आम्ही तिघ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आम्ही तिघ म्हणजे -'छोटा केदार', 'मोठा केदार' आणि 'मी'. म्हटल तर वेगवेगळे म्हटल तर एकच. एकच असले तरी एकसारखे मात्र नाहीत.

'छोटा केदार' फारच लाडावलेला. घरातल पहिल मूल म्हणून सगळ्यांनी अगदी डोक्यावर बसवलेला. राग आला की कोण्णा कोण्णाला म्हणून आवरत नाही. 'छोट्या केदार'चे नखरे भारी. जेवण कस त्याला अगदी 'ताज' आणि 'गरमागरम' हव. आईने पाट पाणी घ्यायला सांगितल की त्याला राग येतो. मनात असल कधी, तर उपकार केल्या सारख स्वतःच ताट घेइल फार तर. जेवणातही 'हेच' हव आणि 'तेच' नको. भाज्याही मोजक्याच खाईल. बटाटा, वांगी, भेंडी सोडली तर चौथी भाजी तो चालवून घेत नाही. पोळ्याही गरमा गरम आणि मऊसूत हव्यात. जरा कूठे करपलेली दिसली तर तो ती खात नाही. पोळीवर तूप हव व्यवस्थीत, नाहीतर जेवण त्याच्या घश्याखाली उतरत नाही. किंबहूना, ' खाईन तर तूपाशी नाही तर उपाशी' ही म्हण त्याच्या साठीच आहे. जेवणात चूकून खडा किंवा केस मिळाला तर ते ताट तो शिवत नाही. आणि त्याच्यासाठी नवीन ताट नाही घेतल तर तो जेवत नाही. रात्री आईने झोपवल्या शिवाय तो झोपत नाही. आणि तो झोपल्याशिवाय ईतर कुणी झोपायच नसत. घरातल कुठलच काम तो करत नाही. जर फारच आग्रह केला तर 'कस तरी करायच' म्हणून करतो. अगदी कॉलेजला गेला, नोकरीला लागला तरी 'छोटा केदार' छोटाच रहातो.

आणि एक दिवस अचानक 'छोटा केदार' मोठा होतो. अगदी आपल्या हिंदी चित्रपटात दाखवतात ना तस्साच. त्याला मोठ व्हावच लागत कारण आता त्याच्या डोक्यावर छत नसत. अगदी अगदी समजूतदार पणे वागायला लागतो. तो आता रडत नाही, कारण डोळे पूसणार कोणी नसत. रागवत नाही, कारण राग शमवणार कोणी नाही. हट्ट करायचा आता विसरूनच जातो. 'छोटे पणाचे' लाड आता नाहीत. रडणार्‍या आजीला तो आधार देतो पण स्वतः रडत नाही. आजी सारखी त्याच्याकडे पहात असते. त्याच्या 'मात्रुमूखी' चेहर्‍यात ती स्वतःच्या मूलीचा चेहेरा शोधत रहाते. ' मोठा केदार' मनातून हलतो पण चेहेर्‍यावर दिसू देत नाही. डोळ्यातून पाण्याचा टीप्पूस काढत नाही. मोठा केदार स्वतःच जेवण बरेचदा स्वतःच रांधतो. पाट पाणी स्वतःच घेतो. आता कुठलीच भाजी त्याला वर्ज्य नाही. 'पोळ्या गरमच असल्या पाहीजेत' असा काही नियम नाही. थंड पोळ्याही छान लागतात की. फक्त सवयी सवयीचा फरक आहे. ताट वाट्या स्वतः च विसळतो. सगळी काम स्वतः करतो. कोणावर अवलम्बून म्हणून रहात नाही. आता नस्ते लाड नाहीत. कूंडीतल्या रोपट्या पेक्षा माळरानावरच झूडूप किती भरभर वाढत. सवयी सवयीचा फरक आहे.

