....... ए .... वेटर...!!.......

Submitted by मिलिंद महांगडे on 28 January, 2012 - 04:22

संध्याकाळ झाली कि मंग्याची लगबग सुरु होत असे.... त्याची ड्युटी संध्याकाळच्या ७ पासून ते रात्री १-१;३० वाजेपर्यंत ....मग सुट्टी ....! दिवसभर तो मोकळाच... आरामात लोळत पडणे , पाहिजे तिकडे भटकणे..., चकाट्या पिटणे...., हे त्याचं दिवसाचं काम..... मग परत संध्याकाळी सुरु ...!! पूर्वीच्या, पहाटे उठून दुधाच्या पिशव्या आणि पेपरची लाईन टाकण्यापेक्षा हे काम १०० पटीने बरं असं मंग्याला वाटे .....सकाळी लवकर उठायचा कंटाळा हे त्या मागचं मूळ कारण...! बारमध्ये लोक येण्याचा काळ म्हणजे संध्याकाळ पासूनचा, म्हणजे अंधार पडला कि लोक यायचे ... मंद प्रकाश .... सिगारेट - दारूचा मिश्र वास ....क्वचित एखाद्या जुन्या गाण्याची सुरावळ.... गिर्हाईकांचा गोंधळ ... आणि मंग्या व इतर वेटर्स ची लगबग हे करिश्मा बारमधल रात्रीचं नेहमीचं दृश्य ....
संध्याकाळी सात वाजता बार मध्ये पोहोचल्यानंतर वेटरचा गणवेश घालून मंग्या ऑर्डरी घेण्याच्या तयारीत उभा असे....खरं तर त्याला हा ड्रेस बिलकुल आवडत नव्हता .... शाळेचा गणवेश घातला असता तर हा गणवेश नशिबी आला नसता असं कधी कधी त्याला वाटे .... पण तो विचार मंग्या लगेच झटकून टाकी... जे झालं ते झालं... आता परत मागचं आठवून दुःख कशाला करत बसा..?? तो आपलं काम व्यवस्थित करीत असे.... नीट ऑर्डरी घेऊन चांगली सर्विस दिल्याने बारचा मालक गोपाळशेट्टीने त्याला लगेच बढतीही दिली....म्हणजे एसी रूम मध्ये वेटरची बढती....!! त्यामुळे मंग्या आणखीनच खुश झाला.... नाही म्हटलं तरी एसी मध्ये येणारे लोक हे जरा हाय प्रोफाईल असतात..... आणि इथे बाहेरच्यासारखा गोंधळ, गोंगाट नसतो....त्यामुळे मंग्याला इथे काम करायला बरं वाटे.....
घेतलेल्या ऑर्डर्स त्या त्या टेबलावर पोहोचवल्यानंतर टेबलवरच्या गिर्हाईकांच्या गप्पा गोष्टी ..., विनोद...., भांडणे... ऐकायला त्याला भारी गंमत वाटे.... त्याचा छंदच झाला होता तो....! जसजशी दारू चढे तसतशा त्यांच्या गप्पा रंगत .... मंग्या त्यांच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने उभा राहून ऐकत असे.... माणूस एकदा प्यायला कि तो कि तो लहान होतो ...., कदाचित आपलं हरवलेलं बालपण थोड्या वेळासाठी का होईना पुन्हा अनुभवता यावं म्हणून माणसं पीत असावीत .... असा एक विचार त्याच्या मनाला चाटून गेला.... बारमध्ये काही नेहमीची गिर्हाईके असायची , तर काही शनिवार - रविवार सुट्टीचा दिवस गाठून आलेली.... आजही तो तीन-चार टेबले एकाच वेळी सांभाळत होता... एक होतं ते नेहमीचं गिर्हाईक - दोन रिटायर्ड झालेले गृहस्थ ... ! ते नेहमी येऊन बसायचे ... आपल्या व्यतीत केलेल्या आयुष्याबाबत बोलत बसायचे ..., आज शनिवारची रात्र असल्याने तशी गर्दी होतीच ....! तीन चार लोकांचा एक ग्रुप होता , त्यांच्या कपड्यांवरून आणि वागणुकीवरून ते बरेच श्रीमंत असावेत असा मंग्याने अंदाज केला . त्याचवेळी एक पाच जणांचा तरुणांचा घोळका आत