नियम, संस्कार ?

Submitted by विनायक.रानडे on 3 December, 2011 - 00:51

हा लेख मी एक मानव? ह्या लेखाचा पुढचा भाग आहे. चांगले किंवा वाईट नियम, संस्कार कोणी ठरवले, का ठरवले? ह्याचा शोध मी माझ्या अनुभवांच्या विश्लेषणातून केला. अनादिकालापासून ह्या सृष्टीत नियमित प्रसंग घडले व घडत आहेत. ह्या नियमित प्रसंगांची यादी म्हणजेच नियम हे मला माझ्या क्षमते प्रमाणे समजले आहे. निसर्गाने दिलेल्या जीवदानाचा चांगला सतकारणी उपयोग व्हावा म्हणून मानवाने बरेच नियम स्वेच्छेने स्वीकारलेले आहेत. हे शरीर सुदृढ, निरोगी राहावे म्हणून ह्या नियमांचे संकलन करून सुनियोजित केलेला कार्यक्रम म्हणजे संस्कार असा माझा मीच ठरवलेला अर्थ आहे.

माझ्या जन्मापासून माझ्या पोटात जाणारा आहार हा देखील एक संस्कार होता. माझ्या आईने जमा केलेल्या अनुभवांनी तिने ठरवले कोणते अन्न माझ्या प्रकृतीला पोषक होते. त्या आहारातील प्रत्येक पदार्थाची निवड, स्वच्छता, शिजवणे, व कोणत्या वेळेला मी ते खावे हे सगळे आहार विषयक संस्कार होते व त्या संस्कारांनी माझ्या शरीराची वाढ झाली म्हणून ते आहाराचे संस्कार चांगले होते. पण रोज दिसणारा विरोधाभास समजणे कठीण झाले आहे, भिकारी बाई तीच्या मुलांना आहाराचे कोणते संस्कार देते? त्या आहार संस्कारांना चांगले वाईट कोण ठरवणार?

जो पर्यंत स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता माझी नव्हती तेव्हा माझ्या पालकांनी माझ्या वर संस्कार केले पुढे त्यांनीच त्याचे नियम तयार केले व मला ते नियम पाळण्याची सक्ती केली. त्या नियमांचे मी पालन केल्यास माझे दैनंदिन जीवन सुलभ निरोगी होईल हा त्या नियम बनवण्या मागचा हेतू होता. हे सगळे नकळत घडत गेले. कारण मी अजून घराच्या चार भिंतींच्या मर्यादेत होतो. जेव्हा शेजारी व घराबाहेरील वातावरणात मिसळणे सुरु झाले तेव्हा माझ्या वर झालेले संस्कार व नियम पालन सक्तीची तुलना करण्याची संधी मला मिळाली. त्या आहार संस्कारांनी माझ्या शरीरातील अवयवांच्या घनतेत (बॉडीमास) बदल घडला होता. त्यामुळे वेगवेगळ्या नैसर्गिक स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) होण्याच्या क्षमतेत बदल घडत होता. म्हणून त्या आहार संस्कारांनी माझी मानसिकता व संवेदनाक्षमता इतरांच्या तुलनेत बरीच वेगळी तयार झाली हे आज जाणवते आहे.

माझ्या क्षमतेची सत्यता रोज घडणार्‍या प्रसंगातून जाणवत होती. समवयस्क मुले-मुली माझ्या घरात केव्हाही खेळायला येत असत, त्यांना कधीच कोणी अडवले नाही पण मी फारसा कोणाच्या घरात गेलो नव्हतो, शेजारची मंडळी आम्हा मुला-मुलींना सारखे घरातून बाहेर काढत असत. हा माझ्या पालकांच्या संस्कारांतील फरक मला अगदी सहज जाणवला. संध्याकाळी आमच्या ६ फुटाच्या झोपाळ्यावर समवयस्क मुले-मुली श्लोक व पाढे म्हणायला रोज जमत होते. त्या श्लोकांचे उच्चार आम्हा भावंडांचे इतरांच्या तुलनेत जास्त स्पष्ट होते, आमचे पाठांतर देखील जास्त होते. हा सगळा संस्कारांचाच परिणाम होता.

