विषय क्र.१- 'दिल्से वासेपूर'

Submitted by ट्यागो on 14 August, 2012 - 17:11

’दूध का कर्ज’ नामक चित्रपट आम्ही थेटरात पाहिलेला पहिला. पहिला म्हणजे अगदी आयुष्यात पहिल्यांदाच. मामासोबत. त्यातला तो ’महान’ सीन चालू असताना अख्खं टॉकीज शिट्ट्या न् गोधंळानं हैदोसलं होतं. पाच-सहा वर्षांचं वय ते, तेव्हा काय कळतंय तसलं काही? पण पब्लिकचा जामच राग आलेला. "हे असले कसले लोक? शांतपणे पहावं की उगीच कशाला बोंबलतायत" असं मामाला विचारायला गेलो तर त्याचा जबडा ’आ’ झालेला. त्याच्या डोळ्यातली हावरी चमक काही वर्षांनी जेव्हा आमच्या डोळ्यांत आली तेव्हा कुठे त्या ’सीन’चे माहात्म्य कळले!

त्यानंतर मग बरेच पिक्चर पहात गेलो. घरच्यांच्या कृपेमुळे ’शोले’ वगैरे रेडिओमुळे आधीच तोंडपाठ झालेला. मग काही वर्षांनी टीव्हीवर त्याचे दर्शन झालेच. त्यावेळी दूरदर्शन दोन चॅनल घेऊन आलेला जवळपास प्रत्येकाच्या घरात. बातम्या, ठराविक वेळेचे कार्यक्रम, गाण्यांचे कार्यक्रम, मालिका, सगळं टाईमटेबल कसं तोंडपाठ. तेव्हा पिक्चरला पण चार-पाच फॅमिल्या एकत्र जायच्या. महाराष्ट्रात अलका कुबलने माहेरच्या साडीतून आणलेला पूर आमच्या गल्लीनं महीनाभर तरी अनुभवला.

मित्रामित्रांत गाण्यांच्या भेंड्या हा आवडीचा खेळ. आमिरचं ’आज ना छोडेंगे तुझे.. दम दमा दम’ कितीही दम लागला तरी बोंबलायचोच. तो ’दिलवाले’ तर कहरच. महाराष्ट्रातल्या कुठल्याही वडापवाल्याकडे, रिक्षावाल्याकडे हि दिलवालेची कॅसेट असतेच. शिवाय ’आशिकी’ अन् ’अल्ताफ़ राजा’ ह्या त्यांच्या खास आवडी. या गाण्यांमधे हाईट म्हणजे ’बेवफ़ा’ चित्रपटातली गाणी. त्यातलं ’आज ही हमने बदले है कपडे, आज ही हम नहाये हुए है’ हे ऑलटाईम फ़ेवरेट! नाहीतरी नव्वदनंतर आलेले बरेचसे डब्बापट संगीतातही बकवासच. पण आमचं लहाणपण मात्र व्यवस्थित गेलं त्याच गाण्यांवर. आजही कधी समवयस्क मित्र जमलो की निव्वळ भंपक गाण्यांच्या भेंड्या जवळपास चार-पाच तास खेळतो ते ह्याच देणगीमुळे! कधी-कधी वाटतं इतका कचरा कसा काय डोक्यात मावू शकतो? पण ज्या जाणिवेनं चांगल्याची आवड वाढत गेली, त्याच नावडीमुळे हा कचराही तसाच असावा.

असंच ९८ च्या सुरवातीलाच ’दिल से’ वरचा लेख वाचलेला पेपरात. हळूहळू गाणीही हिट होत होती. एवढं असुनही पिक्चर आला कधी न गेला कधी कळलं नाही. आमच्याकडच्या एकमेव ’नीलकमल’ थेटरात त्याचा शो झालाच नाही. पिक्चरची गाणी तर तोंडात फ़िट्ट बसलेली. भंगार पिक्चरेय वगैरे रिव्ह्यूज व्हाया माउथ पब्लिसिटी ते पेपर (वृत्तपत्र हो) आमच्या पर्यंत आलेले. त्यामुळे बघायची वगैरे जी हौस होती ती पुरती शमलेली. त्याच दरम्यान मधेच एकदा केबलवाल्यानं रात्रीचा लावला तो पिक्चर. मी अखंड पाहिला तेव्हा मध्यरात्रीपर्यंत जागून. एकही सीन न दवडता. बस्सं; अख्खं बालपण-लहानपण संपलं तिथं. ’सुख हे दु:खातच भेटतं’ वगैरे अर्थाचं काहीतरी डायरीत लिहलेलं आठवतंय तेव्हाचं.

