वेदकालीन संस्कृती भाग ३

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २

मागील भागात आपण आर्यन थेअरी, आर्य-अनार्यांचे देव ह्या बद्दल माहिती पाहिली. ह्या भागात हिंदू धर्मग्रंथाची व त्यावर आधारीत साहित्यप्रकारांची थोडक्यात ओळख पाहू.

हिंदू संस्कृती म्हटले की वेद, वेदांत, वेदांगे हे लगेच समोर येते. बर्‍याच जणांना केवळ चार वेद आहेत, व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते, पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.
चारही वेद (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद), वेदांग, वेदांचे उपग्रंथ, जैमिनीची धर्म मीमांसा, बादरायणाची ब्रह्ममिमांसा, अशा काही मिमांसा, वेदांवर आधारित उपनिषदे, व प्रत्येक वेदांचे उपग्रंथ जसे ब्राह्मण आणि आरण्यक, काही उपवेद जसे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, पुराणवेद इ इ असे सर्व मिळून आपली आजची संस्कृती वा धर्म बनला आहे.

वेद म्हणजे ज्ञान. प्रत्येक वेदाच्या पठणानुसार व तत्वज्ञानानुसार अनेक शाखा होत गेल्या. चारी वेदांच्या एकूण ११८० शाखा आहेत व एक लाखापेक्षा जास्त ऋचा त्यात होत्या. ज्यातील २०,३७९ ऋचा आज अस्तित्वात आहेत. सर्वात जास्त, ऋग्वेदाच्या १०,५५२ ऋचा, ह्या दहा मंडलांत आज अस्तित्वात आहेत. ऋग्वेदाच्या मुख्य संहितेमध्ये मधून मधून जी काही परिशिष्टे जोडली आहेत, त्यांना खिलसूक्ते म्हणतात. कारण ही सूक्ते मूळ भाग नाहीत, तर पदपाठकार शाकल्य ऋषींनी हे जोडले आहेत. अशी एकंदर २६ खिलसूक्ते आहे. पुरूषसूक्त, श्रीसूक्त हे ह्याचाच भाग आहे. कधीकधी नारायण ऋषी असाही उल्लेख आढळतो.

ऋग्वेद : ऋग्वेद या सामासिक पदातील ऋग् म्हणजे ॠचा म्हणजेच पद्यात्मक मंत्र. हे मंत्र छंदंबद्ध असतात.वेदोत्तर साहित्यात अशा रचनेस श्लोक हे नाव प्राप्त झाले. एका सूक्तात साधारण तीनपासून ते ५६ पर्यंत ऋचा असू शकतात. एकू्ण १५ छंद, त्यापैकी गायत्री, अनुष्टुप, जगती , त्रिष्टुप, पंक्ती , उष्णिक व वृहती हे वारंवार आढळतात. व्याकरणावरील लेखात ह्यावर जास्त चर्चा करु. गायत्री ह्या छंदात २४५० ऋचा आहेत.
ऋग्वेदामध्ये पहिल्या आठ मंडलात देवांची स्तुती आढळते. ऋग्वेदातील अनेक देवता ह्या निसर्गाशी संबंधित आहेत, वायू, वरुण, सूर्य, नद्या, उषा, अग्नी, गाय इत्यादी. निसर्ग स्तुती व निसर्गातील बदलांमुळे जीवनसृष्टी कशी प्रभावीत झाली आहे हे त्यात प्रामुख्याने मांडले आहे. अनेकदा एका देवाची स्तुती दुसर्‍या देवाला पण लागू होते, जसे अग्नी. अग्नीची स्तुती करताना त्याला, तू आधी तू वरुण होतोस, मग धगधगलास की सूर्य होतोस, असे वर्णन जागोजागी आढळते. सुरुवातीच्या काळात वरुणाला दिलेले महत्व नंतर इंद्र ह्या देवतेस दिलेले दिसते, कारण संकरकाली अनेक युद्धे होत होती व त्यात इंद्रदेव पराक्रम गाजवत होता. ९ व्या मंडलात सोमयागाबद्दलचे विवेचन आहे तर दहाव्या मंडलात विविध सूक्ते व ऋचा आहेत. व्यावहारिक वा लौकिक जीवनातली सूक्तेही १० व्या मंडलात आढळतात. पहिल्या मंडलातील काही ऋचा ह्या रामायणाचा संबंध दाखविणार्‍या आहेत असे काहींचे म्हणणे आहे. रामायण विषय मी थोडा विस्तृतपणे नंतर मांडेन.

वाचस्पती, विश्वकर्मा, गंधर्व, अप्सरा, हिरण्यगर्भ, भूतपती या दुय्यम देव व अप्सरांसंबंधीची माहिती व सूक्तेही ही ॠग्वेदात आढळतात. ऋग्वेदकालीन समाजरचना जातिभेदात्मक नव्हती असे जातींच्या अनुल्लेखावरुन मानता येते. ब्रह्म, क्षत्र व विश् असे व्यवसायभेद मात्र आढळून येतात. ह्यांना वर्ग म्हणता येईल. दहाव्या मंडलातील काही ऋचा हे स्पष्ट करतात. जसे 'इन्द्रायेन्दो परिस्त्रव' वरवर पाहता ह्याचा अर्थ फार सोपा वाटतो, पण इतर ऋचांसोबत जोडल्यावर त्याचा अर्थ असा निघतो, " माणूस विविध व्यवसाय करीत असतो व त्याच्या विविध धारणा असतात. सुताराला मोडलेले लाकूड, वैद्याला रोगी, पुरोहिताला सोमयाजी, सोनाराला चमकदार हिरे बाळगणारा श्रीमंत, घोड्याला चांगला रथ आणि बेडकाला पाणी पाहिजे, यास्तव सोमा, तू इंद्राकरता वाहत राहा. सांसारिक लोकांना जुगारी होउ नका ही शिकवणही त्यात आहे. संपत्ती असेल तिथेच गाय व बायको रमते असे सवितादेव सांगतो. अन्नदानसूक्तात स्वार्थीपणा हा वधाचा एक भाग आहे असे म्हटले असून, स्वार्थी व अप्पलपोट्या माणसाची निंदा केली आहे.

सामवेद : ऋग्वेदातील ज्या ऋचांवर गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद. एकूण १६०३ ऋचा आहेत, ज्यातील ९९ ऋचांचा समावेश ऋग्वेदात नाही. सामाचे म्हणजे गायनाचे अनेकविध प्रकार व शाखा ह्यांचे विस्तृत वर्णन ह्या वेदात आहे. जैमिनिय शाखेत एकू्ण गानप्रकार ३६८१ एवढे सांगितले आहेत. गायनाचा इतका समग्र अभ्यास जगातील कुठल्याही धर्मग्रथांत झाल्याचे मला आढळलेले नाही!

