चिंटू - प्रिमिअर च्या निमित्ताने

Submitted by कविन on 18 May, 2012 - 02:51

"ए आई, गोष्ट सांग ना!"

"बरं कोणती सांगू? इसापनीतीतली सांगू की बिरबलाची सांगू?"

"ऊऽम्म! नक्कोत त्या. तू मस्त पैकी छाऽऽन गोष्ट सांग. त्यात मी असेन, माझे सग्गळे मित्र मैत्रिणी असतील., परी असेल, फुलपाखरु असेल..." स्वप्नांच्या राज्यात हरवुन गेलेले दोन डोळे मला सांगत असतात.

आणि रोज रोज नविन नविन त्याही तिच्या अटी रुची मधे बसणार्‍या गोष्टी आणायच्या तरी कुठून ह्या प्रश्नाने मला घेरलेलं असतं.

एखाद्या चोखंदळ खाद्यप्रेमीच्या जिभेचे चोचले पुरवणं जमेल एकवेळ किंवा एखाद्या खडूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या समिक्षकालाही खुष करणं सोप्प असेल एकवेळ पण बच्चेकंपनीला एका जागी दिड एक तास खिळवून ठेवणं महाकठीण. त्यांचे आवडी निवडीचे निकष हे आपल्या मोठ्यांच्या निकषांपेक्षा पार वेगळे असतात.

इथे "चिंटू" ने सगळ्या बाळगोपाळांच्या ह्या अपेक्षा १००% पुर्ण केल्यात. तुम्ही आम्ही म्हणू चिंटूचा शेवट पारच पटकन केलाय, काही गोष्टींना आपण म्हणजे आपलं वय म्हणेल ह्या काहितरीच हेss खोट वाटतं ह"

पण छ्छे ८-९ वर्षाच्या पिल्लुला विचारा, उत्तर येईल "अग्ग! आऽई ती गोऽऽष्ट आहे. त्यात खोट्ट् खोट्टच दाखवतात. अस्सच असतं.." की आपली बोलती बंद. त्यांना माहित असतं ते खोटं आहे पण ते बघतानाचा त्यांचा आनंद एकदम खरा असतो.

कालच बघितलं ना माझ्या लेकीला, संपुर्ण सिनेमा संपेपर्यंत कधी खुदुखुदु, कधी हुहुहुहु करत तर कधी गालातल्या गालात मिश्कील हसत त्या चिंटूच्या गोष्टीत इन्व्हॉल्व होताना.

सिनेमातल्या चिंटूचे बाबा त्याला हात धुवून यायला सांगतात, तो ऐकत नाही तेव्हा आकडे म्हणायला सुरुवात करतात तेव्हा तर लेकीने माझ्याकडे अस्सं बघितलं "असे कसे सगळेच आई बाबा सारखे?" वाला प्रश्न डोळ्यात स्पष्ट दिसत होता मला तिच्या. अशा नजरेने माझ्याकडे बघायचे क्षण तिला सिनेमाभर बर्‍याच वेळा मिळाले. Proud सिनेमातले हे सिन्स, संवाद माझ्या घरात घडणारेच वाटले. म्हणूनही चिंटू तिला एकदम जवळचा वाटला आणि हो मलाही.

मलाही चिंटूने नॉस्टालजीक केलं. आम्ही कशा कैर्‍या तोडायचो, मग आठवले आजी आम्हाला ओरडायला लागल्या की कसा सुंबाल्या ठोकायचो. आई पर्यंत तक्रार येणार नाही ह्याची तजवीज कशी करुन ठेवायचो. त्या आठवले आजींच्या दाराला कडी लावून यायची काय पैज लावायचो आणि मग नंतरचा त्यांचा रुद्रावतार वर गच्चीत बसुन गुपचुप एन्जॉय करायचो. सगळच आठवलं. माझं बालपण पुन्हा एकदा फिरुन यायची संधी मला चिंटूने दिली.

