सीरियात चाललेली उलथापालथ

Submitted by sudhirkale42 on 28 July, 2012 - 01:46

लेखकः सुधीर काळे, जकार्ता

सीरियात सध्या चालू असलेल्या उठावाबद्दल चर्चा करण्याआधी आपल्याला सीरियाचा (सीरियन अरब प्रजसत्ताक) थोडा परिचय करून घ्यायला हवा. कारण त्याशिवाय परिस्थितीचे नीट आकलन होणार नाहीं. या देशाचे भूगोलातील स्थान मध्यपूर्वेत आहे व ते नकाशा क्र. १ मध्ये दिलेले आहे. या देशाच्या उत्तरेला तुर्कस्तान असून पश्चिमेला लेबॅनॉन आणि भूमध्यसागर आहे. दक्षिणेला जॉर्डन व इराक असून पूर्वेलाही इराक आहे. या देशाची सीमा कुठेही इराणशी जोडलेली नसली तरी इराकमधून हे देश जोडलेले आहेत.

सीरियाची लोकसंख्या सव्वादोन कोटी आहे व त्यात ७४ टक्के जनता सुन्नी मुस्लिम (जास्त करून अरबी वंशाचे सुन्नी पण त्यात कुर्ड, सिर्काशियन आणि तुर्कमानी लोकही येतात) असून १२ टक्के अरब वंशाचे अलावाईत आणि शिया आहेत. उरलेल्यांत १० टक्के ख्रिश्चन आहेत (त्यात अरब, अस्सिरियन आणि आर्मेनियन वंशाचे लोक येतात) आणि ३ टक्के ड्रूझ (यांनाही शियापंथीय मानले जाते) आहेत. म्हणजेच ८७ टक्के सीरियन लोक मुस्लिम असून जास्त करून अरब वंशाचे आहेत.

भूतपूर्व संरक्षणमंत्री ’मुस्ताफा तलास’[१] माजी राष्ट्राध्यक्ष हाफिज अल अस्साद (सध्याच्या अध्यक्षांचे वडील) यांच्याशी त्यांचे भावासारखे संबंध होते. सीरिया आणि इजिप्त ही राष्ट्रे १९५८ ते १९६१ च्या दरम्यान अब्दुल गमाल नासर यांच्या प्रेरणेतून "संयुक्त अरब प्रजासत्ताक" या नावाने एक झाली होती त्यावेळी हाफिज अल अस्साद आणि मुस्ताफा तलास हे दोघेही लष्करात होते आणि त्यांनी सत्ताधारी बाथ पक्षातर्फे कैरो येथून या प्रजासत्ताकाबाबतची आपली जबाबदारी उचलली होती. पण हा प्रयोग फसल्यावर ही दोन राष्ट्रे पुन्हा वेगळी झाली आणि ते दोघे परत सीरियाला परतले आणि त्यांनी एकत्र काम करून १९६३ साली बाथ पक्षाला सत्तेवर आणण्याची मोठी कामगिरी बजावली. १९६०च्या दशकात नेहमीच घडणार्या "राज्यक्रांती, ऊठसूठ नेतृत्वपालट आणि प्रति-राज्यक्रांती"च्या आवर्तनांना यशस्वीपणे तोंड देत सत्ता अबाधितपणे "बाथ" पक्षाकडेच राखली.

तलास यांच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर हाफीज यांनी रक्तपात होऊ न देता यशस्वी राज्यक्रांती घडविली आणि तलास यांना १९७० साली संरक्षणमंत्र्याचे पद देऊ केले. तलास कुटुंबियांच्या व्यापक लष्करी आणि व्यावसायिक संबंधांच्या सहाय्याने सुन्नी-अलावी[२] यांच्यामधील सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरील एकोपा आतापर्यंत अनेक दशके टिकून राहिलेला आहे. म्हणूनच २००० साली हाफीज अल अस्साद मृत्यू पावल्यानंतर तलास यांच्या पितृसदृश छायेखाली त्यावेळी राजकारणात अगदीच नवखे असलेले सध्याचे राष्ट्रपती बशार अल अस्साद नव्याने मिळालेल्या सत्तेवर आपली पकड दृढ करू शकले.

