शीर्षकगीत झलक: मायबोली आविष्कार - (saee)

Submitted by सई. on 25 January, 2012 - 01:47

ऑक्टोबर महिना माझ्यासाठी एक नवी योजना घेऊन उजाडला. दक्षिणाने एक मेल मला ऑफ़िसच्या मेलवर फॉरवर्ड केली ज्यात योगने, मी मायबोली शीर्षक गीत गाण्यात इंटेरेस्टेड आहे का असं विचारलं होतं. त्यापाठोपाठ जीमेलवर दिनेशचीही मेल आली की अशा प्रकारचं एक गाणं केलं जाणार आहे आणि त्यासाठी तू योगशी लगेच संपर्क साध. खूप दिवसांनी मायबोलीशी संबंधित काहितरी करायला मिळणार होतं, नेहमीपेक्षा वेगळं. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी मी योगला मेल केली. ही गोष्ट ४ ऑक्टोबरची.

खरं सांगायचं तर गेली ३-४ वर्षे मी तशी गाण्याच्या टचमधे नाही. जे काही सुरु आहे ते घरच्या पातळीवर आणि स्वत:साठी किंवा चिरंजिवांसाठी. मुळात नक्की प्रोजेक्ट काय असणार आहे, कितीजण त्यासाठी इच्छुक असतील, मायबोली तर गुणीजनांची खाण आहे त्यामुळे योगवर उत्सुक पार्टीसिपण्ट्स्चा पाऊस पडला असेल असे विचारही मनात येऊन गेले. त्यात आपला कुठे पाड लागणार आणि चढाओढ असेल, आपलं घोडं पुढे दामटावं लागणार असेल तर त्यातही आमचं घोडं पेंड खात असल्यामुळे एकंदरीत सुरुवातीला मनात साशंकताच जास्त होती. पण संध्याकाळी प्रत्यक्ष BB वर डोकावले आणि योगने थेट काय लिहीलय ते वाचलं. त्यानं खूप सहजच ते सगळं मांडलं होतं आणि जर त्यानं निवडलं तर तो म्हणेल तसं करत जाऊ अस ठरवलं. काहीवेळा स्वत:ला दुस-यावर सोपवूनही बघावं, सगळ्याचा निकाल आपणच ठरवू नये, नाही का?

दक्षिणाने सर्वांशी बोलून रिहर्सलसाठी २२ तारिख ठरवली. विवेक देसाईंकडे भेटायचे ठरले. मग योगने चाल पाठवली. घरचा पीसी बंद आणि मोबाईल नादुरूस्त होता. दुसरा बेसिक फोन वापरत होते त्यात नेमकी गाणी ऐकण्याची सुविधा नव्हती. नव-याच्या लॅपटॉपवर ऐकण्यासाठी हेडसेट सापडेना, घराच्या शिफ्टिंगमध्ये असाच कुठेतरी डाव्या उजव्या हाताने ठेवला गेला होता. दक्षिणाला डाऊनलोड करायला सांगितलं तर तिच्या ऑफिसमध्ये ती परवानगी नाही. शिवाय फाईल्स MP3 असल्याने मलाही त्या माझ्या ऑफिसमध्ये डाऊनलोड करता आल्या नाहीत. एकदा प्रयत्न केला तर कसं कोण जाणे, पण त्या फाईल्सनी ऑफिसच्या ईमेल्सचं सगळं ट्रॅफिक जॅम करून टाकलं. तो सगळा गोंधळ आमचे सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर रात्री २-२.३० पर्यंत निस्तरत बसले होते. आणि हे सगळं मला दुस-या दिवशी समजलं. एका साध्या गोष्टीत कित्ती अडचणी याव्यात?? २२च्या रिहर्सलला जाईपर्यंत मी ते गाणं एकदाही ऐकू शकले नाही. मग अर्धा तास अगोदर गेले आणि थोडंफार ऐकलं. पण गाणं अवघड होतं, आणि प्रत्यक्ष योग आला तेव्हा तर मी जवळजवळ ब्लँक होते. पद्मजा नावाची चिमणी, स्मिता, विवेक, मी आणि योग असे पाचजण जमलो. सर्वांना पहिल्यांदाच भेटत होते. मायबोलीकरांच्या नव्या ओळखी नेहमीच आनंद देतात.

