विषय क्र. १ : चिरवेदनेचा पुनरुच्चार करणारी वावटळ

Submitted by झंप्या दामले on 29 August, 2012 - 15:24

काही सिनेमे चोरपावलांनी येतात (म्हणजे जवळपास ९०% मराठी सिनेमे याच वर्गात आले) आणि ठसाच उमटवून जातात. फक्त तिकीटबारीवरच नाही, तर मनावर सुद्धा ... अनेक मराठी सिनेमे धापा टाकत दम तोडत असताना अगदी अलीकडच्या काळात एक सिनेमा येऊन गेला कि ज्याने नुसती तगच धरली नाही तर सिनेमाच्या बाबतीत इतिहासजमा झालेली 'ज्युबिलीसु'द्धा पुण्यात साजरी केली - तीही Golden Jubilee !!! आणि आश्चर्य म्हणजे इतके असूनही हा सिनेमा औषधाला सुद्धा चर्चिला गेला नाही. ना त्याचा पुरस्कार सोहळ्यांमध्ये फारसा बोलबाला झाला, ना त्याचे DVD आणि Satellite rights हातोहात खपल्याच्या बातम्या आल्या. पुण्यात जवळपास ६० आठवडे चाललेला असूनही या सिनेमाबाबत माहिती असणारे लोक मला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सापडले, ही आणखी एक चमत्कारिक बाब. मी सवयीप्रमाणे हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात पाहून घेतला होता आणि या सिनेमाने खरंच मनात घर केले केले होते. On The Record 'हिट' ठरलेल्या पण प्रत्यक्षात अनेक बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या या सिनेमाविषयी लिहायचेच असे वाटून अखेर ते लिखाण पूर्ण केलेच.

या सिनेमाचे नाव आहे 'वावटळ'...अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या स्त्रीला भोवंडून टाकणारी वावटळ...

चित्रपटाच्या सुरुवातीलाच राजस्थान सीमेवरच्या एका गावात कमांडो कारवाईत घरात घुसून तिथल्या पुरुषांना ठार केले जाते. हे पुरुष म्हणजे पाकिस्तानी अतिरेकी आहेत आणि त्यांनी या गावात येऊन गावातल्या एका घरात वस्ती केली आहे. पण त्यांच्या सोबत एक स्त्री (तेजस्विनी पंडित) देखील जणू काही त्यांचीच कुटुंब सदस्य असल्याप्रमाणे तिच्या लहान बाळासोबत राहात असते. मध्यरात्रीच्या अचानक झालेल्या धुमश्चक्रीमुळे गावकरीपण हबकले आहेत. ते कमांडो पथकाचा प्रमुख K5 ला (अशोक समर्थ) सांगतात, की या स्त्रीला घेऊन जा कारण ही या गावची नाही. अतिश्रमाने थकलेली ती स्त्री कशीबशी चार पावले टाकून बेशुद्ध होते. K5 तिला गाडीत घालतो. आणि BSF (सीमा सुरक्षा दल) च्या तळावर, घेऊन
जातो आणि त्या स्त्रीला BSF च्या कमांडर चौहानच्या (विनय आपटे) ताब्यात देतो. या ठिकाणी या K5चे काम संपणे अपेक्षित आहे. कारण कमांडोचे काम गुप्त कारवाया करून अतिरेक्यांना कंठस्नान घालणे आणि BSF मदत करणे असले तरी BSF ऑफिसरच्या इतर आज्ञा पाळण्यास तो बांधील नाही. त्यामुळे तो सरळ तिथून निघून आपल्या खोलीत निघून जातो.

पण त्याच्यासमोर वेगळेच ताट वाढून ठेवलेले आहे.

