लीना - (जागतिक महिला दिना निमित्त)

Submitted by आशयगुणे on 6 March, 2012 - 08:26

दोन दिवसांपूर्वी रविवारी माझ्या बायकोने मला भाजी आणायला धाडले तेव्हा ती दिसली. चेहऱ्यावर हास्य आणि तिचा हात हातात धरून शेजारी चालणारा तिचा लहान मुलगा, हे नक्कीच एक सुंदर दृश्य होतं. गेल्या १५ वर्षात काहीच बदललं नव्हत. ती अजूनही तशीच आणि तितकीच सुंदर होती. ती एका भाजीवाल्याकडे जात असतानाच दोन बाईकस्वार कॉलेज तरुण तिच्याकडे बघत बघत पुढे गेले. शेजारी उभ्या बायका काहीसा मत्सर डोळ्यात साठवून तिच्याकडे बघत होत्या. १५ वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये हेच दृश्य तर घडत असे. आणि थोडं पुढे येताच तिने मला पाहिले. आश्चर्य, अविश्वास, आनंद हे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. लीनाने, आमच्या कॉलेजच्या सर्वात सुंदर मुलीने, त्याचक्षणी मला ओळखले होते.
" काकांना हेलो म्हण", तिने स्वतःच्या लहान मुलाची माझ्याशी ओळख करून दिली. आणि नंतर काही मिनटात मला समजले की ही गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्याची बदली झाल्यामुळे माझ्याच शहरात आहे. मी माझ्या घरचा पत्ता सांगितला आणि जेवायचे आमंत्रण देऊन परत घरी आलो. एकतर जेवायला उशीर झाला होता म्हणून आणि दुसरं म्हणजे हिला( म्हणजे बायकोला) माझ्यावर ओरडायची संधी द्यायची नव्हती म्हणून! आणि जाताना मात्र १५ वर्षांपूर्वीचा तिच्या चेहऱ्यावरचा, मला अस्वस्थ करणारा, कृतज्ञतेचा भाव परत मला दिसला. एवढ्या वर्षात हे देखील बदलले नव्हते तर. त्याला करणं होती म्हणा!
"तुला काय झालंय?" माझे जेवणात लक्ष नाही हे लक्षात येताच बायकोने त्रासिक चेहऱ्याने विचारले. मी विचारांमध्ये हरवलो होतो. मन सतत १५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना समोर आणत होतं. शेवटी जेव्हा तिसऱ्यांदा माझ्या बायकोने प्रश्न केला तेव्हा मी तिला सांगून टाकले. " आज लीना भेटली होती." माझ्या बायकोने तो नेमका चेहरा केला जेव्हा तुम्ही एका मुलीला दुसऱ्या एका मुलीबद्दल सांगता! आणि मी माझ्या बायकोला सांगू लागलो.
वर्गातल्या मुलांमध्ये लीना सर्वात लोकप्रिय होती. अर्थात दिसायला देखील सर्वात सुंदर! पण सुंदर दिसणाऱ्या मुली कधीही स्वतः बोलायला येत नाहीत. एवढेच काय, ज्या मुलींना वाटते आपण सुंदर आहोत त्या देखील कधीही बोलायला येत नाहीत Wink पण लीनाचे तसे नव्हते. ती स्वतः वर्गात कुणाशीही बोलायची. कुठलीही चर्चा सुरु असेल तरी
येऊन आपली मतं मांडायची. कुणी वर्गात जोक केला की मनमोकळेपणाने हसायची. कुणी काळजीत असेल, कसले टेन्शन असेल तर स्वतः त्याच्या किंवा तिच्या शेजारी बसून सांत्वन करायची. आणि त्या एका दिवसापासून अफवा सुरु झाल्या. आमच्या ग्रुप मधल्या एकाने तिला आणि केदारला सकाळी कॉलेजमध्ये एकत्र चालत येताना पाहिले. त्यांच्या गप्पांच्या ओघात, हसत-खिदळत तिने त्याचा हात धरला. एवढेच काय त्याची पाठ थोपटली आणि त्याच्या खंद्यावर डोकं देखील ठेवलं. आम्ही वर्गाबाहेर गोल करून उभे होतो तेव्हा आमचा हा मित्र धावत आला आणि त्याने आम्हाला ही बातमी सांगितली! आणि त्या दिवसापासून आम्ही सर्वांनी ठरवून टाकलं....लीना आणि केदारचे सुरु आहे! ठरावच पास केला जणू काही! केदार देखील आमच्याच ग्रुपचा. त्यामुळे त्याचा घेराव होणारच होता!