योगने आल्या आल्या आम्हाला सगळ्यांना गाण्याच्या प्रती दिल्या. गाणं वाचल्यावर भारावूनच गेले मी! काय अप्रतिम लिहिलंय हे. आपल्या मायबोलीचं अगदी चपखल वर्णन आलंय त्यात. मायबोलीचा एकही गुणविशेष त्यातून निसटलेला नाही. कशी सुचली असेल मायबोलीचं नेमकं मर्म सांगणारी इतकी नेटकी शब्दरचना? 'सा-या कलागुणांना दे वाव मायबोली' ने बहरलेला गुलमोहर डोळ्यांसमोर उभा राहिला. 'चर्चा मतांतरांची अन् वादविवादांची' वाचून पदर खोचून तावातावाने एकमेकांवर तुटून पडणारे सगळे यशस्वी कलाकार नजरेसमोर तरळून गेले :स्मित: सलाम आहे कविराजांना! आणि त्यावर कळस म्हणजे त्या शब्दांसाठी बांधलेली अर्थपूर्ण स्वररचना. किती अवघड आणि सहसा गेय काव्यात कुणी वापरत नाही असे दुर्गम शब्द आहेत त्यात. तरीही चाल ऐकताना ते शब्द जराही कानावर खरचटत नाहीत, ही खरी कमाल. गाण्याची तारिफ झाल्यावर योगने अथपासून इतिपर्यंत सगळं गाणं आम्हाला शिकवलं. प्रत्येकाकडून ट्रॅकवरही म्हणून घेतलं. कोणाकडून काय चुकतंय, कुठे सुधारणा हवीये ते प्रत्येकाच्या कॉपीवर स्वत: लिहून दिलं आणि त्यावर काम करायला सांगितलं. आमची अशीही चर्चा झाली की, शक्यतो मुंबई आणि पुण्याचे रेकॉर्डींग एकत्र झालं तर छान टेम्पो तयार होईल, योगला सोयीचं होईल आणि मस्त वातावरण निर्मितीही होईल. पण तशी शक्यता कमी दिसत होती. नंदिनीच्या कृपेने पोटपूजा, चहापान, छायाचित्रण वगैरे यथासांग उरकून, रेकॉर्डिंगसाठी अंदाजे डिसेंबरचा दुसरा आठवडा ठरवून आम्ही पांगलो.

गाण्याबद्दल थोडंसं. चाल चांगलीच अवघड, प्रत्येक ओळीची वेगळी, जवळजवळ खळेकाकांच्या वळणावर गेलेली. काही ठिकाणी बारीकसारीक ठेवणीतल्या जागा ज्या मला निदान त्या दिवशी तरी ओळख दाखवत नव्हत्या. मला जरा दडपणच आलं. पुन्हा पुन्हा समजावूनही पुढचं कडवं म्हणताना मागचं सपाट होत होतं, मी सारखीच मला समजलं नाही, परत सांग म्हणत होते. कसं येणार गाता? पण योग शांत होता. (इतक्या दिवसांच्या त्याच्याशी झालेल्या संवादानंतर मी आता त्याला ‘धिरोदात्त’ अशी पदवी दिली आहे, अशी माणसे हल्ली फारच दुर्मिळ.) कोणत्याही परिस्थितीत तो विचलीत होत नाही, आवाज चढत नाही की तापत नाही, उतू जाणं नाही, चिडचिड नाही की त्रागा नाही. माझंच उदाहरण बघून मीच त्याला बोलूनही दाखवलं की तुझ्या जागी मी असते तर फटकेच मारले असते, येत कसं नाही? कितीवेळा समजवायचं? लक्षात कसं रहात नाही? नीट लक्ष दे वगैरे!! (प्रत्यक्षात असं काही मी करत नाही हं! पण त्याच्यापेक्षा पेशन्स खुपच कमी आहेत माझ्याकडे.) पण गुरुजी फक्त हसले, बोलले नाहीत काही. आपलं शिकवणीचं कार्य त्यांनी न वैतागता चालू ठेवलं.

