स्पेशल कढी

Submitted by प्रज्ञा९ on 28 June, 2012 - 13:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. दही दीड वाटी
२. बेसन १ टेबलस्पून
३. हिरव्या मिरच्या २
४. लाल मिरच्या १-२
५. लसूण सोलून ६-७ पाकळ्या
६. आलं बोटभर
७. ओलं खोबरं पाव वाटी
८. फोडणीसाठी २ चमचे तूप, जिरं, हिंग.
९. कढिलिंबाची ७-८ पानं. (१ टाळा)
१०. दालचिनी २-३ काड्या
११. चवीसाठी साखर-मीठ

क्रमवार पाककृती: 

१. दही नीट फेटून, त्यात बेसन घालून एकजीव करून घ्या. मग पाणी घालून थोडं दाटसर राहील अशा बेताने घुसळून घ्या. साखर-मीठ घालून घ्या.
२. ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या.
३. हे वाटण घुसळलेल्या दह्याला लावा आणि पुन्हा घुसळून घ्या.
४. तूप, जिरं, थोडा जास्ती हिंग, लाल मिरची, कढिलिंब, दालचिनी अशी चरचरीत खमंग फोडणी या मिश्रणाला वरून द्या. हळद घालू नका.
५. कढी फुटणार नाही अशा बेताने ढवळून उकळी आणा.
६. चव पाहून साखर-मीठ अ‍ॅडजस्ट करा. तिखटपणा कमी वाटला तर हिरव्या मिरच्या ठेचून घाला.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही तशी साधी, पण अतिशय रुचकर पाकृ आहे.
आपल्या आवडीनुसार/ पथ्यानुसार मिरच्या/ खोबरं/ दालचिनी कमी-अधिक करू शकता.

अनेक दिवसांपूर्वी सहकारी मैत्रिणीने दुपारच्या डब्यात ही कढी आणि खिचडी आणली आणि ५ मिनिटांत ती आम्ही संपवली.

माहितीचा स्रोत: 
सहकारी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज कढी-गोळे करणार आहे माळवी पद्धतीने भिजवलेल्या चणाडाळीचे गोळे उकडुन करीन कढी या पद्धतीने-लवंग-दालचिनी घालुन करीन.. फक्त लसुण घालणार नाही कारण गोळ्यांमधे राहीलच.

खरंच धन्यवाद या रेसिपीबद्दल

कढी म्हणली तर अगदी साधेपणाने खाल्ली जाते, पण करायला कशी असते हे समजले

हो आर्या. आणि ओल्या खोबर्‍याची वेगळी छान चव येते.
धन्यवाद सर्वांना.
Happy

येस्स, प्रज्ञा. मस्तच. मला ही कढी खुपच आवडते. फोडणी करताना तुपावर जिरे, हिंग, मेथी दाणे, लाल मिर्ची, कढीपत्ता, लवंगा, मिरी, दालचिनी असं टाकते. बाकी आल्यालसणाचं वाटण, बेसन इ. हवंच. बेसन जरा जास्त घातलं तर कढी फुटतही नाही. चांगली उकळावी आणि गरमागरम मुगाच्या खिचडीबरोबर खावी. Happy

या कढीत भेंडीचे आणि लाल भोपळ्याचे तुकडेही छान लागतात. फोडणीवर या भाज्या घालून थोडं पाणी घालून शिजवाव्यात आणि मग दही घालावं.

सुलेखा, तुमची कढी गोळ्यांची पाक्रु टाका ना इथे!

मी कच्चे गोळे उकळत्या कढीतच सोडते. शिजले की ते वर येतात. पण शेवटी शेवटी कढीचं पिठलं होऊन जातं!