ऐका, पुढल्या हाका...

Submitted by झुलेलाल on 26 November, 2011 - 08:28

घरातील स्थान, आर्थिक स्थैर्य, जीवनशैली आणि कुटुंबातील सदस्यांशी, विशेषत मुलांशी असलेले नाते या असंख्य विषयांभोवती स्त्रियांच्या समस्या वर्षांनुवर्षे गुरफटून राहिल्या. चारपाच दशकांपूर्वीपर्यंत, जेव्हा कौटुंबिक रूढींचा प्रभाव स्त्रीवर सर्वाधिक होता, तेव्हाची स्त्री म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीने रंगविलेले केवळ एक सुबक चित्र होते. म्हणजे, स्त्रीचे रूप, शालीनता, प्रेमळपणा, वात्सल्य आणि स्वयंपाकघरातील जबाबदारी पार पाडण्यातील समर्थपणा किंवा खंबीरपणा या गुणांच्या रंगांनीच स्त्रीचे हे चित्र रंगविले जात असे. पत्नी, आई, सासू, सून, जाऊ-नणंद अशा वेगवेगळ्या कौटुंबिक भूमिकांमध्ये वावरतानाची तिची वागणूक हाच स्त्रीच्या गुणवत्तेचा कस ठरविण्याचा निकष होता. काळ बदलत चालला, स्त्रियांनादेखील शिक्षणाच्या आणि करियरच्या संधींची क्षितिजे खुणावू लागली, तेव्हा स्त्रियांचे उंबरठय़ाआड अडकलेले विश्व मोकळे झाले. कुटुंबातील प्रथांच्या पलीकडे जाऊन ‘ब्र’देखील काढण्याची हिंमत नसलेल्या स्त्रिया ‘बोलत्या’ झाल्या, आणि समाजात वर्षांनुवर्षे दबून राहिलेल्या महिलावर्गाला आवाज आहे, याची जाणीव समाजाला होऊ लागली. स्त्रिया केवळ बोलू लागल्या एवढेच नव्हे, तर न पटणाऱ्या बाबींवर ठाम मतप्रदर्शन करून प्रसंगी एकजुटीने संघर्षांसही सिद्ध झाल्या. कुटुंबाचा गाडा हाकणे ही सामूहिक जबाबदारी आहे, आणि पतीइतकाच पत्नीचादेखील या जबाबदारीतील प्रत्येक पावलावर समान वाटा आहे, हे प्रसंगी पुकारलेल्या लढय़ातून किंवा सिद्ध केलेल्या कर्तबगारीतून स्त्रियांनी दाखवून दिले. या परिवर्तनासाठी स्त्रियांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे.
व्यापक सामाजव्यवस्थेत हा बदल प्रकर्षांने जाणवत असला तरी सामान्य मराठी कुटुंबांमधील ‘आई’ अजूनही या परिवर्तनाच्या प्रवासात स्वतला सामावून घेण्याचा अडखळता प्रयत्न करीत आहे. अजूनही कुटुंबव्यवस्थेच्या जुन्या रूढींविषयीची आत्मीयता तिच्यात डोकावते. संध्याकाळी कामावरून घरी परततानाचा प्रवास सुरू करण्याआधी भाजी खरेदी करून, रेल्वेत किंवा बसमध्ये बसायला जागा मिळाली तर प्रवासात शेंगा, पालेभाज्या निवडणारी स्त्री अजूनही दिसते. कारण, कुटुंबात परतताना आपली घरातली भूमिका निभावण्याची तिची मानसिकता पूर्वीइतकीच जिवंत आहे. घराबाहेर पडल्यानंतर ही स्त्री हक्कांसाठी कणखरपणे लढू शकते, संघटितपणाने संघर्ष करण्याची तयारीही दाखविते, आणि न पटणाऱ्या बाबींवर परखडपणे मतप्रदर्शनही करते. पण संध्याकाळी घरी परतते, तेव्हा मात्र, ती आई, पत्नी आणि गृहिणी असते. संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर, दिवसभराच्या कामाचा शीण घालविणाऱ्या विरंगुळ्याचे क्षण तिचे तिनेच शोधलेले असतात. त्या क्षणांमध्ये रमल्यानंतर ती आपल्या घरातल्या भूमिकेत शिरते, हे चित्र अजूनही कित्येक घरांमध्ये दिसते.
पुरुषांच्या बरोबरीने नोकरी-व्यवसायाच्या विश्वात वावरणारी प्रत्येक नोकरदार स्त्री केवळ बदलत्या समाजव्यवस्थेतून आलेल्या आत्मविश्वासाचा किंवा मिळालेल्या हक्कांचा वाटा उचलण्याच्या मानसिकतेतच असते असे दिसत नाही. वाढती महागाई, बदलती जीवनशैली, आणि त्यामुळे कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी करावा लागणारा संघर्ष ही आजही मध्यमवर्गीय कुटुंबाची अपरिहार्यताच आहे. अनेक पाहण्यांतून निष्पन्न झालेल्या निष्कर्षांनुसार, शहरी भागांतील २७ टक्के महिला नोकरीसाठी सकाळी घराबाहेर पडतात. म्हणजे, साधारणपणे, शहरांत राहणाऱ्या प्रत्येक चार कुटुंबांपैकी एका कुटुंबातील स्त्री नोकरदार असते. अशा वेळी, कुटुंबाचे दररोजचे व्यवस्थान आणि मुलाबाळांची देखभाल हे मोठे आव्हान त्या स्त्रीच्या कुटुंबासमोर असते. या नोकरदार महिलांपैकी सर्वच महिला उच्चपदस्थ नोकरी किंवा उज्ज्वल भविष्यातील संधींची आव्हाने पेलण्यासाठी सरसावलेल्या, उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या नवश्रीमंत वर्गातीलच आहेत, असे नाही. रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या बसच्या थांब्यावर सकाळच्या वेळी लागणाऱ्या रांगा पाहिल्या, की नोकरदार महिलांचे वेगवेगळ्या आर्थिक स्तरांचे चित्र न सांगतादेखील स्पष्ट होऊ शकते. काखोटीला एक साधी पर्स असतानादेखील, हातात एखादी प्लॅस्टिकची पिशवी सांभाळत रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील गर्दीत स्वतला झोकून देताना जिवावरची कसरत पार पाडत कामाच्या ठिकाणी पोहोचणाऱ्या महिलांचा वर्गदेखील नोकरदार महिलांमध्येच मोडतो. नोकरी ही या महिलांची कोटुंबिक अपरिहार्यता असते. आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी घरातील पुरुषाच्या कमाईला जमेल तसा हातभार लावून कुटुंब चालविणे हाच या महिलांच्या ‘नोकरदारी’चा अर्थ असतो.