त्यानंतरचे काही दिवस दिवाळीच्या तयारीत, ती साजरी करण्यात गेले. ३ तारखेला मुंबईचं रेकॉर्डींग आटोपलं आणि योगने त्याच्या आणि अनिताताईंच्या आवाजात रेकॉर्ड झालेले ट्रॅक्स आम्हाला तयारीसाठी पाठवले. यावेळी मात्र मी कार्ड रिडर आणलं, हेडसेट शोधून काढले आणि नव-याकडून वेळेत ते ट्रॅक्स मोबाईलमध्ये ओढून घेतले आणि त्या ट्रॅक्सची एक छोटी प्लेलिस्ट बनवली. ऑफिसमध्ये आणि घरात दोन्हीकडे काम करताना ती प्लेलिस्ट लावून ठेवलेली असे. एकापाठोपाठ ट्यून्स कानावर पडत रहात. सकाळी उठल्यावर दहा मिनिटं नुसतं आणि रात्री जेवणं आटोपल्यावर १५ ते २० मिनिटं ट्रॅकसोबत असं रोज म्हणून बघत असे. रात्री त्यामानाने निवांतपणा असल्याने उभं राहून म्हणून बघणं, मान वर करून म्हणणं असे प्रयोग जमवता आले. नुसत्या ट्रॅकमुळे कोणती ओळ कधी सुरू करायची, आपण लयीत आहोत की नाही याचाही अंदाज यायचा. हळूहळू माझ्यासोबत आख्खं घरदार त्यात रंगून गेलं. सकाळच्या त्या दहा मिनिटात मावशी मला काहीही विचारायला यायच्या नाहीत. नील गादीवरून उठून हळूच मांडीवर येऊन बसायचा. सकाळी तो अर्धवट झोपेत असे, पण रात्री मात्र 'तु कुणाचं गाणं म्हणतीयेस...? हा कुणाचा आवाज आहे? या गाण्यात आवाजच नाहिये, सारखं सारखं तेच गाणं का म्हणतीयेस? तुला आठवत नाहिये का पुढचं? अशी टकळी सुरू असायची. पण एकदाही पठ्ठ्या स्वत: म्हणाला नाही माझ्यासोबत. (त्याची आवडती गाणी मी त्याचा मूड असेल तेव्हाच म्हणू शकते नाहीतर 'तू गाऊ नकोस, मोबाईलवर लाव' म्हणतो. बघा आता! :अ ओ: , आता काय करायचं) ऑफिसमधले सहकारीही आडून आडून, कधी आहे तुझं रेकॉर्डींग, तारिख ठरली का, असं विचारायला लागले. बरोबर आहे अहो, किती का छान गाणं असेना, सारखं वाजवून मी पार त्यांच्या कानांचं भजं करून टाकलं होतं.

सगळ्यांच्या वेगवेगळ्या अडचणींमुळे पुणेकरांची एकत्र अशी प्रॅक्टीस झालीच नाही. १८ डिसेंबरला पुण्याचं रेकॉर्डिंग ठरलं. त्यापुर्वी एकेदिवशी गुरुजींनी फोन करून परिक्षाही घेतली. त्याचा खूप उपयोग झाला कारण, काही अडणा-या गोष्टी त्याला विचारता आल्या. काही ओळींचं टायमिंग नीट जमत नव्हतं त्या ओळी त्याला म्हणूनही दाखवल्या. एकीकडे तयारी अशी छान सुरू होती आणि बाहेर थंडी हळूहळू वाढायला लागली. मला या मौसमात सर्दीचा भयानक त्रास होतो आणि नेमकी मी १५-१६ तारखेलाच आडवी पडले. ताप आला, नाक बोलू देईना आणि शिंका तर दिवसाला २००-२५०. माझ्यासाठी हे दरवर्षीचं चित्र होतं, पण नेमकं गाण्याच्या वेळी हे असं व्हावं याचं फार वाईट वाटलं. आवाज नाकातून तर येतोच पण ब-याचदा बसतोही. तसं काही होऊ नये म्हणून मी रेकॉर्डींगच्या आधी ३ दिवस नस्य करून घेतलं. तरीही आवाज नाकातून येणं मात्र मी टाळू शकलेच नाही. आणि रेकॉर्डींगच्या दिवशी सकाळी अँटीबायोटिक घेऊनच स्मिताच्या घरी पोचले.