शिरला... त्यांना बसायला जागा करून देऊन मंग्या त्या श्रीमंत लोकांच्या टेबलपाशी गेला... त्यांनी विस्की मध्ये काय आहे ते विचारलं...." विस्की मध्ये सिग्नेचर ,मक्डोवेल ,ब्लेंडर्स प्राईड , रॉयल स्टाग , इम्पिरियल ब्लू आहे सर..." मंग्याने त्याला पाठ असलेली सगळी नावं सांगितली... त्यांनी ब्लेंडर्स प्राईड , सोडा , मसाला पापड आणि चिकन -65 ची ऑर्डर दिली . मंग्या ती ऑर्डर आणायला जाणार तेवढ्यात त्या रिटायर्ड गृहस्थांच्या टेबल हून हाक आली ... त्यांनी आपली नेहमीचीच ऑर्डर दिली.... एक चपटी , दोन ग्लास आणि रोस्टेड पापड.....! खरं तर त्यांनी ती ऑर्डर दिली नसती तरी मंग्याने सवयीप्रमाणे तसं सगळं आणलंच असतं..... ते सगळं आणून त्यांच्या टेबलवर ठेवत असताना त्या दोघा गृहस्थाचं बोलणं त्याच्या कानावर आलं ...
-- " घरात सगळे असले कि कसं बरं असतं नै.... नाईतर सगळं घर खायला उठतं..."
-- " आमच्या घरात तर नुसता तमाशा असतो , तीन मुलं , त्यांच्या बायका... नातवंड ... इतका गोंधळ कि मला घरात बसवतच नाही..."
--" नशीबवान आहात राव ... भरल्या गोकुळात राहता की ...!!! आमच्याकडे बोलायला माणूस नाही... मुलगा यु. एस. ला असतो .... घरात फक्त ही आणि मी.... दिवसभर बोलून बोलून काय बोलणार...?? वैताग येतो .."
--" अहो , बरं आहे कि मग.... घरात शांतता पाहिजेच... डोकं बधीर होतं नाहीतर...."
मंग्याने विचार केला , ह्या दोन्ही माणसांची परिस्थिती वेगवेगळी होती , त्यांना प्रत्येकाला दुसऱ्याची परिस्थिती चांगली वाटत होती... हे म्हणजे प्रत्येकाला दुसऱ्याचा ग्लास आपल्या ग्लास पेक्षा जास्त भरलेला असल्यासारखा वाटतो तसं झालं ..... गंमतच आहे ....! इतक्यात त्याला मघाशी आलेल्या तरुणांच्या टेबल हून हाक आली... तो तिथे गेला ... त्यातल्या एकाने विचारलं , काय काय आहे म्हणून... मंग्याने पुन्हा पाठ असलेली यादी त्यांना ऐकवली...त्या तरुणांचं काय घ्यायचं ते नक्की ठरत नव्हतं ... त्यात एकाने पिणार नसल्याचं जाहीर केलं....का तर शनिवार आहे म्हणून....! मग सगळ्यांनी त्याला " ए भाव खातो का ? , आमच्याबरोबर बसायचं नाही का..?? , पी नाईतर मार खाशील ..." वगैरे वगैरे सुनवलं.... मंग्या कुतूहलाने ते सगळं पहात होता.....खरच , जगात मित्र नसते तर माणसाचं काय झालं असतं कुणास ठाऊक.....? आयुष्यरुपी रोस्टेड पापडाला मसाला पापड करण्याची किमया असते ती फक्त मित्रांमधेच ....!
शेवटी ' तुला काय ..? तुला काय...?? ' अशी बरीच विचारा विचारी झाल्यानंतर त्यांनी ३ बडवायझर , लार्ज स्मर्नोफ , चणाडाळ, १ पेप्सी , चिकन लॉलीपॉप , व्हेज क्रिस्पी अशी भली मोठी ऑर्डर दिली.... त्यांची ऑर्डर आणून देतो न देतो , तोच त्या तीन श्रीमंत वाटणाऱ्या लोकांच्या टेबल वरून हाक आली... त्यांना आईस क्यूब , आणि सोडा आणून देत असताना त्याने ऐकलं...
-- " मेहता साब तो आजकाल मिलते हि नही....."
--" कूच नही साब , अपना वो बदलापूरवाला साईट चालू है इसी लिये थोडा बिझी हु... ! आपका होटल कैसा चल राहा है...??