शब्दाचं वजन माहीत असणारा गुलज़ार, संगीताचं प्रचंड ज्ञान असणारा इतकंच नव्हे प्रत्येक गायकाची योग्य लायकी ओळखून असणारा रेहमान. सोनू निगम असो वा सपना अवस्थी किंवा उदित नारायण; हे लोक लायकीचं कुठे गायले असतील तर इथंच! मणिरत्नम बद्दल तर बोलायलाच नको. ’ईशा देओल’ सारखी डंब बाई ’युवा’ चित्रपटात चक्क गोड-गोड दिसते ते मणिरत्नममुळे. याच खुबीचा वापर त्याने ’दिल से’ त केलाय. प्रिती झिंटा कमालीची सुंदर दिसते इथे; अगदी साखरच. शारुकने आयुष्यात कधी उत्कृष्ट अभिनय केला असेल तर इथेच! खरेतर मणिरत्नमचा नेहमीचाच फंडा, मोठे इश्यु घेऊन त्यात एखादी प्रेमकहानी फुलवायची. मग तिच्यावरच लक्ष केंद्रित करायचं अन् इश्यूज गेले तेल लावत! खरंतर चुकीचं काहीच नाही त्यात; कारण तो तरी कुठला अंतर्यामी जो असल्या इश्यूजवर सोल्युशन्स शोधणार?

दिल-से पाहून संपला पण ’आवडता चित्रपट’ अन ’आवडतं गाणं’ हे दोन पुरस्कार घेऊन गेली कित्येक वर्षे माझ्यासोबत आहे. ’ऐ अजनबी’ फ़ार आवडीचं. लिहावं तर गुलजारनंच. ती प्रेयसी आहे पण तरीही ’अजनबी-अनोळखी’ ही फ़ारच विलक्षण उपमा वाटली मला त्यावेळी. त्या गाण्याच्या पुढच्या लाईनीही अफ़ाटच पण असो. मराठीच्या रांगडेपणातून हिंदी-उर्दूचा रोमँटिक भाव व्यवस्थित नाही मांडता यायचा. ते गाणं अखंडपणे चित्रपटात दाखवणं मणिरत्नमला शक्यच झालं नाही कि काय असं वाटत राहतं अन मग ते तसंच तुकड्या-तुकड्यांत चित्रपटभर भेटत राहतं! दुसरं आवडलेलं ’दिलसे-रे’ गाणं, त्याची सिनेमॅटोग्रॅफी, रेहमानचा आवाज.. हय हय हय..

चित्रपटाची सुरुवात एकदम झक्कास होते. जाळ्यांवर लटकणारा, थंडीनं कुडकुडणारा बल्ब, चेकपोस्ट एवढ्या माफ़क चित्रांमधून सगळं हवामान, स्थळ-काळ सगळंच आपल्यासमोर उभं ठाकतं. मग शाहरुखचं स्वत:शीच स्टेशनवर बडबडणं, "भाईसाब, सिगारेट है क्या" म्हणून विचारणं. मनिषाची एन्ट्री. एकदम ’वो मासूम चेहरा’ टाईप! अख्ख्या चित्रपटात बाई ह्याच मासूम चेहर्‍यानं वावरतात. त्या चेहर्‍यामागचं भयाण वास्तव दिग्दर्शक जेव्हा आपल्यासमोर आणतो तेव्हा आपण हबकूनच जातो!

दिलसेत काय न् किती गोष्टी आठवायच्या? गाडी निघून जाताना शाहरुख प्लॅटफॉर्मवर उभा दोन्ही हातांत चहाचे ग्लास घेऊन. त्यात टिपकणारं पावसाचं पन्हाळ पाणी, त्याचं ’ओय’ करून ओरडणं, तिचं वळून पाहणं. चित्रपटात किती वेळा ओरडतो शाहरुख ’ओय’ करून.. दरवेळी कळ उठत जाते.. खोलवर.. केवढा रोमँटीकपणा! किती भिनवायचा? अन तोही अशा दृष्यांमधून? चित्रपटात विशेष लक्षात राहण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत पण शेवटाची १०-१५ मिनटे अप्रतिम! शेवटचा एक डायलॉग "जरुरी नही की तुम एक बेहतर समाज मे पैदा हो, जरुरी ये है की दुसरोंको तुम एक बेहतर समाज दे के बिदा लो!" पुढे चित्रपट संपतो, दोघांची मरणमिठी.. एक जोरदार स्फ़ोट, सोनू निगमचा आवाज अन गुलजारच्या ओळीं.. ’मुझे मौत की गोद मे सोने दे..’

काय आवडलं चित्रपटात तर खूप काही. संपूर्ण चित्रपटात एक उदास, दु:खी स्वर आहे. जो आपल्यातल्या आतल्या सुराला भिडतो, छेडतो. एक प्रेमभावना एक रोमँटिजम आहे ज्याची पुसटशी जाणीव कुठल्यानकुठल्या टप्प्यावर होतच असते. एक असफल प्रेमकहाणी जी असफल असल्यानेच उदात्त वगैरे होते ह्या भावनेला बळकटी! चित्रपट बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल पण जे घडतंय ते बघण्यात आनंद. दुखरा आनंद!

तर दिलसे असा मोठा बदल घेऊन आलेला आयुष्यात तेव्हा. अर्थात हे तेव्हा पटकन नव्हतं उमजलं, पण काहीतरी बदललं गेल्याची भावना पुसटशी का होईना आली होतीच. चित्रपट सपशेल आपटला वगैरे वाचून, ऐकून वाईटही वाटलेलं तेव्हा पण खरेतर आता अजिबात खंत नाही.

त्यानंतर बरेच चित्रपट पाहिले, नानाविध भाषांमधले. बरेचसे आवडले. बरेचसे नावडले. काही पुन्हा-पुन्हा पाहिले, काही आजही पुन्हा-पुन्हा पाहतो. आवडत्या चित्रपटंची यादी मात्र फार मोठी नाही. अगदी आकड्यांच्या भाषेत सांगायचेच तर जवळपास ४०-४५ असावेत. त्यातले १४-१५ बॉलीवूडपट अन् त्यातही एखादा मराठी 'लिमिटेड माणूसकी' म्हणून! आमचं बॉलीवूड ज्ञान तसं अगाधच. ९० ते २०१० पर्यंतचे असंख्य चित्रपट पाहीलेत, पण त्यातही आम्हाला आवडले ते 'गुंडा','इस रात कि सुबह नही', 'दिल-से', 'ब्लु अंब्रेला', 'देव-डी', 'गुलाल' हे ऑफबिट सिनेमेच! जुन्यातलेही असेच वेगळ्या वाटेवरले 'खामोशी', 'प्यासा', 'साहिब बिबी और गुलाम', 'कागज के फ़ूल', 'शोले' 'मुगल-ए-आझम', 'तेरे मेरे सपने', 'तीसरी कसम' अन् 'गाईड'!
यातले सगळेच चित्रपट मी केव्हाही, कितीही वेळ पाहू शकतो (अपवाद-कागज के फ़ूल चा, त्यासाठी तो मूड असावा लागतो) म्हटलं तर या सगळ्या चित्रपटांवर एक एक लेखही होऊ शकेल. पण असो!
पण या सार्‍यात अगदी काल-परवाच आणखी एक बॉलीवुडपट शामिल झाला तो म्हणजे 'गँग्ज ऑफ वासेपूर'!

इथून फार दूरवर, उत्तरेकडे एक गाव आहे. प्रसिध्द-बिसिद्ध नसलेलं. 'वासेपुर!' त्याच गावची कहाणी, त्याच रंगात, त्याच ढंगात. अगदी जश्शीच्या तश्शी! प्रत्येक बघणार्‍याला-ऐकणार्‍याला झेपेलच अशी नाही. नाही आवडली तर चूक तुमची नाही. एका ठराविक साच्यातलं जगणं जगणार्‍या माणसांकडून ती अपेक्षाही नाही. आपल्या सो कॉल्ड सभ्य समाजात तिचे स्वागत होईल ही आशाही नाही. जगण्याचे जे जे हजारो पदर असतात त्यातल्याच काही काळ्या छटा लेवून नटणारी ही कहाणी. ती सुफळ संपूर्ण नाही. अर्धवट आहेच, पण फक्त कहाणीच, जगणं नाही! त्यात सगळेच नायक, सगळेच खलनायक. त्यांच्या जगण्याच्या तर्‍हा निराळ्या. निराळ्या ह्या अर्थानं की आम्ही कधी त्या पाहिल्याच नाहीत. हे असंही जगणं असू शकतं हे आम्हा ठाऊकंच नाही. असो. कहाणी अशीये की ती एकाच धाग्यात गोवलीय, तो म्हणजे बदला- रिव्हेंज. मारधाडीचं एक सत्र जे संपता संपत नाही. आग धगधगते, पेटते, उफाळते, विझते, राख होत येत पुन्हा पेटत जाते. ते अग्निकुंड, जळत राहणारे सदैव. वारसाहक्काने लाभणारे . परिणामांचा विचार, सदसद्-विवेकबुद्धी वगैरेंना इथे थारा नाही. माणुसकी, लोकशाही, सिस्टिम वगैरे फक्त पुस्तकांपुरते. पण मेख अशी की एकमेकांवर कुरघोडी करत असूनही अन् तथाकथित सुसंस्कृत समाजव्यवस्थेपेक्षा अगदी रानवट स्थिती असूनही ढोंग दिसत नाही. जो तो आपल्या मस्तीत 'तेरी कह के लूंगा' मोड मधे! चित्रपटात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कुणाच्याच जगण्यात ढोंग नाही. मस्ती आहे, बेअकलीपणा आहे, उतावळेपणा आहे, पशुता आहे, रासवट रानटीपणा आहे. पण स्वतःला जे हवंय ते करायचंय. त्यापाठी स्वःताचीच जोपासलेली काही गृहीतकं आहेत, गणितं आहेत. नियम आहेत. पण स्वतःपुरतेच!

