पुण्यातील देवालयांची गमतीशीर नावे.....

Submitted by बाळू जोशी. on 16 August, 2012 - 00:38

पुण्यामध्ये असंख्य देवालये आहेत्.त्याचा आकार एखाद्या खोक्यापासून तर विशाल मंदिरांपर्यन्त आहे.इतरत्र न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र, गमतीशीर नावे.कधी कधी तर ती अगदी टिंगलवजाही भासतात.पुणेरी तिरकसपणाने देवांची सुद्धा गय केलेली नाही. Happy हल्ली जर एखादे नव्याने असे नाव दिले तर मोठ्याच वादाचे प्रसंग उद्भवतील. पूर्वी बहुसंख्य देवळे ही पत्ते ओळखण्यासाठी लॅन्डमार्क म्हणून वापरली जायची. मात्र हल्ली या देवळांच्या आसपास इतर मोठाल्या स्ट्रक्चर्स जसे थिअ‍ॅटर्स, मॉल्स, हॉटेले झालीत त्यामुळे ह्या देवळांचे लॅन्डमार्क्स मागे पडत चाललेत व त्यामुळे नव्या पिढीच्या विस्मरणातूनही ही देवळे चाललीत. परवा तर मला सोन्या मारुतीचे देऊळ अक्षरशः शोधून काढावे लागले.
या धाग्याचा उद्देश अशा देवळांची चर्चा घडवून आणणे हा आहे. यात देवळाचे नाव, त्याचे स्थळ व त्याच्या नावाचा माहीत असल्यास इतिहास अपेक्षित आहे. अर्थात विचित्र नावे नसलेली पण इतिहासाच्या दृष्टीने मोल असलेल्या देवळांवरही चर्चा व्हायला प्रत्यवाय नाही.....

उदा:- खुन्या मुरलीधर.

हे देऊळ सदाशिव पेठेत, भोपटकर मार्गावर, म्हणजे पेरुगेट चौकीवरून बाजिराव रोडकडे जाताना उजव्या बाजूस इंडियन बँकेच्या शाखेजवळ आहे.

या मुरलीधराने कुठलाही खून केलेला नाही. Happy हे देऊळ १७९७ साली श्री सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे यांनी बान्धलेले आहे. त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मि. बॉईड हा सैनिकांसह मंदिरावरून जाऊ लागला असता गद्रे यांनी नेमलेल्या अरबांनी त्याना अटकाव केला तेव्हा लढाई होऊन शे-पन्नास माणसे ठार झाली म्हणून याला खुन्या मुरलीधर असे नाव पडले असा इतिहास आहे.
या मंदिराच्या स्थापनेनंतर शम्भरेक वर्षांनी इथल्याच चौकात रँद आयर्स्ट वधाच्या प्रसंगी ज्यानी इंग्रजांकडे चुगली केली त्या द्रविड बंधूंचे चापेकर्-रानडे यांनी मध्यरात्री खून केले (१८९९). पुढे त्यानाही इंग्रजानी फासावर चढविले. या खून प्रकरणाचा चुकीने संदर्भ जोडून चुकीने 'खुन्या'नावाशी संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे असे जाणकार सांगतात्.इंग्रज अधिकारी आणि अरब यांच्या चकमकीमुळेच त्याला 'खुन्या' असे नाव पडले आहे...

तर लोकहो, व्हा सुरू आता...... Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिल्ट्री महादेव बेळगावात आहे .तिथल्या मिल्ट्रीच्या कॅम्प एरियात आहे म्हणून मिल्ट्री महादेव.

बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभं राहिलं की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती. त्या गल्लीने सरळ पुढे गेले की लोखंडे तालमीचा चौक. डावीकडच्या रस्त्यावर दोन इमारती सोडून दाढीवाला दत्त (सध्याचा खुणेचा पत्ता - हस्तकला दुकाना जवळ). डावीकडे न जाता चौकातून सरळ गेलं की पुढच्या चौकाआधी डावीकडे पत्र्या मारुती. तिथून आणखी पुढे गेलं की मोदी गणपती. मोदी गणपती ओलांडून पुढे सरळ जाऊन उजवीकडे वळलं की जो चौक लागतो तिथे माती गणपती.