पण गेल्या आठवड्यात ब्रिगेडियर तलास यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशीर अल् अस्साद यांची साथ सोडली आणि ते बंडखोरांना जाऊन मिळाले. ही घटना अस्साद यांच्या राजवटीला कलाटणी देणारी घटना ठरण्याची शक्यता आहे. अस्साद यांच्या अल्पसंख्यांक ’अल्वाईट’ राजवटीला याच कुटुंबामुळे सुन्नी मुसलमानांकडून खंदा पाठिंबा मिळत आलेला आहे हे वर सांगितले आहेच.

नातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा! या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं. ते कांहींही असो, पण गेली कित्येक दशकें अस्साद कुटुंबाबरोबरचा आपला करार संपवायचा निर्णय तलास कुटुबियांनी घेतल्यामुळे लष्करातील आणि व्यवसायक्षेत्रातील इतर उच्चभ्रू कुटुंबियांवरही असाच निर्णय घेण्याबद्दलची मागणी आता जोर धरू लागेल यात शंका नाहीं.

सीरियातील पेचप्रसंगाबाबत एका चाणाक्ष, डोळस निरीक्षकाने एक स्पष्टीकरण दिलेले आहे ते पटण्यासारखे आहे. त्यांच्या मते अस्साद याच्या राजवटीला एका वितळणार्या बर्फाच्या लादीची उपमा देता येईल. त्याच्या केंद्रस्थानी आहे अलवाईत गोटाकडील सत्ता. या राजवटीला अलवाईत व इतर अल्पसंख्यांकानी एकाद्या पदार्थाला तो टिकावा म्हणून जसे रेफ्रिजरेटर/शीतपेटीत घालून ठेवतात तसे ठेवले आहे. कारण या अल्पसंख्यांकांना बहुसंख्य असलेल्या सुन्नी पंथाच्या राजवटीची भीती वाटते. अद्याप लष्कराच्या हुकुमतीवर आणि नियंत्रणक्षमतेवर खंड पडण्याइतक्या थरावर लष्करातील अधिकार्यांीत आणि सैनिकांत फाटाफूट झालेली नाहीं व या गटात अद्याप तरी एकजूट आहे असे दिसते. पण या केंद्रस्थानाला टिकवून धरून त्यातून राज्याचा रथ हाकण्यासाठी लागणारे सुन्नी समर्थनाचे जाळे हळू-हळू वितळू लागलेले आहे. जसजसा या केंद्रस्थानी असलेल्या बर्फाच्या लादीतला भाग विरळू लागेल तसतसा ती लादी नाजूक होत जाईल आणि केंद्रापर्यंत पोचणारे तडे उघड होत जातील. असे झाल्यास अस्साद राजवट अंतर्गत बंडाळीमुळेच कोसळेल.

सीरियात शेवटी सुन्नी राजवटच येईल?
अस्साद राजवटीला अद्याप तडे गेलेले दिसत नाहींत. पण सीरियावर सुन्नी पंथियांच्या लोकांची राजवट आल्यास प्रादेशिक स्तरावर होणार्या परिणामांकडे जरासे अलिप्तपणे आणि गंभीरपणे पहाणे आवश्यक आहे हे नक्की. खास करून असे झाल्यास इराणच्या या भागातील पकडीवर काय परिणाम होतील याचा अभ्यास करणे जरूरीचे आहे.

