आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर

Submitted by वरदा on 15 August, 2012 - 13:10

इंग्लिशमधे रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तके (पाठ्यपुस्तके किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकाने लिहिलेली/ संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तके सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते. आणि त्यातल्या बहुतेकांची हयात ही इंग्लिशमधून व्यावसायिक संशोधनपर लिखाण करण्यात गेली. काही जणांनी मराठीतून लिखाण केलं पण ते तितकसं समाजमानसापर्यंत पोचलं नाही (उदा: वि.म. दांडेकर). शिवाय इतिहास, संस्कृती वगैरे विषय जरातरी आकलनाच्या टप्प्यातले आहेत, त्यांचा वर्ण्यविषय हा रस घेण्यासारखा आहे हे सर्वसामान्य वाचकाला स्वाभाविकपणे वाटतं. त्या तुलनेत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र असे विषय कोण मुद्दामहून वाचायला जाणार? आणि याही पलिकडचा अस्पृश्य विषय म्हणजे तत्त्वज्ञान. सर्वसामान्यच काय पण इतर समाजशास्त्रांचे विद्यार्थी, अभ्यासक सुद्धा ज्याला वचकून असतात असा विषय हा! जिथे अभ्यासकांनीच वाचायची मारामार तिथे विद्यार्थी आणि इतरेजन कशाला वाचताहेत? पण या सगळ्या परिस्थितीला आणि समजाला छेद देणारं एकमेव पुस्तक मराठीत काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं. त्याचं नाव 'आपले विचारविश्व'. जागतिक तत्त्वज्ञानाचा थोडक्यात आणि अत्यंत सुगम भाषेत आढावा घेऊन त्याची तोंडओळख सर्वसामान्य वाचकाला सहजी होईल हे बघणारं असं पुस्तक माझ्या समजुतीनुसार मराठीतलं पहिलंच रीडर/ कम्पॅनियन बुक ठरावं.

प्रा. के. रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातलं भारतीय अ‍ॅकॅडेमिक्समधलं एक प्रख्यात नाव. मराठी माणसाला कुसुमाग्रजांचे धाकटे भाऊ म्हणूनच जास्त परिचित. आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केलं. आणि या सगळ्या वाचन-लेखन-चिंतनाचं सार असलेलं हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी लिहिलं.

या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना त्यांनी जाणीवपूर्वक फक्त चार महत्वाची क्षेत्रं विचारात घ्यायचं ठरवलं - तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान आणि देवधर्मविचार. त्यांच्याच म्हणण्यानुसार या चारी क्षेत्रांचा समग्र अभ्यास नव्हे तर या विचारप्रवाहांचे स्वरूप आणि दिशा कळणे शक्य व्हावे हे या लेखनामागचे सूत्र आहे.

साहजिकपणे या पुस्तकाचा खूपसा भर हा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञांवर आणि त्यांच्या वैचारिक योगदानाबद्दल आहे. पण प्राचीन जगातील तत्त्वपरंपरांचा आढावाही त्यांनी घेतला आहे. एकूण सहा भागांत पुस्तकाची विभागणी केली आहे
१. पूर्वेची प्रज्ञा (प्राचीन भारत, चीन, जपान, इस्लाम)
२. पश्चिमेचा विचारविकास (प्राचीन ग्रीक, १७-१८-१९व्या शतकातले विचारवंत)
३. वास्तवाचे वेध (समाजशास्त्र, अमेरिकन फलप्रामाण्यवाद, २०वे शतक)
४. आपला भारत (मध्ययुगीन, आधुनिक)
५. विज्ञान आणि धर्म
६. सफर संपवताना (व्यक्ती-विश्व-समाज-मानवी मनाचा शोध)

मी या वर्ण्यविषयाबद्दल फारसं लिहित नाहीये कारण ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. जवळजवळ साडेतीनशे पानांचं हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत कादंबरीसारखं वाचलं तर आपलं वैचारिक व्यक्तिमत्व अतिशय समृद्ध करणारा एक अनुभव पदरात पडतो. पण वर्ण्यविषय थोडा क्लिष्ट असल्याने प्रत्येक वेळी प्रत्येकाला तेवढा अवसर मिळतोच असं नाही. तेव्हा अधून मधून तुकड्यातुकड्यांत - ज्या विशिष्ट मुद्यात/ विचारवंतात रस आहे तेवढाच भाग - असं वाचलं तरी यातून मिळणारा आनंद कमी होत नाही. कधीही हातात घ्यावं आणि कोणतंही पान उघडून वाचावं अशी जी काही थोडीफार पुस्तकं असतात त्यांमधे याचा समावेश नक्कीच होतो.

