विषय क्र.१ - चित्र अवकाश

Submitted by priyalondhe on 31 August, 2012 - 11:55

दिवस वेगाने सरत चालला आहे, संध्याकाळ चोरट्या पावलाने महालात प्रवेशते आहे. इकडे जोधा व अकबर एकमेकांवरील प्रेमाच्या प्रत्ययाने भारावून गेले आहेत. अकबर अचानक काही आठवून जोधाला आपल्या अंतःपुरात घेऊन चालला आहे ... एक अनुपम अशी प्रकाशवेळ गाठण्याकरिता. सूर्य मावळता मावळता एका विशिष्ट कोनातून काही क्षणच सूर्यकिरण तेथील आरश्यावर पडतात आणि ते सारे दालनच सोनेरी प्रकाशात उजळून निघते. आणि जोधा अकबराच्या मीलनोत्कटतेची परिसीमा गाठली जाते ....
ह्या प्रसंगाचे चित्रपटातील यश आपल्याला अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीताच्या कौशल्यापलीकडे कसला तरी वेध घ्यायला भाग पाडते. पण नक्की कसला वेध ? तर संपूर्ण चित्रपटात भरून राहिलेलं अप्रतिम असं "चित्र -अवकाश ". म्हणजेच चित्रपटाचे सेट्स व आशयघन कलादिग्दर्शन !
तशी नितीन देसाई ह्यांच्या कार्याची दाखल लगान , हम दिल दे चुके सनम , देवदास इ . चित्रपटांपासूनच घेतली गेली होती . परंतु जोधा अकबर सिनेमापासून तर मी ह्या कलाकाराची निस्सीम चाहती झाले . ह्या चित्रपटात जोधा व अकबर ह्यांचे महाल तर स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून समोर येतात . मुघल व राजपूत शैलीचे बारकाव्यानिशी दर्शन घडते. चित्रपटातील अनेक महत्त्वाचे प्रसंग त्यांच्या पार्श्वभूमीमुळे उठावदार होतात , लक्षात राहतात. कधी अकबर महालातल्या जाळीदार खिडक्यांमधून जोधाच्या स्वभावातले नाजूक कंगोरे टिपत असतो तर कधी त्याच्या सत्तेची जरब दिवाण-ए-आममध्ये दिसून येते. जोधा जेव्हा संशयाच्या भोवर्‍यात सापडते तेव्हाही कठोर अकबर व अगतिक जोधेच्यामध्ये किल्ल्याचा अक्राळ-विक्राळ दरवाजा करकरत आ वासून उभा राहतो. जोधाच्या माहेरच्या आमेर किल्ल्याची तर शान काही औरच! स्वागतालाच दुमजली सौधातून होणार्‍या फुलांच्या वर्षावाने अकबरच काय तर आपणही सुखावून जातो. त्या दोघातला नाजूक दुरावा अधोरेखीत करण्याकरीतासुध्दा सुंदर नक्षीदार अश्या पडद्याची त्यांच्या दिवाणावर क्षणात योजना होते . ह्यापुढील त्यांच्यातल्या तलवारबाजीचा प्रसंग तर केवळ कमाल ! तलवारबाजी करता करता अकबर निमिषार्धात जोधेला पडद्याच्या जंजाळात अडकवतो. ती कशीबशी त्यातून बाहेर पडते तोच मोगर्‍याचा शिडकावा होतो. सेट्सचा उत्तम वापर आणि नाविन्यपूर्ण प्रणयप्रसंगांची पेरणी ह्यामुळे हा प्रसंग अतिशय संस्मरणीय झालेला आहे.
अश्याच प्रकारचा अनुभव नितीन देसाईंच्या 'राजा शिवछत्रपती' , 'बाजीराव मस्तानी ' ह्या सिरियल्स आणि 'बालगंधर्व' , '1942 अ लव्ह स्टोरी' इ . चित्रपटातूनही आला. देसाईंनी कलादिग्दर्शन ह्या चित्रपटव्यवसायातील शाखेला स्वतंत्र ओळख व शान दिली.
