सनम - ५

Submitted by बेफ़िकीर on 23 July, 2012 - 09:11

जितकी काळजी घरच्यांनी घेतली, तितकीच सनमनेही घेतली! महिनाभर! जाळून मारण्याचा प्लॅन आपल्यालाही कळलेला आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही. अगदी माहेरीही! शेजारपाजारच्यांनाही नाही आणि गावातल्या महत्वाच्या समजल्या गेलेल्या कोणालाही नाही.

प्रेम नुसते उतू चाललेले होते तिच्यावरचे. रत्नी, म्हणजे सासू आणि निर्मला ही नावची जाऊ या दोघी तर तिला कामाला हातच लावू देत नव्हत्या. भिका वडार हा सासरा असून झुर्क्याच्या वरताण, म्हणजे बापाच्या वरताण वागू लागला होता. गावातल्या बायाबायकांना जमवून हळदीकुंकू अन काय काय केले जात होते. पुरावे निर्माण करण्यात येत होते. भिका वडाराचे कुटुंब सनमशी अतिशय प्रेमाने वागत होते याचे! तिघेही दीर आणि गावातले लोक आता सनमचं कौतुक करताना दमत नव्हते.

सनम पोचलेली होती. ती त्या सगळ्यांच्या वरताण प्रेमाने वागत होती. पण रात्री आतल्या खोलीत विन्याबरोबर झोपताना तिच्या मनात हजार वेळा आले होते, की विन्याला सांगावे, बाबारे मला मारणार आहेत हे लोक! तुला माहीत आहे का हे? पण विन्याचा विश्वासच बसणार नाही असे तिला वाटत होते. आणि त्याने विश्वास नाही ठेवला तर हे लोक पराचा कावळा करून गावाला जागं करतील आणि म्हणतील की एवढं कौतुक करूनही ही बया रात्री नवर्‍याला हे असलं सांगते. गाव विरुद्ध जाईल.

सनम सरळ माहेरीही पळाली असती. पण तिने ठरवलेले होते. जशास तसे! आपल्याला जाळायला कोणी सरसावले की त्याला धाडायचाच यमसदनी! तिच्या स्वभावातच होते ते! नाहीतरी माहेरी पळून गेल्यावर गाव विरुद्ध गेलेच असते, इतक्या प्रेमाने वागवल्यानंतरही पळाली म्हणून!

नुसतेच पळून जायचेही तिच्या मनात आले होते. पण नुसतेच पळण्याऐवजी या लोकांना चांगला धडा शिकवून पळावे हे तिला योग्य वाटले होते.

प्रत्यक्ष परिस्थिती येईल तेव्हा ती कशी येईल हे तिला समजत नव्हते. कोण कोण घरी असेल, काय करणार असतील, याबद्दल अंदाजच नव्हता. पण येत्या एक दोन दिवसातच हे होणार आहे हे वाटू लागले होते. वाटण्याचे कारण इतकेच, की मागच्या खोलीच्याही मागे असलेला रॉकेलचा मोठा डबा स्वयंपाकघरात येऊन बसलेला होता. सकाळपासून संवादांचे प्रमाण कमी कमी होऊ लागले होते. चेहरे गंभीर होऊ लागले होते. आणि त्यातच सनमला जे नको ते ऐकू आले. ती आतल्या खोलीत आवरत असताना तिने नेहमीप्रमाणे आतून दार लावून घेतले. तिला आज जरा जास्तच शंका येत असल्यामुळे तिने काही वेळ खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिले. सासरच्या लोकांची नेत्रपल्लवी तिला आता स्पष्ट दिसत होती. पण जो नको तो प्रकार समजला तो हा, की खुद्द विन्याच बापाकडे बघत 'मी आग लावंल पैली' हे म्हणाल्याचे सनमला अगदी स्पष्ट ऐकू आले.

आजच! येत्या एक दोन दिवसांत वगैरे नाही! आज किंवा उद्या परवा वगैरे नाही! 'आजच'!

सनम शहारली. इतकी माणसे आपल्या विरुद्ध असताना, आपला जीव घ्यायला टपलेली असताना अचानक कोणत्याही क्षणी, अगदी आत्ता बाहेर गेल्यागेल्याही आपल्या पदरावर रॉकेल टाकून पेटवण्यात येईल. तिघा चौघांनी आपल्याला धरले तर सुटायच्या आत आग लावणे शक्यही आहे. हे आपल्या आई बापांना, या गावाला, कसे समजणार? कसे समजणार की हा एक कट आहे? ठरवून मारण्यात आलेले आहे?

सनम अजूनही खिडकीच्या फटीतून बाहेर पाहात होती. या घराने आपल्याला मागणी घालून येथे आणले. पहिल्याच दिवशी जातीवरून नाही नाही ते बोलले. आपण पळून गेल्यावर मिनतवार्‍या करून परत आणले आणि पंचायतीसमोर आपली तक्रार केली. आपण भर गावात यांची अब्रू धुळीला मिळवली. त्याचा हा सूड आहे.

स्वतःचं वजन न पेलवणारा पोरगा आपला नवरा! आणि तो आपल्याला पहिली आग लावणार! मुडदे! सगळ्यांचे मुडदे पाडायचे. मागेपुढे बघायचेच नाही. खलास करायचे एकेकाला! फक्त बारकी पोरं सोडायची त्यातून!

'प्वारी झालं काय आवरून' अशी सासूची बाहेरून गोड स्वरातली हाक ऐकू आली तशी सनम चरकली. याच क्षणी आपण बाहेर गेल्यागेल्या आपल्याला धरणार आहेत. ते काय? ती हौसा बसलीय चुलीपाशी! तीच लाकूड फेकणार विन्याकडे! दीर आणि सासरे आपल्याला धरणार! आपण बोंब मारू लागलो की हे आपल्याला दार लावून आतच अडकवणार आणि .... नाही... असे कसे होईल? मलाच कशी काय आग लागली फक्त? बाकीच्यांनी वाचवायचा प्रयत्न कसा काय केला नाही? नाही! असे नसणार! काहीतरी वेगळाच घोळ आहे. बहुधा अजून काही वेळ जगणार असू आपण! पण आपल्याकडून आपण स्वतःला सांभाळत राहिलंच पाहिजे. दार उघडून बाहेर पडलो की थेट बाहेरच्या दारातूनही बाहेर जाऊन रस्त्यावरच केस विंचरायचे.