मुंबई आणि पुणे, दोन्हीकडची सगळी मंडळी वेळेत जमली. दोन मस्त माणसांची - देवकाका आणि मिलिंदची ओळख झाली. काही ओळींमध्ये योगने बदल केले होते त्या जागा त्याने आमच्याकडून करून घेतल्या. त्या दिवशी योगने गाण्यात कोरसची सुरेल हार्मनीही गुंफली. तो एक नवाच अनुभव होता माझ्यासाठी. इफेक्टही छानच येत होता त्यामुळे. जेवण वगैरे आटोपून, थोडी विश्रांती घेऊन फ्रेश होऊन आम्ही सगळे स्टुडिओकडे निघालो. कुणीही तो स्टुडिओ आधी पाहिला नव्हता आणि ठळक पाटी नसल्याने तो शोधावा लागला. पण बाहेरून अगदीच कसासा वाटलेला स्टुडिओ आतून एकदम तयारीचा निघाला. आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी गायला खूप मजा आली.

कॉलेजमध्ये असताना मी एका बालनाट्यासाठी काही बालगीतं रेकॉर्ड केली होती कोल्हापूरला. त्यामुळे हा रेकॉर्डींगचा अनुभव तसा नवा नव्हता. म्हणून प्रत्यक्ष रेकॉर्डींग करताना मला दडपण आलं नाही. व्यक्तिश: मी गाणं खूप एन्जॉय केलं. एकटीचं आणि कोरसमध्येही. देवकाका आणि मिलिंदने तर वातावरणात बहार आणली. खरंच ते दोघं नसते तर जरा कंटाळवाणं झालं असतं किंवा तो फक्त एक तांत्रिक अनुभव ठरला असता. पण त्या दोघांमुळे मिनी गटग असल्यासारखंच वातावरण होतं दिवसभर. ते आल्याबद्दल खरंतर त्यांचे विशेष आभारच मानायला हवेत. स्टुडिओतल्या एसीने मात्र मला चांगलंच गारठवलं. शेवटी योगने माझ्यासाठी एक गरम जॅकेट आणि पायमोजे उपलब्ध करून दिले, तेव्हा मला गाणं शक्य झालं. योगची ती मदत म्हणजे, एखादा मनुष्य आपलं ध्येय उत्तम रितीने गाठण्यासाठी कसा झपाटलेला असतो, याचा एक उत्तम नमुना होता.

इथे मला योगबद्दल थोडं सांगायलाच हवं. स्वतःचं सगळं रुटीन सांभाळून त्यानं हा सगळा उपद्व्याप ज्या कौशल्याने पार पाडलाय, त्याला खरंच तोड नाही. हौसेखातर, छंदापायी माणूस किती झपाटू शकतो ते या दोन महिन्यांमध्ये आम्ही सर्वांनी याची देही याची डोळा बघितलं. प्रत्येक बाबीचं त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग असतं आणि त्या आखणीत येणा-या संभाव्य अज्ञात अडचणींचीही त्यानं मोकळी जागा ठेवलेली असते. पुण्याच्या रेकॉर्डिंगदिवशी पहाटे तो मुंबईत उतरला, लगेच देवकाका आणि मिलिंदसोबत पुण्याला निघाला. इथे आल्यावरही आमच्यापेक्षा त्याचंच काम जास्त चालू होतं. संध्याकाळी पाचला सुरू झालेलं रेकॉर्डिंग रात्री बारा वाजायला आले तेव्हा केवळ वेळेअभावी आटोपलं. तेव्हाही आणखी चांगलं करुन घेण्याची त्याची तयारी होतीच पण आम्हीच गळालो होतो. या सगळ्यात दिवसभर विश्रांती नव्हतीच पण रात्रीचं जेवण घेणंही शक्य झालं नव्हतं. सुप, कॉफी, चहा असंच चालू होतं. हे सगळं उरकून तितक्याच रात्री पुन्हा हे तिघे मुंबईला परतही गेले. किती कमाल असावी? प्रचंड ऊर्जा आहे ह्या मनुष्याकडे. आणि हे सगळं फक्त एका सेशनचं सांगतेय. अख्ख्या दोन महिन्यांच्या कालावधीत सततच त्याचं असं चाललेलं होतं. पुन्हा फोन्स, मेल्सही एकीकडे असतच. प्रत्येकाशी त्याचा वैयक्तिक संपर्क असे. उत्तम संवाद साधणं, मृदू बोलणं, समोरच्याकडून उत्कृष्ट ते काढून घेणं, आवश्यक त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून वेळच्या वेळी त्या करून घेणं आणि असं कितीतरी. इतकं करुनही त्याच्या वागण्यात कुठेही काही ग्रेट करतोय (करत असूनही) या भावनेचा लवलेशही नसतो. पाय जमिनीवर घट्ट आहेत. गाणं छानच होणारेय, पण त्याचं श्रेय योगला एकट्याला देता येणार नाही. सारिका आणि चिमुकल्या दियाचेही तितकेच आभार मानायला हवेत कारण त्यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे योगला हे जमवता आलंय. कशाला नेहमीच मोठ्या लोकांची उदाहरणं हवीत? ही अवतीभवती वावरणारी माणसं थेट दिसत असतात की!