यजुर्वेद : यजुर्वेद हा अध्वर्यू नामक ऋत्विजाचा वेद आहे. यजुष् म्हणजे यज्ञात म्हणावयाचे गद्य मंत्र. पातंजल महाभाष्याप्रमाणे एकूण १०१ शाखा आहेत असे मानले जाते, पण आज सहा आढतात. त्यात दोन मुख्य भेद. कृष्ण व शुक्ल. तैत्तरीय, काठक, मैत्रायणी, कापिष्ठल ह्या कृष्ण यजुर्वेदाच्या उपशाखा तर काण्व व माध्यंदिन ह्या शुक्ल पक्षाच्या शाखा. महाराष्ट्रात काण्व चे कण्व व माध्यंदिनाचे माध्यांजन ब्राह्मण आजही आढळून येतात. शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेस वाजसनेयी संहिता असेही म्हणतात. वाजसनेय म्हणजेच वाजसनी ऋषींचा पुत्र याज्ञवल्क्य. ह्या याज्ञवल्क्य ऋषीने पुढे उपनिषदांत मोठे कार्य करुन ठेवले आहे. यजुर्वेद, एकूण अध्याय ४०. सुप्रसिद्ध अश्वमेध यज्ञ ह्या वेदातील २२ व २३ व्या अध्यायात आहे. तसेच पुरुषमेध हा देखील यज्ञ आहे. मेध चा अर्थ वध असला तरी पुरुषमेधात पुरूषवध नाही तर त्यातील वाईट प्रवॄत्तींचा वध अशी कल्पना केलेली आहे. संन्यासासाठी हा यज्ञ आवश्यक समजला गेला. प्रत्येक हवी देताना 'स्वाहा' हे पद उच्चारायचे इतके सोपे मंत्र ह्या वेदात आहेत. उदा अग्नेय स्वाहा, इंद्राय स्वाहा. वगैरे. खांडवनवनाची कथा सगळ्यांना आठवत असेल इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहाची. ह्यावरुन महाभारत होण्यापूर्वी यजुर्वेद असावा काय? ( हे माझे मत वा कयास Happy )

अथर्ववेद : अथर्ववेदात विविध प्रकारचे शत्रूनाशक मंत्र व इतर मंगल / अमंगल मंत्रांचे संकलन आहे. बहुसंख्य ऋचांची रचना अथर्वण ऋषींनी केल्यामुळे अथर्ववेद असे नाव आहे. पण आधी लिहिल्याप्रमाणे त्या ऋषीच्या शिष्यसमुदायला पण तेच नाव प्राप्त होई. म्हणून अथर्वऋषीनी व त्यांचा शिष्यांनी मिळून लिहलेला वेद असे मानावयास हरकत नसावी. अथर्ववेदाच्या एकून ९ शाखा. पिप्पलाद, तौद, मौद, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श आणि चारणवैद्य. पैकी पिप्पलादाचे उपनिषद फारच प्रसिद्ध आहे.
अथर्ववेदातील कर्मे एकून दहा विभागात मांडली गेली आहेत. १. भैष्यजकर्मे २. आयुष्यकर्मे ३.अभिचारकर्मे, ४ स्त्रीकर्मे ५ सांमनकर्मे ६ राज्यकर्मे ७ ब्राह्मण ८.पौष्ठिककर्मे ९. शांतिकर्मे आणि १०. विश्वोप्तती व अध्यात्म.

पैकी भैष्यजकर्मात विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरायचे मंत्र, निदाने व उपचार आहे. ज्वर, अतिसार, मूत्ररोध, नेत्ररोग, वातपित्तकफादी दोष, ॠदय्रोग, कावीळ, कोड, यश्मा, जलोदर इ सांठी चे उपाय व मंत्र ह्यात मांडले आहेत. पुढे जाऊन आयुर्वेद ह्या वेदांग निर्मितीसाठीची तयारी म्हणजेच भैष्यजकर्मे. वरील प्रत्येक कर्मात खूप माहिती आहे व त्याचा विस्तार पुढील काळात होत गेला. इथे मी सर्व कर्मांची ओळख करुन देऊ शकतो, पण प्रत्येक कर्मावर त्रोटक लिहायचे तरी एक एक लेख होऊ शकतो, विस्तारभयामुळे व वेद साहित्याची ओळख एवढीच व्याप्ती ठरवल्यामुळे पुढे जाऊयात.

संहिता : म्हणजे संग्रह. वेगवेगळ्या ऋषींनी रचलेले गद्य व पद्य एका विषयाला धरुन एकत्रित केले की त्याला संहिता म्हणतात. उदाहरणार्थ मैत्रायणी संहिता.

ब्राह्मण ग्रंथ: ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण इ इ हे गद्य साहित्य आहे. त्यात विविध यज्ञ कसे करायचे ह्याचे तपशिलात विवेचन असते, यज्ञातील अधिकारी, यज्ञकर्मे, इच्छित देव, करावयाची कामे इ इ सोबतच धर्माचे व जीवनाचे तत्वज्ञान ह्या ब्राह्मण ग्रंथांतून मांडले आहे.

आरण्यक - प्रत्येक शाखेचे एक ह्याप्रमाणे ११८० आरण्यके एकेकाळी अस्तित्वात होती. त्यातील केवळ बोटावर मोजण्याएवढी आरण्यके आज उपलब्ध आहेत. मात्र आरण्यकातील मुख्य भाग, म्हणजे उपनिषदातील ज्ञान मात्र आज बर्‍यापैकी उपलब्ध आहे. आरण्यकांमधून देवाबद्दल व एकूणच तत्वज्ञानाबद्दल विवेचन आहे. देवाची भक्ती कशी करावी, मन, काया, आत्मा, परलोकीचे जीवन, पुर्नजन्म, इत्यादींचा वेध त्यातून घेतला आहे. उपनिषदांसह आरण्यके म्हणजेच, 'वेदान्त' अथवा वेदांचा अखेरचा भाग. पाणिनी व बुद्ध यांच्यापूर्वीच आरण्यके व मूळ १३ उपनिषदे निर्माण झाली असे आता बहुतेक सर्व संशोधक मानतात. आज मुख्यत्वे सहा आरण्यके आढळतात. ऋग्वेदाचे ऐतरेयारण्यक व कौषतकी किंवा शांखायनारण्यक, कॄष्णयजुर्वेदाचे तैत्तरीयारण्यक, शुक्लयजुर्वेदाचे बृहदारण्यक, सामवेदाचे जैमिनीय उपनिषदब्राह्मण आणि कृष्णयजुर्वेदाच्या मैत्रायणी शाखेचे आरण्यक उपनिषत्.

उपनिषदे : उपनिषदांतील तत्वज्ञान हे दोन प्रकारचे आहे. एक उपदेशात्मक व दुसरे युक्तीवादात्मक. काहीकाही ठिकाणी सरमिसळ आहे. तर्क व युक्तीवादावर भर असला तरी मात्र कठोपनिषदात आत्मज्ञान तर्काने प्राप्त होत नाही असेही सांगीतले आहे. एकूनच अध्यात्म, दैव, तत्वज्ञान ह्यांची चर्चा विविध उपनिषदांतून आढळते. एकूण १३ मुख्य उपनिषदे आहेत.

१. छांदोग्योपनिषद - सामवेद व छांदोग्य ब्राह्मणाचा मिलाफ होऊन हे उपनिषद तयार झाले आहे. ॐ मंत्राचा महात्मा ह्यात वर्णन केलेला आहे. कर्माचे फल व पुनर्जन्मावरील भाष्य देखील ह्यात आढळते. मानव धर्म, त्याचे साध्य, ध्यानधारणा व ध्यानाचे रोजच्या जीवनातील महत्व ह्यावर विवेचन ह्या उपनिषदात आहे.

२. केनोपनिषद - केन म्हणजे कोण? ह्या सर्वसृष्ठी पाठीमागे कोण आहे. केनोपनिषदात ब्रह्मज्ञान कसे प्राप्त करावे ह्याचे विवेचन आहे. उदा. पहिलाच प्रश्न पाहा.
केनेषितं पतति प्रेषितं मनः
केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः |
केनेषितां वाचमिमां वदन्ति
चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति ||१||
अर्थात कोणामुळे प्राण शरीरातून वाहतो, मन म्हणजे काय? कोणामुळे वाणी बोलते? कोणामुळे नेत्रानी पाहता येते वा ऐकता येते? ह्या व अशा प्रश्नांवर आधारित भाष्य केनोपनिषदात आहे.

३. ऐतरेय उपनिषद - हे उपनिषद ऋग्वेदासंबंधी आहे. केनोपनिषदाप्रमाणेच जीवनावरील भाष्य, प्रश्न, विविध अवयव व त्यांचे इत्सित कार्य ह्यात चर्चिले गेले आहेत.

