हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांसाठी पुष्पौषधी (फ्लॉवर रेमेडी)

Submitted by शोभनाताई on 22 July, 2012 - 05:21

माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाने हॉस्टेल सुरु केले. वास्तुशांतीला बोलावल तेंव्हा मला तनयची आठवण झाली. तनयला हव्या त्या अभ्यासक्रमास आणि चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला म्हणुन निशा खुशीत होती. 'कष्टाच चीज झाल ग' माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स देत ती म्हणाली. तनय आता हॉस्टेलमध्ये राहणार होता, तोही खुष दिसत होता. पण आठ दिवस झाले नाहीत तर निशाचा रडवेल्या आवजातील फोन. ' अग तनय मला कॉलेज झेपत नाही परत यायच म्हणतोय.परीक्षेच्यावेळी तू दिलेल्या औषधाचा फायदा झाला होता. आता काही देता येइल का? मला तर काही सुचतच नाही बघ.' मी तिला धीर दिला. तनयला पुष्पौषधी दिली.त्याची समजुत काढली. थोड्या दिवसानी त्याचा फोन आला 'मावशी थँक्स! माझ्या मित्रानाही देशील का औषध?'
आणि म्हणून मी हे टिपण लिहिल. मैत्रीणिच्या हॉस्टेलच्या रेक्टरना दिल. काही मायबोलीकरानी फ्लॉवर रेमेडीविषयी लिहावयास सुचविले होते. तसच आता विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश होत आहेत. बरीच मुल हॉस्टेलमधे जातील. अशावेळी सदर लेखन उपयुक्त होइल असे वाटल्याने येथे देत आहे.
आजच्या गतीमान आणि स्पर्धेच्या युगात विकासाबरोबर मानसिक ताणतणाव वाढले आहेत. यातून नैराश्य, भयगंड, उदासिनता, आत्महत्येची प्रवॄत्ती असे अनेक मानसिक आजार वाढले आहेत. ग्रामीण- शहरी, श्रीमंत-गरीब,स्त्री-पुरुष, वृद्ध-तरुण, नोकरदार-व्यावसायिक-गृहिणी अशा सर्वच पातळीवर मानसिक आणि त्यातुन होणारे मनोकायिक आजार वाढत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक आरोग्यावर ताबा मिळवण्यासाठी पुष्पौषधी मदतीचा हात देउ शकतात.
ब्रिटिश वैद्यक चिकित्सक डॉ. एडवर्ड बाख यांनी १९३८ साली ही उपचार पध्दती जगासमोर आणली. आणि स्वतःच स्वतःला बरे करा हा मंत्र दिला. याद्वारे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडवणार्‍या नकारात्मक भावनांवर इलाज केला जातो. विविध नकारात्मक भावनांवर इलाज करणारी ३८ औषधे; सहा वर्षांच्या अथक प्रयत्नातुन त्यानी शोधुन काढली. फुलांपासुन तयार केली जाणारी ही औषधे
अत्यंत सुरक्षित आहेत. इतर पॅथीची औषधे चालू असताना ही घेता येतात. वेळोवेळी मी याचा अनुभव घेतला आहे..सदर लेखात हॉस्टेलमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्याना पुष्पौषधी कशा उपयुक्त ठरतील याची माहिती दिलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुर्वीच्या काळी गाव सोडून बाहेर जाण्यास लोक फारसे उत्सुक नसत. आज मात्र शिक्षणासाठी नोकरीसाठी गाव सोडून शहराकडे जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. उच्च शिक्षणासाठी तर मुलांप्रमाणे मुलीही बाहेरगावी जाताना दिसतात. त्यामुळे कॉलेजची, विद्यापीठाची हॉस्टेल्स आहेतच शिवाय खाजगी हॉस्टेल्सची संख्या वाढत आहे.