आमच्यापैकी कुणीच, मुख्य गाण्यात मी गायलेला एक शब्द तरी असणार आहे की नाही याची फिकीरही केली नाही. या गाण्याने मलाही निखळ आनंद दिला. नीलने एकदा मला विचारलंही की, आई तु खूप खुश झाली आहेस का? वय वर्ष चारच्या माझ्या लेकालाही, मला मिळत असलेल्या आनंदाचा साक्षात्कार झाला, इतकी मी त्या गाण्यात गुंतून गेले. या निमित्ताने मी गायनाकडे पुन्हा वळले याचाही आनंद झाला. दिनेशना खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी सुचवलं नसतं तर, मी सध्या मायबोलीवर अ‍ॅक्टीव्ह नसल्याने हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचलंच नसतं.

आणि मायबोली? ती तर माझ्या ऋणानुबंधातली ठेव आहे. कारण तिने मला हयातीतले उत्तम मित्र दिले, मला समृद्ध केलं. माझं काय असेल ते तोडकंमोडकं पण पहिलं लिखाण मी मायबोलीवर केलं. धमाल वातावरण असायचं तेव्हा. बहुतेक सगळेजण एकमेकांना माहित असायचे. छोटे-मोठे उपक्रमही केले. सुरूवातीला ताज्या ताज्या सिंहगड रोड बीबीवर आम्ही काही शीघ्रकवी मंडळी फक्त चारोळ्यांमध्येच बोलायचो, आज आठवलं की गंमत वाटते. उनाडक्या-टवाळक्याही होत्या, मतभेद होते पण सगळं जेवढ्यास तेवढंच होतं. कृपया कोणतेही गैरसमज नसावेत, कारण मी काही 'म्हाराजाच्या टायमाला'च्या चालीत 'गुजरा हुआ जमाना' आठवत नाहीये, केवळ गेली काही वर्षे मी नियमीत संपर्कात नसल्यामुळे आधीचं लिहीलंय. या गाण्याच्या निमित्ताने मायबोलीच्या सदस्यत्वाची गेल्या जवळ जवळ दहा वर्षांची मनात उजळणी झाली आणि एकदम रिफ्रेश व्हायला झालं. या गीतामुळे मायबोलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा लागणार आहे आणि माझाही त्यात खारीचा वाटा आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. यापुढच्याही अशा स्वरुपाच्या कोणत्याही 'मायबोली आविष्कारात' सहभागी व्हायला मला मनापासून आवडेल.

वजनदार काव्य, श्रवणीय चाल, मिलिंदची दमदार साद, अनिताताईंचा तयारीचा तर योगचा धीरगंभीर आवाज, बासरी, सतार, पियानो, व्हायोलिन्स असा भारदस्त वाद्यमेळ, सुरेल हमिंग, उठावदार कोरस...... गजराजांची सोंड, कान, दात, शेपूट असं थोडं थोडंच दिसलंय आतापर्यंत :स्मित: अख्खा गजराज एकत्र पहायची, गाणं अंतिम स्वरूपात ऐकण्याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. इतक्या मंथनातून निर्माण झालेलं गाणं हे अमृतासारखं केवळ अवीटच असणार आहे. मायबोली, गाणं साकारणारे सर्व गायक-वादक कलाकार-तंत्रज्ञ आणि तमाम मायबोलीकरांचे मन:पुर्वक अभिनंदन. मायबोली अशीच वृद्धिंगत होत राहो आणि आम्हालाही समृद्ध करत राहो ही सदिच्छा.

