किती घेशील दो कराने.... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Submitted by प्रज्ञा९ on 13 December, 2011 - 09:47

कधी कधी काही चांगल्या गोष्टी घडतात त्याही आपल्याला अकल्पितपणे! या वर्षी सवाईला मी पुण्यात असेन असं वाटलं नव्हतं आधी. पण आल्यावर मात्र एक तरी सेशन ऐकायला जायचं नक्की केलं. याआधी ३ वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ऑफिसमधून संध्याकाळी थेट रमणबाग. तो सवाईचा पहिला अनुभव. आणि या वेळचा दुसरा.

पहिला दिवस कामाच्या इतक्या गडबडीत गेला, की सवाई आहे हेच विसरायला झालं. त्या दिवशी पं. अजय पोहनकर, अश्विनी भिडे-देशपांडे यांचं ऐकायचं हुकलं! दुसर्‍या दिवशी जोर केला, आणि संध्याकाळी तरी जाऊ म्हणून कामं उरकली. त्या दिवशी शैला दातार, पं. रोणू मुजुमदार आणि डॉ. बालमुरलीकृष्णन यांचा कार्यक्रम होता. दातारांच्या शेवटच्या अभंगाला आम्ही तिथे पोहोचलो. आधीही मैफिल मस्त रंगली असावी, कारण अभंगाने सुरेख शेवट झाला.

पुढे बासरी, सॅक्सोफोन आणि तालवाद्य जुगलबंदी होती. सॅक्सोफोन मी याआधी केवळ पाश्चात्य सुरावटींमधे ऐकला होता. पण ते वाद्य भारतीय संगीतातही इतकं शोभून दिसतं हे मात्र त्या दिवशी समजलं. तिन्हीसांजेला बासरीचे सूर ऐकून जीव शांत शांत झाला अगदी! रोणूजींनी अलगद सुरांची एक लकेर घ्यावी आणि काद्री गोपालनाथांनी सॅक्सोफोनवर ती तितक्याच नजाकतीने उचलावी......
खूप जमली होती जुगलबंदी! काळजात कळ उठावी इतकं जीवघेणं कोणी वाजवत असेल तर आपण बोलायचं तरी काय! आणि दाद तरी काय द्यायची! आणि या सगळ्यावर कळस म्हणजे तालवाद्यांची जुगलबंदी. पखवाज आणि तबला. डोळ्याची पापणी न लवता मी ती स्क्रीनवर बघत होते. सगळ्या जिवाचे कान होणं म्हणजे काय ते अक्षरशः कळत होतं. शेवटी तर श्वास रोखून ऐकत-बघत होते. म्हणजे ऐकू की त्यांचे तबला-पखवाजावर लयबद्ध थिरकणारे हात बघू असं झालं होतं.

या वेळचा महोत्सव पंडितजींना श्रद्धांजली वाहणारा होता, त्यामुळे पूर्ण महोत्सवावर पंडितजींची प्रेमळ छाया होती. कार्यक्रमात पुढे त्यांना श्रद्धांजली म्हणून रोणूजींनी "पायोजी मैने रामरतन धन पायो.." हे भजन सादर केलं. सोबतीला अर्थातच काद्रीजी आणि तबला-पखवाज. अप्रतिम!

एखाद्या अन्नपूर्णेने केलेल्या अन्नाला जशी घासाघासाला दाद मिळते तशी या कलाकारांना मिळत होती. वन्स मोअर चा घोष सुरू होता. सगळं वातावरणच भारावून टाकणारं होतां. हे कधी संपूच नये असं वाटायला लावणारं....

पण वेळेचं बंधन असल्यामुळे त्यांनी कार्यक्रम आवरता घेतला. पुढे कर्नाटकी संगीत होतं, पण काही कारणामुळे आम्ही थांबलो नाही.

