कलंदर, मी आणि जाहिराती (२)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कलंदर, मी आणि जाहिराती (१) - http://www.maayboli.com/node/15684
***
***

'माझ्या व्यवसायाच्या जाहिराती करायच्या आहेत. येऊन भेटू शकाल का?' असा एक दिवस फोन आला. आपल्याला काय, आपण सांगितलेल्या कामाचे नि दिलेल्या भाकरीचे. चलो स्वारगेट, तर चलो स्वारगेट. नो प्रॉब्लेम.

फोनवरून दिलेल्या मित्रमंडळ चौकातल्या पत्त्यावर जाऊन भेटलो. प्रसन्न-हसतमुख, गोरं, उंचनिंच सव्वासहा फुटी, बघता क्षणीच छाप पडेल असं व्यक्तिमत्व. नाव प्रताप काळे. जाहिरातींच्या स्वरूपावरून इस्टेट एजंट असावा. जाहिरातींचे ड्राफ्ट्स देऊन, हिशेब करून लगेच पैसेही देऊन टाकले.

या अशाच जाहिराती साधारण तीन-चार महिने चालल्या. त्यानंतर एक दिवस प्रतापने सांगितलं, रेडिमेड फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आहे, तर त्याच्या जाहिराती करूया. त्यात वेगवेगळी पॅकेजेस घेणार्‍यांना वेगवेगळ्या भेटी अशा ऑफर्सही होत्या. पुन्हा जाहिराती तयार झाल्या. हिशेब झाले आणि लगेच संपूर्ण अ‍ॅडव्हान्स पेमेंटही मिळालं.

काही लोक नाटकी गोड बोलतात, ते आता काही वर्षांच्या अनुभवावरून लगेच कळतं. अशा धोकादायक माणसांपेक्षा कमी बोलणार्‍या खडूस माणसांबद्दल जास्त विश्वास वाटतो. प्रतापचं बोलणं-वागणं आणि एकंदरच वावर असा फसवा वाटत नव्हता. पैशांबद्दल तर मुळीच खळखळ नव्हती. एकंदरच सारं दिलखुलास. एखाद्या माणसाशी आपलं जुळेल, असं जे पहिल्याच झटक्यात वाटत असतं, तसं मला वाटू लागलं. त्यालाही वाटलं असावं. तो सहजच गप्पा मारण्यासाठी मला त्याच्या ऑफिसमध्ये थांबवून घेई, किंवा माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसे. आमचं वयही जवळपास एकच. त्यामुळे अनेक गोष्टी अगदी बालपणीच्या मित्रांगत आम्ही एकमेकांना सांगू लागलो. घनिष्ट मित्रांत होतात, तशा जरूर तिथे वाद-चर्चाही होऊ लागल्या. त्याला निरनिराळ्या ब्रँड्सच्या भारतीय आणि इंपोर्टेड गाड्यांबद्दल बरीच माहिती होती. हा विषय निघाला, की तो न थांबता भरभरून बोलू शके.

त्याच्या ऑफिसात हाताखालच्या लोकांशीही खरं तर तो मित्रासारखंच वागे. कुठचीही अडचण, टेन्शन, प्रॉब्लेम अतिशय शांत मनाने, सहजपणे सोडवणे- या त्याच्या गुणाचं मला कौतुक वाटे. आपण पॅनिक झालो, की प्रश्नाच्या मुळाकडे कसं दुर्लक्ष होतं, आणि आवेगाच्या भरात भलतंच काहीतरी करून बसतो- हे मी माझ्याबद्दल अनेक वेळा अनुभवलं होतं. त्यामुळे प्रतापसारखं- अशी प्रत्येक गोष्ट सहजतेने घेणं, तीतून स्वतःला बाहेर काढून तिच्याकडे शांतपणे बघता येणं- आपल्यालाही जमलं पाहिजे, असं वाटे.

फर्निचरच्या जाहिराती सुरू होऊन चारेक महिन्यांनंतर तो म्हणाला, एक प्रायव्हेट गॅस एजन्सी आपल्याला मिळाली आहे, तर त्याच्या जाहिराती सुरू करू!

आधीचे दोन्ही धंदे अगदी व्यवस्थित चालत असल्याचं एकंदर वातावरणावरून वाटत होतं. तर हे असं अचानक दर दोन चार महिन्यांनी आधीचं सारं बंद करून नवीन धंद्याचं खूळ का निघावं हे मला कळेना. विचारलं तर म्हणाला, अरे सारं करून बघायचं!

पुन्हा नवीन जाहिराती तयार झाल्या. नवीन गॅस कनेक्शन घेणार्‍यांवर ऑफर्सचा मारा झाला. त्याचा भरपूर फायदाही झाला. माझे संपूर्ण पैसेही आधीच मिळाले. संपूर्ण पैसे, तेही वेळेच्या आधीच मिळणे- ही कुठच्याही धंद्यात कळीची गोष्ट होऊन बसते. ते सारं इथं नीट होत होतं.

मग काही महिन्यांनी तो म्हणाला, 'तुला यापुढे चेक्स मी दुसर्‍या अकाऊंटचे देईन. काही दिवसांसाठी आधीचे अकाऊंट मी बंद करतो आहे. विशेष काही नाही- इंटर्नल अ‍ॅडजस्टमेंट, इतकंच.'
मग मला जाहिरातींच्या पेमेंटचे चेक्स 'रणजित नगरकर' या नावाने मिळू लागले. ते पहिल्यासारखेच वेळोवेळी नीट कॅशही होत होते.

