बोलता - बोलता

Submitted by कौतुक शिरोडकर on 17 April, 2012 - 10:32

"तर मि. भालेराव, तुम्ही ३ दिवसापुर्वी दिल्लीला गेला होता."
"हो. मी अधूनमधून आमच्या दिल्ली ब्रांचला जात असतो."
"तुमच्या घरात घडला प्रकार हवालदार चौगुलेनी फोन केल्यावर तुम्हाला कळला. बरोबर "
"हो."
"तुम्ही दिल्लीला जाणार.... हे तुमच्या घरच्याव्यतिरिक्त अजून किती जणांना माहीत होतं ?"
"ऑफिसमधे आणि घरात श्यामलला. बाकी कोणाला काहीच कल्पना नव्हती."
"तुमच्या बिल्डींगमधे ? "
"नाही. कुणालाच नाही. हं... कदाचित आमच्या शेजारच्या शाह फॅमिलीला. त्यांची आणि आमची गॅलरी लागून आहे. श्यामल बोलली असेल तरच."
"तुम्ही कुठल्या शेजार्‍याला बोलला होता का काही ?"
"नाही. पण मी दिल्लीला येत जात असतो ते बहुतेकांना माहीत आहे. सोसायटी मिटींगमधे कधी तरी विषय निघायचाच."
"ते तर होणारच. तुम्ही निघालात त्या दिवशी कोणाशी या बाबतीत बोलणं झाल्याच काही आठवतयं ?
"नाही. पहाटेची फ्लाईट होती. त्यामुळे मी गेलो तेव्हा कोणाला भेटण्याची शक्यता नव्हतीच."
"बरं वॉचमन ? "
"नाही. त्याला कोण कशाला सांगणार ?"
"सांगायला कशाला कोण जातोय ? पण ऐकण्याची शक्यता आहे ना ? तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑफिसात बोलत असताना किंवा तुमच्या मिसेस शेजारच्या शाह फॅमिलीशी बोलत असताना... शक्य आहे ना ?"
"हो. शक्य आहे."
"ठिक आहे. वॉचमनला विचारूच आम्ही. तूम्ही अधूनमधून टूरवर जात असता म्हणजे वॉचमनला त्याची कल्पना असणारच. नाव काय तुमच्या वॉचमनच ?"
"माहीत नाही."
"माहीत नाही ? तुमच्या बिल्डींगच्या वॉचमनचं नाव तुम्हाला माहीत असायला पाहीजे की नाही ? "
"हो.. पण ते नेहमी बदलत असतात. त्यामुळे..."
"तस पण वॉचमनला नावाने हाक मारतोच कोण ? तो फक्त वॉचमन. जसा दुधवाला, पेपरवाला तसं. नाही का ? "
"हो."
"बरं. तुमचा कुणावर संशय ? "
"नाही."
"बघा जरा विचार करून. कुणाशी भांडण तंटा ? दुश्मनी वगैरे ? "
"नाही तस काहीच नाही."
"ठिक आहे. ओ.. जगदाळे, इकडे या जरा."
"आलो साहेब."
"तर मि. भालेराव, गेल्या तीन दिवसातल्या तुमच्या सगळ्या हालचालींचा लेखाजोखा तुम्ही जगदाळेंना द्या. शिवाय तुमच्या घरातून चोरीला गेलेल्या मुद्देमालाची यादी तयार केलीय. केलीय ना जगदाळे ?
"केलीय साहेब."
"ती पण एकदा तपासून घ्या. जगदाळे, यांच स्टेटमेंट घ्या. त्याच्या मोबाईल आणि लॅन्डलाईनचे डिटेल्स मागवुन घ्या. यांच्या मिसेसच्या मोबाईलचे पण गेल्या तीन दिवसातले डिटेल्स मागवा. आणि त्या वॉचमनला पाठवा माझ्याकडं. या तुम्ही मि. भालेराव."

"शिर्केसाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळा तपशील तुमच्या जगदाळेंना दिला आहे."
"तुम्हाला त्रास दिला. पण काय आहे ना, ड्युटी आहे. आणि शेवटी हे सगळं तुमच्यासाठीच. नाही का ?"
"साब... साब.. इनको बोलो ना साब. हमने कुछ नई किया. उस रातको तो हमारा ड्युटीभी नही था. हम गरीब आदमी है साब. हमारा इसमे कुछ लेना-देना नई है साब."
"ये टरमाळ्या, गप उभा रहा तिकडं. तू काय केलं नाय ना ? मग बोंब कशाला मारतोयस ? गप बस तिकडं."
"मी निघू सर ?"
"थँक्यू मि. भालेराव, गरज लागली तर तुम्हाला पुन्हा बोलवूच. तुम्ही असाल ना इथेच ? "
"हो आहे मी. आता कुठे जायची इच्छा पण नाही."
"मी समजू शकतो मि. भालेराव. तुमच्या मिसेसच्या खुन्यांना आम्ही लवकरच मुद्देमालासकट अटक करू."
"तिला न मारता सुद्धा ते चोरी करू शकले असते ना सर ?"
"हो. पण कस आहे ना, सगळ्या घरफोड्यांची वेगवेगळी स्टाईल असत. कुणी फक्त मारझोड करून चोर्‍या करतात तर कुणी खून पाडून. ते ऐकलं असेल ना तुम्ही ? ओळखीचा चोर जीवे न सोडी."
"म्हणजे?"
"म्हणजे चोर कुणीही असू शकतो. बाहेरचा किंवा घरचा पण. या तुम्ही."
"थॅक्यू शिर्केसाहेब."
"जगदाळे, त्या दुसर्‍या वॉचमनला आत घ्या जरा."

"काय रे काय म्हणताहेत पोलिस ? "
"नेहमीचच. एखाद्याच्या बायकोचा खून झाला तर संशयाची पहिली सूई तिच्या नवर्‍यावरच."
"काय सांगतोस ? तुला काही बोलले का ते स्पष्टपणे ?"
"नाही. पण सगळे इशारे त्याच दिशेला होते."
"आता ? "
"आता काही नाही. आलिया भोगासी..."

"जगदाळे, तो भालेराव ज्या दिवशी दिल्लीला गेला त्या दिवशी ड्युटीवर असलेला वॉचमन गायबलाय. बाकीच्यांची खरडपट्टी झालीय. ते क्लियर वाटताहेत. त्या गायब वॉचमनची कुंडली शोधा जरा. सिंग सेक्युरीटी सर्विसेसकडून त्याची फाईल मागवून घ्या आणि त्या सिंगला म्हणावं, दोन दिवसात त्या रामसहाय यादवला शोधून आण, नाहीतर त्याच्या लाईसन्सची सुरळी घालतो म्हणाव त्याच्या घशात. त्या भालेरावाचे डिटेल्स चेक करून बघा."
"मला तो माणूस ठिक वाटतोय साहेब."
"आपल्या सल्ल्याबद्दल मंडळ आभारी आहे. आता जरा आमच्या सुचनांकडं लक्ष द्या. आपल्या खबर्‍यांना लाथा घालून उठवा. तंगड्या पसरून झोपलेत लेकाचे. आणि ती घरफोड्यांच्या रेकॉर्डची फाईल कुठाय ?"
"तासाभरात देतो साहेब. तोपर्यंत तुम्ही कॉम्पुटरवर बघा ना साहेब. सगळे रेकॉर्ड आहेत त्यात."
"जगदळे, तरी फाईल मला पायजेच. कळलं ?"

"टिव्ही बघून हे साले चोरपण हुशार व्हायला लागलेत. फिंगरप्रिन्टसचा पत्ता नाही. कुत्रं पण अर्ध्या वाटेवर रेंगाळलं. दार फार सफाईने खोललय. आतली सिंगल कडी एका धक्क्यात उघडलीय. गडी दमदार असणार. एकुण दोघं जण असणार अस दिसतय. दोघे घरात उचकाउचकी करताना बाईला जाग आली असेल. ती बोंबलू नये म्हणून तिला आडवी केली असेल. शेजार्‍यांना साधी किंकाळीपण ऐकू आली नाही. हे नवख्यांच काम नाही आणि घरच्यांच पण. जगदाळे, या दहा जणांना बघा जरा. पत्ता लावा मंडळींचा."
"करतो साहेब."
"जगदाळे, जरा त्या भालेरावच्या शेजारी आणि ऑफिसात एक चक्कर मारून या. बघा तरी बेणं आहे कसं ? "
"करतो साहेब."