एकुणात काय बच्चेकंपनीसाठी अगदी त्यांच्याच वयाचा विचार करुन त्यांना आवडेल, गंमत वाटेल असाच बनवलाय हा चिंटू. लहान मुलं असतील घरी तर त्यांचं असं मनापासुन समरस होऊन सिनेमाचा आनंद घेण्यातलं सुख अनुभवायला तरी नक्कीच बघा हा सिनेमा.

पात्र निवडी बद्दल काय बोलू? निवडीला अगदी १०१ मार्क. चिंटू तर चिंटू वाटतोच फक्त त्याचा वीग सोडून (मला ओरिजीनल कलाकार जसा आहे तसाच आवडला असता खर तर चिंटू म्हणून्) बाकी बगळ्या, राजु सगळेच जसे आपण सकाळ मधे बघत आलोय अगदी तस्सेच तिथूनच उठून इकडे आल्यासारखे वाटतात. मिनीची निवड तर आवडेशच एकदम. मिनी फक्त तश्शीच बोलू शकते दुसर्‍या पद्धतीने नाही इतकी ती मिनी, मिनी वाटते.

आणि हो ती वानरवेडे वॉरिअर्स, विंचू वॉरिअर्स ही नावं तर एकदम बच्चेकंपनीच्या पसंतीची.

------------

प्रिमिअर बघायची संधी माबोमुळे मिळाली. मा_प्रा धन्यवाद. एक संध्याकाळ अविस्मरणीय केलीत तुम्ही आमची.

आणि हो माबोचा लोगो फार ठ्सठशीत पणे दिसला पडद्यावर. फार मस्त वाटलं लोगो तिथे बघुन.

मधे मधे वॉश ची जाहिरात दाखवलेय म्हणजे पुर्वी मध्यंतरात जाहिरात दाखवायचे तसं न करता सिनेमाभर ही प्रोडक्टस दाखवत त्यांनी हात धुवा असा संदेश मधुनच देत जाहिरात दारांना खुष केलय. Proud पण ते असो Proud तसही आजकाल आमच्या घरीही ऐकु यायला लागल्यात अशाच जाहिराती अधुन मधुन Proud बेसिनचा नळ पण फार काळ चालू ठेवलाय हात धुताना पण ते ही असोच. चिंटूची आई गेली असती आत तर कदाचित ओरडली असती त्याला आणि त्याच्या बाबालाही ह्यावरुन Proud

एकंदरीत हा चिंटू माझ्या घरच्या चिंटीला फारच आवडला.

हा आमचा चिंटूचा पास

Resize of pass 2.jpgResize of pass 1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढी उत्कंठा लागलीय.>>> उत्कंठा वाढणे हाच तर मुळ हेतू आहे Wink सविस्तर वाचू नकाच सविस्तर काय ते जाऊन बघाच पण ८-१२ वर्ष वयाच्या मुलाचा चष्मा/कॉन्टॅक्ट लेन्स लावुन जा Happy आपल्या मोठ्यांच्या नजरेला खटकणार्‍या गोष्टी लवकर दिसतात आणि त्यांच्या नजरेला त्यातल्या गमती लवकर दिसतात. त्यांच्यासाठीचा सिनेमा आहे तेव्हा त्यांच्यातले एक होऊन बघितला तर त्यातली गंमत जास्त खुलते Happy

मोनाली रविवारी माहेरपणाला ये आणि पुजाला बघ शो. हाकानाका Proud ठाण्यात मल्टीप्लेक्स मधे १ चं तिकिट काढशील तेव्हढ्याच पैशात पुजाला दोघ बघाल Wink

