गानभुली - दिल से रे

Submitted by दाद on 16 January, 2011 - 22:04

http://www.youtube.com/watch?v=YwfCMvo19s8
डब लब डब लब डब लब......

धकधकणार्‍या हृदयाचा आवाज. शांततेत नांदणार्‍या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काळाच्या काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर....
.... तर कसे तरंगांचे ओरखडे, वेदनेच्या लाटा उठतात, कसे दु:खाचे बुडबुडे फुटतात, कसं डबडबून येतं हृदय..... कसं घायाळ घायाळ होतं... आत आत!

हे असं घायाळ क्षण संभाळत जगणार्‍या या देहाच्या कक्षेला भेदूनही रोजचा सूर्य....
तो उगवतो, मावळतो, निर्विकार क्षणांचा पारा थेंबा-थेंबावे ठिबकतो, संततधार धरल्यासारखा...
कुणी अन का... केलेल्या नवसाची फेड करीत जगतो आपण एक नको असलेलं आयुष्य?
ही... ही... अमानुष सक्तीही, आसक्ती होते मग कधीतरी. रोजच्या श्वास घेण्यालाही "जीवन" म्हणायला लागतो आपण कधीतरी.....
....मार्गाला लागतो आपण कधीतरी.

अशाच एका कलत्या दुपारी पाऊल उमटतं न जगलेल्या आयुष्याचं... चाहूल लागते निरभ्रं मनभरल्या दोन-चारच श्वासांची. अगदी थोडाचवेळ का होईना पण, अर्थ मिळणार असतो त्यातल्या प्रत्येक श्वासाला. आतापर्यंतं तुकड्या तुकड्यात पांघरलेली ही स्थळ-काळाची लक्तरं.... एकदा कदाचित फक्त एकदाच वस्त्रं बनून येणार असतात.... आपलं उरलं-सुरलं नागडं अस्तित्वं सजवण्याची एक... एकच संधी.

दैवाने कापून, तोडून, भिरकाटून दिलेला आपलाच दुसरा तुकडा भेटणार असतो संध्याकाळच्या कलत्या उन्हात. पूर्णत्व अनुभवायचं, परत एकदा, शेवटचंच बहुतेक.... अगदी काही तास की मिनिटं का पळं?

आपल्यातच आपण विरघळण्याची वाट बघतो आपण. प्राण वेध घेतात, एकदा डोळे बनून, कधी चाहूल घेत तर कधी श्वासात गंध शोधत...

डब लब डब लब डब लब......
सवयीने धकधकतं हृदय आणि त्याबरोबर सवयीनेच घाव घालत असते अदृष्टाची काठी.
पाणी काय हृदय काय, घाव बसला की तरंग उठतात, लाटा किनार्‍याला थडकून फुटतात..... पण धकधक आहेच अविरत, सवयीनेच...
घावांनी हल्लक झालेला, कसोशीने जोडलेला वरचा पापुद्रा साधतोय न साधतोय तोच परत काठी वाजते... सवयीनेच!
वाट बघण्यातही हजार मरणं जगतो आपण, अगदी आनंदानं!

अजून भगभगणरा रोजचा सूर्य आणि त्याबरोबर ठिबकणारा क्षणांचा पारा... वितळतात आपल्यासाठी आणि.....
आणि दिसतो, भेटतो आपल्या कायेबाहेरचा आपलाच प्राण!

अन सगळे बंध तोडून निघतो एक आकांत, एक आssssह.......
.....दिलसे!

’धागिन धाsग दिन देsग धागदिन
धागिन धाsग दिन देsग धागदिन’
शब्द नाहीतच नुसतीच केविलवाणी धडपड.... एकमेकांना सांगण्याची अन समजून घेण्याची...

अरे कसा आहेस?
फार सोसलंस रे....

कुठे होतीस गं?
किती शोधलं तुला?
काय झालं हे?
............
योजलेलं यातलं काहीच म्हणत नाहीत....

