असच आपलं... सटर फटर... सात!

Submitted by ह.बा. on 2 January, 2012 - 04:57

मी घरी कधीही तणावाचे वातावरण राहू देत नाही. प्रश्न बिकट असतात आणि जे खचतात त्यांच्यासाठी ते सोडवणं अशक्यप्राय होऊन जातं. घरातलं वातावरण शेवाळलेल्या भुईसारखं नसावं नाहीतर सावध चालूनही कधी कधी घसरण्याची वेळ येते. संवादाने विझल्या उत्साहाला सहज फुंकर घालता येते. गुरफटणार्‍या मनाला प्रश्नांच्या गुंत्यातून अलवार बाजूला करता येते. कुणी ठरवून धावणारा असतो तर कुणी बेभान धावणारा... पण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात. मानापमानाच्या खड्यांची जाणीव होणारच पण खडे तळपायाच्या खाली असतात त्याना तिथेच ठेवायचे... टोचणार्‍या आणि गुदगुल्या करणार्‍या अशा सार्‍याच गोष्टींना खुसखुशीत आणि हळुवार शब्दांमधे गुरफटून सायं सहा तीस ते सकाळी सात या वेळेत एक छानसा परफॉर्मंस द्यायचा मी प्रयत्न करतो. खाली आलेले स्गळे संवाद वाचताना कदाचित त्यात विनोद दिसेल. पण मला त्यात खंत, ओढ, मनाची द्विधा अवस्था, स्वप्न... असं बरच काही दिसतं... हा संवाद कदाचित लेखकाच्या घरातला असेल पण तो दुसर्‍या कुणाच्या घरी घडतच नाही असे म्हणनारा एकही प्रतिसाद मिळणार नाही याची खात्री आहे... चला थोडस हसून घ्या किंवा मग करिअर आणि घर, स्वप्न आणि प्रेम, झेप आणि पिंजरा, विजोड की योग्य, स्वातंत्र्य आणि कुटूंब.... इ. इ. इ. बोजड शब्द आठवून थोडासा गंभीर विचारही करून पहा... विसरू नका... हे सटर फटर... आहे!!!

