मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच जणांच्या "अजून वाचायचय" यादीत असणारे भैरप्पांचे, पर्व नुकतेच वाचून संपवले. या पुस्तकाबद्दल काहि लिहिण्याइतकी माझी कुवत नाही. पण तरीही.

सर्व कथानक माहित असूनही, हे पुस्तक त्यानी लावलेल्या वेगळ्या अर्थाने खिळवून ठेवते. महाभारतातील कॄष्णासकट सगळ्याच व्यक्तिरेखा इथे केवळ माणूस म्हणून भेटतात. इथे कुठल्याच चमत्काराला, शाप उ:शापाला स्थान दिलेले नाही. त्यामूळे हे सगळे खरेच घडले असावे, असा विश्वास वाटायला लागतो.

कुंति , माद्रिचा नियोग, द्रौपदीचा विवाह, गांधारीचे अंधत्व, कृष्णाचे विवाह, गंगेची मूले आदि सगळ्याच घटनाचा त्या काळच्या समाजविचाराच्या संदर्भात लावलेला अर्थ, हा या पुस्तकाचा विशेष आहे.
ज्या गोष्टी खरेच अतर्क्य आहेत, उदा कर्णाचे कवचकुंड्ल, वस्त्रहरणाच्या वेळी कृष्णाने पुरवलेली वस्त्रे, गांधारीचे शंभर पूत्र हे सगळेच इथे टाळलेले आहे.

पण काहि गोष्टींचा मोह, टळलेला नाही. उदा. भीमाच्या शरिरयष्टीचे वर्णन, त्याची लढण्याची पद्धत वगैरे. हे मला पटले नाही.
युद्धाचे वर्णन मलातरी, आपल्या विश्वास पाटलांच्या, पानिपत इतके प्रत्ययकारी वाटले नाही.
काहि तपशील मला अनावश्यक वाटले. उदा. जलबाधा वगैरे. कुंती झुडूपामागे गेली, सारखे उल्लेखही आवडले नाहीत.
पूर्ण पुस्तकात आदरार्थी बहुवचनांचा वापर नाही. केवळ शेवटच्या प्रसंगात कुंतीसाठी द्रौपदीने ते वापरले नाही. कानडी मधे आदरार्थी बहुवचन नसते का ?

इथे कथानक युद्धापर्यंतच आहे. पुढचे पांडवांचे स्वर्गारोहण इथे नाही. यक्ष धर्माचा संवादही नाही.
आणि या पुस्तकात अनेक मुद्रणदोष आहेत. नावाजलेल्या प्रकाशकाकडून हे अनपेक्षितच आहे.
पण तरीहि हे पुस्तक अवश्य वाचावे असे आहे.

आणखी एक विचार, आपल्याला लहानपणी संस्कार कथा म्हणून या कथा ऐकवल्या गेल्या. त्या वयात हे सत्य पचनी पडलेच नसते. म्हणूनच बहुधा हे चमत्कारांचे शुगरकोटींग केले असावे.

नुकतच मी सिद्धार्थ पारधे हयाचे 'कोलनी' वाचले. सुन्दर पुस्तक आहे. अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर असेल त्या परिस्थितीचा सामना करत माणुस कशी आपली प्रगती साधु शकतो ह्याचे उत्तम उदाहरण . सर्वानी अवश्य वाचावे.

स्वाती, अजून जरा लिहि ना या पुस्तकाबद्दल. नक्की कसली परिस्थिती आहे या पुस्तकात?

दिनेश, छान जमले परिक्षण.

अणूचा शोध कसा लागला तिथपासून अणूबाँब कसा तयार केला गेला, हिरोशिमा, नागासाकी वर हल्ले कसे झाले, त्यांनंतर ह्या शहरांची काय दशा झाली आणि हे पुन्हा घडू नये ह्या सगळ्यांबद्दल अतिशय रंजक माहिती सांगणारे 'बाराला दहा कमी' कोणी वाचलय ?? ( ले. माधव नेरुरकर आणि पद्मजा फाटक (बहुदा ) ... जरूर जरूर वाचा....

कानडी मधे आदरार्थी बहुवचन नसते का ? >> असते. पुस्तकात का टाळले असेल माहिती नाही.

