मनमोकळं - २

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मजा म्हणजे नक्की काय?
खाणं, पिणं, शॉपिंग? असेल. असावं. अं.. म्हणजे याही गोष्टींनी मजा येऊ शकते.
पण मजेचा बेसिक इन्ग्रॅडिअंट काय? पैसा? हो पैसा चालू शकेल. नाही का? पैसाच तर लागतो आपल्याला
रिसॉर्ट्समधे, ट्रेकींगला, हॉटेलात,बार्समधे, थियेटर्समधे, मॉल्समधे जायला.
खाणं, पिणं, फिरणं, शॉपिंग, सिनेमा नाटक, मैफल या आणि अशा सगळ्या प्रकारच्या मजांसाठी.
ठीक आहे. मग पैसा हाच तो मूळ महत्वाचा घटक आहे मजेसाठी.
असं आपण आता ठरवून टाकलंय.
पण मग लहान असताना भान विसरून रंगलेली लपाछपी किंवा डबा ऐसपैस किंवा दुपारचा सगळी
गल्ली गाजवत चाललेला क्यारमचा किंवा पत्त्यांचा डाव ही पण मजाच होती की. आणि थोडं मोठं
झाल्यावर उजाडलं न उजाडलंसं होतं तशा कळण्यानकळण्याच्या सीमेवरच्या वयात मैत्रिणींशी
आत्ता नक्की आठवत नसलेल्या पण त्यावेळी अतिशय महत्वाच्या वाटणार्‍या असंख्य विषयांवर तासंतास
मारलेल्या गप्पा, सायकली दामटत धुंडाळलेले रस्ते, एकमेकींच्या घरी जमून केलेले अभ्यास नामक गोंधळ.
शाळा सुटल्यावर थांबून केलेल्या नाचानाटकाच्या प्रॅक्टीसेस. मागच्या बाकांवर बसून निर्मिलेलं नवसाहित्य
किंवा नवकला. तोंडावर हात ठेवून ऐकलेली आणि शेयर केलेली सीक्रेट्स आणि गॉसिप्स. स्वतःच्या आणि मैत्रिणींच्या
वहीच्या मागच्या पानावर उतरलेले डोक्यात फुटायला लागलेले कवितांचे अंकुर आणि फ्रिहॅंडची वळणं,
वेगवेगळ्या फॉंट्समधे एकमेकींच्या वह्यांवर घातलेली पहिल्या पानांवरची नावं. तास चालू असताना पास
केलेले खलिते आणि आवळा सुपारीची पाकिटं.
रंगपंचमीला सायकलींवर तसंच रंगीत ओलं भटकणं.
मग नीट उजाडलंय असं वाटण्याच्या वयात समोर आलेली नवी दुनिया आणि ओसंडणारा उत्साह. एक शब्दही
न बोलता छताकडं बघत पण मिळून ऐकलेली गाणी. एखादी छोटीशी पण महत्वाची घटना सांगण्यासाठी
असेल तिथून केलेले फोन. रात्री जागून वाचलेली आणि आठवड्यात सगळ्या ग्रुपने वाचून संपवलेली पुस्तकं.
मधेच येणार्‍या फॅड्समुळे मिळून जॉइन केलेले आणि पुन्हा आयुष्यात प्रॅक्टिस न केलेले स्केटिंगचे, मेहंदीचे,
आकाशकंदिल तयार करण्याचे, टाकाऊतून टिकाऊ वगैरे सारखे क्लासेस.
मग हळूच आलेली सगळं सगळं बॉटम्स अप म्हणून मैत्रिणींसमोर नाही ओतता येत याची जाणीव.
अन मग एका कातरवेळी दाटून येणं, आणि मैत्रिणीसमोर मोकळं केलेलं मन, अलवार मोरपिसं,
फडतूस पिक्चरमधली गाणीही अगदी आपल्याच मनस्थितीला जोखून लिहीलीयत हा पक्का समज
भावुकपणे कबूल करणं, लाजणं, रडणं. सगळंच अनिवार, धोधो.
नवीन मिळालेल्या लायसन्सचा पुरेपूर फायदा घेत, नाकासमोर बघून लूना चालवणार्‍या काकांच्या शिव्या खात
चार चार बाईक्स ची माळ करून अख्खा रस्ता अडवत किंवा रेस लावून कॉलेजपासून घरापर्यंत केलेले प्रवास.
आर्चिज, हॉलमार्क मधे तासंतास ग्रूपने एकेक शब्द वाचून एका ग्रिटींगची होणारी खरेदी. व्हॅलेंटाईनचे तसे नाही
तर असे म्हणून गर्ल्स ग्रुपचे सेलेब्रेशन्स.
या सगळ्याला किती पैसा लागला होता? पैसा नसता तर ही सगळी मजा वजा झाली असती?
खरी मजा कुठलीही गोष्ट आपल्या आवडत्या माणसांबरोबर शेयर करण्याची असते.
पैसा असेल तर मजा वाढते हे खरंच. तो एक महत्वाचा घटक आहेच. पण तो पिठल्यात पडलेल्या लसणासारखा.
लज्जत वाढवणारा. पण मुदलात खमंग परतलेलं चण्याचं पीठ हवंच त्यासाठी.
मजेचा मूळ घटक आहे आवडती माणसं. तीही त्या त्या मजेला सूट होणारी. ट्रेकसाठी जिवलग मैत्रच हवे.
सणासमारंभांना नातेवाईकच आणि झू बघायला बच्चेकंपनीच हवी बरोबर.
हेराफेरीसारखा मूव्ही मित्रांच्या घोळक्यात बघणं आणि ऑफिसच्या टीमबरोबर बघणं (बॉसेस सकट) यात
फरक आहे की नाही?
वॉटर गेम्स असलेल्या रिसॉर्टवर घरच्या लोकांबरोबर, सगळ्या भाच्यापुतण्यांसकट जाणं आणि टीम बिल्डींग च्या
वर्कशॉपसाठी जाणं यात पण Happy
तर दोस्त्स पैसा जमवायला हवाच पण त्यासाठी जवळच्या माणसांची कंपनी कॉम्प्रोमाईझ करायला नको.
पहिल्याशिवाय चालतं कधीकधी पण दुसर्‍याशिवाय नाही. वॉट से?