-- " आजकल होटल लाईन में बी कूच नही राहा ... मै एक प्लॉट देख राहा हु .... अग्रीकल्चर है....एन . ए . हो सकता है क्या ...??
-- " हा ... हो तो सकता है........एक बात बोलता हुं वो सुनो.............."
तो समोरचा कसली ' बात ' सांगणार हे मंग्याला ऐकायचं होतं... पण इतक्यात...,
-- " अरे मित्रा.... जरा इकडे ये...." मंग्यासाठी मारलेली हि हाक त्या तरुणांच्या टेबल वरून आली होती.... हि त्या लोकांना थोडीशी ' चढल्याची ' खुण होती.... लोकांना चढली कि ते बॉस , मित्रा , भावा , असल्या नावांनी हाक मारतात , तर काही जणांना चढल्यानंतर ते जास्तच शहाणपणा करायला लागतात ... ते इतरांना तुच्छ समजतात , असली माणसं मंग्याला बिलकुल आवडत नसत.... मग तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करी , आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स मुद्दाम उशिरा आणी.... हे मंग्याला नेहमीचंच होतं. तो तिकडे गेला . " मित्रा , आपल्याला आणखी २ बियर , आणि चणाडाळ घेऊन ये..... " मंग्या बियर सर्व्ह करत असताना ....
--" काय बोलतोयस सुन्या ....?? काय म्हणाली ती....??
--" आधी काही बोलली नाही ... पण आज परत भेटल्यावर ' हो ' म्हणाली...." तो सुन्या कि कोण होता त्याने हे सांगितल्यावर एकच गलका केला त्या पोरांनी... ! सगळ्यांनी चियर्स करायला एकदम आपापले ग्लास उंचावले....मंग्या मजेने ते सर्व पाहत होता... त्याला सुरेखाची आठवण झाली.... आता कुठे असेल ती....?? काय करत असेल....?? आपल्याला तर ती विसरूनच गेली असेल आत्तापर्यंत....!!
-- " ए वेटर ..." त्याला कोपऱ्यातल्या एका टेबलवरून हाक आली . एक ३०-३५ वयाचा माणूस नुकताच बार मध्ये आला होता..... आणि त्याला बोलावत होता.....त्याने फक्त विस्कीच्या लार्ज पेग ची ऑर्डर दिली... मंग्या तो घेऊन येत असताना त्याने पाहिलं कि तो माणूस फोनवर कुणाशीतरी बोलत होता....
-- " हे बघ, आम्ही फक्त एकत्र काम करतो.....तुला वाटतं तसं काही नाही...तुझा काहीतरी गैरसमज झालाय.....मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही...." पलीकडून कोण बोलत असावं ह्याचा मंग्याला थोडा अंदाज आला....
-- " अगं पण..... प्लीज ऐक..., घरी ये...... हेलो ....हेलो.... हेलो ....." पलीकडून फोन कट केला असावा.....त्या माणसाने रागाने फोन टेबलावर आपटला.... आणि समोरचा पेग एकाच दमात पिऊन टाकला.... नक्कीच काहीतरी भानगड असणार..... त्या माणसाने आणखी एक लार्ज पेग मागवला....मंग्या विचार करू लागला ,.... की बार हि जगात अशी एकच जागा आहे की इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळे मूड्स घेऊन येतात.... कुणी पोरगी पटली म्हणून आनंद साजरा करण्यास ...., तर कुणी घरात वेळ जात नाही म्हणून.... , कुणी बिझनेस संदर्भातल्या गोष्टी करण्यास ...., तर कुणी बायको सोडून गेली त्याचं दुखः विसरण्यास...., सगळ्यांना एकच ठिकाण आठवतं ते म्हणजे बार...! आता बराच वेळ झाला होता.... बाराला दहा मिनिटे बाकी होती .... जवळपास सगळ्या टेबलांच उरकत आलं होतं.....