"मस्साला च्या मारी"....

Submitted by लाजो on 28 March, 2012 - 18:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"मस्साला च्या मारी... "

पावणं... असं दचकु नगा... म्या काय वंगाळ नाय बोलत हाय. माज्या रेशिपीचं नावच हाय बघा ह्यो.... "मस्साला-च्या-मारी..." Happy

त्याचं काय हाय बगा, की आमच्या मालकांना.. म्हणजे आमच्या यान्ला Blush 'च्या' लईच आवडतो बगा. आन तो बी मस्साला वाला. आनी नुसताच च्या नव्ह... संगट 'मारी' बिस्कुटच लागतया (डायटवर हायती... खारी नको म्हंत्यात Proud ). तर मी काय म्हंनत व्हते? हां, तर आमचे मालक हरघडी हाका घालतात.... "एSS च्या-मारीSSSS..." रविवारच्याला तर दिवसातुन ६-७ वेळा ह्योच............ "च्या-मारी"..."च्या-मारी"... कंटाळ्ले की म्या. सारखा तो च्या करा.. मसाला कुटा...टोप घासा अन कप धुवा... म्हनल कायतरी आयड्या कराया हवी, जेनेकरुन हे च्या प्रकरन सोप्प करता येइल्ल. मग काय माज्या सुपिक डोस्क्यात वळवळला की हो किडा आन केल्ली की ह्यो नवी रेशिपी...

तर, या रेशिपीसाठी काय काय लागतया?? -

मस्साल्यासाठी:
३-४ वेलच्या, ३-४ लवंगा, दालचिनी तुकडा कुटुन केलेली ताजी भुक्टी - १ छोटा चमचा (टीस्पून)
१ छोटा चमचा सुंठ पावडर

आन ह्यो बी लागतया -

२ मोठ्ठे चमचे (टेस्पून) चहाची पत्ती,
३/४ कप साखर,
२ कप मैदा (गव्हाच पीठ नगाच वापरू .. मज्जा नाय यायाची),
१७५ ग्रॅम मऊ बटर (मीठाबिगर किंवा अमुल पन चालेल),

क्रमवार पाककृती: 

आता आपन बनवुया "मस्साला च्या मारी"

१. सगळे जिन्नस गोळा करा.

Bisc1a.JPG

२. तुमच्या मिस्कर म्हंजी फुप्रो मंदी चाळलेला मैदा, सुंठ, च्या ची पत्ती घाला आन जरा फिरवुन घ्या. मग साखर घाला आन परत फिरवा.. मिस्कर..

३. यात आता कुटलेला मस्साला, बटर घाला अन परत फिरवा... सम्द एकत्र येऊन गोळा व्हाया लागलं की फिर्वायच थांबा.

४. गोळा मिस्करातुन बाहेर काढुन कट्यावर एकत्र नीट करा आन त्याला दांडुक्या सारखा आकार द्या. दांडका साधारण मनगटा येव्हढा जाड हवा (दीड इंच व्यास). हा दांडका प्लास्टिकमधे (क्लिंग रॅप) गुंडाळा आन पांढर्‍या थंड कपाटात ठेऊन द्या घटकाभर.

Bisc2.jpg

५. भट्टी (ओव्हन) १५० डिग्रीला तापत ठ्येवा. घटकाभराने दांडका बाहेर काढा. त्यावरचं प्लास्टिक काढा आन कंगोरेवाल्या चाकून त्याच्या गोल गोल चक्त्या कापा.

६. या चकत्या भाजकागद (बेकिंग पेपर) ठेवलेल्या ताटलीमंदी थोड्या मोकळ्या मोकळ्या मांडा.

७. आता द्या ढकलुन ताटली भट्टीमधी - १२-१५ मिंट. चकत्यांची आता बिस्कुट व्ह्याया लागतिल Happy कडा जरा तपकिरी दिसाया लागल्या की काढा बाह्येर.

Bisc3.jpg

८. बिस्कुट अजुन नरमच लागतिल हातान्ला पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.

