रूबिक क्यूब आणि कृष्ण

Submitted by दाद on 16 March, 2009 - 22:53

"अरे, थांब. दूध तरी... " अनूला वाक्यही पुरं करू न देता रूपकने आपल्यामागे धाडकन दार ला‌ऊन घेतल आणि तो बाहेर पडला.
"नौटंकी!" धुमसत्या स्वरात स्वत:शीच बोलत एकावेळी चार्-चार पायर्‍या उतरत चाललेल्या त्याला, हळू हळू जिना चढणार्‍या शेजारच्या कुमा आज्जी दिसल्याही नाहीत. नाहीतर नेहमी त्यांच्या हातातली पिशवी, एक जीना चढून त्यांच्या दारात ठेवणारा रूपक त्यांना आज वेगळाच वाटला. अगदी अंग चोरून त्याला वाट करून देत त्या जिन्यात उभ्याच राहिल्या.
"हा एक बरा वाटला होता बाकीच्या हिन्दी पंजाबी कार्ट्यांपेक्षा! काही नाही. सगळी पोरं एकाच माळेचे मणी, शिंग फुटली की लहान नाही न मोठं नाही..."

"हे काय चाललय?" स्वत:शीच विचार करत अनूने हतबल हो‌ऊन समोरच्या फॅमिली पोर्ट्रेटकडे बघितल. न राहवून तिनं मिलिंदाला फोन लावला. "मिलिंद", तिचा कातर आवाज ऐकुन मिलिंदच म्हणाला "काय झाल अनु? काही प्रॉब्लेम आहे का?"
"अरे, तू येच आता. चिकन्ना अगदीच वेड्यासारखाच करतोय रे. आज.. आज.. काही न खाता पीता...." आणि अनू रडू लागली.
"अग, या वयात मुलगे थोडे विचित्र वागतातच. ये‌ईल थोड्याच वेळात भूक भूक करत. एवढ्यासाठी इतकं काय रडतेस? तू म्हणजे ना...".
"अरे तितकं कळतय रे मला. हे वेगळय. काहीतरी खूप बिनसलंय. माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये तो... माझा... माझा... हात झिडकारून..."
हे ऐकल्यावर मात्र, मिलिंदला काळजी वाटली. मिळेल त्या फ्ला‌ईटने येतो अस तिला कसं बसं समजावून त्याने फोन ठेवला.

अरे.... दोन दिवसांपूर्वी जेव्हा फोन झाला तेव्हा अनू काही म्हणाली नव्हती. आणि त्यानंतर त्याच्याशीच नाहीका बोललो? तेव्हा तर काहीच जाणवल नाही. काय झालं असेल?
चिकन्ना एक सरळ नॉर्मल मुलगा! त्याच्या इतर मित्रांच्या मुलांसारखाच या वयात थोडा मूडी झाला होता, पण एकूण गडी खेळकर, लाघवी. सहज कोणालाही माया लावणारा.
मिलिंदाने न राहवून रूपकच्या मोबा‌ईल ला फोन लावला. रिंग वाजली पण त्याने कट केल्याच मिलिंदाच्या लक्षात आल आणि त्याच्या मनात चर्र झाल. तरीही त्याने परत एकदा फोन फिरवला.. आता मात्र तो सरळ मेसेज बँकला गेला. कसाबसा आवाजात सहजपणा आणून मिलिंदने निरोप ठेवला. "अबे ओ चिकणे, क्या बात है? क्या चल रहा है बाप के पीठ पीछे? आ? ए, यार त्या वेडाबा‌ईला एक फोन कर बाबा... तू ठीक आहेस म्हणून. फोकट मे मेरा दिमाग खा रही है तेरी अम्मा". आणि रोखलेला अस्वस्थ नि:श्वास ऐकू जाण्या‌आधी त्याने फोन ठेवला.

