अक्का, अ‍ॅलिस आणी मी!

Submitted by ट्यागो on 29 July, 2012 - 14:34

प्रत्येकाला दादरला जायचंय
दादरलाच
लास्ट डेस्टीनेशन
काय ’फकिंग’ आहे तिथं?
कुणास ठाऊक
कुठला बंगाली बाबा
कुठली पुस्तकांची दुकानं
सेंट्रल-वेस्टर्नचा रूट
पुण्यासाठी गाड्या
भाजीपाला, फळं, फुलं
बारसं-बाराव्याचं सामान
देव-देव्हार्‍याच्या गोष्टी
कंपन्यांची ऑफिसं
की अजून काही

मला गाडी पकडता येते
अगदी पर्फ़ेक्ट
म्हणजे ८.२२ ची लोकल
७.३७ ला घर सोडल्यावर मिळतेच
सेकंदाचाही फरक नाही
दोनेक सेकंद चुकलीच
तर दोन कोटी सेकंदाचा मारा
पण असं हल्ली होऊनच नाही देत
एकदम अ‍ॅक्युरेट
इतकंच नाही
गर्दीही येते सर करता
कुठल्या सेकंदाला उचलायचा
कोणता पाय
अन कुठे धरुन ढोसायची गर्दी
कसं शिरायचं सुमकन झूमकरीत
उतरतानाही तीच अ‍ॅक्युरसी
गाडी थांबल्यावर जसं आपण चढत नाय
तसंच उतरतही
दोन्ही कामं ती धावतानाच
गणित अगदी पक्कं

पयले सवाल पडताथा
How to survive here?
पण आता नाय
’बच्चायेस भडव्या अजून, पण शिकवेल हे शहर’
असं म्हणायचंच कुणीनकुणी
आणि खरंच
तेव्हापासून मरु लागली माझी अ‍ॅलीस
हळूहळू
मेलीच!
इथेच
इथेच कुठेतरी
कुठल्याश्या उपनगरात
गटारात, रस्त्यात
वा बहुधा ह्या ट्रॅकवरच
ज्यावरून वाहतात ह्या लोकली, एक्सप्रेसी, मालगाड्या
ज्यांवर हगतात कुंपणापलीकडले
ओकतात गर्दुल्ले
तिथंच
इथंच कुठंतरी

गर्दीला चेहरा घाईचा
पदर ढळतो बाईचा
कैक ढुंगणांचा एकत्रित लाँग मार्च
लै प्रश्न पडलेले आवडत नाय ह्या शहराला
मग
भजनीमंडळं दंगात गातात
जुगारी पत्ते
डोअर लटके जोषात
"ए आयटम, ए पांडू, ..गिरा देख, ओ भय्या.. चलो..चलो..चलो..चलो..चलो"
नुसतं ओरडायचं, केकटायचं
कैच नाय जमलं
तर झोपायचं उभ्या-उभ्याच
एखाद्याच्या वा स्वत:च्या
पाठीवर, खांद्यावर डोकं लटकत ठेवून
पुसायचा घाम विनाकारण
दुसर्‍याचं घामेजलं कपाळ पाहून
किंवा
दुसर्‍याच्याच पाठीत दंडावर घुसळायचं
घामेजलेलं डोकं, कपाळ, गाल, काहीही
चिकटवायचं ताठर-माठर पौरुष
घसघस घासत
काढायचा कुठलासा त्रागा, धागा
ओकायचा शिल्लक असलेला

पुन्हा धावायचं बसमध्ये
टॅक्सीत, रिक्षात, पाया-पायात
संपवायचा दिवस, वेळ
बघायची घड्याळं
स्टेशनांवरली
हातातली
इमारतींवरची
मोबाईल, लॅपटॉप कशातलीही
५.०३ ची लोकल सोडायची नैइच
नायतर भीती 'जास्त दाबले' जाऊ ची
हल्ली फुकटाची मालीश म्हणून
जास्त गर्दी आवडतेच