"कबुतराची जोडी. साधं बाजाराला जायचं तर ते पण जोडीनं. सुट्टीच्या दिवशी तर कुठं कुठं भटकायला जायचे दोघं. एकच प्रोब्लेम होता त्यांना."
"कोणता ?"
"पोर बाळं नव्हत काही. "
"दिड वर्षच झाल होत ना लग्नाला ?"
"म्हणून काय झालं ? इथे साडेआठ महिन्यात होतात पोरं. पण हे हल्लीच्या पोरींच सगळ विचित्रच. फिगर सांभाळायची जास्त काळजी. पोरांचा त्रास काढायला नको. पण हे बोलणार नाही कधी ? सगळं बिल प्लानिंगच्या नावावर."
"म्हणजे एकंदरीत सगळं छान चालल होतं दोघांच ? "
"बेस्ट."

"किती वर्षे ओ़ळखताय तुम्ही मि. भालेरावांना ? "
"गेली चार वर्षे. तो इथे जॉईन झाल्यापासून."
"तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल ?"
"यंग आहे. डॅशिंग आहे. कामाला वाघ आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून हसून खेळून राहतो. अजातशत्रू म्हणा हव तर. "
"अजातशत्रू... ? ह्म्म.. संत तुकोबारायासुद्धा अजातशत्रू नव्हते. ..... त्याचे आणि त्याच्या मिसेसचे संबंध कसे होते ? "
"त्याबद्दल मला फार काही कल्पना नाही. एक दोनदा ती इथे ऑफिसला आली होती. त्यावर काही प्रोब्लेम झाल्याचं मला तरी आठवत नाही. तीन महिन्यापुर्वी मी त्यांना गेटवे ऑफ ईंडियाला पाहीलं होतं. टिपिकल कपल्स वागतात तसेच वागत होते दोघे."
"ऑफिसमधल्या लेडी स्टाफबरोबर त्याच वागणं कस आहे ? "
"म्हणजे ? "
"म्हणजे... म्हणजे तो नेमका कसा वागतो ? फ्रेंडली कि फ्लर्टींग की ...कळल का तुम्हाला ? "
"फ्रेंडली. जेवढ्यास तेवढं."
"ओके."

"मिसेस. दळवी, तुमचं काय मत आहे भालेरावांबद्दल ? "
"सकाळपासून तुम्ही रोहीतची चौकशी करताय. तुमचा त्याच्यावर संशय आहे की काय ? "
"फार हुशार आहात तुम्ही. संशय तर माझा तुमच्यावर पण आहे."
"माझ्यावर ? मी कशाला मारु तिला ? "
"मग कोणी मारलं असेल असं तुम्हाला वाटते ?"
"मला काय माहीत ?"
"भालेरावने ? "
"तो कशाला मारेल ? सारखा तर तिच्यामागे गोंडा घोळत असायचा तो. सारखा आपला फोनवर. काय तर म्हणे.. आता ऑफिसात पोहोचलो.. आता चहा घेतला. आता जेवतोय... आता काम करतोय. आता निघतोय. सारखं आपलं रिपोर्टींग."
"अजून कोणाला करायचा तो रिपोर्टींग ? "
"देशमुख साहेबांना."
"साहेबांच नाही विचारत मी. इतर कोणी होतं का रिपोर्टींग करण्याजोगं ? "
"म्हणजे अफेयर म्हणताय का तुम्ही ? "
"थोडंफार तसच. "
"नाही माहीत. रिनाला विचारा. तिला माहीत असेल कदाचित."
"रिनाला ? ती खास मैत्रीण आहे का त्याची ?"
"मैत्रीण कसली ? टेलीफोन ऑपरेटर आहे ती. चोरून ऐकायची हौस आहे तिला."
"अस्स."

