कंबोडिया आणि ईंडोनेशिया भेट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मला वाचायला जितक आवडत त्याहून कैक पटीने मनातले भाव लिहून काढायला फार फार आवडतात. मी साहित्य पाडणार्‍यातला नाही हे मला खूप चांगले माहिती आहे. त्यामुळे जग काय म्हणेल अशी तमा मला लिहिताना मुळीच नसते. आपण जे जग बघतो तेच जग अनेक जण बघत असतात पण इथे प्रत्येकाची सवेंदना वेगळी आहे. हे स्वान्तसुखाय म्हणून लिहिताना जितके मला दरवेळी जाणवते तेवढे इतर वेळी जाणवत नाही. खूप दिवसांपासून कंबोडियाबद्दल मला लिहायचे होते. काल परवाच मी ईंडोनेशिया वरुन परत आलो. मग तिथे जे काही पाहिले त्याबद्दल प्रवास वर्णन वगैरे नाही पण जे अनुभवल त्याबद्दल लिहू असे वाटायला लागले. तिथे अगदी फिरता फिरता माझ्या मनातील पेन भरभर माझ्या मनात काहीना काही लिहितच होता. इतके जलद गतीने जर मला हाताने लिहिता आले तर कदाचित एक फार मोठे जाडजुड पुस्तक होईल!!!!