सीरियावर कुणाला सहजासहजी प्रभुत्व मिळविता येईल काय हे सर्वप्रथम पहायला हवे! वर्षभर या बंडाळीवर सार्या जगाचे लक्ष का वेधले गेले आहे? केवळ मानवाधिकारांची पायमल्ली हे स्पष्टीकरण पुरेसे नाहीं. गेल्या दशकात इराकमधील सुन्नी राजवटीला उखडून टाकण्यात आणि युफ्रेटीस आणि टायग्रीस या दोन नद्यामधील ’मेसोपोटेमिया’ भागात शिया राजवट आणण्यात इराणला यश मिळाले आहे (नकाशा क्र. २ पहा). आज इराकमध्ये भले एकीचा अभाव असो व तो कितीही भग्न अवस्थेत असो, पण आज तो इराणच्या प्रभावक्षेत्राखाली येतो आणि सद्दामच्या काळात इराकमध्ये निरंकुश सत्ता भोगलेली सुन्नी प्रजा आज पार फडतूस झालेली आहे! इराकमधील इराणच्या यशाने या भागातील सत्तेचा समतोल इराणच्या बाजूला झुकला आहे आणि त्यामुळे शिया पंथियांची सत्ता पश्चिम अफगाणिस्तानापासून इराण-इराक-सीरिया या मार्गाने पार भूमध्य सागरापर्यंत पसरली आहे.

सत्तेच्या समतोलातील या बदलामुळे या भागाशी हितसंबंध असलेल्या राष्ट्रांवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि कतार या राष्ट्रांनी एक होऊन इराणविरुद्ध युती बनविली आहे. अमेरिकेने इराकला नाइलाजास्तव इराणच्या प्रभावक्षेत्राखाली जाऊ दिले असेल पण सीरियातीतील उठावामुळे त्यांना इराणची भूमध्य सागराच्या दिशेने लेवांट भागाकडे होणारी प्रगती रोखण्याची संधी मिळाली आहे (नकाशा क्र. ३ पहा). सौदी अरेबिया शियांचा अरबस्तानातील खदखदता असंतोष काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुर्कस्तान या भागात सुन्नी पंथियांचे पुनरुत्थान व्हायला मदत व्हावी म्हणून एक सुन्नी प्रतिष्ठान उभे करू इच्छित आहे. याचा परिणाम म्हणून जास्त पैसा, जास्त साधन-सामुग्री, जास्त शस्त्रें, जास्त प्रशिक्षण आणि हेरगिरीतून मिळालेली भरपूर माहिती सीरियातील बंडखोरांना गुप्त मार्गाने पोचविली चात आहे. असे केल्याने अति खर्चिक अशा प्रत्यक्ष युद्धात पडण्याची टळेल आणि अस्साद यांची राजवट अंतर्गत बंडाळीने कोसळेल अशी आशा त्यांना आहे. सैद्धांतिक दृष्ट्या हे डावपेच बरोबर वाटले तरी प्रत्यक्षात हे डावपेच वापरणे बरेच गुंतागुंतीचे काम आहे!

किचकट सत्तापालट

सीरियात सुन्नी पंथियांची सत्ता जेव्हां येईल तेंव्हां प्रचंड गोंधळ माजेल. कारण अलावी गटाची सत्ता आता दमास्कसमध्ये आणि सीरियातील इतर शहरांत चांगलीच प्रस्थापित झालेली आहे. या कांहींशा कट्टर नसलेल्या, पाखंडी समाजाने लष्कर, सुरक्षादलें, हेरगिरीविभाग अशा संस्थांतील सर्वोच्च जागांवर आपला चांगलाच प्रभाव प्रस्थापित केलेला आहे आणि या समाजाला जर सत्तेपासून वंचित केले गेले तर ही सारी कौशल्यें त्याच्याकडेच रहातील. म्हणूनच जर अलवाईत आणि इतर अल्पसंख्यांक संख्येने जरी कमी असले तरी सहजासहजी सत्तेपासून दूर करून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या वायव्येकडील किनारपट्टीवरील डोंगराळ भागात घालवून देणे अशक्यच दिसते. (नकाशा क्र. ४ पहा).