विचारांच्या तंद्रीत एकटक तिघांच्या त्या फोटोकडे पहाणार्‍या अनुच्या डोळ्यात फोटोवरूनच परावर्तित झालेली संध्याकाळची किरणं गेल्याने ती भानावर आली.
किती वेळ बसलोय आपण असे? असा विचार करत अनूने उठून तोंड धुतलं आणि देवापुढे दिवा लावला. तिच्या एकाही फोनला चिकन्ना ने परत कॉल केला नव्हता. पण तिचं मन सांगत होतं की तो ठीक आहे. रागा‌ऊन गेलाय कशानंतरी, इतकच. "देवा, माझ्या ह्या एकुलत्या एक लेका..." सण्णदिशी चटका बसावा तसा, तिच्या मनात एक विचार आला आणि अनू धसकली.
"खरंच का तेच कारण असेल?" ती जितका विचार करू लागली, तितकी तिची खात्री झाली. "होय, तेच कारण. पण कोण करेल असं? इथे तर कुणालाच माहीत नाहीये. तिथून, मुंब‌ई वरून त्याला फोन करून कोण सांगेल? कुणाशीच आपलं वैर नाही..... मग?"
"कोणी का सांगेना, पण त्याला हे आपल्याकडूनच कळायल हवं होतं. हे कधीतरी चिकन्नाला सांगावच लागणार होतं."
****************************************
"........तो त्यांचा दत्तक मुलगा आहे".
हे वाक्य मनातल्या मनात बोलतानाही सभोवतीची हवा जड झाल्यासारखा तिचा श्वास झाला. अनूच्या पायतलं त्राण गेल्यासारखं झालं. ओट्याचा आधार सोडून, जवळच्याच डायनिंग खुर्चीवर ती कशीबशी बसली.
"कुठुनतरी कळण्या‌आधी ती आणि मिलिंदा, त्याला सांगणारच होते. पण त्याची बारावीची परिक्षा झाल्यानंतर म्हणजे येत्या चार महिन्यातच. टाळून चालणारच नव्हतं. सगळ ठरवलं होतं दोघांनी. त्याला जवळ बसवून सगळं सगळं सांगणार होते. त्याच्या आ‌ई, वडीलांचं गाव, आज्जीचं घर.... अगदी काही काही लपवून ठेवायचं नव्हतं."

अनू आणि मिलिंद आपापल्या घरात एकुलते एकच. त्यामुळे दोनतरी मुलं हवीतच असा दोघांचाही पक्का विचार. मग, मिलिंदला क्रिकेटची आवड म्हणून एक अख्खी टीमच हवी, किंवा अनूसारख्या किमान दोनतरी वेडाबा‌ई हव्यात, डोक पूर्ण ३६० अंशात फिरवायला, असली चिडवाचिडवी चालायची. पण जेव्हा ४-५ वर्षांत हे नक्की झालं की अनूला मूलच हो‌ऊ शकणार नाही, तेव्हा ती कोसळलीच. एका प्रचंड डिप्रेशनमधून तिला बाहेर काढायला मिलिंदला खूप खूप प्रयत्न करावे लागले. अनू मग थोडी हळवीच बनली ह्या विषयात.

मिलिंदच्या आ‌ईने प्रथम विषय काढला दत्तक घेण्याबद्दल, अनूकडेच. मिलिंदला घरात आणखी गुंतागोंधळ नको होता घरात. तो तर ऐकूनच घ्यायला तयार नव्हता, या विषयावरचं काहीही. मिलिंदच्या आ‌ई बर्‍याच समाजकार्यरत होत्या. अनाथालयासारख्या ठिकाणी काम केल्याने असल्या केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. जोडपी, आणि दत्तक बाळ एक छानसं घरटं फुलवत असल्याचं पाहिलं होतं.

मिलिंद का कोण जाणे, वर वर तरी तसा ठीक वाटत होता, त्याने हे स्वीकारलेलं दिसत होत, पण अनूची तगमग आ‌ईंना पाहवली नाही. अगदी धीर करून त्यांनी तिला विचारलं. आश्चर्य म्हणजे, थोड्या विचारानंतर तर अनू जवळ जवळ हट्टच धरून बसली.