हे जसे आहार विषयाचे संस्कार व आहार नियम होते तसेच माझी मानसिक क्षमता निरोगी असावी म्हणून माझ्या पालकांनी माझ्यावर मानसिक संस्कार केले व मानसिक नियम पालनाची सवय मला लावली. ह्या नव्याने उमजलेल्या माझ्या क्षमतेची तुलना घराबाहेरील वातावरणातील इतरांच्या मानसिक संवेदनाक्षमतेशी करण्याची संधी मला मिळाली. आजतागायत मला कोणाला अथवा कोणाविषयी शिव्या अपशब्द काढण्यात कमीपणा वाटतो. माझे असे ठाम मत आहे की शिव्या अपशब्द काढणे ही बुद्धी कमकुवत असण्याची लक्षणे आहेत. अहो एकदा चक्क माझ्या आईनेच मला गाढव आहेस असे म्हणताच जन्म देणारी तीच आहे व ही चूक तिची आहे माला दोष देऊन काय उपयोग असे मीच तीला सांगितले होते. तिने त्या करता तत्काळ माझ्या कानाखाली वाजवली होती पण त्यानंतर तिने बोलणे बदलले होते, गाढवासारखे वागू नकोस असे ती म्हणू लागली. ह्यालाच तुम्ही चांगले संस्कार म्हणाल की अजून काही उपाधी देणार? ह्या चांगल्या संस्कारांचा परिणाम म्हणजे मी मित्र गोळा केले नाहीत पण महत्त्वाचे म्हणजे शत्रू निर्माण होऊ नयेत ह्याची जास्त काळजी घेतली. आजही तशी काळजी घेतो आहे.

माझ्या लहान पणी शेजारी असणार्‍या समवयस्क मुला-मुलींनी माझी खेळणी व वस्तू परवानगी शिवाय त्यांच्या घरी लंपास केल्या होत्या. हा परिणाम त्यांना मिळालेल्या संस्कारांचाच होता हे मला त्या काळातच समजले होते. प्राथमिक शाळेत शिक्षण सुरु झाले तेव्हा घराच्या चार भिंतीत झालेल्या संस्कारांचा व शाळेत घडणार्‍या संस्कारांचा विरोधाभास जाणवू लागला होता. खोटे बोलणे वाईट असते, देव त्याला शिक्षा करतो वगैरे संस्कार घरापुरतेच असतात असे अनुभव रोज येत होते. शाळेत मुले-मुली, शिक्षक खोटे बोलत होते. त्यांना शिक्षा होताना दिसली नव्हती. उघड्यावर मुतायला, संडासाला बसणारी मुले-मुली बघताना आईने दिलेले संस्कार चुकीचे आहेत की काय असेच काही वेळा वाटत होते. भिंतीवरील नग्न चित्रे व त्या खाली लिहिलेली आकलन न होणारी वाक्ये माझ्या पालकांच्या संस्कारांना / नियमांना जुनाट ठरवीत होती.

माध्यमिक शालेय शिक्षण सुरु झाल्यानंतर ब्राम्हण व ब्राम्हणेतर हा फरक व त्याचे परिणाम मी अनुभवले होते. त्याचेच हे एक उदाहरण आहे. माझ्या बाबांनी एका १३ एकर जमिनीच्या ७० प्लॉट असलेल्या सोसायटीचा कार्यवाह म्हणून काम केले होते. रस्ते, दुतर्फा झाडे अशी बरीच कामे विशेष लक्ष देऊन केली होती. त्या जागेत बाबांनी त्यांच्या मालकीचे घर बांधले होते. आमच्या शेजारी लेवा पाटील समाजाचे एका शाळेचे मुख्याध्यापक होते व त्यांची बायको दुसर्‍या एका शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यांची तीन मजली इमारत होती. त्यात आधुनिक संडासाची व्यवस्था होती पण त्यांची नातवंडे आमच्या घरासमोर झाडाखाली उघड्यावर संडास करायला सकाळी, दुपारी येऊन बसत होती. मी त्यांना हे चुकीचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्कारांना साजेसे उत्तर मला दिले " ए बाम्हण्या, माझी नातवंडं अशीच रोज संडासाला बसतील. ती जागा तुमच्या हद्दीत नाही. पटत नसेल तर ही जागा खाली करा. जा बाम्हणाच्या वस्तीत जाऊन राहा." सगळेच ब्राम्हण चांगले व ब्राम्हणेतर वाईट असे नव्हते / आजही नाहीत मग ब्राम्हण कोण व का? ह्या १८ पगड जाती का व कोणी निर्माण केल्या हा माझा शोध सुरु झाला.

