एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..

Submitted by अनुराधा म्हापणकर on 2 August, 2012 - 01:22

बालपणी कित्येक क्षुल्लक कारणांवरून भांडलो होते..
कधी तुझी खेळणी.. कधी माझी भातुकली..
रिमोट कंट्रोलची खेचा खेची.. टीवी चॅनेल साठी ..
आत्ता ते सारं पोरकट जरी वाटलं तरी..
तेव्हा जीवन मरणाचा प्रश्न होता..

मग एक दिवस ..
ख़री खुरी भातुकली खेळायला सज्ज उभी मी
आंतरपाटा पलिकडच्या विश्वात गेले..
कोणीतरी तुला कान पिळायला बोलावले..
कुठुनसा तू आलास.. डोळे तुझे लाल..
पेटवलेल्या होमाचा धूर- मला वाटले..
सारं जग रडेल.. पण तू नाही ढाळणार अश्रु..
सोडशील नि:श्वास आणि हसशील मनात..
म्हटलं -
आता बस घेऊन रिमोट- चोविस तास हातात..
मी निघाले माझ्या घरी ..
हक्काचा रिमोट माझ्या हातात असेल..
आईच्या कुशीत शिरत मग रड रड रडले..
पप्पांचे हात तेव्हा डोक्यावरून फ़िरले..
तुला म्हणाले.. 'निघते रे'..
आणि मग ..
तू हमसा हमशी रडत मला बिलगलास..
म्हणत राहीलास.. फक्त..
"भाओजी.. माझ्या दिदीची काळजी घ्याल ना.. "
"भाओजी.. माझ्या दिदीची काळजी घ्याल ना.. "

मी अवाक.. नि:शब्द.. !!!
रडताना तुला पहिल्यांदाच पाहिले..
माझ्यावरचे प्रेम तुझ्या डोळ्यातून वाहिले..
भरून पावले अगदी..तशातही मनात सुखावले...
म्हणाले मनातच... चला..
एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..
एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..

:अनुराधा म्हापणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..
गागागागा गागागागा गागागागा..........या 'लगा'वलीत एक गझल होवू शकते या ओळीपासून

असो
कविता खूप खूप छान आहे !!

धन्यवाद

सरळ, साधी पण भावनांनी ओतप्रोत......
नेहेमीप्रमाणेच अतिशय सुरेख.... खूपच भावली मनाला.....