भरत नाट्य मंदीराकडे तोंड करून उभं राहिलं की डावीकडे ४-५ इमारती सोडून उपाशी विठोबा. त्या दोन्हीच्या मधे रस्त्यात एक मारुतीचं देऊळ होतं (जुळा मारुती? नाव नक्की आठवत नाहीये). भरत नाट्य मंदिरच्या उजव्या बाजूला चौकात मध्यभागी पावन मारुती.
डावीकडे उपाशी विठोबावरून सरळ पुढे गेलं की दुसरा चौक चिमण्या गणपतीचा आणि तिसरा (जिथे बाजीराव रस्ता लागतो) बायक्या/नवा विष्णूचा. चिमण्या गणपती वरून सरळ न जाता उजवीकडे गेलं की भिकारदास मारुती.

पेरुगेटवरून मुलांच्या भावेस्कूलवरून सरळ गेलं की हत्ती गणपती. उंबर्या गणपती चौक लक्ष्मी रस्त्यावर. आता त्याला शगुन चा चौक म्हणतात

हत्ती गणपती - ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या जवळ
पत्र्या मारुती - शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणार्‍या चौकात उजव्या हाताला
मोदी गणपती - पत्र्या मारुती उजव्या हाताला आहे तर तिथूनच डावीकडे सरळ गेल्यास मोदी गणपती.
माती गणपती - मोदी गणपती कडून केळकररस्त्यावर गेल्यानंतर थोडेसे डावीकडे बघितल्यास समोरच
जिलब्या मारुती - शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस.
आकरा मारुती - शिंदे आळीच्या शेवटी
उंबर्‍या गणपती - शगुन चौकात
चिमण्या गणपती - बाजीराव रस्त्याला समांतर रस्त्यावर सुजाता मस्तानीच्या अलिकडे
भिकारदास मारुती - बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत

वरदा आणि हिम्सकूल...

धन्यवाद.
असे 'लोकेशन्स युक्त' प्रतिसाद आम्हा पुण्याबाहेरील लोकांना हवे होते. ही माहिती आता टिपून घेतो, म्हणजे ज्यावेळी पुण्यात येणे होईल, त्यावेळी याच्या अनुषंगाने 'राम, कृष्ण, हनुमान' आदीना नमस्कारही करता येतील.

आजकाल पुणे म्हणजे फक्त 'दगडूशेठ हलवाई गणपती' झाल्याचे दिसते, पण वर उल्लेख केलेल्या सार्‍या देवतांच्या नामांना जो शेकडो वर्षांचा इतिहास आहे, तो पाहता हा ठेवा अमूल्य असाच आहे.

बाकी अजूनही 'छिनाल बालाजी' नावामागील आख्यायिका सापडलेली नाही. कुणाला माहीत असेल तर जरूर इथे शेअर करावी. 'चिनाल' नावाची एखादी माळ/ एखादा हार वगैरे दागिना असावा का ? ज्यामुळे चिनालचा पुढे अपभ्रंश होऊन ते 'छिनाल' झाले ? बाकी छिनालला अत्यंत असभ्य असा अर्थ असल्याने ते नाव बालाजीला कसे चिकटले हाच औत्सुक्याचा विषय आहे.

अशोक पाटील

छिनाल नावामागे कुठलीही आख्यायिका नाही. त्या मंदिराच्या आसपास पुण्यातील वेश्यावस्ती होती/ आहे (बुधवार पेठ) म्हणून ते नाव पडलं

अशोक, छिनाल बालाजी नावाचा संबंध बुधवार पेठेतील वेश्यावस्तीशी असावा.

ही आणखी काही मजेशीर नावे. कोणाला ही देवळे कुठे आहेत ते माहित असेल तर सांगा.