आता रहाता राहीलो 'मी'. मला आश्चर्य वाटत, तो 'छोटा केदार' अचानक कुठ नाहीसा झाला. जणू नव्हताच कधी. तो 'मोठा केदार' कसा शहाण्यासारखा वागतो. तसा वागला असता तर काय बिघडल असत. कोणाला 'चूकून का होईना आनंद द्यायचा' तर ते नाही आपलीच मिजास आणि मस्ती. मी कीनै आता ठरवलय, दूख्खांवर मनोसोक्त प्रेम करायच. प्रेम केल की ती ही आपलीशी होऊन जातात. आपल्या बरोबर वस्तीला रहातात. सुखांच कस ' वळवाचा पाऊस'. आज आहेत उद्या नाहीत. पण दुख्ख कशी ' सच्चा दोस्त' बनून रहातात. मी आता ठरवलय रडायच बिलकूल नाही. डोळ्यातून 'पाणी' म्हणून काढायच नाही. मनोसोक्त हसून घ्यायच. स्वतः हसायच, इतरांना हसवायच. आपण मस्तीत जगायच. खूप खूप हसायच. विनोदी किस्से आठवून, कोट्या आठवून, कधी कोणाची केलेली मस्करी आठवून. विनोदी नाटक, चित्रपट, लेख, कथा काही काही म्हणून सोडायच नाही. पूल, चि वि, अत्रे, मिराजदार, मंत्री, भेंडे, दळवी सगळ सगळ वाचून घ्यायच. डोळ्यातून पाणी म्हणून काढायच नाही अजिबात. खरच हसू द्या हो मला. आता पर्यंत बरच रडून झालय. आता मी हसत रहातो सारखा. कधी कोणाबरोबर, कधी एकटा. कधी स्वतःला, कधी इतरांना. कधी सुखाला कधी दूख्खांना. इतका हसतो इतका हसतो की अलगद डोळ्यात 'पाणी' कधी भरून रहात ते कळतच नाही मला.

******************************************************************************************************************

विषय: 
प्रकार: 

छान लिहिल आहेस रे.
तुझ्या मनातील भावना नीट उमटल्या आहेत बघ.
एक सांगतो (कितीही कंटाळवाण असल तरी)
मनातुन तुझ्या आईच जाणं गेल नाहिये. जाणारही नाही.
पण त्यासाठी उदास होउन फायदा नाही रे..
केदार छोटा असो वा मोठा आईला तो नेहमी खुषच हवाय हे लक्षात ठेव.

केदार,
हा आघात भरून येणं खूप कठिण आहे पण खरच अशक्य नाही. तू अंगिकारलेला मार्ग योग्यच आहे. परमेश्वराचे आभार मान की तुला आजी तरी आहे. कित्येक कोवळ्या जीवांना कुणाचाच आधार नसतो. तू त्यांचा आधार होण्याचा प्रयत्न कर आणि बघ तुझ्या वेदनेचा हळूहळू विसर पडेल.

ह्यावर प्रतिक्रिया लिहिता येत नाहीये. हे तुझं, स्वतःचं, खूप आतलं... आहे.

खरय प्रतिक्रिया देता येत नाही.

अरे पण तो जो पहीला परिच्छेद लिहीलास तो माझ्या सहीत मला माहीत असनार्या आणखी ३ केदारांना लागु होतो. (कदाचित केदार ह्या नावाबरोबरच ते येत असाव).

केदार, काय बोलु आणि काय लिहु? ..

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले... ची आठवण झाली...

इतके सोसून सुद्धा तू तुझ्यातली विनोदबुद्धी शाबूत ठेवली आहेस ( तुझ्या इतर लिखाणावरुन जाणवतेच ते)... त्याला खरेच सलाम

visit http://milindchhatre.blogspot.com

प्रतिक्रिया काय द्यावि याचा बराच विचार केल पण शब्दच सापडलेत नाहित.
अप्रतिम लिहिलेस.

मला मझ्या आई ची आठवण आली रे. तीहि अशीच अचानक गेली.खुप लाड करुन घेतले,ती गेल्यावर मात्र तिची जागा घ्यावी लगली लहान भावन्डा साठी.तीला सुख द्यायच राहुन गेल्.ती बोच काही केल्या जात नाहि अजुनही,शब्दात हि उतरत नाहि.तिची आठवण आली कि फक्त डोळे भरुन येतात्.माझा भाउ लहान आहे १६ वर्शाच.तोहि, असाच प्रौढ झाल्यासारखा वागतो.तो कधि आई ची आठवण नाहि काढत किन्वा अम्हि तिघे मी,बहिण आणि तो तिच्या बद्द्ल नाहि बोलत्.पण मनाचा अखन्ड आई बद्दल् चा सन्वाद जाणवतो.खुप रित रित वाटत्.आम्हला अजुन ती खुप हवी होती हे नक्कि.

कवि ग्रेसची कविता आठवली
ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.
मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवीत होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेंव्हा कंदील एकटा होता

आई बरोबर आपलं बालपणही जातं.

खरंच! मलाही शब्द सापडत नाहियेत बोलायला. पण केदार, ITgurl आम्ही सगळे आहोत तुमच्या साठी. आईची जागा आम्ही नक्कीच नाही घेऊ शकणार पण आईशी काही बोलावसं वाटलं तर खुशाल ते इथे मायबोली वर टाका. ती पण माय च आहे आपल्या सर्वांची. माझ्या गळ्यात हुंदका येतोय....
Sad
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा