सारासार विचार करण्याची कुवत

Submitted by शुभांगी. on 9 February, 2012 - 00:41

"अरे, तुला काय शिव्या दिल्या की मारलं मी इतकं रडायला?" तो ड्रायव्हर बाकिच्या मुलांच्या स्कुलबॅग्ज व्यवस्थित रचत त्या मुलाला विचारत होता. मुलाचं हुंदके देऊन टिपं गाळणं सुरुच होतं. बाकीचे चिडीचुप, काही बोललं तर दादा आपल्याला पण ओरडेल म्हणुन. मुलांचा वयोगट ५-११ मधला आणि ड्रायव्हरही पंचविशीतला. नेहमीपेक्षा जरा चढलेला आवाज ऐकुन आजुबाजुचे पालकही जमले.

सकाळचे ६.४५-७.०० वाजलेले, सगळ्याच शाळांच्या गाड्या, व्हॅन आणि रिक्षा यायची घाईची वेळ आणि रस्त्यावर बरीच मुलं आपापल्या (दप्तर, डब्याची पिशवी सांभाळणार्‍या) पालकांसह इकडे तिकडे हुंदडणारी. रस्त्यावर पळापळी करताना चुकुन स्वतःच्याच व्हॅनसमोर आल्यावर ड्रायव्हरने ओरडल्यावर रडणारा तो मुलगा. यात कुणालाच काहीही चुकीचं वाटल नाही, कारण समोरच्या घटनेवरची ती इंस्टंट रियॅक्शन होती. हा सगळा गोंधळ ऐकुन त्या मुलाचे वडील खाली आले आणि त्या ड्रायव्हरच्या श्रीमुखात भडकावली कारण सगळ्यांसमोर त्या मुलाचा पर्यायाने त्याच्या पालकांचा अपमान झाला होता. सगळ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते पालक काहीही ऐकायच्या तयारीत नव्हते मुलाचे हुंदके फक्त त्यांना दिसत होते आणि ड्रायव्हरचा चढलेला आवाज.

बरं इतक करुनही ते थांबले नाहीत तर मुलाला व्हॅनमधुन उतरवुन ते स्वतःच शाळेत घेऊन गेले आणि जाताना, 'प्रिन्सिपलकडे तक्रार करतो, तुझी गाडीच बंद करतो वगैरे'. तो ड्रायव्हरही वैतागला आणि प्रकरण शेवटी हमरी- तुमरीवर आले.

हे सगळ चालू असताना नेहमीचे बघे, इतर लहान मुलं आणि त्यांचे पालकही होते. प्रत्येकाने या घटनेचा आपापल्या परीने अर्थ लावला. मला तरी हा उगीचच आकांडतांडव वाटला कुठल्याही गोष्टीला अवाजवी महत्व दिल्यासारखा.

पालकांची सहनशक्ती खरच इतकी कमी झालिये का की छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना अपमान वाटतो? शिक्षक रागावले की त्यांच्यावर राग धरला जातो. शिक्षकांनी शिक्षा केली की त्यांच्या तक्रारी अगदी प्रिन्सिपल आणि वेळप्रसंगी (काही दुर्दैवी घटनांमधे) पोलिसांपर्यंत जातात. शिक्षक काही ठिकाणी दोषी असतीलही. मुलांच्या भांडणातही हिरीरीने भाग घेऊन दुसर्‍याला ओरडणे मग त्याचा पालक आला की त्याच्याशी अरेरावी, खरच हे सगळं बरोबर आहे का?

माझ्या लहानपणी एकदा अ‍ॅडमिशन घेतली की नंतर पालक शाळेत फिरकायचेही नाहीत अगदी प्रगती पुस्तकावर सही पण घरून केली जायची. तेवढा विश्वास त्यांचा शिक्षकांवर पर्यायाने आमच्यावरही होता. स्कुलबसचे मामा, आम्हाला बसमधे दंगा केला की दरडवायचे, वेळप्रसंगी फटकेही द्यायचे पण कधीही चुकुन माझे पालक त्यांना विचारायला आले नाहित.

वर्गात शेजारणीचे खोडरबर तिला न सांगता घेतले म्हणुन सरांनी हातावर मारलेली उभी लाकडी पट्टी अजुनही आठवते. ते व्रण नाहीत हातावर पण पुन्हा कुणाला न सांगता त्याच्या वस्तूला हात लावायचा नाही हे मात्र कोरल गेलय मनावर. पट्टी मारल्यावर हात सुजलेला, सरांचा रागही आलेला. माझं सापडत नव्हत म्हणुन दोन मिनिटांसाठी तिचं खोडरबर घेतलं म्हणुन सगळ्या वर्गासमोर हातावर मारलेली पट्टी आणि नंतर केलेला तिर्थरुपांच्या संस्कारांचा उद्धार ऐकुन मेल्याहुन मेल्यासारखं झालेलं. पण घरी सांगायची हिम्मतच नव्हती कारण खात्री होती की सरांनी शिक्षा दिली म्हणजे मुलगीच चुकली असणार हा त्यांचा दृढ आत्मविश्वास.
अश्या बर्‍याच गोष्टी घडल्या आयुष्यात पण आपली चुक होती हे कळल की सगळा राग निवळायचा. आईने शिकवलेलं कुठल्याही गोष्टीवर स्वतःच्या बाजुने विचार करुन रियॅक्शन देण्यापेक्षा तासभर विचार कर सगळ्याबाजुने आणि मग ठरव की पुढचा चुक की बरोबर, हे अजुनही लक्षात आहे. त्यामुळे सकाळच्या घटनेने उगाच स्मृती चाळवल्या आणि माझ्या चष्म्यातुन त्या घटनेकडे बघितल्यावर त्याची तीव्रता कळली.

प्रश्न पुन्हा आहेतच. पाल्याला दोन मार्क कमी पडले तरी शाळेकडे धावणारे आपण, अभ्यासात मागे आहे म्हणुन शिकवण्यांचा भडिमार करणारे आपण आणि तरीही मुलाला कमी मार्कस पडले तर त्याच शिकवणीच्या शिक्षकांशी भांडणारे आपण, मुलाला कुणी वर्गात मारल कळल्यावर लगेच जाब विचारायला जाणारे आपण, सारासार विचार करण्याची कुवत गमाऊन बसलोय का?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सारासार विचार नाही, तर आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा हरवलाय आपण.

परत एकदा माझ्या आवडत्या संगीत नाटक कलाकार जयमाला शिलेदार यांचेच उदाहरण देतो. त्यांची सत्तरी उलटल्यावर त्यांनी खास लोकाग्रहास्तव एक संगीत नाटक केले. त्यातल्या एका पदाच्या वेळी त्यांचा ताल चुकला (पद नाही). हि गोष्ट केवळ त्यांच्या आणि वादकाच्या लक्षात आली. त्या एवढ्या निष्णात गायिका, कि सहज दुसर्‍या तालात ते पद गाऊ शकल्या असत्या.
पण नाही, बाईंनी पद थांबवले. पुढे येऊन प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. रात्रभर प्रवास केल्याने, नाटकाचे पुस्तक वाचायचा आळस केला, म्हणून अशी चूक झाली, अशी जाहीर कबुली दिली. आणि परत पद सुरु केले...

वैचारिक ललीत आवडले, सर्वाना विचार करायला लावणारे आह्चे, पालकानी, अ‍ॅटो, बस चालकानीही विचार केला पाहीजे.

उत्तम ललित,
पालकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही आणि ह्या गोष्टीबद्दल त्यांना असलेला अपराधभाव अशा वर्तनाला कारण असावा. महाग मोबाईल घेतला की जास्त फीचर्स मिळतात तसेच महाग शाळा, क्लास असला की 'ज्ञान' आपोआप मिळेल हे लॉजिकही जबाबदार आहेच!

शुकुचे भाबडे अन वैचारिक प्रश्न Happy

पालकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही आणि ह्या गोष्टीबद्दल त्यांना असलेला अपराधभाव अशा वर्तनाला कारण असावा. महाग मोबाईल घेतला की जास्त फीचर्स मिळतात तसेच महाग शाळा, क्लास असला की 'ज्ञान' आपोआप मिळेल हे लॉजिकही जबाबदार आहेच!
>>>>>>
+ १

छान लिहिलं आहेस...

सारासार विचार नाही, तर आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा हरवलाय आपण.>>>>> +१

पण असे लोक निदान मनातल्या मनात तरी नंतर चुक कबुल करतात की नाही कोण जाने?

रोजच्या प्रवासातही असे अनेक नमुने भेटतात. जिथे उगाचच आकांडतांडव / आक्रस्ताळेपणा करण्याची गरजही नसते, मृदु भाषेत बोलुनही आरामात कामे होउ शकतात तिथे उगीचच इरेला पेटून वाद घालणारी माणसे दिसतात. अशा वेळी खरच प्रश्न पडतो की इतक्या पराकोटीचा राग येतोच कसा? पेशन्स लेव्हल चा थ्रेशोल्ड पॉईंट अलीकडे सरकत चाललेला आहे का? Sad

परवाच मी ज्या रिक्षात बसले होते तिला सिग्नल ला थांबलेली असताना मागून कुठल्यातरी वाहनाचा धक्का लागला. ड्रायव्हरचे डोके सटकले. तरातरा खाली उतरून मागून डाव्या बाजुने पुढे जाणाच्या प्रयत्नात असलेल्या एका सायकलस्वाराचे याने बकोट धरुन म-भ च्या शिव्या चालू! वास्तविक ज्या स्कूटरने धक्का दिला होता ती स्कूटर उजव्या बाजुने पुढे आली व तितक्यात सिग्नल सुटून भरधाव वेगाने तो स्कूटरस्वार पुढेही निघून गेला. आम्हा पॅसेंजरांच्या हे लक्षात आले. पण गैरसमजाने आंधळ्या झालेल्या रिक्षावाल्याला कुणाचेच ऐकायचे नव्हते. बिचारा सायकलवाला गयावया करून सांगत होता की त्याने धक्का नाही मारला पण एक नाही की दोन नाही. सिग्नल सुटल्यानंतरही उगीचच मागच्या वाहनांचा सकाळी सकाळी खोळंबा, चूक नसलेल्याअ व्यक्तीचा अपमान, बघ्या लोकांसाठी तमाशा, आमच्या सारख्या नोकरदार लोकांना गाडी वेळेवर मिळेल ना याचे टेन्शन असा सर्व मामला! इतक करून मिळवलं काय? आपला राग कुणावर तरी काढता आल्याचे समाधान? कशासाठी इतकी खुमखुमी?

आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा हरवलाय आपण.

अगदी पटले.
काही केसेसमधे शिक्षक, रिक्षावाले वगैरेही चुकत असतातच, पण आपणही आपल्या पाल्याचे सुपरहिरो बनून संरक्षण करण्याचा सोस आवरला पाहिजे, हे पटते. 'मोठे' होण्याच्या प्रक्रियेत थोडेफार टक्केटोणपे मिळालेच पाहिजेत. प्रस्तुत प्रसंगात त्या मुळूमुळू रडणार्‍या पोराला नक्कीच चुकीचा मेसेज गेला असेल. (असे मला वाटते.)
Child needs a healthy neglect हे नुकतेच कुठेतरी वाचलेले वाक्य आठवले.

लोकं कंटाळली आहेत, त्रासली आहेत. जीवनशैली, गरजा, ताणतणाव, हरवत चाललेली माणुसकी, नातीगोती, पगारात घर चालवण्यातली ओढाताण, या आणि अशा अनेक कटकटींमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे अवघड होत चाललंय... स्वतःपासूनच तुटलेपण येतंय आणि माझ्या मते त्यातून हे सगळं होतंय... एकीकडे आत अमर्याद प्रेम साठलंय आणि दुसरीकडे "माझं प्रेम समोरच्याला कळतच नाही" अशी द्विधा अवस्था आहे.

फारच फंडेवाईक उत्तर वाटलं असेल.. पण मन शांत तर जग शांत हे सोप्पं उत्तर आहे त्यावर... संस्कार-शिकवण वगैरे गोष्टी समजायलाही तेवढं भान हवं ना!

या उदाहरणामध्ये मुलाला आपले पालक आपल्यावरच्या प्रेमापोटी भावनिक होऊ शकतात यापेक्षा चूक कुणाची आहे न बघताही मनगटाच्या जोरावर आपलं म्हणणं खरं करू शकतात हाच मेसेज जाण्याची शक्यता अधिक!
दुर्दैव!

विचार करण्यासारखी घटना आणि एकंदर परिस्थिती नक्कीच आहे. वर वर साधा सोपा वाटणारा हा प्रश्न गेल्या १५-२० वर्षात अत्यंत वेगाने झालेल्या स्थित्यंतरातुन निर्माण झालेल्या द्विधा किंवा/आणि सांस्कृतिक तसेच समाजाप्रतिच्या वैयक्तिक संभ्रमित आणि आत्ममग्न संकुचित मानसिकतेच्या मुळापर्यंत घेउन जाणारं प्रातिनिधिक उदाहरण आहे. सामाजिक भान आणि जाणीवा पुरेश्या सुसंस्कृत आणि समाजाभिमुख होण्याआधिच मिळालेलं अमर्याद स्वातंत्र्य तसेच सध्याच्या उदारिकरणाच्या वातावरणांत याच गोष्टींचं भान नसताना आर्थिक सुबत्तेतुन निर्माण झालेला अहंकार, दुराभिमान तसेच हाती आलेली सत्ता, हे ह्या आणि अश्या इतरही घटनांच्या मुळाशी असावं. हे भयंकर आहे. समाजाला आणखीनच अविचाराकडे तात्पर्याने असंस्कृतिकडे घेउन जाणारे आहे. वरील उदाहरणांत पालकांची वर्तणुक मुलाची मानसिकता चुकिच्या दिशेने नेण्यास कारणिभुत ठरेल हेही भान त्या पालकाने ठेवलेले दिसत नाही.

कदाचीत विषयाचं भान सुटलं असावं माझं. दिलगीर आहे.

आगाउ, तुमचे म्हणणे पटले नाही. हक्क आणि अधिकार म्हणुन सतत वेळ मागत राहणे आणि वेळ देउ न शकणे ह्या दोन्ही गोष्टींचे अवडंबर सध्या दिसते. ते कारण आहे ही पळवाट होईल.

महाग मोबाईल घेतला की जास्त फीचर्स मिळतात तसेच महाग शाळा, क्लास असला की 'ज्ञान' आपोआप मिळेल हे लॉजिकही जबाबदार आहेच!

>>>
बरोबर आहे. पण सामाजिक वर्तणुकीच्या संदर्भात ज्ञानापेक्षा संस्कार महत्वाचे. अनेक सुशिक्षित, उच्च्पदस्थ ज्ञानी, पदाचा गैरवापर करतांना आणि अलिखित/लिखित सामाजिक नियम/कायदे मोडतांना आढळतात. दुसर्‍याचे ऐकुन घेण्याची वृत्ती असायला हवी. तसेच कुठलाही प्रश्न मारहाणीतुन आणि बळ(सत्ता, पैसा आणि शारिरीक) आहे म्हणुन दुसर्‍याचा विचार दाबुन तात्पुरता सुटेल पण ते योग्य नव्हे ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.

लोकं कंटाळली आहेत, त्रासली आहेत. जीवनशैली, गरजा, ताणतणाव, हरवत चाललेली माणुसकी, नातीगोती, पगारात घर चालवण्यातली ओढाताण, या आणि अशा अनेक कटकटींमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे अवघड होत चाललंय... स्वतःपासूनच तुटलेपण येतंय आणि माझ्या मते त्यातून हे सगळं होतंय...
>>

पुर्वापार हे असच चालत आलय. त्या त्या कालानुरुप त्या त्या वेळचे प्रश्न त्या त्या वेळी सामान्य माणसांसाठी कठीणच असतांत.

एकीकडे आत अमर्याद प्रेम साठलंय आणि दुसरीकडे "माझं प्रेम समोरच्याला कळतच नाही" अशी द्विधा अवस्था आहे.

>>
फारच स्वप्नाळु विचार वाटले.

या उदाहरणामध्ये मुलाला आपले पालक आपल्यावरच्या प्रेमापोटी भावनिक होऊ शकतात यापेक्षा चूक कुणाची आहे न बघताही मनगटाच्या जोरावर आपलं म्हणणं खरं करू शकतात हाच मेसेज जाण्याची शक्यता अधिक!
दुर्दैव!

पटले.

