धुंदमय महाबळेश्वर

Submitted by Yo.Rocks on 4 July, 2012 - 06:00

पहाटे पाच वाजता'महाबळेश्वर' एसटी स्टँडला उतरलो तर सगळीकडे चिखलमय पाणी होते.. थंडगार हवा सुटली होती.. दृष्टी अंधुक झाल्यागत भासत होती.. एकीकडे धुक्याचे थवेच्या थवे येउन गळाभेट करत होते. तर दुसरीकडे पावसाची रिपरिप भेदक वार्‍यामुळे मारक वाटत होती.. या सगळ्यांपुढे स्टँडपरिसरातील विजेचे पिवळे दिवे अगदीच फिके पडले होते.. एखाद्या टिपिकल हिंदी चित्रपटातील रात्रीच्या पावसाचे दृश्य समोर चालू होते.. जल्ला विजाच काय त्या चमकायच्या बाकी होत्या.. Proud श्री. (अस्मादिक) व सौ रॉक्स अर्थातच कुडकुडत एका बाजूला उभे होते.. गाडीतून जेमतेम ५ जणच उतरले होते.. हे ५ जण, एसटीचे दोन तीन कर्मचारी व अजुन स्टँडवरील दोघे तिघे.. बस्स.. यापलिकडे मनुष्याची कुठेच जाग नव्हती.. ती गाडी पुढे 'तपोळा'ला जाण्यासाठी निघाली.. मग तर सन्नाटाच ! इतक्यात एकाने येउन विचारणा केली.. रुम बघणार का ? ' आधीच अंगात गारव्यामुळे शिरशिरी आली होती.. त्यातच दाट धुक्यामुळे (की ढगांमुळे ?) सभोवतालचा काहीच थांगपत्ता लागेना.. मग जल्ला रुम कसली बघणार..

आदल्या रात्री मुंबईहून निघालो तेव्हा गरमीने त्रस्त होतो.. घामाच्या धारा वाहत होत्या.. पाउस फक्त टच करुन गेला असे वाटत होते.. म्हटले 'तिथे' तरी जाउन येउ.. पाउस भेटला तर बरेच होईल.. मस्तपैंकी आस्वाद घेउ.. नि उकाडा असला तर देखणे सुर्योदय- सूर्यास्त असं काहितरी काळया ढगांच्या संगतीने पहायला मिळेल या आशेने निघालो होतो... मुख्य हिल स्टेशन म्हटले तर पहाटे साडेपाचलादेखील थोडीफार वर्दळ असावी अशी अपेक्षा होती.. पण ती फोल ठरली होती...

त्या व्यक्तीला काहीच प्रतिसाद न देता उभे राहीलो.. जणू परिस्थितीला न्याहाळत होतो.. इतक्यात बाजूची चहाची टपरी उघडली नि क्षणाचाही विचार न करता दोन फुल कप गरमागरम चहाची ऑर्डर.. गटागटा घेउन पण टाकली.. नि त्या व्यक्तीला म्हटले चला.. त्याची व्हॅन होती सो अश्या अनोळख्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीबरोबर जरा सावधगिरीनेच बसलो.. पण एक विश्वास वाटत होता... नि सार्थ ठरला.. मार्केटच्या परिसराजवळच रुमची सोय झाली.. दोन ठिकाणी विचारपुस केल्यावरच कळले की पावसाचा ऑफसिजन वगैरे काही नाही.. उलट सगळीकडे बहुतांशी खोल्या फूल आहेत..

