मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग २..

Submitted by सेनापती... on 15 February, 2012 - 12:43

मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग १..

११ फेब्रुवारी १६६० - औरंगजेबाने मुख़्तारखान याला दख्खनेची जबाबदारी सोपवून औरंगाबाद येथे पाठवले.

११ फेब्रुवारी १६७१ - होळीच्या सणाचा फायदा उठवून सिद्दी कासिम याने दंडा राजपूरी येथील सामराजगड़ जिंकला. सिद्दीवर जरब बसावी म्हणून शिवाजी राजांनी जमिनीच्या बाजूने सामराजगड तर पाण्याच्या बाजूने कंसा येथे पद्मदुर्ग बांधले होते. परंतु कालपरत्वे हे दोन्ही किल्ले सिद्दीच्या हाती गेले.

११ फेब्रुवारी १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांवर हल्ला चढवला. त्यात ११ फेब.ला इंग्रजांनी किल्ले अजिंक्यतारा वर ताबा मिळवला.

१३ फेब्रुवारी १६३० - मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.

१५ फेब्रुवारी १७४५ - पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस. पानिपतानंतर वयाच्या १६व्या वर्षी माधवराव पेशवे झाले. उत्तरेत डळमळीत झालेले मराठ्यांचे स्थान त्यांनी आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत पुन्हा वर्चासावाला आणून दाखवले.

१६ फेब्रुवारी १७०४ - औरंगजेबने राजगड़ जिंकून त्याचे नाव नबिशाहगड़ ठेवले. पण मराठ्यांनी तो किल्ला लवकरच पुन्हा ताब्यात आणला.

१७ फेब्रुवारी - वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी.

" ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरूद्ध मी बंड पुकारले !"
"अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी इश्वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे !"
"मी मरून जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही."

- वासुदेव बळवंत फडके ...

१९ फेब. १६३० - श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस , किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र.
(तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )

२१ फेब्रुवरी १७०७ - औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू. खुल्दाबाद येथे कबर. श्री शिवछत्रपतिंच्या मृत्यूनंतर दख्खनेमध्ये उतरलेला मुघल पादशहा अखेर २७ वर्षे झूंझुन महाराष्ट्राच्या माती मध्येच दफ़न झाला.

'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही हे तो उमगला होता.' '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी नगर येथे म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...

२३ फेब. १७३९ -चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

२४ फेब. १६७० - राजगड येथे राजाराम यांचा जन्म .
पालथे जन्मल्यामुळे राजांनी "पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले ...! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील ... !" असे उद्गार काढून अशुभ शंकेचे सावट दूर केले. पुढे १६८९ मध्ये श्री शंभू छत्रपति महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.

२५ फेब. १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब.ला चाकणचा किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला. चाकण उर्फ संग्रामदुर्ग संदर्भात एक छोटीशी पोस्ट मागे लिहिली होती.

२६ फेब १९६६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी.
शनिवारी सकाळी १०-३० वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी देह-विसर्जन.
२७ ला महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना.
मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार.

२७ फेब. १७३१ - शाहू महाराज (सातारा गादी) आणि संभाजी महाराज (कोल्हापुर गादी ) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

२७ फेब.- मराठी भाषा दिन.. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ... !

तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती , मस्तच माहीती !!

मागे पानिपतावर काढलास तसा आता औरंगजेबाच्या आयुष्यावर धागा काढ ! उदंड प्रतिसाद लाभेल !! ( जदुनाथ सरकारचे लेखन वाचले असशीलच तु त्यावरही लिही .)

औरंगजेबाच्या आयुष्यावर ..... हरकत नाही. Happy पण बरेच संदर्भ मला पुन्हा वाचून काढावे लागतील.. Happy सरकार सुद्धा.. Happy

मी लिहिलंय मला आवड कशी निर्माण झाली ते.

सप्त शिवपदस्पर्श या मालिकेतील शेवटचा भाग वाचा.. जमल्यास संपूर्ण मालिका वाचा.. http://www.maayboli.com/node/21940

रोहन,
अतीशय उपयुक्त माहीती... ह्या सर्व दिनविशेषांवर एक सुंदर दिनदर्शिका बनू शकेल...

