उद्योजक आपल्या भेटीला - फडणीस ग्रूप

Submitted by Admin-team on 29 May, 2012 - 08:48

अश्वमेध यज्ञ पूर्ण होण्यासाठी दोनच साधने पुरेशी असतात. एक, अश्वमेध यज्ञ करण्याची आकांक्षा आणि दुसरे साधन म्हणजे विजेता ठरूनही पराजितांना आपले मानण्याची व त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची मनोवृत्ती.

संयम, भरारीची सिद्धता, आत्मविश्वास आणि सर्वांना आपलेसे करण्याचा स्वभाव हे जेत्याचे अलंकार आहेत. हे अलंकार ज्याच्याकडे असतात त्याच्या विकसनशील स्वभावाला व 'लॅटरल थिंकिंग'ला समाजातील कोणतीही बंधने बांध घालू शकत नाहीत. जात, धर्म, शहर, संस्कृती, संपत्ती, कायदे, जागा हे घटक लाखोंच्या महत्वाकांक्षेच्या आड येतात, पण उमद्या, प्रवाही, समृद्ध आणि जिवंत आत्मविश्वासासमोर हे घटक पायउतार होऊन त्याचा पुढील मार्ग स्वतःहून सुलभ करू लागतात.

फडणीस ग्रूप ऑफ कंपनीज ही 'एकहाती जादू' स्तिमित करणारी आहे.

DSC_0037.JPGएका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायातील एक शिकाऊ, प्रगतीशील प्रवृत्तीने आपली छाप सोडत वरपर्यंत पोचलेला आणि अलौकिक जनसंपर्क प्रस्थापित करून सहकारी, बॅन्कर्स आणि ग्राहकांना अक्षरशः अवाक् करणारा एक तरुण आज मध्यमवयीन व चारशे पन्नास कोटी उलाढाल असलेल्या उद्योगसमुहाचा सर्वेसर्वा झालेला आहे. त्या व्यक्तीकडे आज प्रत्यक्ष आठशे पन्नास माणसे कर्मचारी म्हणून काम करत असून अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालेले दहा हजार कर्मचारी आपली रोजी रोटी या उद्योगसमुहाशी संलग्न होऊन प्राप्त करत आहेत. रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, पॉवर जनरेशन, हॉस्पिटॅलिटी इन्डस्ट्री आणि खाद्यपदार्थ व्यवसायात ठळक, वेगाने व्यापक होत जाणारा आणि उंचावत्या आलेखाचा ठसा फडणीस ग्रूप ऑफ कंपनीजने आज निर्माण केलेला आहे. आरंभ झाल्यानंतर हे सर्व प्रत्यक्षात उतरले आहे केवळ नऊ वर्षात आणि या वेगवान प्रवासात शेकडो नवनवे मैलाचे दगड निर्माण करतानाही विनय फडणीस हे संस्थापक अधिकाधिक नम्र, लोकप्रिय आणि अजातशत्रू होत चालले आहेत.

'उद्योजक आपल्या भेटीला' या सदरांतर्गत श्री. विनय फडणीस यांची मायबोलीकर बेफिकीर (भूषण कटककर) यांनी घेतलेली आणि इथे शब्दबद्ध केलेली ही मुलाखत.

***

नमस्कार. मुलाखतीस वेळ दिल्याबद्दल मायबोलीतर्फे आभारी आहे. एका प्रसिद्ध उद्योगात एक वरिष्ठ कर्मचारी असलेल्या आपला एक उद्योजक म्हणून प्रवास कसा सुरू झाला याबद्दल थोडे सांगावे.

