वाट हरवते फुलांत तेव्हा, काट्यांनाही वाट पुसावी!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 July, 2012 - 10:56

मुक्तक
वाट कोणी देत नसतो, वाट व्हावे लागते!
गाठण्यासाठी किनारा लाट व्हावे लागते!
चोरवाटा, आडवाटा लोपती वाटेमधे,
गाठ शिखरांशी पडाया घाट व्हावे लागते!!
>..........प्रा.सतीश देवपूरकर
गझल
वाट हरवते फुलांत तेव्हा, काट्यांनाही वाट पुसावी!
वाटसरूने वाटेवरच्या वळणांनाही वाट पुसावी!!

हृदयामध्ये गाणे असले की, जगणेही गाणे होते;
जगणे खडतर होते तेव्हा, गाण्यांनाही वाट पुसावी!

काळजातल्या अमूर्त ओळी अडखळती ओठांवर येता;
अशाच वेळी, गुणगुणताना, शब्दांनाही वाट पुसावी!

चार पावलांवर घर अन् मी हुडकायाला वणवण केली......
थोर मिळाले थोर, अन्यथा पोरांनाही वाट पुसावी!

उशी करावी धरणीची अन् नभ घ्यावे पांघरण्यासाठी;
दिशाभूल करतात दिशा तर....वा-यांनाही वाट पुसावी!

चांदण्यातल्या भेटीगाठी, रुसवे फुगवे, नभही साक्षी;
पुन्हा जायला त्या वळणावर, ता-यांनाही वाट पुसावी!

पैलतीर जाणवतो जीवा, दिशा नेमकी उमजत नाही!
वाटचाल करताना वेड्या, लाटांनाही वाट पुसावी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

अतिशय सुंदर.

हृदयामध्ये गाणे असले की, जगणेही गाणे होते;
जगणे खडतर होते तेव्हा, गाण्यांनाही वाट पुसावी!. .... हे खुपच आवडले.

मुक्तक...अफलातून
अभिनंदन.

बेहतरीन गझल सर ...............

प्रस्तावनेखातर दिलेले २ शेरही जबराट आहेत अगदी !!