गुपचूप गणपती - नारायण / शनिवार पेठेत, पुणे येथे आहे.

निवडुंग्या विठोबा - नाना पेठ

पालखी विठोबा - भवानी पेठ

वीराचा मारुती - शनिवार / नारायण पेठ.

सोट्या म्हसोबा - लक्ष्मी रोड.

भांग्या मारुती - ??

अवचित मारुती - ?? (बहुतेक गुरुवार पेठ, पुणे)

गवत्या मारुती चौक - अप्पा बळवंत चौकाला बहुतेक हे नाव होते पूर्वी. ज्या मारुतीवरून ते नाव मिळाले तो मारुती/ त्याचे मंदिर कुठे आहे हे शोधावे लागेल.

पोटशुळ्या मारुती - ??

गंज्या मारुती - ??

कराडला नदीकिनारी मारूतीच मंदीर आहे . त्याला आधी मड्या मारूती म्हणत. तेथे प्रेते दहन केली जात.
परंतू आता बंद केले आहे. आता मारूतीच नामकरण वीरमारूती असे झाले आहे.

दुसर्‍या गावांकडे गाडी वळलीच आहे म्हटल्यावर नाशिकचे लिहीते. दुतोंड्या मारुती, एकमुखी दत्त, गोराराम.
दुतोंडी मारुती म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मुर्ती. दोन्ही बाजुंना ही मुर्ती आहे. बरीच उंच आहे. पुरसदृश परिस्थितीचे वर्णन करताना दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत्/डोक्यापर्यंत पाणी आलय किंवा अतिवृष्टी म्हणजे दुतोंड्या मारुती संपुर्ण बुडालाय.
एकमुखी दत्ताचे मंदिर गोदाकाठीच आहे. या मंदिरात एकच चेहरा असलेली दत्तमुर्ती आहे.
गोराराम मंदिरातील रामाची मुर्ती 'गोरी' आहे!
नवशा गणपतिबद्दल वर लिहीले आहेच.
अजुन एक लोथे गणपति मंदिर आहे ना? नाशिककरांनो, माझ्या ज्ञानात भर घाला!

नंदुरबारला पण अशाच नावांची मंदिरे/देवालये आहेत. कुणीतरी प्रकाश टाका.

शेण्या मारुती: परीक्षेत पास झालेली मुले शेंदुर लावायची आणि परीक्षेत नापास झालेली मुले शेण लावायची म्हणुन हे नाव पडले. (लोकेशन माहित नाही माहित असल्यास कृपया लिहावे).

बटाट्याची चाळ मधे एक उल्लेख आहे.. बायक्या विष्णु.. त्याबद्दल कोणाला माहित आहे का?

मंडईतून बुधवारात जाताना जे बालाजीच देऊळ आहे त्याला आजही जुने लोक छिनाल बालाजी म्हणतात.
गिरगावात असाच एक रांड्या मारूती होता कालांतराने बहुदा वस्ती हटल्यावर नावही गेल.

वरदा, छान सहल घडवलीस सगळ्या मारुतराया व गणपतीबाप्पांची.. तो उपाशी विठोबाच्या जवळचा रस्त्यातला जुळ्या मारुती. आता शेजारच्या बिल्डींगमधे आहे तो.

कराडला नदीकिनारी मारूतीच मंदीर आहे . त्याला आधी मड्या मारूती म्हणत. तेथे प्रेते दहन केली जात.
परंतू आता बंद केले आहे. आता मारूतीच नामकरण वीरमारूती असे झाले आहे.>>> मला तर वीर मारुती म्हणले की लक्षातच येत नाही. मड्या मारुती म्हणले की मग लक्षात येते.

पोटसुळ्या मारुती हा सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) ताम्बोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे (गणेश पेठ क्रॉस करते त्याच्या पुढे ) आहे....

बाळू झकास धागा......

नेहमी पुण्यात आल्यावर ही अजब नावं ऐकायला मिळायची...... इथे एकत्र संकलन शिवाय त्या नावामागचा इतिहास पण कळतोय एक एक.....