भेटूया, लवकरच, मायबोली गीत ऐकायला. मायबोली जिंदाबाद!!

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

- सई कोडोलीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई.........खुप छान लिहिलं आहेस गं....!!
गणेशोत्सवात तुझा गोड आवाज ऐकला होता..... आता ह्या गाण्यातही तुझा तोच गोडवा असणार हे नक्की Happy
किती वेळ कळ काढायची आता........ !!!!!!!!!!

>>आमच्यापैकी कुणीच, मुख्य गाण्यात मी गायलेला एक शब्द तरी असणार आहे की नाही याची फिकीरही केली नाही. या गाण्याने मलाही निखळ आनंद दिला.

क्या बात है! नेमकी हेच गमक आहे तुझ्या ऊत्तम गायनाचं... तू गाणं स्वतः एंजॉय करतेस गाताना.. आणि जयश्री ने तुझ्या आवाजाबद्दल लिहीलेलं १००% खरंच! दिनेशदांचे अर्थातच विशेष आभार- अन्यथा एका छान आवाजाला हे गीत आणि मायबोलीकर मुकले असते!

>>ऑफिसमध्ये आणि घरात दोन्हीकडे काम करताना ती प्लेलिस्ट लावून ठेवलेली असे. एकापाठोपाठ ट्यून्स कानावर पडत रहात. सकाळी उठल्यावर दहा मिनिटं नुसतं आणि रात्री जेवणं आटोपल्यावर १५ ते २० मिनिटं ट्रॅकसोबत असं रोज म्हणून बघत असे. रात्री त्यामानाने निवांतपणा असल्याने उभं राहून म्हणून बघणं, मान वर करून म्हणणं असे प्रयोग जमवता आले. नुसत्या ट्रॅकमुळे कोणती ओळ कधी सुरू करायची, आपण लयीत आहोत की नाही याचाही अंदाज यायचा.

हेच ते, जे मला प्रत्येक गायकाकडून अपेक्षित होतं... तू ते केलस आणि त्याच एक सुरेल फळ संपूर्ण गीत प्रकाशीत होईल तेव्हा तुझ्या पदरात पडणारच आहे (व्यावहारीक अर्थाने!). ऊत्कृष्ट गायली आहेस तू!

>>इथे मला योगबद्दल थोडं सांगायलाच हवं
बापरे........ जरा जास्ती झालं... दमलो !!!

सई,
अगदी मनापासून व्यक्त झालात तुम्ही...... आवडलं.

"आमच्यापैकी कुणीच, मुख्य गाण्यात मी गायलेला एक शब्द तरी असणार आहे की नाही याची फिकीरही केली नाही." >>>> ... ग्रेट ग्रेट ..... ग्रेट सई !!!!! हीच तर खासियत आहे आपल्या मायबोलीकरांची.

'मी', 'माझं', 'आमचं' यापलिकडे जाऊन 'आपलं' हा विचार करू शकतो आपण मायबोलीकर;
म्हणूनच हा असा सांगीतिक सृजन-सोहळा सांघिकरीत्या घडू शकतो.

कशाला नेहमीच मोठ्या लोकांची उदाहरणं हवीत? ही अवतीभवती वावरणारी माणसं थेट दिसत असतात की! >>

आपल्या मायबोलीचं अगदी चपखल वर्णन आलंय त्यात. मायबोलीचा एकही गुणविशेष त्यातून निसटलेला नाही. कशी सुचली असेल मायबोलीचं नेमकं मर्म सांगणारी इतकी नेटकी शब्दरचना>>>

आमच्यापैकी कुणीच, मुख्य गाण्यात मी गायलेला एक शब्द तरी असणार आहे की नाही याची फिकीरही केली नाही.>>>>

ही काही आणि अशी किती तरी छान छान वाक्य लिहिली आहेस..
एकंदरित संपुर्ण लिखाण आणि अनुभव सुरेख !!

सई, अगदी मनापासून लिहिलंय. आवडलं. Happy
तुझ्या आवाजातली ''साहित्य वा:ड्मयाची...'' ही ओळ फारच सुरेख झाली होती.
मी विचारलं होतं, '' कोणी गायलंय इतकं गोड?''
आता कायम गात रहा!