हृदयं छातीत न धडधडता कानातच वाजतात.... धापणार्‍या आवाजात, शब्दं संपून, शब्दांच्या पलिकडलं, फक्त आपल्याला अन त्याला कळेल अशा अनाकलनीय भाषेत ओरडत रहातात..

याच भाषेत धापतात, रडतात, कुजबुजतात दोघे.... आssह, दिलसे रे!
आपसूकच आकळतं त्यांच त्यांनाच मग...

विलगलेली ही दोन पानं पानझडीच्या एका घावात वेगळी होऊन कुठे, कशी भरकटली, कसल्या कसल्या वावधुळींनी कुठे कुठे भिरकावून दिलं दोघांना, दिशाहीन होऊन एकमेकांना शोधत कशी फरपटली दोघं.....
’धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ता अ धि अ धिंss धिंधिं ना
नागिन धिं
अ धिंss धिंधिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग...

किती जंगलं, किती काटे, कसली गावं, कसली माणसं, कुणा कुणाचे ओरबाडे, कुठे कुठे ओरखडे, कसे घाव-डाव, कसं खपली धरणं, कसं भरून येणं.....
’धिंधिं तानं धित्तान झिग झिग...

मग दोघांनी आयुष्य, आयुष्य म्हणत काळाच्या पुस्तकात कुठल्यातरी दोन पानांत कसाबसा मिळवलेला विसावा, तिथेच पडलेली जाळी....
अन मग पडलेल्या जाळीतून जमतील तशी, मिळतील तितकी वाचलेली अक्षरं....
माग घेण्यासाठी..... आहेस का तू? कुठे असशील तू? .....
आssह, दिलसे!

समजावतात एकमेकांना...
काय करणार, तुझा माझा इलाज नाही, सखे. कात झडल्या जाळीतही अडकून असतं एक जिंदा दिल, धकधकतं ना गं, सवयीनेच.
दिल म्हटलं की दर्द आलाच की रे....
नव्हे गं, दर्द आहे तिथेच दिल आहे.
राणी, ह्याच वेदनेचे पंख होऊन, जाळी झालेलं हे कलेवर फोडून उडून का जात नाही आपली आस आणि विश्वासही?

तरीही थिजलेल्या मनाच्या दगडी पहार्‍यावरही पालवतात चुकार वेली, घोसावतातही यथावकाश....
कुणा कुलकुलणार्‍या चोचींसाठी शिंपी होतो डोळ्यांचा काठ.....
येणार्‍या ऋतूसाठी परत एकदा सजतात डहाळी डहाळीवर, तुझे-माझे श्वास....
पानझडही येतेच, तिचाही नाईलाज.....
आsssह दिलसे रे!

डब लब डब लब डब लब......

धकधकणार्‍या हृदयाचा आवाज. शांततेत नांदणार्‍या संथ हृदयाच्या डोहावर निष्ठूर काठीचे एका मागोमाग एक घाव घातले तर....
.... तर कसे तरंगांचे ओरखडे, वेदनेच्या लाटा उठतात, कसे दु:खाचे बुडबुडे फुटतात, कसं डबडबून येतं हृदय..... कसं घायाळ घायाळ होतं... आत आत!

दिलसे रे !

****************************************
पुस्तक वाचतो नं आपण, तसं गाणं वाचायची खोड आहे मला. पहिल्यांदा नुसतीच सुरावट, मग गायकाचा किंवा गायिकेचा आवाज, मग शब्दं, मग सूर आणि शब्दांचं एकत्र नांदणं, मग ताल-ठेक्यांची झुळझुळ, त्यासाठी वापरलेली वेगवेगळी वाद्यं किंवा नुस्ते आवाज वगैरे वगैरे...
ह्यात आवडलेलं गाणं अनेकदा ऐकलं जातं. एखाद्या गहन/सखोल पुस्तकासारखं प्रत्येक ऐकण्यात वेगळा पदर उलगडत जातो... आणि कधी कधी दृश्यमान होतं गाणं.

