भेट...????

Submitted by विनीता देशपांडे on 17 February, 2012 - 02:12

"आई निघते ग ! आणि हो आज मी शेखरसोबत खरेदीला जाणार आहे.... उशीर होईल..रात्रीचं जेवण बाहेरच करु " मीनल.
"अग! मीने ऐक तर...येतांना बाबांच औषध घेऊन ये....तसं आहे दोन दिवसांच ...वेळेवर धावपळ नको आठवणीने घेऊन ये." आई.
"हो ग येते आता...".म्हणत मीनल घाईत निघाली.
आज ती खूप आनंदात होती. ऑफिसला हाफ डे टाकला होता. ठरल्याप्रमाणे लंचब्रेकमधे शेखर घ्यायला येणार आणि साखरपुड्याची खरेदी करायची या विचारात मग्न ती ऑफिसमधे पोहचली.
कामात वेळ कसा गेला कळलंच नाही. मीनलने फाईल्स कपाटात टाकत शेखरला मीसकॉल दिला.
आज बाहेर जायच म्हणून डबा घेतला नव्हता...तोच रमा आणि मंजिरीने तिला आवाज दिला.
" शेखर येईपर्यन्त आमच्यासोबत बस जरा " रमा
" दोन घास खा ग, येईलच तो ऐवढ्यात " मंजिरीने डबा पुढे केला.
"गाडीवर असेल...गर्दीपण केवढी असते आजाकाल...." मीनलच्या मनात विचार डोकवायला लागलेत.
तिने घड्याळाकडे बघत परत मीसकॉल दिला.
खरतर शेखर दिलेली वेळ कधी चुकवत नाही.....आज काय झालं....विसरला तर नाही.....शक्यच नाही कालच रात्री याबद्दल फोनवर बोललो.
एक...दिड...पावणे दोन वाजत आले शेखरचा ना निरोप ना फोन. या विचारात तिने परत फोन केला.
"येईल गं....अडकला असेल कुठल्या कामात " रमा.
मीनलचं गप्पांमधे लक्षं नव्हतं. "कुठे गेला शेखर ?....फोन पण उचलत नाही.....? मीनल.
पंधरा दिवसांनी त्यांचा साखरपुडा आहे. माझी आटोपली अजून त्याचीच खरेदी बाकी आहे.
शेखरची वाट बघून कंटाळली होती. "वंदनाताईला फोन लावू का ?" तिच्या मनात आलं.....नको उगीच काळजी करतील.
अडीच वाजले....आता मात्र मीनलची सहनशक्ती संपली....मल्हार...शेखरचा मित्र त्याला फोन लावला. त्यालाही काहीच माहित नव्हते.
त्याचाही फोन शेखर उचलत नव्हता.
आज कुठलेच शूटिंग नसल्याने युनिटवरपण नव्हता...मग हा गेला कुठे ?
" मल्हार मला रींगरोडवर भेटतोस...तिथूनच आपण शेखरच्या घरी जाऊ " मीनल ने मल्हारला फोन केला.
दोघं शास्त्रीनगरला शेखरच्या घरी पोहचले. मीनलने शेजारच्या प्रमिलाकाकूकडून किल्ली आणली आणि कुलुप उघडले.
घरात सगळीकडे पसारा होता. गेल्या आठवड्यात मीनल घर आवरुन गेली होती. परत एवढा पसरा बघून तिला आश्चर्यच वाटलं.
"मीनल...शेखर इतक्यात बदलल्यासारखा वाटला का "? मल्हार.
"हं...मला वाटलं सतत शूटिंगमुळे त्याची झोप झाली नसावी. थकला असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं रे...पण...हा असं कधी वागत नाही" मीनल
" तो मिनाक्षीबद्दल काही बोलला का तुला ? " मल्हार
" हो फोनवर काहितरी सांगत होता.....शिरोळ्याला शूटिंग होती...तिथे भेटली...." मीनल
"कोण ही मिनाक्षी....नवीन आहे का ? " मीनल
"नाही...प्रॉडक्शन हाऊस मधे या नावाची कोणी मुलगी नाही ." मल्हार
"तुला त्याचं विचित्र वागणं खटकलं नाही का?" मल्हार
अरे, तो नेहमीच तसं वागतो. तुला माहित आहे ना ? मीनल पसारा आवरत म्हणाली.
मिनाक्षी....कोण ही...याला कुठे भेटली....कशी आहे....कुठून आली ? प्रश्नांची रांग तिच्या नजरेसमोर उभी होती.
शेखरच्या ओळखीच्यांकडे फोन केले......कोणाचकडे नाही, मग हा गेला कुठे ? या प्रश्नाच उत्तर मीनलला सापडत नव्हतं.
त्याच्या टेबलवर कंप्युटरजवळ कॅमेरा...एक सीडी...आणि काही फोटो सापडले. फोटो शिरोळ्याच्या शूटिंगचे होते. त्यात विशेष काही मिळाले नाही. सीडी आणि कॅमेरा घेऊन दोघेही बाहेर पडलेत. मित्र...नेहमीचे हॉटेल्स....टपरी...ऑफिस सगळीकडे बघून झाले पण शेखरचा काही पत्ता नव्हता. शोधण्यात रात्र झाली.
वंदनाताईला फोन करु का नको या विचारांत असतांना तिला उगाच वाटलं कदाचित त्यांना माहित असेल तो कुठे आहे ते.
आणि माहित नसेल तर....उगाच काळजी वाटेल....कळवायला तर हवं....असो.....माधव जिजाजींनाच फोन करते.
" हॅलो...जिजू शेखर कुठे आहे ....काहि माहिती......"बोलता बोलता मीनलचा बांध सुटला आणि सकाळपासून घडलेलं सारं सांगितलं.
" येईल ग...काळजी करु नको....उद्या मी प्रॉडक्शन हाऊसला सकाळी नऊ-सव्वा नऊ पर्यन्त पोहचतो, तू पण पोहच" माधव
"चल मी पण निघतो. सकाळी पावणे नऊ वाजता मी तुला घ्यायला येतो" मल्हार
"ठीक आहे.." मीनल