चित्रपट नाही पाहिला अजून. पण तूनळीवर प्रोमो, ऑफिशियल वेबसाईट पाहिली. क्षमस्व पण आजिबात आवडला नाही. Sad
चिंटू हे आपल्या अनेकांचं दैवत आहे. त्यावर चित्रपट निघतोय ही भावनाच खूप भीतीदायक होती. कारण चित्रपट म्हणलं की नको तो मालमसाला आलाच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रं कोण?? आणि हीच भीती खरी मोठी आहे. चिंटूचं पात्र जरा जास्त मोठं नाही वाटतं?? मिनी चुणचुणीत, हुशार कदाचित प्रसंगातून दाखवली असेल पण काम करणारी मुलगी मला नाही आवडली. नेहा गोड आहे. बगळ्या, राजू, पप्पू ठीक. मेकअप जरा भयानकच आहे.
चिंटूची आई चित्रांमधे किती सुंदर आणि छान दाखवतात. टिपीकल मध्यमवर्गीय पण टापटीपीतली असते. विभावरीचा अभिनय चांगलाय पण चिंटूची आई म्हणून मी स्वीकारू शकत नाहीये तिला. का कुणास ठाऊक!!
आता पर्यन्त तरी मला सुबोध भावे - चिंटूच्या बाबाच्या रुपात परफेक्ट वाटतोय. बाकीच्या पात्रांचं फार काही पटलं नाही. Sad अर्थात बाकीची सिनीअर मंडळी काम चांगलच करतात. तेव्हा तो प्रश्ण नाही.
सलील-संदीप संगीत म्हणजे काय सगळा आनंदच आहे. Light 1
जरा जास्तच निगेटिव्ह लिहिलयं पण काय करु चिंटूचं मनावर अधिराज्यच तसं आहे.

मला हा चित्रपट अ‍ॅनिमेटेड स्वरूपात पाहायला जास्त आवडला असता. चिंटू जसा व्यंगचित्रात दिसतो, तसाच ह्यात दिसला असता. त्याला असं खर्‍या स्वरूपात आणलेलं पाहायला मला नाही आवडणार.

मला पण त्या विभावरीला चिंटू ची आई म्हणून पाहील्यावर धक्काच बसला. एखादा नवीन प्रसन्न चेहेरा घ्यायला हवा होता... छोटीशी, हसरी, मिश्कील अशी तरुण बाई हवी होती. ही विभावरी बरीच मोठी आहे त्या रोलसाठी असं मला वाटतं, निदान दिसते तरी मोठी, प्रौढ, सिरीयस.

मला तर वाटतंय की कास्टींग ३ वर्षांपूर्वीच केलं असेल जेव्हा ही मुलं अन त्यांचे आई-बाबा खरंच लहान होते. Lol अन आता शूटींग अन पुढचे सोपस्कार होईतो ते सगळे थोराड दिसताहेत भूमिकांसाठी. Wink Light 1

मला तर वाटतंय की कास्टींग ३ वर्षांपूर्वीच केलं असेल जेव्हा ही मुलं अन त्यांचे आई-बाबा खरंच लहान होते. अन आता शूटींग अन पुढचे सोपस्कार होईतो ते सगळे थोराड दिसताहेत भूमिकांसाठी. >:D

चित्रपट मोठ्यांना ही आवडण्यासारखा असणार.. Happy
पण हो खरच.. आई म्हणून त्या चित्रातल्यासारखी दिसणारी दीप्ती भागवत कदाचित छान दिसली असती..

मुळात चिंटुच आपल्या भेटीच माध्यम बदलले आहे.... आणि बदललेल्या माध्यमात चिंटु जास्त प्रभावशाली नाहि आहे....

मा बो मुळे चिंटूचा प्रयोग बघण्याची संधी मिळाली. सगळ्या बाल कलाकारांच्य उपस्थितीत सिमेमा बघण्याची मजा वेगळीच. त्यामुळे लेकी एवढीच मी ही उत्सुक होते चित्रपट पहायला.
माझ्या लेकीला ही सिनेमा प्रचंड आवडला. तिला सगळ्यात आवडलेल्या दोन गोष्ट म्हणजे चित्रपटातला चिंटू रोज भेटतो तसाच आहे विग सोडला तर आणि (मुख्य म्हणजे कुठेही उपदेशाचे डोस नाहीयेत. मुलांनी कस वागाव, कस वागू नये ई ई Proud )
चित्रपटात कुठेही उगीचच भावभावनांचे कल्लोळ, रडारड हाणामार्‍या, संवाद,मोठ्यांचा आव आणून वागणारी , बोलणारी मुल, भडक वेशभुषा, केशभुषा कुठेही नाही. जे हल्ली घरच्या आणि दारच्या रिअ‍ॅलिटी शो मधे सगळीकडेच सतत बघायला मिळतं. पूर्णपणे लहान मुलांचा चित्रपट आहे. चित्रपटात लहान मुलांचा निरागसपणा जपलाय . सगळ्या छोट्या मुलांनी इतक्या आत्मविश्वासाने काम केलीयेत की अगदी थक्क व्हायला होत. अगदी मोठ्या कलाकारांच्या तोडीस तोड. मिनी तर एकदम जबरी गोड. जोशी काकु अगदी जशा रोज बघतो तश्शाच आहेत. दिलिप प्रभावळकरांनी छोट्याशा भुमिकेत एकदम धमाल आणलीय. राजू,पप्पू, बगळ्या, नेहा सगळीच एकदम सुपर डुपर
संदीप खरेची बालगीत एकदम मस्त.