ए. आर. रहमानचं "दिलसे" हे गाणं असंच ऐकलं मी.... मनात आलं ते लिहून ठेवलंही. ह्या लेखात सघन असं काही नाही. पण जमेल त्या वाकड्या तिकड्या शब्दांत माझी अनुभूती (मोठ्ठा शब्द आहे...) तुमच्या पर्यंत पोचवण्याचा थोडा अट्टाहास म्हणा, ना. माझ्यासारखं गाणं "वाचणार्‍यांना" नक्की काहीतरी जाणवेल. इतरांना कदाचित आवडणारही नाही. पण तरीही.......

हा लेख वाचण्यापूर्वी आणि कदाचित नंतरही ते गाणं ऐकायला हवं.....नाहीतर एखाद्या सुंदर मैफिलीचा नुसताच वृत्तांत वाचल्यासारखं होईल ते.

परत एकदा सांगत्ये, हे मला "दिसलेलं" गाणं आहे.... तुम्हाला तसं दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे माझा.

ए. आरचा अत्यंत व्याकूळ करणारा, कधी थोडा रुद्ध, हळवा होणारा आवाज, त्याची मॉड्युलेशन्स भावली. संथ सुरू होणारं गाणं....
पहिल्याच ओळीत तीन वेळा धमाका उडतो "सूरज", "पारा" आणि "दिलसे" याच शब्दांवर. त्याबरोबरच त्याने वापरलेली वाद्य किंवा सॅंपलिंग करून वापरलेले आवाज. त्यातला एक आवाज म्हणजे पाण्यावर काठी मारल्यास उठणारा आवाज.... नीट कान देऊन ऐकल्यास ऐकू तर येतोच पण एकदा ऐकला की गाणंभर पाठ सोडत नाही.
"गम दिलके बस चुलबुले है... पानी के ये बुलबुले है... उठतेही बनते रहते है...." इथे कळतो त्या काठीच्या आवाजाचा परिणाम.....

"शब्दं संपले आणि तरीही काही सांगण्यासारखं उरलं की सुरू होतो तराणा...." असं कुणी म्हटलंय (बहुतेक कुमारजींनी)
धपापणार्‍या हृदयाची काहीतरी सांगण्याची धडपड अगदी अगदी पकडलीये मृदुंगाच्या किंवा मटक्याच्या बोलांनी.
"धागिन धाग दिन देग धागदिन
धागिन धाग दिन देग धागदिन"

खरोखर धाप लागून बोलायला गेल्यास, तोंडाने घेतलेल्या श्वासाचा वापर करून म्हटलेले पुढचे बोल -
"धिंधिं तानं धित्तान झिग झिग...
ताss अ धि अ धिंss अ धिंधिं ना
नागिन धिंन अ धिंss धिं ना....
अ धिंधिं तानं धित्तान झिग झिग... "

त्यातल्या मधे मधे आलेल्या ’अ’ ने जो परिणाम साधलाय तो शब्दातीत आहे.

शिवमणीन वापरेलेले अनेक ड्रम्स, इतर पर्कशन वाद्यं, मधला सरगम, अन ते मॄदुंग/मटक्याचे बोल... ह्या सगळ्यांचा मेळ केवळ केवळ अप्रतिम.
ए आरच्या इथे लागलेल्या आवाजा बद्दल काय बोलावं?

मला स्वत:ला हे गाणं थोssडं धावल्यासारखं वाटतं. किंचित लय कमी केली तर ह्यातला "मझा" दुप्पट होईल अशी मलाच का कुणास ठाऊक पण खात्री वाटतेय...
माझ्या मनात हे गाणं चालू होतं त्या लयीला एकदम "सुकून है" होतं, माझं.
हा लेख लिहिला तेव्हा चित्रपट बघितला नव्हता. नंतर कधीतरी बघितल्यावर त्याचं केलेलं चित्रिकरणही आवडलं.