मुळातच तत्त्वज्ञान इंग्लिशमधून वाचायचा प्रयत्न केला की लक्षात येतं की भाषा पक्की असेल तरच वर्ण्यविषय समजतो. कारण प्रत्येक शब्दाला मागे एका संकल्पनेची/ विचारप्रक्रियेची पार्श्वभूमी असते आणि नेहमीच्या इंग्लिश शब्दांच्या वापरात ती माहित असणं आवश्यक नसतं. ज्याला परिभाषा (जार्गन) म्हणतात ती आत्मसात केल्याशिवाय ही पुस्तकं वाचणं दमछाक करणारं ठरतं (आणि म्हणूनच कदाचित बहुतांश मराठी अभ्यासक-विद्यार्थी हे वाचायचा कंटाळा करतात). या अशा भाषेला सुगम मराठीत आणणं हे जवळजवळ अशक्यप्राय काम शिरवाडकरांनी यशस्वीरीत्या केलंय. जवळजवळ प्रत्येक संकल्पनेला त्यांनी मराठी प्रतिशब्द वापरलाय आणि कंसात त्याचा मूळ इंग्लिश शब्द दिलाय. त्यामुळे वाचकाला समजायला अजिबातच अडचण येत नाही. शिवाय मधेमधे छोट्यामोठ्या चौकटी टाकून विविध उद्धरणं, कविता, जादाची माहिती (स्निपेट्स) देऊन विषयाची रंजकता वाढवली आहे.

पण या सगळ्यापेक्षा आपण सर्व मराठी माणसांनी आवर्जून वाचावी ती या पुस्तकाची प्रस्तावना. अडीचपानी प्रस्तावनेत मराठी समाजशास्त्र-विचारवंत परंपरेची पीछेहाट का होतीये/ झालीये यावर अत्यंत परखड भाष्य आहे. उभी हयात शिक्षणक्षेत्रात काढल्यानंतर - मराठवाडा आणि पुणे - जो साक्षेपी प्राध्यापक जेव्हा ही मते मांडतो तेव्हा त्यावर आपण प्रत्येकाने एकदातरी विचार करणं आवश्यक आहे.
"१९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रांत पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्च शिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे सामान्यता संपादन (achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा आदर्श बनला!"

या परिचयाचा शेवटही मी त्यांच्याच प्रस्तावनेतील शेवटाने करतेय
"सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. सध्या सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य आणि नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणार्‍या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे..."

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://kharedi.maayboli.com/shop/Aapale-Vichr-Viswa.html
आपले विचारविश्व
के. रं. शिरवाडकर
राजहंस प्रकाशन (२०१०)
किंमत - रु. ४००/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पुस्तक वाचायला पाहिजे. सुरस (इंटरेस्टिंग) दिसतंय. किती पानी आहे ते कळेल काय? माझा अंदाज रुपयाला एक पान या छपाईदराने ४०० पाने होत असावीत. ५०० अधिकतम. तर ५०० पानांत ६ विषय बसवणे अवघड काम दिसतेय.

-गा.पै.

त्यांचं 'साहित्यवेध' (अर्धवट)वाचलंय. त्यात असाच साहित्याशी संबंधित वेगवेगळ्या विचारप्रवाहांची ओळख करून दिली आहे. हेही वाचावेसे वाटतेय.

... त्यामुळे सामान्यता संपादन (achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा आदर्श बनला!">> अचूक!
परिचयासाठी धन्यवाद!

छान परिचय करून दिला आहे. धन्यवाद. पूर्वेकडील प्रज्ञा हे फार आवडले. कुठून तरी मिळवून वाचणार.