ती स्त्री आपली पार्श्वभूमी काही केल्या चौहानला सांगत नाही.... किंबहुना ती तोंड उघडायलाच तयार नाहीये..... ती बराच मोठा काळ कसल्यातरी 'शॉक' मध्ये आहे... तिची तब्येत कशी आहे हे पाहायला K5 तिला ठेवलेल्या खोलीत येतो. त्याला पाहून तिला आठवते की 'हाच आपली सुटका करणारा आहे' आणि ती कृतज्ञता व्यक्त करते. पण तो निघून गेल्यावर मात्र पुन्हा मूग गिळून गप्प बसते. चौहानच्या लक्षात येते की तिचा पुरुष जमातीवरचा विश्वास संपूर्णपणे उडाला आहे आणि K5 हा हिच्यासाठी देवदूत असल्यामुळे हिचा फक्त त्याच्यावर विश्वास आहे. तिला बोलते करायचे तर याला समोर उभे करणे गरजेचे आहे. म्हणून तो K5 ला गळ घालतो "कृपया या स्त्रीच्या भल्यासाठी मला मदत कर". पण K5 सांगतो "सर, आम्हाला अशा भावनिक गोष्टीत अडकण्याची परवानगी नाही.मला तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीत अडकवून नका. आणि एकदा जर का मी यात लक्ष घालायचे ठरवले तर मग तुम्ही काहीही झाले तरी मला यातून बाहेर काढू शकणार नाही..... तुम्हाला फार जड जाईल ते...." कमांडोंना असेच प्रशिक्षण दिलेले असते की कोणत्याही भावनांना बळी पडणे त्यांना शक्यच होऊ नये .... कोणी ओळख काढून देखील त्यांना असल्या गोष्टीत गुंतवू नये म्हणून त्यांची ओळख देखील इतकी गुप्त असते की अशोक समर्थ केवळ K5 या गुप्त नावाने ओळखला जात असतो... हे सारे असूनही चौहान K5 ला दादापुता करून तिच्यासमोर उभं करतो ते तिच्याकडून तिची आणि पर्यायाने तिच्या सोबतच्या अतिरेक्यांची माहिती काढून घेण्यासाठी ..... त्यामागचे कारण स्पष्ट असते. चौहानला काहीही करून अतिरेक्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांपर्यंत पोचवणे भाग असते. त्यामुळे तो तिची काळजी करतोय असा कितीही भाव दाखवत असला तरी तिच्या वैयक्तिक पूर्वायुष्यात काय झाले याच्याची त्याला फारसे काही देणे घेणे नसते. तिच्यावर गुदरलेल्या भीषण परिस्थितीची कल्पना आपल्याला येते तिने सांगितलेल्या माहितीतून. लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईला फिरायला जुईली मानकर नावाच्या या तरुणीचं आलेल्या हिंदू - मुस्लीम दंगलीत अडकणं, मुस्लीम टोळीच्या म्होरक्याने तिला पळवून नेणं, तिला एका godown मध्ये डांबून ठेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणं, त्यातूनच तिला मूल होणं, अतिरेक्यांच्या टोळीचं तिला तान्ह्या बाळासह राजस्थान सीमेवर घेऊन जाऊन निर्दयीपणे वाट तुडवायला लावणं, यामध्ये तिचं आयुष्य वावटळीतल्या पाचोळ्यासारखं दिशाहीन भोवंडत राहिलेलं असतं .

Vavtal 2.jpg

तिथून सुटका झाली तरी तिची परवड थांबलेली नसते.

लष्करामार्फत मजल दरमजल करत सून सापडल्याचा संदेश जेव्हा तिच्या सासरी पोचवला जातो आणि तिला पोचवायची व्यवस्था करत आहोत असे कळवले जाते तेव्हा तिच्या वरच्या संकटा विषयी आणि त्यातून तिला झालेल्या अपत्याविषयी कळल्याने त्यांचे चक्क 'No Thanks' वाले पत्र येते. इतकेच नव्हे तर इतकेच नव्हे तर आमदार असणारे तिचे सासरे आपले सगळे वजन वापरून आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत संधान बांधून जुईलीची पाठवणी परस्पर महिला आधारगृहात करायचे आदेश काढायला लावतात. K5 ला हे कळते तेव्हा तो अतिशय व्यथित होतो. केवळ अतिरेक्यांचे धागोदोरे शोधण्यापुरतेच तिला (आणि तिच्याकडून माहिती काढण्यासाठी पर्यायाने K5 ला) वापरून घेतल्याबद्दल चौहानला सुनवायलाही कमी करत नाही. आधी त्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आता त्याला या प्रकरणातून बाहेर काढणे चौहानला अवघड झालेले असते. चौहान "वरिष्ठांपुढे माझे हात बांधलेले आहेत" असे उत्तर देऊन जुईलीला मदत करण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगतो. शिवाय सुट्टीसाठी कोल्हापूरला घरी निघालेल्या K5लाच जुईलीला दिल्लीतील महिला आधारगृहा मध्ये पोचवून मगच महाराष्ट्रातल्या स्वतःच्या गावी जाण्याची विनंती करतो.