"झाली का खरेदी" चप्पल काढत नाही तो आईने उत्सुकतेने विचारलं.
"नाही....शेखरला वेळ नव्हता..."खरं कारण टाळत मीनल म्हणाली.
"वंदनाताईशी बोलली का ?" आई
"नाही...नंतर बोलते...बाळला बंर नाही म्हणून बोलले नाही." मीनल
आधीच बाबांच्या आजारपणामुळे आई काळजीत असते....त्यात नवीन भर नको. हा विचार करत मीनलने आईला सांगायचे टाळले.
शेखरचा विचार डोक्यातनं जात नव्हता. सगळ कसं सुरळीत चाललं होतं, मग मधेच हे काय झालं.
शेखर राजे तिला तिच्या मावसबहिणीच्या मानसीच्या लग्नात भेटला. राहूलचा मानसीच्या नवर्‍याचा मित्र.
भेटी-गाठी झाल्या...आणि केव्हा एकमेकांवर प्रेम झाले दोघांनाही कळलेच नाही. त्याचे आईवडिल बारामतीला आणि एक बहिण ती पुण्यालाच असते. तिचं तीनमहिन्याचा बाळ केदार तो लहान असल्यामुळे साखरपुडा उरकून तीन महिन्यांनी त्यांच्या लग्नाचा मुहुर्त काढला होता.
मीनलचे वडिल रेल्वेतून रिटायर झाले होते. नुकताच त्यांना माईल्ड हार्ट अटॅक येऊन गेला. आई-वडिलांची एकुलती एक बी कॉम नंतर कंप्युटर कोर्स केल्यावर एका पतपेढीत अकाउंटंट म्हणून नुकतीच नोकरीला लागली होती. शेखर व्यवसायाने एक फोटोग्राफर होता. सत्यम प्रॉडक्शन हाऊसमधे कॅमेरामन म्हणून काम करत होत.होता. नव्या सिरिअलचे काम चालु होते. त्याच्या शूटिंगसाठीच तो एक आठवड्यासाठी शिरोळ्याला एका फार्महाउसवर गेला होता. जायच्या आधी मीनलला भेटला...रोज फोनवर गप्पा होत होत्या.
त्याच्या बोलण्यातून काहीच जाणवलं नाही, हं कोणी मिनाक्षी...रघुवीर...उज्वलामामीबद्दल बोलला एक दोन वेळा ......मीनलच्या भोवती विचारांच वलय गडद होत गेलं. शेखरच्या काळजीत रात्रभर झोप लागली नाही. पहाटे पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला.
" मीने...उठ आठ वाजले.....ऑफिस नाही का ?...आज भावेकाकूंकडून पिकोलादिलेली साडी घेऊन ये ग....." आई.
आईच्या आवाजाने दचकून जागी झालेली मीनल काहीच न बोलता बाथरुममधे गेली.
विचारांचा पिंगा सुरु झाला. शेखरला परत फोन करुन बघितला...पण काहीच रिस्पॉन्स नाही.
" अगं डबा तर घे...." आई
अं आज नको....असु दे...म्हणत मीनल निघाली पण.
"ही पोर...पण...".आईचं मन ते काळजीने कासावीस झालं....तिची घाई बघून त्यांना विचारायचा धीर झाला नाही.
ठरल्याप्रमाणे मल्हार आला.
दोघांनी सत्यम प्रॉडक्शन हाऊस गाठलं.......शेखर कालपासून कुठे आहे....कोणालाच काहिही माहित नव्हते.
" मॅडम मी त्याला काल पासून फोन लावतो हाय....पन तो उचलतच नाय....
शिरोळ्यावरुन आलेपासून तेचा पत्ताच नाय....केमेरातील रीळ पन कुठे ठेवली माहित नाय." पटेलसाहेब
तुमाला कलालं तर मला कलवा....पटेल
बापरे! आता याला शोधायचं तरी कुठे ?
या विचारानं तिला घेरी आली.
पोलिसात जाउ या ?मल्हार
नको, माधव जिजूंना येउ दे आणि मग ठरवू काय करायचं ते.
प्रॉडक्शन हाऊस मधला स्टाफ काळजीत होता.......शेखर बेजवाबदार कधीच वागत नसे.
" मी त्याला शेवटचं...हं राजेश कुबेर आठवत म्हणाले, आम्ही सगळे शिरोळ्याहून नरवा परतलो......वॅन मधून सामान काढलं......हो तो बाईक घेऊन गेला. त्यानंतर मात्र भेटला नाही"...सगळ्या स्टाफचं हेच उत्तर होतं. बाईक घेऊन तो गेला कुठे.
नरवा रात्री म्हणजे बुधवारी.... प्रमिलाकाकूंनी तर तो आलाच नाही असे म्हंटले.