या उलट अरबी आणि तुर्की राजवटीच्या पाठिंब्याने राज्यावर आलेल्या सुन्नी राजवटीविरुद्ध अलवाईत गट लढाऊ प्रतिकाराची मोहीम उघडू शकतो. सध्या सीरियात सत्ताधारी असलेल्या "बाथ" पक्षात अलवाईत गटाचेच निर्विवाद वर्चस्व आहे. या लोकांनी इराकमध्ये सद्दामच्या पाडावानंतर इराकी "बाथ" पक्षाचा चुटकीसरशी झालेला पाडाव आणि त्या पक्षाची त्यानंतर झालेली ससेहोलपट पाहिलेली आहे. आपला पराभव झाल्यास आपलीही अशीच गत होऊ नये म्हणून अलवाईत गट स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी नक्की "जिंकू-किंवा-मरू" धर्तीचा लढा देईल आणि या क्षेत्रातला आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी इराण अलवाईत गटाला कायम मदत करत राहील यात शंका नाहीं. त्यामुळे हे युद्ध नक्कीच लेबॅनॉनमध्येही पसरेल कारण तिथेही पंथीय झगडा चालूच आहे.

अस्साद यांच्या राजवटीच्या पाडावात बहुराष्ट्रीय जिहादी योद्धेही मोठी भूमिका बजावतील. आता सीरियात चाललेल्या बंडाळीत कट्टर सुन्नी उग्रवाद्यांचा, सलाफी उग्रवाद्यांचा अणि बहुराष्ट्रीय अल कायदा जातीच्या जिहादी योद्ध्यांचा वाढता सहभाग आहे. त्यापैकी सलाफी उग्रवादी अणि बहुराष्ट्रीय अल कायदा जातीचे जिहादी योद्धे सीरियात लेबॅनॉन, जॉर्डन आणि इराकमधून दाखल होत आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून सीरियाचे हेरखाते आपल्या परराष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून लेबॅनॉन आणि इराकमध्ये जिहादी योद्धे पोचविण्याच्या कामात गुंतले आहे. या उलट सौदी अरेबियासुद्धा सीरियात जिहादी योद्धे घुसविण्यासाठी हेच तंत्र वापरत आहे. बहुराष्ट्रीय जिहादी योद्ध्यांनी सीरियात आपला जम बसविल्यास ते सौदी राजवटीसाठी नवीन समस्या निर्माण करतील हे जुन्या अनुभावापासून माहीत असल्यामुळे सौदी अरेबिया असे करण्याबाबत कांहींसा उदासीन आहे. पण इराण आणि इराणच्या शिया समर्थकांबाबत सौदी अरेबियाला असलेली काळजी वरील धोक्यापेक्षा मोठी आहे. सौदी अरेबिया सीरियन राजवट आणि तिचे इराणी आणि शिया समर्थक यांच्या विरुद्धच्या (त्यांच्या मते रास्त असलेल्या) जिहादला प्रोत्साहन देत आलेला आहे हे खरेच आहे.

पण एका बाजूने जिहादी युद्धाला प्रोत्साहन देणे आणि दुसर्या बाजूने जिहादी प्रवृत्तीला आवर घालणे अशा दोन परस्परविरोधी कृती एकाच वेळी करणे सौदी राजवटीला सोपे नाहीं. धर्मवेड्या जिहादी योद्ध्यांना एकाद्या देशात घुसविणे हा भाग सोपा आहे, पण एकदा का इराण आणि शियांविरुद्धच्या सामायिक हितसंबंधांची धार बहुराष्ट्रीय जिहादी योद्ध्यांच्या कट्टर तत्वावर आधारित कार्यक्रमापुढे कमी झाली कीं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे महाकठीण आहे.[३]

मेसोपोटेमियाच्या रणभूमीचे पुनरुत्थान?

सध्याच्या अलवाईत राजवटीचे पतन आणि सुन्नी समर्थनाने उभरणार्या नव्या राजवटीचा कांहींसा वादळी जन्म यांच्या दरम्यानच्या काळात चांगलीच अराजकता माजणार हे नक्की. दोन पंथात माजलेल्या अराजकापायी कट्टर तत्वांमुळे प्रेरित झालेल्या आणि इराक आणि सीरियात लढाया लढून कणखर झालेल्या उग्रवाद्यांची (त्यात सुन्नी राष्ट्रवादी आणि बहुराष्ट्रीय जिहादी असे दोघेही आले!) एक पिढी रणभूमीवर लढत राहील. आणि सीरियात विजय मिळाल्यानंतर इराकमध्ये धडपडत असलेल्या आपल्या मित्रसंघटनांना मदत करण्याची तयारीही हे जिहादी करतील. थोडक्यात फारसे नियंत्रण नसलेल्या जिहादींची इराकमध्ये नव्याने घुसखोरी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