पुढच्या दिवशी पं. जसराज, शंकर महादेवन यांचा पर्फॉर्मन्स होता. त्या दिवशी सगळी दैनंदिन तिकिटं लवकर संपली. मी गेले तेव्हा लोक फाटकाबाहेर उभ्याने ऐकत होते! थोड्या वेळाने मात्र संयोजकांनी पूर्ण प्रवेश मोकळा केला आणि आम्ही आत जाऊ शकलो. काल तिकिट काढूनही मिळाली नाही अशी जागा तिकिट नसताना मिळाले हे नवलच! आत गेलो त्यावेळी शंकर महादेवनच्या कर्नाटकी संगीताचा शेवटचा भाग सुरू होता. खूप गोड वाटलं ते ऐकताना. आधी आलो नाही म्हणून पुन्हा एकदा हळहळलो...
त्यानंतर मात्र तो जे गायला त्याला तोड नाही! ते अफाट होतं. "याचीसाठी केला होता अट्टाहास" असं झालं होतं मला. श्रद्धांजली म्हणून त्याने अभंग गायला सुरूवात केली. मोहक गुंफणच ती! पहिलाच अभंग ऐकला, आणि अर्ध्या रस्त्यातच पेट्रोल संपलं म्हणून ते भरायला गाडी ढकलून आलेला थकवा, पार्किंग नाही म्हणून ते शोधताना झालेली दमछाक, तिकिट नव्हतं तेव्हा झालेली घालमेल...सगळ्यामुळेच कठीण झालेलं मन एकदम मऊ झालं! आपलं मन आतून पाघळतंय ही जाणीव व्हायला लागली. जसजशी अभंगांची रेशमी लड उलगडायला लागली तसतशी ही जाणीव अधिक तीव्र झाली. मग मग तर, आता याच मातीत मिसळून जावं, पुढे काही ऐकू नये असं वाटायला लागलं. जादुई आवाज, गोड चाली आणि जीव ओतून गाणं....शंकर महादेवन, "शंकर महादेवन" न रहाता दोघांत तिसरा तानपुरा झाला होता....तो स्वतःच अखंड अभंग झाला होता!

नकळत डोळे ओलावले! भैरवीचा अपवाद सोडता असं फार क्वचित झालं होतं माझं. दाद देण्याइतकी तरी माणसांत असायचे मी. पण हे काहीतरी वेगळंच होतं. मीच काय, कोणीही बोलू नये, आणि त्याचे अभंग संपताना एक जीवघेणी शांतता असावी असं वाटत होतं. नक्की काय वाटलं ते शब्दांच्या पलिकडचं आहे! पण फार फार काहीतरी उत्कट घडत असताना "इथे आपणच संपावं, पुढचं काही नको" ही जाणीव खरंच इतकी तीव्र होते का? ते अभंग ऐकताना माझ्याही नकळत देहातला आत्माराम म्हणाला असेल, की अखेरचा दिस असाच गोड व्हावा...

त्यानंतर पंडित जसराज गायले. खूप छान झालं तेही. पण त्यांचा मान राखूनही, अगदी खरं सांगायचं तर शंकर महादेवनचं गाणं इतकं आत खोलवर भिनलं होतं, की दुसरं काही ऐकून मनात झिरपायलाही जागा नव्हती.

कदाचित माझ्या या उत्कट किंवा तीव्र भावनेमुळेच असेल, पण नंतरचा एकही दिवस/ सेशन मला जायला मिळालं नाही. जे काही साठलंय ते "तीर्थ विठ्ठल...क्षेत्र विठ्ठल.."
आणि म्हणूनच असेल, पण हे लेखन म्हणजे रूढार्थाने सवाईचा वृत्तांत नाही. "जाणत्या" रसिक श्रोत्याची टिप्पणी नाही. जे जे मनाला भावलं, आणि ज्याने खर्‍या अर्थाने, माणूस म्हणून जन्माला येऊन गाणं ऐकायला आवडतंय, या गोष्टीचं सार्थक झालंय असं मला वाटलं त्याला दिलेली दाद आहे. काही ठिकाणी ते भावविव्हल वाटू शकतं, शब्दबंबाळही झालं असेल, पण जे आहे ते निखळ प्रामाणिक आहे! जिथे सरस असेल तिथे पूर्ण श्रेय कार्यक्रमाचं, आणि जिथे कमी असेल ते माझं. त्यात न्यून ते पुरते करून घ्याल अशी आशा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यानंतर पंडित जसराज गायले. खूप छान झालं तेही. पण त्यांचा मान राखूनही, अगदी खरं सांगायचं तर शंकर महादेवनचं गाणं इतकं आत खोलवर भिनलं होतं, की दुसरं काही ऐकून मनात झिरपायलाही जागा नव्हती.>>>>

ह्याला प्रचंड अनुमोदन.... माझी ही अवस्था काहीशी अशीच होती...

बरोबर माझी मुलगी पण होती.. तिने शंकर महादेवन काकांचे गाणे पूर्णवेळ अजिबात गडबड न करता ऐकलं.. आणि नंतर आजोबांचे गाणे सुरु झाल्यावर बाबा घरी जायचं म्हणून मागे लागली..थोडावेळ तसेच बसलो होतो पण तिची कुरकूर चालूच होती.. त्यामुळे शेवट पर्यंत थांबलो नाही..
सध्या सुद्धा तिला मधूनच काकांचं गाणं ऐकायची लहर येते.. आणि यूट्युब वरचं गाणं ऐकायचं असतं..