फेब्रुवारीच्या पहील्या भागात शिवकालातील अजून एका सोनेरी पानाचा "उंबरखिंडीच्या" लढाईचा उल्लेख राहीला काय? माझ्या माहीती प्रमाणे ही लढाई फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यात झाली आहे...

अरे हो रे... उंबरखिंड कशी विसरलो मी.. Sad त्यावर खरेतर एक अख्खा धागाच होईल.. Happy तारीख बहुदा ६ किंवा ८फेब्रुवारी १६६१.. लक्ष्यातच येत नाहीये मला.. Sad

Kartalab khan, at the end of 1660, equipped with a considerable force, descended the Ghats near Lonavala. Shivaji allowed him to enter the thick forest of 9 km in length. There is a village called 'Umber' in this area & pass known as 'Umberkhind'.

The Marathas led by Shivaji ambushed Mughals. Finding himself unable either to advance or retreat, Kartalab khan begged for mercy. Shivaji took possession of entire equipment of Kartalab khan & allowed him to depart.

अरे हो रे... उंबरखिंड कशी विसरलो मी.. त्यावर खरेतर एक अख्खा धागाच होईल.. तारीख बहुदा ६ किंवा ८फेब्रुवारी.. लक्ष्यातच येत नाहीये मला.. >>>> धागा होईल नव्हे एक धागा काढच ही विनंतीवजा आग्रह समज..

महाराज्यांना स्वराज्याच्या भुगोलाचे किती जबरदस्त ज्ञान होते आणी त्यांनी या भुगोलाचा लढायांमध्ये कसा चपखल वापर करून घेतला हे अनेक लढायांमधून सिद्ध होते जसे की अफजखान लढाई, पन्हाळा प्रकरण, सुरत स्वारी. यामध्येच उंबरखिंड लढाईचा पण समावेश होईल... कमीतकमी सैन्य आणी संपुर्ण विजय यामध्ये सह्याद्रीच्या भुगोलाने एका सेनापती सारखीच भुमिका बजावली आहे असे मला वाटते...

माझ्या माहीती प्रमाणे उंबरखिंड लढाई ३ फेब्रुवारी १६६१ ला झालीय....

महाराज्यांना स्वराज्याच्या भुगोलाचे किती जबरदस्त ज्ञान होते आणी त्यांनी या भुगोलाचा लढायांमध्ये कसा चपखल वापर करून घेतला हे अनेक लढायांमधून सिद्ध होते
>>>> महाराजांच्या काळातले नकाशे मिळाले नसले तरी त्यांनी कोकण आणि वर घाटाचे नकाशे बनवून घेतल्याचे टिपण सापडते. दुर्दैवाने आज नकाशे नसल्याने एक महत्वाचा दस्तऐवज नाहीसा झाला आहे. अर्थात त्यांच्या लढायांमधून भूगोलाचा वापर प्रकर्षाने जाणवतोच...

होय.. ३ फेब्रुवारी असेल.. Happy १६६१ हे तर नक्कीच.

मुजरा सेनापती....
उंबरखिंडवरच्या धाग्याची वाट पाहतोय Happy

प्रत्येक घटनेवर सध्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास स्वतंत्र "एपिसोड" लिहून होतील इतके त्याचे महत्व आहे. असे असूनही श्री.सेनापती यानी नेमक्या आवाक्यात त्यावर जे भाष्य केले आहे त्यामुळे वाचकाला त्याविषयी अधिक मिळवून वाचत राहावे अशी जी भावना मनी येते त्याचे श्रेय लेखकाला दिले पाहिजे.

यातील 'राजाराम' घटनांवर माझ्याकडून काही नोंदी ~
१. राजाराम महाराज ~ मराठा साम्राज्याचे तिसरे छ्त्रपती. आमचे दुर्दैव पाहा, थोरल्या छत्रपतींना आयुष्य लाभले अवघे पन्नास. दुसर्‍या छत्रपतींचे आयुष्य ३०, तर तिसर्‍यांचे ३१. शिवाजीराजांच्या ५० पैकी स्थैर्याची वर्षे मोजली तर तीनचारही होत नाहीत. बाहेरच्या शत्रूसमवेत त्यांच्या लढ्याचे कारण समजू शकतो, त्यामुळे त्याना लाभलेला अन्य सरदारांचाही पाठींबा तितकाच लखलखीत. पण घरच्या आघाडीकडे लक्ष देण्यास त्याना जितका अवधी नशिबाने द्यायला हवा होता तो अर्थातच न मिळाल्याने त्यांच्या पश्चात दोन भावात [सावत्र असले तरी] आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या स्त्रीया व त्या त्या गटाचे म्होरके यांच्यात पडलेली आणि अगदी उघड्या डोळ्यांना दिसून येणारी दरी अधिकच खुली झाली.