"काय रे! काय चाललंय तुमच्या दोघात?" आमच्यातल्या एक पुढे सरसावला. केदार थोडा हसला पण काहीच बोलला नाही. त्याला पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा त्याने एकच उत्तर दिले.
" अरे काही नाही रे.....म्हणजे मला काहीच करावे लागत नाही स्वतःहून. ती अशी मुलगी आहे की स्वतःच सगळं काही करते." हे ऐकून साहजिकच आमच्या भुवया उंचावल्या!
"पण तुम्ही किस तर नक्कीच केलं असेल. एकदा तरी! इतपर्यंत नक्कीच मजल गेली असेल तुमची." आमच्यातल्या एकाने चित्र रंगवायला सुरुवात केली लगेच. केदार ह्यावर काहीच बोलला नाही आणि नेमक्या ह्याच गोष्टीमुळे आमच्यातला संशय बळावला. त्यानंतर बरेच दिवस आम्ही केदारला चिडवणे सुरु ठेवले. ह्यात चिडवणे हा शुद्ध हेतू नव्हता. वास्तविक तो कधीच नसतो. ह्या असल्या चिडवण्यात थोडा मत्सर देखील असतो. ' केदार मध्ये एवढे काय आहे रे....त्याला कसे काय पसंत केले असेल....मग मी का नाही', अशी बरीच वाक्य आमच्यात बोलली गेली. लीनाला मात्र ह्याचा काहीच पत्ता नव्हता. ती आमच्यात अधून-मधून घुटमळत असेच. कधी राजला जर्नल लिहून देण्यात मदत कर, तर कधी जयेशला अभ्यासात मदत कर, तर कधी चक्क माझ्याशी संगीत-चर्चा कर! हिला एवढ्या विषयात कसा काय रस वाटे देव जाणे! पण ही मुलींशी फार कमी बोलताना दिसे आणि म्हणून आमच्या ग्रुप मधल्या बऱ्याच मुलांना असं वाटे की हिला फक्त मुलांशी बोलण्यात इंटरेस्ट आहे! पण ही खूप मनापासून गप्पा मारत असे एवढे नक्की. असेच काही दिवस गेले. कोर्टाच्या पिंजऱ्यात अजून केदारच होता! एका सकाळी आम्ही सगळे प्रक्टिकल असल्यामुळे वर्गात हजार राहिलो. बघतो तर पहिल्या बाकावर लीना आणि शशी बसले होते! लीना त्याला काहीतरी समजावण्यात मग्न होती. आम्ही सारे येताच शशी थोडा सावरला आणि आमच्याकडे बघून किंचित हसला! आम्ही सारे जणू काहीच झाले नाही अशा थाटात मागे जाऊन बसलो. पण साऱ्यांची नजर मधून मधून पहिल्या बाकावर जात होती. शशीला जेव्हा ती काय सांगते आहे ते समजले तेव्हा तिने त्याची पाठ थोपटली. शशीला आरोपी करून घ्यायला एवढे कारण पुरेसे होते आम्हाला. एक मात्र खरे. लीना स्वतः मुलांच्या जवळ येते असं बऱ्याच जणांना त्यादिवशीपासून वाटू लागले. मग तिच्याशी मुद्दाम विषय काढून बोलायला जा, काहीतरी विचारायला जा असले प्रकार आम्हा मुलांचे सुरु झाले. आणि मग नंतर मुलांचे रिपोर्ट्स येणं सुरु झालं. तिने माझे केस कसे विस्कटले असं विशाल एकदा म्हणाला तर कुठलीही गोष्ट समजावताना ती हात कसा धरते असं शशीने ठासवले. तर तिला जोक सांगितला की ती हस्ते आणि त्यामुळे आपल्या खांद्यावर डोकं हमखास ठेवते असा आम्हाला सर्वांना विकासने सल्ला दिला! ह्या अशा निष्कर्षांमध्ये कॉलेजचे जवळ जवळ वर्ष गेले.
लीना आता आमच्यातच असायची. वर्गातल्या मुलींनी तिच्यावर जवळ जवळ बहिष्कारच टाकला होता. एकंदर बिघडलेल्या मुलींना मुलींमध्ये मज्जाव असतोच. हा तसाच प्रकार होता. आणि पवन बरोबर लीना जेव्हा पिक्चर बघून आली तेव्हा तिच्या बिघडण्यावर शिक्काच बसला होता. जी मुलगी रोज कुणा ना कुणा मुलाबरोबर फिरते ती आमच्यात नको बाबा, हे वाक्य एक-दोन मुलींकडून ऐकून झाले होते. आम्हाला देखील लीनाचा कधी कधी त्रास होऊ लागला. कधी पोरांनी मिळून कुठे जायचं ठरवलं तर 'मी पण येते ना' ही ओळ आळवली जायची. मग अशा वेळी ज्या कुणामुळे तिला घेऊन यावे लागायचे त्याला नंतर फार शिव्या पडायच्या. आणि एके दिवशी असं काही झालं की लीनाचे आमच्या बरोबर येणे अचानक थांबले. दुसऱ्या वर्षाच्या दिवाळी सुट्टी नंतर कदाचित, पण लीना एकटी राहू लागली. तिचं आमच्याशी बोलणं कमी झालं. मुली असंही तिच्याशी बोलत नव्हत्याच. आम्हाला देखील काही विशेष फरक नव्हता पडत. आमचा बऱ्यापैकी मोठा ग्रुप होता आणि आमची मस्ती सुरु असायची. लीनाशी अधून- मधून बोलायला काही पोरं जायची. पण ती स्वतः अजिबात आमच्यात येत नसे. मला हे जाणवत असे पण इतर लोकांनी त्याची विशेष दाखल घेतली नव्हती. आमच्या ग्रुपमध्ये काही पोरांनी छंद जोपासायला सुरुवात केली होती. मी आणि अजून दोन जणांनी एक band स्थापन केला होता आणि गाण्या-बजावण्यात फार छान वेळ जाई. कॉलेज मध्ये आणि कॉलेजच्या बाहेर देखील आमचे कार्यक्रम सुरु झाले होते.
एकदा असंच आईने दुकानात पाठवले असताना हाक आली. मागे वळून बघतो तर हातात पिशवी घेऊन लीना उभी. शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणारी ही मुलगी इकडे कशी काय ह्या आश्चर्याने मी तिच्याकडे बघितले.
" काल मॉलमध्ये झालेला तुमचा performance आवडला रे मला. तुम्ही खूप छान present करता. मी तुमचे बरेच shows बघायला येत असते. बरं वाटतं ऐकून", तिने अगदी मोकळेपणाने सांगितले. थोडं बोलण्यानंतर समजलं की लीना आता शहराच्या ह्या भागात राहायला आली आहे. आणि गेले काही आठवडे ती इथेच आहे. त्यामुळे नंतर तिची भेट होऊ लागली. कॉलेजचे शेवटचे वर्ष आले होते. आम्ही जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा अभ्यासाचा विषय जास्त निघू लागला. मधून मधून संगीत देखील येत असे बोलण्यात. पण मुख्य विषय अभ्यास. ती तशी हुशार होती. पण हुशारीचे रुपांतर कधी मार्कात होते नसे. म्हणून कदाचित आमचे जमायचे. Wink मी काहीही बोललो तरी ती त्यावर पटकन विश्वास ठेवायची. आणि इतरांनी सांगितल्याप्रमाणे बोलण्याच्या भरात कधी कधी हातही धरायची. ते खांद्यावर डोकं ठेवण्याचा प्रसंग मात्र माझ्या वाटेला कधी आला नाही.