घालून झालेली वेणी पुन्हा सोडून सनम खणखणीत आवाजात उद्गारली..

"आल्ये आई"

दार उघडून सनम फणी घेऊन जी ताडताड बाहेर आली ती थेट घराला लागून असलेल्या रस्त्यावरच केस विंचरू लागली.

मागे सगळे बघतच बसलेले असणार हे तिला ठाऊक होते. आपण असे बाहेर उभे राहून केस विंचरू नयेत हे सांगायला सगळ्या बायकांच्या जिभा वळवळत असतील पण प्रेमाचे नाटक करायचे असल्याने ते कसे सांगायचे या विचारात सगळे असतील असे सनमच्या मनात आले. तेवढ्यात हिराबाई ही म्हातारी सनमला रस्त्यावर ऊन खात बसलेली दिसली. तिला प्रेमाने हाक मारून चहा घ्यायला या म्हणत सनम तिच्या हाताला धरून आत आली.

संतापलेले सगळे जण त्या दोघींना एकत्र पाहून चरफडत बसले.

आता या म्हातारीचा चहा होईपर्यंत तरी काही बोलता येणार नाही हे सगळ्यांना समजले. ती हिराबाई साठ वर्षापूर्वीच्या त्याच त्याच कहाण्या सांगण्यात रमून गेली. सनमला पाहून 'आपण मोठ्या आहोत' हे लक्षात आलेली हौसा चुलीवरून उठली आणि कळल्यासारखेच सनम चुलीवर बसली. तिने अगदी प्रेमाने सगळ्या पुरुषांना 'च्या घ्याल ना' म्हणून विचारले. सर्वांच्या मुंड्या होकारार्थी हालल्या. सासू रत्नीच्या तोंडावर वाक्य आले होते. 'दूध तुझा बाप झुर्क्या पाठिवतूय व्हय?'! पण आज बोलायचे नव्हते.

चहा होईपर्यंत सगळे नुसतेच टकमक बघत बसलेले होते. चहाचे कप समोर आले आणि भुरकत भुरकत सगळ्यांनीच चहा गिळला. पण त्या हिराबाईचे काही निघण्याचे चिन्ह दिसेना! आणखीनच वैतागलेले सगळे आता त्या हिराबाईला 'च्या झालाय ना? बसा आता निवांत ऊन्हं खात आज्जी' म्हणत होते. पण ती तिला चहा विचारणार्‍या सनमचे कौतुक करत बसली.

सनम चुलीवर बसलेली असली तरी तिची कोणाकडे पाठ नव्हती. नजरेच्या कोपर्‍यातून तिला प्रत्येक हालचाल न्याहाळता येत होती.

का कोणास ठाऊक, आज सगळ्याच बायका अगदी ठेवणीतली पातळे नेसून बसलेल्या तिला दिसल्या. आणि रस्सा ढवळताना तिच्या मनात तो भयानक विचार आपोआपच आला. प्रकाश पडला तिच्या डोक्यात!

काही ना काही कारणाने बाईमाणसं बाहेर चाललेली असणार आहेत, मुलांना घेऊन! आणि या पाच हरामखोरांच्या जेवणानाष्ट्यासाठी मला घरीच थांबवणार असावेत.

हा विचार मनात रुजतोय तोवरच सासू रत्नी म्हणाली.

"सनम्ये... बाळा आज आमी चौघी हौशीच्या म्हायरी चाललूयत.. काय कार्यंय म्हनं... आता तुझी ना वळख ना पाळख थितं... वर ह्ये सर्वे गडी हित्तंच हायत... तवा ह्यांचं जवानखान तू बघ आज... आ?"

"चालतंय की"

सनमने हसून उत्तर दिले. तिचा एक मोठा प्रश्न निकाली निघाला होता. पंधरा जणांशी लढण्याऐवजी आता फक्त पाच जणांशी लढायचं होतं! पंधरा जणांनाही ती भारीच गेली असती. पण नेमका प्लॅन काय आणि किती वाजता आहे हेच माहीत नसल्याने शत्रू कमी झालेले केव्हाही बरेच होते.

तर हिराबाई पचकली.

"रत्नी.. नव्या सुनंची वळखपाळख तिला घ्यून ग्येलाबगंर कशी व्हईल? जा तिलाबी घ्यून?"

क्षणभर रत्नीच्या चेहर्‍यावर भयानक भाव आले. पण नीट बोलायला लागणार होते.

"तस्नांय आज्जी.. पर काय ठिकाणी कडक आस्तं ना? आपल्या घरी काय तस्काय नस्तं.."

सनम लमाण आहे, आम्ही ते आनंदाने चालवून घेतो आणि आम्ही चालवून घेतो म्हणून बाकीचे घेतील असे नाही, हे तीनही मुद्दे रत्नीने हिराबाईच्या कानात मधुरपणे उतरवले. त्यावर 'हा, त्येबी खरंच' करत हिराबाई लंगडत लंगडत निघून गेली. ती गेली तसा सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

सनमला आठवले. माकड, साप, कोंबडी किंवा ससे पकडताना आपण असेच दबा धरून बसलेले असतो. जर्रा कुठे काही चुकीची हालचाल झाली की घ्यायचाच जीव त्या माणसाचा!

या वडार कुटुंबाने आजवर असे काहीही केलेले नव्हते. त्यामुळे ताण त्या सर्वांच्या चेहर्‍यावरही दिसतच होता. आजवरचे सौजन्य आता प्रयत्न करूनही चेहर्‍यावर आणता येत नव्हते. आणि आपणच मरणार आहोत हे माहीत असूनही तिथेच थांबण्याचा बेधडकपणा सनमकडे लहानपणापासूनच होता. तिच्यासाठी तो एक खेळ होता खेळ!