४. कौषतकि - ह्या उपनिषदात हिंदू तत्वज्ञातील पुनर्जन्माबद्दलची चर्चा आहे.

५. कथोपनिषद - ह्या यजुर्वेदीय उपनिषदात, ऋग्वेदातील एका कथेच्या आधाराने प्रश्नोत्तर आहेत. भगवद्गीतेतील बराचसा भाग ह्या उपनिषदाशी मिळता जुळता आहे.

६.मुंडकोपनिषद - मुंडक म्हणजे टक्कल. त्याअर्थाने हे टकलूउपनिषद. Happy वेदांगे व ब्रह्मज्ञान ह्यावरील भाष्य व फरक ह्यात आहे.

७. तैत्तरेय उपनिषद - तीन भागात असलेल्या ह्या उपनिषदात पहिल्या भागात वाणी, उच्चार, व्याकरण ह्याबद्दल चर्चा तर दुसर्‍या वर तिसर्‍यात परमार्थ ज्ञान ह्या संकंल्पनेवर चर्चा केलेली आढळते.

८.बृहदारण्यकोपनिषद - ह्या उपनिषदाचे तीन कांड आहेत. पहिल्या मधु कांडात माणसाची स्वतःची विश्वशक्तींशी ओळख ह्याची चर्चा आहेत. दुसर्‍या मुनीकांडात तत्वज्ञानावर भर आहे तर तिसर्‍या खिलकांडात उपदेश, उपासना, ध्यान व भक्ती ह्याचे विवेचन आहे.

९. श्वेताश्वतर उपनिषद - ह्या उपनिषदाचा उद्गाता खुद्द शिव आहे असे मानले गेले पण त्यावचेळी श्वेताश्वतर नावाचे ऋषी पण आहेत त्यांनीही हे लिहिले असेही मानले जाते. मनुष्यात असलेल्या ईश्वराबद्दलचे चिंतन ह्याउपनिषदात आहे.

१० प्रश्नोपनिषद - ह्यात वेगवेगळे सहा प्रश्न कर्ते पिप्पलादाला प्रश्न विचारतात. ते सहा प्रश्नकर्ते हे क्षत्रिय वा ब्राह्मण आहेत. भारद्वाजपुत्र सुकेश, शिबीपुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू गार्ग्य, अश्वलापुत्र भार्गव, कात्यपुत्र कंबंधी हे पिप्पलादाकडून ज्ञानप्राप्त करुन घेतात. विविध तत्वज्ञानसंबंधी प्रश्न व त्याचे उत्तर म्हणजेच प्रश्नोपनिषद.

बाकीची मुख्य उपनिषदे म्हणजे इशाव्यास, मांडूक्य व मैत्री. प्रत्येक उपनिषदात आत्मज्ञान, ध्यान, इश्वर, भक्ती, मनुष्यजीवन, शरिरासंबंधी प्रश्न इत्यादीचे विवेचन आहे. हिंदू संस्कृतीच्या तत्वज्ञानाचे सार म्हणजे ही उपनिषदे होत.

आदि श्रीशंकराचार्यांनी ईश, ऐतरेय, कठ, केन, छांदोग्य,प्रश्न, तैत्तिरीय, बृहदारण्यक, मांडूक्य आणि मुंडक ह्या उपनिषदांवर भाष्य केलेले आहे.

उपनिषदातील भूगोल हा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत आहे. उदा. - प्रश्नोपनिषदातील भार्गव हा विदर्भाचा होता अशी सुरुवात पहिल्या मंत्रापासूनच आहे. ॠग्वेदासारखे इथे भूगोलाबाबत अनिश्चितता नाही.

वेदांगे : - एकूण सहा वेदांगे आहेत. जसे व्याकरण, ज्योतिष्य, निरुक्त, शिक्षा, छंद, आणि कल्पसूत्र. वेदागांमध्ये ह्या प्रत्येक अंगाची विस्तृत माहिती व त्यावरील भाष्य आहे. ज्योतिष्यांतर्गत खगोल शास्त्र, बीजगणित ह्यांचा अभ्यासही वेदांगांतून दिसतो.

फक्त ह्या वेदांगांवर मिळून एक वेगळा लेख लिहायचा मनोदय आहे. त्यात बीजगणित, भूमिती, आर्युवेद, खगोलशास्त्र इत्यांदींचा आढावा घ्यायचा आहे.

स्मृती : वैदिकांच्या समाजसंस्थेत वेदपूर्वकालापासून सूत्रकालापर्यंत जे सामाजिक व धार्मिक आचार विचार रुढ होते त्यांचा संग्रह म्हणजे स्मृती. गृहसूत्रे, धर्मसूत्रे व व्यवहार केवळ स्मरणाने लक्षात व सुरक्षित रहात नव्हते म्हणून ते ग्रंथ रुपाने पुढे आले. विविध विधिनिषेधांची, कर्मकांडांची, आचाराची आणि सामाजिक रुढींची मांडणी ह्या स्मृतींमध्ये आहे. आश्वलायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक, बौधायण अशी १७ मुख्य धर्म व गृह सूत्रे आहेत व ह्या स्मृती त्यावर आधारीत आहेत. लक्ष्मणशास्त्री जोश्यांनी आजपर्यंत संपादित वा ज्ञात नसलेल्या ४६ स्मृतींचे संपादन, संग्रह केला आहे. ह्यावरुन एकू्ण स्मृतींचा विस्तार लक्षात यावा. सध्या एकच प्रसिद्ध वा कुप्रसिद्ध स्मृती आहे ती म्हणजे मनुस्मृती. मुख्य म्हणजे ह्यात इतर काही ग्रंथांप्रमाणेच काही पाठांत चातुर्वर्ण्याचे रुप दाखविले आहे, ते पाठ आजच्या दॄष्टीने जातीभेदवाचक मानले तरीही इतर खूप मोठा भाग तत्कालीन धर्माचे विवेचन व इतर रुढींची मांडणी असा आहे.

पुराणे : नावाप्रमाणे पुराण म्हणजे जुने, जुन्याकाळचे. पुराणांची निर्मिती विश्वनिर्मितीच्या रहस्य उकलीपासून ते आजपर्यंत इतिहासाची नोंद घेण्यासाठी केली आहे. हे विश्वनिर्मितीचे रहस्य आजच्या भाषेत वैज्ञानिक आधार असलेले असेल असे नाही, तर तत्कालीन तत्वज्ञानावर आधारित असलेली विश्वनिर्मिती, इतिहासाचे वर्णन करणे, वेगवेगळ्या राजांची वर्णने, वंशावळ्या ठेवणे, भूगोल, काळ इ सर्वांचा उल्लेख पुराणात आहे. त्यातही महापुराणे व उपपुराणे असा भेद आहे. महापुराणांचे प्रकार १८.
१. ब्रह्य २. पद्म ३. विष्णु ४. शिव ५. भागवत ६ भविष्य ७ नारद ८ मार्कंडेय ९ अग्नी १० ब्रह्मवैवर्त ११ लिंग १२. वराह १३. स्कंद १४.वामन १५. कूर्म १६ मत्स्य १७ गरुड १८ ब्रह्मांड

पुराणांमध्ये देव-असुरांची युद्धे, भूगोल इ चे वर्णन आहेच पण त्याशिवाय विविध चरित्रे, व्रतवैकल्य, स्मार्त, धर्मशास्त्र, तीर्थस्थाने इ विषय पण आहेत.