विषय: 
प्रकार: 

सन्मी... खासच लिहिलं आहेस. तसं सगळं आपल्याला माहित असतं पण तरीही वाचायला आवडलं... मनमोकळं-१ पेक्षा ही जास्त छान आहे!

आय से १०० मार्क्स टू संघमित्रा Happy
मस्तच लिहिलंयस.. अगदी मनातल्या विचारांचं प्रतिबिंब..

झ्याक लिवलयस की गं सन्मे तू.. मन येकदम मोकळं झालं बघः)

खरी मजा कुठलीही गोष्ट आपल्या आवडत्या माणसांबरोबर शेयर करण्याची असते.

एकदम सही, आवडले आणी पटले!

मजेचा मूळ घटक आहे आवडती माणसं.
+++ हे म्हणजे लाखातले एक बोललीस बघ. एकदम पटले. छान लिहीतीयेस, अजुन येवुदे.

सॉलिड हसले! असेल तिथून केलेले फोन, ग्रीटिन्ग खरेदी, पुन्हा आयुष्यात न वापर्लेले क्लास .. अगदी अगदी. माझ्याचसाठी लिहिलेय का Happy

दोन्ही सु,न्दर. खूप मजा आली आणी पैसे पण नाही पडले वाचायला.
-बापू

दोन्ही सु,न्दर. खूप मजा आली आणी पैसे पण नाही पडले वाचायला.
-बापू

मजेचा मूळ घटक आहे आवडती माणसं. तीही त्या त्या मजेला सूट होणारी.

पहिल्याशिवाय चालतं कधीकधी पण दुसर्‍याशिवाय नाही.

अगदी मनापासुन पटल. मस्तच आहे तुझ मनमोकळ लिखाण.

दोस्त्स वाचलंत आणि सांगितलंत त्याबद्दल मनापासून आभार. पोस्टू की नको चाललेलं जरा. झलक जिंदगी सारखंच वाटतंय का हे लिखाण असं वाटत होतं. तसं असेल तरी सांगा. कधीकधी काय होतं की आवडतं वाचायला पण एकसाची होतं.. म्हणून. अर्थात आता सुचलं की (आणि सुचेल ते) लिहायचं ठरवलं आहेच पण मायबोलीवरच्या प्रतिक्रियांनी दिशा मिळते पुढच्या लेखनाला.
म्हणून बडे थँक्स गं (१ पेक्षा छान आहे हे) सांगितल्याबद्दल.
मैत्रेयी मागे पण एकदा आपले लहानपणचे अनुभव मॅच होत होते. मला वाटतं मी सुट्टीवर लिहीलं होतं तेंव्हा. Happy

Happy सहीच! मलाही वाटतं पहिले नसेल तरी चालेल पण फार सुदैवी असावे लागते दुसरे आपल्याजवळ असायला. वाळूसारखे निसटून जातात सुंदर क्षण!
बाकी धडाक्यात येउ दे असच अजून. मग्काय मौजाही मौजा Happy

हे पण झकास जमलंय .. भरपूर आठवणी जाग्या झाल्या .. आणि थोडंसं वाईट पण वाटलं की ते दिवस आता परत येणार नाहीत म्हणून .. Happy

सन्मी, अतिशय अतिशय सुंदर लिहिलयस.
'खरी मजा कुठलीही गोष्ट आपल्या आवडत्या माणसांबरोबर शेयर करण्याची असते.'
मजेची इतकी साधी सरळ सोप्पी व्याख्या.....
जियो! आता दिवस काय जाईल म्हणतेस!

मस्त सुंदर आणि खरोखर मनमोकळ... ह्य लिखाणातुन तुझी व्यक्तीरेखा पण उभरते... १-२ वचले. कामचालु आहे... तु पण लिहीत रहा असच मनमोकळ...

पैसा असेल तर मजा वाढते हे खरंच. तो एक महत्वाचा घटक आहेच. पण तो पिठल्यात पडलेल्या लसणासारखा.
लज्जत वाढवणारा. पण मुदलात खमंग परतलेलं चण्याचं पीठ हवंच त्यासाठी.
मजेचा मूळ घटक आहे आवडती माणसं. तीही त्या त्या मजेला सूट होणारी.>> संघमित्रा, १००१ मोदक!

कप आणि कॉफीची गोष्ट आठवली!

हेही मस्तच आहे. मैत्रेयीसारखंच वाटलं, "हे माझ्याचसाठी लिहिलंय की काय" Happy

>>हेराफेरीसारखा मूव्ही मित्रांच्या घोळक्यात बघणं आणि ऑफिसच्या टीमबरोबर बघणं (बॉसेस सकट) यात
फरक आहे की नाही?

Happy Happy Happy