हॉस्टेलमधे राहणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी पहिली गरज असते ती जमवून घेण्याची. तडजोड करण्याची. धर्म, प्रांत,भाषा,संस्कॄती,आर्थिक परिस्थिती या सर्वच बाबतीत ! हॉस्टेलमधे राहणार्‍यात विविधता असते. रुममेट कोण असेल सांगता येत नाही. घरापासून दूर, दुसर्‍या प्रदेशात राहायचे. तिथली हवा,संस्कृती,खाणेपिणे सर्वच वेगळे असते.शालेय पातळीवरील शैक्षणिक जीवन आणि कॉलेजमधील शैक्षणिक जीवन यात फरक असतो. या सर्वांशी जुळवून घ्यायचे तर, वॉलनट(Walnut) ही पुष्पौषधी अगदी जिवलग मित्र बनून तुमची सतत साथ-सोबत करु शकते.

प्रथम वर्षातील विध्यार्थ्याना जमवून घेण्याबरोबर घरची आठवण येणे स्वाभाविक असते. खाण्याजेवणाची आस्थेने विचारपूस करणारे मागे लागून खायला लावणारे कोणी नसते. अभ्यासाचे टुमणे लावणारे, मायेची पाखर घालणारे कोणी नसते. घर म्हणजे काय याची खरी किंमत समजते. अभ्यास सोडून पैसे खर्च करुन सारखे सारखे घरी जाणे परवडणारे नसते. आठवणींची तीव्रता वाढत जाते. या अवस्थेतुन हनीसकल (Honeysuckle)अलगद बाहेर काढते.

मराठी माध्यमातून शिक्षण झाले असल्यास इंग्रजी माध्यमातून शिकणे अवघड जाते. छोट्या गावात आपण 'वासरात लंगडी गाय शहाणी' असतो. इथे एकापेक्षा एक हुषार विद्यार्थी पाहून आत्मविश्वास गमावल्यासारखे वाटते. ग्रामीण भागातून आल्यास शहरी वातावरण, भाषा यामुळे आपण गबाळे आहोत असे वाटते. आणि न्युनगंड निर्माण होतो.या सर्वातून लार्च (Larch) तुमच्यातील राजहंस जागॄत करत आत्मविश्वास मिळवून देतो. याशिवाय प्रॅक्टिकल, प्रेझेंटेशन, तोंडी परीक्षा यासर्वांसाठीही आत्मविश्वास देण्याचे काम लार्च करते.

याबरोबर मिम्युलस (Mimulus) दिल्यास परीक्षा, प्रॅक्टीकल याबद्दल वाटणारी भीती कमी होते.

विद्यार्थ्यांचे बरेचसे ताणतणाव परीक्षा, अभ्यास यांच्याशी निगडित असतात. परीक्षेची तारीख जवळ आलेली असते. अभ्यास झालेला नसतो. मग झोप उडते. स्मरणशक्ती दगा देईल असे वाटते. अशावेळी व्हाईट चेस्टनट(White Chestnut) हळुवारपणे दिलासा देते. काहीवेळा अभ्यास पूर्ण झालेला असतो. पण पेपर हातात आल्यावर उत्तेजना इतकी वाढते की पेपर सोपा असूनही आणि अभ्यास तयार असूनही अचानक काही आठवेनासे होते. त्यावेळी व्हाईट चेस्ट नट आवर्जून घ्यावे.
कवी, लेखक, संशोधक यांच्या सर्जनशीलतेला खतपाणी घालण्याचे काम व्हाईट चेस्टनट करते. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, संशोधनप्रकल्प यात भाग घेणारे यानी व्हाईट चेस्टनट अवश्य घ्यावे.

सततचा अभ्यास प्रॅक्टिकल, लेक्चर्स, तोचतोच दिनक्रम यामुळे एकसुरीपणा येतो. कंटाळा येतो. बोअर झालो हा शब्द वारंवार यायला लागतो. अभ्यासाचा कंटाळा येतो. एकदा अभ्यासाला बसल्यावर छान अभ्यास होतो पण सुरुवातच होत नाही.अशा धक्का स्टार्ट मंडळींचा कंटाळा घालवण्याचे काम हॉर्नबीम (Hornbeam) करते.