दुसर्‍याचे ऐकुन घेण्याची वृत्ती असायला हवी. तसेच कुठलाही प्रश्न मारहाणीतुन आणि बळ(सत्ता, पैसा आणि शारिरीक) आहे म्हणुन दुसर्‍याचा विचार दाबुन तात्पुरता सुटेल पण ते योग्य नव्हे ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
>>>
शर्विलक, अगदी खर आहे हे. आणि हे भानच हरपत चाललय आजकाल.

मस्त विषय.

पाल्याचे अतिसंरक्षण करण्याची वृती बळावत चालली आहे ह्याबद्दल वरील बर्‍याच प्रतिसादांशी सहमत.

चांगलं लिहीलंय्स गुब्बे...प्रत्येक शब्दाशी रीलेट करता येतंय.

खरय शुकु,
हल्ली पालकांमधेच ही वृत्ती नसते, त्यामुळे सहाजिकच मुलांकडे ही नाही,
क्षुल्लक गोष्टीतही हमरी तुमरीवर येण्याचीच वृ त्ती बळावत चाललीय हल्ली,

तर आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा हरवलाय आपण>>>
सहमत.

ग्रूहीत धरणे ही देखील एक समस्या असावी. सध्या होत असलेल्या सगळ्याच बदलात चुटकी वाजवल्यावर आम्ही सेवा द्यायला हजर अशा मार्केट मुळे समोरच्याच्या मनोवस्थेचा विचार होत नाही.
अजाणतेपणे आपण आपलच घोड दामटत राहतो.

या गोष्टी तर सर्रास सध्या रस्त्यावर जाता-येता अनुभवायला मिळतात! कोणीतरी कोणाचे डोके फोडणे, बेदम चोपणे, चॉपर घेऊन मागे लागणे, आरडाओरडा करून तमाशा करणे, माणसे गोळा करणे, शिवीगाळ इत्यादी इत्यादी प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये खूप पाहिलेत. अस्वस्थ, असंतुष्ट, धुमसणार्‍या मनाने वावरणार्‍या माणसांची संख्या खूप वाढली असावी बहुतेक!

कित्येकदा अशा चिडलेल्या माणसाशी शांतपणे, गोड दोन शब्द बोलले की त्यांचा राग निवळताना पाहिलाय. जरा समजुतीने घेतले तर, त्यांना शांत व्हायला वेळ दिला तर प्रसंग हाताबाहेर जात नाही हेही पाहिलंय. गर्दीत बर्‍याचदा त्यांना चुचकारणारे, समजावणारे कोणी असेल तर तेवढ्यापुरते निभावले जाते. परंतु तो काही दीर्घकालीन उपाय नव्हे व दर वेळेसच त्यांची समजूत पटेल याची शाश्वती नसते.

अशा लोकांबाबत केलेली ही निरिक्षणे :

१. त्यांना राग झटकन येतो. थोड्याथोडक्या गोष्टींवरून डोके सटकते. (कित्येकदा, वेळच्या वेळी न जेवणे इतके साधे कारण असू शकते, किंवा रात्री झोप धड झालेली नसणे, इ. पासून ते मनोस्वास्थ्य बिघडलेले असण्यापर्यंत काहीही कारण असू शकते)
२. दिवसाभरात दुसर्‍या कोणचा राग तिसर्‍याच कोणा व्यक्तीवर निघतो. उदा. आपली चूक नसताना पोलिसमामाने हटकले, पावती फाडली तर त्याचा राग दिवसभरात तिसर्‍याच कोणा व्यक्ती-वाहनावर काढला जाणे. किंवा मालकाने शिव्या दिल्यावर त्या निमूटपणे ऐकायला लागल्या - मग त्याचा राग तिसर्‍याच व्यक्तीवर काढला! असे प्रकार.
३. बारीकसारीक गोष्टींवरून हातघाईला येणे. शब्दाला शब्द वाढविणे.
४. आपली चूक झाली हे मनातून माहीत असते व त्याचाच कित्येकदा राग आलेला असतो. परंतु समोरच्याला आपली चूक कबूल न करणे व त्यावरून गोंधळ घालणे.
५. निव्वळ माज.

