नशीब भाग - ५२

Submitted by विनायक.रानडे on 4 January, 2012 - 01:24

१९९० चा तो काळ होता. मोठ्या मुलाचे शाळेत शिक्षक वर्गाशी पटत नव्हते कारण मागील भागात घडलेला नाटकातील बक्षीस सोहळा. मी वर्तमान पत्रातून शिकवणी जाहिराती बघितल्या. त्यातल्या एका दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधला. बोलण्यावरून समजले बाई "मद्रासी" होती. तिने माझ्या मुलाच्या शाळेचे नाव विचारले, मी नाव सांगताच त्या शाळेतल्या मुलांना ती शिकवत नाही सांगून दूरध्वनी बंद केला. मी यादीतला दुसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले बाई "बंगाली" होती. ह्या बाईने शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्‍या शिक्षकाचे नाव वगैरे विचारले. तिने सांगितलेले शिकवणी शुल्क ऐकून मी दूरध्वनी बंद केला. मी यादीतला तिसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले गुजराथी बेन होती. तिची शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्‍या शिक्षकाचे नाव वगैरे फीत ऐकली पण मीच दूरध्वनी बंद केला. "मुलाने स्नेक (स्नॅक) खाऊन शाळेच्या होल (हॉल) मंदे झोपा" काढू नये म्हणून मी शिकवणी शोध तिथेच थांबवला. अहो काय सांगू खाकेत कळसा अन गावाला वळसा घातला बघा. घराजवळच राहणारा मराठी मित्र त्याच्या बायकोने माफक दरात शिकवायचे कबूल केले. हे घडले कसे तर भाजीच्या दुकानात माझी बायको व ही मित्राची बायको ज्योतसे ज्योत लावत बोलत होत्या. त्यातलीच एक ज्योत मुलाच्या शिकवणीची होती.

मी छायाचित्रणाच्या कामा करता एका कंपनीत गेलो असताना त्या प्रमुखा बरोबर बोलत होतो. त्याच्या मुलीला शाळेत कसा त्रास झाला तो सांगत होता. त्याची मुलगी सातवीत असताना आई बरोबर भारतातून ओमानला आली. एक नवीन जागा, शाळा, अभ्यासक्रम म्हणून सहकार्‍याने एक शिकवणी सुरू करून दिली. त्या वर्षी मुलगी बर्‍या गुणांनी पास झाली म्हणून आठवीत गेल्यावर शिकवणी सुरू करायला त्या शिकवणीच्या बाईने नकार दिला. ह्याने पुन्हा सहकार्‍याला विचारले, त्याने जे सांगितले त्यांवरून शिकवणीचा व्यवसाय कसा चालतो हे कळले. शिकवणी घेणारी बाई व शाळेतील शिक्षिका ह्यांचा एक गट असून पूर्ण वर्षाचा करार असतो. सगळ्या चाचण्यांचे जे प्रश्न विचारले जाणार त्याच्या दुप्पट प्रश्न शिकवणी वाल्या बाईला मिळतात. त्याचाच अभ्यास करून घेतला की यश निश्चित. शिवाय प्रश्न फुटले असे सिद्ध होत नाही. सातवीची शिकवणी वाली आठवीच्या गटात नव्हती. आठवी ते दहावीचा एक स्वतंत्र गट असतो. त्यात भागीदारी जास्त असते म्हणून शुल्क जास्त मोजावे लागते. त्या कंपनी प्रमुखाला हे मान्य नव्हते त्याने सातवीच्याच शिक्षिकेची शिकवणी चालू ठेवली. दोन महिन्याच्या चाचणी व तिमाही परीक्षेत मुलगी नापास झाल्यावर त्याला आठवीचा नवीन शिकवणी गट शोधावा लागला. त्याची मुलगी आठवी पास होताच त्याने तिला भारतात आजी कडे परत पाठवले. नववी / दहावीची शिकवणी शुल्क त्याला परवडणारी नव्हती. तेवढ्या खर्चात भारतात ती मुलगी दोन वर्ष आरामात राहू शकणार होती.