तिथे ही सगळी बच्चे कं आपला स्टारपणा विसरून धम्म्माल करत होती.
वानरवेडे आणि विंचू बायटर्स नाव एकदम भारी. फक्त विंचू बायटर्सना सारख युनीफॉर्म मधे का दाखवलय ते कळल नाही.

पण चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही, लहान मुलांच्या नजरेतून बघीतला तर अजुनच धम्माल येइल.

सगळ्या लहान मुलांनी आवर्जून बघावा आणि सगळ्या मोठ्यांनी बच्चे कं ला आवर्जून दाखवावा असा चित्रपट

मला सगळ्यात 'एकटी एकटी घाबरलीस ना आई' गाणं आणि त्यात दाखवलेला चिंटूचा निरागसपणा अतिशयच आवडला.
सगळ्या चिंटू-गँग चं मूलपण इतकं कमालीचं जपलंय की इतका अस्सल बालचित्रपट मी अनेक वर्षांत पाहिला नव्हता. त्यामानाने सकाळ मधल्या चित्रमालिकेत आई-बाबा, आजी-आजोबा, जोशी काकू या पात्रांना जेवढं फूटेज आहे तेवढं चित्रपटात नाही पण.... मुलांना सगळं आवडून जातं हीच त्या चित्रपटाची जमेची बाजू आहे. नाहीतर मी आणि लली एकदा हट्टाने आमच्या पोरांना 'दुर्गा झाली गौरी' नाटक बघायला घेऊन गेलो होतो तर आम्हीच जास्त रमलो आणि पोरं बाहेर येऊन आम्हाला म्हणाली की कसलं पकाऊ नाटकाला आम्हाला घेऊन आलात, बोअर झालं जाम Sad
वास्तविक, दुझागौ मधेही मुलांना आवडेल आणि शिकवण मिळेल असंच कथानक आहे पण मुलं जर रिलेट करू शकली नाहीत तर कंटाळतात. एक्झॅक्टली हाच मुद्दा दिग्दर्शकाने आणि पटकथाकाराने अगदी कसोशीने पाळला आहे. टेकिंग मधला फ्रेशनेस तसूभरही कमी होत नाही शेवटपर्यंत त्यामुळेच मुलं थिएटर मधे जाम एंजॉय करतात हा चिंटू. Happy

बाकी, चिंटूच्या आईची भूमिका केलेल्या विभाला टिपिकल साडीत दाखवण्याऐवजी पंजाबी ड्रेस मधे दाखवले असते तरी चालले असते कारण आता खुद्द प्र.वा./चा.प. या चिंटूकारांनी अनेक दिवसांपूर्वी आपल्या चित्रमालिकेतही चिंटूच्या आईला काळानुरूप पंजाबी ड्रेस मधे आणले आहेच. Happy

माझ्या भाच्यांना ( ५ वर्ष आणि ८ वर्ष) लय म्हणजे लयच आवडला.

>>आणि हो ती वानरवेडे वॉरिअर्स, विंचू वॉरिअर्स
+ २

"अरे काका.. अप्रतिम म्हणजे अप्रतिमच आहे बघ. तू बघच चिंटू. आपण जाऊया का?? "

लेकीला आवडेल असं दिसतयं!
तिला चिंटु पुस्तकातुन माहीत आहे. सिडी उपलब्ध आहे का?