अशा महिलांना आपल्या घराची घडी विस्कटू न देण्याचेही आव्हान पेलायचेच असते. नोकरी करणाऱ्या या वर्गातील महिलांची आपली कौटुंबिक जबाबदारी झटकण्याची इच्छा नसते, किंवा नवऱ्याच्या बरोबरीने काम करत असल्याने घरातील जबाबदारीचा वाटा नाकारण्याची तिची मानसिकता नसते. सामान्यपणे प्रत्येकालाच, आपण जगतो ते जीवन सामान्य वाटत असते. भोवतालच्या श्रीमंतीच्या प्रदर्शनामुळे, दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या मालिकांनी रंगविलेल्या कुटुंबजीवनाच्या भपकेबाज चित्रांमुळे आदर्श जीवनाच्या वेगळ्याच कल्पना अनेकांच्या मनात घोळत असतात. स्त्रिया त्याला अपवाद नसतात. त्यातच सकाळी घराबाहेर पडून, सामान्य कमाईसाठी दिवसभर राबणाऱ्या नोकरदार महिला आणि त्यांच्याच आसपास वावरणाऱ्या उच्चभ्रू, उच्चशिक्षित आणि अधिकारामुळे प्राप्त झालेला आत्मविश्वास मिरविणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या महिला असे तट नोकरदार महिलांमध्ये आपोआप तयार झालेले असतात. रेल्वेच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणारी नोकरदार महिला, सेकंड क्लासच्या गर्दीतून लोंबकळत कार्यालय आणि परत घर गाठणारी महिला, भपकेबाज, शोफर ड्रिव्हन कारमधून प्रवास करणारी नोकरदार महिला असे अनेक वर्ग नोकरदार महिलांच्या दुनियेत असल्यामुळे यातील प्रत्येक वर्गाच्या समस्या आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या हाताळण्याचा दृष्टिकोनही वेगवेगळाच असतो. तरीदेखील, सामान्य कुटुंबातील महिलेसाठी नोकरी हा जगण्याच्या संघर्षांचा अपरिहार्य भाग असल्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्यांचे स्थान इच्छा नसतानासुद्धा दुय्यम ठेवावे लागते. ही खंत अनेक नोकरदार महिलांना सतावतानादेखील दिसते. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक ताण आणि नोकरीनिमित्त घराबाहेर राहावे लागल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य कौटुंबिक समस्यांची चिंता यांमुळे अनेक नोकरदार महिलांना रक्तदाब, हृदयदौर्बल्यासारखे विकार जडत असल्याचेही काही पाहणी अहवालांचे निष्कर्ष आहेत. नोकरी ही ज्या स्त्रियांच्या कुटुंबांची गरज असते, त्यांच्या कौटुंबिक आणि आरोग्यविषयक समस्याही वाढत जातात.
अशा समस्यांना एकटी नोकरदार स्त्रीच जबाबदार असते का, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पतीचीही समान जबाबदारी असते किंवा नाही, हा अलीकडे एक वादविषय होऊ पाहात आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबांतील मुलांचे पोषण नीट होत नाही, त्यांच्या आहाराच्या सवयी बदलतात आणि घरातील एकटेपणा घालविण्यासाठी मुलांनी शोधलेल्या बैठय़ा पर्यायांमुळे स्थूलपणासारखे विकारही बळावतात, असे ‘असोचेम’च्या एका पाहणीत अलीकडेच आढळून आले आहे. आर्थिक गरजा भागविण्यासाठी नोकरी करणाऱ्या आणि शैक्षणिक दर्जा उंचावल्यामुळे करिअर म्हणून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या, अशा दोन्ही गटांतील स्त्रियांच्या मुलांमध्ये असे विकार वाढत असल्याचा या पाहणीचा निष्कर्ष आहे. नोकरदार महिलांचे घराकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे मुलांमधील हे विकार वाढतात, असे या पाहणी अहवालाचे मत आहे. पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत, अर्धवेळ काम करणाऱ्या महिलांच्या मुलांमध्ये या विकारांचे प्रमाण कमी असते, तर पूर्णवेळ घरात असलेल्या महिलांच्या मुलांमध्ये ते आणखीनच कमी असते, असे आढळल्यानंतर, नोकरदार महिलांच्या मुलांमध्ये आरोग्याच्या तक्रारी अधिक असल्याचा निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला.
या अहवालावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटू लागल्या. मुलांच्या आरोग्याची जबाबदारी एकटय़ा स्त्रीची- म्हणजे आईची- का? वडिलांचीही तितकीच जबाबदारी असायला हवी, असा सूरही उमटू लागला. परंतु, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची असावी हा या पाहणीमागील महत्त्वाचा मुद्दाच नव्हता. महिलांनी नोकरीचे क्षेत्र निवडल्यानंतर त्या कुटुंबाच्या आरोग्याची घडी कुठेतरी विस्कटते आहे, हे या पाहणीतून सामोरे आलेले वास्तव विचारात घेणे आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्याची जबाबदारी केवळ आईचीच का, असा सवाल पुढे येऊ लागल्यानंतर, अशा जबाबदारीतील वडिलांचा वाटा हा चर्चेचा स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो. मुलांचे आरोग्य, शाळा, खाण्यापिण्याच्या सवयी, दैनंदिन जीवनशैली यांबाबतच्या सवयींवर पारंपरिक कुटुंबव्यवस्थेच्या संकल्पनेत आईचा प्रभाव असल्यामुळे या पाहणीची दिशा अशी ठरली असावी, आणि त्यामुळे कदाचित असा निष्कर्ष काढला गेला असावा. तरीदेखील, या जबाबदाऱ्या केवळ आईच्या किंवा केवळ वडिलांच्या या वादाला तात्पुरते बाजूला ठेवून या समस्येवर विचार करणे अधिक गरजेचे आहे, हे या पाहणीमुळे अधोरेखित झाले आहे. कारण, आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेली पुढची पिढी मोठेपणी त्यासाठी नेमके कुणाला जबाबदार धरणार आहे, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. ‘नोकरदारी’ हे या समस्येचे मूळ असेल, तर त्यावरचा तोडगा काय, याचाही विचार आवश्यक आहे. आर्थिक गरजा भागविण्याची निकड आणि कौटुंबिक आरोग्य यापैकी कोणत्या बाबीला प्राधान्य हवे, हेही या निमित्ताने ठरले पाहिजे. नाही तर, जबाबदारीच्या वादात पुढच्या पिढीचे आरोग्य पणाला लागलेले असेल..