आता लीना आमच्या घरी येऊ लागली होती. माझ्या आईशी गप्पा मारायची. " काकू आहेत का? सहज चक्कर टाकू...इथे दुकानातच आले होते", ही अशी वाक्य वारंवार येऊ लागली कानी. तिला आमच्या परिवाराबद्दल कमालीची उत्सुकता होती. आम्ही कधी, कुठे लग्नाप्रसंगी किंवा अशा कुठल्याही कार्यासंबंधी बाहेर जाऊन आलो की फोटो बघणे, लग्न कसं झालं इत्यादी विचारणे हे सारे नित्याचे झाले होते आता. लग्न कसं झालं ह्यात काय विचारायचं हा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यामुळे कधी कधी मी तिला त्रासिक उत्तरं देखील दिली होती. अशा वेळेस ती माझ्या आईशी बोलायला जायची. मी माझ्या बहिण-भावंडांबरोबर अगर मित्रांबरोबर फेसबुकवर फोटो टाकले की हिच्या प्रतिक्रिया पहिल्या असायच्या. लीनाचा उलगडा होणे आता कठीण काम झाले होते. एकीकडे सर्व मुलांबरोबर 'फ्री' राहणारी ही मुलगी कुटुंब किंवा नातेसंबंध ह्याबद्दल इतकी उत्सुक कशी? आणि एकदा दुकानातून भाजी आणताना ही मला रस्त्यात भेटली. आणि तेव्हा झालेला हा उलगडा मी कधीच विसरू शकणार नाही.
" मी आज खूप खुश आहे. माझा दादा येणार आहे नागपूर वरून. मग आज आम्ही सारे भावंडं पिक्चरला जाणार आहोत. नंतर डिनर आणि मग रात्रभर गप्पा!" मी अगदी खुशीत हे सारे सांगितले. " मजा आहे रे तुझी. मला तुझ्या फेमिलीबद्दल कमालीची उत्सुकता आहे रे. तुम्ही कसे एकमेकांबरोबर असता रे." लीना हे अचानकपणे बोलून गेली. " तुझे नातेवाईक कुठे असतात? तुम्ही जाता की नाही कुठे?" मी सहज प्रश्न
केला. "नाही रे. मी इथे आईबरोबर राहते. आमचे नातेवाईक आमच्याकडे येत नाहीत."
" आणि तुझे बाबा?" मी सहज विचारले.
" मी शाळेत असताना माझ्या आई-बाबांचा divorce झाला. तेव्हापासून मी आणि माझी आई एकटेच राहतो. आमच्याकडे अगदी क्वचित कुणीतरी फिरकत असतं. लहानपणी आम्ही दोघे लग्नाला वगेरे जायचो. पण तेव्हा एक सतत परकेपणाच जाणवायचा. नवऱ्याने टाकलेली बाई ही विशेषणे माझ्या आईबद्दल बऱ्याचवेळेस वापरलेली मी ऐकलेली आहेत. त्याचा अर्थ तेव्हा कळला नाही पण आता मोठं झाल्यावर कळतोय. मग आम्हीच ठरवलं. कुठेही नातेवाईक मंडळीत जायचे नाही. लहानपणी देखील मी माझ्या बहिण-भावंडांमध्ये खेळायला जायचे तेव्हा त्यांना देखील त्यांचे आई-वडील माझ्यात जास्त मिसळू द्यायच्या नाहीत. का तर म्हणे माझ्या आईने एका दुसऱ्या जातीच्या माणसाशी लग्न केले आहे. आम्ही आमच्या मंडळीत देखील उपेक्षितच राहत असू. माझे बाबा कधी आमच्या आईकडल्या नातेवाईकांमध्ये आले की त्यांना तसा मान, तशी विचारपूस कधीच मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं असे. हेच माझ्या आईबद्दल देखील होत असे. त्यामुळे त्यांची खूप भांडणं होयची. त्यांच्या मध्ये भरडली जायची मी. मला ना कधी इकडच्या नातेवाईकांनी जवळ केलं नाही तिकडच्या. शेवटी त्या दोघांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला. माझ्या १२ वी पर्यंतचा खर्च आईने उचलला. नंतर तिला पाठदुखीमुळे नोकरी सोडावी लागली. सुदैवाने आमच्या आईच्या आईने काही पैसे आईच्या नावाने ठेवले होते. त्यामुळे माझे आता कॉलेजचे शिक्षण तरी होत आहे. पण मला माहिती आहे. जशी मी graduate होईन तसे माझे लग्न लागणार आहे. दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे. त्यामुळे वाटतं की आहे ती कॉलेजची वर्ष मज्जा करून घेऊ." लीनाने हे सारे अगदी सहजपणे सांगितले.