"बोला जगदाळे, काय बातमी ? "
"साहेब, खबर्‍यांना लावलय कामाला. काही ना काही कळेलच. तुम्ही दिलेल्या लिस्टमधल्या पाच टोळ्या सध्या आत आहेत. दोन मोडल्यात. तीन अजून बाकी आहेत. त्यांना उचलायला सांगितलय. रामसहाय यादवला मुलगा झाला म्हणून तो गावी गेलाय. पण सिंगला तंबी दिलीय त्याला हजर करण्यासाठी. भालेरावचं दिल्लीतलं रुटीन चेक केलय. सगळं परफेक्ट आहे. सगळे फोन रेकॉर्ड तपासलेत. संशयास्पद असं काही नाही."
"त्याच्या मोबाईलमधला एखादा रिपिटेड नंबर ?"
"ठराविक नंबर आहेत. त्यातले तीन ऑफिस कलिग, एक वडिलांचा, एक मोठ्या भावाचा, दोन जुने मित्र आणि दोन मैत्रिणींचे."
"काय करतात या मैत्रीणी ? "
"एकीचं लग्न झालय आणि एक अविवाहीत आहे आणि फोरेन बॅकेत जॉब करतेय."
"तिची माहीती काढा जरा."
"अजून एक संशयास्पद गोष्ट कळलीय."
"काय ?"
"दिल्लीला जायच्या आधी सलग चार दिवस रोहीत त्याच्या वेगवेगळ्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या बारमधे बियर प्यायला गेला होता."
"यात संशयास्पद काय आहे ?"
"साहेब, दारू मीपण पितो. पण आमचे बार ठरलेले असतात आणि मित्रपण. वेगवेगळ्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या बारमधे प्यायला जाणं मला काही झेपलं नाही. तेही टुकार बारमधे."
"जगदाळे, थोडं अजून विस्ताराने सांगाल का ? "
"भालेराव राहतो अंधेरीत. पण तो प्यायला बसतो सांताक्रुझच्या दिपा बारमध्ये. त्याचा मित्र राहायला लालबागला. नंतर तो प्यायला बसतो जोगेश्वरीच्या शगूनमध्ये. मित्र राहतो मीरारोडला. तिसरी बैठक खारच्या साईलीलामधे. मित्र राहायला बोरीवलीला. बारची आणि मित्रांची निवड रोहीतची. हे सगळे बार स्वस्त टायपातले."
"ओह. इंटरेस्टीग. जगदाळे, हुश्शार झाला तुम्ही. हे सगळं कळलं कुठुन ?"
"ऑफिसची टेलीफोन ओपरेटर रिना. हल्ली सगळे मित्रांना कॉन्टॅक्ट करायला मोबाईल वापरतात. पण त्याने बहुतेक वेळा मित्रांना ऑफिसच्या लॅन्डलाईनवरून फोन केलाय. तोही ऑपरेटरकरवी. तिला चोरून ऐकायची हौस आहे."
"जरा चेक करा की. हे ह्याच वेळेला केलय की प्रत्येक टुरच्या आधी ? "
"करतो साहेब. तेवढं एक सोडलं तर बाकी सगळ आलबेल आहे. भालेरावचं फेसबुक अकाऊंट चेक केलय. त्यात विशेष काही नाही. चोरीचा पंचनामा केला होता तेव्हाही त्याच्या घरात विशेष असं काही आढळलं नव्हतं."
"तरीही मला त्याच्यावर संशय आहे जगदाळे."

"बियर पिणे हा गुन्हा आहे का ?"
"अजिबात नाही. हवी तेवढी प्या. फक्त एक प्रश्न. प्रत्येक टूरच्या आधी वेगवेगळ्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या टुकार बारमधे जायचं कारण ?"
"मी बियर पिणार नाही अशी श्यामलची शपथ घेतली होती. त्यामुळे शक्य तो अशा बारमधे जायचो जिथे आमच्या ओळखीच्या माणसांपैकी कुणी पाहणार नाही."
"अस्स आहे होय."
"माझ्या घरात घरफोडी झाली तेव्हा मी इथे नव्हतो हे तुम्हाला माहीत आहेच. पण मीच श्यामलचा खुनी आहे या एकाच दिशेने तपास चाललाय तुमचा. तुम्हाला एवढीच खात्री असेल तर टाका मला आत."
"इतकी का घाई करताय मि. भालेराव. पुरावे तरी गोळा करू द्या आम्हाला. तुमचं एरेंज मॅरेज. तुमच्या आईने ठरवलेलं. तुमचं प्रेम मात्र नेहा कामतवर. ओएमेन बँकेतली डेपुटी मॅनेजर. श्यामलची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा जास्त उत्तम. तिच्यानंतर तिच्या वाटणीचे वारस तुम्हीच. त्यामुळे श्यामलच्या मरणाचा तस बघायला गेलं तर सर्वात जास्त फायदा तुमचाच."
"ओह... सॉलिड तपास केलाय तुम्ही. पण इतकी मेहनत करण्याएवजी जर सरळ विचारलं असतं तर मीच सांगितलं असतं. हे खरं आहे की माझं नेहावर प्रेम होत आणि आजही आहे. आईमुळे मला श्यामलशी लग्न करावं लागलं. पण मी श्यामलपासून काहीही लपवलं नव्हतं. पण हे सिद्ध करायला आता श्यामल इथे नाही."
"जे सिद्ध करायचं आहे ते मी करेन. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा."
"माझ्या मागे लागण्याएवजी तुम्ही ते घरफोडे शोधायला मेहनत केली तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल. पण ते घरफोडे तुम्हाला सापडत नाहीत म्हणून तुम्ही मला बळीचा बकरा बनवू पाहताय. तुम्हाला झेपत नसेल तर सरळ सांगा तसं. ही केस सीआयडीकडे देण्याची मागणी करेन मी."
"घाई नको मि. भालेराव. धीर धरा आणि शांत रहा. आम्हाला काय झेपतं आणि काय नाही.. हे तुम्हाला झेपणार नाही. या तुम्ही."