ज्याना "शिवाजी नंतरचे छत्रपती" असा अभ्यास करावा लागतो त्याना हे समजले तर आश्चर्य वाटते की शिवाजी नंतर ज्येष्ठ्य पुत्र संभाजी नव्हे तर केवळ १० वर्षे वयाच्या राजारामाचा 'दुसरे छत्रपती' म्हणून घाईघाईने (एका गटाने) 'राज्याभिषेक' करवूनही घेतला होता. फूटीची नांदीच होती ती, कारण संभाजीराजेना पाठिंबा देणार्‍यांचीही संख्या लक्षणीय असल्याने त्या गटाच्या हिकमतीवर राजाराम महाराजांचे ते छत्रपतीपद अल्पजीवी ठरले.

संभाजीराजांनी तर ते छत्रपती होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणार्‍यांना यमसदनाला पाठवून देऊन शिवाजीराजांच्या चितेची राख थंड होण्या अगोदरच मराठा साम्राज्याच्या भेगा रूंद केल्या असे इतिहासतज्ज्ञ मानतात. पाठिंबा देणार्‍यांना मारले तरी लहान असलेल्या राजारामाला 'युवराज' पद देऊन त्याचे योग्य ते पोषण मात्र केले. पण कितीही झाले तरी राजाराम हे कधीच 'संभाजी' झाले नाहीत. ज्या संभाजीच्या पराक्रमाची, धाडसाची, मराठा साम्राज्याच्या जाज्ज्वल्य अभिमानाची ज्वाला सतत भडकवत ठेवण्याची त्यांची धमक राजारामासारख्या तशा सौम्य मानल्या जाणार्‍या युवराजात उतरली नाहीच. त्या प्रचंट वटवृक्षाखाली राजाराम नामक रोपट्याची वाढ जोमाने झाली नाही.

या राज्याचे कमनशिब असे की वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी तो नेहमी त्वेषाने आणि पराक्रमाने सळसळणारा पेटता वणवा मोघलांनी विझवून टाकला. संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या कैदेत (अल्पवयीनही होतेच), म्हणून 'राजाराम' तिसरे छत्रपती बनले. पण थोरला भाऊ आणि वडील यांच्यात असणारी जेत्याची जन्मजात लढावू वृत्ती जितक्या जिद्दीने त्यानी दाखविली जाणे गरजेचे होते ते त्यांच्याकडून झाले नसल्याने धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्यासारख्या स्वामिनिष्ठ ज्येष्ठ्य सरदारांवरच औरंगझेबाचे तुफान थोपविण्याची जबाबदारी आली, आणि ती त्यांनी समर्थपणे पेललीही. राजारामांचा बहुतांशी "छत्रपती" पदाचा कार्यकाळ (जवळपास ७ वर्षे) मग तामिळनाडूच्या जिंजीतच गुजरला गेला.

थोरल्या भावाप्रमाणे राजारामालाही ३१ वर्षाचेच अल्पसे आयुष्य लाभले. त्यांच्या मृत्युचेही नेमके कारण इतिहासाकारांना शोधून काढता आलेले नाही. संशयाचे धुके विरले नाहीच.

संपली - अवघ्या तीन छत्रपतींच्या मराठा साम्राज्याची कहाणी. शाहू जरूर चौथे छत्रपती झाले पण ज्या प्रतिकूल परिस्थितीत [मोघलांच्या देखरेखीखाली] त्यांची वाढ झाली होती ती पाहता त्याना राज्याची 'थेट' जबाबदारी पेलवणार नव्हती हे स्पष्ट झाल्यावर त्यानीच पेशव्यांच्या हाती ती सूत्रे दिली व स्वत:साठी पुण्याऐवजी सातारा हेच तिथून पुढे छ्त्रपतींचे निवासस्थान जाहीर केले.