मी प्रथम ज्या व्यवसायात एक उद्योजक म्हणून प्रवेश केला त्याच व्यवसायात मी नोकरी करत होतो. यामुळे मला ऑपरेशनल असे सर्वच ज्ञान आधीच प्राप्त झालेले होते व त्याचमुळे माझा जनसंपर्कही असा होता जो माझ्या व्यवसायाला पूरक ठरत होता. पण या प्रश्नाचे हे उत्तर म्हणजे नुसतीच औपचारिकता ठरेल. खरे उत्तर हे आहे की एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या सकारात्मक बाबी, बुद्धी, संधी व माणसांची साथ सोबत या सर्वांचा सर्वोत्कृष्ट वापर ती व्यक्ती सहसा करतच नसते. मी या सर्व घटकांचा वापर एक चांगला, सर्वसमावेशक व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करतानाच फायदेशीर ठरेल असा स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी केला. अनेकदा असे दिसते की कर्मचार्‍यांना किंवा एकंदरच माणसाला आपण काय करू शकतो याची नीटशी कल्पना नसते. इच्छा आकांक्षांना प्रयत्नांची जोड माणूस नक्कीच देतो, पण मूळ ध्येयच उंचावणे किंवा स्वप्नच मोठे पाहणे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी स्वतःची नेमकी किती आणि कशी तयारी आहे याबाबत माणूस योग्य दिशेने विचार करत नाही. भीती, भय हे तर मनात असायला हवेच, अन्यथा चुकीचे निर्णय घेतले जातील. पण भरारीची तयारी, धडक प्रवृत्ती आणि माणसांवर विश्वास ठेवून त्यांना आपल्याबरोबर उंचावर नेणे हे अत्यंत महत्वाचे घटक माणूस सहसा कार्यरतच करत नाही. प्रत्येकात ती क्षमता कमीजास्त प्रमाणात असूनही प्रत्येकजण खुजी स्वप्ने तरी पाहतो, उडी तरी मारत नाही किंवा बरोबरच्या माणसांना सन्मान आणि रोजगार दोन्ही देऊ करून त्यांचा सुयोग्य सहभाग तरी करून घेत नाही. हा शेवटचा घटक अतिशय महत्वाचा. हे असे होण्याचे कारण असते मनातील भीती, जी आपण स्वतः, आपल्या कुटुंबियांनी किंवा आपल्या भविष्यातील ग्राहकांनी निर्माण केलेली असते. ही भीती निर्माण करणारी माणसेच असतात हे लक्षात घ्यायला हवे आणि व्यावसायिकाने खरे तर अशा माणसांकडून येणार्‍या भीतीचा स्वीकार न करता उलट त्या माणसांना आत्मविश्वास द्यायला हवा की मी जे करेन ते तुम्हा सर्वांसाठी योग्यच असेल. अर्थातच असा विश्वास कोणी केवळ वाक्चातुर्याच्या जोरावर किंवा आश्वासनांद्वारे प्राप्त करू शकत नाहीच. त्यासाठी प्रथम 'डिलीव्हर' करावेच लागते. प्रथम सिद्ध करावे लागते की त्यांनी तसा विश्वास ठेवणे हे योग्य ठरेल. मोठमोठी नांवे त्या व्यवसायात आधीच लोकांच्या मनात स्वतःसाठी एक जागा निर्माण करून राहिलेली असताना 'हा काय मोठे दिव्य करणार आहे' ही सर्वसामान्यांची भावना नष्ट करणे सोपे नाही. पण त्यासाठी एक महत्वाची गोष्ट करावी लागते. सहसा माणसे आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठीच्या प्रयत्नांत 'माणूस' या घटकाला कमी प्राधान्य देतात. मी 'माणसाला' सर्वात जास्त प्राधान्य देतो. माझे ग्राहक 'एक माणूस म्हणून' माझ्या कामाबाबत खुष असतील तर ते माझ्यासाठी अधिक किंमतही देतील, माझ्यावर वाढता विश्वासही ठेवतील. माझे सहकारी सन्मानपूर्वक रोजीरोटी कमवू शकले आणि मित्रत्वाच्या वातावरणात राहिले तरच व्यवसायात मन गुंतवतील. माझे बँकर्स फक्त परतफेड आणि व्यावसायिकता बघतील असे नाही तर एक माणूस म्हणून ते 'व्यावसायिक मैत्री, हसतमुख व्यावसायिक स्नेहबंध' यांच्याद्वारे माझ्या व्यवसायाबाबत एक माणूसकीचा दृष्टिकोनही ठेवतील. उद्योजक होण्यासाठी जनसंपर्क, धडाडी आणि सर्व संबंधित माणसांना योग्य सन्मान प्राप्त करून देणे अतिशय आवश्यक आहे. तरच व्यवसाय वाढतो आणि त्याचे अधिष्ठान 'रिस्पेक्ट अ‍ॅन्ड गेट रिस्पेक्ट' या मजबूत विटांनी निर्माण होते.