मग बुधवारी रात्री हा गेला कुठे. तेवढ्यात माधवजिजाजी आलेच.
"सगळीकडे विचारपूस केली" माधव
" हो..सगळी कडे" मल्हार
"बारामतीला आईबाबांना फोन केला?" माधव
"हम्म...नाही त्यांना काळजी वाटेल म्हणून केला नाही . थांबा लगेच करते" मीनल.
" तिच्या हातून फोन घेत..माधव म्हणाले नको..मी केला होता फोन , तो तिथेही नाही" माधव.
"चलं ..मल्हार तुझी गाडी इथेच ठेव. कार मधे बसा." माधव.
मग आता कुठे जायचं ? मीनलने रडतच विचारलं
पोलीसचौकीत ? मल्हार
"अर्थातच....."माधव

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
एकदा घरी जाऊन बघू? मल्हार
चलं.....बघू? तिघेही शास्त्रीनगरच्या घरी आलेत.
त्या तिघांचे प्रश्नार्थक चेहरे बघून प्रमिलाकाकूंना लक्षात आलं होतं तरी किल्ली देत त्यांनी विचारलच " शेखरचा पत्ता लागला कां ?
"नाही अजून...." मल्हार त्यांना टाळत म्हणाला.
"हं हे घे..... काल त्याच्या नावाने एक पार्सल आले" प्रमिला काकूंनी एक पाकिट मीनलच्या हातात ठेवलं.
"अगं बघ तरी.....कोणाचं, कुठून आहे ते" माधव
मीनलने निमुटपणे पाकिट माधवजिजाजींच्या हाती ठेवले.
घरी आल्यावर शेखरच्या आठवणीने तिला आणखीनच दाटून आले होते. त्याच्या सोबत घालवलेले सगळे क्षण तिला आठवत होते. त्याचा खट्याळपणा..त्याचं चिडवणं. सारखसारखं सरप्राईज़ देणं....त्याचे स्वप्न रंगवून सांगणे. घरभर त्याच्याच आठवणी भिरभिरत होत्या. टेबलवर फोटोफ्रेममधे दोघांचा फोटोपाहून डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला.
"स्वत:ला सावर मीनल " मल्हार फोटोफ्रेम उचलत म्हणाला. ही फ्रेम मी त्याला दोन वर्षापूर्वी गिफ्ट केली होती. अजून सांभाळून ठेवली आहे त्याने.
मीनल चरकलीच....अरे ही फ्रेम त्याला रघुवीर ने दिली.
"रघुवीर..कोण रघुवीर?" मल्हार
रघुवीर,त्याचा मित्र तो त्याला कामशेतला भेटला होता. मीनल
"माझ्या माहितीप्रमाणे त्याचा रघुवीरनावाचा कोणीच मित्र नाही" मल्हार
कसं शक्य आहे ? मीनल ओरडतच म्हणाली. आता तू म्हणशील तू उज्वलामामींना पण ओळखत नाही?
अगं खरच नाही...मीनल मी गंमत करत नाही....ही कोण ?
ज्यांच्यी मेस होती....तुम्ही त्यांच्याचकडे जेवायला जात होते ना. मीनल
आता मात्र मल्हार जाम भडकला.....जस्ट अ मिनीट मीनल , ही दोन्ही नावं मी शेखरच्या तोंडून कधीच ऐकली नाही.
मी त्याला दहावर्षांपासून ओळखतो. उज्वलामामी नाही आम्ही गोविंदमेसमधे जेवायला जायचो.
अरे! इतक्यात तो याच लोकांबद्दल भरभरुन बोलत असे.
माधव त्यांचा संवाद ऐकून गोंधळलेच......तेवढ्यात त्यांनी पार्सल उघडले.
त्यात शेखरच्या नावाचा अडीचहजाराचा चेक होता. सोबत एक चिठ्ठी होती.
नमस्कार शेखरसाहेब,
तुमचे पत्र मिळाले. मनीऑर्डरही मिळाला. पण आता मला याचा काहीही उपयोग नाही. जिच्यासाठी तुम्ही हे पैसे पाठवले ती या जगात नाही. मिनाक्षीला जाऊन वर्ष झालं. तुम्ही कोण आहात? तिला कसे ओळखता ?मला माहित नाही.
हा चेक पाठवत आहे.
धनंजय पेठे
संभाजी चौक,
नगर

पत्र वाचून सगळेच आवाक झाले. हे काय घडतय.....कसं घडतय काहीच उलगडत नव्हतं. हे पत्र...मिनाक्षी..रघुवीर...उज्वलामामी
हे कोण ? हे कोण आणि या तिघांशी शेखरचा काय संबंध ? या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवीत.
"मल्हार, गोविंदमेस कुठे आहे?" माधव
"गोखलेरोडवर" मल्हार
"चल...मीनल तू पण चल. या प्रकराणाचा छडा लावायलाच हवा." पत्र खिशात टाकत माधव म्हणाले.