"अनू, आपल्याला आपण दोघं आहोत ना? शिवाय तुझे, माझे आ‌ईबाबा? ती सुद्धा लहान मुलंच होणारेत अजून काही वर्षांनी. आपल्यालाच बघायचय त्यांचं सगळं."
"अनू, हे असं दुसऱ्याचं मूल आणून वाढवायचं नको वाटत राणी, आपण लळा लावायचा आणि एक दिवस त्याला काही झालं तर आपलंच मन आपल्याला खाणार... दुसर्‍याचं मूल आपण वाया घालवलं"
"ए, आपण एकच का, तीन-चार मुलांच्या सगळ्या शिक्षणाची वगैरे खर्च करू, तू म्हणशील तर अगदी पोस्ट ग्रॅज्यु‌एशन, सुद्धा. मुली असतील तर लग्नही करून देवू. मी स्वत: कन्यादान करेन, तुला वचन देतो हव तर तसं. पण घरात आणून... डोन्ट कॉम्प्लिकेट थिंग्ज."
"अनू, माझं ऐक. आ‌ईबरोबर, बाहेर माणसांत जायला लाग. थोडं तिच्याबरोबर किंवा तुला हवंतर स्वतंत्र काम करायला लाग. बघ, तुझे विचार बदलतील. एकदा मन रमवायला शिकलीस ना की, तुला सवय हो‌ईल."
"भलता हट्ट नकोय मला. मूल नसलेली जोडपी लगेच दत्तक घेत सुटत नाहीत. उगीच माझी आ‌ई काहीतरी डोक्यात भरवतेय आणि तू...."
"अनघा, मोठं झाल्यावर तरी त्याला कळेलच की नाही? कळेल कशाला, आपल्यालाच सागावं लागेल... तेव्हा निघून गेला तर? मला नाही सहन होणार ते. मग रडत बसशील, मी आधीच सांगून ठेवतोय.... "

एक ना दोन, वेगवेगळ्या वेळी, हर प्रकारांनी मिलिंदने तिला आणि घरातल्यांना समजवायचा प्रयत्न केला.

स्वत:शीच विचार करून करून तर तो अतिशय थकून जायचा. "दत्तक मूल घ्यायचं म्हणजे नक्की काय? नक्की किती वेगळं असणार आपलं पितृत्व?" एका नवीन, अनोळखी वाटेने, डोळे बांधून ने‌ऊन वाळवंटात कुठेतरी सोडून दिल्यासारखं, पायाखालची जमीन काढून घेतल्यासारखं त्याला वाटायचं. मग सुरू व्हायचे प्रश्न, अधिक आणि नवीन नवीन प्रश्न.

"घरातले सगळे चूक आहेत का? आपलं नसलेलं मूल हे एक "रुबिक क्यूब’ सारख का समजतोय आपण? त्याच्या सगळ्याच बाजूंवरचे सगळेच चौकोन एक एक कोडं बनून येणार की काय?
पण मग आपल्या रक्ताचं मूल तरी जन्मताच आपल्याला किती माहीत असतं? कितीतरी मुलं केवढी आ‌ई-बापांपेक्षा वेगळीच होतात?
बरं, मूल आपलं असतं म्हणजे नक्की काय? त्याच्या कोणत्या गोष्टी आपल्या कडून आलेल्या म्हणुन गृहीत धरतो आपण?"
"एक बाप म्हणून आपण नक्कीच समर्थ आहोत मूल वाढवायला. पण, ते आपल्या स्वत:च्या मुलाचे. दुसर्‍याच्या मुलाचे समर्थ बाप आपण हो‌ऊ शकू का? की कमी पडू? हक्क समजून एक चापटी लगावताना आपला हात आखडेल? "

हे "आपलं" आणि "दुसर्‍याचं" हा काय फरक आहे? का म्हणतोय आपण असं? आपलं मूल तरी खरोखर "आपलं" कधी होत? आपण आपलं म्हणतो म्हणून आपलं? नाहीतर कधीतरी ते आपलं होतं का?
ज्यांची उत्तरं फक्त काळच दे‌ऊ शकतो अशा अनेकानेक प्रश्नांचा नुसता गुंता. उत्तर कुठे नाहीच एका प्रश्नातून हजार नवीन प्रश्न. मिलिंदला, आपल डोकं विचार करून करून फुटणार असं वाटायला लागलं होतं.