सायं. सहा तीस. दिवस सुरू.
क्रेडीट घ्यायला सगळे पुढं असतात.... मर मर मरा काम करा आणि अवॉर्ड घ्यायला मॅनेजर धोकटी घेऊन पुढं...
अगं आवर स्वतःला... काय झालं...
काय नाय रे... नेहमीचं. जाऊदे.
नव्हे बडबडत होतीस म्हणून म्हटलं... बग आलेला का?
आता ह्याच्यात बग कुठून आला? तुला नाही कळत तर जाऊदे ना...
तस न्हवे... कोडींग नसेल जमत तर सांग मला मी मदत करीन... एम जे फर्स्टक्लास आहे मी...
जाऊदे म्हटलं ना... चहा करते.
बरं...
शॉर्ट टर्म साठी ऑनसाईट जाऊन येऊ का रे?
ये ना. पण चहा ठेवल्यावर जा. मला तितकासा जमत नाही ना...
ऑनसाईट म्हणजे युएस ला. कंपणीकडून.
अच्छा म्हणजे परदेशात? जा ना जा...
शिवांशू राहील का आज्जीजवळ?
राहील ना. मी लहानपणापसून आज्जीकडेच होतो.
हो पण तुझी आई युएस मधे नव्हती.
म्हणून काय झालं? ती कासार शिरंब्यात तर होतीच ना?
चेष्टाच करणारेस का?
नाही!
चहा घे.
(एवढ्यात मावशी चिरंजीवाना घेऊन घरी येतात.)
ह्हे शाब्बास... मुंगळा आला बघा... मुंगळा आला बघा... य्ये य्ये...
कुठाय शिवांशूची आई?
किचनात आहे.
हेहेहेहेआंम.... जाते वो
बर बर... उद्या या सकाळी लवकर...
हो...
शिवल्या... बाबाला चिकटला का? ये इकडं...
दुदू?
हा देते...
भूभू... भॉ भॉ भॉ...
होय? कुठं होतं...?
गोगा काटी... हां!
मारलं होय... शानं गं बाळ माझं.... ह्याला मांडीवर घेऊन दूध पाज रे...
कसं शक्य आहे?
का? चितळे सार्‍या महाराष्ट्राला पाजतात...
ते फक्त स्वतःच नाव लावतात. गाई म्हशिंना पब्लिसीटी मिळू नये म्हणून.
ही घे बाटली...
ये रे शिवल्या... बाबाच्या मांडीवर बसून दुदू प्याचा हां...
चान्स मिळेल. जाऊ क ऑनसाईट?
जा ना बाई. दर आठवड्याला विचारत जाऊ नको... मी रोज शेकडो वेबसाईटवर जाऊन येतो कधी विचारतो का की वेबसाईटवर जाऊ का म्हणून?
जातेच.
जाच.
पिल्यासाठी थांबलिये. जरा मोठा झाला की.
झोपला बघ हा. जेवन झालं का?
हो.
परवाच्या रिलीजवेळी तर एवढी कटकट झाली.
का? बग्ज आलेले का?
बावळटा बग्ज हा एकमेव प्रॉब्लेम नसतो...
ओके. म्हणजे कॉक्रोचेस पण असतात?
जाऊदे. तुझं सांग काय म्हणताय्त नवीन क्लायंट?
चाल्लय! प्रेझेंटेशन्स, कॉल, इमेल इत्यादी इत्यादी... हाजिमिमात्से... गोजाईमास... सुझूकी सामुरायनोप्रॉब्ल्रेम...
तुझ्या अजून लक्षात आहे?
मग. तू विसरलीस की काय? तुझ्या जापानी भाषेच्या त्या शिकवण्या चालू असताना माझ्या दोन नोकर्‍या गेल्या... त्याचही काही नाही. पण एवढी भाषा शिकून तू जपानला गेली नाहीसच. किती स्वप्नं रंगविलेली मी...
एकट्याने एन्जॉय करण्याची...
नाही गं तू गेल्यावर जपानमधे तुझ्या स्वप्नात येण्याची आणि तुझ्याजवळ टाईमपास न करता जपान फिरण्याची... सायोनारा... सायोनारा...
हं. बघतेच आता. या वर्षात जाऊन येणारच.
जा जा. माझी कसलीही काळजी करू नको...
भांडी घासायचा कंटाळा आलाय आज...
हे वाक्य तू स्वतःशी बोलतियेस ना?
हो. हो. स्वतःशीच. एव्ढं कुठलं आलय नशीब.
भांडी घासणारा नवरा मिळणे म्हणजे नशीबवान? असे असेल तर तुझ्यासारखी फुटक्या नशिबाची तूच.
अंथरून टाक.
उत्स्साहवर्धक काम मी न कचवचता करीत असतो!
अरे तुला एक सांगायचं राहिलं..... हॅहॅहॅ.... हुहुहुहु...
जोक मारणारेस का?
नाही रे. एक नवीन जॉईन झालिये. ऑ का ठो कळत नाही.... हीहीही.... आणि...
बग आणत असेल ना सगळे?
तुला बग सोडून माझ्या इंडस्ट्रीतले काही कळाते का?
कळते ना! कोडींग, टेस्टींग, रिलीज, हाजिमिमास्ते, ऑनसाईट, क्लायंट कॉल आणि ह्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे... बग. बघ किती नॉलेज आहे.
गुड नाईट!
एक गझलं ऐकवू का? आजच लिहीलिये...
ए सकाळी लवकर उठायचय ना.
वा वा! म्हणजे तुम्ही मॅनेजरला घातलेल्या शिव्या आम्ही शांतीचे माहाकाव्य असल्यासारखे ऐकायचे आणि आम्ही दिवसभर दुसर्‍यांच्या गझलांवर संशोधन करून यमक जुळणारे शब्द गोळा केले. त्याची एकही मात्रा हलणार नाही आणि मधे मधे अर्थही लागेल अशी मांडणी केली... हे सगळे तुम्ही झोपेच्या नावाखाली अप्रकाशीत ठेवणार?
ऐकव बाबा पटकन...
ओके!
खुराड्यात काल होता झोपलेला
कोंबडा हा आज येथे कापलेला...
हॅ फ्रॉड कवी.... हीहीहीही.... हे चालणार नाही. झोपलेला चे यमक कापलेला कसे असेल?
असू शकतं!
ह्यॅ. थापा नको टाकू. झोप. उद्या ते यमक नीट जुळवून मग ऐकव...
मायला झोपलेला चे यमक कापलेला नाही. मग काय? कोपलेला? हां कोपलेला.... पण कापलेला मधे जी वेदना आहे ती कोपलेलात नाही... काय करावे?.... काय....
उठ रे साडेपाच वाजले...
काल होता झापलेला.... आज येथे कापलेला....
ए यमक जुळले बघ....
ऑफिसला जायचय... तू नऊ वाजेपर्यंत यमक जुळवत बस...
ओके...
सकाळचे सात. दिवस समाप्त!

गुलमोहर: 

ह.बा. Rofl

पण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात
व्वाह!!!

बाकी मस्त खुशखुशीत!

हबा Happy

पण दोघे एकमेकांच्या पायाखालची वाट सुखाची होण्यासाठी एकमेकाला जपत धावतात तेव्हाच त्याला संसार म्हणतात >>>>>>>>>> फारच सुरेखं.

रविवारी सोलापूरला गेलेलास काय?>>>

एखादी गोष्ट मनापासुन आवडली की माझ्यातला इरसाल सोलापूरी जागा होतो मित्रा. त्याला इलाज नाही Happy

Pages