पुराणातील इतिहास हा विविध देवांची अदभूत वर्णने, अतिशयोक्ती व कल्पनाविलासाने भरला आहे त्यामुळे बरेचदा कालमापन करुन इतिहासाशी पडताळणे अवघड होऊन बसते. काल्पनिक काय व खरे काय ह्याची सांगड त्यामुळे लागत नाही. भूगोलातील वास्तू, पण अतिशयोक्त वर्णन, ह्यामुळे इतिहासकारांची मोठी गोची होते. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण दोन मोठी उदाहरण बघू. वेदांत मनुष्याचे साधारण वय १०० सांगीतले आहे परंतु,

१. पुराणात दशरथ राजाने ६०,००० वर्षे राज्य केले, रामाने ११,००० वर्षे राज्य केले व विश्वामित्राने १०,००० वर्षे तप केले. ह्या उदाहरणात कालगणनेला एक वेगळा अन भलताच अतिशयोक्तीपूर्ण अर्थ पुराण लिहिणार्‍यांनी देऊन ठेवला आहे.

वि का राजवाड्यांनी ह्याची फोड फार मस्त करुन दाखवली आहे. ती कशी ते पाहू. पुराणांप्रमाणे, कलियुग ४३२००० वर्षे, द्वापारयुग ८६४०००, त्रेतायुग १२९६००० व कृतयुग १७२८०००, महायुग ४३२०००० वर्षे होतात. कोणाही इतिहासकाराला व व्यक्तीला हे खोटे आहे हे लगेच लक्षात येऊ शकते. ह्या गणिताप्रमाणे जामदग्न्यकुलोत्पन्न परशुराम हा दाशरथीरामापर्यंत जिवंत होता (त्यांच्या युद्धाची कथा आहे) असे लिहिले आहे, तर मग परशूरामाचे वय दोन कोटी सोळा लाख वर्षे भरते. हे शक्य असेल का? ह्यावर उत्तर तो देव आहे, जगू शकतो हे असेल तर पुराणातले सर्वच बरोबर ठरेल हे म्हणण्याआधी एक क्षण थांबा, मी दुसरे उदाहरण महाभारतातले देतो.

२. महाभारतात पांडवांना १२ वर्षे वनात राहण्यास भाग पडले आहे हे तर सर्वज्ञात आहे. लोमेश ऋषी हे युधिष्ठिरासोबत तीर्थयात्रेस होते. वनपर्वात एके ठिकाणी ( वनपर्व १२१ | १९ ) लोमेश ऋषी युधिष्ठिरास म्हणतो की हा त्रेता व द्वापार युगाचा संधी आहे. ही पर्वणी सोडू नको. पुढे एके ठिकाणी पण हाच उल्लेख तीर्थस्थानी आहे. (वनपर्व १२५ | १४ ). ह्याच वनवासात हनुमानाची व भीमाची गाठ पडते. ती कपिध्वजाची कथा व भीमाचे गर्वहरण हनुमानाने कसे केले व पुढे हनुमानाचे गर्वहरण कृष्ण कसे करतो ती कथा सर्वांना माहित असेलच असे धरुन चालतो. तेथे उल्लेख आहे की 'एतत्कलियुगं नाम अद्चिराद्यत्प्रवर्तते' (भारत १४९ | ३७ ) म्हणजे तेंव्हा द्वापार व कलीचा संधी होता. थोडक्यात १२ वर्षात एकदा त्रेता व द्वापार व एकदा द्वापार व कलीचा संधी होता. शिवाय पुढे जाउन भारतीय युद्धानंतर २६ वर्षांनी कृष्ण इहलोक सोडतो. हे सव्वीसावे वर्ष फार महत्वाचे आहे, कारण युद्ध चालू असताना देखील बलराम श्रीकॄष्णाला म्हणतो , " प्राप्तं कलियुगं विद्धि" (शल्यपर्व ६० | २५ ) व जेंव्हा कृष्ण गेला (२६ वर्षानंतर) तेंव्हा कलियुग प्रवृत्त झाले असे म्हणतात, ह्यावरुन कलीयुगाची तीन वेळा आवृत्ती झाली असे स्पष्ट होते. जर वरील कालावधी (तो अनेक हजारो वर्षांचा) घेतला तर ह्या संधी कश्या होतील? ही केवळ देवांचे महात्म्य ठासून सांगण्यासाठी केलेली अतिशयोक्ती ठरु शकते. खरी कालगणना नाही. ह्या गणितानुसार प्रथम वेदकाळात चार वर्षांचे युग होते व नंतर ते ५ वर्षांचे झाले असा निष्कर्ष राजवाड्यांनी काढला आहे, जो आता सर्वमान्य ठरावा.

असे असले तरी पुराणांतून असेलेल्या वंशावळी व इतर घटना तत्कालिन समाजाचे दर्शन घडवतात. त्यामुळे पुराणातले सर्वच फेकुन देण्याजोगे नाही.

हिंदू साहित्य म्हटले की महाभारत व रामायण हे दोन्हीही त्यात येतात. ह्या लेखात आधीच तो खूप मोठा होत असल्याकारणाने ह्या दोन्हींची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही, कारण हे दोन्ही बहुतेक हिंदूंना माहिती असतात. रामायणा संबंधी अनेक विवाद आहेत. राम कोण होता, तो हिंदू तर सोडा, आर्य ही नव्हता, ह्यापासून तो चांगला होता, वाईट होता, विष्णूचा अवतार होता असे अनेक मतप्रवाह आहेत. रामायणातातील राम कोण? ह्यावर माझा पुढचा लेख लिहायचा विचार आहे.

ही होती आपल्या हिंदू साहित्याची तोंडओळख. ह्यात मी अजून जैन आणि बौद्धसंप्रदाय त्यांचे तत्कालीन लोकांवर परिणाम, संस्कृतीमधील बदल व साम्य, श्रीशंकराचार्य, भागवत संप्रदाय साहित्य, कालिदास, भवभूती इ लोकांचे साहित्य ह्यांचा आढावा घेतला नाही. जसेजसे लेखनकाल पुढे जाईल तसेतसे ते साहित्यही मांडायचा विचार आहे.

प्रकार: 

माझि आजुन एक थियरी आहे. कित्पत पटते पहा.
पुर्वी पर्शियात र्दायुस राजा होउन गेला ( Alexander बरोबर हर्लेला नाही काही तो र्दायुस III)
http://en.wikipedia.org/wiki/Darius_I_of_Persia
पर्शियन भाषा right to left लिहितात.
जुन्या लिपित र्दायुस हा २ syllables cha शब्द आहे.
र्दायुस
पर्शियन लिहायचे
युस र्दा
हिन्दि भाषान्तर काराने वाचले.
र्दासयु
कारण त्याला पर्शियन right to left लिहितात हे माहित होते पण युस हे एक आहे क वेगवेग्ळे ते कळले नाही.
असा दास्यु शब्द आला असावा. या र्दायुस राजाचे भारतिय मान्द्लिक राजे अस्ल्याचाही उल्लेख आहेत.
याचि ९९ नगरे आर्यानी नश्ट केलि असतील.
Alexander
Alef ksi and ar
ar and ksi Alef

बाकिच्या भाषान्तर काराने (Alef गाळुन वाचले कारण Alef preposition सर्खा ही वाचत असावेत हा माझा कयास) .
ar and k si
सिकन्दर.
अशा प्रकार पार्शि right to left लिहिल्याने व त्याचे अयोग्य भाषान्तर केल्याने बरेच घोळ झाले.
Miliander मिलिन्द झाला.

नीलिमा, मजेशीर थिअरी आहे. Happy
तुम्ही दिलेल्या दुव्यावर दरयुशच्या चित्रावर 'Khshayathiya Khshayathiyanam (king of kings)' असं लिहिलंय. ते पर्शियन आहे का? ते जवळपास 'क्षत्रीय क्षत्रियानाम्'सारखं वाटतंय वाचायला. Happy

तुम्हि
गाथा इराणि पुस्तक वाचा.
'गाथा' 'लेझिम' हे पर्शियन आहेत.
आपली संस्कृती जुन्या झोराश्ट्रिअन संस्कृतीला जवळ आहे.
'क्षत्रीय क्षत्रियानाम्' लक्शात आले नाही पण शब्र शरब या persian words मुळे
केदार्ने जेव्हा दस्यु राजा शबर असा उलेख केला तेव्हा जाणवले.
पुर्वि माण्ड्लिक राजे मुख्य राजाचे नाव आधि लावत, त्यामुळे दस्यु राजा शबर
हे "दस्यु चा माण्ड्लिक राजा शबर" असे होउ शकते. दस्यु हे जमात असावी असे नाही.
पण हे चुक देखिल असेल.