मी प्रथम बांधकाम व्यवसायात स्थान निर्माण केले आणि त्यानंतर समोर येत असलेल्या कोणत्याही योग्य संधीला नाकारले नाही. त्यासाठी नवनव्या क्षेत्रातील ज्ञान संपादन करावे लागले, त्यातील आव्हाने, 'की - इश्यूज' आणि फायदेशीरता यांचा परामर्श घेतला. तरबेज लोकांना आपल्याकडे वळवले आणि भविष्यातील ग्राहकांचे मन स्वतः भेटून जिंकले. आज फडणीस ग्रूप अत्यंत वैविध्यपूर्ण क्षेत्रात धडाक्याने आपले स्थान निर्माण करत आहे. डायव्हर्सिफिकेशनला मी कधीही शत्रू मानले नाही, उलट त्याला मी त्या क्षणीचे 'एकमेव प्रवेशद्वार' मानले, जणू की मला फक्त त्यातूनच प्रवेश असावा असे. आपण आपली सर्व शक्ती आणि तनमन अर्पण केले की यश स्वतःहूनच अंतर कमी करून आपल्यापर्यंत पोचते हे वारंवार अनुभवले.

व्यवसाय उभारताना विविध टप्प्यांवर आपल्याला विविध प्रकारची आव्हाने सामोरी आली असतील. कोणत्या अश्या आव्हानांचा उल्लेख आपण कराल, ज्यातून नवी दिशा मिळाली किंवा काहीशी निराशा झाली?

निराशेला निराशा मानणे हे व्यावसायिकासाठी कुपथ्य आहे. प्रत्यक्षात निराशा व्हावी असे कधी झाले नाही, पण झाले तरी मी त्या निराशाजनक आव्हानालाही एक कडवे पण 'जेय' आव्हान मानेन. 'होऊ शकत नाही, असे काहीही नसते' हे तत्व अंगिकारले तर आपणच आपल्याला समजावू शकतो की अजून काहीच बिघडलेले नाही आणि आपणच आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतो की 'जस्ट गिव्ह वन मोर ट्राय'. मला नशीबाने कधीच निराशाजनक परिस्थितीत आणले नाही, पण याचे श्रेय माझ्या कर्तृत्वाला देण्याऐवजी मी पुन्हा एकदा मला साथ देणार्‍या सर्व माणसांनाच देईन. त्यातही सर्वाधिक महत्व माझे कुटुंबीय, सहकारी आणि ग्राहक यांचे.

येथे महत्वाचे असे म्हणावेसे वाटते आहे की 'पराजय ही भावना आपल्याला दुखावते व पुढील आव्हान स्वीकारताना आपला आत्मविश्वास घटवते' याचे कारण आपला इगो. एखाद्या क्षणी आपण दुर्दैवी ठरलो, तर 'मी पुन्हा मागच्या परिस्थितीत जाणार नाही, माझी पोझिशन किती श्रेष्ठ आहे' असा विचार करणे घातक आहे. हार ही तात्कालीक असते आणि 'स्वतःत बदल न करण्याइतका' इगो हा घातक असतो. आपण परिवर्तनशील व्यक्तीमत्वाचा आदर्श घालून दिला की सहकारी हातात हात देत आपल्याला 'हम तुम्हारे साथ है' म्हणत पुढे नेऊ लागतात. सुदैवाने, व्यावसायीक आयुष्यात मला आजवर कोणतेच अपयश सामोरे आले नाही, हे मात्र वेगळे.