तासाभराने म्हातार्‍या भिकाला नमस्कार करून सगळ्या सुना आणि मुले घराबाहेर पडली. सासू रत्नी मात्र अजूनही घरातच होती. भिकाशी काही ना काही बोलण्याचे नाटक करत होती. अचानक सगळे उठले आणि आतल्या खोलीत गेले. इच्छा असूनही सनम उठली नाही. तिच्या संताप यासाठी होत होता, की विन्या त्या सर्व कटात मनापासून सामील झालेला होता. तिने त्याचक्षणी ठरवले. विन्याने जर पहिली हालचाल केली, तर पहिला मुडदा विन्याचाच पाडायचा. सनमने नुसते दोन हात विन्याच्या गळ्यावर दाबले असते तर तो अर्ध्या मिनिटात खलास झाला असता. पण त्याच अर्ध्या मिनिटात बाकीचे तिच्यावर तुटून पडले असते. त्यामुळे तिने महिन्याभरापासून पाहून ठेवलेला एक जीवघेण्या वजनाचा जाड लोखंडी गज जवळपासच ठेवलेला होता. कुजबूज करून सगळे बाहेर आले. सनमला आपल्या योजनेची काहीच माहिती नसल्याचे तिच्या वावरावरून दिसत असल्याने सगळे मनातच खुष झाले.

"चाल्ले गं प्वारी.. लय नगं राबूस.. येतूच रातच्चे"

असे म्हणत सनमच्या चेहर्‍यावरून प्रेमाने हात फिरवत सासू निघाली तसा सनमनेही तिला आणि सासर्‍याला खोटा खोटा नमस्कार केला.

"आमी नाय चाल्लोय"

भिका वडारने हे वाक्य टाकले तसे त्याच्याकडे बघत पदर डोक्यावरून ओढून घेत सनम म्हणाली..

"आईंनाबी क्येला... म्हून क्येला.."

काही वेळाने उद्भवणार असणार्‍या परिस्थितीची आणि आत्ताच्या सनमच्या मनस्थितीची आठवण येऊन भिका स्वतःशीच हासला. तो हासला तशी पोरेही हासली. विन्या तर खदखदून हासला.

परत चुलीपाशी बसत सनमने थेट मोठ्या दिरालाच विचारले.

"भावजी... राकीलचा डबा हित्तं का ठिवलाय?"

सगळेच चपापले. ते चपापतात की नाही हे पाहण्यासाठीच सनमने तो प्रश्न विचारलेला असल्याने तिने सर्वांचे चेहरे झटक्यात न्याहाळले. पटकन विन्याच उत्तरला.

"त्ये काई न्हाई... शिवा यनार हाये.... थोडं राकील पायजेलें त्याला"

बराच वेळ चुलीवर काम करणार्‍या सनमच्या डोक्यात शेवटी एक भन्नाट आयडिया चमकली. स्वतःवरच खुष होऊन तिने शेवटची भाकरी उतरवली... आणि कोणाचे लक्ष नाही असे पाहून मगाशीच आत जाऊन जमीनीवरच निजलेल्या वामन्याच्या सरळ शेजारी बसत ती कुजबुजली...

"भावजी ... मापी मागायची व्हती... "

इतक्या समीप ती आग पाहून वामन्या खडबडून उठला... त्याने बाहेरच्या दाराकडे पाहिले... सनमने त्याला सांगितले..

"दादा रस्त्यावं बसल्येलेत.. ह्ये ग्येले शेतावं... आन दोघं भावजी भाईर निजल्येत"

वेडा का खुळा झालेला वामन्या या परिस्थितीचा अर्थच समजू शकत नव्हता. म्हारवाड्यात ठेवलेल्या बाईकडे चालत जायचा ताप घेण्यापेक्षा सनम घरातल्या घरात मिळाली तर भारी होईल हे पहिल्या दिवपासूनच त्याच्या मनात होते.

"म्हन्जे? कसली आन मापी?"

"गावाद्येखत चुकीचं बोलल्याली मी"

वामन्याच्या अंगात वीज आली. त्याचा अजून विश्वास बसत नव्हता. त्याने नेमके तेच विचारले.

"तू आश्शी... हित्तं... माझ्याजवळ कस्काय???"

"यळच न्हाई घावत तुमची मापी मागायला.. सर्वे असत्यात...तुमच्याशी कसं बोल्नार सर्व्यांदेखत?"

वामन्यान किती आवंढे गिळले ते त्याचे त्याला कळेना! म्हणाला...

"जा भाईर.. दादा येत्याल"

" न्हाई म्हन्ले यनांर इतक्यात.. "

"आगं पर... ह्ये दोघं जागं झालं तं??"

"अर्धी बाटली रिचावल्यालीय तवा?... घोरतायत"

हे सगळं हीच बया सांगतीय म्हंटल्यावर वामन्या भानावर आला. भानावर आला आणि जनावरासारखे आवाज काढत हासत म्हणाला..

"तवा झालं त्ये झालं.. आता तुझ्यावं माजा बी जीव हाये.."

सनमला पाहिजे होते ते घडू लागलेले होते.. त्यामुळे झालेला आनंद लाजून हासण्यात मिसळत ती मुरके घेत म्हणाली..

"तुमी काई यळा राच्चे त्या म्हारवाडीत जाताय ना? लय वगाळ वाटतं..."

"आं? आन तुला काय म्हाईत ह्ये?"

"ह्यांनीच सांगितलंय... ह्याना काय काम हाये का दुसरं राच्च? नुसती बडबड..."

हा एक वेगळाच प्रकार समजला वामन्याला! विन्या आत जाऊन मजा मारत असेल या त्याच्या कल्पनेला त्याच्यामते फारच सुखद तडा गेला.

"म्हन्जी? ... इन्या ... आन तू... इन्या.."

सनमने खाली बघत नकारार्थी मान हालवली. वामन्याचे हृदय बाहेर काढून पाहिले असते तर बेडकासारखे उडताना दिसले असते...