अतिशय उत्तम पुस्तकपरिचय. तू उद्धृत केलेल्या त्यांच्या ओळी फार अंतर्मुख करायला लावणार्‍या आहेत. धन्यवाद.

दि. य. देशपांड्यांनी अर्वाचीन पाश्चात्त्य तत्वज्ञानावर (अनुभववाद, विवेकवाद, कांटची विचारधारा इ.) लिहिलेली पुस्तके जेव्हा वाचली तेव्हाच मराठीतून तत्वज्ञान सोपे करून सांगणे महाअवघड असेल याचा अंदाज आला. मला व्यक्तिशः इंग्रजीत लिहिलेले समजून घेणे जास्त सोपे वाटले. पण आता हे वाचायलाच पाहिजे.
दि. के. बेडेकरांच्या साहित्यावरही काही लिहिशील का?

आताच पाहिले. हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात आहे Happy आता पुस्तकटोपली भरली की झाले Happy

अ‍ॅडमिनना धन्यवाद Happy

अरभाटा, अरे दि के बेडेकर मी फारसे वाचले नाहीयेत. तसंही तत्त्वज्ञान हा माझा प्रांत नव्हे तर थोड्याफार प्रमाणात 'प्रोफेशनल हॅझर्ड' आहे. Proud
एकदा त्या सागरात पाय भिजवायला गेलं तर आणखी आत आत जायला सीमाच नाहीये आणि ते मला जमणारं नाही. त्यामुळे विषयाशी संबंधित तेवढंच सैद्धांतिक वाचन सहसा होतं.

वि वा शिरवाडकरांचे धाकटे भाऊ के रं शिरवाडकर? Uhoh म्हणजे चुलत वगैरे का?

=============

>>>"सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. सध्या सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य आणि नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणार्‍या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे..."

<<<

पूर्ण दोष ढकलणे हा हेतू नाही आणि अजिबातच दोष न देणे इतका मनाचा मोठेपणाही नाही. पण आधीच्या पिढीने निर्माण केलेल्या जीवनशैलीतच आजचे लोक राहात असतात. शिरवाडकरांचे हे वाक्य कोणत्याही काळातला माणूस केव्हाही म्हणू शकेल. लेख आवडला पण प्रस्तावनेतील कोट केलेले वाक्य वाचून निराशच झालो.

लले, धन्यवाद Happy

अवांतर उत्तर - हे रसग्रहण नाही तर परिचय आहे Proud
आणि मला असं हुकमी लिहिता येत नाही (अभ्यासाचं सोडून) शिवाय त्या स्पर्धेच्या वेळी अनंत व्यावसायिक मरणरेषा सांभाळत होते... Uhoh

अरभाट, जमलं तर पुस्तक खरेदीतली लिंक दे ना इथे.

बेफिकीर, सख्खे भाऊ. कुसुमाग्रज लहानपणी दत्तक गेले होते.

बेफिकीर, सख्खे भाऊ. कुसुमाग्रज लहानपणी दत्तक गेले होते.<<< ओके, हे माहीत नव्हते. या माहितीसाठी धन्यवाद.

शिरवाडकरांचे हे वाक्य कोणत्याही काळातला माणूस केव्हाही म्हणू शकेल. >>>> ह्म्म्म. हे संपूर्ण पटत नाही.

साधारण एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध ते विसाव्या शतकाचा उत्तरार्ध असा काळ पाहिला तर महाराष्ट्रात गुरूदेव रानडे, भांडारकर, लोकहितवादी, चिपळूणकर, आगरकर, फुले, विठ्ठल रामजी शिंदे, कर्वे त्रयी (धोंके, रधों आणि इरावतीबाई), केवलानंद सरस्वती व त्यांची विचारधारा पुढे नेणारे तर्कतीर्थांसारखे लोक, रॉयवादी विचारवंतांची फळी (द्वा. भ. कर्णिक, गोविंदराव तळवलकर इ.), आंबेडकर, सावरकर, विनोबा भावे, आचार्य जावडेकर, दुर्गा भागवत, नरहर कुरुंदकर, पु. ग. सहस्रबुद्धे (लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान), गं बा सरदार इ. लोकांचे अस्तित्व उठून दिसते. या लोकांद्वारे गेली १००-१५० वर्षे महाराष्ट्रात सातत्याने विचारजागर होत होता. या लोकांनी पृथगात्म (ओरिजिनल) व मूलगामी असे विचारधन दिले. या पार्श्वभूमीवर प्रस्तावनेतील वाक्ये नक्कीच मननीय आहेत व ती 'हे कधीही कोणीही म्हणू शकते' एवढ्या सबगोलंकारी विधानाने मोडीत काढता येतील का?
कदाचित या तोडीचे काम सततच न होणे जास्त नैसर्गिक असेल! म्हणजे समाजशास्त्राच्या दृष्टीने गेली १५० वर्षांचा काळच अपवादात्मक असेल आणि आता जो स्थूलपणा आला आहे तो जास्त स्वाभाविक असेल. मला माहिती नाही. पण या विचारमंथनावर पोसलेल्यांना काही बाबींचा तीव्र अभाव जाणवणे अगदी साहजिक आहे. असो.

हा दुवा मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध असलेल्या या पुस्तकासाठी -
http://kharedi.maayboli.com/shop/Aapale-Vichr-Viswa.html

या लोकांनी पृथगात्म (ओरिजिनल) व मूलगामी असे विचारधन दिले. <<<

माणूस त्या त्या परिस्थितीत त्याला जे शक्य आहे ते करतो. त्या काळचा (सामाजिक, तांत्रिक इत्यादी एकंदरच) विकास आत्ताइतका नव्हता. पारतंत्र्यही होतेच.

(कोणताही विचार पृथगात्म असणे मला अशक्य वाटते. जगात काहीही ओरिजिनल नाही असे मला वाटते. 'इट ऑलरेडी एक्स्झिस्ट्स, ओन्ली वुई कम टू नो लिटल लॅटर' इतकेच मला वाटते. मग यात विचार, प्रगती, संशोधने हे सगळेच आले).

(हे माझे गृहीतक अमान्य असलेच तरी क्षणभर मान्य केल्यानंतर / केलेच तर) माणूस फक्त विचार राबवण्यासाठी कष्ट करू शकतो, मुळातच विचार निर्माण करू शकत नाही. विचारांची निर्मीती परिस्थितीजन्य राहते. हजारे आज महान ठरत असले तरी आजच्या परिस्थितीचा एक अप्रत्यक्ष परिणाम इतकेच हजारेंचे स्वरुप आह असे माझे मत!

माणसाला माणूस स्वतःच अधिक आवडत असतो. 'आमच्या काळात' यातही 'आमच्या' हा शब्द आहे. 'आजच्या काळात' यातही 'आजचा' हा शब्द आहे. या टाईमस्पॅनमध्ये माणूस स्वतः कुठेतरी असतो. त्याच्या जडणघडणीच्या काळात रुजलेले विचार दिसेनासे झाले की हळहळतो. हे तरी कालातीत असावे हे मान्य होण्याची आशा वाटते.

संशोधने व कष्ट त्याच (१९ उत्तरार्ध ते २० उत्तरार्ध) लोकांनी केली आणि त्याची फळे आपली मुलेबाळे चाखणार हे आपल्याला मान्य व्हायला हवे. 'त्यांच्यात विचार नाही' असे म्हणणे तकलादू अधिष्ठानावरील विचार आहे कारण आज पारतंत्र्य आले तर हीच विशीबाविशीची मुले मुली लढायला तयार होणे असंभव नाही Happy

कोणताही विचार पृथगात्म असणे मला अशक्य वाटते. >>>> हे गृहितक आहे हे मान्य केलेच आहे, त्यामुळे नंतरचा विचार करण्याआधी आधी ह्याचा आधार बघावा लागेल.
उपरोल्लेखित सर्व नावे केवळ विचारवंत या संज्ञेखाली घेतली आहेत. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हा वेगळाच विषय होईल. परिस्थिती वेगळी होती हे मान्यच. पण केवळ 'पारतंत्र्य/स्वातंत्र्य' हाच मुद्दा नसेल. तो अंमळ सोयीचा वाटतो. नाहीतर स्वतंत्र समाजातूनसुद्धा चॉम्स्कीसारखे विचारवंत आलेच नसते.