मग नंतर एक दिवस एक हजार गॅस कनेक्शन्स विकल्याची पार्टी प्रतापने माझ्यासकट त्याच्या मित्रमंडळीला आणि स्टाफलाही दिली. त्याच्या इतक्या सार्‍या मित्रांसोबत बोलण्याची, बसण्याची ही पहिलीच वेळ. पार्टी रंगात आली, आणि निरनिराळे विषय वाढत गेले तसं कळलं, की प्रतापला सतत गाड्या बदलायला जितकं आवडतं, तितकंच सतत मैत्रिणीही बदलायला. त्याच्या अनेक किश्श्यांना दाद देत 'तुझे प्रताप महान आहेत बाबा..' असं काहीतरी म्हणालो, तेव्हा तो फटकन म्हणाला, 'हो. पण माझं नाव प्रताप नाही!'

मी त्याच्याकडे आवासून पाहत राहिलो, तसा एकच मोठा हशा पिकला. माझ्या डोक्यापर्यंत त्याच्या बोलण्याचा अर्थ पोचत नव्हता बहुतेक. काही क्षण तसेच गेल्यावर त्याने माझा हात हातात घेऊन म्हटलं, 'आजच संध्याकाळी तुला मी चेक दिलाय तो खिशातच आहे ना तुझ्या? त्यावरचं नाव बघ बघू.'
'रणजित नगरकर.' मी चेक काढून पाहत म्हणालो, 'याच तर नावाचे चेक्स देतो आहेस तू गेले काही दिवस.'
'हां. अगदी बरोबर.' तो मागे रेलत शांतपणे म्हणाला, 'तेच माझं नाव आहे!'

मी अविश्वासाच्या नजरेने त्याच्याकडे बघू लागलो. मग त्यानंतर तो स्वतःबद्दल बोलत राहिला, आणि खाणं-पिणं विसरून, डोळे विस्फारत मी ते ऐकत राहिलो.

श्रीमंत बापाचा लाडावलेला पोर.. कॉलेजातली दंगामस्ती.. मुलींना पळवणं आणि प्राध्यापकांना धमकावणं.. कॉलेज संपल्यावर काय करायचं म्हणून खंडणीचा व्यवसाय.. त्यातून बड्या धेंडांशी चकमकी.. मारामार्‍या.. खुनाचे प्रयत्न.. आणि या सार्‍यातून उभे राहिलेले खटले.. मग काही महिने परदेशात परागंदा.. परत आल्यावर वेगळ्या नावाने वावर.. बर्‍याच लटपटी-खटपटी करून पोलिसांशी संधान.. मग सध्या कोर्टात आणि पोलिस स्टेशनांत लावाव्या लागणार्‍या हजेर्‍या..

अनेक खटले चालू असलेल्या या माणसाला आपण गेलं वर्षभर भलत्याच नावाने ओळखतो आहोत!
त्याच्याशी व्यवहार करतो आहोत. इतकंच नाही, तर व्यवहाराच्या पलीकडची मैत्री प्रयत्नपूर्वक जपतो आहोत!

'हे बघ,' तो शांतपणे म्हणाला, 'फसवणूक झाल्यागत तुला वाटत असेल, तर ते मनातून काढून टाक. मला काही दिवस ओळख लपवणं आवश्यक होतं. आपल्या जीवापेक्षा या जगात इतर काहीच महत्वाचं नसतं. तू माझा खरंच एक चांगला मित्र झाला आहेस. वेळोवेळी तू दिलेले सल्ले माझ्या उपयोगी पडले आहेत. तू कोंढव्यात नीट तपास केला असतास तर तर तुला माझी पार्श्वभूमी सहज कळली असती, पण तुझ्या मनात तसं काही आलं नाही, कारण एकंदरच त्या सार्‍या जगाशी तुझा कधी संबंधच आला नसेल. तुझ्याशी छान जमेल, असं मला वाटलं, आणि तुला एक चांगला मित्र बनवायचं मी ठरवलं. तुला अंधारात ठेवायचं नव्हतंच. हे सारं मी तुला कधी सांगेन, इतकाच फक्त प्रश्न होता, तो दिवस आज उगवला. आता गुंडगिरी, लफडेबाजी करून आयुष्य नीट जाणार नाही, हे मला कळलं आहे. मला इथून पुढे व्यवस्थित राहायचं आहे. चांगले, प्रतिष्ठित धंदे करून ओळख मिळवायची आहे. हे सारं करताना तुझ्यासारखे, या इतर माझ्या मित्रांसारखे जवळचे लोक मला जवळच असलेले हवे आहात..'
---

गंदा है पर धंदा है ये. पैशांचं सारं सुरळित चालू आहे, तोवर प्रताप ऊर्फ रणजितशी जुळवून घेण्याचा मी निर्णय घेतला. रणजितने पुढल्या आणखी एक-दीड वर्षात आणखीही चार-पाच व्यवसाय बदलले. जाहिराती होत राहिल्या. माझे पैसे मिळत राहिले. या पैशाच्या निमिताने, जाहिरातींच्या निमित्ताने माझं येणं जाणं, भेटणं चालू राहिलं.