वामन्याने परिस्थितीवर एकंदर दहा वीस क्षण जरा नीट विचार केला. हिला आजच्याऐवजी उद्या मारलीन तर आज हिला पटवता येईल. या चौघांना चांगली पाजून आडवे केले की ही रात्रभर आपलीच. आणि तिच्या मनात हे असे नसते तर ही इतक्या जवळ येऊन बसण्याची हिम्मत तरी झाली असती का तिची? सगळ्यांदेखत आपल्या पायाकडेही न बघणारी ही पोरगी आत्ता इथे अशी? वामन्याने आणिक एक खडा टाकला.

"आन मी म्हारवाडीत गेल्यालो तुला का वगाळ वाटतंय?"

सनमने कावरीबावरी होण्याचा अभिनय केला. 'माझा तुमच्यावर जीव आहे' हे हिला सांगता येत नसल्यामुळे तिच्या ताँडून शब्द फुटत नाही आहे हे वामन्याला समजले. आत्ता त्याला हत्ती उचालयाला सांगितला असता तरी त्याने उचलला असता. त्याला फक्त एक माहीत नव्हते की घरातला एकच माणूस एका खोलीत भेटणे इतकीच सनमची निकड होती. मग त्याच्याऐवजी त्याचा धाकटा भाऊ या खोलीत एकटा निजलेला असता तरी तिला चालले असते या ज्ञानापासून तो वंचित होता. पण अजूनही त्याची तिला स्पर्श करायची हिम्मत नव्हती. याचे कारण त्याला मनात भीती ही वाटत होती की ही जर आपल्याला फसवत असली तर आपण हात लावला आणि बोंब मारली तर गावात काही आपली धडगत नाही. आपल्यावर सूड घ्यायला तर ही आपल्याला फरवत नसेल? आजवर काही लक्षात यावे असे काहीच कशी वागली नाही? अगदी आजच का?

तिची परिक्षा घेण्यासाठी अचानक कडकपणाचा आव आणत तो म्हणाला..

"सनमे.. थोरल्यांपाशी आसं यून बसायला शरम न्हाई तुला?"

त्याच्यात झालेला हा बदल कशामुळे झाला ते काही सनमला समजले नाही. त्यामुळे हातात आलेला डाव हातातून चालला की काय असे वाटले तिला. तिच्यामते ती त्याला चांगला ओळखून होती. एक नंबरचा लंपट होता तो! पण असा अचानक का कडक झाला ते समजत नव्हते. वास्तविक आत्तापर्यंत त्याने तिला जवळ घेतलेले असायला हवे होते. पण तो खरंच चांगला बिंगला असला तर तोच बोंब मारेल या भीतीने सनम लगबगीने उठली.

ती उठलेली पाहून वामन्याचा जीव डोळ्यात गोळा झाला. तिला आज्ञेच्या सुरात तो म्हणाला..

"काय इचारलं आमी??? हितं बस???"

आता बाका प्रसंग होता. हा नीयत चांगली बाळगून असला तर आता काही खरे नाही, यांचे मुडदे पाडायच्या आधी आपलीच गावात बेअब्रू होणार हे सनमला समजले. पण त्याचा हुकूम मोडणे हेही धोक्याचेच होते. सनम आधीपेक्षा किंचित लांब बसली. तेही वामन्याला खरे तर आवडले नाही. पण त्याच सुरात तो म्हणाला...

"जवाब द्ये... आसं यून बसायचं कारन काय??"

सनम पुटपुटत म्हणाली.

"थोरलं आस्लात तरी... वाटलं म्हून बोल्ल्ये..."

"काय वाटलंन???"

"......"

"काय वाटलंन????"

वामन्याला एक तर आवाज चढवता येत नव्हता कारण बाहेर दोन भाऊ झोपलेले होते, ते जागे झाले असते. त्यात पुन्हा भिका वडार एकदम आला असता तर प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे वामन्याचा आवाज हास्यास्पद झाला होता. पण सनमने प्रचंड हिय्या करून एक अचाट प्रकार केला.

वामन्याच्या खांद्यावरून आपली दोन बोटे अलगद त्याच्या पोटापर्यंत सरकवत तिने धीर करून त्यालाच विचारले.

"नजरंनतं कळत न्हाई व्हय??"

नजर! वास्तविक पाहता वामन्याच काय, धाकडे दोघे दीर समोर आले तरी सनम गळ्यापर्यंत पदर काढायची. जेमतेम दहा पाच वेळा नजरानजर झाली असेल महिन्याभरात! नजरेतून काय कळणार? अक्कलशून्य वामन्या! त्याने सनमला अपेक्षित असलेलीच हालचाल केली. त्याच्या अगदी जवळ ओढली गेल्यावर त्याच्या तोंडाला येत असलेल्या दुर्गंधीने सनम खरे तर तोंड कसेतरी करणार होती. पण मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला तर वामन्याला संशय येईल त्यामुळे गप्प बसली. पण दोन चार क्षणातच काहीतरी वाजले. तो आवाज ऐकताच सनम उद्गारली..

"दादा आलंत"

असे म्हणून ती जोरात त्याच्यापासून दूर होऊन उभी राहिली.. तसे चेकाळलेल्या वामन्याने तिला खाली ओढली आणि ती कशीबशी खाली कोसळत असतानाच तो म्हणाला..

"दादा न्हायत... परसातलं दार वाजतंय... "

सनम सोडा म्हणाली खरी, पण सुटायचा प्रयत्न करत नव्हती... वामन्या हरखून म्हणाला..

"तुझी सासू आन जावा घराभाईर गेल्यावं खरा रंग दावलास व्हय तू???"

खुसखुसत हासत सनम कुजबुजली..

"यळंच न्हाई मिळत तवा..."

"आत्ता हाये ना यळ???"

हीच ती वेळ होती... जेव्हा वामन्याला अर्धवट पागल करून सोडायला हवा होता..

स्वतःहून त्याला अंगभर बिलगत जमीनीवर झोपवत सनम त्याच्या कानात कुजबुजली...

"आत्ता न्हाई... सांजंला सर्व्यांना पाजा लय... मंग राच्चं हितं भ्येटू..."

खाडकन प्रकाश पडला वामन्याच्या टाळक्यात... तिला आणखीन जवळ ओढून तो म्हणाला...

"लय वंगाळ करणारेत चौघं तुझ्यासंग... आज सांजंला..."