निलिमा, दार्युस पासून दस्यु आला असे म्हणने थोडे धारिष्ट्याचे ठरेल कारण दस्यु म्हणजे सर्व आर्येतर असा उल्लेख आहे. दस्यु ही जमात नाही, तर मुळ लोकं जी त्या विशिष्ट समुदायाशी साम्य ठेवणारी नव्हती ती. उदा द्यायचे झाले तर अमेरिकेत आज h1 करताना "एलियन ऑथराईज्ड टू वर्क" असा शिक्का आपल्याला बसतो. पण आपण एलियन नाही, तर अमेरिकन नसलेले सर्व लोकं जे अमेरिकेत काम करायला येतात त्यांना अमेरिकन एलियन म्हणते तसेच काहीसे दस्यु, दास ह्या लोकांबाबत.

मांडलिकाचा मुद्दा :

मुख्य मुद्दा असा की दारयुसचा कालावधी फक्त ५५० बिसी आहे. दार्युस च्या काळात आपल्याकडे भगवान बुद्ध जन्मले होते व त्यांनी छांदोग्यउपनिषदातील व यजुर्वेदातील काही ऋचा घेउन नविन तत्वज्ञान निर्माण केले. केवळ ह्या कालावधीवरुनच शबर व दार्युस चा मेळ लागत नाही.

तसेही शबर राजा दस्यु होता म्हणजे तो ह्या दार्युसचा मांडलिक होतो असा अर्थ निघत नाही, (काळावरुन तर नाहीच पण इतरही दॄष्टीने) तर प्रगत शबर राजा जो मुळ रहिवासी असेल त्याचे ९९ पुर म्हणजे नगर ह्या टोळ्यांनी वा निर्वासितांनी फोडले. उलट ह्यातून असेल दिसते की जर नॉर्डिक म्हणजे आर्य तर त्यांचा पूर्वी शबर नावाचा राजाचे राज्य होते, त्याचे ९९ नगर व कित्येक गावं प्रगतावस्थेत होते (थोडक्यात हडप्पाशी रिलेटेड) आणि ते आम्ही फोडले. इथे ९९ पुरं ह्याला मोठा अर्थ आहे. तो कसा? तर एक राजा, त्याची सेना, त्याचे ९९ पुरातील राज्य हे काय दाखवते? तर प्रगत समाज. पुर आणि सेना कधी निर्मान होतात तर रानटी समाजातून बाहेर आल्यावर.

शिवाय झोराष्ट्रीयन, पर्शियन, अकिडियन, अवेस्था ह्या सर्वांचा प्रभाव होता. हे मानून चालले तर मग जर वेद हे आर्यांचे ग्रंथ माणले तर ह्या सर्व भागात आज वेदांसारखे वा त्या टाईपचे ग्रंथ / साहित्य असावे, ते दिसत नाही. किंवा त्यांचा आजच्या इतिहासात ह्या टोळ्यांबद्दल वा त्यांनी निर्मान केलेल्या वैदिक साहित्याबद्दल तरी उल्लेख यायचा. पण तो कुठेही नाही.

म्हणूनच ह्या सर्व थेअर्‍या होतात.

तसेच गाथा,लेझिम, दस्यु सारखे अनेक शब्द आले आहेतच. पण शब्द आले म्हणजे हे सर्व साहित्य तिथले असे होत नाही. उदाहरणार्थ गोरा हा शब्द इंग्रजी मध्ये घेतला आहे, तसेच पंडित पण. ह्या किंवा अश्या शब्दांवरुन १००० वर्षांनंतर भारतीय म्हणाले की हे शब्द आलेत म्हणजे तुमची सद्य संस्कृती पण आमची देणं ते तसे होईल का?

कालिबंगन व त्यासारख्या बंदरातून नौकेच्यासहाय्याने मेसोपोटेमियाशी व्यवहार व्हायचे, अश्या व्यवहारात, प्रवासी किंवा विस्थापित टोळ्यांमुळे हे शब्द सहज इकडून तिकडे, तिकडून इकडे येऊ शकतात असे मला वाटते.

लिपीत डाविकडून, उजवीकडे वा उलटे वाचताना हा घोळ होईल असे वाटत नाही. कारण ज्याला लिपी माहित आहे त्यालाच त्याचे वाचन करता येईल. अन्यथा आज तर माझ्यासमोर तेलुगु ही भाषा ठेवली तरी ति वाचायची कशी हा प्रश्न पडेल व मी तेलुगु जाणकाराला विचारेल मग साहजिकच तो ही भाषा डावीकडून वाचायची, रंडी म्हणजे या, अन्नम म्हणजे भात असे विषद करेल. उदा दिलं कारण जर वाचता येत नसेल तर उजवीकडून वाचू कि डावूकडुन ह्याला काहीच अर्थ राहत नाही.

पण एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल मला तुमची अ‍ॅनॅलिटिकल साईड आवडली. Happy वरिल अर्थमांडणी स्वतःशीच आहे, तुम्ही जी थेअरी मांडली, त्याला एका ओळीत उत्तर न देता व्यवस्थित मांडावे वाटले, बोचरे शब्द आले असतील तर कृपया दुर्लक्ष करा. पण सांगने हा की अश्या थेअर्‍या मांडत जा. म्हणजे आपण जे वाचलं, आकळलं, ते खरचं आहे की नाही हे पडताळून पाहायची संधी मिळते. Happy

अजिबात राग नही आला. तुमचा अभ्यास खुपच आहे.
मी उद्या detail लिहिन, पण
१) ऋग्वेद लिखाण १२०० BC चालु झाले तरी ३५० BC पर्यन्त चालु होते.
२) अवेस्था आणि रिग्वेदात खुपच साम्य आहेत.

अर्थात Persians दास, आसुर अस्ल्यामुळे ते दुसर्या angle नि आहेत.
http://varnam.org/blog/2007/01/avesta_and_rig_veda/

धन्यवाद. Happy

तुम्ही दिलेला ब्लॉग वाचला.

त्यात जो करार ( हित्ताईत व मितन्नी मधील करार ) तो लेखक मांडत आहे तो मी इथे आधिच दिला आहे. (बोधझ गई - माझ्या लेखाचा बहुतेक भाग दोन मध्ये) थापरांनी ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्याला डॉ एन. एस. राजाराम ह्यांनी उत्तर दिले आहे. ते मी पुढच्या लेखात मांडेन.

अवेस्था व ऋग्वेद कालात साम्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असिरीयनांनाच आपण कदाचित असूर असेही म्हणत असू. ऋग्वेदातील एका ऋचेप्रमाणे असूर व देव हे एकाच माणसाची दोन मुले. असुर मोठे व देव छोटे. असूर आधी बलवान होते, बुद्धिमान होते पण पुढे चालून देवात व त्यांच्यात भांडण लागले व देव जिंकले. ही कथा किती खरी किती खोटी हे देवालाच माहित. Happy ह्या दानव, असुरांबद्दल येत्या लेखात मांडायचा विचार आहे.

अवेस्था संस्कृती मध्ये बाण हे शस्त्र प्रमुख होतं त्यामुळे रामावरिल एका पुस्तकात असे लिहले आहे की आपण जो राम मानतो तो अवेस्थामधला एक राजा होता. ऋग्वेदातील नद्या, त्यांचे अवेस्थाशी नाम साम्य इ वर पुढच्या लेखात लिहणार आहेच. त्यात प्रामुख्याने शरयु आणि ऋग्वेदातील सरस्वती ह्या घेणार आहे.