रणजितने खरोखर बदलायचं ठरवलं आहे, हे मला अनेक वेळेला दिसून आलं. कोंढव्याजवळ नगरकरांची शेकडो एकर जमीन होती. आधीचे सारे व्यवसाय बंद करून रणजितने ती जमीन डेव्हलप करून घरं बांधायचं मनाशी घेतलं. आजूबाजूला वाटेल त्या दराने घरं विकणं चालू असताना त्याने परवडणार्‍या दरांत स्वस्त घरं पुरवायला सुरूवात केली. जाहिरातींचा टर्नओव्हर वाढला. या वाढत्या उलाढालीत एक-दोन आठवडे पेमेंट उशिरा मिळणं, हे अर्थातच होऊ लागलं. पण तरीही इतर बिल्डर लोक पेमेंटसाठी साठ आणि नव्वद दिवसांचा 'क्रेडिट पिरियड' मागत होते, त्या तुलनेत हे कितीतरी बरं आणि सुरक्षित होतं. हळूहळू रणजितच्या कंपनीची 'मध्यम आणि कनिष्ठवर्गीयांसाठी घरं बांधणारी कंपनी' अशी ओळख होऊ लागली होती. यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. हे पुरस्कार खरे होते की मॅनेज केलेले, यात मला पडायचं नव्हतं. कारण पुरस्कार मिळतानाचे फोटो असलेल्या जाहिराती, हाही माझ्या व्यवसायाचा भागच होता. याही जाहिरातींचे पैसे अर्थातच मला नियमितपणे मिळत होते.

हे सारं खरं असलं, तरी 'कुठचीही गोष्ट सहजतेने घेणे' या ज्या गोष्टीचा मला एकेकाळी हेवा वाटला होता, त्याचे दुष्परिणामही आहेत, असं मला जाणवू लागलं होतं. त्याचा स्टाफ आणि कंत्राटदार लोकही त्याच्या या स्वभावाचा फायदा घेत आहेत, हे मला अनेकदा कळत होतं. तसं मी सांगून दाखवल्यानंतरही त्याने ते कॅज्युअलीच घेतलं होतं. प्रत्येक गोष्ट कॅज्युअली घेणं हा त्याचा मूळ स्वभावच होता. रणजित या बदलत्या काळातही आपल्या नावावर असलेल्या खटल्यांच्या तारखांना आणि पोलिस ठाण्यांना अतिशय 'कूल' राहून हजेरी लावत होता.

हे सारं चालू असताना रणजितच्या व्यक्तिमत्वात दडलेला सच्चा, दिलखुलास माणूस मला पुन्हा पुन्हा दिसत होता. आणि इतर कशाचं नसलं, तरी या गोष्टीचं अप्रूप मला होतंच.
---

सारं काही बर्‍यापैकी सुरळित चालू असताना एक दिवस कळलं, की जिल्हा परिषदेने रणजितच्या एका प्रकल्पाची चार पाच मजले बांधून झालेली इमारत पाडून टाकली. जमीन रणजितची असली, तरी इमारतीचं बांधकाम तिथल्या ओढ्या-नाल्यांना बंद करणारं, त्यांची दिशा वळवणारं होतं. पर्यावरणसंबंधीच्या काही आवश्यक त्या परवानग्या त्याने बांधकाम सुरू करताना घेतल्या नव्हत्या. धंद्यात कॅज्युअली वागल्यामुळे रणजितला आजवर बसलेला हा सर्वात मोठा फटका होता.

काही कोटींचं बांधकाम वाया तर गेलं होतंच, शिवाय प्रकल्पात घरे घेतलेल्यांनी खटले दाखल केले. माझंही काही लाखांचं पेमेंट रणजितकडे त्या वेळेला बाकी होतं. रणजितची परिस्थिती आणि वेळ बघून मी काही दिवस गप्प राहायचं ठरवलं. नाही म्हटलं तरी आम्ही दोघं एकमेकांना गेली काही वर्षे नीट ओळखत होतो. धंदा करताना प्रासंगिक तोटा, फटके सोसून माणसं जोडावी लागतात, हे मी एव्हाना शिकलो होतो. सार्‍याच गोष्टी नियमावर बोट ठेऊन तर माझ्याही धंद्यात कधी झाल्या नव्हत्या.

आलेल्या आपत्तीतून आणि पैशांच्या चणचणीतून मार्ग काढण्यासाठी रणजितने जो मार्ग शोधला, तो ऐकून मी कपाळावर हात मारून घेतला. त्याच्याच दुसर्‍या ठिकाणच्या जमिनीवर श्रीमंतांसाठी बंगल्यांची स्कीम त्याला करायची होती. एकेक बंगला दहा कोटी रुपयांचा!

त्या जमिनीचं लोकेशन बघता तिथं इतके पैसे खर्च करून बंगला कुणी घेणार नाही, हे मी त्याला सांगून पाहिलं. पण तो या महत्वाकांक्षेने पछाडला होता. पुणे-मुंबई-दिल्लीतले श्रीमंत लोक आणि परदेशातले लोक हे बंगले विकत घेऊ शकतील, असं त्याचं म्हणणं होतं.

'अडचण असल्याने मी माझ्या पैशासाठी थोडं थांबेन, पण अजिबात पटत नसलेल्या या प्रकल्पाच्या जाहिराती मी करणार नाही,' असं मी स्पष्टपणे रणजितला सांगून टाकलं. त्यानेही ते फारशी खळखळ न करता पटकन कसं स्वीकारलं, ते मला नंतर कळलं.

या प्रकल्पाच्या भारतात जाहिराती करायच्याच नाहीत, असं त्याने ठरवलं होतं. दुबई आणि लंडनमधल्या प्रॉपर्टी शोज् मध्ये स्टॉल्स बूक केले गेले. अशा स्तरावर इतकी महागडी प्रॉपर्टी विकण्याचा अनुभव आपल्याला नाही, त्यामुळे कमीत कमी एखादा मोठा कन्सल्टंट तरी नेम- असंही मी सांगून पाहिलं. त्याचा परिणाम इतकाच झाला की दुबई आणि लंडनच्या बड्या प्रॉपर्टी एजंट्सना लाखो रुपये देऊन त्या प्रॉपर्टी शोज् साठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी बूक केलं गेलं. हे प्रॉपर्टी शोज् व्हायच्या आधी मुंबईतल्या एका बड्या हॉटेलात या प्रकल्पाची घोषणा केली गेली. भलीमोठी रक्कम खर्चून एका मोठ्या बॉलीवूड स्टारला या प्रकल्पाचा ब्रँड अँबॅसॅडर म्हणून नेमला गेला.

रणजितसह त्याच्या स्टाफमधले मोजके काही लोक मुंबई-दुबई-लंडन अशी सैर करून पंधरा दिवसांनी हाश्शहुश्श करत पुण्यात दाखल झाले. मी समक्ष भेटून सारा वृत्तांत विचारला. एकही बुकिंग नाही, आणि प्रॉपर्टी शोज् आणि सहलीसकट दोन आठवड्यांत झालेला एकूण खर्च- साडे तीन कोटी रुपये!

मी चिंतेत पडलो. प्रकल्पाचं भवितव्य स्पष्टच दिसत होतं. आता मात्र माझे पैसे मागणं भाग होतं. पैसे 'मागण्याची' ही पहिलीच वेळ. पैशांचा विषय काढल्यावर तो म्हणाला, 'आय नो. ही अडचण जरा जाऊ देत. खूप खर्च झाला आहे. पण या प्रॉपर्टी शोज् मधून केलेला खर्च वाया जाणार नाही. काही बुकिंग्ज पाईपलाईनमध्ये आहेत. नक्की होतील. मित्रासाठी अजून थोडी कळ सोस.'

मी पुन्हा गप्प बसलो. अजून काही दिवस गेले. पण पाईपलाईनमधून बुकिंग्ज येण्याची चिन्हं दिसेनात. पुढल्या काही शोज् साठी त्या सिनेस्टारला मोठी रक्कम देऊन जे बूक वगैरे करून ठेवलं होतं, तेही पैसे वाया गेल्यातच जमा दिसत होते.

पुढे काही दिवसांत रणजितच्या ऑफिसच्या पोर्चमध्ये क्राईस्लर नावाची अलिशान गाडी दिसली. मी विचारलं तेव्हा रणजित निर्विकारपणे म्हणाला, 'तो नालायक बॉलिवुड स्टार पैसे तर परत देणं शक्य नाही. त्या पैशांसोबत, काही अटींवर त्याला ही कारही आपण दिली होती, त्याही अटी त्याने पाळल्या नाहीत. त्यामुळे गाडी आणली परत!'

मला एकंदरच या प्रकरणात रस नव्हता. मला माझ्या पैशाची चिंता जास्तच वाटू लागली. कळकळीने हा विषय काढल्यावर तो म्हणाला, 'अरे, पैसे कुठेच जात नाहीत रे. तू माझ्या घरच्यासारखा आहेस. हा एवढा तिढा तर आधी सुटू दे. थोडा अजून धीर धर प्लीज.'

अजून दोनेक आठवड्यांनी रणजित अचानक गायब झाला. एक महिनाभर फोन बंद. ईमेलला उत्तर नाही. कुठे गेला आहे, कुणालाच पत्ता नव्हता. सरत्या दिवसागणिक माझे ठोके चुकू लागले. काही लाख रुपयांचा प्रश्न होता. शेवटी तो परत आल्याचं कळलं, तेव्हा तडक त्याचं ऑफिस गाठलं. नेहेमीप्रमाणे दिलखुलास बोलून त्याने माझा राग शांत केला. कुठे होतास, असं विचारल्यावर त्याने काही फोटो दाखवले. रणजितसोबत एक सिरीयल अ‍ॅक्ट्रेस त्या फोटोंत होती. लग्नाचे आणि हनीमूनचे वगैरे असतात तसेच ते फोटो होते.

मी त्याला म्हणालो. 'लोकांचे पैसे बुडवून तू हनीमून करत फिरतोयस? आणि तेही कुणाला न सांगता? तुला काय वाटेल ते कर. आधी माझे पैसे दे.'

'अरे हो! तुझे पैसे द्यायचे राहिलेच आहेत अजून, नाही?' तो अत्यंत निरागसपणे आणि विचारांत गढून जात म्हणाला.

माझा पारा पुन्हा चढला. आणि रागाने त्याच्या प्रत्येक गोष्ट कॅज्युअली घेण्याच्या सवयीबद्दल भरपूर बोलून घेतलं, जरा उंचच आवाजात.

मी काहीतरी अन्यायकारक बोलत असल्याच्या, कळकळीच्या नजरेने त्याने माझ्याकडे बघितलं. 'तू मला समजून का घेत नाहीस?' असंच काहीतरी त्याला त्या नजरेतून म्हणायचं असावं. मला हसावं की रडावं ते कळेना. त्याच्या लग्नाच्या बायकोने काही महिन्यांपूर्वीच भांडण काढून वेगळं राहायला सुरूवात केली होती, तेव्हा ते सगळं घडलं तसं स्वच्छपणे-सरळपणे मला सांगतानाही त्याचा चेहेरा असाच व्यथित वगैरे झालेला दिसला होता.

त्यानंतर आणखी धारेवर धरल्यानंतर काही दिवसांनी त्याने माझे पैसे दिले. पण ते देताना 'इतक्याशा पैशासाठी लोक इतका तमाशा, इतका राग कसा मनात धरू शकतात?' असं बालसुलभ निर्मळ आश्चर्य त्याच्या डोळ्यांत होतं..!

काही दिवसांनी ती सिरियल अ‍ॅक्ट्रेसही त्याला सोडून गेली. त्याने भेट दिलेल्या महागड्या गाडी आणि दागिन्यांसकट. तो पुन्हा व्यथित-बिथित झाला, 'लोक असं कसं करू शकतात?' म्हणत. काही दिवसांनी त्याने पुन्हा त्याच निर्मळ आणि सरळपणे ऑफिसात येऊन बसायलाही सुरूवात केली.
---

रणजित अजूनही माझा मित्र आहे. कधी त्याच्याइतकं कॅज्युअली मला प्रत्येक गोष्टीत वागता येत नाही, याचा मला हेवा वाटतो. आणि कधी त्याच्याइतकं कॅज्युअली मला प्रत्येक गोष्टीत वागता येत नाही, याबद्दल देवाचे आभार मानतो.

अजूनही मी त्याचं काम करतो. थोडेफार दिवस इकडेतिकडे झाले, तरी त्याचे पैसे कधीच बुडणार नाहीत याची मला खात्री आहे. खात्री नसती तरी एखादे वेळेस केलंही असतं त्याचं काम, कुणी सांगावं? गंदा है पर धंदा है ये.

***

टिंबर मार्केटमधल्या जितेश आबनावेची दोन-तीन दुकाने आहेत. प्लायवुड आणि फर्निचरसाठी लागणार्‍या कच्च्या मालाची. बाथरूम अ‍ॅक्सेसरीज, डोअर फिटिंग्जचं एक बर्‍यापैकी मोठं शोरूम आहे. शिवाय एक ट्रॅव्हल एजन्सीही. चार भाऊ मिळून हे सारं बघतात. सार्‍यांची लग्नं झालेली, त्यामुळे या एकत्र कुटुंबाचा मोठा पसारा. जितेशचे वडील हे शांत, हसतमुख गृहस्थ. मी गेलो, की कधीकधी ते भेटतात. क्वचित माझ्या ऑफिसलाही येतात. जितेशपेक्षा एक भाऊ मोठा, तर दोन लहान.

जाहिरातींच्या कामासाठी मोठा राजेश आणि जितेश हे दोन्ही माझ्याकडे येतात. एक दिवस जितेश आला, तो विचारमग्न चेहेरा घेऊनच. तो पाच मिनिटे तसाच बसून राहिला, तेव्हा नेहेमीपेक्षा त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, हे मला कळलंच. त्यालाच बोलू देत, म्हणून मीही शांत बसून राहिलो.

'आपण काही वर्षांपूर्वी सकाळमध्ये 'इयर पॅनेल्स' केली होती, आठवतं?' शेवटी तो म्हणाला, 'त्याचे सध्या रेट्स काय आहेत?' 'इयर पॅनेल्स' म्हणजे वर्तमानपत्राच्या नावाच्या बाजूला सर्वात वरती असलेल्या चार बाय पाच सेंटीमीटर आकाराच्या जाहिराती. उत्कृष्ठ व्हिजिबिलिटीसाठी या पहिल्या पानावरच्या छोट्या जाहिराती जाहिरातदारांमध्ये प्रसिद्ध आहेत. किंमत जास्त असल्याने गेल्या दोन तीन वर्षांत आबनावेंनी या जाहिराती केल्याचं मला आठवत नव्हतं. आता कसा विचार केला त्यांनी त्या जाहिरातींचा?

'इयर पॅनेल्स आता बंद झाली. त्याऐवजी पॉईंटर्स असतात आता. आकार तोच. फक्त आता त्यांची जागा पहिल्या कॉलममध्ये असते. किंमत- एका दिवसासाठी पन्नास हजार.' मी म्हणालो.

'हं.' दोन क्षण विचार करून जितेश म्हणाला, 'किंमत जरा जास्त आहे. पण करू या आपण.'

'ओके. त्यासाठी वेटिंग असतं. लगेच उद्याचं पॉईंटर तर मिळणार नाही, बुकिंग करून ठेवावं लागेल आधी. विषय काय आहे? आपल्या शोरूमची जाहिरात?' मी विचारलं.

'नाही.' जितेश म्हणाला, 'डीएसकेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!'

मला आश्चर्य वाटलं. आपण भले की आपला व्यवसाय, असं हे सारं कुटुंब. जितेशने एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला की काय? तसं विचारल्यावर तो फक्त 'नाही' इतकंच म्हणाला. जास्त खोलात न जाता मी बुकिंग केलं, आणि त्याने सांगितल्याप्रमाणे अ‍ॅड-कॉपी बनवली. तीमध्ये डीएसके आपले गुरू आहेत, त्यांचा आशीर्वाद हवा आहे, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जितेश आबनावे यांच्याकडून शुभेच्छा, असा एकंदर मामला.