फर्स्टक्लासच्या डब्यात
त्याच्यासोबत ती
कुणीतरी कुस्करु पाहतं मग
कुठूनतरी हात काढून
कुणीतरी अघळ-पघळ-अंगलट
तोही मजा घेतो अन तीही!
प्रचंड दबलेलं असं
उफ़ाळून येतं काही
तोच भेसूरपणा ज्याच्या-त्याच्यात
सुप्त लैंगिकता, वासना, विकृती इ.इ.
काहीही
विरेचनाचे शॉर्टकट्स
की मोकळं व्हायची ऊर्मी
लै टायमाचं काम भंपाक
सगळं कसं झटाककन पटाकन
हे सगळीकडेच
मरीन ड्राईव्ह, बीचेस, देवळं, कोपरे, कोपचे, बागा, टॅक्स्या, रिक्षा, गाड्या
उघड्यावर, गर्दीत कुठेही
घट्टपणे चोखाळतात हे मार्ग
हे, ते, तो, ती, तू , मी..
म्हणून ती कण्हते
तो ओरडतो
ते हसतात
त्या खिदळतात
एक पाशवी खेळ
सदैव चालूच

हे ठाणं, कल्याण, वसई, विरार, डोंबिवली,
ह्या रांडा
मुंबईनं ठेवलेल्या
अजून कैक येतायेत, होतायेत, वाढतायेत
मुंबई ह्यांची अक्का
सगळ्यांचीच
माझीही!

मयुरेश चव्हाण, मुंबई.
२७.०७.२०१२, २१.१२.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईचं अतिशय मा**चो* इंटरप्रीटेशन केलयस...

हे ठाणं, कल्याण, वसई, विरार, डोंबिवली,
ह्या रांडा
मुंबईनं ठेवलेल्या
अजून कैक येतायेत, होतायेत, वाढतायेत
मुंबई ह्यांची अक्का
सगळ्यांचीच
माझीही!

करेक्ट!!

ट्यागो म्हणजे मयुरेश चव्हाण का? तरीच स्टाईल ओळखीची वाटली. कविता नेमकी कशी असते किंवा नसते ह्यातलं काही कळत नाही पण लिहीलेलं खुपच जबरदस्त आहे. खिळवून ठेवतं.

वाह! आवडलीच.
ट्यागो, 'अभिधानंतर'चे काही वाचता का? हे वाचून कोलटकर, हेमंत दिवटे, सलील वाघ, वर्जेश सोलंकी इ.च्या कुळाची आठवण झाली. येत रहा Happy

मनापासून धन्यवाद प्रत्येकाचे!

'अभिधानंतर'चे काही वाचता का?>>>
नाही ओ, ऐकून आहे मात्र, अन् हो शोधातही. आपल्याकडे (कुणाकडेही) काही असल्यास दिलेत तर आभारी राहीन!

कविता म्हणून सच्ची.. विवेक राजापुरेंची आठवण झाली..पण एका अभिमानी मुंबईकरणीसाठी हृदय जाळून टाकणारी वस्तुस्थिती. माझ्या महालक्ष्मीची अक्काबाई कशी झाली? कुणीकुणी केली ? पण नाहीच. ही माझी मायाविनी,मनस्विनी ,शतरूपधारिणी या सगळ्यात आहे आणि सगळ्यापलिकडेही.

एखादं घर नांदतंगाजतं आहे ,भरभराटलेलं आहे म्हणून त्याच्या आश्रयाला अख्खा गाव येऊन राहिला तर त्या घराची अवदसा होईल नाहीतर काय? तसं झालंय माझ्या मुंबईचं. नियोजनशून्यच नव्हे तर इच्छासक्तीशून्य मतलबी राजकारणी, धूर्त नफेखोर बिल्डर्स, भ्रष्ट नोकरशहा यांच्या कुरुसभेत तिचं वस्त्रहरण चाललय.आहे कुणी माईचा लाल तिच्यासाठी ?

इथे एक सुंदर शहर होतं,जगावेगळ्या धारणांचं. होतं नाही, अजूनही आहे ते माझ्या मनात, कवितेत, थोडं थोडं अस्तित्वातही..अजून द्वारका बुडाली नाहीय..

माझ्या महालक्ष्मीची अक्काबाई कशी झाली? कुणीकुणी केली ?>>>>ती आम्हीच केली,
आमच्या आवडी निवडी बदलल्या,आता बघाना वरच्या कवितेत आम्हाला काय काय आवडलं

काय ’फकिंग’ आहे तिथं?