एक मात्र आहे की ह्या जुन्या काळच्या एकेका शब्दानुसार, नद्यानुसार अनेक थेअरी निर्माण होतात, व त्या वाचायला, त्यांचा इतिहास समजून घ्यायला मजा येते.

ऋग्वेदाचा काळ याबाबत म म चित्रावांनी मराठी भाषाम्तरात एक तक्ता दिलेला आहे.. त्याचा आधार घेऊन काही मुद्दे मांडतो....

१. महाभारत साधारण्तः ५००० वर्षापूर्वी झाले... म्हणजे महाभारत बी सी ३०००

२. या युद्धात इक्ष्वाकु कुळातील साधारणतः १२५ व्या पिढीतील एक राजा लढलेला होता.

३. दशरथ हा इक्ष्वाकु कुळातील साधारणतः ७५ व्या पिढीतील.. ३० वर्षात एक पिढी हा सामान्य हिशोब धरला तर, दशरथाचा काळ होईल महाभारताआधी ५० *३० म्हणजे -१५००........ बी सी ४५००

५. राम ७६ वी पिढी, लवकुश ७७ वी पिढी... लवकुशाच्या काळात भरत कुळात सुदास राजा होऊन गेला, ज्याच्याबद्दल ऋग्वेदात उल्लेख आहे.

६. हरिश्चंद्र हा इक्ष्वाकु कुळातील साधारणपणे ३८ व्या पिढीतील... म्हणजे दशरथाआधी साधारण १००० वर्षे... बी सी ५५००... हरिश्चंद्र, शुनःशेप आख्यान ऋग्वेदात आलेले आहे...

७. याच प्रकारे इक्ष्वाकुचा (घराण्याची दुसरी पिढी) काळ आणखी १००० वर्षे मागे जातो... बी सी ६५००....

वेद हे यापूर्वीच्या काळापासून निश्चितच आहेत...

असुर या शब्दाबाबत थोडेसे: ( या लेखमालेच्या दुसर्‍या भागात मी प्रतिक्रियात लिहिलेले आहे.. कॉपि/पेस्ट करतो )

आर्य हे प्रामुख्याने दोन देवताम्ची पूजा करत. इंद्र आणि वरुण. पूर्वीच्या काळी असुर हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला जात होता.. या देवाना त्या काळी असुर म्हणत. सुर हा शब्द कालांतरने निर्माण झाला अणि शब्दांचे अर्थ बदलले.

असुर वरुणाची भक्ती प्रामुख्याने करणारा एक वर्ग निर्माण झाला, जो स्थलांतराच्या काळात पर्शियात स्थिरावला.. हाच पारशी धर्म.. असुर हा शब्द अवेस्तात जाताना अहुर असा झाला.. पारशी लोक त्यांच्या देवाला अहुरा म्हणतात.
***
(आर्य, वेद, ब्राह्मण हे सगळेच मुद्दे इतिहासकारानी पार एक्मेकात मिसळून टाकलेले आहे... या सगळ्यांचा द्वेष करणारी मंडळी, वेदाचा काळ फार जुना नाही, भारतातील अवैदिक धर्माचेच हे एक पिल्लु आहे, हे सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करत असतात... याच्या उलट विचारसरणी असणारे लोक वेद हे किती प्राचीन आहेत, हे सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करत असतात.. सगळा इतिहास, भूगोल आणि धर्म यातून पूर्ण डिस्टोर्ट झालेला आहे.... Happy गंमत म्हणजे, वेद जुने नाहीत, ते भारतातल्याच अवैदिकाचे पिल्लु आहे, असे म्हणणारे लोकच ५० वर्षापूर्वी आर्य भारतातले नाहीत, म्हणून ब्राह्मणही या देशाचेच नाहीत, असा डांगोरा पिटत होते... आर्य भारतातले नाहीतच, असेही म्हणून आर्याना (की आजच्या ब्राम्हणाना Happy ) झोडपून झाले.. आणि आर्यांची संस्कृती कुठली महान? ते तर इथलेच पिल्लू, असेही म्हणून त्याच लोकानी आर्याना (!) झोडपलेले आहे.... अर्थात, असे झोडपणे हा या बीबीचा उद्देश नाही, पण इतिहासाच्या पुस्तकातील मुद्दे वापरताना हा मुद्दा अगदीच दुर्लक्षून चालणार नाही.. )

केदार,
तुम्च्य बर्याच गोष्टि पट्ल्या
१) आसिरिअन्स हेच असुर असु शकतील हे एक्दम मान्य. आसिरिअन्स एक्दम क्रुर होते. "Comanche Indians" प्रमाणे शत्रुचि डोकि इतर अवयव shrink करुन अन्गावर घालणे, मुन्डक्यान्चे ढीग रचणे असे प्रकार ते करत.
२) हित्ताईत व मितन्नी मधील करार बद्दल तुमचा आधिचा लेख वाचला.

तुम्ही म्हणालात
"लिपीत डाविकडून, उजवीकडे वा उलटे वाचताना हा घोळ होईल असे वाटत नाही. कारण ज्याला लिपी माहित आहे त्यालाच त्याचे वाचन करता येईल.अन्यथा आज तर माझ्यासमोर तेलुगु ही भाषा ठेवली तरी ति वाचायची कशी हा प्रश्न पडेल व मी तेलुगु जाणकाराला विचारेल मग साहजिकच तो ही भाषा डावीकडून वाचायची, रंडी म्हणजे या, अन्नम म्हणजे भात असे विषद करेल"

एकच गोष्ट मला मान्य नाही.

अ) मी कुठे म्हट्ले की भाषान्तर काराला वाचता येत नसे.
भाषान्तर काराला वाचता येइ पण प्रोब्लेम व्हायचा तो लिहिताना आणि ते ही बरेचदा नावे लिहिताना.
क्साय, प्क्र सार्खि अक्षरे एका लिपित असत ती दुसर्या लिपित नसत.
उदा.
ग्रिक Herodatus , पर्शिअन erodatah , सन्स्क्रुत इरोदतः
एकच असेल आणि त्याचा उच्चार भाषांतर काराने बरोबर केला असेल पण लिहिताना लिपीच्या
limitations मुळे फरक पडतो आणि मागाहुन १००० वर्षांनी लोक वेगळे वाच्तात.

ब) पुर्वी इतिहास जाणणारे, भाषांतर करणारे आणि शिलालेख लिहिणारे वेगवेगळे लोक असत. शिवाय लिहिणे जेव्हडे कठीण तितक्या चुका जास्त होणार. दगडावर लिहिणे किती काळजी घेतली तरी अवघड होते.

क) बरीच भाषांतर अरेबीतुन ग्रीक, ग्रीक मधून पार्शी, पार्शीतुन देवनागरी आणि देवनागरीतुन ग्रीक अशी
बरेच्दा उलट्सुलट होत. त्यात तुम्ही बघितलेच कि पर्शीत स आणि ह ला एकच अक्षर आहे. ग्रीक मध्ये बरीच अक्षरे जोडाक्षरेच आहेत आणि वेळप्रसंगानुसार त्यांचा वेगळा उच्चार होतो.

आता स्वातिनेच सांगितलेले Darius चे विशेष्ण
Khshayathiya Khshayathiyanam (पार्शीत)

क्षत्रियः क्षत्रियानाम
आता उलटे लिहा
क्षत्रियः नाम क्षत्रियः
क्शः ना क्शः
शहेन शः
किति striking similarity आहे.