चार दिवसांनी जितेशचा पुन्हा फोन, आणखी एक पॉईंटर बुक करण्यासाठी. यावेळी जाहिरात होती- 'माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या आमच्या प्रिय भगिनी आहेत, आणि रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या सतत सोबत राहण्याची मी शपथ घेत आहे, त्यांच्याकडून राखी बांधून घेताना कृतकृत्य होत असल्याची भावना मनात आहे..' वगैरे.

आणखी चार दिवसांनी जितेशने फोन करून विचारलं, 'अशा आठवडाभरच्या पॉईंटर अ‍ॅड्सचं स्कीममध्ये बुकिंग करून टाक..!' मी त्याने सांगितल्याप्रमाणे बुकिंगही केलं.

तिसर्‍या जाहिरातीतही अशाच एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव होतं. खाली- 'शुभेच्छुक : जितेश आबनावे'. आतापर्यंत बुक केलेल्या सगळ्या जाहिरातींमिळून सारा खर्च होत होता साडेतीन लाख रुपये.

त्या दिवशी जितेशच्या बायकोचा फोन आला. अजून अशा किती जाहिराती बुक केल्या आहेत, असं ती विचारत होती. राजेशचाही एकदा फोन येऊन गेला. मला आता मात्र हे सारंच प्रकरण वेगळं वाटू लागलं.

दुसर्‍या दिवशी राजेश माझ्या ऑफिसमध्ये आला. तो म्हणाला, 'जितेशने घरात भांडणं काढली आहेत. सध्याच्या सार्‍या दुकानांमधून आणि एकूणच धंद्यातून त्याने अंग काढून घेतलं आहे. त्याला आता बिल्डर बनायचं आहे. ते एक असोच. पण रागाने पेटून उठून त्याने भलतंच काहीतरी करायला सुरूवात केली आहे. आमच्या नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे जाऊन तो घरातल्या आम्हा सार्‍यांना शिव्या घालतो आहे. आणि आता त्याच्या किती मोठमोठ्या ओळखी आहेत हे दाखवण्यासाठी आणि कुणाच्याही मदतीशिवाय नवीन धंदाही सुरू करू शकतो, हे दाखवण्यासाठी त्याने या जाहिराती सुरू केल्या आहेत. या अशा शुभेच्छांच्या मूर्ख जाहिरातींचा आमच्यासारख्या धंदा एके धंदा करणार्‍या लोकांसाठी काहीच उपयोग नसतो. पण रागाच्या भरात हे त्याला समजत नाहीये, आणि कष्टाने कमवलेल्या पैशांचा तो असा चुराडा करत सुटला आहे. त्याची बायकोही त्याला परोपरीने समजावते आहे, आणि मीही. पण काल आम्ही तुम्हाला फोन केल्याचं कळल्यावर त्याने परत तमाशा केला. आमचा जितेश असा कधीच नव्हता. त्याच्या डोक्यात घुसलेलं हे नवीन खूळ कसं काढायचं, ते काही कळतच नाहीये..'

मी अक्षरशः अवाक झालो. राजेश अजून बरंच कायकाय बोलत होता, पण ते माझ्या पर्यंत पोचत नव्हतं. जितेशच्या पुढल्या सार्‍या जाहिराती प्ली़ज थांबवा किंवा रद्द करा, असं राजेश म्हणाला, तेव्हा मला धर्मसंकटात सापडल्याची जाणीव झाली. आतापर्यंत जितेशच्या एका फोनवर जाहिराती रिलीज करणार्‍या मला आता नक्की काय करावं, तेच कळत नव्हतं. खरं तर खाली शुभेच्छुक म्हणून जितेश फक्त स्वतःचंच नाव टाकत होता, तेव्हाच मला हे प्रकरण वेगळं असल्याची शंका यायला हवी होती.

राजेश तिथंच असतानाच जितेशच्या बायकोचाही फोन आला. राजेश बोलत होता, तेच तीही बोलली, आणि शेवटी नसत्या जिद्दीपायी पैशांचा चुराडा होऊ नये म्हणून पुढल्या जाहिराती बंद करा, असंही सांगितलं. पहिल्या काही जाहिराती प्रसिद्ध झाल्यावर आबनावेंच्या घरात हे एवढं धुमसत होतं तर! जाहिरातींची सेवा देणारा एक मध्यस्थ- ही माझी भुमिका मी नीट पार पाडत असलो, तरी कुटुंबाच्या भांडणात आपण नक्की काय करावं, ते मला समजेना.

तेवढ्यात जितेश तिथं आला, आणि दोघांची वादावादी ऑफिसमध्येच अक्षरशः कळसाला पोचली. वरकरणी शांत डोक्याने जाहिराती द्यायला आल्यागत दिसणारा जितेश आतून हट्टाने किती पेटला होता, ते मला स्पष्ट दिसत होतं.