धन्यवाद कविन. चांगलं लिहील आहेस! Happy

वरती आगाउपणाने दिलेली पोस्त संपादित केली आहे.. Blush
मी अजून चित्रपट पहिला नाही पण त्याच्यातला dragon माझ्या आत्तेबहिणी ने केला आहे.. Happy

आज लेकीसोबत हा चित्रपट पाहिला. ती पहिल्यांदाच थिएटरमधे गेली आणि पहिल्यांदाच सिनेमाही पाहीला. ( या आधी घरी फक्त निमो, अ‍ॅलिस आणि लायन किंग हे अ‍ॅनिमेशनपट पाहिलेत.) त्यामुळे ती फारच एक्सायटेड होती.
त्यात नुकतच चिंटू भाग १ वाचुन झालय. त्यामुळे उत्सुकताही होती.
तीला चित्रपट खुप आवडलाच. पण तीला बंटीही हवा होता. तो दिसला नाही. ( मधे एक दोन मिनीट एक कुत्रा दिसला तोच बंटी का? पण तोही फार कमी वेळ होता. )
मला चित्रपट आवडला. लहान मुलांसारखे होऊन पाहिल्यास मस्तच वाटला.

न आवडलेल्या गोष्टी
- विग. चिंटू किंवा इतर कोणाचेच विग आवडले नाही. बाबांचे मानेवर येणारे केससुद्धा पटले नाहीत.
- चिंटूची आई फार मोठी वाटली. ती अजुन लहान आणि थोडी मिश्किल / खोडकर हवी होती.
- कर्नल साहेबांचे रायफल घेऊन जाणेही पटले नाही. नुसते काठी वगरे चालले असते ना..
- सर्वात वाईट वाटले ते - नेहा आणि मिनीला चिअरगर्लच्या पोषाखात पाहुन. त्यातही त्या एकदा म्हणतात कि आम्हालापण खेळायला घ्या. पुढच्या प्रसंगात त्यांना खेळताना दाखवायला हवे होते. कुठलाही संदेश द्यायचा नसला तरी मुली खेळणार नाहीत किंवा मुली = चिअरगर्ल असा काहीसा मुलांचा ( आणि मुलींचाही ) समज आपोआप होऊ शकतो ( कंडीशनिंग Proud )
(लेकीला क्रिकेट, चिअरगर्ल याबद्दल माहित नाही त्यामुळे तीला ते कळलेच नाही. पण इथल्या सर्व मुलांना माहीत आहेच. )

खूपच छान. पण आम्हाला हि चित्रपट कधी बघायला मिळणार कुणास ठाऊक? कमीत कमी १`वर्षाने तरी नवीन मराठी चित्रपटाच्या सीडी निघाव्यात.माझ्या मुलालाही चिंटू खूप आवडतो. सगळी पुस्तके आहेत. सीडी मिळाली तर बरे होईल.

माझी मुलगी अजीबात रीलेट नाही करु शकली. कारणं
१. इंग्रजी माध्यमा मुळे मुळातच मराठी भाषेतल्या गमती कमी कळतात
२. आजुबाजुला बिल्डींग मध्ये सगळे अ मराठी असल्याने बोलायची भाषा हिंदी आणि इंग्लीश
३. आम्ही सकाळ घेत नाही, त्या मुळे आमच्या घरात मुळात चींटु लोकप्रिय नाही

मुलगी वय ११. त्यामुळे अर्धवट वय. लहानमुलांचे सगळे चित्रपट ती नेहेमी बघते. मराठी बालनाट्यांत तिने २ वर्ष काम ही केलेली आहेत. नाटक मात्र अगदी आवडीने पहाते.
इंग्लीश, हिंदी, मराठी अश्या सगळ्या लहान मुलांच्या सीनेमांना आम्ही जातो. पण ह्या सीनेमाशी का माहित नाही पण ती रीलेटच नाही झाली.

मी बघीतलेला नाही, त्या मुळे सांगु शकत नाही. मुळात मलाच पेपर मधली कार्टुन्स आवडत नाहीत वाचायला. विनोद आवडतो पण कार्टुन्स मात्र नाही आवडत.