"काय घेनार शेठ ?" वेटर
काही नको...ओ गोविंदशेठ इकडे या जरा. मल्हार
मी नाय गोविंद....माझा बा तो गोविंद...मी गणेश. बोला काय काम काढलं?
तुमच्या कडे हा मल्हार आणि शेखर राजे जेवायला यायचे आठवतं का ? माधव.
हे हं..अशे कितेक येतात आणि जेवून जातात कोणकोणाला लक्षात ठेवायचं. हं आठवतय थोडं थोडं. बोला...धंद्याचा टाईम हाय बोला लवकर. गणेश
"कोणी उज्वलामामी काम करते का तुमच्या कडे ?" मीनल.
"आयला, ही काम करायची अगुदर...आठनऊ महिन्यांपूर्वीच गचकली." गणेश
गणेशशेठचं बोलणं ऐकून तिघेही हादरलेच.
"आता कामशेत गाठायला हवं." मल्हार
"त्या आधी पोलिसांकडे जाऊन हे सारं सांगितलं पाहिजे." माधव
पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. आम्ही शोधतो ना त्यांना. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो साहेब. फारतर कामशेत पोलिसचौकीत बोलून एक हवालदार सोबत देऊ करेन...हे असं काही नसते साहेब. कुठे गेला असेलं पार्टीबिर्टी करायला. येईल परत.
मल्हार, सत्यमच्या ऑफिसमधून कामशेतमधलं शूटिंग कुठे झालं होतं याचे डिटेल्स घे. माधव यांनी सुचना करत वंदनाला फोन लावला. तिच्या प्रश्नांना थोपवत त्यांनी गाडी कामशेतकडे वळवली.
"रघुवीर.....याला गाठला पाहिजे." माधव
ऑफिसमधून मिळालेल्या पत्त्यावर उजाड माळारान एक पडकं घर आणि विहीर होती. इथे रघुवीरबद्दल माहिती कोण देणार या विचारांत तिघांनी गावातली पोलिसचौकी गाठली. तिथे रघुवीरचे संपूर्ण नाव रघुवीर तानाजी शिर्केआणि त्याच्याबद्दल जे कळले ते ऐकून ते स्तब्ध झाले. मीनलला तर ते ऐकून सुन्न झाली.आपल्या आयुष्यात असं काही घडेलं याची कल्पनाच नव्हती. आता राहिली होती ती मिनाक्षी. ती भेटली शिरोळ्याला....तिच्या वडिलांचं पत्र आले ते नगरहून .मग जायचे कुठे ? नगरला की शिरोळ्याला. काहीच सुचत नव्हते. या तिघांचा आणि शेखरचा काय संबंध?
विचारांच्या गोंधळात गुरफटलेले तिघे पुण्याला पोहचले. रात्र फार झाली होती. प्रसंगाचे गांभीर्य जाणून माधव यांनी मीनलच्या घरी या प्रकरणाची कल्पना दिली. तिकडे बारामतीलाही कळवले. सकाळी नगर आणि शिरोळ्याला जाऊन या प्रकराणाचा छडा लावायचा ठरलं.