दुर्दैवाने अशा वागण्याला, मनाच्या काबूबाहेर जाणार्‍या भावनांना, विचारांना सुनियंत्रित कसे करावे, बेलगाम जीभेला कसे वळण द्यावे याचे शिक्षण शाळाकॉलेजांतून मिळत नाही. घरी-दारी शिकविले जात नाही.

गुब्बे, नेमक लिहील आहे, विषयाची चान्गली हाताळणी.
>>> सारासार विचार करण्याची कुवत गमाऊन बसलोय का? <<<<
बहुधा होय, पण, त्याहुन दुर्दैव आहे की "जे सारासार विचार करतात" त्यान्ना "षंढासारखे गप्प बसुन, मला काय त्याचे असे म्हणत लाम्ब रहाणे" म्हणजेच सारासार विचार असे वाटू लागले आहे.
का नाही तेथिल उपस्थित एकही जण त्या उद्दाम माजोरी पालकाविरुद्ध बोलायला तरी उभा राहिला?
पाल्य येवढ्या तेवढ्याने रडू लागला, पालकाने मुस्काटीत मारली वगैरे पेक्षाही, एकाही जणाच्या मस्तकात तथाकथित कातडीबचाऊ "सारासार विचारामुळे" तिडीक गेली नाही, हे सर्वात जास्त धोकादायक आहे असे मला वाटते.

limbutimbu अनुमोदन ,
मला त्रास होत नाही ना (सध्या) मग मला काय करायचय हा विचार सगळ्या प्रश्नांच मूळ आहे .
मी लहानपणी इचलकरंजीला असताना शेजारचे आपल्या बायकोला दारू पिऊन गुरासारख मारत असताना माझ्या काकानी त्या माणसाच्या कानाखाली असा जाळ काढला होता . दोन मिनिटापूर्वी माझ्या बायकोला मी मारीन नाहीतर पेटवीन म्हणणारा चुकल चुकल माफ करा करायला लागला ,
आज हे केल तर लोक काकानाच तुमच चुकल म्हणतील .

लोकं कंटाळली आहेत, त्रासली आहेत. जीवनशैली, गरजा, ताणतणाव, हरवत चाललेली माणुसकी, नातीगोती, पगारात घर चालवण्यातली ओढाताण, या आणि अशा अनेक कटकटींमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे अवघड होत चाललंय... >> +१, त्यातही आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्याचा अट्टहास. कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी घ्यावे लागणारे प्रचंड कष्ट. today's life has become materialistic Sad
चांगली शाळा, उंची कपडे, महागडी खेळणी, मोठं घर, फक्त यातूनच आपण आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकतो या विचारने माणसं मूळ व्हॅल्यू सिस्टिम विसरत चालली आहेत. Sad
या ललितातला पालक हा त्याच्या पाल्याला किती वेळ देऊ शकतोय या बद्दल मला शंकाच आहे, पण आपण ड्रायव्हरवर ओरडून एकप्रकारे आपल्या पाल्याचं (सो कॉल्ड) संरक्षण करतोय याचं समाधान करून घेत असावा. Sad

अकु, समजाऊन पण सांगायचा प्रयत्न केला तरी मीच शहाणा ही वृत्ती असल्याने बाकिच्यांनी नाद सोडला.

कदाचित तू म्हणतेस तश्या बाकीच्या गोष्टी कारणीभूत असतीलही पण त्या पालकाच्या अश्या वागण्याचा इतरांनी करुन घेतलेला समज्/गैरसमज तर बदलता येवू शकणार नाही.

लिंब्या, षंढासारखे गप्प राहणे म्हणजे सारासार विचार करणे असे नाही. त्याला समजाऊन सांगणार्‍यालाही तुझ्या पोराला कुणी बोलल तर तूला काय वाटेल आणि कारण नसताना माय बहिणीवर उतरणार्‍या माणसाला विकृत समजून सगळे गप्प बसले.
आणि काय घ्या त्याच्यातला संतोष माने जागृत झाला असता म्हणजे पंचाईत झाली असती की आमची Lol
जोक्स अपार्ट, मुलगा का रडतोय? कुणाची चुक आहे याचा कुठलाही विचार न करता फक्त मुलगा रडतोय आणि एखाद्यामुळे रडतोय म्हणुन कुणाच्या श्रीमुखात भडकावणे आणि आपल्या वर्तनाचे जराही दु:ख न बाळगणे याला सारासार विचारशक्ती गमावलिये अस म्हणल तर चालेल नाही का?

