झलक शीर्षकगीताची (उल्हास भिडे)

Submitted by UlhasBhide on 17 January, 2012 - 01:22

जगभरात विखुरलेल्या अनेक मायबोलीकरांच्या सहभागाने ’मायबोली शीर्षकगीत’ संगीतबद्ध करणं हा उपक्रम
म्हणजे एक फार मोठं आव्हान. पण आपले ज्येष्ठ मायबोलीकर श्री. योगेश जोशी यांनी (योग) घेतलेली अपार मेहनत, त्यांना गायक मायबोलीकरांनी तितक्याच तळमळीने दिलेलं सहकार्य, आणि मायबोलीच्या संस्थापकांनी यात जातीने लक्ष घालून संबंधितांशी संपर्क साधून दिलेला सल्ला, सूचना, मार्गदर्शन तसंच ऍडमिन, व्यवस्थापन समिती आणि या विषयातील तज्ञ मायबोलीकर यांचा सक्रीय सहभाग या सार्‍यामुळे हे काम सुकर झालं आणि अतीशय योजनाबद्ध रीतीने पार पडलं.

योगेश जोशी(योग) :
सिनिअर माबोकर म्हणून कुठेही आढ्यतेचा लवलेश नाही. संगीत क्षेत्रातलं आणि तत्संबंधी तंत्रज्ञानातलं उत्तम ज्ञान आणि अनुभव असूनही बढाया मारण्याची वृत्ती नाही. अगदी down to earth माणूस. गायक माबोकरांच्या चुका/त्रुटी स्पष्टपणे पण मार्दवपूर्ण शब्दात सांगण्याची, समजवण्याची धाटणी. प्रत्येकाकडून जास्तीत जास्त चांगलं करवून घेण्याचं कसब. वेळ आणि वेग यांचं संतुलन राखत अतिशय शांत चित्ताने, हसतमुख राहून स्वत:च्या घरातलं कार्य असल्यासारखा हा माणूस झटला. “योग यांना बघून तर झपाटलेपण काय असतं याची प्रचिती आली” असं अनिताताईंनी म्हटलंय ते तंतोतंत खरं आहे.
स्वत: झटून, सर्वांचं सहकार्य मिळवून हे सर्व घडवून आणलं याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अशा टीम-लीडरबरोबर काम करणं हा खूप आनंददायक अनुभव असतो. हा आनंद सर्व संबंधित माबोकारांनी अनुभवला असेलच.

माबोकर गायक, गायिका :
यांचं योगदान तर खूपच महत्वाचं. दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी गीताची नियमित तालीम केल्यामुळे प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी त्यामानाने कमी रिटेक्स घ्यावे लागले. काही प्रसंगी गीतातील काही विशिष्ट जागा घेताना जरी ३-३/४-४ रिटेक्स झाले तरी सांगितलेले बदल अंमलात आणून, न कंटाळता सर्वांनी योगेशना संपूर्ण सहकार्य दिलं. खरं तर यातल्या प्रत्येक गायकाला ही गोष्ट माहित आहे की, जरी संपूर्ण गीत त्याच्या / तिच्याकडून गाउन घेतलेलं असलं तरी प्रत्येकाने गायलेल्या एखाद-दुसर्‍या निवडक ओळीचा अंतर्भाव गीतात केला जाणार आहे. “एकाच काय, अर्ध्या ओळीचा अंतर्भाव जरी झाला/न झाला तरी आपण सर्व मिळून काहीतरी चांगलं घडवतोय, हेच मोठं समाधान आहे” अशा स्वरूपाचे उद्गार त्यांच्याकडून ऐकल्यावर मन भरून आलं, फार पूर्वी ऐकलेल्या एका गीताच्या ओळी आठवल्या -----
"असू आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदिर उभविणे हेच आमुचे शील"

एक सुंदर कलाकृती निर्माण करायची हे सर्वांचं ध्येय. ध्येय ही एक प्रकारची नशा (अर्थातच उदात्त अर्थाने) असते. आणि ध्येयपथावर स्वत:ला झोकून देऊन निरंतर मार्गक्रमण करणं हीदेखील तितकीच नशा, ’मधुशाला’ मधे हरिवंशरायजी बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे :
“मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला”
गेले काही महिने सगळेच या उदात्त नशेने, ध्येयाने झपाटलेले होते.

पण या सगळ्यात माझा प्रत्यक्ष सहभाग अगदीच नगण्य. कारण ना मी गाऊ शकत, ना गीताबरोबर प्रकाशित होणार्‍या व्हिज्युअल इफेक्ट्स बाबत स्वत: काही ठोस करू शकत. त्यामुळे moral support इतकीच काय ती माझी मदत.
असो .....