"साहेब, इस्माईल बोलतोय."
"बोल."
"वर्धमान ज्वेलर्सकडे एक डील झालीय."
"कुठाय तो ?"
"दहिसर. कांदळपाडा. मॅकडोनाल्डच्या पुढे"

"हे बघ नेहा, काही दिवस न भेटलेलं उत्तम."
"अरे पण ...?"
"प्लीज..... ! तो इन्स्पे शिर्के, श्यामलच्या खुनाचा संशय माझ्यावर घेतोय. तुझ्यासाठी मी तिचा खून केलाय असं त्याला वाटतं."
"मुर्ख आहे तो. आपल्या भुतकाळाचा या सगळ्याशी संबंध लावून काय मिळणार आहे त्याला ?"
"हे त्या इन्स्पेक्टरला कोण समजवणार ? तो तर ज्याला त्याला संशयानेच बघत असतो."
"मग आता काय करायचं ?"
"रिलेक्स. काही दिवस शांत बसू आणि मग बघू काय होतय ते. डोन्ट पॅनिक. सगळं ठीक होईल."
"होप सो."

"चल शेठ आता पटापटा नाव पत्ता सांग दोघांचा."
"बबन शेलार आणि मॅथ्यू. पत्ता माहीत नाय सायेब."
"मला माहीत आहे साहेब."
"जगदाळे, आधी याला उचला आणि मग त्या दोघांना. आता कळेल की या प्रकरणात कोण कितपत गुंतला आहे ते."

"चला रे. पोपटपंची सुरु करा."
"आम्ही शगूनमधे बसलो होतो साहेब. तेव्हा तो भालेराव त्याच्या पंटरबरोबर येऊन आमच्या बाजुच्या टेबलवर बसला. बियर वर बियर ढोसत होते दोघे. तो दिल्लीला जातोय हे त्यानं त्या पंटरला सांगितलं आणि आम्ही दोघांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मग कळलं की तो अंधेरीत राहतो, टुरवर गेला की घरात बायको एकटीच असते आणि घरात पैसा बर्‍यापैकी आहे. आम्ही त्याच्या टॅक्सीचा पाठलाग केला. त्याचं घर बघून ठेवलं. दोन दिवस पाळत ठेवली आणि त्या रात्री घुसलो त्याच्या घरात."
"बाईला का मारलत ? "
"बोंबाबोंब करेल म्हणून. गळ्यावर चाकू ठेवला तरी हातपाय चालूच होते तिचे. दोगाना ऐकत नव्हती बाई. मग काय इलाज नव्हता."
"खर बोलताय ? "
"आईची शप्पथ सायेब."
"त्या भालेरावने सुपारी दिली नव्हती ना तुम्हाला ? "
"नाय सायेब. ते बेणं तर एक नंबर येड हाय."