पुन्हा एकदा हे भावनिक प्रकरण गळ्यात येऊन पडल्याने K5 अस्वस्थ होतो. शेवटी एक कर्तव्य म्हणून जुईलीला घेऊन रेल्वे स्टेशनवर येतो, पण तिला दिल्लीला पोहोचते करण्याऐवजी सरळ दुसऱ्याच गाडीत चढतो आणि तिला घेऊन थेट सावंतवाडीला तिच्या सासरी येऊन धडकतो.

Vavtal 3.jpg

सुनेला दरवाजात उभे राहिलेले पाहून सासरचे लोक स्तंभित होतात. जुईलीचे आयुष्य रुळावर आणण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून, K5 तिच्या सासऱ्यांना तिला पुन्हा विनंती करतो पण अपेक्षेप्रमाणे तेही हात झटकतात. आता मात्र K5 संतापतो आणि सासऱ्यांना बरेच काही सुनावतो. तिचा काहीही दोष नसताना तिने किती आणि का सहन करायचे असा प्रश्न विचारतो. सासरे निरुत्तर होतात. पण आता काहीच होऊ शकणार नसते. जुईलीच्या नवऱ्याचे दुसरे लग्न ठरलेले असते. आता जुईलीला तिच्या बाळाशिवाय खऱ्या अर्थाने स्वतःचे अस कोणीही उरलेले नसते.... परिस्थिती ओळखून जुईली बाहेर पडते. जुईलीला सासर परत मिळवून द्यायचे अशा निश्चयाने आलेला K5 सुद्धा नाईलाजाने जड पावलांनी निघतो.... बाहेर पडता पडता K5 थबकतो, काही एक विचार करतो आणि सावकाशपणे आणि विचारतो "घरी माझी आई आहे, स्वतःची थोडी शेती आहे. माझ्याशी लग्न करशील?" ती काहीच बोलत नाही पण तरीही मूकपणे त्याच्यासोबत चालू लागते आणि सिनेमा संपतो.....

अनंत सामंतांच्या ‘K5’ या कादंबरीवरचा हा सिनेमा..... एक स्त्री काहीही संबंध नसताना, चूक नसताना कशी होरपळते आणि तिची सदोदित परवडच कशी होत जाते याचे हे व्यथित करणारे चित्रण... सिनेमा आपल्याला सतत प्रश्न विचारात राहतो, "चूक कोणाचीही असली तरी भोग स्त्रीच्याच नशिबी का ?? दोष तिच्याच माथी का ??" कुठेही melodramatic न होऊ देता केलेली संयत हाताळणी हे या सिनेमाचे बलस्थान. त्याचे श्रेय दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना द्यायला हवे. विशेषतः शेवटचे K5 चे सासऱ्याची कानउघडणी करण्याचे दृश्य तर आक्रस्ताळे आणि melodramatic होऊ शकले असते, पण अशोक समर्थचा मुळातलाच खर्जातला जबरदस्त प्रभावी आवाज आणि काहीही झाले तरी K5 हा घरात आलेला आगंतुक आहे याचे दिग्दर्शकाने ठेवलेले भान यामुळे संपूर्ण प्रसंगाचा 'टोन' खालचा ठेऊनदेखील K5 चे बोलणे अतिशय प्रभावी ठरते.