देवादिकांना पण अशी नावं....

दाढीवाला दत्त, उपाशी विठोबा, बायक्या विष्णू
Proud

बटाट्या मारुती:- शनिवार वाड्यासामोरच्या पटांगणात. फुले मंडई (रे मार्केट )होण्यापूर्वी भाजी बाजार शनवार वाड्यापुढच्या पटांगणात भरत असे . तिथे या मारुतीजवळ बटाटे विकणारे बसत म्हणून Happy

भांग्या मारुती :- नाना वाडा ते बुधवार चौक च्या दरम्यान आहे म्हणे... (म्हणजे वसन्त टॉकीजच्या आसपास का?)

खुन्या मुरलीधराबद्दल मी वेगळीच गोष्ट ऐकली होती.
ते देऊळ नाना फडणवीस यांनी बांधले व त्याचे ओपनिंग**
करण्यासाठी एक इंग्रज बँड व एक मराठी लोकांचा बँड अश्या दोघांनाही बोलावले होते, पण आधी कुणी सुरुवात करायची यावरून 'चर्चा' झाली नि त्यात उभयपक्षी अनेक खून पडले. म्हणून हे नाव पडले.
या प्रसंगावरूनच मायबोलीवरच्या 'चर्चे' सत्य, सभ्यता, संदर्भ इ. चा सतत खून होत असतो.
(**खरे तर मराठी शब्द माहित आहे, पण तो इथे कसा लिहायचा हे माहित नाही. शिवाय बर्‍याच लोकांना मराठी शब्दाचा अर्थ कळणार नाही, तेंव्हा मीच इंग्रजी शब्द वापरतो.)

त्या काळात इंटरनेट, सी एन एन वगैरे नव्हते त्यामुळे अगदी सदाशिव पेठेत सुद्धा ही बातमी आम्हाला एक दोन दिवसांनी कळली. तेंव्हा आम्हाला कळेस्तवर खर्‍या बातमीत अनेक बदल झाले असण्याची शक्यता आहे. आम्हाला जे कळले ते तरी खरे की आजकालच्या सनसनाटी वार्ताहरांच्या पूर्वजांचा तो प्रताप, सांगता येत नाही.

मस्त बाफ.
पुण्यात जंगली महाराज.
औरंगाबाद मध्ये सुपारी मारुती, जवळच भद्र्या मारुती.
परळीत एक झुरळ्या गोपिनाथाचे मंदिर पाहिले होते. ते मंदिर तळघरात, थंड होते, तिथे नेहेमी भिंतीवर झुरळे असायची म्हणून हे नाव.

पोटसुळ्या मारुती हा सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) ताम्बोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे <<<< डुल्या मारूती मंदिराच्या मागच्या बाजूलाच भेळ-भडगुंज्यांची दुकाने आहेत त्या लाईनीत.

लकेरी मारूती - नानापेठ पारशी अग्यारी जवळ

मजा येतेय सगळी माहिती आणि नावं वाचायला....

(वरदा, तू सांगितलेल्या रस्त्यांवरून थोडा वेळ जात राहिले आणि मग भरकटले :हाहा:)

पेशवाईमध्ये शनिवारवाड्याच्या बाहेरच्या म्हणजे आत्ताच्या वीर मारुतीचे फार प्रस्थ होते.पानिपतावर जाताना तिथे नवस बोलला गेला होता.

जे कोणी थोडे सुखरुप परत आले त्या "वीरांनी" दर वर्षी या मारुतीची अनवाणी यात्रा करण्यास सुरुवात केली ज्याची पुढे प्रथा झाली. अजूनही त्या "वीरां"चे वंशज त्या तिथीला येतात.

स्त्रोत : नवरा व साबा

गावकोस मारूती - कसबा पेठ - कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती आधी
उंटाडे मारूती - केईएम हॉस्पीटल
मद्राशी गणपती - रास्ता पेठ, अपोलो टॉकीज समोरच्या बोळात

Pages