गुलमोहर: 

अहाहा! आधी लेख वाचला आणि मग गाणं ऐकलं.. तरीही लेखाच्या प्रेमात जास्त पडले Happy शब्द नाहित....खुप सुंदर हे फारच तोकडे शब्द...गाणं वाचायची कल्पना भन्नाट, खुपच आवडली. तु खुप छान लिहितेस.

दाद आपल्याला दाद दिल्याशिवाय पुढे काही लिहण अशक्य आहे.

एखाद्या गाण्यात जे आपल्याला जे भावत त्याने ते गाण अजरामर होत. आपले गानभुली हे सदर अप्रतिम आहे यात शंका नाही. काळ देहासी आला खाउ किंवा कानडाऊ असुदे प्रत्येक ललित गाण्याइतकच सुंदर आहे.

जे शब्दात वर्णन करता येत त्याला ज्ञान म्हणतात. जे शब्दात व्यक्त करता येत नाही त्याला कौशल्य म्हणतात. आपली संगीतकारांची कौशल्ये शब्दात व्यक्त करण्याचा अभ्यास अतुलनीय आहे.

विषय रहेमान च्या दिलसे गाण्याचा असताना रहेमानच्या संगीताची तुलना दुसर्‍या कोणाशी करणे कदाचित कुणाला आवडेल वा आवडणार नाही.

पं. हृदयनाथ मंगेशकरांना असेच कौशल्य आहे अस माझ मत आहे. शांता शेळके यांच " गणराज रंगी नाचतो " हे गाण असो की सुरेश भटांच " मालवुन टाक दिप" हे गीत असुदे. अवीट चाल देणे माझ्या मते केवळ प्रतिभा नव्हे पण ज्याला बुध्दीचा उच्च स्तर म्हणतात अशी प्रज्ञा असल्याशिवाय अश्या उत्तम चाली बांधण केवळ अशक्य. माझ्या मते रहेमान काय, नौशादसाहेब काय किंवा पं. ह्रदयनाथ काय अश्या अनेक संगीतकारांची ही अनेक जन्मांची साधना आहे.

बापू... Happy
तुमचा अनुभव हीच तर गंमत आहे. अर्जुनाला पक्ष्याचा डोळा तेव्हढा दिसला तेव्हा झालेलं एकचित्तं... हेच सगळ्यात महत्वाचं नाही का?
आपल्यातल्या प्रत्येकाला हा अनुभव येतोच येतो... माझ्या एका कलीगला अशी समाधी कोड लिहिताना लागते Happy तो अनुभव अन आपण... त्यावेळी ह्यामधे जगातलं दुसरं काहीही नाही... किंबहुना तो अनुभव तेच आपण होतो... तेव्हा आपण पुरिया धनाश्रीही होतो. तुम्ही म्हणताय तसं रागाचं व्याकरण वगैरे लक्तरं उडून जातात...
माझी आई म्हणायची... ही वाचत असताना (किंवा नंतर गाणं ऐकत असताना) हिला कुणी फाडून खाल्लेलंही कळणार नाही.
....तीच सीडी मग परत लावली .. पुन्हा नव-नव्या अनुभूती घेतल्या>> त्याच त्या ऐकलेल्या गाण्यात मग वेगवेगळे स्तर दिसायला लागतात, गायकानं मुद्दाम "दाखवलेल्या" जागांच्या पल्ल्याडही अलवार असं जे हळव्या फुंकरीच्या जादुचं... ते ही. आणि मग मधल्या शांततेचाही अर्थं लागायला लागतो. ती आहे म्हणून आलेला आधीच्या नंतरच्या सुरांना लाभलेला अर्थं जाणवायला लागतो...
आज मलाच खूप आनंद झालाय... तुमचा अनुभव वाचून Happy
सूर, शब्दं, ताल... इतकच काय पण जगातलं सारं सारं असच रसरसून फक्तं तुमच्यासाठी म्हणून अगदी कडकडून भेटू येवो तुम्हाला सर्वांना.... अगदी फक्तं तुमचं म्हणून.

Pages