संपूर्ण सिनेमामध्ये बलात्कारी अतिरेकी (मुकेश तिवारी) वगळता इतर कोणतेही पात्र थेट वाईट किंवा खलनायकी म्हणून येत नाही. चांगला आणि वाईट या रंगाच्या मधली असणारी, पात्रांना 'ग्रे' शेडमध्ये वागवणारी तात्कालिक परिस्थिती किंवा नियती ही देखील अनेक वेळा प्रभावी ठरत असते हेच यातून जाणवत राहते. याची दोन उदाहरणे आहेत. पहिले उदाहरण पुन्हा वर उल्लेखलेल्या प्रसंगाचेच द्यावे लागेल. तोपर्यंत जुईलीची सुधारगृहात पाठवणीची व्यवस्था करून तिला नाकारणारे सासरचे लोक हे आपल्या दृष्टीने दुष्ट-निर्दयी वगैरे झालेले असतात पण शेवटच्या प्रसंगात मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि पूर्वग्रह काहीसा बदलतो. एका स्त्रीची वेदना जाणवून अकृत्रिमपणे हळवी होणारी जुईलीची सासू आणि बोलण्याची इच्छा असूनही पुढे येऊन न बोलता केवळ मूकपणे आणि अस्वस्थपणे जुईलीकडे पाहणारा तिचा नवरा यांना पाहिले की ते परिस्थितीला शरण जाणारे, अप्रिय सत्याला उंबऱ्याबाहेर ठेवून सोयीस्कर आडोसा शोधणारे मर्त्य मानव वाटायला लागतात.

एखाद्या पात्राला सरसकट वाईट न ठरवता त्यावर प्रेक्षकाला फेरविचार करायला भाग पाडणारं दुसरे उदाहरण कमांडर चौहान. BSF च्या Headquarters मधून K5 जुईलीला घेऊन पोहोचवण्यास निघतो तेव्हा वाटेत त्यांना गाठून निरोप द्यायला चौहान स्वतः येतो. सुरुवातीपासून कर्तव्य कठोर असणारा, अतिरेक्यांचा माग काढेपर्यंत जुईलीशी आपुलकीने वागून नंतर मात्र तिला तिच्या सासरी नेऊन सोडण्याची जबाबदारी घेण्याऐवजी सरळ "वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला महिला आधारगृहात पाठवायला लागेल" असे सांगून हात झटकणारा 'कमांडर' चौहान या ठिकाणी जुईलीच्या बाळासाठी खेळणी भेट देताना आणि एखाद्या बापासारखा हळवा होऊन डोळ्याच्या कडा पुसत जुईलीला निरोप देताना दिसतो. हा प्रसंग खरोखरच touching झाला आहे. माझ्या मते संपूर्ण चित्रपटातला हा सर्वोत्कृष्ट प्रसंग आहे.