शेवटी अनू आणि घरच्यांपुढे हार मानून तो तान्ह्या रूपकला बघायला अनाथालयत गेला होता. पांढर्‍या स्वच्छ कपड्यात गुंडाळलेला महिन्याचा रूपक दा‌ईने अनूच्या हाती दिला. थरथरत त्याला आणि स्वत:ला संभाळणार्‍या अनूला आधार देताना त्याने कधी दोघांना कवेत घेतलं त्याच त्यालाच कळलं नाही.
****************************************

रूपक एका अस्सल पंजाबी कुटुंबातला मुलगा. अपघातात तरूण मुलगा गेला आणि त्या धक्क्याने खचलेली सून बाळंतपणानंतर महिनाभर सुद्धा जगली नाही. कुणी तसं जवळचं नातेवा‌ईक नसल्याने, स्वत:च क्षयाने आजारी असलेल्या दादी मा ने त्याला गुरगावच्याच अनाथालयात आणलं. अनू-मिलिंदाचं घरटं त्याला मिळाल्याचं बघून स्वत: काही महिन्यांतच गेली सुद्धा.
मिलिंदने त्यांचं सगळ अगदी रीतीप्रमाणे केलं. येताना तो रूपकच्या आ‌ई-बाबांच्या काही वस्तू गोळा करून घे‌ऊन आला. त्यात त्याच्या आ‌ई-वडिलांचा त्यांच्या लग्नातला फोटो, शेतावरल्या घराचा फोटो, आज्जीचा चष्मा, रूपकचा गळ्यातला ता‌ईत इ. वस्तू होत्या. अतिशय जड मनानं अनूनं ते एका पेटीत घालून कपाटात खूप खूप मागे ठेवून दिलं.

मिलिंद आणि अनूचं एका बाबतीत मात्र एकमत होतं. थोडातरी त्याला त्याच्या "मातीचा" संपर्क हवा. म्हणून आणि शिवाय उगीच त्याला कुणाकडून वेड्या वाकड्या शब्दांत काही कळू नये म्हणूनही, इतर नातेवा‌ईकांपासून दूर, गुरगावच्या जवळच एका नवीन कॉलनीत ते रहायला गेले. तसे अगदी जवळचे नातेसंबंध छान टिकवले होते... मात्र समजदार नातीच. शक्यतो लग्न, मुंजी सारखी मोठे घरगुती कार्यक्रम ते टाळायचे. न जाणो, त्याला कुणी काही बोललं तर?

त्यावेळी शेजारी रहणार्‍या छोट्या हिरण्याने रूपकला दिलेलं नाव - "चिन्न कान्हा"- "छोटा कान्हा". त्याचं वापरून वापरून झालेल, ’चिकन्ना’. तेच म्हणायची सगळी घरची माणसं.

रुपक योगायोगाने दिसायला आणि तब्येतीनेसुद्धा मिलिंदासारखा. मूळचा गोरा, पण खेळून सावळलेला तजेलदार रंग, त्याच्या वयापेक्षा दोन वर्षांनी मोठा दाखवणारी उन्ची, खेळताना हनुवटीला झालेल्या जखमेचा एक छोटुकला व्रण, हल्लीच मित्रांच्या नादाला लागून आणि बाबाला लाडीगोडी लावून केलेला क्रॉप कट.
अनूच्या शेजारणी वगैरे म्हणायच्याही, "ये तो पूरा का पूरा बाप पे गया है. माका कुछ तो लिया होता?" अनूच्या काळजात एक कळ उमटायचीच. चिकन्ना किती परिमल सारखा, त्याच्या आ‌ईसारखा दिसतो ते तिचं तिलाच माहीत होतं. त्याला सरा‌ईतासारखं भांगडा नाचताना पाहून मिलिंदला "रुबिक क्यूब" चे न जोडणारे चौकोन आठवायचे.

पण मग, तो अनूसारखाच छुंदा खायचा, भाजी‌इतका घे‌ऊन. तिच्यासारखेच वेगवेगळे नवीन पदार्थ चाखायला आवडायचे त्याला. मिलिंदाच्या बाबांसारखं बुद्धीबळ खेळायचा छान आणि अनूच्या पप्पांसारखाच त्याला इतिहास, उत्खनन असल्या विषयाची भयंकर आवड होती. दोन्ही आज्ज्यांशी मस्तं मराठीत बोलणं चालायचं.
पण.... मिलिंदासारखीच बासरी धरून गच्चीच्या दारात उभा राहून तो धून वाजवू लागला, की सगळी खळबळ शांत व्हायची मनातली. - हा आपलाच, अगदी आपल्या दोघांच्या काळजाचा तुकडा! अनू अणि मिलिंद अगदी कृतकृत्य व्हायचे.
*****************************************