सनमला 'आज सांजंला' या शब्दांमधून निश्चीत वेळ समजलेली होती... निदान दुपारभर भय नव्हते... उलट त्या आधीच आपण आपली कामगिरी करणे शक्य होते...

"काय वंगाळ???"

"तुला अक्कल न्हाई व्हय??? गावात अब्रू घालीवलीस आम्ची... आन... ह्ये सर्वे शांत बस्तील व्हयं???.. खल्लास करनारेत तुला... सांजंचं चुलीवं बसल्यावं.. "

सटपटल्यासारखे दाखवत सनम बाजूला झाली आणि डोळ्यात हुकुमी पाणी आणून म्हणाली...

"आवं काय सांगताय??? आं??? ह्यं काय??? आन... आन आत्ता सांगताय?? म्हन्जे.. म्हन्जे मी हितं आलीच नस्ती तं ब्वाललाच नस्त्यात...."

"यडी का खुळी तू??? आं??... मी आधीपास्नंच ठरवल्यालंय... तुझ्या नादाला लागंल त्याला दूर करून तुला घ्यून लांब पळून जायचं... "

"मला... आधी कस्काय न्हाई ब्वाललात???"

"आमी आधी करतू.. मग कळतंच जगाला..."

"तरीच.. तरीच आय आन सर्वे ग्येले व्हय???"

सनम भयाने थरथरल्याचा अभिनय करत होती... तिला धीर देत वामन्याने बराच वेळ समजावले...

वामन्या अडाणीच... कोण कोणाला धीर देते होते त्याला माहीत नव्हते... काही वेळाने सनम दबक्या पावलांनी बाहेरच्या खोलीत आली तर समोरच्या दारातून चक्क भिका वडारच त्याचक्षणी आला..

आल्याआल्या त्याने विचारले..

"इन्या कुटाय गं???"

हा एवढा मोठा पदर घेत सनम म्हणाली...

"राबाया ग्येलं..."

"आन वामन्या... "

"थोरलं आतमधी हायेत..."

"आं??? आन मग... तू कस्काय आत्नं आलीस???"

थोरला दीर आत एकटा असताना ही आत गेली कशी हा भिकाचा प्रश्न होता.. सनमने भिकाची झोप क्षणात घालवली...

लगबगीने त्याच्याजवळ जात पदर वर घेत चेहरा दाखवत मधाळ स्वरात रहस्यमयपणे हासत कुजबुजत भिकाला म्हणाली...

"माल वाटलं तुमीह्ये.. आतमदी"

भिका उभा थरथरला.... सनम ज्या प्रकारे ते वाक्य बोलली होती... त्याप्रकारे कधी रत्नी आणि निर्मलाही बोललेल्या नव्हत्या...

आपल्याला जे वाटतंय तोच तिच्या बोलण्याचा अर्थ आहे की काही वेगळा या शंकेत भिका आत येऊन टेकला..

सनम त्याच्याकडे बघत खुसखुसत चुलीपुढचे आवरायला लागली.

पाचजणांमध्ये तीन विरुद्ध दोन इतपत तरी फळी तिने पाडलेलीच होती.. टेकून बसलेल्या भिका वडाराच्या चेहर्‍यावरील गढूळ हास्य ग्वाही देतच होते की तो आपल्यासाठी लढणार.. आतला वामन्याही लढणार... विन्यालाच आपल्याबद्दल काही नाही हे मात्र सनमला सहन होत नव्हते..

विन्या आला आणि दोघे दीर उठले तशी सनमने पाने घेतली

आणि जेवणे झाल्यावर वामन्या नशेत असल्यासारखा सगळ्यांना उद्देशून म्हणाला......

"आज राच्चंला ब्वाकाड कापायचाय.. अन्शूमन.. पाच सा बाटल्या घ्यून यं सांजंचा"

एक खून, दारू आणि मग मटन, या स्वप्नात बाकीचे तिघे रमले.. अर्थात खून झाल्यावर सगळी पोलिसकी व्हायला किती वेळ लागेल त्याचा कोणालाच अंदाज नव्हता.. त्यामुळे दारू आणि मटन दोन तीन दिवसांवरही जाऊ शकेल हेही त्यांना वाटत होते.. पण खुद्द वामन्या आणि भिका हे दोघे मात्र वेगळ्याच स्वप्नात वावरत होते...

वैतागलेला अन्शूमन पुन्हा तिथेच लवंडला.. विन्या मात्र सनमच्या हालचाली न्याहाळत बसला... पुन्हा काही हे शरीर आपल्याला मिळणार नाही हे दुर्दैव त्याच्या मनाला डाचत होते... तो अचानक म्हणाला..

"आमी जरा निजतो.. मग हायेच पार्टी आन काय?"

बापासमोर कसं म्हणणार की मी बायकोबरोबर झोपायला आत चाललो आहे?

पण वामन्याची जलन जागृत झाली...

"टामाटे वर आल्येत न्हं रे? ... तोडून आन पाच धा किलो.. फुक्काचा राबत जाऊ नगं"

वैतागलेला विन्या म्हणाला...

"लय थकलूय..."

"राच्चा घालवू थकवा तुझा...जा आता..."

बेडर सनम सगळ्यांना ऐकू जाईल असे खुसखुसली ते वाक्य ऐकून... ते पाहून सगळेच हासले... एकटा विन्या सोडून..

विन्या तेवढा ताडताड बाहेर जायला निघाला... पण तेवढ्यात अधीर झालेला अन्शूमन एकदम उद्गारला..

"सांज व्हईतोवं रुकलं पायजेल व्हय वामनदा?"

पाचजणांचे दहा डोळे चमकले. सनमचे मात्र विस्फारले. अन्शूमनची घाई ही होती की एकदा कामगिरी करून मोकळे होऊ म्हणजे काय व्हायचं ते होऊन जाईल एकदाचं... एकदा तपासण्या बिपासण्या होऊन ही चितेवर लुढकली आणि विन्याने आग दिली की निवांत पार्टी करायला मोकळे...