पावसाळा म्हटला तर सोलार सिस्टीम बंद.. तेव्हा अंघोळीसाठी गरम पाणी बादलीतून मिळणार होते.. तासभर वामकुक्षी घेतली.. उठल्यानंतर बाहेरील वातावरणात तसूभरदेखील फरक पडला नव्हता.. तोच सुसाट थंडगार वारा.. वाहते ढगांचे लोट.. नि त्यांतून अधुनमधून अंगात आल्यासारखे पडणारा पाऊस.. आमच्या खोलीची खिडकी बंद ठेवण्यातच धन्यता मानली.. इथवर आलो खरे पण प्लॅन कुठलाच आखला नव्हता.. त्यात आता हा पाउस असा सामोरा आला तेव्हा महाबळेश्वरचे पॉईंटस बघणे म्हणजे जल्ला पॉईंटलेस.. इकडे फिरण्यासाठी टॅक्सी करू शकता.. अडीचतासात तीन-चार स्थळे दाखवणार.. साधारण भाडे रुपये ४५०/-.. प्रतापगडची सफर करायची असेल तर भाडे रुपये ७५०/-... आणि मान्सुन पेशल म्हणाल तर सगळे पॉईंट बंद असतात/दिसत नाही म्हणून ३-४ मंदीर दर्शन.. इत्यादी इत्यादी.. आम्ही जसे बाहेर पडलो तसे अश्या 'महाबळेश्वर दर्शन' ची टेप लावणारे टॅक्सीवाले बरेच भेटले ....

पण आमच्या मनात आपल्या मनासारखे फिरायचे होते.. आयता भेटलेला पाउस एन्जॉय करायचा होता.. मग नको ते वेळेचे बंधन.. नको ते फिरण्याचे बंधन.. नि खिशाला पण जास्त चाट नको म्हणून आम्ही सरळ एसटी
स्टँडचा रस्ता धरला.. जस्ट लाईक ट्रेक ! बाहेर पडल्यापासून पावसाची सर बरसू लागली होती.. त्यात ढगांचे धुके ! हे सगळे मार्केटमध्येच अनुभवतोय यावर विश्वास बसत नव्हता.. एकदम प्रसन्न सुरवात.. !

प्रचि १ :

आम्ही तर इतके खूष की इकडे पाहू की तिकडे अशी हालत.. पाच फूटापलिकडचे दिसत नव्हते.. सकाळचे १० वाजत आले होते पण वातावरण अगदी जैसे थे वैसे ! मार्केटमध्ये वडापावच्या एक- दोन गाडया होत्या.. पण सक्काळीच कोणी तयारीत नव्हते.. शेवटी स्टँडजवळ पोहोचलो तर लालबुंद स्ट्रॉबेरी नजरेस पडली.. नशीबवान आम्हीलोक्स.. कारण सिझन तर नव्हताच.. हे शेवटचे पीक होते सो मागेपुढे न विचार करताच लगेच आस्वाद घेतला. मस्त आंबटगोड.. !

प्रचि २:

प्रचि ३:

तिथेच बाजुला कुण्या पुरोहीताचे स्नॅक्सचे दुकान दिसले.. नि आपला फेवरिट वडापाव-समोसापाव अश्या वातावरणात खायला कुणाला नाही आवडणार.. तिथेच मग दुकानात चौकशी केली तर कळले 'वेण्णा लेक' व 'विल्सन पॉईंट' ही दोन ठिकाणे मार्केटपासून फक्त ४-५ किमी अंतरावर आहेत.. एक तर म्हणाला आम्ही सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी जातो.. झाले.. म्हटले एसटी नको चारचाकी टॅक्सी नको.. आपली ११ नंबरची गाडी.. वातावरण तर एकदम उत्साहवर्धक.. चलते चलते बारिश का मजा लेने की मजा कुछ और है ! पहिली वाट आम्ही 'वेण्णा लेक' ची धरली.. कुणालाही (टॅक्सीवाल्याला नको !) विचारले तरी सांगतील.. एकदम मस्त ओलाचिंब रस्ता.. दोन्ही बाजूला गर्द झाडी.. रस्त्यावर फारसे कुणीच नाही..

प्रचि ४:

जेमतेम पंचवीस मिनिटांच्या चालीनंतर 'वेण्णा लेक' लागले.. नि साहाजिकच मग गाडया, घोडेस्वार, खाण्याचे स्टॉल्स नि पर्यटक यांची वर्दळ नि गडबड.. हे अनुभवण्यापेक्षा आतापर्यंत मस्त रमतगमत केलेली पदभ्रमंतीच आम्हाला जास्त आवडली.. असो.. पाउस व ढग यांनी आमचा पिच्छा काय सोडला नव्हता.. नि आम्हीसुद्धा त्यांना आवडीने स्विकारत होतो.. या सरोवराच्या परिसरात तर खाण्याची खूपच चंगळ आहे..