'बाराला दहा कमी' >> बरेच जुने पुस्तक आहे का? अशाच प्रकारचे एक पुस्तक वाचल्याचे आठवते पण हेच का ते माहीती नाही.

बी ,बर्‍याच दिवसानी दिसलास !
मिनोती, या पुस्तकात, सगळेच एकमेकाना अरे तूरे करतात. महाराजाला पण प्रजा अरे तूरेच करते. विदुराला कुंती अरेतूरे करते. मला खटकले ते. मी जे उल्लेख केलाय ते वाक्य म्हणजे, द्रौपदी कुंतीला, ( उत्तरेच्या संदर्भात ) तिचा नियोग घडवा, असे म्हणते, तेही उपरोधाने असेल. एकंदरच ते का टाळलेय ते कळत नाही.
बाराला दहा कमी हा बहुतेक, टेन टू मिडनाईट, या पुस्तकाचा अनुवाद असावा. मी पण वाचल्यासारखे वाटतेय.

नाही, तो अनुवाद नाही... स्वतंत्र पुस्तक आहे... कोणती कथा नाही... मी लिहीलय तस अणूचा शोध, अणूबाँब चा शोध, त्याचे संभाव्य घातक परिणाम असे पुस्तकाचे स्वरुप आहे.. मी जवळ जवळ १० वर्षापूर्वी वाचले होते.. राजहंस प्रकाशनाचे आहे.

एखाद्या वस्तूचे 'बारा वाजणे' असा शब्दप्रयोग आपण वापरतो तेच आपल्या प्रुथ्वी ( कस लिहायच ?) बाबतही घडू शकत, अस काहीस लेखकद्वयाला सुचवायच आहे... ' नो मोअर हिरोशिमाज ' ह्याला अनुसरून.

पृथ्वी - pRuthvee

राजा, यु_आर्_सॅम डॅनिकननी दिलेले पुरावे खोटे होते. त्याला त्याबद्दल अटक झाली होती आणि त्याने गुन्हा कबुल देखिल केला होता. आता देव खरच परग्रहांवरुन आले होते का हा वेगळा विषय आहे, पण तो म्हणतो तसे खचितच झाले नव्हते.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

बाराला दहा कमी हे सर्व संवेदनशील व्यक्तींसाठी एक मस्ट रिड आहे.जबरदस्त माहिति आणी व्यक्तिरेखा,खिळवून टाकणारे प्रसंग आणि या सर्वांबरोबर सतत चाललेली मानवी इतिहासातील सर्वात भयाण शोकांतिका्. हे पुस्तक मला तरी कोणत्याही अन्य महाकाव्याइतकेच रंजक आणि विचारप्रवर्तक वाट्ले.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

फार पुर्वी मला "बाराला दहा कमी" वाचल्याचं आठवतय. अर्थात सगळं नीट नाही आठवत पण ते मस्त होतं इतकं नक्की आठवतं.

सध्या शोभा डे चं स्ट्रेंज ऑब्सेशन वाचतेय...

वर सगळ्यांच वाचून, लायब्ररीत क्लेम लाऊन 'पर्व' आणल, म्रुत्युंजय वगैरे अनेकदा वाचल्याने, पहिल्यांदा वाचतांना धक्कादायक वाटल, विशेषतः आंधळा, थेरडा, असे शब्द... एका ठिकाणी भीम कुंतीला ' पापी' म्हणतो, ( मनातल्या मनात ) ते पण खटकल. अर्थात ती सगळी आपल्यासारखी हाडामासाची माणस होती. कुठे तरी वाचल्याच आठवतय, नाती कशी असावीत हे रामायण सांगत, ती कशी नसावित हे महाभारत सांगत.

