चैत्रचाहूल

Submitted by जिप्सी on 3 April, 2011 - 02:44

"वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन" सध्या सर्वत्र अशीच स्थिती आहे आणि सर्वांचीच अवस्था "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी झालेली आहे. याला कारण नुकताच सुरू झालेला कडक उन्हाळा. उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास, उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली, घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्‍यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग".

हेमंत आणि शिशिर ऋतुच्या आगमनाने झाडांवरची पानं हळुहळु गळु लागतात. एकेकाळी हिरवा पर्णसंभार मिरवणार्‍या या वसुंधरेची अशी विपन्नावस्था आपल्याला बघवत नाही. सगळीकडे हि धरती अशीच निष्पर्ण, उजाड आणि उदास बसुन आपल्या प्रियकराची, ऋतुराज "वसंताची" वाट पाहत असते आणि अचानक तिला त्याच्या आगमनाची चाहुल लागते. हा ऋतुराजही आपल्या आगमनाची वर्दी देण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दुताला भुतलावर पाठवतो आणि सांगतो, " गा कोकिळा, गा रे, भूलोकीच्या गंधर्वा तु अमृतसंगीत गा रे....." आणि कोकिळही या भुतलावर येऊन आपले काम चोख बजावतो. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच त्याला भेटायला आतुर असलेल्या धरतीची लगबग सुरू होते. हळुहळु झाडांवरच्या फांद्यांना कोवळी, लुशलुशीत पालवी फुटायला लागतात आणि एखाद्या अल्लड मुलीचे नवयौवनेत रूपांतर व्हावे असे हे वृक्ष दिसु लागतात/सजु लागतात. बघता बघता या वृक्षांना कळ्या धरू लागतात, काही कालावधीनंतर त्यांचे फुलात रूपांतर होऊन संपूर्ण वृक्षच फुलांचे घोस मिरवत आपले लक्ष वेधून घेतो. काहि दिवसांपूर्वी अंगावर वस्त्रे नसलेली पुरंध्री नखशिखांत सुवर्णालंकारांनी मढवावी असेच हे वृक्ष पुष्पसंभारांनी लगडलेले दिसु लागतात. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी धरतीही नटु लागते. गडद, हळदी सोनमोहराचा शालू नेसुन, त्यावर मातकट किंवा हलक्या पोपटी रंगाची चोळी परीधान करून, शाल्मली, पंगारा, पळस यांचा लाल/शेंदरी मळवट कपाळी लावून, कानात हलक्या पिवळ्या रंगाच्या बहाव्याचे झुबकेदार कर्णफुले घालुन, अंजन, नीलमोहराचा निळसर साज गळ्यात घालुन, पायात पिवळ्या टॅबेबुयाचे पैंजण बांधून, हातात फिक्कट गुलाबी रंगाच्या कॅशियाची कांकणे लेउन, नाकात पाचुंदाची नथ आणि केसात विविध चाफ्याचा फुलांचा गजरा माळुन, बकुळीच्या मंद सुवासाचे अत्तर लावून, असा सारा साजश्रृंगार करून ती प्रियकर वसंताला भेटण्यासाठी तयार होत असते. या दोघांच्या प्रेमाचा हा उत्सव सगळ्यांनाच सुखावून देणारा असतो आणि तो पाहण्यासाठी मुद्दाम कुठे जायची गरज नसते. आपल्या आजुबाजुला, टेकड्यांवर, शहराबाहेर/गावाबाहेर, माळरानावर, डोंगरदर्‍यांमध्ये यांची कुठेही पाहिलं तरी यांची प्रणयराधना चालु असते. हा उत्सव महिनाभर चालु असतो. वसंताला निरोप देत, या प्रेमउत्सवाची सांगता करत, वैशाख वणव्याचे आव्हान स्विकारत पावसाळा सुरू होईपर्यंत शेवटी बहरतो तो "गुलमोहर".

या ऋतुराजाचे कौतुक सगळ्यांनाच. ऐन वसंतात लाल, पिवळ्या, निळ्या-जांभळ्या, केशरी रंगाने बहरलेले वृक्ष पाहिल्यावर छायाचित्रकाराला त्याच्या कॅमेर्‍यात, चित्रकाराला त्याच्या कॅनव्हॉसवर आणि गीतकाराला त्याच्या लेखणीत कैद करावेसेच वाटणार. निसर्गाच्या या रंगपंचमीची भुरळ आपल्या मराठी कविंनाही न पडली तर नवलच. मायबोलीकर दाद यांच्याच शब्दात सांगायचे तर हि "गानभूल" आपल्या कवींना देखील पडली आहे आणि ती का पडु नये? इतक्या सुंदर दृष्याला/वातावरणाला गद्यात का कैद करावे? चला तर मग असेच काही वसंतगाणी गुणगुणत या "चैत्रचाहुलीचा" आस्वाद घेऊया.

===============================================
===============================================
कुहु कुहु कुहु येई साद, उधळीत वनी स्वरतुषार
मधुर हे तराणे, ऋतुराज आज आला........

सुमनांचे रंग रंग ऋतुरंगीत झाले,
गंधगीत रतीचंचल अवनीवर दरवळले
वारा हा भिरभिर तोडे बंध.....