नव्या छ्त्रपतीसमवेत आपल जमणे शक्य नाही म्हणून मग राजारामाच्या पत्नीने 'ताराबाई' [थोरल्या महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या] मग 'कोल्हापूर' इथे पतीच्या नावाने वेगळ्या मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि अगोदरच कमकुवत झालेले छत्रपती घराणे मग भरभक्कम कधीच झाले नाही.

अशोक पाटील

अशोकदा.. पुन्हा एकदा मस्त माहिती.. Happy

राजारामांचा बहुतांशी "छत्रपती" पदाचा कार्यकाळ (जवळपास ७ वर्षे) मग तामिळनाडूच्या जिंजीतच गुजरला गेला.
>>> १६९१ ते १६९६ ते जिंजी येथेच होते. तिथेच त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. १९९६ मध्ये ते दख्खनेत परतले आणि पुढे १७०० साली त्यांचे सिंहगडावर निधन झाले. आजही त्यांची समाधी सिंहगडावर बघता येते.

ताराबाई यांनी तर विलक्षण कमालीने सर्वांनाच विस्मयचकित करून मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. १७०७ नंतर शाहू ऐवजी ताराबाईला महत्व असते तर मराठी साम्राज्याचा इतिहास कदाचित वेगळा असता. पण जर तर ला काहीच अर्थ नसतो. ह्याच ताराबाईला पुढे ४० वर्षे वनवासात खितपत पडावे पगले होते.

सेनापती - फार उपयुक्त माहीती, अरे ११ फेब्रुवारी १६७१ - होळीच्या सणाचा फायदा १६७१ यावर्षी अधीक महीना होता का यावेळी होळी मार्चमध्ये येतेय. Happy
अशोकजी - मस्तच . Happy

अशोकजी आणी रोहन मस्त माहीती...
रोहन तुझ्या राजाराम महाराजांच्या समाधीच्या फोटोवरून आठवले - मी पहील्यांदा जेव्हा सिंहगडावर गेलो होतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या देवघरातले - कदाचित त्यांनी स्वतः पुजलेले - शिवलिंग तिथे समाधीच्या आत होते. सद्यस्थितीत ते तिथे नाही.. Sad . अजून एक - राजाराम महाराजांच्या समाधीच्या आत प्रदक्षीणेला जागा सोडलेली नाही कोणी किरकोळ माणूस आत अगदी अंग चोरून बसू शकला तरच..... असे का असेल बरे?

१६९१ ते १६९६ ते जिंजी येथेच होते. तिथेच त्यांनी राज्याभिषेक करून घेतला>>>> तर मग मराठ्यांचा राजा म्हणून राज्य कारभार विशयक ईथल्या महाराष्ट्रातील मराठ्यांची त्यांचा झालेला पत्र व्यवहार सध्या उपलब्ध आहे का?

मला माहीत आहे मुळ धाग्याला धरून हे नाही ...विशयाला धरून नसतील तर वरच्या पोस्ट मी उडवायला तयार आहे.

होळीच्या सणाचा फायदा १६७१ यावर्षी अधीक महीना होता का यावेळी होळी मार्चमध्ये येतेय.>>>> विचार करण्या सारखी गोष्ट आहे....

शिवलिंग तिथे समाधीच्या आत होते. सद्यस्थितीत ते तिथे नाही..

>>> ते सध्या सातारा जलमन्दिरात आहे. तिथे कोणी नेले हे मला विचारु नकोस... Wink

११ फेब्रुवारी १६७१ - होळीच्या सणाचा फायदा १६७१ यावर्षी अधीक महीना .........

>>चांगला मुद्दा.. Happy मी पुन्हा एकदा तपासतो तारिख.. Happy

महाराष्ट्रातील मराठ्यांची त्यांचा झालेला पत्र व्यवहार सध्या उपलब्ध आहे का?
>>>> हो. उपलब्ध आहे. कोल्हापुर इथे आहे. प्रसिद्ध पण झालाय. ताराबाई कालीन पत्रे असे पुस्तक आहे एक.