दोन भागांत दाखवलेल्या ह्या कहाणीत बघण्यासारखं बरंचसं आहे. मोस्टली अ‍ॅक्टींग. नवाजुद्दीन सिद्दीकी नावाचं बॉलीवुडला पडलेलं स्वप्न ही फार मोठी देणगी आहे या चित्रपटाची. उसकी शोलोंसे भरी आँखे देख बच्चन न याद आये तो पैसा फुकट! हि इज अवर जनरेशन्स 'अँग्री यंग मॅन'! त्याचं लहान मुलासारखं रडणं, हसणं, नशेत धुंद असणं, सुरुवातीचा भित्रेपणा-कमकुवतपणा जाऊन बेरड होणं, त्याच्यातली पशूता, जरब, हातवारे, बॉडी लँग्वेज सगळं सगळं अप्रतिम! माणूस म्हणून ज्या ज्या भल्याबुर्‍या गोष्टी असतात प्रत्येकात त्याचं पडद्यावर असं चित्ररूप पाहणं अन् तेही इतक्या अँगल्सनी.. वाह!
बाकी इतर सगळ्यांचाच अभिनय सरस, सहज. तो इतका सहज आहे की त्यामागचे कष्ट कळायला आपल्याकडे वेळ नसतो. त्यानंतर उल्लेख करावा तर रिचा चढ्ढाचा! बाई गाता गाता अशा हळूच रडतात कि आसवंही अ‍ॅक्टींग करून जातात. चित्रपटात दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संगीत! ह्या खानवलकर बाई म्हणजे अगदी अफाट सुसाट आहेत . अप्रतिम अन् वेगळं संगीत. जणू काही उत्तरेत एखाद्या खेडेगावात ठर्र्याच्या ठेल्यावर ठेका धरतोयसं वाटणारं. महेंद्र कपूरच्या आवाजाशी मिळता-जुळता आवाज घेऊन एखादं दर्दभरं गीत वाजवणं अन् तेही तसल्याच दर्दभर्‍या सिच्युएशनला. हॅट्स ऑफ! अजून कैक प्रकार आहेत सांगण्यासारखे. पण ते आपले आपण तपासावे, जपावे!

आणखी महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे कथा मांडणी, ती सांगायची पध्दत. ती जगावेगळी नाही. तिच्यात घटनांची गर्दी, घाई नाही. पाडावर एखादा म्हातारा त्याच्या गतवैभवी तारुण्यात नव्याने मागे जात ती हळूवारपणे आपल्यासमोर मांडत जातो. अगदी जशीच्या तशी. कुठलेच मौखिक, भाषिक अलंकार न वापरता. कुठेकुठे थोडासा फिल्मीपणा आहे सुद्धा. पण तोही वरण-भातासोबत लोणच्यासारखा. शिव्या आहेत (नक्की किती हे मोजले नाही IMDB सारखे) पण जाणवत नाहीत. त्या शिव्यांपलिकडल्या भाव-भावना, आशय अगदी लख्खपणे समोर येतो. त्या शिव्या ऐकताना हसू येत नाही की कसेसेच होत नाही. खरेतर छोट्या छोट्या बर्‍याच चुका आहेत चित्रपटात पण संपुर्ण चित्रपट एक मोठा इम्पॅक्ट घडवून आणतो मनावर.