मला एका आयते कपडे उत्पादकाचे छायाचित्रण व चलचित्रणाचे काम मिळाले. माझा कपडे शिवण्याचा अनुभव होता म्हणून छाया चित्राद्वारे शिवणाच्या कोणत्या प्रक्रियेला जास्त महत्त्व दिले जावे हे मी सहज ठरवू शकलो. चलचित्रणा द्वारे कपडे उत्पादनातील कौशल्य फार चांगले दाखवता आले. त्या एका कामाने अजून दोन कपडे उत्पादकांनी मला छायाचित्रण व चलचित्रणाचे काम दिले. त्यानंतर एका घरगुती वीज वाहक तार उत्पादन कंपनीने जपानचा ५ एस कार्यक्रम त्यांच्या उत्पादन जागेत सुरू केला त्याचे चलचित्रणाचे काम मी केले. ति चित्रफीत उद्योग मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात दाखवण्यात आली होती. योग जुळून आले होते मंत्रालयाच्या त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण मीच करीत होतो. चित्रफितीच्या शेवटी माझे नाव पडद्यावर झळकले व मग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याने माझ्या कामाचे व्यासपीठावरून कौतुक केले होते. त्या एका चित्रफितीने औद्योगिक वसाहतीचे चित्रीकरणाचे सरकारी काम मिळाले. त्या वसाहतीत असणारे कापड उद्योग, पाणी तापवणारी उपकरणे, प्रकाश नळ्या व्यवस्था, संगणक छपाई कागद, सगळ्या प्रकारचे तैल रंग, चार चाकी वाहनांचे बॅटरी सेल, रेडीएटर, चॉकलेट / बिस्किट अशा विविध उत्पादकांच्या चित्रफिती बनवण्याचे काम मला मिळाले. प्रत्येक कामात माझा उत्पादन क्षेत्रातील विविध अनुभवांची फार मदत झाली. त्या कंपन्यांच्या प्रमुखांनी एका चलचित्रफित तयार करणार्‍याला उत्पादन क्षेत्रातील अनुभव असावा ह्याचे कौतुक केले होते.

ओमान मधले पहिले जाहिरात निरीक्षणाचे काम मी सुरू केले व पुढे सातआठ वर्ष ते सतत चालवले होते. ओमान दूरचित्रवाणी वरून रोज संध्याकाळी ६ ते १२ ह्या वेळात दाखवल्या जाणार्‍या जाहिराती किती वाजता कोणत्या कार्यक्रमात दाखवल्या गेल्या त्याचा पुरावा म्हणून चलचित्र मुद्रण रोज न चुकता मी, बायको व मुले करत होतो. दुरचित्र संचावर जाहिरात चालू होण्या आधी व नंतर कोणता कार्यक्रम होता ह्याची ५ सेकंदाची चित्रफीत पुरावा म्हणून जाहिराती बरोबर मुद्रित करून दर आठवड्याला तयार करीत होतो. त्या जाहिरातींच्या आठवड्याच्या लिखित वृत्तांताची एक प्रत तयार करून देत असे. करारा प्रमाणे जाहिरात वेळेवर न दाखवल्याची परतफेड किंवा पुढल्या बिलात त्या किमतीची सूट माझ्या त्या जाहिरात निरीक्षणाने जाहिरातदाराला मिळत होती. तो फायदा २ ते ८ हजार रियालचा होता. ह्या निरीक्षण कामातून मला महिना १५० ते ३०० रियाल मिळत होते.

त्या काळात माझ्या आईला व तिच्या सोबतीला मोठ्या बहिणीला मी ओमानला बोलावले. ज्या आईने माझी लायकी फक्त हमाल होण्याचीच आहे असे ठरवले होते. तिने माझे वैभव जवळून पाहावे हा उद्देश होता. आई येणार म्हणून माझी माझदा हॅचबॅक परत करून माझदा स्टेशन वॅगन विकत घेतली. मी बायको व दोन्ही मुले विमान तळावर गेलो. विमानतळाच्या बाहेर एक पेट्रोल पंप आहे त्याला लागूनच एक छोटीशी टेकडी आहे त्यावर छान बगीचा बनवलेला आहे. त्यात मस्कत नगरपालिकेचे १० फुटाचे चिन्ह असून मोठ्या अक्षरात "तुमचे स्वागत" असे लिहिलेले आहे. त्याचे चलचित्रीकरण केले. त्या टेकडीवरून एअर इंडियाचे विमान आकाशात दिसताच चित्रीकरण सुरू केले व जमिनीला टेकताच बंद केले. आईच्या स्वागताकरता बायको व मुले पुढे गेली, मी चित्रीकरण सुरू ठेवले ते वादिकबिर मध्ये असलेल्या घरापर्यंत चालू ठेवले होते. आईचे, माझे मुलांचे बोलणे बायको चलचित्र मुद्रण करीत होती. आईने आमच्या करता श्री गणेश मूर्ती असलेले २ इंचाचे चांदीचे नाणे आणले होते. त्याची स्थापना करण्याकरता भिंती वर काच लावून त्यावर भगवा रेशमी रुमाल ठेवला व आई बरोबर आम्ही सगळ्यांनी श्री गणेशाची पुजा केली. त्या दिवसापासून बर्‍याच उलाढालींना सुरुवात झाली. ति कशी पाहा पुढील भागात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मामी तुमचा कोणत्याही प्रकारच्या शिकवणीशी व त्या गटबाजीशी जवळचा संबंध नाही ना?