नाती कशी असावीत हे रामायण सांगत, ती कशी नसावित हे महाभारत सांगत.>>>>
सुंदर विचार ग surabhee....
आवडला.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

नुकतेच अनिल अवचटांचे "स्वतः विषयी" वाचले. लेखकाचा प्रांजळपणा जागोजागी जाणवतो, आणी मुख्य गोष्ट म्हणजे कितीतरी आधी घडलेल्या गोष्टी त्यांनी इतक्या ताकदीने लिहिल्या आहेत ना कि थक्क व्ह्यायला होतं वाचताना.
शाळेत असतानाचे त्यांचे आयुष्य..पोंगाडअवस्थेतल्या त्यांच्या मानसिक आंदोलानांन विषयी अगदी मोकळे पणाने लिहिले आहे.
पुढे मेडिकल करताना... त्यांचा सामजीक चळवळीत सहभाग वाढला .....ते ही अगदी संयत पणे लिहिले आहे.सुनंदा (जीवनसंगीनी) शी झालेली ओळख्.....तिने व्यापुन टाकलेले त्यांचे पुर्ण आयुष्य... अगदी ताकदीने चितारले आहे. एक जोडीदार म्हणुन वागताना त्यांनी दाखवलेला समजूतदारपणा अतिशय भावस्पर्शी आहे.
आणी .....(last but not least)....सर्वात ह्रद्य भाग म्हणजे ....संगोपन्....त्यांच्या २ मुलींना त्यांनी कसे वाढवले ते लिहिले आहे. त्यांच्या सामाजीक कार्याच्या प्रभाव मुलींच्या संगोपनवार पण झाला. त्यांनी मुलींना ज्या मोकळेपणाने,मित्रत्वाने वाढवले ......ते ठायी ठायी विखुरलेले आहे. हा प्रेमळ पिता तर मला फरच भावला. Happy

एकुण जरूर वाचावे असे पुस्तक आहे.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

सुरभीला अनुमोदन....

पर्व वाचलं... केवळ धक्कादायक... मृत्युंजय अनेकदा वाचल्यानंतर हे पुस्तक वाचलं त्यामुळे तर केवळ वाक्यावाक्याला तुलना झाली.
ज्याला आपण देव म्हणतो त्या कृष्णालाही अगदी सामान्य व्यक्तिरेखा (लबाड मनुष्य) दाखवलय. ते मुळीच आवडल नाही.

आंधळा थेरडा असले विशेषणं तर मुळीच नाही आवडलेत.

एकुण पर्व नाही आवडणार्‍या पुस्तकात जमा झालं.

-प्रिन्सेस...

एका वयात मृत्युंजय आवडले होते, आता ते अतिकाव्यमय वाटते. त्यात कवच कुंडल दान करायचा प्रसंग सुरेख आलाय. पण ते नेमके काय होते याचा उलगडा झाला नव्हता.

चोप्रांच्या महाभारतातले ताताश्री, मामाश्री पण मला कृत्रिम वाटले होते तसेच पर्व मधले अनादरयुक्त उल्लेख. पण त्या काळात काय प्रथा होत्या, हा तिढा आहेच !

चोप्रांच्या महाभारतातले ताताश्री, मामाश्री पण मला कृत्रिम वाटले होते तसेच पर्व मधले अनादरयुक्त उल्लेख. >>>>>. अगदी अगदी.

-प्रिन्सेस...

पॅपिलॉनचा पुढचा भाग आलाय म्हणे..वाचलाय का कोणी? वाचला असेल तर कसा आहे?
पॅपिलॉन जबरी आहे यात शंका नाही, पण पुस्तकांची वर्दळ जास्त झालीये घरात त्यामुळे आता विचारून विचारूनच पुस्तकं घ्यायची असा विचार करत्ये.

सुरभी, आगाउ- बाराला दहा कमी बद्दल च्या माहितीबाबत अनेक धन्यवाद. मिळवून वाचलेच पाहिजेच्या यादीत लगेच घातले.
हिरोशामाचे Peace Memorial संग्रहालय आणि Atomic Dome प्रत्यक्ष पाहून काय वाटले ते कायम स्मरणात राहीलं आहे.

अलिकडेच पद्मजा फाटक यांचे- "हसरी किडनी " वाचले. प्रभावित झाले. किडनीविकार, डायलिसीस, किडनी रोपण आणि रोपणोत्तर आयुष्यातील अनूभव -असा (थोडक्यात ) विषय, त्या अनुषंगाने (शक्य तेव्हढा) बुद्धिवाद, आणि समतोल विचार करून अनेक पातळ्यांवर केलेलं आत्मपरिक्षण, चिंतन, मनन आणि ही शोधप्रक्रिया- आणि हे सर्व ऐहिक प्रश्न (अर्थाजनासाठीचा लढा, आयुष्याच्या पन्नाशीत केलेले देशांतर) सोडवता सोडवता. मुळात जीवनेच्छा/विजीगीषा प्रबळ. अनंत शारीरीक हालअपेष्टा सोसत, आर्थिक गणितं सोडवत, कुटंबियांच्या च्या/सुहृदांच्या सहाय्याने (त्यांच्या भाषेत "अठरा औक्षहिणी" सैन्याच्या मदतीने दिलेला लढा, ह्यांच हे सार. आणि तरीही बाईंना- अवयवदान आणि अनंत पात़ळ्यांवर घेतलेली आर्थिक मदत यांना न्याय देणारं कार्य या वाढीव आयुष्यात आपल्याकडून व्हायला हवं याची जाण आणि त्याचा घेतलेला ruthless/honest परामर्श. बापरे !! सकारात्मक म्हणजे किती कष्टानी ठेवलेला सकारात्मक दृष्टिकोन !!!! आपल्या दु:खाचं अवडंबर किंवा उदात्तीकरण न करता घेतलेला आत्मशोध.

रैना, कित्ती दिवसांनी ! Happy

दर दिवशी येत असणार Happy
पांशामो. ऑन : फा. को. करायची सवय कधी जाणार देवाला ठाऊक.. : पांशामो ऑफ

इथे कोणी डॉ. नितु मांडकेंच हृदयस्थ वाचलय का??खुप छान आहे पुस्तक..
-----------------------------------------------------
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

व्यासपर्व, युगान्त, आणि पर्व हे एकत्र वाचल्यास उत्तम. मला स्वत:ला पर्व आवडते, युगान्तही. मराठी अनुवादाचे मात्र माहित नाही. मी पर्व ईंग्रजीतून वाचले आहे.
पण हे सर्व व्याज आहे.मुदलातले "महाभारत" कुठले वाचावे ? कोणी सांगू शकेल का ?

पॅपिलॉनचा पुढचा भाग आलाय म्हणे..वाचलाय का कोणी? वाचला असेल तर कसा आहे? >> बॅंको. फारसा काही वेगळे नाहि वाटत पॅपिलॉनपेक्षा, तसेच हे बर्‍यापैकी जुने पुस्तक आहे.

hasari kidney malahi khup awdla hota.. thakka zale hote tyancha ashavad pahun!

टारफुला - ले. शंकर पाटील

शंकर पाटील ह्या मुख्यतः ग्रामीण लघुकथा लेखनाने लिहिलेल्या मोजक्या (बहुदा एकमेव) कादंबर्‍यांपैकी टारफुला ही एक. त्यांच्या नेहेमीच्या खुमासदार, ग्रामीण विनोदी बाजाच्या कथांपेक्षा हटके.
एका पश्चिम महाराष्ट्रातील (बाहुबली-रामलिंग डोंगराच्या पिछाडीचा म्हणजे इशान्येचा भाग आणि वारणेच्या पश्चिमेचा भाग ह्यामधल्या खोर्‍यातले गाव) चांगल्या शेतजमिनीच्या गावचा प्रमुख आणि कर्तबगार पाटील अचानक मरतो आणि त्यामुळे माजलेल्या अनागोंदीवर-सत्तासंघर्षावर बेतलेले हे पुस्तक. पुस्तकातील काळ साधारण १९००-१९३०च्या दरम्यानचा म्हणता येइल.
पुस्तकाचे मुख्य करुन तीन भाग करता येतील. पाटील मेल्यावरचा भाग ज्यात गावचे कुलकर्णी आबा आणि गावात दत्तक प्रकरणावरुन माजलेली अनागोंदी-वाद ह्यांच्यावर अधिक भर आहे. दुसरा भाग हा नवीन पाटील गावात आल्यावरचा भाग ज्यात नवीन पाटील राउनानांच्या सहाय्याने गावावर जम बसवतात. असे करताना ते गावातील मुख्य विरोधकांची फळी मोडून काढतात. पण तसे करताना त्यांनी घेतलेले काही अनैतिक तसेच अन्यायकारक निर्णय. तिसर्‍या भागात नवीन पाटलाने जुन्यांचा बीमोड करताना जी तरुणांची फळी उभी केलेली असते ती पाटलांच्या विरोधात उभी राहते.