ग्रीक मध्ये ksi (पन उच्चार क्ष, x, sh) प्रसन्गानुसार अशी अक्षरे होती.
त्यातुन माझ्या मते पुर्वी विशेषणे वाढ्वाय्ची राजान्ना सवय होति.
१) फार पुर्वी क्श ksi म्हण्जे योद्धा असेल.
नंतर ३ कलात निपुण म्हणुन क्षत्रिय आला असेल.
२) हा क्ष आप्ल्याला रामाच्या इ क्ष वाकु घराण्यात पण दिसतो.
अरब लोकांप्रमाणे आपण ही बरेच्दा इश्वाकु लिहितो

पेर्शिअन मध्ये Kishwar चा अर्थ "Lord of the world" "Greatest Conquoror"
हा ईक्ष्वर सार्खा वाटतो पण पुन्हा i आणि k ची गल्लत आहे.

Darius बद्दल अजुन काही. या Darius che आजोबा cyrus the great याने आप्ल्या धाकट्या मुलाला
लहान वयात पुर्वेचा क्षत्रप (म्हण्जे Governor पुन्हा क्ष आला) बनाय्ला पाठ्वले. Cyrus च्या म्रुत्युनंतर
हा मुलगा जेव्हा परत आला तेव्हा तो स्वताला "गोमाता" म्हणायचा यावरून त्याला तोतया "witch" ठरवून Darius ने या काकाला मारले. इतिहास्कार म्हण्तात की हा Cyrus चा मुल्गा बार्दिया आणि गोमाता एकच होते. पुर्वेच्या (भारताच्या) प्रभावाने त्याने स्वतःला ही पदवी दिली असावी.

कोण जुना हा वाद मी घालत नाही कारण साधारण समान काळ असेल तर संस्क्रुती इतिहास्च्या द्रुष्टीने
कोण First याला फार महत्व रहात नाही.

निलिमा बरोबर. कोण जुने हा वादच नाही मुळी.

क्षत्रप, गोमाता हे अगदी बरोबर आहे. सरस्वती चा प्रदेश असा धरुन आधीची मूळ संस्कृती व त्यात सप्तसिंधू आणि इंडूस सिव्हिलायझेशन एकत्र केले तर अफगाण वगैरे भारताचाच भाग ठरतात. (बामियांमधिल बुद्ध मूर्त्या हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण) तर त्याचा पुढे जाउन इराण, ग्रीक इ शी संकर होतच असावेत. मिन्यांडर इथे येतो, सेक्युटर निकोलस चंद्रगुप्ताला आपली मुलगी देतो तर भाषा, साहित्य आणि वीर पुरषांचा कथा इकडून तिकडे अन तिकडून इकडे होणारच. आणि जिथे तुलनेने प्रगत लोकं राहतात तेथील संस्कृती अंगिकारली जाणार.

महाभारताप्रमाणे पंचनदाच्या पुढे उत्तर कोसला* आहे. (ह्यावर खात्री करतो) व उत्तर कोसला मधून सैन्य युद्धाला आले हा ही उल्लेख आहे. त्यामुळे जर तत्कालिन भुगोल समोर ठेवला तर पर्शियन साम्राज्यापर्यंतचा भारत सहज शक्य दिसतो. अन्यथा मिन्यांडर, मिलिंद झाला नसता वा ग्रीक राजकन्या हिंदू राजपत्नी झाली नसती.

उत्तर कोसला म्हणजे इराण असे माणनारी एक शाखा आहे. जर भारत युद्धाला ते येत असतील तर साहजिकच येथील राजे, त्याच्या कथा ह्या त्यांचा संस्कृतीचा भाग बनु शकतात.
मी इथे अगदी उलट व्हियू मांडत आहे. म्हणजे हे लोक तिथून इथे आले म्हणन्यापेक्षा महाभारता नंतर कथा इथून तिथे गेल्याची शक्यता. माझा स्वतःचा अभ्यास ह्यादृष्टिने अजूनही चालूच आहे. आणि आता बी बी लाल ह्यांचाप्रमाणे असेच घडले असावे अशी शक्यता निर्माण होत आहे. ते किती खरे किंवा खोटे हे काळच ठरवेल.

हा विचार माझ्या मनात का येतो त्या बद्दल चे कारण म्हणजे वेदात उल्लेख केलेले किरात हे लोकं. किरात नावाचे लोकं म्हणजेच नेपाळी. किंवा मंगोलाईडस. भारत युद्धा भगदत्त राजाने एक अक्षोहोनी सैन्या किरात व चिना असे मिळून आणले. ( चिना हा पण उल्लेख महाभारतात आहे.) नेपाळ मध्ये आजही किरात मंदिर आहेत. त्यांचा मुंढ्ढमला ते किरात वेद असेही म्हणतात. हिमायल उतरुन नेपाळात जाउन तत्कालिन आर्य किंवा मुळ लोकांनी युद्ध केली आहेत. (इथे आर्य हीच सज्ञा वापरतो, पण आर्य म्हणताना आर्य अनार्य दोन्ही अभिप्रेत आहेत.) व ही लोकं भारत युध्दात पांडवांविरुद्ध लढली आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या देशांशी संकर सहज शक्य आहे.

किरात बद्दल थोडी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Kirat आहे.

composite gods.

इजिप्त्च्या sun gods "Ra" बद्दल तुम्हाला माहित असेलच.
http://en.wikipedia.org/wiki/Ra

अनेक Egyptians इतर देवाना मागे आणि कधी पुढे Ra लावत
जसे Amun and Amun-Ra
Atum and Atum-Ra

यावरुन Ind-Ra पण Hind लोकांची composite देवता असु शकेल.
जशी पर्शिअन्स चि Ahu-Ra जिचा उच्चार ते असुरा असा करत.

या आसुराला पर्शिअन्स Yasna मधुन (Avestan for 'oblation' or 'worship') आवाहन करत.
http://en.wikipedia.org/wiki/Yasna

"Yasna करणारे पर्शिअन्स पहिले आणि इतरांनी Yasna करु नये. केल्यास तो थांबवावा कारण ज्यांची
आग सर्वात जुनी ते श्रेष्ठ " अशा सम्जुती Avestha मध्ये आहेत.

Iraan मध्ये सर्वात जुना Yasna एकिकडे चालू आहे. काही मुंबैतील श्रिमंत पार्शी तो चालू रहावा म्हणुन अजुन देणगी देतात

आत्ताच तुझा प्रतिसाद वाच्ला.
मलाही हे एक्दम मान्य आहे. बरेच आर्य भारतातुन Europaत परत गेले
आणि त्यांनी या कथा तिथे प्रचलीत केल्या.
या सम्पत्तीला भुलुनच मग Alexander ने पर्शिया व भारतावर हल्ला केल.

<आज साठी जगताना काही तरी अर्थ लागेल असं सांगा हो.. >

आपण जी जी पुस्तके वाचता आहात, त्यातून आपल्याला बरेचसे मूलभूत ज्ञान मिळेल. परंतु, त्याचा अर्थ हा तुम्ही स्वतः मनन व चिंतन करून काढायचा. नि त्याप्रमाणे वागायचे कसे हेहि. कारण तुम्हाला आजचे जग माहित आहे, तुमचा स्वतःचा स्वभाव माहित आहे, काय पटेल नि पटणार नाही तेहि माहित आहे.

थोडक्यात गणिताचे पुस्तक असते, त्यात २ + २ = ४ असे लिहीले असते. तसेच अंकगणित, बीजगणित, भूमिती इ. निरनिराळी पुस्तके ज्ञान देतात. ते नेहेमीसाठी सत्य आहे पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे फक्त तुम्हीच प्राप्त परिस्थिती वरून ठरवता. त्याचा उपयोग रोजच्या, आजच्या, उद्याच्या काळात कसा करायचा हे त्या काळातील प्राप्त परिस्थितीनुसार समजते.

काही इतर similarities शब्द आणि संस्क्रुतितील.

The following is an example of the closeness of the Avestan Old Iranian and Rig Vedic Sanskrit languages:
Old Iranian/Avestan: aevo pantao yo ashahe, vispe anyaesham apantam (Yasna 72.11)
ऋग्वेद abadhe pantha he ashae, visha anyaesham apantham
Translation: the one path is that of Asha, all others are not-paths.