पण त्यात वामन्याची इच्छापूर्ती होत नव्हती.. भिका वडार तर अजून तंद्रीतच होता... नेमके काय म्हणायचे होते सनमला हेच त्याला समजत नव्हते... त्याचा विश्वास बसत नव्हता की सनमला तेच म्हणायचे असेल जे ऐकायला त्याचे कान आतुर झालेले होते...

त्यामुळे तो अजून पूर्णपणे वामन्याच्या पार्टीतला नव्हता..

बाकीचे तिघे मात्र एकदाची कामगिरी उरकून टाकायला तयार होते.. विन्याला तशीही सनम आता मिळणारच नव्हती... त्यामुळे तोही अर्ध्याच पायावर तयार होता....

अचानक भिकाच उद्गारला..

"हा... म्यीबी त्येच म्हन्तोय.. "

साक्षात बापाचाच हुकूम म्हंटल्यावर विन्या तेथेच घुटमळला.. सनमने ताडकन वामन्याकडे पाहिले.... वामन्याला त्या पाहण्याचा अर्थ नीट समजला... आपण तिला वाचवायला हवे आहे हे त्याला कळले.. तो एकदम म्हणाला...

"ज्ये त्ये काम जवातवाच व्हईल... "

तर भिका वडार उसळला..

"अय... बापासामनं सबूद नाय पायजेल... इन्या.. धर तिच्यायला तिला.."

केवळ एका क्षणात बाजी उलटली... कोणाला काही समजायच्या आतच विन्या सनमकडे धावला.. तो धावतोय हे पाहून अन्शूमन आणि रंगाही धावले... अन्शूमन आणि विन्याने सनमला गच्च धरून ठेवायचा प्रयत करेपर्यंत रंगाने चुलीतले जळके लाकूड हातात घेतले.... तोवर भिका वडार दोन ढांगात तिथे पोचला तर त्याला वामन्यानेच धरले... आता परिस्थिती पब्लिकच्या लक्षात आली... डोक्यात घुसली...

आपलाच थोरला भाऊ सनमला वाचवतोय हे समजल्यावर विन्याने काळ आणि स्थळ याचे भान न राखता वामन्यालाच शिवी दिली... म्हणाला हिच्यावर तुझी नजर आहे होय??? ताकदवान भिका तोवर सुटला आणि त्याने वामन्याच्या श्रीमुखात भडकावली.. वामन्याने भाऊ नाही पाहिले अन बाप नाही पाहिला.. तो बापालाच म्हणाला.....

"मादरच्योद... माझीच बाईल निजवतोयस भडव्या अंगाखाली ... आन हिच्याकडं मी फाइलं तर चवताळतूय्स???"

वामन्याने भिकाला इतके मारायला सुरुवात केली की अन्शूमन, विन्या आणि रंगा हातातले काम सोडून तिकडेच धावले... अजून गावात आवाज फारसे पोचलेले नसल्याने बोंबाबोंब झालेली नव्हती...

या भानगडीत घडलेला एक विचित्र प्रकार कोणालाच समजला नाही... अचानक घबाडघाईत घुसलेला विन्या मागच्यामागे ओढला गेला आणि खाली पडला.... जो तो स्वतःच त्या मारामारीत गुंतलेला असल्याने काही क्षणांनी जेव्हा सगळ्यांनी मागे विन्याकडे पाहिले... तेव्हा...

... गांड फाटली एकेकाची... शब्दशः

विन्याचे मुंडके चुलीमागे होते... धड उसळ्या मारत असूनही सनमच्या पायाखाली दाबले गेलेले होते...

आणि सनम भेसूर आवाजात वामन्याला म्हणाली...

"थोरलं.... आज आर या पार.. आपण दोघं संसार लावायचा लय लांब कुटतरी... हितल्यांचे मुडदेच पाडू बघा"

वामन्याला सनमच्या त्या बोलण्याने अंगावर चरबी चढल्यासारखे वाटले मात्र... एकच क्षण तसे वाटले... कारण काही झाले तरी आपल्या सख्ख्या धाकट्या भावाचा इतका निर्घृण खून समोर पाहताना सगळेच लटपट कापू लागले होते...

ते उसळत असलेले धड, सनमच्या चेहर्‍यावरचे भाव, हातातली रक्ताळलेली पहार आणि चुलीमागचे मुंडके.. एकंदर दृष्य घेरी आणणारे होते... खरंच घेरी आली रंगाला... मगाशी सनमला जाळण्यासाठी त्याने जे जळके लाकूड हातात घेतले होते त्याच्यावरच तो घेरी येऊन पडला... आणि बोंबलत उठला खरा... पण अर्धवट उठला... कारण त्याचेही मुंडके तसेच एकाच घावात धडावेगळे झाले...

एक नवी सून... जिला केवळ जातपातीवरून छळण्यात आले... तेही एकच दिवस... ती हे हत्याकांड करत होती... याचे एक कारण नव्हते... अनेक होती... बाई पाहिली की उसळणारे पुरुष होते इथे... सूनेला जाळणार्‍या बायका होत्या.. राक्षसी स्वभाव होते.. आणि...

... आणि सनम फालतू नव्हती.... पार शहरापर्यंत लोण पोचेल अशी बातमी आपण निर्माण करत आहोत याचे तिला आत्ताही भान होतेच... ती बेभान झालेली नव्हती... पण क्रूर मात्र दिसत होती... ही तीच सनम का, असे वाटावे इतकी क्रूर...

भिकाचे डोळे फाटले होते ती दोन प्रेते पाहून... आत्ता खरे तर सगळेच हतबुद्ध झालेले होते... कारण ही नेमकी कोणाकोणाला मारणार आहे हे समजत नव्हते...

अन्शूमन.... वामन्या आणि वामन्याच्या हातांच्या पकडीत असलेला भिकाचा बाप हे तिघे लटपटत का होईनात... पण हयात होते अजूनतरी...