कला, तंत्रज्ञान आणि मायबोलीकरांनी ’आपल्या मायबोलीचा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी आत्मीयतेने घेतलेली मेहनत; अशा त्रिवेणी संगमातून एक सृजनसोहळा सांघिकरीत्या घडतोय, शीर्षक गीतातल्या या ओळी :
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते विश्वात 'मायबोली'

प्रत्यक्ष साकार होताना दिसतायत आणि मीही या सृजनसोहळ्यातला एक छोटासा अंश आहे हे माझं परमभाग्य.

.... उल्हास भिडे

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच झालयं गाणं.. आणि व्हिज्युअल्स पण अप्रतिम! सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.

इतकं भारी वाटल ना गाणं ऐकून. >> + १.
व्हिज्युअल्स पण अप्रतिम! >> + १
ह्या गीताचा वापर कुठे आणि कशासाठी होणार आहे?

सुंदर झालंय. मायबोली हे शब्द सरस्वती मधे गुंफण्याचं अ‍ॅनिमेशन मस्तच आहे. सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन!

योगेश जोशी यांचे टीम लिडर म्हणून अभिनंदन.
शीर्षक गीत सुंदरच आहे. पण त्याबरोबर ज्यांनी आवाज दिला ते सर्व गायक हे देखील अभिनंदनास पात्र आहेत. रेकॉर्डिंग उत्त्तम झालं आहे. आणि व्हिजुअल बद्दल तर कौतुकास शब्दच नाहीत.

सांघिक यशाबद्दल सर्वांचेच अभिनंदन !

सुन्दर..! चित्ररूपपण एकदम छान.. सरस्वतीसह!

गाणे ऐकताना.. उगाचच भरून आलं.. आम्ही स्वतः काही(च) केलं नाही.. पण तरीही आपणच खूप काही तरी साध्य केल्यासारख वाटलं. Happy Happy

उल्हासजी कित्ती छान लिहिलत Happy
खरच हा सगळा अनुभव फार फार छान होता.
अ‍ॅनिमेशनबद्दल लिहिणार्‍या सगळ्यांना धन्यवाद !

खूप छान आणि कष्ट घेऊन तयार केलेली शीर्षकगीताची झलक आवडली. संपूर्ण गीत ऐकायला केव्हा मिळेल त्याची आतुरतेने वाट पहातो. उल्हासराव, तुमचे आणि सर्व योगदानकर्त्यांचे अभिनंदन !

ऐकलं मी ही....... Happy
उकाका,
तुम्ही लिहीलेल्या "प्र त्ये क" शब्दाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाहीच!!
काय सुरेल झालं आहे, हा टीझर म्युझिकपीस ऐकूनच प्रचंड आनंद झाला आहे...
जिथे दिवसातील अनेक तास आपण वावरतो आहोत त्या संकेतस्थळाबद्दल अटॅचमेंट आहेच- त्याबद्दल वर्णिलेला प्रत्येक शब्द मानाचा झाला आहे, आणि ह्या गाण्याला साकारण्यासाठी घेतलेली मेहनत जाणवते आहेच! ब्राव्हो फ्रेंड्स- अ रिअल ग्रेट जॉब Happy

सार्‍या टीमचे अभिनंदन, खूप खूप अभिनंदन...

भुंगा आलाप सहीच झाला आहे, त्या आलापाने डायरेक्ट गाण्यात प्रवेशल्याचा आनंद मिळतो आहे!

एकूणच वर्ल्ड क्लास...!!

न राहवून- पुन्हा एकदा अभिनंदन सार्‍यांचेच.. आणि आभार आम्हांला श्रवणीय अनुभव प्रदान केल्याबद्दल Happy

अप्रतिम!!!!!
किती गोड वाटतंय ऐकायला. मन प्रसन्न झालं एकदम.
सरस्वतीमध्येच 'मायबोली' अक्षरे गुंफण्याचा कल्पनेला सलाम! >>>>>>१+++
सर्व गायक गायिका, वादक या सगळ्यांचे आभार, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! चाल अतिशय सुरेल बांधलीये.
हो आणि उल्हास काकांनी लिहलय पण हे गीत फार छान.

क्या बात है !!! सगळ्या गुणी लोकांची साधना छान रुप घेऊन आलीय... भिडेसाहेब, योग, रैना , देवसाहेब अन आमचे दुबईकर केम्भावी किडस... ही सगळी ओळखीची नावं यामागे आहेत ही आणखी आनंदाची बाब...
ब्राव्हो !!!

सुंदर,
सई पुण्याला भेटली होती, तिने सांगितल्यापासूनच ऐकावेसे वाटत होते.
सूरेल झालेय, (असा नेटवरचा पहिलाच प्रयत्न असणार बहुतेक.)

संपूर्ण टीम वर्क जबरदस्त.
उत्कृष्ट शब्दरचना, कर्णमधुर संगीत, सुरेल आवाज - वा वा वा - कान तृप्त झाले.
सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Pages