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=195879:...

गुलमोहर: 

नक्कीच विचारप्रधान. पण अजुन पुर्ण वाचले नाही.

परिच्छेदात एका ओळीचे अंतर ठेवलेत तर वाचन थोडे सोयीचे जाईल

चतुरंग मधे प्रकाशित झालेल्या लेखावर तिथे आलेल्या प्रतिक्रियांमध्ये मला जे सांगायचेय ते आधीच आले आहे. आधीची आई फक्त गृहिणी असायची आणि आताची स्त्री नोकरदार गृहिणी आहे एवढाच फरक परिस्थितीत पडलेला नाही. अनेक गोष्टी पुढल्या पिढीच्या आरोग्यावर विपरित परिणाम करत आहेत. उदा: मुलांना खेळायला मैदानेच नसणे, खेळायला मुलांकडे वेळ नसणे ही दोनच देतो. या सगळ्यांचे खापर स्त्रीने नोकरी करणे या एकाच गोष्टीवर कसे काय फोडता येईल?
स्त्री नोकरी करायला लागल्यावर कुटुंबव्यवस्थेत बदल झाला, त्याचा सगळ्यात जास्त ताण त्या स्त्रीवरच पडतो. तिच्या आरोग्याबद्दल एखादी ओळ लिहायला हरकत नव्हती. स्त्रीची भूमिका बदलली तशी पुरुषाचीही भूमिका (पुरेशा प्रमाणात) बदलली नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरवून लेखाची गाडी 'त्याच त्या' रुळावर गेली आहे.

स्त्रीची भूमिका बदलली तशी पुरुषाचीही भूमिका (पुरेशा प्रमाणात) बदलली नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरवून लेखाची गाडी 'त्याच त्या' रुळावर गेली आहे.<<
संपूर्णपणे सहमत.

लेख प्रचंड एकांगी आहे. इतक्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी बाजूला टाकून काढलेले निष्कर्ष काय कामाचे.