संभाजी चौक आला. धनंजय पेठे.......दोनचार दुकानात चौकशी केल्यावर पत्ता मिळाला. निदान यांच्याकडून शेखरबद्दल काही माहिती मिळेल या आशेत ते पेठेंकडे आले. ते तर शेखरला ओळखतही नव्हते. माधवने त्यांचे पत्र पुढे केले. त्यांनी जे सांगितले ते ऐकून तिघेही अचंभित झाले. या तिघांचा आणि शेखरचा नक्की काय संबंध हे कोड उलगडायला एक धागा सापडला होता. तो धागा घेऊन ते शिरोळ्याला निघाले. मीनल, मल्हार आणि माधव यांची अवस्था फारच विचित्र होती. शेखर सुखरुप असू दे या विनवण्या मीनल देवाला करत होती. माधव आणि मल्हार घडलेल्या घटनांना जोडून काय सापडतय याचा अंदाज घेत होते. तेवढ्यात मल्हारच्या मोबाईलवर मॅसेज आला. सत्यमच्या ऑफिसमधून शिरोळ्याला झालेल्या शूटिंगचे लोकेशन आणि ते सगळे राहिले त्या जागेचा पत्ता त्यात होता.
शिरोळ्याला पोहचे पर्यन्त दुपारचे साडेचार वाजले. विचारत विचारत त्या पत्त्यावर ते पोहचले. शेखर कुठे आहे? या तिघांचा आणि शेखरचा काय संबंध? याचे उत्तर इथेच सापडणार होते. फार्महाऊसवर पोहचले तेव्हा शेखर येऊन गेल्याच कळलं.
"साहेबांचा मुक्काम इथचं आहे....कुठ जवळपासकामाला गेलेत रात्री परत येतील." वॉचमनच्या सांगण्याने सगळ्यांनाच हायसं वाटलं.
तो येईपर्यन्त धीर ठेवायलाच हवा..मल्हार
साहेब शूटिंगला आले होते......परत गेले बी .. पन अचानक रात्रीला आले....अजून काय काम शिल्लक हाय ते करुनच येतो म्हनले. मी आमच्या मालकांना विचारलं ते आमचं पाटिल साहेब. ते हो म्हनले....रायलं असेल एखांद काम. काम झालं नसेल म्हनून परत आले असनार...म्हनून इथे एंट्री मिळाली ,आमी असं कधी बी करत नाय.एक रुम दिली हाय. तुमी त्यांच पाव्हनं काय.
बसून घ्या वरांड्यात.
ओ ! रामभाऊ, तुमच्या पाटिलसाहेबांचा फोननंबर देता का? माधव
"हॅलो ,नमस्कार, पाटिल साहेब" माधव
ते येत आहेत. त्यांना या प्रकरणाची थोडी कल्पना दिली आहे. माधव
साहेब...मी हा फार्महाऊस भाड्याने देतो. सत्यमवाले कोणी ओळखीपाळखीतून आले विचारत आणि आम्ही भाडाने दिला त्यांना बास, एवढा काय आमचा अन त्यांचा संबंध.यांच शूटिंग मी तर ते पण नाही बघितलं राव. पाटिल
तीन-चार दिवसांपूर्वी वॉचमनचा फोन आला. कोणी एक साहेब आले. थोडं काम बाकी आहे म्हणून. असं होतं....मी परवानगी दिली. तिघांना काळजीत बघून आणि मीनलची अवस्था बघून ," तुम्ही एवढ्या दुरुन आलात...मी तुमची इथे रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करु शकतो. "पाटिल म्हणाले.
रामभाऊ यांची व्यवस्था करा..सांगत पाटिल गेलेत.
टेबलावर या तिन्ही लोकांचे तपशिल ठेवत मल्हारने धागे कुठे जुळतात हे शोधायला सुरवात केली
हे तिघे आणि शेखर.....
रघुवीर आपल्या बाळंतीण बहिणीला भेटायला कामशेतवरुन नगरला निघाला .....