फोनची रिंग वाजली तशी अनू धावलीच. "चिकन्ना..."
"आन्टी, करतार बोलता, जी. रूप मेरे साथ ...." त्याला वाक्यही पूर्ण न करू देता अनू जवळ जवळ ओरडलीच,
"करतार क्या हु‌आ है उसे? कैसा है? उसे फोन दे दो, प्लीज".
"आन्टी, सो रहा है। घबरानेकी को‌ई बात नही जी, थोडा डिस्टर्ब लग रहा है, लेकिन मेरा पूरा ध्यान है उसपर"
मग थोडकं चाचरतच म्हणाला "मैणू घर नही जाणा, मेरा को‌ई घर-वर नही ऐसा कुछ पागल जैसा बोल रहा था. डोण्ट वरी आंटी, अम्मा ने खाना खिला दिया है जबरदस्तीसे।"
अनूच्या डोळ्यांना धारा लागल्या तो पर्यंत.
"अब जाके उठ्ठेगा, तब उसका मूड्-वूड देखके, फिरसे फोन करुंगा जी। और अंकल आये, तो कहना के फोन करे, बावुजीको। फोन नंबर है उनके पास"
थोडं थांबून पुढे बोलला "गुरुपर भरोसा रख्खे आंटी, जो कुछ है, सब वोह सम्हाल लेंगे. सत श्री अकाल, आंटी।"

खात्रीच झाली आता अनूची. दुसरं तिसरं काही नाही. तेच. त्याला अनाथालयातून उचलून आणलाय, तो माझ्या पोटचा नाही... हेच कळलय त्याला...
थोड्या वेळातच पोचतो अस सांगायला मिलिंदचा फोन आला तेव्हा अनूने त्याला सगळं सांगितलं. मिलिंद जरी काही म्हणाला नाही तरी, राहून राहून तिला मिलिंदची सगळी वक्तव्य आठवली. किती परोपरीने सांगत होता तो, दत्तक मूल नकोच.
*****************************************
हे सगळ एकटीने सहन करण्याच्या पलीकडचं झालं होत, अनूला. अस्वस्थपणे ती येरझारा घालू लागली. बरीच रात्र हो‌ऊन गेली होती. करतारचा फोन आल्यावर जरा जीवात जीव आला तिच्या. अगदीच उपाशी तापाशी कुठेतरी नाहीये. या वयात क्षुल्लक कारणासाठी डोक्यात राख घालून मुलांनी घर सोडलेली एक दोन उदाहरणं तिला माहीत होती. हे तर काय, मोठ्ठच कारण.
या क्षणी आपला लेक काय विचार करत असेल? आपला विश्वासघात केल्याबद्दल किती घृणा वाटत असेल त्याला आपल्याबद्दल...... अनूच्या पोटात तुटलं. आपल्या आ‌ईपणावरंच कुणीतरी घाव घालून घालून त्याचे तुकडे तुकडे करतंय असं वाटु लागलं तिला. आधारासाठी आपो‌आप तिचे पाय रूपकच्या खोलीकडे वळले.

नेहमी त्याच्या पसार्‍याबद्दल त्याला रागावणारी अनू नि:शब्द उभी राहिली त्याच्या खोलीच्या दारात. ठा‌ई ठा‌ई विखुरलेल्या त्याच्या वस्तूंमध्ये तिला तिचा हरवलेला ’छोटा कृष्ण’ दिसत होता.
अभ्यास करता करता मध्येच उठून गाणी लावणं किंवा बास्केट बॉल घे‌ऊन घरभर धबा धबा करत धावणं. कधी बासरी घे‌ऊन एखाद्या नवीन गाण्याची धून वाजवायची खटपट. छोट्या पुस्तकांच्या शेल्फ़ वर ओला टॉवेल वाळत घालायचा अन दरवाज्यावर मात्रं वाळत घातल्या सारखं पुस्तक! बसल्या बसल्या चॉकलेटं खा‌ऊन त्यांच्या चांद्यांच्या भावल्या बनवून खोलीभर पसारा करायचा. अंगात आल्यासारखं नुसता व्यायामच करत सुटणं आणि मग घामाने गिच्च अंगाने तिला मिठी मारण्याची धमकी देणं.... अनूला हसू आलं ते आठवून.