Bisc4.JPG

९. "च्या-मारी" झाली की .. काढा प्लेटीत Happy

Bisc6.JPG

१०. च्या-मारी आन सोबत टीवी चा रिमोट दिला यान्ला... म्हंन्ल "च्यामारी घ्या....मस्साला च्या मारी" Lol

Bisc5.JPG

वाढणी/प्रमाण: 
एक खाऊन थांबता येत नाही त्यामुळे खाल तेव्हढे..
अधिक टिपा: 

१. यात शक्यतो चहाची पत्तीच वापरा. पावडर नको. पावडर वापरणार असाल तर २ टबलस्पून ऐवजी १ टेबलस्पूनच घ्या.

२. चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात. मस्त चव येते.

३. सुंठ आणि ताज्या मसाल्याचा स्वाद खुप छान लागतो. विकतचा मसाला शक्यतो नका वापरू यात अजुन बरेच काही घटक असतात.

४. अनसॉल्टेड बटर वापरणार असाल तर अगदी चिमुटभर मीठ घाला. बिस्किटाची गोडी जास्त खुलते.

५. रॅप केलेला तयार दांडुका (रोल) फ्रिज मधे आठवडाभर आणि फ्रिझरमधे महिनाभर ठेऊ शकता. आयत्यावेळेस बाहेर काढुन थोडा थॉ करुन मग बेक करा.

६. बेक करताना साधारण १० मिनीटांनंतर लक्ष असू द्या. कडा लालसर्/थोड्या तपकिरीसर दिसायला लागल्या की बिस्किट लगेच बाहेर काढा. असं वाटतं बिस्किट कच्च आहे पण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यातल्या हीट मुळे बिस्किट शिजतच असतं. ५ मिनीटांनी बिस्किट जाळीवर काढा. थंड झाल्यावर बिस्किट छान खुसखुशीत होतात.

त टि : आमचे मालक वर्षातुन एकदा चहा पिणार्‍यातले पण ही च्या-मारी रोज आवडीने खातात Happy

माहितीचा स्रोत: 
बेसिक बिस्किट रेसिपी त्यात चहा मसाल्याची अ‍ॅडिशन
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच खुसखुशीत कृती, लेखन अन फोटोसुध्दा. Happy नक्की करणार. पण मैद्या पासून नाही. गव्हाच पीठ सपिटाच्या चाळणीने चाळून करेन म्हणते. रन्गाला मार खातील बहुते क Happy

चहा पत्ती आणि चहा पावडर वेगवेगळे असतात का? माझ्याकडे टी बॅग्ज आहेत. त्यातला चहा नाही चालणार का?

आता पुढची रेसीपी "च्या मायलो"...... Light 1 Proud

लाजोचं च्या मारी... "मायलो" घातलेल्या दुधात बुडवून खायचं... Rofl

मला काही प्रश्न पडले
१. चहापत्ती नी चहा पावडर मधे काय फरक?
२. चहापत्ती ह्या बिस्किटांमध्ये कडु लागत नाही का? कारण अशीच चहापत्ती (चहाशिवाय) खाण्याचा विचार पण करवत नाही.

धन्यवाद मंडळी Happy

- चहा पत्ती म्हणजे 'लिफ टी' ज्यात चहाची वाळकी पाने कळुन येतात.

- चहा पावडर/डस्ट यात चहा बारीक भुकटीच्या स्वरुपात असतो.

- चहा पत्ती नसेल तर चहा पावडर चालु शकेल फक्त ती अगदी शेवटी घालावी म्हणजे मिक्सर मधुन फिरवताना त्याचा पार भुगा होणार नाही.

- चहा घातल्याने बिस्किट अजिब्बात कडु होत नाही Happy

@ धनश्री गानू<<< फ्रेश क्रिम चालणार नाही. बटर ऐवजी साजुक तूप वापरु शकता Happy

लाजो, धन्य आहेस _/\_ ! प्लेन बिस्किटं श्रूजबरी बिस्किटांसारखी लागतील का ? मसाल्यामुळे ही बिस्किटं तर भारीच लागत असणार Happy

Pages