धडपडलो मी, तडफडलो मी उठण्यासाठी!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 July, 2012 - 06:44

गझल
धडपडलो मी, तडफडलो मी उठण्यासाठी!
काय काय मी केले नाही जगण्यासाठी!!

कधी झोपड्यांमध्ये केव्हा रंगमहाली;
कुठे कुठे हिंडले लुटारू लुटण्यासाठी!

जरी मनाच्या खिडक्या केल्या बंद तरीही;
गतकाळाची झुळूक येते छळण्यासाठी!

कधीच गेली जळून माझी तमाम स्वप्ने;
काय राहिले सरणावरती जळण्यासाठी?

अनेक वाटा, पळवाटाही समोर माझ्या;
पायच उरले नाही आता पळण्यासाठी!

भले नसेना दृष्टी मजला जगाप्रमाणे!
स्पर्श, नादही मला पुरेसे बघण्यासाठी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: