मेरे अवगुन चित ना धरो

Submitted by चैतन्य दीक्षित on 12 March, 2012 - 11:28

कोण गती जगलो हे जीवन? केली किति पापे?
हरि, हरि आता सगळ्या दु:खा, शिणलो भवतापे |
आयुष्याची गाडी उताराला लागली आणि मागे वळून पाहिलं तर दिसलं ते अविचारानं जगलेलं जीवन. आनंदाच्या क्षणी धुंद-मत्त होऊन तुला विसरलो, दु:ख झालं तेव्हा माझं कर्म न पाहता तुलाच विचारले की "हाच का तुझा न्याय?" सुख-दु:खांच्या लाटांमध्ये हेलकावे घेत, मन नाचवेल तसा नाचलो पण काही केल्या मला माझं वागणं तपासून पहावंसं वाटलं नाही. मी माझ्या चुका मात्र पाहिल्याच नाहीत.तुला विसरलो रे मी! पण ...पण आता मला माझ्या चुका कळल्या आहेत आणि म्हणूनच चिंता-क्लेश हरण करणार्‍या 'हरी' मी तुला विनंती करतो की माझ्या अवगुणांकडे दुर्लक्ष कर आणि मला जवळ घे.
तानपुर्‍याचा आवाज जणु हरीला ही विनंती करण्यासाठी धीर देतो आहे ... तरीही कशी सुरुवात करू? काय बोलू हे न उमगून, केवळ स्वरांनीच पुन्हा एकदा सगळा धीर एकवटून मग एकदाचे शब्द फुटतात- मेरे अवगुन चित ना धरो!
लेकरानं खोड्या करून खालमानेनं आईसमोर उभं रहावं, आई चिडली असेल असे वाटून 'मी चुकलो, पुन्हा असा नाही वागणार' हे साधे शब्दही फुटत नाहीत तोंडातून तसेच काहीसे. पण एकदा का 'मी चुकलो' असं म्हटलं, की डोळ्यातून वाहणारे अश्रूच सगळं बोलायला लागतात आणि मग फक्त 'आई, आई' असं म्हणत लेकरू आईला बिलगतं.
या भजनातला 'हरी' हा शब्द, लेकरानं रडत रडत आणि आई माफ करेल अशा आशेनं उच्चारलेला 'आई' हाच शब्द आहे असं वाटतं. पण हे लेकरू मात्र फार म्हणजे फारच पश्चात्तप्त आहे. त्यामुळे नुसत्या एवढ्या विनंतीनं हरी माफ करेल अशी खात्री न वाटून ते हरीला अनेक उदाहरणं देऊन क्षमायाचना करतं. ते म्हणतं तुला दुर्गुणी आणि सज्जन सारखेच, म्हणून तर तुला 'समदर्शी' म्हणतात. याच तुझ्या ब्रीदाची तुला आठवण करून देतो, आता तू ठरव मला भवसिंधूतून पार करायचं की नाही ते.
हरी मेरे अवगुन चित ना धरो
समदरसी हे नाम तिहारो, चाहो तो पार करो |

का सरिता गंगेसि मिळाली | मिळणी होता गंगा जाली |
मग जरी वेगळी केली | तरी होणार नाही सर्वथा ||
असा दाखला देऊन लेकरू म्हणतं, जिचं पाणी खूप मलीन आहे अशी छोटी नदी जर गंगेला मिळाली, तर गंगेला मिळाल्यानंतर मात्र दोघींचा रंग एकसारखाच होतो आणि त्या छोट्या नदीलाही गंगाच म्हटलं जातं. थोडक्यात ती छोटी नदी स्वतः गंगाच होते. मीही 'एक मलीन छोटी नदी' आहे असं समजून माझा मलीनपणा घालवून मला आपलंसं कर.

एक नदिया एक नार कहावत, मैलो ही नीर भरो
दोउ मिले जब एक बरन भये, सुरसरि नाम पर्‍यो |

यातलं 'दोउ मिले जब एक बरन भये, सुरसरि नाम पर्‍यो' हे इतकं भाबडेपणानं गायलंय की केवळ तेवढं ऐकूनच हरी यावा आणि त्यानं म्हणावं 'अरे, पुरे पुरे. नको इतकं वाईट वाटून घेऊस. मी आलोय तुला आपलंसं करायला'.
आता खरं तर आईनं लेकराचं रडणं पाहून त्याला जवळ घेतलंय, पण लेकराला इतकं भरून आलंय की ते पुन्हा पुन्हा आईची क्षमा मागत तिला स्वतःच्या समदर्शी ब्रीदाची आठवण करून देतं.
परिसासाठी लोखंड हे लोखंड असतं. मग ते पूजेत ठेवलेलं लोखंड असो किंवा घरात इतरत्र वापरलेलं लोखंड असो, परीस दोन्ही लोखंडांचं खर्‍या सोन्यात रूपांतर करतं. तद्वत, तूही माझ्या अवगुणांकडे दुर्लक्ष कर.

इक लोहा पूजा मे राखत, इक घर बधिक पर्‍यो
पावक गुन-अवगुन नही चितवत, कंचन करत खरो |
समदरसी हे नाम तिहारो, चाहो तो पार करो
मेरे अवगुन चित ना धरो |

आईनं जवळ घेतल्यानं लेकरालाही थोडं हायसं वाटू लागलंय.. मधुन मधुन एखादा हुंदका येतोय इतकंच. आईच्या समजावण्यात 'बाळा, तू माझाच अंश आहेस रे.मी तुझ्यावर का रागावेन? शांत हो बघु' असा भाव असतो आणि भोळेपणानं ते लेकरू आईला विचारतं 'मग तू आणि मी वेगवेगळे का? मला तू तुझ्यासारखंच का नाही करत?' मनाच्या गाभ्यातून अतीव करुणेनं भरलेला एक हुंदका दाटून येतो आणि बाळ म्हणतं 'एकवार माझे अपराध पोटात घाल माउली! फक्त एकवार !'
हरी, मला ऐकीव ज्ञानानं हे ठाऊक आहे की मी जीव आणि तू ब्रह्म आहेस, दोघेही एकच. पण अनुभव नाही रे! अनुभवाला येतं ते फक्त तुझ्या-माझ्यातलं द्वैत, मी-तूपण ! म्हणूनच मी कळवळून विनंती करतो की फक्त एकदाच माझे सगळे अपराध क्षमा कर, अवगुणांकडे दुर्लक्ष कर आणि मला भवसागरातून पार कर. तुला तुझ्या 'तारक'ह्या ब्रीदाची आण आहे.

एक जीव एक ब्रह्म कहावत, सूर-श्याम झगरो
अब की बेर मोहे पार उतारो, नहि पन जात टरो |
हरी मेरे अवगुन चित ना धरो ||

काही रचनाच अशा असतात की ऐकल्यानंतर काही बोलूच नये असं वाटतं.
आपण नकळत स्वपरीक्षण करू लागतो. ही रचनाही तशीच एक.
......
श्रीकृष्णार्पणमस्तु !

गुलमोहर: 

काही रचनाच अशा असतात की ऐकल्यानंतर काही बोलूच नये असं वाटतं. >>

ऐकल्यावर माझही असच झालय