दुसरे म्हत्त्वाचे -
याच्या जडणघडणीच्या काळात रुजलेले विचार दिसेनासे झाले की हळहळतो. >>>> विचार रुजले नाहीत म्हणून हळहळणे नाही. उलट मुळात विचारांची मांडणीच होत नाहीये हा मुद्दा आहे. विचार रुजणे/न रुजणे याचा विचार करण्याच्या प्रक्रियेशी संबंध नाही. हे केवळ 'आमच्या काळी अमुक होते' असे पोकळ स्मृतिरंजन (नॉस्टॅल्जिया) नाही. असले स्मृतिरंजन भावनाधिष्ठित होय. ते इथे अप्रस्तुत ठरते.

आणखी एक - तुमचे गृहितक प्लेटोच्या 'आयडिया व फॉर्म' या संकल्पनांना समांतर आहे. प्लेटोच्या या गृहितकाविरुद्ध विचाररचना अनेकांनी केली आहे. तीसुद्धा एकदा तपासून बघावी लागेल.

अरभाट, मस्त पोस्ट. सर्व लेव्हल्स वर आता एवढे dumbing down होत आहे. त्यात फिट होणे जड जातेच. म्हणजे तशी वैचारिक पार्श्वभूमी व शैक्षणिक पात्रता नसतानाही होते.

रच्याकने:
चॉम्स्कींचा उल्लेख वाचून अंमळ भावना प्रधान व्हायला झाले. माझ्याकडे त्यांचे समग्र कलेक्षन आहे.
असे विचार प्रकट होऊ दिले म्हणून अमेरिकन समाजातील कितीतरी गोष्टी आव्डत नसल्या तरी
त्यांचे फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन जपल्याबद्दल कौतूकच वाट्ते. नाहीतर दडपशाहीचेच अनुभव जास्त.

अवांतर लिहील्या बद्दल क्षमस्व.

अरभाट, माझ्या मुद्यांकडे किंचित दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत आहे. (बाहेर गेलो होतो, त्यामुळे उशीरा प्रतिसाद देत आहे).

>>>उपरोल्लेखित सर्व नावे केवळ विचारवंत या संज्ञेखाली घेतली आहेत. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हा वेगळाच विषय होईल. परिस्थिती वेगळी होती हे मान्यच. पण केवळ 'पारतंत्र्य/स्वातंत्र्य' हाच मुद्दा नसेल. तो अंमळ सोयीचा वाटतो. नाहीतर स्वतंत्र समाजातूनसुद्धा चॉम्स्कीसारखे विचारवंत आलेच नसते.<<<

विचारवंत हेच मुळी घडतात ते परिस्थितीमुळे. म्हणजे अनेक जण विचार करत असतात, चांगला विचार स्वकष्टाने राबवून अंमलात आणणारे विचारवंत ठरतात आणि मग नंतरचे लोक त्यांना मोठे समजतात ( जे ते असतातच). पण मुळात चांगला विचार प्रत्यक्षात आणणे यामागे तो विचार मनात येण्याची कारणे म्हणजे (अनेकदा सामाजीक) परिस्थिती असते. मीही स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याबाबत (खास करून काही) म्हणत नसून फक्त उदाहरणादाखल स्वातंत्र्य हा एक विषय निवडला. जसे आज स्त्रिया शिकत असल्याने आज फुले समाजात घडण्याची समाजाची गरज (काही प्रमाणात, काही प्रदेशात) संपलेली आहे. तशी तेव्हा तुम्ही म्हणता ते विचारवंत असण्याची गरज समाजात होती. (यात श्रेय काढून घेण्याचा हेतू वा अधिकार नाहीच आहे, पण म्हणून पुढच्या जनरेशनला एकंदरीत विचारहीन म्हणण्याला विरोध आहे इतकेच)

विचार रुजले नाहीत म्हणून हळहळणे नाही. उलट मुळात विचारांची मांडणीच होत नाहीये हा मुद्दा आहे. विचार रुजणे/न रुजणे याचा विचार करण्याच्या प्रक्रियेशी संबंध नाही. हे केवळ 'आमच्या काळी अमुक होते' असे पोकळ स्मृतिरंजन (नॉस्टॅल्जिया) नाही. असले स्मृतिरंजन भावनाधिष्ठित होय. ते इथे अप्रस्तुत ठरते.<<<