त्यानं कालवलेला भाताचा घास घेण्याचा आग्रह... तुझ्यापेक्षा मी छान कालवतोय म्हणंत, आणि परिक्षेच्या वेळी, तिला अपरात्री उठवूनं तुझ्या हातची कॉफी हवी म्हणंत जांभया देत ओट्यावरच बसकण मारणं.
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला छानशा सिनेमाची दोन तिकिट बाबाच्या हातावर ठेवून, डोळा मारणं. तिला आग्रह करून करून नव्या फॅशनचे पंजाबी कुरता-लेहेंगा घालायला लावणं.

कधी मित्र मैत्रिणी जमवून हाssss धागडधिंगा!
गाणी, भेंड्या..... अनू परत हसली. हो, अंताक्षरी म्हणायचं! भेंड्या काय भेंड्या? त्याच्या गाण्यांच्या, भांगड्याच्या प्रॅक्टिसेस.... सगळ्या मित्रांनी मिळुन स्वयंपाकघरात घातलेले गोंधळ अन मग, अनू घरी येण्या‌आधी बाप-लेकाने गडबडीने केलेली स्वच्छता. बर्‍याचशा गोष्टींचं काय करायचं माहीत नसल्याने सरळ फेकून दे‌ऊन "स्वच्छ" केलं होतं किचन त्यांनी.
तर्‍हेतर्‍हेचं करून खायला आवडायचं. मग नारळ खवून द्यायचा पण कांदा कापायला किती रडारड चालायची? त्याचं कधीतरी मूड ये‌ऊन, त्याच्या मते "मस्त" नूडल्स बनवून चॉपस्टिक्सनी तिला खायला लावणं, आणि तिची त्रेधा बघत मनसोक्त हसणं.

त्याचं हसणं आठवून अनू कळवळली.
काय झालं हे? कसं सावरायचं? आपलं ऐकेल तो? त्याचं रागावणं, रुसणं, अबोला, हट्ट, हसणं, एक ना दोन.... सगळं सगळं तिच्या भोवती फिरू लागलं. त्याची टेबलावरच ठेवलेली बासरी हातात घे‌ऊन कुरवाळत ती खोलीच्या दाराशीच बसली.

अशी किती वेळ बसली होती तिच तिलाच कळलं नाही. पण, पहाटे कधीतरी किल्लीने दार उघडून घरात आलेल्या मिलिंदला ती तशी शांत बसलेली दिसली.

चिकन्नाच्या आ‌ई, वडील, आज्जी यांच्या जमवून ठेवलेल्या वस्तुंची ती बॉक्स समोर घे‌ऊन बसली होती. आपल्याला बघून परत किती रडेल नि, तिला कसं कसं समजवावं लागेल ह्याच विचारात मिलिंद होता. हिला खूपच मोठ्ठा धक्का बसलाय...
तो हळूच तिच्याजवळ बसत हळव्या आणि हलत्या स्वरात म्हणाला, "अनू, तू आधी काळजी करू नकोस बघू. आपण करू काहीतरी. अग, असं काय करतेस.... "
त्याला वाक्यही पूर करू न देता अनूनं त्यालाच जवळ घेतलं आणि म्हणाली, "अरे, मी ठीकय आता. तू माझी जरा सुद्धा काळजी करू नकोस. काही खाल्ला-प्याला आहेस का?" त्यानं डोलावलेल्या मानेकडे बघून तिनं जवळच पडलेला बास्केटबॉल उचलला.

"सतरा वर्षांपुर्वी आपण हे छोट गाठोडं घरी आणलं, आठवतं? किती नर्व्हस झाला होतास तू? मी तरी काय? मलासुद्धा काही काही माहित नव्हतं. सासूबा‌ई, आ‌ई, बाबा, पप्पा, किती मदत केली रे सगळ्यांनी? कसा जपलाय त्याला आपण आणि कशा कशा पासून? मलातर अजूनही खरंच वाटत नाहीये की ते पिल्लू मोठही झालंय आणि त्याला पंखही फुटलेत. आपली मुलं आपल्यासाठी मोठी होतच नाहीत की काय?".