सनमच्या पायांच्या पकडीतून निसटलेले रंगाचे प्रेत उडून चुलीवरच पडले... त्याला ताबडतोब अग्नी मिळू लागल्यासारखे झाले होते.. आपल्याला काय करायचे होते आणि आपण काय पाहात आहोत अशा अवस्थेत तिघे उभे असतानाच अन्शूमनला भान आले... तो दाराकडे धावू लागला.. पण दारापाशी पोचायच्या आतच त्याच्या पाठीत पहार घुसली.... तो मेला नसला तरी खाली पडून तडफडू लागला... तो जिवंतच राहिल्याचे पाहून सनम त्याला मारायला धावत सुटली... तिच्यामते आता प्रश्न संपलेलाच होता.. वामन आणि भिका एकमेकांशी लढत असेपर्यंत आपण अन्शूमनला मारू शकतो असे तिला वाटले... पण डोळ्यासमोर दोन मर्डर्स आणि एक हाफ मर्डर दिसल्याने सनमबाबतची उरलीसुरली आस्था संपवून वामन्या आता तिला खलास करायला सिद्ध झाला... त्याने अन्शूमनला खलास करू पाहणार्‍या सनमला मागून पकडले आणि सावरलेल्या भिकाने एक काठी घेऊन सनमच्या डोक्यात हाणली... टणक डोक्यावर झालेला तो घाव कसाबसा सहन केला तिने... बेशुद्ध पडत आहोत असे तिचे तिलाच वाटायच्या आधी तिने भिकाच्या दोन मांड्यामध्ये लाथ घालणे आणि भिका खच्चून ओरडणे इतकेच तिला जाणवले..

पण भयानक संतापलेला वामन सनमला आता आतल्या खोलीकडे खेचून नेऊ लागला होता... तिला सर्वप्रकारे अद्दल घडवून मगच खलास करायची हे त्याने ठरवलेले होते..

वामन्याला वाटत होते त्याहून सनम लाखो पटींनी भयानक निघालेली होती... सगळ्यांनाच खलास करण्याचा हिचा विचार आहे हे त्याला आता समजून चुकले होते... तिला फटाफट फटके मारत त्याने आतमध्ये आणले... बाहेर अन्शूमन तडफडत होता... भिका वडार कसाबसा उठून बसलेला होता... इकडे शुद्ध आल्यामुळे सनमने वामनकडे पाहात विचारले...

"चला थोरलं... जाऊ पळून..."

क्षणभर तिच्या त्या स्पर्शाने आणि अजूनही तसेच बोलण्याने वामन्या पुन्हा पाघळला... पण जिवाभावाचे तीन भाऊ खलास झालेले आहेत हे पाहून त्याला अजिबात विश्वास ठेवता आला नाही तिच्यावर....

त्याने तिला शिव्या देत खाली पाडली... आणि जवळ पडलेला एक कोयता उचलला... हाच कोयता गेहून विन्या राबायला जायचा... त्या कोयत्याच्या मुठीत काहीतरी गडबड आहे हे सनमला त्याही क्षणाला आठवले..

तिने पडल्यापडल्याच त्या कोयत्याच्या मुठीवर खच्चून लाथ मारली... आणि परिणामतः ते पाते फिरले आणि खाली पडले... ते घ्यायला संतापाने वाकलेल्या वामन्याला पुढचे काही समजलेच नाही... जे पाते घ्यायला आपण वाकलो आहोत तेच पाते आपल्या पोटात कसे आणि कधी घुसले याचा विचार करण्यापूर्वीच तो गतःप्राण झाला..

आता शांतपणे चालत चालत सनम बाहेरच्या खोलीत आली... दाराबाहेर गाव जमलेले असावे असे तिला वाटले... कारण भिका खच्चून किंचाळला होता... बाकीच्या भावांचे आवाजही आलेले नव्हते.. अन्शूमनच्या हालचाली आता क्षीण क्षीण झालेल्या दिसल्या सनमला.... तरीही काळजी नको म्हणून तिने ती पहार पुन्हा बाहेर काढून पुन्हा खुपसली तसा अन्शूमन आवाजही न करता निर्जीव अवस्थेत पडला... भिकाने सगळी ताकद एकवटून हे भयंकर हत्याकांड गावाला याच क्षणी समजावे या हेतूने आणखीन एक किंकाळी मारली... आणि बाहेरून दारावरच्या थापांचा आवाज कमी होऊन चक्क दार फोडण्याचाच आवाज सुरू झाला...

सनम भिकाजवळ बसली... त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाली...

"रानोमाळ फिरत यूं शिकार कर्नारी झुर्क्याची प्वारगी सून म्हून आन्ताना... भडव्या... लाज न्हाई वाटली??? आरं... हातानं माकड दाबून मार्नारी औलाद आम्ची.. योका नाजूक प्वारीसमूर थरथर कापतूयस व्हय?... चल मंग.. प्वारांच्या दर्शनाला नर्कात जाऊन हुबा र्‍हाय"

अक्षरशः एकाच पंज्याने भिकाचा गळा तिने दाबून धरला... आणि भिकाचे डोळे आणि जीभ बाहेर आलेली पाहून आणि तो संपलेला पाहून तिने मागच्या खोलीत धाव घेतली..

मागच्याही दारावर थापा पडतायत हे पाहून मात्र ती गांगरली.. आता करायचं काय????

अचानक तिला ते सुचले.. मागच्या दारावर कोणा ओळखीच्या बाईचा आवाज तिला ऐकू आला... तशी ती अतिशय जोरात किंचाळत त्या बाईला उद्देशून म्हणाली...

"रानूबाय... म्होरल्या दारावं या... लय भयान झालंय... "

मागच्या दारासमोरची सगळीच्या सगळी गर्दी पुढच्या दाराकडे धावल्याचे आवाज येताच सनमने शांतपणे मागचे दार आतून उघडले...

... बाहेर जेमतेम तिने पाच सहा पावले जमीनीवर टाकली असतील तेवढीच... त्याच क्षणी जवळच्या वडावर उडी मारत ... केवळ अर्ध्या मिनिटांत तिने सहा सात झाडे उडत उडत मागे टाकली...

आणि... पंधराव्या मिनिटाला ती नदीच्या काठी निवांत पहुडलेली होती.... अजून एक दोन चारच मिनिटांत ती नदीतून पोहत लांब जाणार होती.... जवळ निदान एक साडी चोळी घ्यायला हवी होते असे तिला वाटले... नदीच्या उतार अंगाला कोणकोणती गावे लागतात हे तिला ऐकून माहीत होते...