प्रचि ५:

प्रचि ६:

इथे बोटींगची सशुल्क (अंदाजे रुपये २००/-) सुविधा आहे.. पण हवीय कुणाला ? आमची भटकंती टिपीकल पर्यटकाप्रमाणे नव्हतीच.. त्या बोटींगचा अनुभव घेण्यापेक्षा त्या सरोवराच्याच्या एका बाजूने चालण्याचे ठरवले.. तत्पुर्वी सरोवरामध्ये पाउसवार्‍यासंगे विहार करणार्‍या बोट बघताना छानच वाटत होते..

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

त्या भर पावसात वल्हवणार्‍याला खूप कष्ट पडतानाचे दिसत होते.. (जल्ला मला इथे कॅमेरा जपताना कष्ट पडत होते..)

प्रचि १०:

आम्ही सरोवराच्या ज्या बाजूने चालत गेलो ती जागा खूपच सुनसान नि दुर्लक्षित वाटत होती.. किनार्‍यावरची पर्णरहीत अशी सुकलेली व रांगेत असणारी ही झाडं रुक्ष/भयावह वाटत होती.. पण सरोवराचे सौंदर्य इतक्या जवळून बघताना खूपच आनंद झाला.. त्यात पण एकदम मदहोशी वातावारण.. मध्येच ढगांची इतकी गर्दी व्हायची की सरोवर पण दिसेनासा होउन जायचे... इकडचेच काही प्रचि..

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

इथेच आम्ही मनसोक्त फिरून घेतले.. निघावेसे तर वाटत नव्हते.. बोटींग करणार्‍यांना नक्कीच आमचा हेवा वाटत असेल.. आम्ही धरलेली वाट मुळात निमर्नुष्य होती.. पुढे ती दूरवर एका मंदीराकडे जात असल्याचे दिसत होते.. पण कुणाचीच चाहूल नव्हती शिवाय वातावरणदेखील अधुनमधून अंधुक होत असल्याने आम्ही माघारी फिरलो.. 'वेण्णा लेक' पर्यंतची आमची एक पदभ्रमंतीच होउन गेली.. फक्त या ठिकाणी यायचे झाले तर टॅक्सीवाले रुपये १००/- भाडे घेतात.. त्यापेक्षा चालत गेलात तर उत्तमच.. नि सोबतीला असा मंदधुंद पाउस असेल तर लै भारी.. ! इथूनच मग दुपारी अडीच तीन च्या सुमारास परतीचा रस्ता धरला.. याच रस्त्याला मध्ये एका ठिकाणी जुन्या पायर्‍यांचा रस्ता दिसतो.. एका वाटेकरीला विचारले असता कळले की मार्केटला जाण्यासाठीच रस्ता आहे.. सो तिकडे मोर्चा वळवला.. जेमतेम पंधरा वीस पायर्‍या पण पावसाळी वातावरणाच्या काळोखामुळे तिथून जाताना मस्तच वाटत होते.. शिवाय कोणाचा मागमूसही नव्हता.. अगदीच एखाद दुसरे कुणीतरी..

त्या पायर्‍या चढून वरती आलो नि पुन्हा डांबरी रस्ता लागला.. तिथून उजवीकडे वळून चालू लागलो.. तिकडेच मग विल्सन पॉईंटकडे असा फलक दिसला.. नि मग काय.. मार्केटचा रस्ता सोडून या रस्त्याने चालू लागलो.. वातावरण तर आता फारच अंधुक झाले होते.. अगदी सांज दाटून आली की काय असे वाटत होते.. ढगांची दाटी वाढतच होती.. नि पाउस अधुनमधून भेटीला होताच..

प्रचि १४: पिकासा के साईड इफेक्ट्स !

प्रचि १५:

प्रचि १६: धुक्याची गुहा !!!