ब्राम्हण कोणाला व का म्हणतात हे प्रथम ब्राम्हणेतरांचे मत जाणून घेतले. पूजा पाठ करणारे, उगीचच जास्त शिकलेले आहोत असे समजणारे, लोकांना भविष्य सांगून फसवणारे, लग्न कार्यात पत्रिकांचा घोळ घालणारे, न समजणारे मंत्र म्हणून दक्षिणा गोळा करणारे, फुकट मेजवानी खाणारे, लांब शेंडी उघडे पोट दाखवत गावभर फिरणारे, पाले भाज्या कढी भात खाणारे, अशी विधाने ऐकायला मिळाली. सिनेमा नाटकातून ब्राम्हण असाच काहीसा दाखवला गेला, आजही दाखवला जातो. पण असले कोणतेच प्रकार माझ्यात नव्हते मग मला ब्राम्हण का व कोणी ठरवले? ह्याचा अर्थ मला समजवून सांगण्यात आला. माझा जन्म एका ब्राम्हणाच्या घरात झाला होता, आडनाव रानडे म्हणून मी ब्राम्हण ठरलो होतो. तो माझा दोष कसा होता? मला माझे डोके चांगल्या प्रकारे वापरता येते हा दोष का व कोणी ठरवला?

जसे वय वाढत गेले तसे जाती, पोटजाती, ब्राम्हणांचा द्वेष, धर्म व त्यातील फरक असे विविधं प्रश्न त्रास देत होते. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आता सुरु झाला.

ह्या चित्रणात माझी मोठी बहिण सातवीच्या मुलांना "ध्वनी प्रदूषण" हा विषय समजण्या करता तीने केलेली कवीता वाचन करते आहे. मोठी बहिण २००४ ला हृदय विकाराने आम्हाला सोडून गेली. ही कवीता म्हणजे एक संस्काराचाच प्रकार आहे. तिच्याच शब्दात ऐकू या. दुवा - http://youtu.be/gcYfSHNVFm8

गुलमोहर: 

>>> एका ठराविक पातळी नंतर कुठल्याही गोष्टींचा अतिरेक चांगला नाहीच. <<<<
अगदी बरोबर.
मात्र देशकालवर्तमानपरिस्थितीनुसार, विशिष्ट कृती करताना विशिष्ट बाबी त्याज्यच ठरविल्या आहेत, व त्या कसोशीने पाळल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. (अन आक्षेप हा अस्तो की हे नियम बामणान्नी त्यान्चे सोईकरता बनविलेत)
अगदी आधुनिक जगात, ड्रायव्हिन्ग करताना "मदिराप्राशन करु नये/मदिराप्राशन केलेल्या अवस्थेत ड्रायव्हिन्ग करु नये" असा भारतातील कायदा म्हणतो, तर परदेशात एखाददोन ठिकाणी (नेमका संदर्भ आठवत नाही) सिग्नलवर पेग/दोन पेग विकणारे फेरिवाले असतात असेही फोटो/माहिती बघण्यात आली आहे. म्हणजे तिकडे कुठेतरी (मेचक्या ठिकाणीच) होते म्हणून भारतातही मदिराप्राशन सिग्नलवर्/टोलनाक्यान्वर उपलब्ध व्हावे का? नको तर का नको? हव तर कायदा बदला Proud , अशाही मागणी होऊ शकतातच ना? लोकं कायदे मोडतातच ना? (तरी नशिब, हे भारतातील कायदे बामणान्नी त्यान्चे सोईकरता बनविले नाहीयेत, वा आजवर त्यान्नी त्यान्चे सोईकरता बनविलेत असे कोणी सिद्ध केलेले नाहीये Wink )

मी लिहिलेल्या विषयाचा अर्थ समजून न घेता एखादे अर्धवट वाक्य संदर्भ तोडून त्यावर डॉक्टरेट मीळवण्याचा प्रयत्न आहे कि काय असा संभ्रम झाला आहे. समजून न घेण्याची जणू स्पर्धा असल्या सारखे होते आहे.

