मी तुझ्याशी काय बोलू सांग ना

Submitted by बेफ़िकीर on 3 January, 2012 - 08:14

मी तुझ्याशी काय बोलू सांग ना

केवढी वर्षे मधे डोकावली

ठीक की होतो बरोबर पण तरी

एकमेकांचे कुठे होतो म्हणा

शोधला मी मार्ग माझा वेगळा

काढली होतीस त्यावर भांडणे

ऐकले नाही तुझे काहीच मी

केवढी आसावली होतीस तू

भीक मागितलीस मी परतायची

मी तुला नाही म्हणालो त्याक्षणी

मान्यही केलेस माझे वागणे

आणि तू बसलीस त्या वाटेवरी

मी परत येईन या आशेमधे

मग तुलाही छंद जडला शेवटी

एकटी जगणे सुखाचे मानुनी

राहिली होतीस त्या वाटेवरी

मात्र मी म्हातारपण झेलायला

सज्ज नव्हतो एकटा तुझियाविना

मग परतलो त्याच वाटेने पुन्हा

आणि तू दिसलीसही तेथे मला

आणि ओळखलेसही झटक्यात तू

आणि कवटाळून तू रडलीसही

आणखी हसलीसही ओथंबुनी

आणि मीही हासलो लाचारसा

आणि चर्चा जाहली स्वप्नांवरी

जी कधी पाहायचो मी आणि तू

आणि चर्चा जाहली शपथांवरी

घेतल्या होत्या कधी मी आणि तू

पूर्तता होणारही त्यांची कशी

यत्न जर पन्नास टक्के व्हायचे

सोडले मी पाहणे केव्हाच ते

स्वप्न ना सत्यामधे उतरायचे

पण मला आता हवी आहेस तू

हे मला बोलायचे आहे जरा

पण तुझे हे प्रश्न संपेनात ना

उत्तरे कोठून आणू सांग ना

.
.
.
.
.
.
.
.
..

.
.

केवढी वर्षे मधे डोकावली

मी तुझ्याशी काय बोलू सांग ना

====================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दो ओळीत योग्य अंतर ठेवून अपेक्षित परिणाम छान साधला आहात ! ही स्टाईल ओरीजनल आणि खूप सुखावह आहे; बेफिजी
कविता पण तश्शीच......अभिनंदन !!

सहि

khupch chan............. savpnana kahi maryada astat hech shevti khar.....

पण तुझे हे प्रश्न संपेनात ना
उत्तरे कोठून आणू सांग ना >>>> छानच.
उत्तरे कोठून आणू या प्रश्नातच उत्तरं आली.

Happy

पण मला आता हवी आहेस तू

हे मला बोलायचे आहे जरा

पण तुझे हे प्रश्न संपेनात ना

उत्तरे कोठून आणू सांग ना

आर्त ओळी...कविता आतून आल्यासारखी वाटली.. खुप आवडली.