प्रादेशिक प्रभावासाठी इराणविरुद्ध चाललेली ही मोहीम सीरियात संपण्याची शक्यता कमीच आहे. सीरियात जर सुन्नी गोटाचा विजय झाला तर लेबॅनॉनमधील हिजबुल्ला आणि त्यांच्या मित्रसंघटनांच्य़ा नेतृत्वाखालील शिया पंथींच्या गोटाचे प्रभावी स्थान डळमळेल. लेवांत विभागात तुर्की, सौदी आणि कतारी राजवटींचे सुन्नींना मिळालेले समर्थन आणि अरब राजवटींत कट्टर इस्लामी प्रवृत्तीचा उदय यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष इराण आणि अरबी शियांविरुद्ध तटबंदी उभी करण्यात केंद्रित होईल.

याबाबतीत सर्वात जास्त महत्वाच्या इराकमधील युद्धाकडे लक्ष द्यायला हवे. इराकमध्ये इराणचा पाठिंबा लाभलेले शिया गटाचे सरकार सत्तेवर आलेले आहे हे इथल्या अनेक प्रादेशिक शक्तींना पसंत नाहीं आणि या प्रादेशिक शक्तींचे या भागात हितसंबंध अडकलेले आहेत. सीरियातील संघर्षामुळे उभ्या राहिलेल्या सुन्नी उग्रवादी शक्तींचीही या भागात मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू होईल. या उग्रवाद्यांना नेहमी कुठल्या तरी मोहिमेत गुंतवून ठेवायची गरज आहे अन्यथा ही उग्रवादी मंडळी घरी परतून स्वगृही नवे संघर्ष उभे करतील. सध्या शियांच्या वर्चस्वाखाली रहात असलेल्या दुबळ्या सुन्नी गटांना मदत करण्यासाठी ही मोहीम उभी केलेली आहे. सध्या इराणला इराकमधील परिस्थितीबद्दल काळजी वाटत नसेल पण सीरियामधील पराभवाचा चक्री परिणाम होऊन इराकमध्येही इराणला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. असे झाल्यास पुन्हा एकदा अरबी सुन्नी गट विरुद्ध इराणी शिया गट असा संघर्ष विभागीय प्रभावासाठी पेटेल. या गोष्टी घडायला वेळ लागेल आणि अद्याप सीरियात सुन्नींना विजय मिळालेला नाहीं कारण अलवाईत गटाची सत्तेवरील पकड अद्याप ढिली झालेली दिसत नाहीं. पण दूरवरचा विचार केल्यास असे होईल.....?
------------------------------------------------------
टिपा:
[१] यांना आधुनिक तलास घराण्याचे ’कुलपुरुष’ मानले जाते.
[२] अलावी (किंवा अलावाईत) उपजातीबद्दल ’विकिपीडिया’ खालील माहिती उपलब्ध आहे. (The Alawis, also known as Alawites, Nusayris and Ansaris are a prominent mystical religious group centred in Syria who follow a branch of the Twelver school of Shia Islam.) जास्त माहिती http://en.wikipedia.org/wiki/Alawi इथे वाचा. या उपजातीच्या पुरुषांना ’अलावी’ म्हणतात तर स्त्रियांना ’अलाविया’!
[३] याबाबतीतले पाकिस्तानचे उदाहरण बोलके आहे. तिथेही भारतात आणि खास करून काश्मीरमध्ये उत्पात करण्यासाठी उभारलेल्या बहुराष्ट्रीय जिहादी तुकड्या आता भस्मासुराप्रमाणे जनकावरच उलटलेल्या आहेत!
हा लेख Stratfor या संस्थळावरील लेख आणि Wikipedia वरील माहिती यांचे संकलन आहे. दुवे आहेत (१) http://www.stratfor.com/weekly/considering-sunni-regime-syria?utm_source...
आणि (२) http://en.wikipedia.org/wiki/Syria
Syria-1B_1.png
नकाशा क्र. १

