जिंकलेली लढाई

Submitted by किंकर on 17 September, 2011 - 18:35

मायभूमी सोडून परदेशी येऊन स्थायिक झाल्यावर परत गेल्यावर मित्र,नातेवाईक यांना
खऱ्या अडचणी,सद्यस्थिती न सांगता वेगळेच बोलणाऱ्या,
एका अनामिक अनिवासी भारतीयाचे खरे खुरे मनोगत .......

दाखवून जिंकीन गडकोट किल्ले, आणि मुलुख भारंभार
जीवनाच्या लढाईत, आमची मस्ती अपरंपार

आलो सोडून गाव माझा,मागे राहिले घर दार
आतला आवाज ओरडून सांगतो, विसर आता नाही माघार

येण्याचा निर्णय घेतला तेंव्हा, मी एक मावळा होतो
गड समोर दिसताना, चढ सोपा मानीत होतो

लढाईस फुटले तोंड, अन मी पडलो तोंडघशी
दुरून पाहणारे म्हणती, याचा निर्णय नेहमीच धाडसी

लढाईचे वृत्त कळवताना, मी सांगतो होतेय सरशी
आतला आवाज मला विचारी, का तू तुलाच फसवशी

गड चढणे सुरु आहे, फंदफितुरीची भीती आहे
मागील रेटा नेतो पुढेच, लोक म्हणती धडाडी आहे

मन म्हणाले, खिंडीत कोणी गाठण्याआधीच पार कर खिंड
खिंडी पल्याड दुर्बल शत्रू, पकडून काढ त्यांची धिंड

सांगत सहकार्यांना साऱ्या,तुटून पडलो शत्रुवर
हर हर महादेव म्हणत, नजर लावली शिखरावर

सरसावून करता हल्ला, त्रेधातिरपीट शत्रूची
नजरेत माझ्या आता खात्री, भल्या मोठ्या समराची

पुढे काय होईल कोणास माहित,एक भीती अज्ञाताची
आता काय ? हा प्रश्नच नाही झुंज आहे निकराची

शत्रू नमला,गड फत्ते,गुलालाचे उठले लोट
छाती फुगली सेनानीची,प्रेम लाभले आम्हा अलोट

कोणी पुसती, कोणी हसती,
विचारीत रहस्य विजयाचे

मी बोललो, "त्वेषाने केला हल्ला,शत्रूस केले नेस्तनाबूत
धाडस आमच्या नसानसात ,म्हणून गड राहिला शाबूत"

माझे मन पुन्हा ओरडले, अरे हे तू बोलतोस फार
मागचे दोर कापले होते म्हणून,तू नाही घेतलीस माघार

जाऊ दे झाले गेले मनात ठेवून, आनंद घे विजयाचा
शेवटी काय, इतिहास सांगतो मोठेपणा जेत्याचा ...

गुलमोहर: 

विभाग्रज , pradyumnasantu , - आपले आभार .
प्रज्ञा १२३ - लढाई जिंकायची म्हणजे घोड दौड हवीच, धन्यवाद.
UlhasBhide - स्पष्ट अभिप्रायासाठी धन्यवाद.