झालेले हत्याकांड पाहून शासनाचे डोळे पांढरे होणार हे तिला समजून चुकलेले होते... आपला बाप झुरक्या आणि आई.. दोघांनाही पकडतील हेही तिला समजले... पण आत्ता इतके प्रकार केल्यानंतर नदी उलटी पोहून त्यांना आधीच हे सगळे जाऊन सांगणे तिला नको वाटले... पाच पाच खून करून पुन्हा नदी उलटी पोहायची??? न्ना!

आपला बाप हा आपला बाप आहे... त्याचे तो सहज पाहील... आईचं मात्र काही सांगता येत नाही...

डोळ्यात पाणी आले सनमच्या... आपण नुसते पळूनही जाऊ शकलो असतो सासरहून... आईबापाच्या जिवाला घोर लावून आपण पाच माणसं मारली आणि आता रानावनात फिरावे लागणार... त्याचे काही नाही.. पण.. आपण असे का केले??? आपण असे केले याचे कारण आपल्याला मारणार होते असे आपण कोणाला सांगितले असते तर ते कोणालाही खरे वाटले नसते..जो गुन्हा होणार होता, झालेला नाहीच आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार करता आली नसती... केली असतीच तर काही दिवसांनी पुन्हा नांदावेच लागले असते.. हजारो सुनांना हे सहन करावे लागते... पण मी 'सनम' आहे.. मी आहे रानची पोर.. मला भय नाही.. जेथे कायदा हात टेकतो... तेथे मी सुरू होते..

सनम... तुझे आयुष्य आता हेच... रानावनात जगायचे मस्त.....हवी ती शिकार करून खायची... मात्र माणूस नावाचे हिंस्त्र आणि ढोंगी जनावर कधीही जवळ करायचे नाही... आणि... आणि सर्वात महत्वाचे...

... जेथे म्हणून अन्याय झालेला दिसेल.. तेथे... तेथे असेच कोणाच्या डोक्यातही नसताना घुसून अन्यायी माणसाला अद्दल घडवायची... तुझे नांव ऐकून चळाचळा कापले पाहिजेत लोक... चळाचळा कापले पाहिजेत...

आपल्याला एकाही खुनाचा पश्चात्ताप होत नाही... जी सासू आपल्याला मारण्यासाठी आणि ते दृष्य लहान मुलांनी पाहू नये यासाठी सगळ्यांना घेऊन बाहेरगावी जायचे नाटक करते... तिच्या नशीबात हे यायलाच पाहिजे..

अनार गाव थरथर कापत कित्येक दिवस झोपले नाही पाहिजे..

... विन्या.. तू एकटा माझ्याबाजूने असतास ना?... अरे तुला कधी डोक्यात आले नसेल इतके सुखी ठेवले असते मी... पण तू चुकलास.. त्यामुळे तुझे मुंडके आता जाळले जाईल वेगळे... आणि धड वेगळे.. रक्ताच्या सड्यात पडलायत पाचजण..

तुमच्याच रक्ताची कसम खाऊन ही सनम या निसर्गाला, या रानाला सांगत आहे... आजच्यापुढे पंचक्रोशीत जेथे अन्याय दिसेल... तेथे सनमने घडवलेली अद्दलही दिसेल..

मागून आवाज येऊ लागलेले होते... गावातले सगळेजण दिशादिशांना पांगलेले असणार आता.. आपला शोध सुरू झालेला असेल.. झाडावर चढून बसूयात अंधार होईपर्यंत... खायचे काय आणि प्यायचे काय असले प्रश्न माणसांना पडतात.. आपण तर रानाची राणी.... रान हाच आपला राजा...

सनम एका झाडावर चढून बसली... अंधार पडेपर्यंत त्या भागात कित्येक माणसे आणि तीन चार पोलिस अनेकदा येऊन गेले.. त्या सात तासात सनम एक क्षणही आपली नजर त्या प्रदेशावरून हटवत नव्हती...

... आणि मग शेवटी... पूर्ण अंधार झाला... आणि याच दिशेने काही बत्या घेऊन आणखीन काहीजण येताना दिसले...

... तशी मात्र ती सरसर खाली उतरली.. मागे पाहात विजयोन्मादाने हासत हासत तिने...

... थंडगार नदीत सूर मारला...

अनार गावची सनम आता राज्याच्या पोलिसांच्या तोंडचे पाणी पळवून हिरो ठरायला निघाली होती

=============

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान

छान

बेफिकीर,

अरे वा, पाचही मुडदे एकाच भागात! मला वाटलं की एकेका भागात एकेक मुडदा पडेल. सनम काहीतरी करून परतपरत येत राहील मुडदे पाडायला.

पण तुम्ही तर एकाच भागात सगळ्यांना संपवलंत! पंचपक्वान्नांच्या मेजवानीऐवजी डबा मिळाल्यासारखं वाटंत आहे. Biggrin

तोही गोड मानून घेऊ! पण उत्सुकता फार ताणली गेलीये. पुढला भाग लवकर येउद्यात.

आ.न.,
-गा.पै.

बापरे काय ताकद आणि हिम्मत आहे या बाईची........ सामान्य आचार व व्यक्तिमत्त्व असणारा विन्या हिला मागणी घालायचा विचार कसा काय करु शकला काय माहीत, आपल्याला झेपणार नाही किंवा आपली लायकीच नाही अश्या बाईचा नवरा होणे हे त्याला कळु नये...... आणि अशी शुरवीर व देखणी सनमदेखील कुठे या नेभळट, कावेबाज, सत्वहीन लोकांच्या घरची सुन बनली.... अशी बायको तर चांगल्या नितीमान असणारया सरदाराला शोभली असती......

शेवट लवकर झाला....पण;

ही कादंबरी पुर्ण केलीत म्हणुन आज मी खुश आहे... Happy

तेव्हा (माझ्या) ऑफिस मधल्या सर्वांना माझ्या तर्फे 'टि' पार्टी....!!!!

नो कमेनत्स्................बेफिकिर.....