नको रे कान्हा

Submitted by पाषाणभेद on 22 January, 2012 - 18:32

नको रे कान्हा

नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी
नको लगट दावू उगीचच खेटूनी ||

नार मी भोळी साधी सरळ हरणी
रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी
सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले
अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी ||

गोरी माझी काया तू रे सावळा
मनात दुजे काही चेहेरा भोळा
नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना
ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी ||

श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा
केशव मुरलीधर माधवा गोविंदा
अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी
विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी ||

तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण
तुझ्याविण जग सारे होई वैराण
यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले
तुझ्यासवे त्यात गेले चिंब न्हाऊनी ||

- पाभे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाभे
काय सुटला आहात.. अहो , किती सहजता आहे या गीतात. मी थक्क झालो. पाभे तुम्ही सिरीयसली सिनेमा साठी गाणी लिहा.