याठिकाणी आजुबाजूला बरीच रिसॉर्टस होते.. पण सारेच ढगांच्या धुक्यात लुप्त झाले होते.. वातावरणात थंडगार ओलावा होता.. एखाद दुसरी गाडी जात होती तीच काय ती गडबड.. अन्यथा सन्नाटा आणि आम्ही दोघे ! आमची ११ नंबरची चलती का नाम गाडी चांगलीच भरात आली होती..

प्रचि १७:

ढगांनी तर आता आमच्या पायाशी लोळण घ्यायला सुरवात केली होती.. वार्‍याला उधाण आले होते.. तेव्हा उडी मारण्याचा उत्साह नाही आला तर नवलच..

प्रचि १८: उडताही फिरू इन हवाओमे कही..

मी नेटवर वाचले होते की विस्लन पॉईंटवरून (उंची अंदाजे ४७०० फूट ) सुर्योद्य व सुर्यास्त दोन्ही बघता येतात.. तिथे खास त्यासाठी गोलाकार प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत.. पण जल्ला आम्हाला इथे ढगांशिवाय काहीच दिसणार नव्हते.. फक्त अधुनमधून जोरकस येणारा वारा मात्र ढगांचे लोट हटवण्याचे काम करत होता.. तेव्हाच कुठे काहीतरी आसपासचे दिसत होते.. पण एकदम मस्त ! अगदी गडावर गेल्याचे भास होत होते.. Happy नावाला दोन तीन गाडया व एक-दोन कुटुंब आली होती.. बाकी असतील तर माहित नाही.. दिसतच नव्हते.. पण आवाजही नव्हता.. !

प्रचि १९: हा एक प्लॅटफॉर्म

ढग काहि सेकंदासाठी दूर झाले नि दिसलेले दृश्य टिपेपर्यंत पुन्हा ढगांचे आक्रमण.. थोडीफार बाजी मारण्यात यशस्वी झालो..

प्रचि २०:

पाउस अधुनमधून आपल्या थेंबाचे तडाखे देत होता.. सोबतीला भन्नाट वारा.. आम्ही फिरेस्तोवर त्या गाडया पण माघारी फिरल्या होत्या.. ढगांनी तर हल्लाबोल केला होता.. चोहोबाजूंनी वेढले होते.. डांबरी रस्त्यावर चालत असुनही दोन फुटापलिकडचे दिसत नव्हते.. आवाज फक्त जोरकस वार्‍याचा चालू होता.. वातावरण एकदम थंड.. आमच्या दोघांची अगदी स्वर्गीय वारी सुरु होती.. कुणाचा मागमूसही नव्हता.. किट्टी - किट्टी रोमँटीक ना.. Proud पण जल्ला आमच्या सौ. रॉक्सना ते वातावरण एकदम भुतपटात दाखवतात तसे वाटले.. नि घाबरुन 'माघारी चला' चा नारा सुरु झाला.. Happy

असले मंद-धुंद वातावरण आम्ही गडावर कुठे ना कुठे तरी अनुभवले असतेच.. नि पुन्हा पुन्हा अनुभवण्यास नेहमीच तय्यार ! पण इथे या निमर्नुष्य नि अनोळखी परिसरात दुकटयाने फिरणे धोक्याचे वाटले तेव्हा मनाला आवरते घेतले नि अगदी नाईलाजाने परतीचा रस्ता धरला.. घडयाळात संध्याकाळचे नुकतेच पाच वाजत होते पण वातावरण मात्र आता काळोख पडेल असे सांगत होते..

परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा गरमागरम कटींग मारली नि वीसेक मिनीटांतच मार्केट गाठले पण.. खरे तर आम्हाला कळलेच नाही कुठून कसे आलो.. पण जी काही पदभ्रमंती झाली होती ती खरीच सुखावह होती.. एकदम फ्रेश होतो.. थकवा वाटण्याचा प्रश्णच नव्हता.. नि शेवटी काय कसलाही प्लॅन नसताना दोन स्थळं देखील बघून झाली होती.. अगदी विनाशुल्क नि मनसोक्तपणे.. स्वतःच्या मर्जीनुसार.. अशी मजा गाडीतून फिरताना नक्कीच घेता आली नसती.. आमच्या या 'हटके' भटकंतीचा आम्हालाच अभिमान वाटत होता..

मार्केटमध्ये आलो तर इथेपण अंधुक वातावरण.. जल्ला या महाबळेश्वरमध्ये ढगांना पकडून धरण्याचे बळ सॉल्लिड आहे असे वाटते.. आता मात्र रविवारची संध्याकाळ असल्याने पर्यटक मोठया संख्येने मार्केटमध्ये फिरताना दिसले.. 'वेण्णा लेक' नंतर थेट इथे गर्दी बघितली.. बहुदा पावसामुळे कोणी बाहेर पडले नसावे.. आम्ही मात्र आता दिवसभरच्या मंदधुंद वातावरणातील भटकंतीमुळे चांगलेच गारठलो होतो.. विल्सन पॉईंटच्या अनुभवाने पुरेपुर समाधान झाले होते सो कुडकुडतच दुसर्‍या दिवशीचा प्लॅन आखला.. दुसरे काही नको.. आता बघायचा 'प्रतापगड' !!

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच...
घोड्याचा प्रचि बघताना.. घोडा उडी मारणार की यो उडी मारणार याची वाट बघत बसलो होतो.

वा वा...........मस्तच्....लिखाण ही आणि प्रचि हि........यो खरेच सीम्स यु रॉक..... Proud

महाबळेश्वर ऑलवेज रॉक्स Happy
मी आताच जाऊन आले माझ्या महाराष्ट्रेतर मित्र-मैत्रिणींसोबत
तिथे गेल्यावर त्यांची एकच प्रतिक्रिया होती... ऑसम... एक जण म्हणाला कोण म्हणतं पृथ्वीवर स्वर्ग नाहिये म्हणुन.. (उगाच) मला(च) महाराष्ट्राचा अभिमान वैगेरे वाटला Wink
झब्बु देऊ का? Proud

योग्या...
नव्यां-नव्यां 'लगीन'... आणि सोबत (फकस्त) 'घरकारीण'... मगे... 'वाता-वरण' 'धून्द' नाय झालां तर नवलच... Proud ...

जबरदस्त रे रॉक्स Happy तु एवढ्या उंच उडी मारली आहेस का फोटोग्राफरची कमाल आहे ?
आता बघायचा 'प्रतापगड' !! >>> वाचण्यासाठी आतुर झालोय.
मस्त सफर Happy

ज... ब... री!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

धन्यवाद Happy

नितीन.. फोटोग्राफरची कमालच म्हणा.. पहिल्याच टेक मध्ये घेतलाय फोटो नि उडी म्हणशील तर त्यात मास्टर आहे आपण !

यो यू अ‍ॅन्ड मिसेस रॉक्स रिअली रॉक..
छान धुंदमय वर्णन केलंयस बरोबर सुप्पर्ब फोटोज.. व्वा!!!
सगळे सीन, रस्ते एखाद्या परीकथेतील दिसतायेत्,झालच तर प्रचि १७ मधलं चेटकिणीचं घर ही आहे..
मस्त मस्त एकदम हटके भटकंती !!!

गेल्यावर्षी महबळेश्वरला जाऊन आलो, ते सुध्दा पावसाळ्याच्या सुरवातीलाच, तीन दिवसाचा मुक्काम होता. त्यामधे प्रतापगड, पंचगणी, मिनी काश्मिर पाहुन घेतल. त्याने पोट नाही भरलं, पुन्हा जावयासे वाटतेय, पुढचा भाग लवकर टाका Happy

वा रॉक्स - मस्त धमाल केलेली दिस्तेय.....
सुरेख वर्णन, भारी फोटो -
या पावसाळी वातावरणात महाबळेश्वर - ही कल्पनाच केली नव्हती रे - तुम्ही लोक्स भन्नाट आहात यार --
सो धन्स तुम्हाला......

सही !

Pages