त्याच दिवशी उज्वलामामी तिच्या वडिलांची तब्येत जास्त झाली म्हणून पुण्याहून नगरसाठी निघाली.
त्याच दिवशी मिनाक्षी आपल्या भावासोबत अ‍ॅडमिशनचे पैसे घ्यायला तिच्या काकांकडे म्हणजे शिरोळ्याला निघाली.
पण ही तर आठमहिन्यांपूर्वीची गोष्ट. मीनलने विचारले. शेखर शूटिंगसाठी दहा दिवसापूर्वी आला होता. मग हे सगळं.....काय आहे?
जिजू.....रघुवीर आणि उज्वलामामीची बस नगरला जाताना शिरोळ्याला थांबली असेल. तेव्हांच मिनाक्षी भावासोबत शिरोळ्याला बसने उतरली. मल्हार
म्हणजेच...हे चौघं शिरोळ्याला बसस्थानकावर भेटले. माधव
हो पण हे चौघं एकमेकांना ओळख नाहीत...मग ? मीनल
एक मिनीट...शिरोळ्याच्या बसस्टॅंडवर चला, तिथे नक्की माहिती मिळेल. माधव
चहाच्या टपरीवाल्या पोरानं सारं सांगितलं आणि तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली.
आठमहिन्यांपूर्वी......मोठा अपघात झाला होता इथे साहेब.
तुमच्याजवळ जे फोटो आहेत ना.....हे साहेब ही मावशी....इथच चहाप्यायला थांबली होती. ती ताई-दादा कोणाची तरी वाट बघत इथच बसली होती.
तो पोरगा कोण आहे?
"हा...मंदार...मिनाक्षीचा भाऊ" मल्हार
जो कोणी पण आहे.....रस्त्यावर तो ठेला आहे ना तिथे केळी घ्यायला गेला .त्या तिकडून हॉटेल आहे ना तिकडून एक सुमो आली बघा खूप जोरात .....काय झालं माहित नाही पण धडक देत तिने फुलवाल्याच दुकान उडवलं...त्या मोचीवाल्याचं दुकान उडवलं.....आमची टपरीच पण नुकसान झालं साहेब. त्या पोराला पण उडवलं...तशी फोटोतली ताई मिनाक्षी...तो दादा.......आणि त्या मावशी मदतीला धावल्या. पण त्यांनाही उडवत गाडी वेगानं गेली साहेब. अख्खा गाव लोटला साहेब. गर्दी झाली. ही तिघे तर जागीच खल्लास झाली. त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात नेले. तो गाडीवाला गेला पळून हातीच नाही दावला बघा...दावला असता ना तर तेला जित्ता नसता ठेवला या गाववाल्यांन. एवढच माहिती साहेब. "
हे ऐकून माधव थरथर कापू लागले.
ए गणप्या काम नाय का ? कोनासंग बोलत बसला....शाळेचा अभ्यास पन करायचा हाय तुला ? आटप पटापटा .टपरीमागून करडा आवाज आला.
" आलो मालक" गणप्या
" ओ सायब, जाणारे समदे गेले. आता हे ऐकून तुम्ही काय करनार....दहा-पंधरा दिवसांपूर्वी एक सायब आला होता चहा प्यायला, तुमच्यावानीच प्रश्न विचारत होता. जरा झकलटच होता. " टपरीवाला
" शेखर...." माधव
"मला नाव नाय माहित. हं पण पत्ता विचार होता या गणप्याला."
"कुणाचा"? माधव
"कुणाच रे गणप्या?" टपरीवाला.
"दवाखान्याचा" गणप्या.