बाकी दोन भागांच्या या चित्रपटात दुसरा भाग काहीच्या काही महान होऊन गेलाय. कारणं बरीच असतील पण चित्रपट संपतो अन् उरते नवाजुद्दिनची ती भेदक नजर.. सतत.. नजरेसमोरच!
अनुराग कश्यपचं 'हिंसाप्रेम' ठळकपणे दिसतं इथं ही एक लख्ख करून जाणारी गोष्ट!
चित्रपट ’पैसा-वसूल’ माझ्यासाठी तरी. बाकी थेटरातल्या ८०% रिकाम्या खुर्च्या पाहून का कुणास ठाऊक मला तरी फारच आनंद झाला!

तर हे आमच चित्रपट वेड! कुणी लावलं, कधी, कसं याला काही अर्थ नाही. ते लागलं, ते आम्ही पोसलं, वाढवलं. त्यातून काय मिळालं काय नाही याचाही लेखाजोखा नाही! जे पहावंसं वाटलं ते पुन्हा-पुन्हा पाहिलं, जे नाही ते एकदातरी पूर्ण पाहून शिव्यांच्या लाखोलीसोबत वाहवलं. आवड जपली, जोपासली, जोपासणाराय!
बाकी पुढच्या चित्रपटांसाठी गुलजारच्याच भाषेत 'खामोशी'तून,
"ख्वाब चुन रही है रात, बेकरार है
तुम्हारा.. इंतजार है!"

_________________________________________________________________________

*** या आणि आजवर प्रकाशित केलेल्या प्रत्येक शब्दाच्या शुध्दलेखनासाठी मदत करणारे 'भरत मयेकर' यांचे मनापासून आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वासेपूर मलापण प्रचंड आवडला. दिलसेबाबतच्या प्रत्येक वाक्याशी सहमत. एकूणच लेख सुंदर. स्पर्धेसाठी शुभेच्छा.!

खासच रे....
'दिलसे' माझाही अतिशय आवडता चित्रपट आहे. वास्येपूर अजुन पाहिलेला नाहीये, बघावा लागेल आता.

<<बाई गाता गाता अशा हळूच रडतात कि आसवंही अ‍ॅक्टींग करून जातात. >> जियो Happy

दोन्ही सिनेमा मी पाहिलेले नाहीत.
लेख वाचल्यानंतर बघण्याची इच्छा निर्माण झाली.
मला वाटतं यातच लेखाचं यश आहे.

ट्यागो, मारधाडीचे आणि हिंसाचाराचे सिनेमे हा माझा जॉनर नाही... पण वासेपूर पाहणे नशीबात होते आणि हिंमत करुन शेवटपर्यंत पाहिला... मी तो कसा काय पाहिला, हे माझ्यासाठी असलेलं एक कोडं होतं आणि मला तो इतका प्रचंड, प्रमाणाच्या बाहेर कसा काय आणि का आवडला, हे त्याहून मोठं कोडं होतं, पण हा लेख वाचून ते बर्‍यापैकी सुटलं, असं म्हणायला हरकत नाही... Happy असं नेमक्या शब्दात पकडणं अवघड काम आहे.

त्यातलं ते संगीत आणि तो आवाज अजूनही कामात नुसता घुमतोय....

तुझी लिहीण्याची शैली नेहमीपेक्षा जरा हटके प्रकारातली, त्यामुळे हेही 'दिलसे' लिहीलं आहेस प्रत्येक ओळीतून जाणवत रहातं, हाच खरा मयुरेश टच.. Happy

प्रतिसाद एवढ्याचसाठी दिला नव्हता की दिलसे अन वासेपूर दोन्ही पहायचे राहिलेत! लिहिता थेट परिणामकारक तुम्ही, नेहमीच.

<< 'गुंडा','इस रात कि सुबह नही', 'दिल-से', 'ब्लु अंब्रेला', 'देव-डी', 'गुलाल' हे ऑफबिट सिनेमेच! जुन्यातलेही असेच वेगळ्या वाटेवरले 'खामोशी', 'प्यासा', 'साहिब बिबी और गुलाम', 'कागज के फ़ूल', 'शोले' 'मुगल-ए-आझम', 'तेरे मेरे सपने', 'तीसरी कसम' अन् 'गाईड'!>>

हे पटलं.
या यादीतल्या पहिल्या पोस्ट-मॉडर्न नावांमध्ये 'गंगाजल ' बसेल असे वाटले.
शुभेच्छा.

एकदम मस्तच लिहिलंय .....आवडल ..... दिलसे ची गाणी तर एकदम फेवरीट.... अजूनही ती गाणी एकली कि आत कुठेतरी कालवाकालव होते .

शेवटचे दोन परिच्छेद उत्तम ....मी पण वासेपूर पाहिलेला नाही ...पण भारीच लिहिलंय त्यावरून आता बघावासा वाटतोय .... Happy Happy

Pages