हॉस्टेलमध्ये राहणार्‍या भिडस्त स्वभावाच्या कोणाचेही म्हणणे पटकन पटणार्‍या विद्यार्थ्याना हॉस्टेलमधील जीवन त्रासदायक होते. त्यांच्या घरुन आलेला खाउचा डबा त्यालाही न ठेवता सगळे फस्त करतात. कॉमन संडास-बाथरुम असल्यास हे सतत मागे राहतात. असे भिडस्त, कोणाचेही म्हणणे पटकन ऐकणारे, भिडेखातर किंवा गटात एकटे पडू या भीतीने, मित्रांच्या सांगण्यावरुन व्यसनाच्या आधीन होतात. अशा भिडस्ताना सेंटारी (Century) मदतीचा हात देते.

भिडस्तपणामुळे किंवा वाइट संगतीमुळे व्यसनाधीन झालेल्याना, व्यसन सोडायची इच्छा असते. पण भावनाना आवर घालता येत नाही. अशावेळी अनावर भावनाना आवर घालण्याचे काम चेरी प्लम (Cherry Plum) करते.

विविध कारणांनी विद्यार्थ्यांच्या भावना अनावर होउ शकतात. काहीवेळा रॅगींगला तोंड द्यावे लागते; परीक्षेत अपयश येते; अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड येते; रागाच्या भरात आपल्या हातून विपरित घडेल अशी भिती वाटते; अशावेळी कमकुवत मनाच्या व्यक्तींना नैराश्य, वैफल्य यानी घेरले जाते. आत्महत्या करावीशी वाटते. स्वीट चेस्टनट (Sweet Chestnut) यापासुन परावृत्त करते.

आणि वडिलकीच्या नात्याने कान पिळून मानसिक संतुलन जाग्यावर आणण्याचे काम चेरी प्लम (Cherry Plum) करते.

कॉलेज जीवनात विशेषत: इंजिनिअरींगच्या विद्यांर्थ्यांबाबत विषय राहणे, वर्ष राहणे हे अनेकांच्याबाबत घडत. कधीही नापासाचा शिक्का न बसलेल्या विद्यार्थ्यांना हे इअर डाउन, सब्जेक्ट डाउन प्रकरण मानसिक ताणाचे वाटते. नैराश्य येते. नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. या सेट बॅकला तोंड देउन नव्या जोमाने अभ्यासाला लागण्यास जेंटीयन (Gention) उपयोगी पडते.

डॉ. बाखच्या ३८ औषधांपैकी वरील सर्व औषधे हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण मानसिक समस्या लक्षात घेउन सांगितलेल्या आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने गरजेनुसार ३८ औषधांपैकी वेगवेगळी औषधे घेणे गरजेचे असते.

डॉ. बाखनी पाच औषधे एकत्र करुन तयार केलेले ३९ वे औषध रेस्क्युरेमेडी (Rescue Remedy) . हे औषध मात्र हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांपुरतेच नाही तर; प्रत्येक व्यक्तीने जवळ ठेवावे असे आहे. संकटप्रसंगी, आणीबाणीच्या वेळी हे औषध हमखास उपयोगी पडते. छोटा मोठा अपघात, भाजणे, कापणे यासाठी डॉक्टरांच्यापर्यंत पोहचेपर्यंत प्रथमोपचार
म्हणुन RR या नावाने ओळखले जाणारे हे औषध चोख कामगिरी बजावते. नकारात्मक विचार, मानसिक अस्वस्थता यासाठी हे घ्यावे.