सर्वसामान्य चित्रपटातले नेपथ्य, खोट्या खोट्या हजारेक स्क्वे.फुटाच्या गरिबांच्या झोपड्या, उंची लालभडक गालिच्यांनी सजलेले अतिश्रीमंतांचे प्रासाद किंवा चित्रविचित्र प्रकाशाचे, गुप्त दरवाज्यांचे स्मगलर्सचे अड्डे ह्या स्वरूपातच समोर येत गेले. बर्‍याचदा एखाद्या पार्श्वभूमीचा एखादा कोपराच उभारला जातो. त्यामुळे एकतर तो कृत्रिमही वाटतो आणि कॅमेर्‍याचा वावरही मर्यादित व सेटमधल्या उणीवा झाकणाराच ठरतो. परंतु ह्या सगळ्याला छेद देऊन अभ्यासपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि भव्य अश्या चित्र -अवकाशाची नवी व्याख्याच जणू देसाईंनी बनवली. त्यांना वैशिष्ट्यपूर्ण विषयांची आव्हाने देखील संधीरुपात मिळाली. आता ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’चेच उदाहरण घ्या ना. जवळ जवळ सव्वाशे वर्षांपूर्वीचा भारत अक्षरशः डोळ्यापुढे उभा केला आहे. संवाद , कपडेलत्ते ह्यापलीकडे जाऊन घरातली भांडी -कुंडी , मध्यमवर्गीय वाडे , ट्रामची वर्दळ आपल्याला त्या काळात फिरवून आणते.
कलाक्षेत्रात मुशाफिरी करणारा एक नवोदित कलाकार ते स्वतःच्या एकरोंच्या स्टुडिओत दुसर्‍यांची करोडोंची स्वप्ने प्रत्यक्षात आणणारा "ड्रीममेकर" हा प्रवास केवळ थक्क करून सोडणारा आहे. हा प्रवास उलगडतो तो 'आधुनिक युगाचा विश्वकर्मा ' ह्या त्यांच्या चरित्रातून. कारकीर्दीच्या ऐन भरात असणार्‍या, चाकोरी बाहेरची वाट चोखाळणार्‍या कलाकाराचे चरित्र लिहिले जावे अशी घटना विरळाच!
ह्या प्रवासातल्या टप्प्यांचे अधिक जवळून दर्शन घडण्याची संधी चालून आली ती त्यांच्या N.D.Studioच्या भेटीने. N.D.Studioमधे पडद्यामागच्या दुनियेचे, अथक परिश्रमांचे, परिपूर्ण नियोजनाचे, "नितीन देसाईंच्या कला फॅक्टरीचे" दर्शन घडले. देसाई यांनी Universal Studioच्या धर्तीवर उच्चतम निर्मिती मूल्ये असणार्‍या संपूर्ण स्वदेशी स्टुडियोची स्थापना केली आहे. प्रारंभीच पाच देवतांच्या आशिर्वादाने येणारा प्रत्येकजण प्रसन्न होतो आणि अत्याधुनिक प्रॉडक्शन हाऊसमधे प्रवेश करतो. सर्व सोयींनी युक्त असलेल्या प्रॉडक्शन हाऊसमधे अनेक जुन्या नव्या प्रकल्पांच्या नेपथ्याची प्रमाणबध्द मॉडेल्स्‌ देखील ठेवली आहेत. देसाईंच्या स्वतःच्या कार्यालयातील त्यांच्या वडिलांचा अर्धपुतळा आपले लक्ष वेधून घेतो. आपल्या मुळांशी पक्क्या बांधलेल्या देसाईंबद्दलचा आदर द्विगुणित होतो. देसाईंनी चित्रीकरण संपलेले भव्य सेट्‌स‍ जतन करण्याचा खर्चिक परंतु ऐतिहासिक पायंडा पाडला आहे. त्यासाठी टिकाऊ सेट बांधकामाची स्वतःची पध्दत विकसिक केली आहे. त्यामुळे गेल्या ५-६ वर्षांतले जोधा-अकबर, राजा शिवछत्रपति, अजिंठा, झाशीची राणी असे विविध गाजलेले सेट्‌स पाहण्यासाठी उपलब्ध होते. शिवाय निसर्गसौंदर्य आणि भरपूर outdoor locationsचा तर खजिनाच आहे हा स्टुडियो. वेगवेगळे काळसंदर्भ असलेल्या शेकडो दुर्मिळ वस्तूंचा, कपडेपटाचा शिस्तबध्द संग्रह त्यांच्यातल्या दूरदृष्टी, चिकाटी आणि अभ्यासपूर्ण परिश्रमांचा प्रत्यय देतो.
चित्रपटाने होणारे मनोरंजन हे केवळ मनोरंजन न राहता देसाईंच्या कर्तृत्त्वाने नेत्रसुखद, परिपूर्ण असा भावाविष्कार होऊन गेला आहे. मनोरंजनाला लाभलेले हे नवे परिमाण ही निश्चितच देसाईंची चित्रपटसृष्टीला देणगी आहे. त्यामुळे गाथाचित्रशतीमध्ये चित्र -अवकाशाच्या विश्वकर्म्याचे स्थान अनिवार्य ठरते.