आज या ग्रूपमध्ये कोणकोणत्या क्षेत्रातील काम सुरू आहे?

आधी सांगितल्याप्रमाणे, व्यवसायवृद्धी या उद्दिष्टामध्ये 'वैविध्यपूर्ण क्षेत्रात' प्रवेश करणे याला मी कायमच एक संधी मानत आलो. आमच्या नावापुढे आज अनेक क्षेत्रातील आमचे दिमाखदार अस्तित्व लिहिले जात आहे.

सर्वप्रथम रिअल इस्टेटमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी अपार्टमेन्ट्स, कॉलनीज, बंगले, रो हाऊसेस व ट्विन्स बांधलेले आहेत. सर्व आर्थिक सेगमेन्ट्सना भुलवणार्‍या किंमती, सेवा व गुणवत्ता दिली आहे.

रिअल इस्टेटनंतर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रवेश केला. मोठमोठे रस्ते, पूल, व्यावसायिक संकुले, विमानतळ अशा स्वरुपाच्या बांधकामांमध्ये आम्ही वेगाने नाव कमावले.

आमच्या ग्रूपसाठी त्याकाळची सर्वाधिक अभिमानाची बाब म्हणजे आमचे अलिबागला बांधलेले रॅडिसन अलिबाग हे 'साहिल रिसॉर्ट्स' सेव्हन स्टार हॉटेल. या हॉटेलला मुंबईहून थेट बोटीतून केवळ अडीच तासात पोचण्याचीही व्यवस्था आम्ही केलेली आहे, ज्यामुळे मुंबई ते अलिबाग हे रस्त्याने येण्याचे अंतर घटले आहे. या हॉटेलमध्ये सर्वोत्कृष्ट सेवासुविधा आहेत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश हे आव्हानात्मक होते. मात्र आज येथे राहणारा ग्राहक समाधाने एक स्मितहास्य करतो आणि आमच्या सेवासुविधांवर खुष होतो हीच पावती.

टेलिकॉम क्षेत्रात आम्ही मोबाईल फोनचे टॉवर्स, ऑप्टिक फायबरचे इन्स्टॉलेशन, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स या सर्व प्रकारची कामे करत आहोत. हे क्षेत्र आमच्यासाठी रेप्यूटचे क्षेत्र असून त्यातील वेगवान वाढ ही आमच्यावर असलेल्या ग्राहकांच्या विश्वासाचे द्योतक आहे.

या शिवाय आम्ही सौरऊर्जा, विन्डमिल्स, संगणक प्रशिक्षण व निर्यात या क्षेत्रात पूर्ण ताकदीनिशी कार्यरत आहोत.

सर्वात नवीन समावेश आहे पोर्तुगालच्या डॅनेसिटा या कंपनीशी केलेल्या बिस्किट निर्मीतीच्या कराराचा. खोपोली येथे एक भव्य युनिट सुरू केलेले असून बिस्किटांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आम्ही सिद्ध झालेलो आहोत.

एवढ्या भव्य उद्योगाचे नियंत्रण केवळ 'विनय फडणीस' एकटेच करतात?

ध्येयाकडे दिशा देण्याचे काम मी करत असलो तरी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ आमच्याकडे कार्यरत आहेत.

इतक्या सर्वदूर पसरलेल्या व्यवसायाच्या भरभराटीत कुटुंबियांचे प्रोत्साहन किती?