केवळ गावचे राजकारण हा ह्या कादंबरीचा गाभा नसून ही कादंबरी अनेक प्रश्नांवर बोट ठेवते अथवा अनेक प्रश्न उभे करते. एखाद्या जनसमूहावर सत्ता गाजावताना नैतिकता तसेच मुल्ये ह्यांच्याबरोबर तडजोड करणे हे क्रमप्राप्तच आहे की असे न करतादेखील सत्ता तसेच नेतृत्व करता येते? बळकट नेतृत्व नसेल तर समाजात अनागोंदी माजणारच का? तसे असेल तर मनुष्यसमाज हा मुळातच नैतिक मुल्यांचे पालन करणारा नसून ही मुल्ये केवळ अनेकजण एकत्र आल्यानेच पाळली जातात हेच सत्य का?

माझ्या मते ही कादंबरी 'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' च्या तुलनेची रुपकात्मक कादंबरी आहे. तसेच एखादे मनुष्यपात्र अथवा पात्रे ही कादंबरीचे नायक (प्रोटॅगॉनिस्ट) नसून संपूर्ण गावच नायक असलेल्या मोजक्या मराठी कादंबर्‍यांपैकी एक आहे (दुसरी झटकन आठवणारी मराठी कादंबरी म्हणजे तुंबाडचे खोत. इथे एक खोत नायक नसून 'खोती' हाच कादंबरीचा नायक आहे. इतर भाषांत बघायचे झाले तर वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्युड ही कादंबरी अश्या प्रकारच्या कादंबरींचा एव्हरेस्ट म्हणायला लागेल.)

टारफुला वाचताना प्रत्येक भागाच्या मध्यात तोच तोच पणा जाणवतो कारण वेगवेगळ्या हंगामात चालणारी कामे, शेतीची-बलुतेदारांच्या कामांची वर्णने ३-४ वेळा उगाचच आल्यासारखी, पाने भरण्यासाठी (फीलर) आल्यासारखी वाटतात. आबा आणि त्यांची बायको ह्यांच्यातील संवाद असेच भरवणुकीसाठीचे वाटतात. सर्वात मोठी खटकणारी गोष्ट म्हणजे नवीन पाटलाची बदलत जाणारी मुल्यव्यवस्था आणि त्या प्रवासाची कारणमिमांसा कुठेच येत नाही. ह्या पात्राने वेगवेगळ्या टप्प्यात केलेली कृती, डावपेच विस्ताराने येतात पण त्यामागची मनोभुमिका फार प्रभावीपणे उभी राहत नाही. त्यामुळे नवीन पाटील आज चांगला-नैतिक आणि एकदम उद्या क्रूर-अनैतिक असे थोडेसे होते.

मराठी साहित्यातील उत्कृष्ट कादंबर्‍यांपैकी एक म्हणुन टारफुलाचा मी नक्कीच उल्लेख करेन.

माहितीबद्दल धन्यवाद asami,
तसेच हे बर्‍यापैकी जुने पुस्तक आहे.>>>हो, बरोबर, पॅपिलॉनपण उशीराच मिळालं होतं मला.

"एका तेलियाने" आणि "हा तेल नावाचा इतिहास आहे" - गिरीश कुबेर - २ही छान आहेत
क्रुड ऑईल, ते मिळणारे देश, ते मिळवण्यासाठी विकसीत देशानी केलेली कारस्थाने, क्रुड ऑईलचा १ल्या नी २र्‍या महायुदधाशी संबंध, शेख झाकी एहमद यामनी या सौदी च्या तेल मंत्र्याने अमेरिकेची केलेली गोची, ओपेक वर सतत २५ वर्ष गाजवलेल राज्य इ. इ वर सगळी माहिती खूप छान दिली आहे.

सध्या श्रीमान योगी वाचतो आहे.

'अधर्मयुद्ध' हे 'एका तेलियाने' आणि 'तेल नावाचा इतिहास' यांचा पुढचा भाग. गिरीश कुबेर यांची ही तीन पुस्तके अप्रतिम आहेत.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

Pages