आता कोण किती टीप देतं ह्याकडे मंग्याचं लक्ष लागलं .... तो हा विचार करत असताना त्या रिटायर्ड गृहस्थांनी बिल मागवलं....इथे काहीही टीप मिळणार नाही हे त्याला माहित होतं....त्याने बिल आणून दिलं , आणि त्या तरुणांच्या टेबल पाशी उभा राहिला..... त्यातल्या दोन -तीन जणांना खरोखरच चढलेली होती.... त्यांचा गोंधळ चालू होता....एक जण तर आणखी प्यायची आहे असं म्हणत होता... पण त्यांच्यातल्या त्या न पिणाऱ्या मित्राने सगळ्यांना सावरायचं काम केलं... सगळ्यांनाच चढल्यावर न पिणारे किंवा कमी पिणाऱ्या लोकांवर नेहमीच हि अवघड जबाबदारी येत असते हे मंग्याने अनेकदा पाहिलं होतं..... बाकीचे काहीही बरळत होते...
-- ' आपल्याला काय जास्त चढलेली नाय....'
-- ' आपण अजून २ कोटर मारू शकतो....'
-- ' ए बिल मी देणार....मित्रा त्याच्याकडून घेऊ नको रे ...' हे मंग्याला उद्देशून होतं.....मंग्याला एकाच वेळी ३-४ जणांनी पैसे देऊ केले ..... आता कोणाचे पैसे बिल म्हणून घ्यावे ह्याचा त्याला प्रश्न पडला....त्यातल्या त्यात ज्याने जास्त आग्रह केला त्याच्याकडून त्याने बिलाचे पैसे घेतले.....त्यांनी टीपही चांगली दिली... मंग्या खुश झाला.... त्यामानाने त्या श्रीमंत वाटणाऱ्या लोकांनी अगदीच किरकोळ टीप बडीशोपच्या वाटीत ठेवली.... ' लोग बडे है , लेकीन दिल बडा नही .... ' ह्याचा त्याला प्रत्यय आला .... आता एकच शेवटचं टेबल राहिलं... त्या माणसाने बरीच दारू प्यायली होती.... मंग्याला त्याची काळजी वाटू लागली.... आता जवळजवळ बार बंद व्हायची वेळ आली होती ... मंग्याने त्या माणसाला हळुवारपणे त्याबाबत जाऊन सांगितलं....त्याने कसेबसे मागच्या खिशातून पाकीट काढलं.... पाकिटात त्याच्या बायकोचा फोटो होता.... तो बराच वेळ फोटो पाहत राहिला.... खरंच त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम असावं असं मंग्याला वाटलं....' साहेब , त्या नक्की परत येतील ,तुम्ही काळजी करू नका...' असं मंग्याला त्याला सांगावंसं वाटलं... पण तो शांतच राहिला... त्या माणसाने बिलाचे पैसे काढले.....टीप देण्यासाठी आणखी पैसे तो काढू लागला...' राहू द्या साहेब... टीप नको ' मंग्या त्या माणसाला बोलला .... त्याने डोळे किलकिले करत काहीशा आश्चर्याने मंग्याकडे पाहिलं ...... तरी त्याने टीप ठेवली आणि निघून गेला... स्वतः दुःखी असतानाही त्या माणसाने आपला विचार केला ह्याबद्दल मंग्याला आश्चर्य वाटले... त्याने कृतज्ञतेने त्या जाणाऱ्या माणसाकडे पाहिलं, ते पैसे खिशात टाकले , आणि तो ते शेवटचं टेबल साफ करू लागला.....

गुलमोहर: 

आवडली

चांगली आहे. पण त्या माणसाच्या बायकोचा फोटो, 'सुरेखाचा' असेल का याची उत्सुकता लागली असतांना, केवळ आपल्याला मोठ्या मनाने, त्याने टीप दिली म्हणून खूश झाल्याचा शेवट थोडा सपक वाटला. अर्थात, तुम्ही याचा विचार केला असेलच... छान Happy

मस्त

पण त्या माणसाच्या बायकोचा फोटो, 'सुरेखाचा' असेल का याची उत्सुकता लागली असतांना

>> Uhoh असा उल्लेख कुठाय कथेत?