गर्दीला चेहरा घाईचा
पदर ढळतो बाईचा

चिकटवायचं ताठर-माठर पौरुष
घसघस घासत
काढायचा कुठलासा त्रागा, धागा
ओकायचा शिल्लक असलेला

फर्स्टक्लासच्या डब्यात
त्याच्यासोबत ती
कुणीतरी कुस्करु पाहतं मग
कुठूनतरी हात काढून
कुणीतरी अघळ-पघळ-अंगलट
तोही मजा घेतो अन तीही!

हे, ते, तो, ती, तू , मी..
म्हणून ती कण्हते
तो ओरडतो
ते हसतात
त्या खिदळतात
एक पाशवी खेळ
सदैव चालूच

ह्या रांडा
मुंबईनं ठेवलेल्या>>>>

हे सगळं वाचायला आम्हाला आवडलं याचाच अर्थ आमच्यासुध्दा आवडीनिवडी बदलल्या नाही का?

प्रमोद देव | 31 July, 2012 - 23:28
बकवास!>>>>>>>
धन्यवाद देवसाहेब.

कवितेबद्दल तर काही लिहावंसं वाटत नाही. म्हणून तर मी दिलेला प्रतिसाद माघारी घेतला.
पण प्रतिसादांतही भल्याभल्यांनी निराशा केली.
दुर्दैव.

Pratisad denaryanni nirasha keli mhanta? Pratisadaat ekhadi sweet counter kavita / gazal apekshit hoti ka tumhala??

आवडली.
पण सहज नाही वाटली. आटापिटा वाटला थीममध्ये बसवायचा. कदाचित शब्दयोजनेमुळे.
त्यातली वेदना अजून प्रखर उमटायला हवी होती असे वाटले.

१)ट्यागो म्हणजे मयुरेश चव्हाण का? तरीच स्टाईल ओळखीची वाटली. कविता नेमकी कशी असते किंवा नसते ह्यातलं काही कळत नाही पण लिहीलेलं खुपच जबरदस्त आहे. खिळवून ठेवतं.

२)Pratisad denaryanni nirasha keli mhanta? Pratisadaat ekhadi sweet counter kavita / gazal apekshit hoti ka tumhala??

वैद्यबुवा: या आपल्या दोन्हीही प्रतिसादांनी माझी निराशा केलेली नाही.
धन्यवाद!!!

Tumhi majhya pratisaadakade dole lawun basla asaal asa majha dava naahi aajibaat. Majha jau dya, ekda lekhan awadla ki nahi he dokyaat register jhalyawer dusryanni kase pratisaad dyaawet hya wicharcha anda kashala oobvat basawe asa bhabda prashna padla mhanun wicharla yewdhach.

प्रॉब्लेम काय आहे?
तुम्हाला कविता आवडली नाही एवढाच ना? की ही कविता मायबोलीवर येतेच कशी हा? की लोकांना ही कविता आवडूच कशी शकते हा?

तुम्हाला कविता आवडली नाही हा तुमचा चॉइस आहे. त्याबद्दल कुण्णाला काहीच म्हणायचे नाहीये.

ही कविता माबोवर असण्यात काहीच चुकीचे नाही हे वाटणारे माझ्यासारखे बरेच लोक आहेत आणि मुळात माबो प्रशासनाला गैर वाटत नाहीये. कमालीच्या कंटाळवाण्या, गुलगुलीत, गोग्गोड आणि प्रिटेन्शियस कविता माबोवर प्रचंड संख्येने रोज येत असतात ते जर माबोवर असणे गैर नाही तर या रोखठोक आणि प्रामाणिक कवितेने काय घोडे मारले राव?

लोकांना कविता आवडूच कशी शकते हा प्रॉब्लेम असेल तर न आवडणे हा तुमचा चॉइस तसा आवडणे हा आमचा चॉइस. तुम्हाला न आवडण्याचे स्वातंत्र्य आहे तर आम्हाला आवडण्याचे आहे.

आता बोर झालं. कधी नव्हे ते एखादी लख्ख कविता येते माबोवर तर ती आवडली म्हणायचीही चोरी की काय!!!

Pages