Syria-2A_0.png
नकाशा क्र. २

Syria-3A.png
नकाशा क्र. ३

Syria-4A_0.png
नकाशा क्र. ४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती... रक्तपात होतो आहे या बद्दल दु:ख होते पण याच १-२ वर्षात असे बदलाचे वारे वहाण्याचे कारण काय? आधी पण लोकशाही साठी इजिप्त, लिबीया येथे उठाव झाले होते. सत्ताबदल झाला पण लोकशाही येथे तसेच इतरत्र मुळ धरेल का?

सुधिरजी,

खुप दिवसां नंतर तुमचा लेख बघायला मिळाला.

लेख खुप समतोल, सर्व बाजुंचा विचार मांडला आहे.

भारतात रहाणार्याना शिया सुन्नी झगड्याची व्याप्ती सहजी ऊलगडणार नाही, अर्थात वाचन असेल तर गोष्ट
वेगळी. अरब देशात ही ह्या तंट्या विष यी लोक ऊघड पणे बोलत नाहीत.

विवेक-जी,
"न्यूक्लियर डिसेप्शन"मध्ये याबाबत खूपच हृदयाला चरे पाडणारी माहिती आहे. शियांच्या कत्तली करणे हा "अल कायदा"च्या युद्धनीतीचा, डावपेचांचा एक भागच आहे असाही उल्लेख आहे. मला पक्के आठवत नाहीं, पण मला वाटते कीं १९व्या प्रकरणात याबाबत खूपच वाचण्यासारखे आहे.

विवेक-जी,
पाकिस्तानसारख्या सुन्नी बहुसंख्य असलेल्या देशात शियांच्या प्रार्थनास्थळी स्फोट घडवून नियमितपणे शिरकाण होत असते हे आपण वाचतोच. शियांची संख्या जास्त करून उत्तर पकिस्तानात (खैबर पख्तूनख्वा आणि पाकव्याप्त काश्मीर) आहे व तिथे हे हल्ले TTP (तेहरीक-ए-तालीबान पाकिस्तान) तर्फे होत असतात. शियांना मारणे ही अल कायदाची एक तर्‍हेची युद्धनीतीच आहे असाही उल्लेख "न्यूक्लियर डिसेप्शन"मध्ये आहे. ९३ टक्के शिया मुस्लिमांचा इराण हा देश शेजारी असूनही इराण अशा शिरकाणांविरुद्ध कधीच आवाज कसा उठवत नाहीं याचेही मला आश्चर्य वाटत आलेले आहे. इराकमध्ये शिया लोकसंख्या ६५% आहे तर इराणमध्ये ९०+%. उत्तरेला इराणला लागून असलेल्या अझरबाईजानमध्ये ८०+% तर सीरियात १०-१२% शिया आहेत. इराकमध्ये शियापंथीय ६५% असूनही तिथे शियांचे अल कायदातर्फे नियमितपणे शिरकाण होत असते. मग वाटते कीं हे शिया मुसलमानसुद्धा हिंदूंसारखे mild and meek असावेत! खरे काय ते कळायला बरेच वाचन करावे लागेल व त्याला वेळही लागेल! या विषयाची 'तयार' माहिती कुणाकडे असल्यास वाचायला आवडेल
आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे! सुन्नी असलेल्या सद्दामने या शिया बहुसंख्य इराकवर अनेक दशके राज्य केले. शिया-सुन्नी-कुर्द असा 'भेदभाव' न करता कुठल्याही विरोधकाला त्याने जिवंत ठेवले नाहीं. अगदी आपल्या मुलीला आणि जावयालाही! जॉर्डनला पळून गेल्याबद्दल त्यांना दोषी ठरवून गोडी-गुलाबीने परत आणले गेले व त्यांच्या वंशातल्या सर्वांना सद्दामने जिवे मारले होते.