<त्यानंतर पंडित जसराज गायले. खूप छान झालं तेही. पण त्यांचा मान राखूनही, अगदी खरं सांगायचं तर शंकर महादेवनचं गाणं इतकं आत खोलवर भिनलं होतं, की दुसरं काही ऐकून मनात झिरपायलाही जागा नव्हती.>>>> १००% अनुमोदन.
शंकर चे गाणे आहेच तसे. मी पुण्यात शिकायला होते, तेंव्हा १ वर्ष ही चुकविला नाही सवाई, आणि आता मुंबई मधे आल्यापासुन १वर्ष ही जमले नाही.
खुप मस्त लिहिले आहे, एकदम प्रामाणिक अनुभव

जादुई आवाज, गोड चाली आणि जीव ओतून गाणं....शंकर महादेवन, "शंकर महादेवन" न रहाता दोघांत तिसरा तानपुरा झाला होता....तो स्वतःच अखंड अभंग झाला होता!
नकळत डोळे ओलावले! >>> अगदी अगदी.....

खरोखर स्वरामृतानुभव होता हा सगळा....

मस्तं लिहिलय... Happy

मी दिनेशदां चा समदु:खी आहे. यू ट्यूब वर दहा मिनीटांचा व्हीडिओ पाहुन व या लेखा सारखे लेख वाचून दुधाची तहान ताकावर भागतो झालं. Sad

सुंदर अनुभव! यूट्यूबवर शंकर महादेवनची अभंग मेडली पाहताना / ऐकताना देखील तल्लीन व्हायला होतंय...

बरोबर माझी मुलगी पण होती.. तिने शंकर महादेवन काकांचे गाणे पूर्णवेळ अजिबात गडबड न करता ऐकलं.. आणि नंतर आजोबांचे गाणे सुरु झाल्यावर बाबा घरी जायचं म्हणून मागे लागली..थोडावेळ तसेच बसलो होतो पण तिची कुरकूर चालूच होती.. >> सो स्वीट, हिम्स! Happy

नकळत डोळे ओलावले! भैरवीचा अपवाद सोडता असं फार क्वचित झालं होतं माझं. दाद देण्याइतकी तरी माणसांत असायचे मी. पण हे काहीतरी वेगळंच होतं. मीच काय, कोणीही बोलू नये, आणि त्याचे अभंग संपताना एक जीवघेणी शांतता असावी असं वाटत होतं. नक्की काय वाटलं ते शब्दांच्या पलिकडचं आहे! पण फार फार काहीतरी उत्कट घडत असताना "इथे आपणच संपावं, पुढचं काही नको" ही जाणीव खरंच इतकी तीव्र होते का? ते अभंग ऐकताना माझ्याही नकळत देहातला आत्माराम म्हणाला असेल, की अखेरचा दिस असाच गोड व्हावा... >>>>>>>>>>>>>>>>>>>>

रोज वर्तमानपत्रात वाचून जीव तळमळतो, अगदी.>>>>>>>>>>>>>>>>>>>

अती सुन्दर ... खरच खुप जीव तळमळ ला माझा...... नशिबातच नव्ह्ते....
पण लेख वाचुन खरच डोळे पाणावले .....

सहि....

खुप छान लिहीलयस गं! नी, खरच खुप नशिबवान आहेस तू! एव्हढ्या वर्षांत तू सगळ्याच दिग्गजांना ऐकलं असशील ना?

सुंदर लिहिलंस प्रज्ञा! "सवाई" आम्ही पण तुझ्या लेखनातून अनुभवला.
या वर्षी माझी वारी चुकली. पण आता बाजारात सीडी आल्या की घेईनच.

छान लिहिले आहे. शंकर महादेवन हा खरच गुणी कलाकार आहे. ग्लॅमर मध्ये राहुनही डोक्यात हवा गेलेली नाही.

खरंय... तो क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून आयुष्य धन्य झाल्याचा अनुभव होता Happy आवडला लेख Happy शब्दांत उतरवणं अवघड होतं, ते तुम्ही केलंत Happy

>>जे जे मनाला भावलं, आणि ज्याने खर्‍या अर्थाने, माणूस म्हणून जन्माला येऊन गाणं ऐकायला आवडतंय, या गोष्टीचं सार्थक झालंय असं मला वाटलं त्याला दिलेली दाद आहे.

नक्कीच... आरपार भिडलं..!

>>शंकर महादेवन, "शंकर महादेवन" न रहाता दोघांत तिसरा तानपुरा झाला होता....तो स्वतःच अखंड अभंग झाला होता
एकूणात एखाद्या अभंगाला वा अभंग गाणार्‍याला अशी दाद मिळणे यापेक्षा यापेक्षा मोठा गौरव दुसरा नाही. शब्द, ताल, मागे राहून या अनुभूतीत निव्वळ त्या परमोच्च भावाशी तादाम्य एव्हडेच काय ते शिल्लक रहाते. "अभंग" जो कधीच भंग पावू शकत नाही त्या अर्थाने तुमचा अनुभव सुफल झाला असे म्हणायला हवे. पंडीत भिमसेनांच्या अमर अभंगवाणीला ही खरी श्रध्दांजली !

(यूट्यूब वा ईतरत्र कुठे क्लिप आहे का?)

योग, प्रतिसादांच्या पहिल्याच पानावर नंदिनी आणि देवकाकांनी लिंक्स दिल्या आहेत यूट्यूबच्या.

प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार. Happy

पहिलाच अभंग ऐकला, आणि अर्ध्या रस्त्यातच पेट्रोल संपलं म्हणून ते भरायला गाडी ढकलून आलेला थकवा, पार्किंग नाही म्हणून ते शोधताना झालेली दमछाक, तिकिट नव्हतं तेव्हा झालेली घालमेल...सगळ्यामुळेच कठीण झालेलं मन एकदम मऊ झालं! आपलं मन आतून पाघळतंय ही जाणीव व्हायला लागली.>>>>>> लेख वाचून हेच झालं.
गाण्यात जसा कलाकार पूर्ण उतरला की ते गाणं जसं रसिकाच्या ह्रदयात सहज उतरते तसेच या लेखाविषयी म्हणता येईल.....
जियो, जियो....
(...... खरी अनुभूती तर पूर्ण नि:शब्दच....................)

लिहिलंय चांगलं, पण पुढच्या वर्षीपासून सवाई असाच होणार असेल तर नाही आवडणार जायला.
यावेळेसचा सवाई गायकीपेक्षा सादरीकरणावर जास्त भर देणारा वाटला, शात्रीय संगीतापेक्षा उपशास्त्रीय किंबहूना सुगम संगीत ऐकतो आहे की काय असं वाटत होतं. उदा. शंकर महादेवन, तो जेंव्हा कर्नाटकी संगीत गात होता तेंव्हा प्रतिसाद यथा तथाच होता, पण जेंव्हा त्याने भजनं सादर(सादर गायला नव्हे) करायला सुरवात केली लोकांचा प्रतिसाद वाढायला लागला. भलेही त्याचे खालचे सूर पोकळ असले तरिही. (माझं बोलणं चुकीचं वाटत असल्यास परत एकदा युट्युबवर जाऊन नीट ऐकून खात्री करून घ्यावी.)
यावेळेस किती गायकांनी आलाप, जोड ऐकवलं? रागाची सौंदर्यस्थळ दाखवली? जर फक्त अण्णांना श्रद्धांजली म्हणून यावेळेस जास्त भजनं झाली असतील तर ठीक आहे, हे पुढे पण चालू राहिलं तर पुणेकर चांगल्या शास्त्रीय संगीताला मुकतील हे मात्र निश्चित.
चु. भु. द्या. घ्या.

देवा, तुमची पोस्ट पटली. शंकर महादेवन ह्यांचं गाणं ऐकताना वाटलं ( त्यांचं लाईव्ह गाणं ऐकताना बरेचदा वाटतं ) की केवढं potential आहे ह्या माणसात तर सूर लावताना एवढं casual का राहतात हे. गळा कुठूनही कसाही सहजरित्या फिरतोय तर सूर pin point ला लावण्याकडे दुर्लक्ष होतंय.** पण समोरासमोर गाणं ऐकताना बरेचदा एक उत्कट भारावलेपण येतं प्रेक्षकांमध्ये हे ही खरं Happy
बाकी शास्त्रीय गाण्याचं म्हणाल तर पूर्वी मैफिलीत जसा तासनतास एकच राग रंगायचा तसं होणं आता कठीण वाटतं. जर नवीन पिढीपर्यंत पोचायचं असेल तर सादरीकरणाचा साचा बदलायला हवा. तसा तो बदलतोही आहे. ह्यामध्ये मला सुरांशी, रागरचनेशी केलेली कुठलीही तडजोड अपेक्षित नाहीये. मी फक्त वेळेबाबत बोलतेय.

** हे लिहिण्यासाठी खूप धाडस गोळा केलंय. शंकर महादेवन ग्रेटच आहेत ह्यात वादच नाही. पण ते ग्रेट आहेत म्हणून तर ह्या गोष्टी इतक्या तीव्रतेने खुपतात आणि त्यांच्या गळ्यातून परफेक्ट सूर निघाला नाही तर त्याचं वाईट वाटतं.

Pages