शेवटी मोठमोठ्या आवाजांत अटीतटीने वाद घालणार्‍या त्या दोघांना तसंच ऑफिसमध्ये सोडून मी बाहेर आलो, आणि दोघांच्या वडिलांना फोन केला. इतके धीराचे ते गृहस्थ, पण घरातल्या भांडणाने तेही हतबल झाल्यागत दिसले. 'नुसत्या जाहिराती बंद करून काही फायदा नाही, तो पुन्हा असलं काहीतरी दुसर्‍या एजन्सीकडे जाऊनही करू शकतो. जाहिराती बंद व्हायच्या आधी त्याच्या डोक्यातलं थैमान शांत करता आलं, तर बघा. आम्ही तर हात टेकले, गेल्या महिन्या-दोन महिन्यांत. या अशा जाहिरातींचा आपल्यासारख्या धंदेवाईकाला काही उपयोग नाही, हे त्याला समजून सांगा. त्याला ते पटलं, तर असं खूळ पुन्हा त्याच्या डोक्यात येणार नाही..' असं ते म्हणाले.

मी ऑफिसात येऊन राजेशला समजावून घरी पाठवलं. त्यानंतर मी जितेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला किती पटलं, ते माहिती नाही, पण थोडा वेळ गप्प बसून तो निघून गेला.

उरलेल्या जाहिराती रद्द केल्याने माझा पुढे या जाहिरातींतून होऊ शकणार तीनेक लाख रुपयांचा धंदा बुडला. पण आबनावे कुटुंब माझ्या एजन्सीशी जोडलेलं राहिलं.

नंतर त्यांची घरातली भांडणं मिटली असावीत. सारं पुन्हा पहिल्यासारखं पुन्हा चालू झालं. नंतर कधीतरी एकदा 'स्टाफ पाहिजे'ची जाहिरात जितेश द्यायला आला, तेव्हा 'आता हेही माझ्या घरी विचारून खात्री करून घेणार का?' असं खवचटपणे विचारलं. मी काहीच न बोलता हसलो. तसं त्याच्या घरी विचारायची गरज नव्हतीच, आणि हे त्यालाही नीट माहिती होतं.

हुशारीने धंदा पुढे नेणार्‍या अनुभवी जितेशला पुढे प्रत्येक वेळी बघताना, त्याच्याशी बोलताना त्या 'तशा' जाहिरातींतून काहीतरी फायदा होईल, तेही कुठचाही पॉलिटिकल अजेंडा मनात नसताना- असं त्याला का आणि कसं वाटलं असावं याचा अंदाज मला कधीच आला नाही.

माणसं ओळखली असं वाटत असतं आपल्याला फक्त. खरं तर ती प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने ओळख देतात. या बदलत्या ओळखी आणि त्यांचे निरनिराळे रंग आपल्याला कधी त्रास देतात, मनस्ताप देतात, तर कधी आश्चर्याचा सुखद धक्का देतात- हेच खरं.

***

एकदा ऑफिसमध्ये पोलिस हजर झाले, आणि मी चरकलोच. टाईम्सच्या 'अ‍ॅसेंट' या रिक्रुटमेंट जाहिरातींच्या फीचरमधली एक जाहिरात दाखवत त्यांनी विचारलं, ही जाहिरात तुम्ही केलीय का?

मी बघितलं, तर माझ्याच एजन्सीची जाहिरात. डझनभर वेळा तरी मी ती जाहिरात करून चुकलो होतो. 'स्विस इंटरनॅशनल' नावाच्या प्लेसमेंट फर्मची ती जाहिरात होती. गेलं वर्षभर हा क्लायंट माझ्याकडे होता. कॉलसेंटर आणि बीपीओ-केपीओच्या कामासाठी कॉलेजच्या मुली हव्यात, अशी ती जाहिरात होती.

पोलिस म्हणाले, 'चौकीवर चला. स्टेटमेंट घ्यायचंय.' त्यांच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

तिथं सारी चौकशी झाल्यावर सारं नीट कळलं. 'स्विस इंटरनॅशनल' ही प्लेसमेंट एजन्सी नसून फीमेल एस्कॉर्ट्स पुरवणारी कंपनी होती. वेडेवाकडे आणि खास हेतू असलेले प्रश्न विचारल्यावर मुलाखतीला आलेल्या मुलींपैकी काहींनी पोलिसांत तक्रार केली होती.

मी हतबुद्ध.

त्यानंतर मी त्या एजन्सीच्या खर्‍या मालकाला भेटलो, तर अक्राळविक्राळ दाढी, केस, तांबारलेले डोळे आणि अवाढव्य देह असलेला तो माणूस होता. गेल्या संपूर्ण वर्षभरात हा मला कधीच दिसला नव्हता. माझं गेल्या दोन जाहिरातींचं पेमेंट बाकी होतं. तो विषय काढल्यावर तो म्हणाला, 'आता आपण मी जेलमधून बाहेर आल्यावर भेटू. अच्छा. बाय. टेक केअर!'

त्यानंतरच्या अनेक महिन्यांत मला ते ऑफिस उघडं दिसलं नाही. भरपूर तपास करूनही काही पदरात पडलं नाही. पोलिसांत विचारलं, तेव्हा कळलं, सध्या तो ड्रग्जच्या व्यापाराच्या गुन्ह्याखाली तुरूंगात आहे.

यानंतर मी प्लेसमेंट एजन्सीची जाहिरात आली, की कसून चौकशी करू लागलो. तसं कुणीच आढळलं नाही, ते एक सोडाच. खरंतर प्लेसमेंट एजन्सी कशाला, साधा क्लासेस चालवणारा, ग्रीटींग्ज-भेटवस्तू विकणारा, कुरियर कंपनीवाला, एखादा रेस्टॉरंटवालाही भलताच कुणीतरी निघेल, कुणी सांगावं. कोणाचा अंदाज घेणं, म्हणजे तरी नक्की काय असतं? तर माहित नाही. कधीतरी समजेल, शिकायला मिळेलही. किंवा कधीच नाही.