मित्रानो, मी स्ट्राँग आहे मला नाही मानसिक उपचारांची गरजा अशी आत्मप्रौढी न बाळगता पुष्पौषधी 'Friend in need ' आहे हे ओळखून त्यांच्याशी मैत्री करा आणि खुशाल ताणतणावाना भिडा. हॉस्टेल लाइफ निरामय आनंददायी करा.

(टीप : ही औषधे कोणत्याही होमिओपॅथीच्या दुकानात मिळतात.पाचपर्यंत ओषधे एकत्र घेता येतात.दिवसातुन चार मात्रा सर्वसाधारणपणे घ्याव्या.समस्या तिव्र असल्यास तासातासानेहि घेउ शकता यापासुन कोणताहि अपाय नाही.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभना काकू, छान माहिती आहे. मूड स्विंग्ज वर यांचा खूप चांगला उपयोग होतो हे पाहण्यात आहे. नेहमीच्या औषधांच्या बरोबरीने ही औषधे घेता येतात हाही एक प्लस पॉईन्ट व पथ्य असे काहीच नसते.
पुण्यात तर बर्‍याच ठिकाणी होमिओच्या दुकानात ही औषधे मिळतात.

शोभनाताई, धन्यावाद. उपयुक्त माहिती. अजुन वाचायला आवडेल.
मूड स्विंग्ज वर यांचा खूप चांगला उपयोग होतो हे पाहण्यात आहे>> +१

व्वा... खुप उपयुक्त माहीती दिलीत याचप्रमाणे सामान्य लोकांसाठीपण स्मरणशक्ती, आत्म्विश्वास वाढवण्याची औषधे सुचवा नं....

शोभनाताई अनेक धन्यवाद आणी उत्तम माहिती. फक्त एकच सांगा की ५ ते ६ वर्षाच्या लहान मुलांना अशी औषधे देता येतात का? आणी जर हो, तर ती कितपत सुट होतात?

शोभनाताई काही दिवस इथे येऊ शकत नाहीयेत. नेट अ‍ॅक्सेसची काही अडचण आहे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे थोड्या दिवसांनी त्या देतील.
टुनटुन, माझ्या अल्पमतिने आणि अल्प अनुभवाने सांगते, लहान मुलांनाही ही औषधे देता येतात. आणि सुटही होतात Happy

२ वर्षांपर्यंत च्या मुलाना पुष्पौषधी देता येतात का ?
देता येत असतील तर
१) एकाग्रता / स्थीरपणा या साठी काय देता येईल ?
२) बुध्दीवर्धक काय देता येईल ?

प्रतिसादाला वेळ लागल्याबद्दल दिलगीर आहे. आरतीनी कारण सांगितलच आहे.आर ती त्याबद्दल धन्यवाद.
शशांक,अरुंधती,रचनाशिल्प,निवा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मनि आत्मविश्वासासाठी लॉर्च सर्वानाच घेता येइल.त्याचबरोबर भितिमुळे नसल्यास मिम्युलस, निर्णय घेता येत नसल्यामुळे नसल्यास स्क्लेरेंथस,अशी गरजेनुसार औषधे घ्यवी लागतिल.स्मरणशक्तीबद्दल हि असेच.एकाग्रता नसल्याने कमि असेल तर क्लेमाटिस्,हनिसकल्.इतर विचराम्चि गर्दि झल्याने असेल तर व्हर्वेन आणि व्हाइटचेस्टनट.
टुनटुन अवलनी सांगितलेली माहिती बरोबर आहे.लहन मुलांना औषधे जास्त लवकर लगु पडतात.गोड गोळ्या असल्याने मुले आवडीनेहि घेतात.
केदार अगदी तान्ह्याबाळालाहि देता येतात्.एकाग्रता आणि स्मरणशक्ती का नाही याची कारणे पाहुन त्यानुसार औषधयोजना करावि लागेल.

Hi medicines ghyayala chalu kelyavar tyancha parinam kiti divsani apekshit aahe?
Mahiti ani lekha baddal dhanyawad..