अभिनयाच्या बाबतीत अशोक समर्थ नेहमीप्रमाणेच दमदार आहे. तगड्या व्यक्तिमत्वाचा, थंड रक्ताचा, मिळालेल्या प्रशिक्षणानुसार कोणत्याही भावनिक गुंत्यात न अडकणारा, पण अखेरीस जुईलीची फरफट पाहून अस्वस्थ होऊन तिला तिचे पूर्वायुष्य परत मिळवून देण्यासाठी सूत्र हातात घेऊ पाहणारा कमांडो त्याने सुरेख साकारलाय. विनय आपटे आणि अशोक समर्थ या दोघांमधल्या शाब्दिक चकमकी लक्षात राहण्यासारख्या झाल्या आहेत आणि या दोन्ही अभिनेत्यांची क्षमता पूर्णपणे दाखवून देणाऱ्या असल्यामुळे समाधान देणाऱ्या आहेत. फक्त चौहानचे सुटलेले पोट पाहून मात्र हा असा पेटू माणूस BSF मध्ये ऑफिसर कसा असेल असा प्रश्न मला छळत होता. तेजस्विनी पंडितला 'सिंधुताई सपकाळ' सोबतच याही सिनेमामध्ये हेवा वाटावा अशी भूमिका मिळाली आहे. अतिरेक्यांच्या कळपासोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरफटत जाणारी, त्यांच्याकडून वारंवार उपभोगली गेल्याने दगडासारखी सुन्न-बधीर झालेली आणि तरीही बाळावर माया करणारी स्त्री तिने समरसून रंगवली आहे. जुईलीला कित्येक महिने एका godown मध्ये बंदिस्त करून तिला कायम अर्धनग्नच ठेवणारा, तिच्यावर वारंवार बलात्कार करणारा विकृत उलट्या काळजाचा नराधम मुकेश तिवारीने जबरदस्त साकारला आहे. सुऱ्याच्या धारदार पात्याने जुईलीचे तळपाय उकरण्याचा प्रसंग शहारे आणतो. मी मूळ कादंबरी वाचलेली नाही, पण मी एके ठिकाणी वाचलेल्या परीक्षणानुसार मूळ कादंबरीत तिच्यावरच्या अत्याचाराची याहून भयानक वर्णने आहेत. कदाचित मराठी प्रेक्षकाची प्रकृती-प्रवृत्ती आणि मर्यादा लक्षात घेऊन दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी हे प्रसंग थोडक्यात उरकले असावेत. दंगलीचे दृश्य देखील सपक वाटते. अर्थात या त्रुटी माफक आहेत. सुरुवातीला दाखवलेली कमांडो कारवाई दमदार आहे. संपूर्ण चित्रपट प्रभावीपणे उभा करण्यामध्ये छायाचित्रणाचादेखील वाटा आहे. मराठीत सिनेमा मध्ये यापूर्वी न आढळलेली राजस्थानची रखरखीत पार्श्वभूमी कॅमेऱ्यात चांगली टिपली आहे आणि ती जुईलीच्या आयुष्यातल्या रखरखटाशी कळत नकळत खूप सुसंगत ठरते.

सतत भोगत आलेली आणि वारा नेईल त्या दिशेला भेलकांडत राहणारी सिनेमातली स्त्री मला फक्त कथानकापुरती मर्यादित वाटलीच नाही. कुठल्याही अप्रिय घटनेची परिणती अंतिमतः स्त्रीला दोषी
ठरवण्यात किंवा तिचे हक्क (अनेकदा जगण्याचा हक्कही) नाकारण्यात होते हे आदिकालापासून चालत आलेले आणि अजूनही रोज दिसत असलेले वास्तव मला या सिनेमातून पुन्हा अधोरेखित झाल्यासारखे वाटले. थिएटर बाहेर पडत असताना अस्वस्थतेसोबतच एक चांगला सिनेमा पाहिल्याचे समाधान देखील वाटत होते.

आवर्जून पहावा असा हा लक्षवेधी सिनेमा या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल अशी मला खात्री आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. तो फोटोतला मॅन आहे तो समर्थ का? असे लोकही प्रत्यक्षात कमीच भेट्तात. फायदा घेऊन सोडून देण्याकडेच कल दिसतो. कथा खूप छान वाट्ते आहे आणि वास्तववादी पण. नक्की बघेन शेवटाचा परिच्छेद सुरेख लिहीला आहे.

फारच सुंदर लेख. (इतके कमी प्रतिसाद?)

प्रत्येक वाक्य आवडलं! स्पेशली, (मुकेश तिवारी सोडून) कोणतेही पात्र थेट खलनायकी नसणे हे आणि 'एखाद्या स्त्रीची काहीही चूक नसताना तिच्या नशिबी ही ससेहोलपट येणे दाखवणे ' हे! तसेच, तुम्ही ज्या तन्मयतेने वर्णन केले आहेत ते तर फारच आवडले.

शुभेच्छा

फार आश्चर्य (आणि वाईटही) वाटतंय माझे मलाच कि इतका आगळावेगळा चित्रपट असूनही मला माहितही नाही याबद्दल ????

दामले - तुम्ही फार सुंदर लिहिले आहे या चित्रपटाविषयी......
या चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद...