हे ऐकून तिघेही तडक जवळच्या सरकारी दवाखाण्यात गेले.
"हो....थांबा रजिस्टर बघून सांगते." सिस्टर.
"त्यांच्या नातेवाइकांनी नेली की प्रेतं. बाकी माहोती इथल्या पोलिसचौकीत मिळेल.
घाईघाईत तिघांनी शिरोळ्याची पोलिस चौकी गाठली.
"लवकर करा हो साहेब....."मल्हार.
"शोधतोच आहे साहेब......वाईच धीर धरा....."हवालदार. मीनल आणि मल्हारने आत्तापर्यन्त साठवलेला धीर आता सुटत होता.
" हे काय त्यांच सामान होतं ते कालच एका साहेबांनी नेले.नाव...शेखर राजे ही बघा सही." हवालदार
"कोणाचं होतं ते सा..मा..न....." माधव
"त्या प्रेतांसोबत मिळाले होते साहेब" हवालदार
"रघुवीर...उज्वलामामी...मिनाक्षी...चं" मीनल
मीनलची अवस्था फारच वाईट होती. जे घडत होतं ते सार तिच्या आकलन शक्तीच्या पलीकडलं होतं. हे माझ्या शेखर सोबतच का?
"मल्हार....उज्वलामामींच्या वडिलांचा पत्ता काढ..." माधव
तिघांनी शिरोळ्याची धनगरवाडी गाठली.
"उज्वला..."नाव घेताच...म्हातारा चरकला.
"माझं मरण ती घेऊन गेली. आता तुम्ही काय द्यायला आलतं?" म्हातारा
" कालच एक साहेब धोतरजोडी देउन गेला....ही बघा...माझ्या पोरीची शेवटची इच्छा" म्हातारा
एक क्षण माधवच्या डोळ्यासमोर छातीशी एक पिशवी कवटाळलेली रक्तानेमाखलेली उज्वला तरळऊन गेली. आणि त्यांच काळीज भरुन आलं.
तसेच ते तिघं निघाले आणि त्यांनी रघुवीरच्या बहिणीचं घर गाठलं.
"कोन हाय?..." एक क्षीण आवाज आतून आला.
"आम्ही पुण्याहून आलो..." मल्हार. अजून काही सांगायच्या आत ती बाई लहानशा बाळाला घेऊन बाहेर आली....."नका छळू हो...आता अजून काही द्यायच राहून गेलं का?"
कोणी...आ..लं..होतं का? मीनल
बाळाच्या हातातले वाळे दाखवत म्हणाली....माझ्या भावाने घेतले होते...माझ्या बाळासाठी......काल एक साहेब देऊन गेला.
अवसान गिळत...माधव गाडीत बसला.....त्याच्या डोळ्यासमोर उताणा पडलेला रघुवीर दिसत होता.
तडक मिनाक्षीच्या काकांच घर गाठलं.
"हुशार होती हो आमची पोर.....मीच तिला बोलवलं. पैसे घ्यायच्या निमित्ताने भेट झाली असती. असं होणार हे ठाऊक असतं तर मी कधीच बोलवलं नसतं तिला " काकांच्या डोळ्यात पाणी तराळलं.
त्यांनी एक चुरगळलेलं पाकिट पुढे केलं. कालच एक साहेब हे देऊन गेले.
त्या पाकिटात कॉलेजचा फॉर्म होता.
दादा...दादा ओरडत रडत येणारी एक मुलगी माधवच्या डोळ्यासमोर तरळून गेली.
जिजू...शेखर कुठे असेल ? मीनल
"मला माहित आहे.....चला "माधव ने गाडी स्टार्ट करत म्हंटले.
जिजाजींच्या चेहर्‍यावरचे हावभाव पाहून मल्हार चरकलाच. यांना कसं माहित शेखर कुठे आहे तो.
गाडी शिरोळ्याच्या बाहेर पडली....घाट संपला. मंदिराजवळ माधवने गाडी थांबवली.
मंदिराच्या पायरीवर......शेखर तिथेच बसला होता.
शेखर.....शेखर ....मीनल धावतच त्याच्या जवळ गेली. तो धूळीने माखलेला...त्याचे मळके कपडे...डोळ्यातली वेगळीच चमक
बघून मीनल आणि मल्हार दचकलेच.
"इथेच....तुम्ही रक्ताचे डाग पडलेला शर्ट फेकला होता ना जिजाजी...." शेखर
म्हम...ण..जे.....ती गाडी....ते चौघं...तो अपघात...जिजाजी.....
माधव हे ऐकायला होता कुठे.....