***
***

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सही लिहीलेस! किती नवे, वेगळे अनुभव मिळतात तुला आणि त्या प्रत्येकाचं वेगळेपण ठळकपणे तुला जाणवतं, इतरांपर्यंत पोचवता येतं हे महत्त्वाचं! Happy

सा़जिरा,
वाचायला सुरवात केली तसे वाचन थांबावावेसे वाटेचना (हातचे काम सोडून).
जबरदस्त अनुभव आहेत आणि त्याचे शब्दांकनही.

सॉल्लिडच लिहिलंय. खूप आवडलं. (पहिला भागही तेव्हा आवडलाच होता.) Happy

कोणाचा अंदाज घेणं, म्हणजे तरी नक्की काय असतं? तर माहित नाही. कधीतरी समजेल, शिकायला मिळेलही. किंवा कधीच नाही. >>> हे जबरीच !!

साजिर्‍या अगदी सुंदर अनुभव रेखाटन... प्रताप मधे तर मला माझ्या पार्टरनचीच छबी दिसू लागली होती... मात्र किस्से आणि आकडे नॉर्मल होते :p

धंद्यात अगदी एक से एक नमुनेदार अनुभव येतात... मला ही काहीसे असेच अनुभव अल्पकाळ टिकवलेल्या धंद्यात आले होते.

सुंदर.

या धंद्याची खासियत आहे ही! माझ्या वकिली करणार्‍या मित्रांकडेही अशा सुरस चमत्कारिक कथा - किस्से असतात. माणसांचे अजब नमुने, अजब किस्से!! आधीच्या गृहितकांना कधी साफ कोलमडवून टाकणारे - कधी दृढ करणारे. लिहिलंय खूप छान!

अरे व्वा .... जाहिरातींचे विश्वच कलरफुल... अनुभवांचे विश्वही कलरफुल. काळ्या रंगासकट. . आगे बढो भैय्या.

मस्त लिहिलयस,

माणसं ओळखली असं वाटत असतं आपल्याला फक्त. खरं तर ती प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने ओळख देतात. या बदलत्या ओळखी आणि त्यांचे निरनिराळे रंग आपल्याला कधी त्रास देतात, मनस्ताप देतात, तर कधी आश्चर्याचा सुखद धक्का देतात- हेच खरं. >>> जबरी आहे हे वाक्य

अगदी एखादी थ्रिलर वाचावी असे अनुभव आहेत साजिरा यांचे जाहिरातक्षेत्रातील. या दुसर्‍या भागामुळेच पहिला भागही या निमित्ताने वाचायला मिळाला, तोही असाच भन्नाट. एखादी कादंबरी यातून तयार होईल इतके संपन्न असे अनुभवविश्व आहे हे.

पोलिस चौकीचा अनुभवही जाहिरात व्यावसायिकांना जाहिराती स्वीकारण्यापूर्वी दहादा विचार करायला प्रवृत्त करणारा वाटला. आली आहे जाहिरात, मिळाले आहे पेमेन्ट, मग देऊन टाकू या जाहिरात, असे म्हणून आपण समाजाच्या कोणत्यातरी घटकाला संकटात तर ढकलत नाही ना ? असा स्वतःशीच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे हे साजिरांच्या पोलिस अनुभवावरून या क्षेत्रातील लोकांना पटेल.

कोल्हापूर-पुणे तसेच पुणे-कोल्हापूर एशियाड/निम आराम गाड्यात सध्या "सोनिया मॅडम" नावाने एक जाहिरात ड्रायव्हर केबिनमागे चिकटविलेली दिसते. त्यात दहावी ते पदवीधर पर्यंतच्या मुलामुलीना त्याना अमुकतमुक फोनवर संपर्क साधावा असे आवाहन केलेले आहे. अर्थात कॉल सेंटरसाठी. राहण्या-जेवण्याची मोफत सोय, असेही प्रलोभन आहे. पण पुण्यासारख्या अत्यंत गजबजलेल्या शहरात इतक्या ईझिली राहणे-जेवण्याची सोय होईल का ? असाच काहीसा प्रश्न वाचणार्‍या सीनिअर प्रवाशांच्या मनी येतो. मलाही पडला, आणि त्या निमित्ताने मी पुण्याच्या स्वारगेट, स्टेशन तसेच कोल्हापूर डेपो मॅनेजरकडे जाहिरातीच्या सत्यतेविषयी चौकशी केली. पण त्यानी मुंबईकडे बोट दाखविले. काय बोलणार मी तरी यावर ?

अशा जाहिरातीबद्दलही साजिरा यानी इथेच मार्गदर्शन केले तर मी कोल्हापूर-पुणेचा नियमित एशियाडचा प्रवासी या नात्याने अशा जाहिरातीच्या 'व्हॅलिडिटी' चा निश्चित मागोवा घेऊ शकेन.

अशोक पाटील

मस्त लिहीलंय..मी दोन्ही भाग एकसंध वाचुन काढले आणि दोन्ही खुप आवडले.
प्रसंग बरंच काही शिकण्यासारखे आहेत.

Pages