कुटुंबियांनी मला वेळोवेळी धीर आणि आत्मविश्वास दिलेला आहे. ते अजूनही जुन्याच जीवनशैलीत राहत असून ही प्रगती आमच्या कोणाच्याच डोक्यात गेलेली नाही. आपण जे करतो त्याला इतर माणसांची आणि नशीबाची साथ असते म्हणूनच ते यशस्वी होते हे आमच्या धार्मिक विचारांच्या कुटुंबात माझ्यासकट सर्वांना मनापासून मान्य आहे. माझ्या मातु:श्री, सौ. अनुराधा, सायली आणि साहिल, माझी बहिण आणि माझे सर्वच कुटुंबीय मला सातत्याने प्रोत्साहन देत असतात. एकेकाळी स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे नसलेला आणि लहान वयातच कामाला लागलेला मी आज जेथे कुठे आहे, ते केवळ घरच्यांनी पाठीवर थाप मारल्यामुळेच. गरीबी मी स्वतःच पाहिलेली आहे, माझ्या कुटुंबियांनीही पाहिलेली आहे. श्रीमंती, वैभव सर्वांना हवे असतेच. पण आजही माणसाचे मन जिंकणे आणि निगर्वी राहणे ही दोनच तत्वे मी आणि सर्व कुटुंबीय अंगीकृत करून वागत आहोत.

आपल्या आयुष्यात आपण सतत कार्यरत असाल. मग कुटुंबाला, समाजाला, स्वतःला वेळ किती देता?

मी माझ्या व्यक्तीमत्वाची सुस्पष्ट 'कंपार्टमेन्ट्स' केलेली आहेत. त्यात एक मुलगा आहे, एक पती आहे, एक बाप आहे, एक नातेवाईक आहे, एक सहकारी आहे आणि एक मित्रही. मी सामाजिक कार्य बर्‍याच प्रमाणावर करत असतो. धार्मिक कार्य तर आमच्या कुटुंबात सातत्याने होतच असते. जसे शंकर महाराज मठाबाबत आम्ही काही करत आहोत. मी व्यायाम करतो, खेळायला जातो, वाचन करतो, प्रवास करतो आणि कुटुंबाबरोबर खूप वेळही घालवतो.

माणसाचे एक चुकते असे मला वाटते. व्यावसायिक म्हणजे चोवीस तास बारा महिने व्यावसायिकच असतो असे नाही. तो मुळात माणूस असतो. तो 'माणूस', म्हणजे कुटुंबातला, समाजातला 'माणूस' म्हणून जिवंत राहिला तरच तो व्यावसायिक म्हणूनही जिवंत राहू शकतो. फायद्यासाठी यंत्रवत कार्यरत राहणे हे अयोग्य आहे.

जनसंपर्काचे स्थान काय?

शत्रू निर्माण करणे सोपे असते. शतृत्व कायम ठेवणेही सोपे असते. त्या माणसावाचून फारसे काही अडतही नसते. अगदी व्यावसायीकही शत्रूचा शत्रू असू शकतोच. पण यशाचा मार्ग माणसांच्या मनातील मैत्रीपूर्ण भावनेतून जातो हे लक्षात ठेवायला हवे. आपल्याशी संबंधीत प्रत्येकजण हा आपल्याबाबत फक्त 'चांगलाच' विचार करेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. लहानात लहान माणसाच्या भावनाही जपाव्या लागतात. माणसे खुश तर लक्ष्मी आणि यश हे आपल्या घरी पाणी भरतील. पण कोणीतरी आपल्यावर खुष नाही आहे ही भावना छळते. जगन्मित्र कदाचित कोणीच नसेलही, पण निदान चुकून कोणी दुखावले गेलेच तरीही त्याला पुन्हा सुखावणे हे केवळ एक व्यावसायिक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही आवश्यक आहेच. म्हणूनच मी माझा जनसंपर्क प्रचंड ठेवलेला आहे. तो दररोज वाढतच आहे. प्रत्येक माणूस ही स्वतःला समृद्ध करण्याची संधी असते. या दृष्टीने पाहिल्यावर माझ्यासारखा जनसंपर्क कोणाचाही होईल. सगळेच माझे खूप चांगले मित्र नसतीलही, पण मला शत्रू मात्र नाही. आणि एखादा असलाच तर तो ज्याअर्थी मला माहीत नाही त्याअर्थी तो विशेष महत्वाचाही नाही.