माणसाचे चिंतन, अनुभुती, समकालीन एकंदर परिस्थिती आणि भावना या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणूनच एखादा विचार निर्माण होतो असे माझे मत आहे. म्हणजे भावना बाजूला ठेवून जर निव्वळ चांगला विचार किंवा वाईट विचार सादर करायचा म्हंटले तर ते यंत्रवत होईल. शिरवाडकरांच्या त्या चिंतनामागे त्यांची भावना तशीच असणार हे खरे तर स्पष्ट दिसल्याचे मान्य व्हावे. भावनाधिष्ठित राहूनच विचारांचे रुजणे, खतपाणी व प्रसार होऊ शकतो. विचारवंताचे विचार समाजाशी जोडले जाणे ही केवळ एका प्रक्रियेची नाळ असून त्या नाळीमागे त्या विचारवंताच्या भावना व भावनाधिष्ठित चिंतन असणे हे मला एकमेव शक्य वाटते. अलिप्ततेचा आशीर्वाद असण्यात अशक्य काही नाही, पण तेथे समाज आधी हा प्रश्न विचारेल की 'हे तुम्ही सांगताय खरे, पण तुमचे स्वतःचे काय?'!

>>>आणखी एक - तुमचे गृहितक प्लेटोच्या 'आयडिया व फॉर्म' या संकल्पनांना समांतर आहे. प्लेटोच्या या गृहितकाविरुद्ध विचाररचना अनेकांनी केली आहे. तीसुद्धा एकदा तपासून बघावी लागेल.<<<

आपला मेंदू (येथे उपरोध अभिप्रेत नाही व आपला म्हणजे कोणाही एकाचा) अप्रभावित ठेवणे अशक्य असल्याने हजारो दृष्टिकोन आपल्या दृष्टिकोनात मिसळतात व तरीही तो आपल्याला आपला दृष्टिकोन वाटत राहतो व ते वाटणे नैसर्गीक असल्याने मान्य व्हावे असेच असते. पण आपल्या नियंत्रणाबाहेरच्या बाबींमधून आपल्या नियंत्रणातल्या बाबी आपण करत असतो इतके मान्य व्हावे. म्हणजे पाऊस पडला तर छत्री उघडतो, हे अतिशय किंचित उदाहरण. पारतंत्र्य (पुन्हा एकदा, फक्त उदाहरणादाखल) आले तर स्वातंत्र्यासाठी लढणे! माणसाने माणसाकडे श्रेय घेण्याची / देण्याची मर्यादा सर्वानुमते ठरणे अशक्य असले तरी काही प्रमाणात काही जणांनी ठरवायला हरकत नसावी. Happy

अश्विनीमामी +१. हेच म्हणायचे होते.
आणि सोशल नेटवर्किंगचा या डंबिंग डाऊन मध्ये फार मोठा भाग आहे. प्रत्येक गोष्टीचा जीव छोटा असला पाहीजे. कॅची असले पाहिजे. पोस्ट हवी, लेख नको. इतके कॅज्युअल पचवणे जड जाते.
आणि विचारांचे multilevel processing का करता येत नाही ? प्रश्नच पडले नाहीत तर उत्तरं शोधणार कुठुन?

विचार रुजले नाहीत म्हणून हळहळणे नाही. उलट मुळात विचारांची मांडणीच होत नाहीये हा मुद्दा आहे. विचार रुजणे/न रुजणे याचा विचार करण्याच्या प्रक्रियेशी संबंध नाही. हे केवळ 'आमच्या काळी अमुक होते' असे पोकळ स्मृतिरंजन (नॉस्टॅल्जिया) नाही. असले स्मृतिरंजन भावनाधिष्ठित होय. ते इथे अप्रस्तुत ठरते.<<<<<<

विचारांची मांडणी अशी अशी व्हावी ही एक सापेक्ष कल्पना जाणवते. समाज प्रवाहानुसार आपापले टप्पे घेत वाहतो. फेसबूकवर जुने मित्र पुन्हा सापडल्याने तेथेच त्यांना भेटणे व त्यात वेळ घालवणे हे आधीच्यांना मान्य होणे अवघड असते. पण त्यांनीच आंतरजाल आणि फेसबूक निर्माण केलेले असते. विचारवंताने काम आजच्या समाजात करणे आणि अपेक्षा उद्याच्या समाजाकडून ठेवणे हे, तंत्रज्ञान आजच्या अप्रगत समाजात बनवणे आणि ते उद्याच्या प्रगत समाजाने वापरणे याच्या (नेमके) उलट आहे. यातून हा गोंधळ होतो नाही का?