सुधिरजी,

आपल म्हणण अगदि बरोबर आहे. शिया लोक सुन्नी पेक्षा खुपच MILD AND MEEK असतात.
सर्व साधारण पणे बाहेर असे लोक जास्त वाच्यता करत नाहीत. हे लोक खुप Accommodating असतात.

मध्ये एकदा इथला लोकल अरबी माणसाने खासगी मध्ये सांगितले होते कि खुप ठिकाणी शिया लोकांची
हत्या केली जात आहे. अर्थात तो शिया असल्याने तो असे सांगु शकला.

सरकारी पदावर बरेचदा इथे शिया लोकांवर अन्याय होतो, केला जातो. शेवटी ते लोक कंटाळुन नोकरी सोडुन
जावू ईच्छितात.

त्या विरुद्ध सुन्नि लोक फारसे शिकलेले नसतात, जे सुन्नी वरच्या जागे वर आहेत/ असतात ते फक्त वशिल्याने
किंवा राज्यर्कत्याच्या नातेवाईक असल्याने त्या जागे वर पोहोचलेले असतात. ह्याला अपवाद आहेत.

माझे काही इराकी शिया मित्र आहेत इथे दुबईत त्या वरून सांगु शकतो.

माहितीपूर्ण. क्षमस्व, पण भाषा जरा जास्त बोजड, अप्रचलित वाटते. काही वाक्ये इंग्रजीतून अनुवादित आहेत हे साफ जाणवते. मराठी अनुवाद हा खरोखर मराठीत रुळलेला वाटला तर वाचायला जास्त आवडेल.
उदा. हे वाक्य
>>
असे केल्याने अति खर्चिक अशा प्रत्यक्ष युद्धात पडण्याची टळेल आणि अस्साद यांची राजवट अंतर्गत बंडाळीने कोसळेल अशी आशा त्यांना आहे.
<<
ह्यातले अशा प्रत्यक्ष हे शब्द अनावश्यक आहेत. आणि काय टळेल ते कळत नाही.

किंवा
<<
इराकमधील इराणच्या यशाने या भागातील सत्तेचा समतोल इराणच्या बाजूला झुकला आहे
<<
समतोल झुकेल कसा? हे म्हणजे सरळ वळणाची म्हणण्यासारखे आहे. बहुधा हे ब्यालन्सचे भाषांतर आहे.
इराणचे पारडे जड झाले आहे असे काहीतरी मराठी लिहिता आले असते.

<<
शियांविरुद्धच्या सामायिक हितसंबंधांची धार बहुराष्ट्रीय जिहादी योद्ध्यांच्या कट्टर तत्वावर आधारित कार्यक्रमापुढे कमी झाली कीं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे महाकठीण आहे.
<<
हे वाक्य. फारच जड, अनाकलनीय झाले आहे.

तरीही ही माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा आपला व्यासंग कौतुकास्पद आहे.
पुढील लेखनाकरता शुभेच्छा.

सुधीर काळे,

आपल्या शिकण्याच्या वृत्तीस दंडवत! कालमानपरत्वे तुम्ही वयस्कर व्हाल पण म्हातारे निश्चितच होणार नाही. Happy

लेख उत्तम आहे. शिया सत्ताक्षेत्र (किंवा प्रभावक्षेत्र म्हणा हवं तर) हे गांधारापासून थेट भूमध्यसागरापर्यंत पसरले आहे ही बाब उघड असली तरी फारशी चर्चिली गेली नसावी. मुख्य माध्यमांत कोणी हा मुद्दा मांडल्याचं आठवत नाही. आपल्या निरीक्षणास दाद द्यावीशी वाटते.

आ.न.,
-गा.पै.

गामा-जी,
माझ्या लॉगिन sudhirkale42 मधील ४२ हा आकडा माझ्या वयाशी संबंधित नसून ते माझे जन्मवर्ष (१९४२) आहे. थोडक्यात मी वयस्क आणि वृद्ध दोन्ही झालेलो आहे!