हा सगळा विषय लक्षात येता सुन्नच झालो मी - असा चाकोरीबाहेरचा चित्रपट काढणारा निर्माता, दिग्दर्शक, इ. - सगळेच महान...

मी मूळ कादंबरी वाचलेली नाही, पण मी एके ठिकाणी वाचलेल्या परीक्षणानुसार मूळ कादंबरीत तिच्यावरच्या अत्याचाराची याहून भयानक वर्णने आहेत. कदाचित मराठी प्रेक्षकाची प्रकृती-प्रवृत्ती आणि मर्यादा लक्षात घेऊन दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी हे प्रसंग थोडक्यात उरकले असावेत. >>>>

मुळ कादंबरी " के-५ " पहिले मला वाटतं मौज किंवा तत्सम दिवाळी अंकात प्रसिध्ध झाली होती. त्या वेळेस मी कॉलेजात होते. ती कादंबरी वाचुन मी उध्वस्त झाले होते. मग मोठी झाले एकदा कधीतरी ते पुस्तक हाताला लागले. तीरमीरीत अनंत सामंताना पत्र लिहिले. त्यांचा एकदा फोन आला. आणि त्यांना पहिला प्रश्ण मी विचारला " हे सगळं खरं आहे का?" त्यांनी सांगितले " हे मी लिहिलेले प्रत्यक्ष घटने पेक्षा खुपच सौम्य आहे. " ऐकुनच धक्का बसला. नंतर झपाटल्या सारखी त्यांची इतर सगळी पुस्तके घेवुन वाचली.

माझी खात्री आहे की चित्रपट खुपच सौम्य झाला असणार. कारण ती कादंबरी शब्दशः सिनेमाच्या फ्रेम मध्ये आणायची ठरवली तर एक तर कोणी कलाकारच तयार होणार नाहीत. मुळ कादंबरीत तो अतिरेकी ( बहुदा जफार खान ) जुईली मानकर ला सतत कुत्र्या सारखी एका कोपर्‍यात बांधुन ठेवतो आणि ते ही संपुर्ण नग्न. तेही एक दो महिने न्हव्हे तर सतत म्हणजे साधारण १ वर्षा पर्यंत. तिचे काम फक्त मादीचे. तिचे जेवण तो भरवणार. ती पळुन जाउ नये म्हणुन तो तिच्या पायावर रोज जखमा करत असतो. आणि स्वतः मलम पट्टी करत असतो. तिकडच्या तिच्या आयुष्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही असे वर्णन आहे. अक्षरशः वाचवत नाही. शेवट पर्यंत ते नग्नच असते अगदी ती जेंव्हा के-५ ला मिळते तेंव्हाही ती नग्नच असते आणि तिच्या पायाला दोरी असते. तिला बोलते करायला महत प्रयास पडतात. तिची जबानी लिहुन घेणार्‍यालाही ऐकुन मल्मळायला लागतं.

पण ही खरी घडलेली गोष्ट आहे. जुइली मानकर खरच अस्तित्वात आहे. स्वतः लेखकाने सांगितल्या मुळे च फक्त विश्वास बसला.

चित्रपट चांगलाच असणार, पण कादंबरी भयानक आहे. पण अतिषय वाचण्या सारखी. पुर्ण अंगावर येते. मी जेण्व्हा मोठी झाल्यावर ती परत वाचली तेंव्हाही ३-४ दिवस अस्वस्थ होते.

अजुन पाहीलेला नाहीये पण ऐकलं आहे या चित्रपटाबद्दल! आता बघायलाच हवा.

लेख खुपच मनापासुन लिहिला आहे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा!

मी पण फक्त वाचले होते या चित्रपटाबद्दल. आता बघायला पाहिजे.
याच नावाचा एक अगदी जूना मराठी चित्रपट होता.

कादंबरी वाचली आहे. वाचून खूप अस्वस्थ झाले होते. अश्या लिखाणाला आवडले असे पण म्हणवत नाही. Sad

सिनेमा बद्दल माहित नव्हते. पण हा लेख वाचून तो पहावासा वाटत आहे. खूप छान लेख.