अजून कोणत्या क्षेत्रात मुसंडी मारण्याचा विचार आहे?

अनेक क्षेत्रे आहेत. काहींबाबत वैचारीक पातळीवरच प्रगती झाली आहे तर काहींबाबत अधिक पुढे गेलेलो आहोत. स्वतःला बांधून न ठेवणे हे सुखद असते.

उद्योगधंद्यांची सद्याची अवस्था कशी आहे?

सध्याची अवस्था घातक आहे. रुपया घसरत आहे आणि उद्योगधंदे बंद पडत आहेत. अशा वेळी टिकून राहणे हे गुणवत्तेतून व टेक्नोइकॉनॉमिकली सरस ठरण्यातून जमेल. आम्हाला प्रत्यक्ष असा काहीच धोका नसला तरी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दादा असलेल्या कंपन्यांना मात्र वाईट दिवस आलेले दिसत आहेत. म्हणूनच डायव्हर्सिफिकेशन अतिशय महत्वाचे आहे. त्यातही फूड अ‍ॅन्ड बेव्हरेजेस आणि हॉस्पिटॅलिटी हे उद्योग अमर ठरतील.

तुम्हाला भय कशाचे वाटते?

मला पूर्वी थोडी भीती वाटायची. भीती फक्त याच गोष्टीची वाटायची की आपण एकटे आहोत. जे चांगले घडेल तेही आपल्यामुळे आणि जे वाईट, बुरे घडेल तेही आपल्याचमुळे. ते दिवस केव्हाच गेले. आता व्यवसाय अनेक क्षेत्रात नेल्यानंतर मनाला एक स्थैर्य आलेले आहे. आता मी फक्त पुढे जाण्याचाच विचार करू शकतो.

कलाक्षेत्रासाठी फडणीस ग्रूप काही करतो का?

माझ्या मुलाच्या नावाने असलेले 'साहिल फाऊंडेशन' हे वर्षभर काव्य व साहित्य क्षेत्रासाठी सातत्याने उपक्रम करते. यात अनेक संमेलने, मेळावे, पुरस्कार, महोत्सव, व्याख्याने, नवोदीत कवी व साहित्यकारांसाठी विविध स्पर्धा यांचा समावेश आहे. काहीवेळा मीही अशा उपक्रमांना उपस्थित राहतो. याच उपक्रमात काव्यप्रतिभा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, चांगला माणूस पुरस्कार, आई पुरस्कार असे महत्वाचे पुरस्कारही आहेत.

मराठी माणूस असल्याचे काही विशिष्ट फायदे तोटे व्यवसायात अनुभवास आले?

अजिबातच नाही. मराठी काय आणि इतरभाषिक काय. फरक काहीच नाही. आत्मविश्वास असल्यास कोणीही मोठे काम करू शकतो. मराठी माणसाला असे विशिष्ट चष्मा घालून का बघितले जाते हे मला माहीत नाही. असे नाही की मी मराठी माणसांसाठीच काही खास प्रयत्न करतो वगैरे, पण मला त्यात काहीच विशेष वाटत नाही.

नवोदित अथवा इच्छुक उद्योजकांसाठी काय संदेश द्यावासा वाटत आहे आपल्याला?

रोजगार भरपूर निर्माण करा. एकटेच कमवत बसण्यापेक्षा चार माणसांना कामाला लावाल असे काहीतरी करा. नोकर्‍यांसाठी नवनव्या संधी निर्माण करा. पुण्य देवळात जाऊन नाही तर दुसर्‍याला नोकरीला लावून मिळेल. चार पैसे कमी मिळाले तरी आनंदाचे प्रमाण त्यानुसार बदलत नाही. दोघा तिघांना मी काम देवू केले यातील समाधान शतपटीने मोठे आहे. अर्थात, या समाधानासाठी बिझिनेस करा असे म्हणत नाही मी, पण स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे यातील जादू काही औरच असते.वसंधी रोज आजूबाजूला दिसत असतात. लाजायचे कारण नाही. लोकांशी नीट वागा, त्यांच्या मनाला आनंद द्या, कोणाचे शाप घेऊ नका. मोठेच होत जाल. माणूस जिंकणे हे दहा हजार कोटीची कंपनी उभी करण्यापेक्षा मोठे काम आहे. किती पैसे मिळतात, कशाचे उत्पादन करता किंवा कशाची विक्री करता याला महत्व नाही. स्वतःचे कुटुंब जगवणे आणि इतर एक दोघांना त्यांचे कुटुंब जगवण्यास हातभार लावणे एवढेच ध्येय असले तरी पुरू शकते.

