भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 7 March, 2012 - 15:28

मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता. पण यथावकाश सर्व आळ्या, वाडे बिल्डरलॉबीने सिमेंटच्या जंगलात रूपांतरित करून टाकले. अनोळखी लोकांची संख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे शिव्या घालत फिरणे, बोंबाबोंब करणे हे बंद होऊन होळी ही फक्त रात्री दारू चढवून आपापसात गप्पा मारणे इतपतच उरली.

एकदा डिप्लोमाला असताना माझा एक मित्र, शेखर देशमुख, थेट बदलापुराहून माझ्याकडे होळी साजरी करण्यासाठी आला होता. त्याला मी लहानपणीच्या होळीच्या खूप गप्पा हाणल्या असल्यामुळे त्यालाही जरा उत्सुकता होतीच आमच्या पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची. रात्री मग माझे आगाशीतले काही मित्र आणि शेखर असे मिळून व्हिस्कीचा खंबा घेऊन बसलो. त्यावेळी शिकाऊ उमेदवार असल्यामुळे भरपूर भ्रष्ट पद्धतीचेच पिणे होते ते. खंबा संपत आल्यावर सगळेच जण जरा मोकळे होऊन आपापला खरा रंग दाखवून पुड्या सोडू लागले. गप्पांच्या ओघात भांगेचा विषय निघाला. आमच्यापैकी कोणीच भांग घेतली नव्हती त्याआधी. शेखरला भांग ट्राय करायची इच्छा झाली. मला म्हणाला,"भोXXX, मी तुझा अतिथी आहे आणि अतिथी देवो भवं ह्या न्यायाने मला भांग हवीय, सोय कर." च्यायची त्याच्या, आधीच मर्कट तशात मद्य प्याले, तो एकटाच नाही हो, आम्ही सगळेच. मग रात्री त्या तसल्या अवस्थेत भांगेची व्यवस्था करायला आम्ही सगळेच 'हलेडुले' होऊन निघालो.

माझा एक मारवाडी मित्र होता, त्यांच्या एरियात त्याचा मामा भांगेची सोय करतो अशी ऐकीव माहिती होती. मध्य रात्री त्याला गाठले. तो त्याच्या मामाकडे घेऊन गेला आणि खरोखरचं तिथे भांग घोटण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या मारवाडी मित्राने त्याच्या मामाला मला भांग हवी असे सांगितले. त्यानेही लगेच चान्स मारून घेतला, "सरचां मुलगा ना रे तू, तू पण हेतलाच काय? जय जलाराम बाप्पा". माझे वडील शाळेत सर होते आणि त्याने बहुदा माझ्या वडिलांच्या हातचा प्रसाद भरपूर खाल्ला असवा कारण त्या प्रसादाची परतफेड तो होळीचा प्रसाद, भांग, देऊन करीन म्हणाला. "शक्काळला येऊन घेऊन जा", असे म्हणून त्याने आम्हाला आश्वस्त केले. मीही लगेच जरा कॉलर टाईट करून शेखरकडे बघितले (पुढे कंडिशन कशी टाईट होणार आहे ह्याची अजिबात कल्पना त्यावेळी नव्हती). तो 'अतिथी देव' तृप्त चेहेर्‍याने माझ्याकडे बघत होता.

ह्या शेखरचा माझ्या घरी खूप वट होता. PLCNA हा एक विषय मला समजावून सांगण्यासाठी ह्याआधी त्याचे माझ्या घरी बर्‍याच वेळा येणे झाले होते. थेट बदलापुरावरून आपल्या मुलाला अभ्यासात मदत करायला येतो म्हणून आईला त्याचे फार कौतुक होते. पण ते कार्ट कसलं बेणं आहे ह्याची तिला तोपर्यंत कल्पना नसल्यामुळे चक्क धूळवडीला घरी मटण वगैरे आणून खास त्याच्यासाठी पेश्शल तिखट मेनू बनवला होता. त्या जेवणाच्या तयारीची सोय करून आम्ही आमच्या पहिल्यावहिल्या भांगेच्या अनुभूतीसाठी कुच केले.

मारवाडी मित्राच्या मामाकडे गेलो. तो आमची वाटच बघत होता. "ये ये साला लै टाइम लावला, मला वाटला येते का नाय", असे म्हणत त्याने आमचे स्वागत केले. मग हिरवट मेंदी रंगाचे, ओलसर लगद्याचे 2-3 छोटे-छोटे गोळे माझ्या हातात ठेवून बोलला, "लैच कडक माल हाय, कोण कोण घेते?". मग आमच्याकडे सगळ्यांकडे त्याने नीट बघून घेतले. "तुम्हीच घ्या, लहान पोरान्ला अजिबात द्यायचा नाय", असे बजावून आम्हाला जायला सांगितले. ते गोळे घेऊन निघालो तेव्हा सकाळचे दहा - साडे दहा झाले होते. जेवायला साधारण अजून दोनेक तास होते. भरपूर वेळ होता.

एक चहाच्या टपरीवर जाऊन दुधाचे ग्लास मागवून ते गोळे दुधात मिक्स करून ते दूध आम्ही सर्वांनी संपवले. भांगेवर गोड खाल्ल्यावर आनंद आणखीन द्विगुणित होतो अशी ऐकीव माहिती होती. त्या माहितीचा हवाला धरून मग गोड खायचा सपाटा लावला. सर्वांत आधी अर्धा किलो जिलबी हाणली. मग कुल्फीवाल्याला पकडून 2-2 कुल्फ्या चापल्या. मग रस्त्यावर रंग उधळत फिरायला सुरुवात केली. मध्येच मिठाईच्या दुकानातून मसाला दूध,पेढे असला गोड माराही चालू होता. शेवटी एका पान टपरीवर मसालापान डब्बल गुलकंद घालून आणि ईक्लेयर चॉकलेट कातरून त्यात घालून खाल्ले. परत रंगांची उधळण करत रस्त्यावर निघालो. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा जोर जाणवू लागला होता. आता घरी जायचे मटण हाणून मस्त ताणून द्यायची असा विचार करतंच होतो....

अचानक मला सर्व आवाज एकदम हळू हळू ऐकू येऊ लागले. पायाला जरा मुंग्या आल्यासारखे वाटायला लागले. पायाला काय झाले वाटते न वाटते तोच एकदम हलकं हलकं वाटायला लागले. "च्यायला चढली की काय रे", असे शेखरला म्हणालो. तर तो म्हणाला "चल लवकर जाऊन अंघोळ करून जेवूयात. मी जातो, मला बदलापुराला पोहोचायला उशीर होईल." मग लगेच आम्ही घरी गेलो. मी अंघोळ करून कपडे बदलेपर्यंत मला सहजावस्था आली. शेखर अंघोळ करून बाहेर आला तोच लालबुंद होऊन. त्याला बरीच चढली होती. "मित्रा, माझी लागली आहे, मला काहीच कळत नाहीयेय काय करायचे ते. काकूंना तोंड दाखवायची सोय राहिली नाही. मला खूप काहीतरी होतेय. मला डॉक्टरांकडे घेऊन चल." हे ऐकून माझ्या एकदम कपाळातच गेल्या. हे काय त्रांगडं होऊन बसलं. मी त्याला म्हणालो, "जेवून घेऊया रे, जेवल्यावर जरा बरं वाटेल." पण तो पार ऐकण्याच्या पलीकडे पोहोचला होता. तो पर्यंत आईला संशय आलाच काहीतरी गडबड झाल्याचा. लगेच मग भावाला सांगून शेखरला बाहेर काढले आणि सायकलवर डबल सीट घेऊन त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. आमच्याकडे बघूनच त्याला काय झाले असावे ते कळले. त्याने शेखरला टेबलवर झोपवून चेक केले आणि विचारले "काय घेतले?"
"भांग, डॉक्टर.", मी.
"नक्की का? त्यात काय मिक्स केले होते?", डॉक्टर.
"नाही डॉक्टर, भांगच होती", मी.
"कुठून आणली होती", डॉक्टरने संशयितपणे. मग मी डॉक्टर आणि वकिलापासून काहीही लपवू नये म्हणून त्या मारवाड्याचे नाव आणि त्या एरियाचे नाव सांगून मोकळा झालो.
"रात्री काय घेतले होते?", डॉक्टर.
"व्हिस्की", मी.
"किती घेतली होती?", डॉक्टर. आता माझी फाXX, मी काहीच बोलत नाही हे पाहून त्याने काय ओळखायचे ते ओळखलं.
"भोXXXच्यांनो, झेपत नाहीतर हे असले पालथे धंदे कशाला करता रे. त्या भांगेत अफू मिक्स असणार. डी हायड्रेशन झाले आहे. लवकर घरी जाऊन भरपूर जेवा. ग्लूकोज नाहीयेय शरीरात. असच राहिले तर सलाईन चढवावे लागेल. आणि ह्याला (शेखरला) काय झाले आहे, असा का डिप्रेस झालाय हा. ह्याला आधी जेवायला घाला", डॉक्टर. ते ऐकून मलाही अचानक भयंकर असे काहीतरी वाटू लागले,एकदम आजारी पडल्यासारखे झाले.

त्या डॉक्टरला पैसे देऊन बाहेर आलो. तर शेखर एकदम चालू झाला, "मी नालायक आहे, तुझी आई एवढी माउली, माझ्यासाठी मटणाचे जेवण बनवले आणि मी भिकारचोट काय करून बसलो. आता कसे तोंड दाखवू त्या माउलीला". ते 'माउली' तो असे काही म्हणत होता की मला त्याही अवस्थेत खो खो हसायला येत होते. आता ते हसू त्या अफूमिश्रित भांगेचा परिणाम होता की काय ते त्या आळंदीच्या खरोखरीच्या माउलीलाच ठाऊक. "ए, मला घरी जेवायला यायचे नाही. मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल, सलाईन लावा मला नाहीतर मी मरीन",शेखर. त्याचा तो अवतार बघून मी आणि माझा भाऊही घाबरलो. शेखर तर काहीही ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हता. मग आमची वरात निघाली जवळच्या हॉस्पिटलमध्ये...

हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर धूळवड करायला निघून गेले होते. नर्स आतमध्ये जेवत होत्या. एका नर्सला बोलावून मघाच्या डॉक्टरांचा रेफरंस देऊन सांगितले की शेखरला सलाईन लावायचे आहे. ती भडकलीच, असे कोणालाही उगाच सलाईन लावत नाही असे म्हणाली. आता आली का पंचाईत. मग तिला त्या डॉक्टरांशी फोनवर बोलायला सांगितले. शेखरने "मी नालायक आहे, माउली मला माफ कर" असा लावलेला घोष पाहून तिलाही काय झाले असावे ह्याचा अंदाज आला. तिने डॉक्टरांना फोन केला. मग आम्हाला बसायला सांगून ती जेवायला परत गेली. इकडे शेखरचे, "मी नालायक आहे, खाशील भांग परत" हे स्वगत चालूच होते. तेवढ्यात त्याच्या कानामागून एक घामाची धार एकदम आली आणि माझे अवसानच गळाले.भयंकर घाबरलो मी. "नssssर्स", असे खच्चून ओरडलो मी. 2-3 नर्स एकदम पळत आल्या. त्यांनी लगेच शेखरला एक बेडवर झोपवून सलाईन चालू केले. मी बाहेरच थांबलो. आता मलाही ताण असह्य झाला होता. मी कॉरिडॉरमध्ये येरझारा घालू लागलो. एक नर्स मला खेकसून म्हणाली, "बस तिकडे बाकड्यावर". मी हो म्हणालो आणि परत येरझारा घालू लागलो. असे 2-3 वेळा झाल्यावर माझी पण शेखरच्या बाजूच्या खाटेवर रवानगी झाली आणि दंडावर सलाईन चढले. (हे सगळे मला नंतर भावाने सांगितलं, अदरवाइज माझ्या लक्षात राहण्याचे काहीच कारण नव्हते Wink )

सलाईन संपल्यावर आम्ही दोघेही जरा ताळ्यावर आलो. "मला डायरेक्ट स्टेशनवर सोड, काकूंच्या समोर जायची माझी हिंमत नाही", शेखर. 'माउली'वरून पुन्हा 'काकू' वर आल्याने शेखरही आता बराच हुशार झाला हे माझ्या लगेच लक्षात आले (तसा हुशार आहेच मी, लहानपणापासून). पण आईची सक्त ताकित होती,"घरी येऊन जेवायचे". मग नाईलाज असल्याने शेखरला घरी यावेच लागले. घरी पोहोचल्यावर त्याने मानही वर केली नाही. जे काही पानात वाढले ते गुपचूप खाल्ले."आता नीट घरी जाऊ शकशील का की उद्या जातोस?",आई. त्याच्या पोटात गोळाच आला. मान खाली तशीच ठेवून तो म्हणाला, "नाही आता बरे आहे, घरी जाईन."
"ठीक आहे, घरी पोहोचल्यावर फोन कर.", आई. लगेच त्याचे पाऊल घराबाहेर पडले. माझा भाऊ त्याला स्टेशनवर सोडायला गेला. मला आई आणि बाबांच्या तावडीत सोडून. ते गेल्यावर माझे काय झाले त्याच्यावर एक नवीनं लेख पुन्हा केव्हातरी Happy

त्यानंतर पुन्हा कधी भांग खायची छाती झाली नाही. आत्ताही हे सर्व लिहिताना अंगावर काटा आला आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आगाशीचे का? छान गाव आहे. मुंबईच्या इतक्या जवळ असुनही एक वेगळेपण अजुनही बर्‍याचपैकी जपून ठेवले आहे.

भांगेचा मला अनुभव नाही पण प्रताप ठाऊक आहे.

एकदा लहानपणी आजोळी होळी करता गेलो होतो. मामाने भांग घेतली होती आणि त्यावर पुरणपोळ्या हाणल्या होत्या. त्याने जी जेवायला सुरुवात केली ते थांबायचे नावच नाही. अजुन अजुन करत सगळा स्वयंपाक फस्त!! आजीला एकुण प्रकार लक्षात आला आणि तिने मामा व त्याच्या मित्रांचा उद्धार करायला सुरुवात केली.

मी अजाण बालक! Uhoh विचार करत होतो आज आजीला झालेय का रोज थोडा भात घे, भाजी घे करत मागे लागते आणि आज मामा एवढा चांगला जेवतोय तर ही भडकली का?
नंतर कळले की ही करामत भांगेची होती. Happy

आताच कलीगला "भांग माहात्म्य" सांगितले की भांग चढली की माणुस जी गोष्ट करत असेल तिच करत राहतो (IT term : Infinite loop मध्ये जातो).

त्याचे उत्तरः बरंय बॉसला नाही माहित आहे नाहीतर सकाळी आपल्याला भांग खायला देईल आणि आपण पण जोपर्यंत प्रोजेक्ट नाही पुर्ण होत तोपर्यंत काम करत बसु. Proud