" अगं, मग तू आमच्यात येत जा की. हल्ली तुझे आमच्याशी बोलणे देखील कमी झाले आहे", मी म्हणालो.
" नाही रे. ते आता शक्य नाही. मी तुम्हा मुलांशी बोलते ह्यामुळे जर माझी बदनामी होत असेल तर नको. मी तुमच्याशी जास्तच बोलते म्हणून मला आपल्या वर्गातल्या मुलींचे शेरे ऐकावे लागतात. त्यांना हे खुपते. आणि काही मुलं माझ्याबद्दल काय विचार करतात हे मला आता कळले आहे. त्यादिवशी मी पवन बरोबर पिक्चरला गेले तेव्हाच ठरवले. एकतर मी लहानपणापासून पिक्चर वगेरे बघायला कधीच गेले नव्हते. बाहेर लोकं काही बोलतील म्हणून माझी आई कधीही मला घेऊन कुठे बाहेर फिरायला देखील पडायची नाही. भाजी किंवा तत्सम सामान आणण्यापुरते तेवढे आम्ही बाहेर पडलो असू कधी. तर जेव्हा पवन पिक्चरला जायचे म्हणाला तेव्हा मी उत्सुकतेने त्याच्याबरोबर गेले. पण ह्याने त्याच्या अजून एका मित्राला बोलावले होते. मला दोघांच्या मध्ये बसवले आणि..." एका वेगळ्या लीनाचा उलगडा झालेला मी त्याक्षणी अनुभवला. वर्गातल्या काही लोकांनी पवनला पिक्चर कसा होता हे हसत हसत का विचारले होते हे तेव्हा मला समजले. त्यारात्री घरी बिछान्यावर पडलो होतो. हिने सांगितलेले सारे आठवत होतो. आपण कुणाबद्दल काय विचार करतो आणि त्या व्यक्तीचे तसे वागण्यात कुठल्या इतिहासाचा हात असतो ह्याचा आपण कसा विचार करत नाही हे मला त्याक्षणी जाणवले. पण माझा एक स्वभाव आहे. मी जे काही अनुभवतो, मला त्या अनुभवावरून हे काही वाटतं ते मी त्याक्षणी ऐकत असलेल्या गाण्यात मिसळतो आणि एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. हिची कहाणी ऐकली त्या दिवसात मी नुसरतची 'किरपा करो महाराज मोइनुद्दिन' ही कव्वाली ऐकत होतो. आणि का कुणाला माहिती मी त्या रात्री तिला 'एस एम एस' केला आणि हे ऐकायला सांगितले.
दोन दिवसांनी एका रात्री तिचा मला फोन आला. साधारण १ वाजला असेल रात्रीचा. रडत रडत लीना मला सांगू लागली. " त्या गाण्यात एक विलक्षण ताकद आहे. समर्पणाची एक वेगळीच भावना आहे. मी माझे रडणे आवरू शकत नाही. तो कोण गायक आहे....ग्रेट आहे एकदम! मैं बुरी हू, लेकीन तिहारी हू ...मोरे ख्वाजा मोपर दया करो.. हे ऐकून मी आज प्रचंड रडले. पण आता एकदम हलकं वाटतंय रे. कसला तरी आधार असल्यासारखं वाटतंय. Thank You very much!" तिचा आधार हा शब्द मी ऐकला आणि मला एकदम काहीतरी 'strike ' झाले. कुठल्याही मुलीचा लहानपणीचा सर्वात प्रथम आधार म्हणजे तिचे वडील. नंतर ती मुलगी तो आधार शोधते आपल्या बहिण-भावंडांमध्ये. इथे तर कुणीही नव्हते. मग व्यक्त कुणासमोर होयचं? आपल्याला सतत काहीतरी सांगायचं असतं ते कुणाला सांगायचं? मग आजू-बाजूची मुलं विश्वासू वाटू लागतात. पण हा freeness इतरांना नेहमी खटकतो. कारण मुलगी आहे तर मग ती एवढी open कशी काय? आणि मग अशी मतं बनवली जातात. त्यानंतर ती जेव्हा जेव्हा भेटायची तेव्हा चेहऱ्यावर तो कृतज्ञतेचा भाव सदैव असायचा.
एरवी काहीही ऐकून न घेणारी माझी बायको आज शांत बसून हे सारे ऐकत होती. माझा हात हातात धरत ती मला म्हणाली, " पुढच्या रविवारी बोलवायचे जेवायला?"