***
प्रतिसाद आणि त्यातील प्रश्नांचे स्वागत आहे. Happy
***
***

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड आवडलेली मुलाखत ! प्रत्येक उत्तरामधुन बरंच काहि शिकण्यासारखं आणि त्याला आपल्यामध्ये भिनवण्यासारखं. अर्थात बेफिकीर यांचे प्रश्नही सुस्पष्ट आहेत.

व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात यावर थोडा फोकस असता तर ते मार्गदर्शन्पर ठरलं असतं. पण तरीही ही मुलाखत खुप काही शिकवुन गेली. धन्यवाद!

>>> फडणीस लोकं असतातच हुशार, वाद नाही त्यात काही <<< अगदि अगदी Happy
उत्कृष्ट व्यक्तिची उत्कृष्टपणे घेतलेली मुलाखत. उत्तरातील बहुतेक सर्वच वाक्ये महत्वपूर्ण Happy

(च्यामारी, आम्हाला पण सातत्याने "डायव्हर्सीफिकेशन" करावे लागले, पण बोम्बलायला ते "नोकरी" या सदरात त्या पुरतेच मर्यादीत राहिले, जन्गजन्ग पछाडूनही व्यवसायात असे उतरताच आल नाही, पण असो. अजुनही वेळ गेलेली नाहीये, अशा मुलाखती उमेद टिकवुन ठेवायला मदत करतात, मार्गदर्शनपरही ठरतात! Happy )

ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद बेफिकीर. नेमके प्रश्न आणि उत्तम शब्दांकन या गोष्टी नजरेत भरण्यासारख्या. फडणीसांना शुभेच्छा. Happy

विनय फडणीसांसाठी प्रश्न-

कनिष्ठवर्गीय / कनिष्ठ मध्यमवर्गासाठी पुण्यासारख्या ठिकाणी घर घेणं अवघड होत चाललं आहे. स्वस्त घरांची योजना याआधी कधी राबवली आहे काय? भविष्यात तसा विचार आहे का? मुळात स्वस्त घरांची कल्पना 'फीजिबल' वाटते का? (उदाहरणादाखल असं म्हणू या, की पुणे महानगरपालिका हद्दीत तीनशे स्क्वेअर फुटांचे घर ६-७ लाखांत, किंवा ५०० स्क्वे.फु.चे घर दहा लाखांच्या आसपास) ती प्रत्यक्षात यावी यासाठी बांधकाम क्षेत्राने काय जबाबदारी घ्यावी, धोरणं ठरवावीत असं तुम्हाला वाटतं?

छान

मुलाखतकारांनी उत्तम मुलाखत घेतली आहे. प्रश्न नेटके आहेत पण उत्तरे खूपच मोठी असल्याने प्रश्न त्रोटक वाटतात. बहुधा बेफिकीर यांनी अंडरप्ले केले असावे. पण एकूण मजा आली.

एका धडाडीच्या व्यवसायिकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. बेफिकीरांनी विचारलेल्या नेमक्या आणि योग्य प्रश्नांना श्री. फडणीसांनी मनमोकळी उत्तरं दिली आहेत. या मुलाखतीतून श्री फडणीसांची ''व्हिजन'' आणि सुस्पष्ट विचारधारा अधोरेखित होते.