"हो... हो.... हे श्यामलचेच दागिने. ते घरफोडे सापडले ?"
"हो. सापडलेत."
"फक्त एकदाच मला भेटू द्या त्यांना. "
"सॉरी मि. भालेराव. आता नाही. कोर्टात भेट होईलच. मि. भालेराव, तुमच्या बायकोच्या खुनाला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात."
"व्हॉट नॉनसेन्स ? "
"आय एम टॉकींग सेन्स मि. भालेराव. टुकार बारमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या घरातली गुपिते चारचौघात उघड केलीत. असल्या ठिकाणी येणारे सगळेच गरीब नसतात. तुमच्या फुकटच्या बोलघेवडेपणाचा फायदा या घरफोड्यांनी घेतला. इन शॉर्ट, तुम्हीच तुमच्या घरची टीप त्यांना दिलीत."
"आय एम सॉरी सर. पण तसं काही करण्याचा माझा हेतू मुळीच नव्हता."
"असेलही आणि.......... नसेलही."
"तुम्हाला अजूनही असं वाटतेय की या सर्वात माझा हात आहे ? "
"कस आहे ना भालेराव, हा माझा जन्मजात प्रोब्लेम आहे. मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. तुमच्या पण कपाळावर लिहीलेलं नाही ना की तुम्ही प्रामाणिक आहात ? "
"कुणाच्याच लिहीलेलं नसतं. पण या कागदावर स्पष्ट लिहीलय की श्यामलच्या इस्टेटीचा संपुर्ण हक्क मी तिच्या आईवडीलांच्या नावे केलाय. याउपर तुमची मर्जी."

"साहेब तो रामसहाय यादव आलाय."
"आता काय लोणचं घालायचं का त्याचं ? पाठवा त्याला परत."
"अपेक्षेपेक्षा फार लवकर क्लियर झाली ना केस ? "
"निदान दिसतय तरी तसच."
"म्हणजे ?"
"काही नाही."
"...."
"जगदाळे, माझा स्वभाव फारच संशयी आहे का ? "
"..."

"हो सर... प्लीज सर, मला दिल्ली ब्रांचला ट्रान्सफर दिलीत तर फार बरं होईल."
"पण भालेराव, तुमच्या इथल्या कामासाठी दुसरा योग्य माणूस मिळेपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल."
"सर, मल्होत्राशी मी बोललोय. ते मुंबईला यायला तयार आहेत. त्यांच्या जागी मी दिल्लीला जाईन. मी आता इथे त्या घरात राहू शकत नाही. प्लीज सर."
"ओके भालेराव, आय विल डु द नीडफूल."
"थँक यू सर. थँक यू वेरी मच."

"हॅलो नेहा, माझी दिल्लीला ट्रान्सफर होतेय."
"केव्हा निघणार आहेस ? "
"या मंथ एन्डला."
"ओके. ऑल द बेस्ट"
"यू टू. तुझ्या ट्रान्सफर एप्लीकेशनचं काही झाल की नाही ? "
"नॉट यट."

"सहा महिने... सहा महिने टुकार बारमध्ये मित्रांना बियर पाजून बडबड केली. पण शेवटी त्या दोघांबद्दलचा अंदाज काही चुकला नाही. भालेराव, या हुशारीसाठी एकदा पाठ थोपटा पाहू स्वतःची."

समाप्त.

गुलमोहर: 

आवडली पण जेंव्हा तो टुकार बारमध्ये बिअर पित बसला होता हा उल्लेख आला तेंव्हा मला अंदाज आला होता हे अस असणारेय

आवडली पण जेंव्हा तो टुकार बारमध्ये बिअर पित बसला होता हा उल्लेख आला तेंव्हा मला अंदाज आला होता हे अस असणारेय>>>+१

mast.....

आवडली. नेहमीपेक्षा छोटी झाली की गोष्ट Happy तुझ्या रहस्यकथा बर्‍याच दीर्घ असतात.
ही कथा आधी वाचली आहे का मी, की जगदाळे, शिर्के, घरफोडी, खून इ साम्यस्थळामुळे आधीच्या एखाद्या जुन्याच कथेसारखी वाटली?

कौतुक, तुझ्या इतर कथांपेक्षा थोडी डावी वाटली कथा.
एकतर शेवट खूपच अपेक्षित झाला.
आणि दुसरे म्हणजे... कथा रंगेपर्यंत आवरती घेतल्यासारखी वाटली.
कथाबीज चांगले आहे मस्त.

हं...
कथा रंगेपर्यंत आवरती घेतल्यासारखी वाटली. >>> अनुमोदन.

पण, निव्वळ संवादांतून सगळे प्रसंग मांडणं हे फार कठीण काम आहे. Happy

धन्यवाद ! फक्त संवादातून रहस्यकथा लिहीण्याचा हा प्रयास. त्यामुळे त्यात गुंतागुंत शक्य असूनही टाळली. अधूनमधून असे प्रयोग करावे म्हणतो. Happy
हिम्स, 'लक्ष्य' साठी नाही लिहीली. वर्तमानपत्रातल्या बातमीवरून सुचलं. म्हणून काल खरडलं आणि पोस्टवलं. Happy

Pages