पुस्तकावरुन मला आठवल ईंडोनेशिया मधे कितीतरी शब्द संस्कृत आहेत? तिथे ग्रंथालयाला 'पुस्तकायान' असे म्हणतात. आणखी पाट्या वाचल्यात तर कळले 'विद्या', 'प्रपंच', 'अनुग्रह', 'पुष्प', 'भुंगा', 'भाषा', 'सपाता', 'वाहन', 'राजा', 'भुमी', 'मनुष्य', 'कुबेर' हेही शब्द तिथे आहेत. मी काही संशोधक नाही पण मला जर तिथे काही काळ रहायला मिळाले तर मी नक्की शक्य तेवढे शब्द शोधून काढेन. माझ्या आधी कुणी ते काम केलेही असेल. पण हल्लीच जग अस आहे की माहितीचे स्तोत्र अनेक आहेत पण आपल्याला वेळ अपुरा पडतो. शिवाय इतक्या वेगळ्यावेगळ्या विषयांबद्दल माहिती करुन नेमके त्याचे काय करावे हा दुसरा प्रेरणा कमी करणारा प्रश्न पडतो. तेंव्हा सहजगत्या जेवढे श्रवण करायला मिळेल, वाचायला मिळेल तेवढे त्या त्या वेळी ग्रहन आकलन करुन घ्यायचे मग ऐरवी आपली मर्जी आपल्या सोबत असतेच! हल्ली माझ्या ज्ञानाची व्याप्ती मी अशीच कासवगतीने वाढवत आहे. सारखे सारखे पुस्तक घेऊन अभ्यास करण्याचे दिवस गेलेत. पण एकेकाळी ते काम मी मोठ्या आवडीने केले आहे. शाळेत असताना अगदी पुस्तकी किडा हेच विशेषण मला लावले जायचे. तेंव्हा आता खंत नाही की पुस्तके जवळ असून मी तितका त्याला चिकटलेला नसतो. शिवाय सगळीच कामे एकट्यानी करायची म्हंटली की एका मुड मधुन दुसर्‍या मुड मधे शिरायला अवकाश हवा असतो. असा अवकाश महिनोनमहिने देखील असू शकतो. मी ईंडोनेशियातील 'बांडुग' वरुन 'योग्यकर्त्याला' जात होतो तेंव्हा एक डच माणूस ट्रेनमधे मधे मला म्हणाला आमच्या डच भाषेतील सतरा हजार शब्द इथल्या स्थानिक भाषेत आहेत. सुमारे साडे तिनशे वर्ष डच लोकांनी तिथे राज्य केले तेंव्हा मला हे अगदी साहजिक वाटले की डच भाषेतील सतरा हजार शब्द तिथल्या स्थानिक भाषेत आहेत. पण भारतीयांनी... हिन्दूनी कधी कुणावर राज्य केल्याचे माझ्या ऐकीवात नाही. तेंव्हा संस्कृत भाषा, हिंदू संस्कृती इतक्या दुरवर कशी पोचली ह्याचे मला नवल वाटले. काही प्रश्नांची उत्तरे अकस्मात मिळतात. मी कंबोडियामधे एका अंध मुलांच्या शाळेला भेट दिली. तिथे तिथल्या नद्यांची जुनी चित्र अभ्यासपुर्वक काढली होती. त्यात असे लिहिले होते की भारतीय लोक पावसाळा असताना समुद्रात नौका हाकत नसत. तो पाच सहा महिन्यांचा काळ त्यांना कंबोडियातच घालवायला लागायचा. मग ह्या अशा अनेक सहा सहा महिन्यांच्या वास्तव्यात भारतीयांनी आपली कला तिथे जोपासली. हळूहळू त्यांची कला मुळ धरु लागली. अशाच कलेतून मग त्यांचीही मुळे तिथे रुजु लागली. आज कंबोडियामधे 'अंकोर वॅट' नावाचे जे अतिविशाल मंदिर आहे ते अशाच पद्धतीने उभारले गेले असावे असे संशोधकांचे ठाम मत आहे. व्यापारासाठी भारतीय येथून तिथे फिरलेत सोबत त्यांची कलाही त्यांनी जोपासली. एकदा मी म्हणजे सन २००४ मधे बालीच्या 'अमेद' किनार्‍यावर उभा होती. सागर शांत होता. फेसाळ लाट अधुनमधुनच यायची आणि सोबत वाळू न्यायची आणायची. तिथे कुणी माणूस मला नजरेस पडत नव्हता. म्हणून पुढे त्या लाटेत पाय टाकायचे माझे धाडस होत नव्हते. इतक्यात एक काळा छोटासा गणपती एका उभ्या लाकडाच्या टोकावर मी पाहिला. एका नवख्या अपरिचित ठिकाणी गणपती सारखा देव पाहून मला खूप आनंद झाला. एक किडका मुलगा इतक्यात तिथे आला. मी त्याला विचारले हे हिंदू देव.. हिंदू कला इथे इतक्या लांब कशी काय पोचली. तर तो मला म्हणाला हा जो सागर दिसतो आहे ना ह्याच्या दुसर्‍या टोकाला भारत देश आहे. मुख्य म्हणजे व्यापार करण्यासाठी जी लोक इकडून तिकडे गेलीत त्यांच्यासोबत हे देव ही कला इथवर आली. मग प्रश्न पडला त्यांची कला, त्यांची भाषा, त्यांच्या गोष्टी भारतात का नाही पोचल्यात? कदाचित भारत त्या वेली सोनेकी चिडिया असा देश असावा. काही द्यायची कुवत फक्त आपल्याच कडे असावी!

एकट्यानी परदेशात फिरायला जाणे म्हणजे जितकी उत्सुक्ता असते तितकिच भिती देखील असते. पण लागोपाठ सुट्या काही नेहमी मिळत नाही. आणि चालढकल करता करता जेंव्हा वर्ष उलटून जातात आणि आपल्या शारिरिक उणिवा जेंव्हा आपल्याला जाणवायला लागतात तेंव्हा वाटतं नाही जे काही बघायचे आहे करायचे आहे त्यालाही "कल करेसो आज, आज करेसो अभि" ही उक्ती लावावी. नाही तर केंव्हा पाठिचा कणा वाकेल, गुडके दुखायला लागतील, छातीचा त्रास, अमका आजार तमका आजार होईल ह्याचा नेम नाही. असा अगदी खूप टोकाचा विचार करुन मी एकाच दिवशी विमानाची तिकिटे, हॉटेलचे बुकींग करुन टाकले. वेळेवर असे काही करायचे झाले की पैसे पण खूप जातात. पण माणसानी किती योजना कराव्यात आयुष्याच्या हा प्रश्न दरवेळी मनाला पडतो. जेंव्हा वाटेल तेंव्हा आपण पाखरु बनून फिरून याव आणि परत मग आपले घरटे असतेच आपल्याला त्यात महिनेन महिने दिवस कंठायला. हो ना? एकट फिरताना आपले प्रियजन सोबत असते तर... असे कैकदा वाटत राहते. पण फिरण्यात काय मौज असते हे प्रत्येकाला कळतेच असे नाही. ज्याचे त्याचे छंद आणि आयुष्यातले प्राधान्यक्रम वेगळे. त्यामुळे मी आता ढवळाढवळ करणे सोडून दिले आहे.

to be continued..

विषय: 
प्रकार: 

मी साहित्य पाडणार्‍यातला नाही हे मला खूप चांगले माहिती आहे.

बी: तरिही हा लेख अतिशय उत्तम "पाडला" आहेस! क्रमशः बघून खूप बर वाटल. तुझ्याकडून छान छान गोष्टी वाचायला मिळतील म्हणून. शेवटच्या पॅराने तर मला अंतर्मुख केल. इथे जाउन येउ, हे पाहुन येउ--असे मनात लई इमले बांधते पण ट्रिप प्लॅनिंगचा आळस. आता झटकणार. इंडोनेशिया-बाली बद्दल कुतुहल कारण माझे गुरु बालीचे आहेत. असो. छानच लेख.

पुढचा भाग लिही पटकन.. ''ज्याचे त्याचे छंद आणि आयुष्यातले प्राधान्यक्रम वेगळे''.. अगदी बरोब्बर !!!

कल्पुला ही अजून एनकरेजमेंट मिळेल आता Happy

हो नक्की लिहिन पुढचा भाग. तुम्ही मुलीमुले फार छान प्रतिक्रिया देता त्यातून एक वेगळी उर्जा निर्माण होते. पुर्वी मी फ्रान्सवर एक लेख लिहिला होता ओबडधोबड तोहि इथे खूप जणांना आवडला. असो.. धन्यवाद. माझ्या वेळेनुसार करेन लिखाणकाम पुर्ण.

कंबोडियात रामायण वगैरे कथा वर पण नाच असतात, बाली मध्ये असे प्रभाव दिसतात. मी बघून चाट पडले होते.
आत ते तिथे का व कसे होतात ह्याचा इतिहास मला कंबोडियन मैत्रीणीने साम्गितला होता पण मी विसरलेय ती माहीती.. बरीच वर्षे झाली.

तिथे बौद्ध धर्माचा ज्यास्त प्रभाव दिसतो पण.

एकट फिरताना आपले प्रियजन सोबत असते तर... असे कैकदा वाटत राहते. पण फिरण्यात काय मौज असते हे प्रत्येकाला कळतेच असे नाही. ज्याचे त्याचे छंद आणि आयुष्यातले प्राधान्यक्रम वेगळे.

हे एकदम पटलं.!!!
अतिशय छान लेख, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...... Happy

बाली म्हणजेच बलिय प्रदेश. आपल्या भारतीय संस्क्रुती मधे बळि राजा चा उल्लेख आहे. हा बळि राजा जेव्हा पतालात समुद्र मार्गे (सध्याची दक्शिण अमेरिका)गेला तेव्हा या बेटावर त्याने मुक्काम केला. हा बळि विष्णु भक्त होता म्हणुन ह्या बेटां वर अंगकार (विष्णु ) मंदिरे आहेत. तसेच दक्शिण अमेरिका येथे सुद्धा रामाचे उल्लेख आढ्ळतात.
दक्शिण अमेरिका येथे लिमा येथे एका डोंगरावर एका त्रिशुळाची खूण दिस्ते. हाच तो Trident of Lima.
हे सर्व राजे आपले तमिळ वंशिक होते. Spanish आक्रमणात यातला शेवट्चा राजा मारला गेला तो अत्यल्पा (Atahulpa)