मी बरीच वर्षे भारता बाहेर काढली, वयाने मोठा होताना भारतात जे अनुभव आले त्याला त्रासून मी देश सोडला व "नॉन रिक्वायर्ड इंडियन = एन आर आय" झालो होतो. मायदेशी परतलो १० वर्षे ह्या देशात काढल्यावर परिस्थीतीला कंटाळून पुन्हा "एन आर आय" होणार आहे. परदेशिय वातावरण व त्यांची समाज व्यवस्था ह्यांचा अनुभव घेत असताना भारतीय समजरचनेचा अर्थ समजवून घेण्याचा माझ्या क्षमते नुसार प्रयत्न केला व त्यातून हे विचार मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून त्याची सुरवात "मी एक मानव" म्हणजे मला समजलेला मानव व इतर जीव ह्यातील फरक अशी सुरवात झाली त्यातून संस्कार, धर्म, जात, आक्रमण, शिक्षण वगैरे बरेच विचार पुढे आले, तेच मी इथे माझ्या विचार स्वातंत्र्याची मदत घेउन लिहितो आहे.

आम्ही गुलाम का झालो व आजही आहोत ह्याचे उत्तर मला मिळाले आहे. ते माझ्या पुढील लेखातून माझ्या पद्धतीने येणार आहेत ते समजण्याचा वाचकांनी प्रत्यत्न करावा हि सदिच्छा!!!!!

आम्ही गुलाम का झालो व आजही आहोत ह्याचे उत्तर मला मिळाले आहे. ते माझ्या पुढील लेखातून माझ्या पद्धतीने येणार आहेत ते समजण्याचा वाचकांनी प्रत्यत्न करावा हि सदिच्छा!!!!!
---- अवश्य लिहा.... आनंदाने वाचन, मनन, चिंतन करु. आपल्या सदिच्छांबद्दल धन्यवाद.

भारता मधुन बाहेर पडणे कढिण, परत जाणे त्याहुनही कठिण.... तुम्ही असे ३ वेळा करत आहात. धन्य आहे तुमच्या धाडसाची.

आम्ही गुलाम का झालो व आजही आहोत ह्याचे उत्तर मला मिळाले आहे. ते माझ्या पुढील लेखातून माझ्या पद्धतीने येणार आहेत >>> जरूर लिहा. आम्ही वाचू.

ह्या लेखावरच्या प्रतिक्रिया का भरकटल्या यात मूळ लेखातही काही चुकीचे असू शकते हे पटू शकते का तुम्हाला? लोकांच्या वागण्याचा संबंध तुम्ही जातीशी जोडलाय ते तुमचा वैयक्तिक अनुभवावरून हे दिसते आणि त्यावरून बनलेले तुमचे मत तुमचे वैयक्तिक मत म्हणून ठीक आहे. पण इतरांचे अनुभव तसे नाहीत त्यामुळे त्यांना ते आवडले नाही.

बाकी मीअण्णाहजारे यांच्या पहिल्या कॉमेंटला आपण दिलेले उत्तर अनावश्यकरीत्या स्ट्रॉन्ग व वैयक्तिक वाटले.

फारएण्ड आभारी आहे. मी लेखक नाही, त्यातून भाषा माझा विषय नाही, मी भाषा ह्या विषयाला संभाषण माध्यम एवढेच समजू शकलो. तसे सगळ्याच विषयाचे आहे. त्यामुळे चुका होतील ह्याची मला खात्री आहे पण सकारात्मक ऐवजी नकारात्मक भाषा वापरणे, मलाच वेडे ठरवणे हे मला नवीन आहे. कदाचीत हे त्यांच्या विचार स्वातंत्र्यामुळे घडत असेल. एका पाटलाने मला बामण ठरवून मला त्रास दिला कोणत्या आधाराने ? मी तर जात काढण्याचा प्रयत्न केलेलाच नाही, माझा प्रश्न संस्कारांचा आहे. अशा व्यक्ती लहान मुलांना काय संस्कार देणार? पण .... धन्य हो ....

माझा एक फार चांगला मित्र, पालक दिवस रात्र शिव्या देणारे, दारूडे, अत्यंत गरिबी पण हा मुलगा एकच कपड्याचा जोड रोज स्वच्छ धुवून वापरणार, अत्यंत संस्कारित, हे संस्कार त्याला कोणी दिले, कधी ही शिवीगाळ नाही, त्याची मराठी भाषा त्या गावातून बाहेर हुठेही न जाता अगदी स्वच्छ होती, हे उदाहरण मी देणे आवश्यक होते. हे खरे आहे.

..

Pages