प्रचि १
कोकिळा

===============================================
===============================================
ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले.......

प्रचि २
वड

प्रचि ३
पिंपळ

===============================================
===============================================
हासत वसंत ये वनी, अलबेला हा
प्रियकर पसंत हा मनी, धरणीला हा

घनवनराई, बहरुनि येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला हा, चाफा झाला पिवळा हा
जाइ जुई चमेलीला, भर आला शेवंतीला घमघमला हा

प्रचि ४
पांढरा बहावा

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७
सोनबहावा

प्रचि ८

प्रचि ९
गुलाबी कॅशिया

===============================================
===============================================
आला वसंत ऋतु आला, वसुंधरेला हसवायाला
सजवीत नटवीत तारुण्याला, आला आला आला

शतरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण,
चैतन्याच्या गुंफित माला, रसिकराज पातला

वृक्षलतांचे देह बहरले, फुलांफुलातुन अमृत भरले
वनावनातुन गाऊ लागल्या, पंचमात कोकिळ

व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुरकाल हा प्रेममीलना
मदनसखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला

प्रचि १०
फिक्कट गुलाबी टॅबेबुया

प्रचि ११
पिवळा टॅबेबुया

प्रचि १२

===============================================
===============================================
ऋतुराज आज मनि आला, ऋतुराज आज वनि आला
नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला

कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला

प्रचि १३
पळस

प्रचि १४
सोनमोहर (पितमोहर)

प्रचि १५

प्रचि १६
काटेसावर (शाल्मली)

प्रचि १७
पर्जन्यवृक्ष

===============================================
===============================================
वसंत वनात जनात हांसे, सृष्टीदेवी जणु नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट

प्रचि १८
वरूण/वायवर्ण

प्रचि १९

प्रचि २०
कौशी

===============================================
===============================================
प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बाग दिलाचा दरवळला

प्रियकर मधुकर धावुन येईल, रसिकराज मधुरुंजी घालिल
मंजुळ गुंजनि सदा रंगविल, ह्या हसर्‍या फुलराणीला

प्रचि २१
कनकचंपा (रामधनचंपा)

प्रचि २२
गुलाबी तामण

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
जांभळा तामण

प्रचि २६

प्रचि २७
गुलमोहर

===============================================
===============================================

गुलमोहर: 

वाह जिप्सी,फार सुंदर प्रचि.
रच्याकने,तुलाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

...

हे असे फोटो काढायचे नसतात मित्रा... लोकांना त्रास होतो ना.... Wink

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

वरील सर्व प्रचि हे मुंबई आणि परिसरातच काढले आहेत. Happy

प्रचि १ — कोकिळा (वसई किल्ला - वसई)
प्रचि २ — वडाचे पान (वसई किल्ला - वसई)
प्रचि ३ — पिंपळपान (वसई किल्ला - वसई)
प्रचि ४, ५, ६ — पांढरा बहावा (जिजामाता उद्यान - भायखळा)
प्रचि ७, ८ — सोनबहावा (सुमन नगर जंक्शन - चेंबुर)
प्रचि ९ — गुलाबी कॅशिया (जिजामाता उद्यान - भायखळा)
प्रचि १० — फिक्कट गुलाबी टॅबेबुया (हिरानंदानी बिजनेस पार्क - पवई)
प्रचि ११, १२ — पिवळा टॅबेबुया (एलबीएस रोड - कांजुरमार्ग स्टेशन)
प्रचि १३ — पळस (पेब किल्ला - नेरळ)
प्रचि १४, १५ — सोनमोहर (पितमोहर) (जिजामाता उद्यान - भायखळा)
प्रचि १६ — काटेसावर (शाल्मली) (वसई किल्ला - वसई)
प्रचि १७ — पर्जन्यवृक्ष (वसई किल्ला - वसई)
प्रचि १८, १९ — वरूण/वायवर्ण (जिजामाता उद्यान - भायखळा)
प्रचि २० — कौशी (जिजामाता उद्यान - भायखळा)
प्रचि २१ — कनकचंपा/रामधनचंपा (हिरानंदानी बिजनेस पार्क - पवई)
प्रचि २२, २३, २४ — गुलाबी तामण (सुमन नगर जंक्शन - चेंबुर)
प्रचि २५, २६ — जांभळा तामण (हिरानंदानी बिजनेस पार्क - पवई)
प्रचि २६ — गुलमोहर (एलबीएस रोड - कांजुरमार्ग स्टेशन)

विक्रोळीहुन घाटकोपरला (रेल्वेने) जाताना उजव्या बाजुस गोदरेज कंपाउंडमध्ये सोनबहाव्याची भरपूर झाडे सध्या बहरली आहे.

मस्तच रे ...आज सकाळिच ऑफिसला येताना काहि झाडांचा फुलांचा बह्रर पाहिला आणि मनात विचार केला प्रकाशचित्रे काढायचा आणि तो तु येथे ईछा पुर्नु केलि

प्रकाशचित्रे अ प्र ति म

ध्यनवाद ..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Happy
सुंदरच योगेश ... मस्त आहेत प्रची Happy

चैत्रचाहूल चे फोटो पाहिल्यावर खर्‍या अर्थाने चैत्र महिन्याची सुरूवार झाल्यासारखी वाटते Happy

Pages