सागरापर्यंत अंती पोचली प्रत्येक धारा!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 July, 2012 - 07:01

गझल
सागरापर्यंत अंती पोचली प्रत्येक धारा!
नेमक्या लाटेस मोठ्या लाभला नाही किनारा!!

रोज मी निरखून बघतो, तारकांच्या या नभाला;
एवढे गगनात तारे, ना दिसे माझाच तारा!

ही कशी आली फुले रानातली परसात माझ्या?
वाट चुकल्यासारखा का, वाहतो हा रानवारा?

का कुणाला दोष देवू? का कुणाला बोल लावू?
प्राक्तनाने माझिया हा मांडलेला खेळ सारा!

काव्य करतो तो कवी, पण नेमके तो काय करतो?
तो जणू चिमटीत पकडू पाहतो हलकेच पारा!

पैलतीराची कधीही हाक येणे शक्य आहे;
जीव आहे एकटा पण, केवढा त्याचा पसारा!

मेघ आशेचे जमाया लागले नेत्रात माझ्या;
मोर हृदयातील फुलवू लागले त्यांचा पिसारा!

तू अशी झुळकीप्रमाणे येवुनी गेलीस की;
रोमरोमातून माझ्या आजही उठतो शहारा!

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

ही कशी आली फुले रानातली परसात माझ्या?
वाट चुकल्यासारखा का, वाहतो हा रानवारा?

पैलतीराची कधीही हाक येणे शक्य आहे;
जीव आहे एकटा पण, केवढा त्याचा पसारा!

mast aahet he sher
baakeechehee chhaan aahet
gazal khoop aavadalee

का कुणाला दोष देवू? का कुणाला बोल लावू?
प्राक्तनाने माझिया हा मांडलेला खेळ सारा!

पैलतीराची कधीही हाक येणे शक्य आहे;
जीव आहे एकटा पण, केवढा त्याचा पसारा!....... हे विशेष आवडले. अतिशय छान Happy

जीव आहे एकटा पण, केवढा त्याचा पसारा!>>>>>>>>>.जीव आहे 'एकढा' पण, केवढा त्याचा पसारा <<<<<<<<<<<<<<असे करता येईल का ?

काव्य करतो तो कवी...........यात 'क' चा अन् 'तो' चा अनुप्रास मस्त साधलात ...पण काही ठि़काणी तो 'तो' भरीचा वाट्तो !!( या शेराची दुसरी ओळ बेहद्द खूबसूरत आहे.अभिनन्दन)

झुळकीप्रमाणे = झुळुकीप्रमाणे .....असे हवे बहुधा

का कुणाला दोष देवू? का कुणाला बोल लावू?
प्राक्तनाने माझिया हा मांडलेला खेळ सारा!

काव्य करतो तो कवी, पण नेमके तो काय करतो?
तो जणू चिमटीत पकडू पाहतो हलकेच पारा!

पैलतीराची कधीही हाक येणे शक्य आहे;
जीव आहे एकटा पण, केवढा त्याचा पसारा! >>>> हे फारच मस्त........