>>ही खरी घडलेली गोष्ट आहे

बाप रे! नुस्ता हा लेख वाचूनच कसंतरी होतंय. माझ्याच्याने काही हा चित्रपट बघितला जाणार नाही. लेखाद्वारे ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

अनेक दिवसांपूर्वी रात्रीची झोप उडवलेल्या या कादंबरीची आठवण झाली, परत एकदा हा लेख वाचताना अंगावर काटा आला, अस्वस्थ, केवळ अस्वस्थ हेच एकमेव फिलिंग Sad

मोहन की मीरा, जफार खान नाही, रहिमतखान

झंप्या दामले, थेट भिडणारा लेख! पण आशयामुळे सुरेख म्हणवत नाही! Sad उत्कृष्ट परिचयपर लेखाबद्दल आपलं अभिनंदन.

मंजिरी सोमण, हो, कादंबरीतलं त्याचं नाव रहिमतखान आहे. गंमत म्हणजे कादंबरीत लेखकाने त्याच्या पोराला नावच दिलेलं नाहीये. नुसतं एक मादी म्हणून जुईलीचं अस्तित्व प्रकर्षाने ध्यानी यावं म्हणून की काय! Sad

पुरंदरे शशांक, चाकोरीबाहेरचा चित्रपट अशाच चाकोरीबाहेरच्या कथेवर आधारित आहे. त्यामुळे लेखक अनंत सामंतही महान म्हणायला पाहिजेत.

मोहन कि मीरा, मीपण वाचलीये ती कादंबरी. प्रचंड अस्वस्थ करते. आपला समाज एव्हढा षंढ झालाय की धुरकटलेलं पात्र सरळ फेकून द्यावं? नीट साफसूफ करून घ्यायला नको? एकंदरीत भारतीय समाजाची विजिगिषु वृत्ती कमी पडते. कमांडो कारवाईत आपला देश इतका पुढारलेला आहे, पण खचलेल्या माताभगिनींना कुणी आधाराचं बोटही पुढे करीत नाही! जुईलीची फरपट आणि समाजाची अगतिकता, दोन्हीही प्रचंड अस्वस्थ करतात. :-(अरेरेअरेरे

आ.न.,
-गा.पै.

आधी लेख वाचून आणि मग मोकामींचा प्रतिसाद वाचून सुन्न झाले मी.
स्वप्ना म्हणते तस माझ्यानेही हा सिनेमा बघितला जाणार नाही. लेख वाचल्याने आलेली अस्वस्थताच इतकी भयानक आहे की पुस्तक वाचणे आणि सिनेमा पहाणे दोन्ही गोष्टी मला शक्य नाहीत.
रात्री झोपताना "आज माझ्या जवळ काय आहे" हा प्रश्न ज्याला पडतो ना त्याने हे सगळं आठवावं आणि आपलं आयुष्य किती सुखी आणि सुरक्षित आहे त्याचा विचार करावा.

तुम्हा सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
बऱ्याच जणांना हा सिनेमा माहीतच नाही असे दिसते आहे. साहजिकच आहे, कसलीही प्रसिद्धी न करता आलेला हा सिनेमा.... पुण्यात चालला बराच, पण पुण्याबाहेर बहुदा प्रदर्शितच झाला नसावा, हे दु:खद आहे..

साहजिकपणे बहुतेकांकडून प्रसिद्ध 'Masterpeice' सिनेमांबद्दल बऱ्याचदा लिहिले जाते. म्हणूनच 'वावटळ' सारख्या दुर्लक्षित सिनेमावर मी मुद्दामूनच ठरवून लिहिले. या व्यतिरिक्त आणखी एका सुरेख सिनेमावर लिहायची इच्छा होती पण त्यातले तपशील स्मृतीमध्ये पुसट झाले असल्यामुळे जमले नाही. तो होता चिन्मयी सुर्वे आणि सचित पाटील अभिनित आणि शिवदर्शन - अमित दिग्दर्शित , व.पुं.च्या कथेवर आधारित Touching सिनेमा 'रंग मनांचे'. मला खात्री आहे हा सिनेमा पाहिलेले माझ्याशिवाय फारतर ८-१० प्रेक्षक अस्तित्वात आहेत. जर वाचकांपैकी कोणी हा सिनेमा पहिला असेल तर नक्की कळवा.

