साक्षात्कार

Submitted by आनंदयात्री on 8 February, 2012 - 06:25

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

तो म्हणाल्यावर निघाले पालखी घेऊन सारे
तो म्हणाला आणि केला सामुहिक धिक्कार त्यांनी

'मी खरा त्यांच्या कृपेने येथवर सुखरूप आलो'
घडवला सरणावरीही हाच साक्षात्कार त्यांनी

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/02/blog-post_08.html)

गुलमोहर: 

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!>>>> जबरी....

मस्तं गझल..... Happy

क्या बात है!!!!

सगळेच शेर छान. तुलनेत मतला ज...रा कमी प्रभावी वाटला नचिकेत..... आणि तो अजून सुंदर होवू शकतो.

छान गझल. Happy

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी>> मस्त

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!>>खयाल सुंदर , अभिव्यक्ती (मला तरी) जरा संदिग्ध वाटली

तो म्हणाल्यावर निघाले पालखी घेऊन सारे
तो म्हणाला आणि केला सामुहिक धिक्कार त्यांनी>>> सुंदर शेर

रदीफ वेगळीच आहे.

(डोह नितळ आणि निखळ नसतो हे गृहीतक का असावे हे लक्षात आले नाही, उलट काही कवितांमध्ये डोह हा केवळ खोली व गूढता यासाठी योजला जातो व तो नितळ असतो असे अभिप्रेतही असते) Happy

-'बेफिकीर'!

सुरेख गझल, नचिकेता.

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो हा शेर, खयाल फारच आवडला. कित्येक शेर भटांच्या कवितेची आठवण करून देतात. (ही तक्रार नाही. :))

'डोह' बद्दल बेफिकीर यांच्याशी सहमत. डोह गढूळ असलाच पाहिजे असे नाही.

अभिनंदन आणि पुलेशु.

तुझी गझल वाचायला मिळणे हीच ट्रीट आहे!
तुझ्या गझलेतील खयालांची ताकद आवडते!
ए पण तुही सरण, मरण नको आणूस प्लीजच...

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी>>

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी>> साधे, सरळ, पण जबरी!

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो,

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे>> हे मिसरे विशेष आवडले Happy

जुन्या, नव्या दोस्तांचे आभार.. Happy

"कित्येक शेर भटांच्या कवितेची आठवण करून देतात. " - या प्रतिक्रियेवर मी अडखळलो होतो... आणि 'ही तक्रार नाहीये' म्हणालात, मग आता थोडं बोलून घेतो. -
भटसाहेबांची "आकाश उजळले होते" ही गझल, गझल म्हणजे काय हे समजत नव्हतं तेव्हा वाचल्यावर अक्षरश: नि:शब्द झालो होतो. असं काहीतरी लिहिता आलं तर कसलं मस्त होईल असं वाटलं होतं. मग तेव्हापासून सुरू झालेला तिथपर्यंत पोहोचायचा प्रवास एक टक्का झालाय असं आता वाटतंय. नव्याण्णव टक्के बाकी आहे, पण पुढे जायला हरकत नाही... तो 'माझा' प्रवास असेल एवढं मात्र आता उमजलंय.. Happy

मतल्यातला खयाल मात्र नेहमीचाच वाटला.

सहमत. मतल्यामध्ये सोपं, अजून सोपं लिहायचा एक प्रयत्न केला एवढंच सांगू शकेन. Happy

डोह खोल, गूढ आणि गढूळ असतात हे गृहीत धरलंय.

तुझी गझल वाचायला मिळणे हीच ट्रीट आहे!
तुझ्या गझलेतील खयालांची ताकद आवडते!

मनापासून धन्यवाद! Happy

एकसे एक शेर !
सगळीच्या सगळी गझल कॉपी करावी लागेल इथं. सहजता आहे. मीटरमधे मारून मुटकून बसवल्यासारखं अजिबात वाटलं नाही. गेयता असलेले गद्य शेर असं कुठंही वाटलं नाही. वाचतानाच गुणगुणता आले इतकं सौंदर्य आहे गझेलत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शेर वाचतानाच थेट आत पोहोचतोय..

काही तर थेट उर्दू गझलेचं सौंदर्य मराठीत घेऊन आलेत असे शेर आहेत. शेवटचा शेर खूप प्रगल्भ आहे.
अभिनंदन नचिकेत !

( गेले वर्षभर गझल लिहीण्याचा कंटाळा केला होता. तुझ्या या गझलेने ती मरगळ क्षणात गेली. त्यासाठी आभार Happy )

Pages