(विनीता देशपांडे)

गुलमोहर: 

मला काहीच क्ल्यु लागला नाही? वाचताना एकसंधता जाणवत नाहीये. Sad
पॅरा टाकता आले तर बरे होईल.

माधवच्या हातूनच तो अ‍ॅक्सिडंट झालाय का? Uhoh
तसं असेल तर शेखर ला ते कसे कळले? कुणीतरी विस्कटून सांगा प्लीज.

मला काहीच क्ल्यु लागला नाही? वाचताना एकसंधता जाणवत नाहीये. अरेरे
पॅरा टाकता आले तर बरे होईल.

माधवच्या हातूनच तो अ‍ॅक्सिडंट झालाय का? अ ओ, आता काय करायचं
तसं असेल तर शेखर ला ते कसे कळले? कुणीतरी विस्कटून सांगा प्लीज.>>+१

मला हि काही समजल नाही

निंबुडा +१
आणि तो (शेखर) नरवापासून गायब होता तर मग त्याने कथानायिकेला उद्या शॉपिंगसाठी भेटू, असा फोन कसा केला?

कथाबीज मस्त आहे. पण बर्‍याच पात्रांची गुंतागुंत असलेल्या घटना फारच झपाट्याने घडताहेत. त्यामुळे गोंधळ होतोय. शिवाय शेवट नक्की काय आहे ते कळलच नाही. पुन्हा एकदा नजरेखालून घालून कथा अजून विस्तारानं आणि घटना, शेवट ठळक करून लिहिली तर अतिशय परिणामकारक होईल.

माधवच्या हातूनच तो अ‍ॅक्सिडंट झालाय का?
तसं असेल तर शेखर ला ते कसे कळले? >>
मला वाटते शेखर हातूनच तो अ‍ॅक्सिडंट झालाय म्हणुन

कथाबीज चांगले असूनही... मांडणी अतिशय विस्कळीत आहे.. काहीच क्लू लागत नाहीये..
पुन्हा एकदा लिहायचा प्रयत्न करावा.

मामी आणि प्राजुशी सहमत. कथाबीज छान आहे पण मांडणी अतिशय विस्कळीत आहे.
बर्‍याच ठिकाणी पात्रांचे संवाद, मनातले विचार आणि कथानक ह्यांची सरमिसळ झाल्याने अर्थबोध होत नाहीये. खूप घाई घाईत लिहिलत का? माधव, शेखर आणि अपघात ह्यांचा संबंध लागत नाहिये.
योग्य ठिकाणी परिछेद टाकून आणि शुद्धलेखन सुधारुन परत लिहिलेत तर कथा अजून जास्त प्रभावी होईल. कथेच्या प्रसंगातही सुसुत्रता येईल.

पु.ले.शु.

मला हि काही समजल नाही ... जर माधवच्या हातूनच तो अ‍ॅक्सिडंट झालाय तर शेखर ला ते कसे कळले? --- प्लिज सांगा

विनीताजी कथेत चांगला Suspense आहे.
पण तो Suspense शेवटी Suspense चं राहिला.
शेखर त्या लोकांना मदत का करत होता ? शेवटी माधव का गायब झाला ?
शेखरचा आणि त्या लोकांचा काय सबंध ? जरा सविस्तर लिहा.

१.पंधरा दिवसांनी त्यांचा साखरपुडा आहे. माझी आटोपली अजून त्याचीच खरेदी बाकी आहे.>>> ईथे माझी म्हणजे कोणाची? ( कारण हे सगळे नायिकेच्याच संदर्भात असावेसे वाटते)

२.तिचं तीनमहिन्याचा बाळ केदार तो लहान असल्यामुळे साखरपुडा उरकून तीन महिन्यांनी त्यांच्या लग्नाचा मुहुर्त काढला होता.>>>>>

१ आणि २ थोडे विसंगत वाटत आहेत.

चुका काढण्याचा उद्देश नाही माझा. पण खरच वर सगळे म्हणतात त्या प्रमाणे कथाबीज छान आहे, त्यामुळे विनीता परत एकदा वाचुन अजुन एकदा नीट मांडता आली तर बघ. सगळे नक्किच परत वाचायला येतील. आणि तु एकदा वाचलिस की तुला जमेलच.
हे माझे वै म . याबद्दल वाद नको लोक्स Happy

विनीता पुलेशु.

कथाबीज खरच छान आहे पण कथा उलगडण्यात विसंगती झालेली आहे. पात्रांच्या तोंडी जे संवाद आहेत ते ही नीट पोहोचत नाहीत.

माधवच्या हातूनच तो अ‍ॅक्सिडंट झालाय का?
तसं असेल तर शेखर ला ते कसे कळले ?>>>>> +१