प्रिया लोंढे
नाशिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान लिहिलंयस, प्रिया Happy
अश्विनीला अनुमोदन.

तू स्वतः एक कलाकार असल्यामुळे तुझ्या दृष्टीकोनातून जोधाअकबरचं ते दृष्य पहायला छान वाटलं.
तसंच अजून काही दृष्यांबद्दल वाचायला आवडलं असतं.

पुस्तकाबद्दल आधी माहित नव्हतं.

देसाईंनी कलादिग्दर्शन ह्या चित्रपटव्यवसायातील शाखेला स्वतंत्र ओळख व शान दिली. >> पटले.

अगदी प्रभात युगाच्या चित्रपटातले काही प्रसंग निव्वळ त्यातल्या कलादिग्दर्शनामुळेच आजही आठवतात. उदा. शेजारी मधला धरणाचा प्रसंग, तुकारामातला पुष्पक विमानाचा प्रसंग. दोन्ही चित्रपट बघून खूप काळ लोटलाय. बाकीचे फारसे आठवत पण नाहीये पण हे प्रसंग मात्र अगदी काल बघितल्याप्रमाणे आठवतात.

पण त्याचे कलादिग्दर्शक मात्र नाही माहीत. देसाई हे नाव आज चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त करू शकते. इतकी ताकद आहे त्या नावात.

लेख आवडला पण खूपच त्रोटक वाटला. अजून वाचायला आवडेल.

priya cchan aahe lekh. mala khup awadla. Apan shalet hastalikhitasathi lekh lihaycho. tyachi athwan zali. jodha akbarche scenes dolyasamor ubhe rahile.....

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मायबोलीवरचे हे माझे प्रथमच लेखन असल्याकारणाने विषय- विस्ताराचा अन्दाज कमी पडला. पुढिल लेखनात ह्याची नोंद घेईन.

छान लेख. अश्विनी के +१, त्यांनी ह्या टेक्निकल अंगाला ग्लॅमर मिळवुन दिले.

फक्त एकच तक्रार... त्यांच्या आर्ट डायरेक्शन मधे सगळे अगदी चकचकाट असते. एकदम भव्य दिव्य..... पुर्वी चे त्यांचे चित्रपट खुप जास्त क्रीयेटीव्ह होते असे मला वाटते उदा. परिंदा, सलाम बॉम्बे, माचिस, मिशन काश्मीर. त्यांच्या हल्लीच्या सिनेमात एकसुरी पणा आला आहे. उदा. जोधा अकबर, शिवाजी ( मालिका), देवदास....

एकच गम्मत रच्याकने.....

हे सेट ते भाड्याने देतात. तुम्हाला जर गणेश उत्सवा साठी हवे असतिल तरी त्यातल्या अनेक प्रॉपर्टीज भाड्याने मिळतात. ३ वर्षां पुर्वी आमच्या जवळच्या एका "नेत्या" चा वरदहस्त असलेल्या गणेशोत्सवात 'शिवाजी" सीरीयल मधला सेट होता. आणि १० दिवसांसाठी साधारण २० लाख भाडे घेतले होते. ( एकदम पक्की बातमी)

मला आवडलेले कलादिग्दर्शन आर्थात इतरांचे --

२२ जुन १८९७ ( नचिकेत जयू पटवर्धन ) , मिर्च मसाला , शाम बेनेगलांचे बरेचसे चित्रपट, चक्र, खंडहर, .... बरेच आहेत.

सुंदर माहिती...
देसाईंचे भव्य दिव्य सेट बघायला आवडतात.
N.D.Studio मधे सर्वसामान्यांना प्रवेश आहे का?

९०च्या दशकात पार्ल्याच्या रत्नाकर फडके यांनी कलादिग्दर्शन क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. 'हतियार'च्या कलादिग्दर्शनासाठी त्यांना फ्लिमफेअर मिळालेलं आहे. बॉर्डर, रेफ्युजी सारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटाचे त्यांनी कलादिग्दर्शन केले होते.

अरे वा !

हा लेख कसा सुटला नजरेतून ? चांगल्या विषयावर लिहीलयस. नितीन देसाईंच्या कलादिग्दर्शनाचा १९४२ - अ लव्ह स्टोरी पासून मी पण फॅन आहे. कसौनी नावाचं गावच त्यांच्या स्ट्डीओत उभारलं होतं. अनिल कपूर आणि मनिषाच्या एका गाण्यात दुपट्टा हवेत लहरत असताना पाठीमागे गडद होणारे मावळतीचे रंग किंवा पावसात दिसणारा टेलिफोन बूथ हे इफेक्टस आजही मनात साठवले गेलेत. सिनेमा विधू विनोद चोप्राचा असल्याने पावसातल्या त्या बूथचं दृश्य करीब मधे पुन्हा रिपीट झालंय.

धन्यवाद या लेखासाठी. नाणावलेले कलादिग्दर्शक बिजॉन दासगुप्तांचा उल्लेख नाही केला का ?