भातुकलीचा डाव आपला

Submitted by रसप on 6 August, 2012 - 01:06

एकांताच्या दोन क्षणांचा
परस्परांशी मेळ घालतो
काळवंडल्या मनात माझ्या
रस्ता शोधत धडपड करतो

तुझ्याविना मी जगण्याचीही
कधी कल्पना केली नव्हती
तू नसताना क्षणाक्षणाला
विषण्णतेची येते भरती

लपवुन दु:खे हसायलाही
तूच शिकवले मनास होते
गहिवरतो मी हसता हसता
स्मरते कारण मला नको ते

भातुकलीचा डाव आपला
तसाच अर्धा पडून आहे
खिडक्या दारे भिंतींनाही
तुझीच आशा अजून आहे

खोट्या इच्छा आकांक्षांच्या
नभात कोणी किती उडावे
विझलेल्या डोळ्यांनी माझ्या
सांग दूरचे कसे पहावे ?

....रसप....
६ ऑगस्ट २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post_6.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी हृदयस्पर्शी......
अवांतर - आज काय प्रकार आहे कळत नाही - शाम ची "तू" ही कविता ही याच मूडची आहे....

भातुकलीचा डाव आपला
तसाच अर्धा पडून आहे
खिडक्या दारे भिंतींनाही
तुझीच आशा अजून आहे <<< सुंदर

विझलेल्या डोळ्यांनी माझ्या
सांग दूरचे कसे पहावे ? <<, छान

अतिशय छान Happy

विझलेल्या डोळ्यांनी माझ्या ... इथे ...विझलेल्या या डोळ्यांनी... किंव्हा.. विझल्या/(निस्तेज) माझ्या डोळ्यांनी.

........... असं केलं तर लय अधिक छान येईल. असे वाटते. Happy

धन्यवाद शशांक सर आणि बेफि सर..

सुधाकर (ऑर्फियस) साहेब,

आपण सुचविलेल्या दोन्ही बदलांत -

विझलेल्या या डोळ्यांनी'_' आणि विझल्या माझ्या डोळ्यांनी'_'

'_' अशी एक रिकामी जागा सोडल्यास ते लयीत म्हणता येते. ह्यावरून समजावे की इथे मात्रा कमी पडते आहे. आपल्या मनमोकळ्या सूचनेबद्दल आभार. परंतु, मूळ ओळच लयीत (आणि मात्रांतही) आहे. Happy

मनातली रुखरुख प्रभावीपणे व्यक्त झालेय.
"भातुकलीचा डाव आपला
तसाच अर्धा पडून आहे"

"खोट्या इच्छा आकांक्षांच्या
नभात कोणी किती उडावे"

या ओळी अधिक आवडल्या.