१९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रांत पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्च शिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे सामान्यता संपादन (achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा आदर्श बनला!"<<<

तत्ववेत्ते, संशोधक अश्यांना जन्माला घालताना देवाने युरोपवर अधिक कृपा का केली? बहुधा भारताची लोकसंख्या अनियंत्रीतपणे वाढणार आहे म्हणून किंवा चारशे वर्षांनंतरही महाराष्ट्र 'राजे परत या' चा जयघोष करणार आहे हे कळल्याने!

आपण एक संपन्न देश नाही आहोत आणि असे अनेक देश जगात आहेत. पण तांत्रिक विकासाचा एक 'स्लो' पण निश्चीत व मोठा फायदा म्हणजे कालांतराने सर्व जागतीक पातळीवरील समाज एकाच तांत्रिक विकासाच्या टप्प्यावर येऊन पोचतो व निदान त्या घटकापुरता समान होतो. नंतर पुन्हा तेव्हा महाराष्ट्राला पत्ता नसलेले ज्ञान कोणीतरी मिळवत असेल.

साधारण एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध ते विसाव्या शतकाचा उत्तरार्ध असा काळ पाहिला तर महाराष्ट्रात गुरूदेव रानडे, भांडारकर, लोकहितवादी, चिपळूणकर, आगरकर, फुले, विठ्ठल रामजी शिंदे, कर्वे त्रयी (धोंके, रधों आणि इरावतीबाई), केवलानंद सरस्वती व त्यांची विचारधारा पुढे नेणारे तर्कतीर्थांसारखे लोक, रॉयवादी विचारवंतांची फळी (द्वा. भ. कर्णिक, गोविंदराव तळवलकर इ.), आंबेडकर, सावरकर, विनोबा भावे, आचार्य जावडेकर, दुर्गा भागवत, नरहर कुरुंदकर, पु. ग. सहस्रबुद्धे (लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान), गं बा सरदार इ. लोकांचे अस्तित्व उठून दिसते. या लोकांद्वारे गेली १००-१५० वर्षे महाराष्ट्रात सातत्याने विचारजागर होत होता. या लोकांनी पृथगात्म (ओरिजिनल) व मूलगामी असे विचारधन दिले. या पार्श्वभूमीवर प्रस्तावनेतील वाक्ये नक्कीच मननीय आहेत व ती 'हे कधीही कोणीही म्हणू शकते' एवढ्या सबगोलंकारी विधानाने मोडीत काढता येतील का?

>>>>

हा परिच्छेद वाचून 'लोकमान्य ते महात्मा'चीच आठवण झाली.

पुस्तक परिचय आवडला.

>>सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत.
ह्या परिच्छेदाविषयी आणि अरभाटांनी दिलेल्या विचारवंतांच्या यादीबद्दल मला वाटते की ह्या विचारवंतांच्या काळात (तथाकथित) उच्चशिक्षण थोडक्या लोकांना मिळू शके. तेव्हा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषा, गणित सगळे विषय एकमेकांशी जास्त जोडलेले होते. कारण मुळात शिकणारे लोक कमी. त्यामुळे जे होते त्यांना सगळेच ज्ञान उपलब्ध असे. आणि अश्या 'सर्वज्ञ' ज्ञानी लोकांना यशस्वी, थोर समजले जात असे.

आता माहितीच्या विस्फोटात एका आयुष्यात असे 'सगळे' शिकायला जाणे म्हणजे एक ना धड अशी परिस्थिती होण्याची शक्यता जास्त. विचारवंत होण्यात ग्लॅमर नाही. Happy

Pages