अवेस्ता Yasht (13.143 & 144) मध्ये Aryan lands or Aryan nation, called "Airyana Vaeja or Airyanam Dakhyunam"
वेदा मध्ये Arya Varta .

या Airyana पासुन इरान आणि आरण्य हे शब्द आले असावेत.

अवेस्तामध्ये ज्या १६ जागा झरत्रुष्टाला दिल्या त्यात "Hapta Hindu" बरोबर 'Haroyu' चा उल्लेख आहे.

हे एक्दम शरयु सार्खे वाटते.

In the Avesta, Jamshid is called Yima-Srira or Yima Khshaeta, meaning Yima the radiant, son of Vivanghat. In an Old Persian tablet found at Persepolis, he is called Yama-kshedda, and eventually in Middle Persian Pahlavi, his name is transformed to Jam-sheed (to this day, the Parsees of India continue this penchant for converting the Y sound to a J sound). In the Vedas, he is called Yama, son of Vivasvant.

अवेस्तामध्ये प्रार्थनेला मंथरा म्हणतात. आपण मंत्र म्हणतो
http://tenets.zoroastrianism.com/perfct33.html
रामायणातल्या मंथरा दासी च्या नावाचा अर्थ प्रार्थना नसेल?

आपण सीतेचे अग्निदिव्य वाचतो.
अवेस्तामध्ये आगिचा देव अतार या सबंधी काही महिती विकिपेडीया वरुन
In the most ancient texts, atar is a medium, a faculty, through which judgement is passed and reflects the pre-Zoroastrian institution of ordeal by heat (Avestan: garmo-varah, heat ordeal; cf. Boyce 1996:ch. 6). So, for example, justice is administered through atar (Yasna 31.3, 34.4, 36.2, 47.2), the blazing atar (31.19, 51.9), through the heat of atar (43.4), through the blazing, shining, molten metal (ayangha Khshushta, 30.7, 32.7, 51.9). An individual who has passed the fiery test, has attained physical and spiritual strength, wisdom, truth and love with serenity (30.7). However, among all the references to atar in the oldest texts, it is only once addressed independently of Ahura Mazda. In this exception, atar is spoken of in the third person masculine singular: "He detects sinners by hand-grasping" (Yasna 34.4).

ज्यांना यमश्रेश्ठ चा जमशेद कसा होउ शकतो असे वाटत असेल त्यांनी

यत्र चा जेथे
योगी चा जोगी
जार चा यार
(अर्थात वरील ३ शब्द फार नंतर झाले)
याचा विचार जरुर करावा.

मंथरा... मंत्रा....... असेल का? Happy ( आता कैकयी चा अर्थही अवेस्तात बघायला हवा.. ! Happy )

ऋग्वेदात एका राक्षसाचा उल्लेख आहे.. जरुथ नावाच्या... आर्यानी याला यज्ञात जाळून टाकले म्हणे.. काही इतिहासकार जरुथ म्हणजे झरतृष्ट असे सांगतात... ( झरतृष्टाचा शेवट कसा झाला ? ) या घटनेचा काळ साधारणपणे इ स पूर्व ५०० असा निघतो.. (म्हणे.. )

ऋग्वेदात बर्‍याचदा देवानी राजाना मदत केली असे उल्लेख येतात. पण हे केवळ त्या राजानी विनयाने त्यांच्या यशाचे श्रेय त्या त्या देवाला दिले असावे, असे मला वाटते.. जसे शिवाजी महाराजांच्या चरित्रात प्रत्येक यशस्वी युद्धानंतर साक्षात भवानी मातेनेच हे यश दिले, असा उल्लेख आढळतो, तसा हा प्रकार असणार...

असे असले तरी पुराणांतून असेलेल्या वंशावळी व इतर घटना तत्कालिन समाजाचे दर्शन घडवतात. त्यामुळे पुराणातले सर्वच फेकुन देण्याजोगे नाही>>>>>>>>>>> एकदम मान्य. नुकतीच विष्णुपुराणातली 'ज्यामघ' राजाची अत्यंत मनोरंजक गोष्ट वाचायला मिळाली. मानवी मनाचे अनेक कंगोरे पुराणातून समोर येतात.
एक प्रश्न - बाणासुराच्या कथेत, कृष्ण आणि शंकराचे युद्ध झाले व त्यात वैष्णव ज्वराने माहेश्वर ज्वराचा पराभव केला असा उल्लेख आहे. हा सर्वच भाग खूप नंतर उद्भवलेल्या शैव-वैष्णव वादाचा परिणाम आहे काय?

हो प्रथमदर्शनी वाटते तसेच. शैव- वैष्णव वाद पण पुरातन आहे, नंतर अचानक ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा तसे हा वाद उफाळून आला. शंकर कृष्णाचे युद्ध ही प्रतिकात्मक व नंतर घुसडलेली कथा आहे असेच वाटते. ह्या वादांचे युद्धस्वरुप तात्विक होते, खरोखरीचे युद्ध नव्हते. पण मांडताना ते देवांमधिल युद्ध स्वरुपात मांडून नंतर दोन्ही देव एकमेकांना आदरणीय ठरतात (विष्णू, शंकर) हे दाखविण्यामागचे कारण कदाचित इतर मंताचा योग्य तो आदर ठेवावा असे तर नसेल?

कैकयी केकय म्हणजे अफगाणिस्तान भागातील... म्हणजे पर्शियाजवळ... मंथरा तिच्या माहेरची म्हणजे त्याच प्रांतातील. अवेस्तात मंथरेचा अर्थ प्रार्थना शक्य आहे.

हरियु म्हणजे काही लोक हराप्पा म्हणतात.

केदार,या धाग्यावर आता वेद आणि त्याच्यातील अगाध विज्ञान या विषयावर 'हातखंडा' असलेले तज्ञ येतीलच. मग त्यांचे एक एक अचाट दावे वाचायला मिळतील.

मी भांडत नाही आहे.. मी जे लिहिले आहे ते वेदात खरोखरच आहे. मी हे उपहासाने किंवा चेष्टेने लिहिले नाही. येऊकामी यानी कोणत्या उद्दे३शाने लिहिले ते मला माहीत नाही... वेद हे सर्व हिंदुना अभिमानास्पदच आहेत.. विनोबानी ऋग्वेदाला आई मानले आहे. दुर्दैवाने वेदांची मूळ ऋचा आणि त्याचे मराठी ( किंवा इतर भाषांतर) अशी पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत.. वेद भाषांतरावर काही हिंदी पुस्तके आहेत, पण मराठी अगदी कमी. त्यामुळे परकीयानी केलेले इंटरनेटवरचे भाषांतर आपल्याला वाचायला लागते, अशी आपली अवस्था आहे. वेदांचे सार्थ व सटीप मराठी भाशांतर व्हायला हवे.

आम्ही भांडत नाही आहोत. फक्त वेद म्हणटले की ज्यांचा ईगो सुखावतो त्यांचे पोरखेळ क्लेम कसे असतात ते सांगतो आहे. वरदा, काड्या म्हणू नये समीधा म्हण्टले कि या धाग्याला धार्मिक फिल येईल आणखी. Attension sicking behaviour वगैरे कैच्याकै तुमचं....

आर्यांनी थंड प्रदेशात अग्नीभोवती शेकोटी केल्यानंतर लिहिलेली गीते म्हणजेच हे साहित्य. अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षा फार वेगळे नाही.

जामोप्या, येऊकामी एक सूचना, तुम्ही तुमच्या रंगीबेरंगीमधे तुमचे विचार का लिहित नाहि ? प्रत्येक बाफावर जाऊन तेच तेच लिहायचे कष्ट वाचतील. फक्त लिंक देत जा.

Pages