उत्तम मुलाखतीबद्दल धन्यवाद. Happy

विनय फडणीस ची आणि माझी ओळख साधारण ८७-८८ च्या सुमारासची असावी. मी बजाज ऑटो मध्ये नोकरी करत होतो. तेव्हा हा गोरा-गोमटा सडपातळ आणि देखणा असा मुलगा चक्क टेम्पररी म्हणून तिथे आला. कायम हसतमुख असणारा, चिकना-चोपडा दिसणारा हा पोरगा "नुसता हिरो आहे.. काही कामाचा नाही" असं आमच्या सिनिअर लोकांनी जाहीर करून टाकले होते. नुसत्या वरवर दिसणाऱ्या गोष्टींनी माणसे कशी चटकन मते बनवतात याचे ते उत्तम उदाहरण होते. काही महिन्यातच बहुतेक तो सोडून गेला किंवा तात्पुरता जॉब असल्यामुळे संपला पण असावा - काही आठवत नाही.
नंतर माझ्या बायकोच्या ऑफिस मध्ये त्याची परत काही वर्षांनी गाठ पडली. ते ऑफिस होते डी.एस.के. यांचे. तिथे असताना त्यांनी प्रचंड कष्ट करून, गोड, नम्र वागण्यामुळे भराभर प्रगती केली. आम्ही इकडे अमेरिकेत आल्यावर संपर्क सुटला. पण अधून मधून त्याच्या प्रगतीच्या बातम्या जुन्या लोकांकडून काळात होत्या. नंतर एकदा त्याचा फोन नंबर मिळाल्यानंतर बायकोनी त्याला फोन लावला. जणू मधला काळ गेलाच नाही आणि काही विशेष घडलेच नाही इतक्या सहज पणे तो बोलत होता. फोन संपल्यावर बायको केवळ थक्क झाली होती. म्हणाली की वाटले नव्हते की विनय ओळखेल, ओळख दाखवेल..एवढा मोठा माणूस झालाय पण आहे तसाच आहे !! प्रत्येक गोष्ट सांगताना , "अग, आता आपण असं केले आहे.. आपण तसे केले आहे.." असं सांगत होता. कुठेही मी माझे असे शब्द नव्हते !! माणूस आतूनच सरळ, साधा आणि सुसंकृत असेल तर असे होऊ शकते अन्यथा पु.लं. नि म्हटल्या प्रमाणे - माणूस अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड होतो हेच बहुतेक वेळा दिसते आणि त्या पार्श्वभूमीवर विनय वेगळा उठून दिसतो. विनय हे नाव खरया अर्थानी शोभून दिसते त्याला !! आम्हाला सर्वांना त्याचा अतिशय अभिमान आहे.

वॉव.. कसली मस्त झाली आहे मुलाखत! पॉझिटीव्हीटी , धडाडी नुसती शब्दाशब्दातून पोचत आहे! बेफिकिर, मुलाखत उत्तम झाली आहे. फडणीसांना सुद्धा खूप धन्यवाद!

खूप छान मुलाखत आहे. माझा एक प्रश्न आहे. नवनवीन क्षेत्र शोधताना दुसर्‍याने शोधलेल्या कि.न्वा सुरु केलेल्या बिझनेस मधे जॉई.न्ट वेन्चर करण्याचा विचार सुद्धा आपण करता का? ह्या स.न्ब.न्धी अधिक बोलण्यासाठी स.न्पर्क करायला तुमचा इमेल मिळेल का? मी हेल्थ्केअर बायोमेडिकल फिल्ड मधे नवीन व्यवसाय सुरु केला आहे.

मुलाखत दात्याचे तसेच मुलाखत कर्त्याचे अभिन्ण्दन
हा एक चांगला पायंडा आहे. यातुन, बरच काही साध्य होऊ शकेल,
एकमेकांचे परिचय सुध्दा वाढतील.

>>माणूस जिंकणे हे दहा हजार कोटीची कंपनी उभी करण्यापेक्षा मोठे काम आहे.

क्या बात है! आवडले... मुलाखतही व फडणीस गृप देखिल.

Pages