- आशय गुणे Happy

माझे इतर लिखाण: http://www.relatingtheunrelated.blogspot.in/

गुलमोहर: 

अप्रतिम लिहिलंय.

दोष कोणाला द्यायचा? संस्कारांना? समाजातल्या संकेतांना? एका कोवळ्या वयात मैत्रीचा आधार शोधू पाहणार्‍या लीनाच्या वागण्याला? तिच्या परिस्थितीला? तिला समजून न घेणार्‍या तिच्या सोकॉल्ड मित्रांना? प्रामाणिक मैत्री माहितच नसलेल्या जुनाट पुरूषी वृत्तीला????????

वर लिहिल्याप्रमाणे छान जमलयं फक्त लीना १५ वर्षाने भेटत असेल तर खालिल उल्लेख जरा बदला कारण थोबाडपुस्तक ७ वर्षापुर्वी आले.

>> मी माझ्या बहिण-भावंडांबरोबर अगर मित्रांबरोबर फेसबुकवर फोटो टाकले की हिच्या प्रतिक्रिया पहिल्या असायच्या.

छान लिहीलयं.. अश्या प्रतिक्रिया येतात कॉलेज मधे .. लोक का उगाच जळ्तात कळत नाही Sad

वा आशय - सुंदर लेखनशैली, वेगळेच व्यक्तिचित्र पहायला मिळाले........ निलिमा म्हणते आहे ते खरे आहे - ते बदलले तर छान वाटेल.

खुप छान लिहीले आहे.

तिचा आधार हा शब्द मी ऐकला आणि मला एकदम काहीतरी 'strike ' झाले.>>>

स्त्रीच्या आयुष्यात येणार्‍या सगळ्या पुरूषांना त्यांच्या नात्यात एकदा जरी हे strike झाले तर तिची परिस्थिती आजच्या पेक्षा खुप वेगळी असेल.

Pages