हे सगळ या घटने पुरत मर्यादित नाहिये. एकुणातच परस्परभाव कमी झालाय एकतर किंवा दुसर्‍याला तुच्छ लेखण्याची वृत्ती तरी वाढलिये. लोक मधे पडतात आजही पण तू म्हणतोस तसं तमाशा बघणारेच जास्त असावेत म्हणुन तर मी आणि माझं काम भलं, बाकीचे मरेनात का हे प्रमाण वाढतय.

शुभांगी ,
खुप छान मांडली तु आजची परीस्थ्ती ,खरच सध्या सगळे जण इतके बिझी आहेत की आपल्या माणसाना आपण वेळ देवु शकत नाही , हे पटत , रागही येतो . आणी हा च राग कधी ,कुठे निघेल हे सागंता येत नाही.

गुब्बे, बरोबर आहे तुझ Happy
पण त्या शेरास सव्वाशेर मिळायलाच हवा होता.
त्याची कुन्डली तपासली पाहिजे, त्यात सापडेल या घटनेचे मूळ.

केदार, अगदी बरोबर. हल्ली तस होत नाही हे मात्र खरय.

गुब्बे, छान लिहीलंय.

पालकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही आणि ह्या गोष्टीबद्दल त्यांना असलेला अपराधभाव अशा वर्तनाला कारण असावा. महाग मोबाईल घेतला की जास्त फीचर्स मिळतात तसेच महाग शाळा, क्लास असला की 'ज्ञान' आपोआप मिळेल हे लॉजिकही जबाबदार आहेच! >>> +१००

कदाचित, बेगडी 'प्रतिष्ठा' प्रत्येकाच्या मानेवर बसूं पहाते आहे हेही कारण असूं शकेल; त्यामुळें, क्षुल्लक गोष्टीही प्रतिष्ठेचा प्रश्न बनवायची वृत्ती बळावत असावी ! "साला माझ्या मुलाला रडवतो काय ? ", झालं, हाणला जावून त्याला !!

सामाजिक भान आणि जाणीवा पुरेश्या सुसंस्कृत आणि समाजाभिमुख होण्याआधिच मिळालेलं अमर्याद स्वातंत्र्य तसेच सध्याच्या उदारिकरणाच्या वातावरणांत याच गोष्टींचं भान नसताना आर्थिक सुबत्तेतुन निर्माण झालेला अहंकार, दुराभिमान तसेच हाती आलेली सत्ता, हे ह्या आणि अश्या इतरही घटनांच्या मुळाशी असावं. हे भयंकर आहे >>>

+1 शर्विलक, अगदी नेमकं मांडलंय तुम्ही.

रोज ट्रॅफिक मध्ये वाहने चालवणारी अनेक उदाहरणं दिसतात ज्यांना वाहने देणे ही घोडचुक आहे व ज्यामुळे एखाद दोन लोक कुठल्याही क्षणी प्राण गमावतील असे वाटते. पण केवळ आर्थिक सुबत्ता आहे म्हणून रस्तावर ते माज करतात. ज्याकडे पैसा तो मोठा हा समज पसरला गेला व तोच आज रुढ आहे. म्हणून माजाची उतरंडही तशीच आहे.

पालकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही आणि ह्या गोष्टीबद्दल त्यांना असलेला अपराधभाव अशा वर्तनाला कारण असावा >>> मलाही पटले नाही. उलट इथे भाऊ म्हणतात तसे " बेगडी प्रतिष्ठेचा" प्रश्न केला जातो.
आपल्याकडे पालक तसेही खूप जास्त लक्ष देत नव्हते. उल्ट आता पालक मुलांकडे जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करत आहेत. शुकु ह्यांनी लिहिल्यासारखे आधीच्या पिढीत मुलं कुठे आणि कशी वाढली हेच मुळी कळत नव्हते. आत्ताच्या पिढीत तसे नाही. अर्थात कॉलेज लेवलला तू म्हणतोस तसे आहे. पण शाळा लेव्हलला थोडी जागरुकता निर्माण होत चालली आहे. (निदान शहरात, तालुका खेडेगाव इ इ आजही पूर्वीसारखेच आहे)

Pages