मराठीत चांगले सिनेमे येत नाहीत किंवा तेच तेच विषय असे म्हणणाऱ्यांना हे सिनेमे हे एक चांगले उत्तर आहे ....

हा सिनेमा माहित नव्हता. पण तुमचा लेख खूप परिणामकारक असल्याने सिनेमाची पुर्ण कल्पना आली. शुभेच्छा Happy

@मोहन कि मीरा : हे कथानक खरे आहे ??? बापरे, हे तर अजूनच अस्वस्थ करणारे आहे .....माहिती बद्दल धन्यवाद
@ vijaykulkarni : माझ्या अंदाजानुसार हा सिनेमा DVD वर सुद्धा उपलब्ध नाहीये.... झी टॉकीज वर कधीतरी लागेल या आशेवर काळ कंठावा लागेल या पुढे ....

दामलेजी नमस्कार, मी ही कादंबरी आणी दिवाळी अम्कात दोन्हीकडे वाचली आहे.
अगदी सगळी वर्णने अंगावर येतात आणि मुंबै ते दिल्ली असा विमान प्रवासातले सगले प्रसंग कस्ट्म आणि इतर अधिकार्यांची सम्धी साधु लाळ्घोटे पणा अक्षरशः चीड आणतो
लवकर हा चित्रपट झी वर लागु दे अशी आशा करु या

@मोहन कि मीरा : हे कथानक खरे आहे ??? बापरे, हे तर अजूनच अस्वस्थ करणारे आहे >>>

दुर्दैवाने खरे आहे. भारता ला लाज आणणारे आहे. दहशदवाद हा घरा घरात घुसलेला आहे. लेखकाशी जेंव्हा मी बोलले तेंव्हा ही मी त्यांचे अनुभव ऐकुन अजुनच सुन्न झाले. ते म्हणाले की मी ऐकलं, पाहिलं त्याच्या ५०% सुध्धा लिहु शकलो नाही. आणि सिनेमाचे वर्णन बघता त्यात कादंबरीतलं ५०% सुध्धा आलं नाहिये. म्हणजेच वास्तव किती भीषण असेल !!!!

मंजीरी धन्स..... चुक सुधारल्या बद्दल.

मोकीमी अनुमोदन. अनंत सामंतांचा फॅन एम टी आयवा मारु पासूनच. माईन फ्राईन्ड, त्रिमाकासी मादाम, ऑक्टोबर एन्ड, के फाईव्ह आणि चक्क लांडगासुद्धा. एक से एक.

प्रत्येक माध्यमाला त्याची बलस्थानं आणि अर्थातच मर्यादाही असतात. पुस्तक हे तुम्हाला गुंतवून विचार करायला भाग पाडते. म्हणूनच त्याची ईन्वॉलव्हमेन्ट जास्त वेळ टिकते.

चित्रपट घटना 'दाखवून' त्याविषयीच विचार करायला लावतो. म्हणून त्यातल्या पात्रांच पुढे काय झालं असले प्रश्न सहसा आपल्याला पडत नाहीत. जर तुमच्या आयुष्यात तश्या अथवा साधर्म्य दाखवणार्‍या व्यक्तिरेखा अथवा प्रसंग आले असल्यास गोष्ट वेगळी.... (हे माझे दोन पैसे)

अण्णा, विमानप्रवास ??

चांगला लेख आणि परिचय.. ह्याची छोटी अ‍ॅड सकाळ्मधे रोज यायची. तेव्हा पाहिला नाही ह्याचे खरेच वाईट वाटत आहे. अजून असे चांगले पण जास्त प्रसिद्धी न मिळालेले मराठी चित्रपट असतील तर जरूर सांगा.

चांगला परिचय...
अश्याच विषयावर एक हिंदी सिनेमा आहे : दंश
के के मेनन आणि सोनाली कुलकर्णीचा.

Pages