वाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 August, 2012 - 09:23

गझल
वाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे!
शोधतो जो तो मला अन् मी न कोणा सापडे!!

एक मी माणूस आहे चारचौघांसारखा;
का मला देवाप्रमाणे घालता हो साकडे?

एवढ्या मोठ्या नदीच्या राहुनी पात्रामधे;
हाय, हे पाषाण सारे कोरडेच्या कोरडे!

हा स्मशानी शांततेचा गलबला सोसू कसा?
केवढा करतात गलका या स्मृती चोहीकडे!

कोण जाणे, हा मुक्याने फोडला टाहो कुणी;
का बरे गझलेत वाटे हुंदका कुठला दडे?

मी किती लिंपू? कितीदा जिंदगी ही सारवू?
सारखे निघतात माझ्या वेदनांचे पोपडे!

या कळा संवेदनांच्या, अन् मुक्या या वेदना;
मी कसा शब्दात मांडू? शब्द माझे तोकडे!

कोणतेही स्वप्न सहजी ना कधी साकारले;
मोल रक्ताचे दिले मी जागजागी रोकडे!

नाचले घेवून ज्याला काल ते डोक्यावरी;
आज नावानेच त्याच्या फोडती सारे खडे!

उंच शिखरांना यशाच्या पाठमोरे पाहिले!
रोज पादाक्रान्त केले अपयशाचे मी कडे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑर्फीशी सहमत !

अजकाल (दोन एक दिवस झाले) नेहमीपेक्षा जरा वेगळ्या धाटणीच्या वाटू लागल्यात सर तुमच्या गझला

मजा आगया सर

वैभवा!
मतल्याचा तुला समजलेला अर्थ सांगशील का?
काय म्हणायचे आहे आम्हाला या मतल्यात?
कुणाला उद्देशून असावा हा मतला? अंदाज?
..........प्रा.सतीश देवपूरकर

थाम्बा प्रयत्न करतो..........

१)मी अखंड होतो माझ्यावर प्रहार असे झाले की मी अनेक तुकड्यात विभागालो गेलो आता लोक मला शोधू पाहतात अन(इथे "पण" अजून छान वाटले असते ) मी कुणाला सापडलो नाही

२)माझ्या शेरास जरी एक निश्चित असा अर्थ होता तरी लोकांनी माझ्या शेरास अनेक अर्थ लावले(चीरफाडच जास्त केली ) ...पण ते विखुरालेल्यासारखे वाटू लागले मग लोकांनी माझा खरा अर्थ शोधू पाहीला पण मी आता कुणासच सापडत नाहीये

दुसरा अर्थ लक्षात घेतला तर 'ग्रेस'ना उद्देशून चपखल बसेल हा शेर !!

पहिला अर्थ घेतला तर हा शेर एखाद्या तुम्हास आवडलेल्या इतर गाझलकाराच्या शेरातून स्फुरला आहे असे मानले (समजून चाला की असे झालेय म्हणून) तर हा शेर भट साहेबाना उद्देशून वगैरे असू शकतो (आपले गुरू यास्तव आपणावर त्यांचाच सर्वाधिक प्रभाव पडला आहे असे गृहीत धरल्यास)

अजून काही वेगळे असेल तर क्षमस्व!!

वैवकु

वैभवा! चतुरपणे उत्तर दिलेस! अरे मी थट्टा नाही करत रे बाबा!
मला फक्त बघायचे आहे की माझा शेर किती थेट आहे व तो कसा sound होतो आहे. एकच (hint) सागू इच्छितो की, हा शेर अर्थाने बहुपदरी/व्यामिश्र/complex आहे.
..........प्रा.सतीश देवपूरकर

हा स्मशानी शांततेचा गलबला सोसू कसा?
केवढा करतात गलका या स्मृती चोहीकडे!>>>>

हे आवडले

शांततेचा गलबला हे oxymoron हि आवडले...