ही बोलतेय तर तिला बोलू द्यावी म्हणजे मोकळी हो‌ईल अस म्हणून मिलिंद ऐकत होता.
"इतका कसा रे हा डोक्यात राख घालून घेतोय? सांगणारच होतो ना आपण त्याला? उलट त्याची त्याच्या मातीशी अगदीच नाळ तुटू नये म्हणून आपण आपली मुळं तोडून इथे ये‌ऊन राहिलो.
तू तर त्याच्या आ‌ई वडिलांबद्दल किती, काय काय जमवून ठेवलयंस? पेपरमधली, त्यांच्या अपघाताची कात्रणं, त्याच्या वडिलांनी त्यांच्या लहानपणी हॉकीत मिळवलेला कप आणि असंच काय काय."

"त्याच्यापासून लपवून ठेवायचं नव्हतं रे कधीच, आपल्याला. मला वाटायचं की, कधी सांगायचं आपण त्याला हे सगळ? कसं कळणार आपल्याला की, किती मोठा झाल्यावर हे भूतकाळाचं ओझ पेलू शकेल आपलं लेकरू?"

बॉल बाजूला ठेवत तिनं परत बासरी हातात घेतली.
"मला किन‌ई अनेक वर्षं वाटायचं आपण काहीतरी हिरावून घेतोय म्हणून. म्हणजे रूपकला त्याच्या आ‌ईपासून, त्याच्या मुळ ’तो असण्यापासून’. अपराधीच वाटायचं, अरे. ’आपल्या आ‌ईपणासाठी काय करतोय आपण?’ असं सारखं स्वत:ला तपासायची मी.
पण आज खूप विचार केल्यावर जाणवलं की, आपण काहीही हिरावून घेतलं नाहीये त्याच्यापासून किंवा कुणाकडुनच. उलट चिकन्नाला त्याचं हक्काचं गोकूळ मिळवून दिलं. परिमलने त्याला जन्म दिला... त्याची देवकी झाली ती. पण मग मी यशोदा नाही का त्याची?"

नकळत बासरी हळुवारपणे पदराने पुसत ती म्हणाली, "उत्तम आ‌ई-वडील होण्याचे का क्लासेस असतात? यशोदा कुणाकडे शिकली? सोप्पं नाहीये हे सगळं. अगदी अगदी ओल्या मातीचा एक गोळा आपल्या हाती येतो काय, आणि आपण एकदम "आ‌ई वडील" होतो! त्याला थापटत, थोपटत आतून बाहेरून आधार देत देत एक सुबक "माणूस" बनवायचं. त्यात आपणही घडतोच की नाही? मुलगा, मुलगी काही वेगळ नसतं, रे. आपल्या आ‌ई, पप्पा, सासूबा‌ई, बाबांना विचारून बघ एकमत आहे सगळ्यांच. खस्ता सारख्याच, काळज्या सारख्याच, तसेच जिवाचं पाणी करणारे प्रसंग, आणि वेड लावणारे आनंदही, तसेच. पहिलं पा‌ऊल आणि पहिलं खरचटणं, पहिला दात, पहिला घास, पहिला नंबर आणि मित्र-मैत्रिणीशी पहिलं भांडण! मुलाचं अन मुलीचं काही वेगळं नाही."

"माझी तर खात्रीच झालीये. जगातल्या सगळ्या आ‌ई-वडिलांचं हेच एक काम एक कृष्ण द्यायचा परत या जगाला. आपला म्हणून वाढवायचा आणि जगाचा म्हणून परत द्यायचा. मग गोकूळात राहिला काय, मथुरेत राहिला काय, आपलाच की तो!"
असं म्हणून तिनं मिलिंदाच्या नजरेला नजर मिळवली. तिच्या नजरेत चकाकणारे आत्मविश्वासाचे मोती बघून त्याला काय म्हणावं तेच सुचेना. नुसतंच पाणावलेल्या डोळ्यांनी "अनू" म्हणत त्याने तिच्या बासरी धरल्या हातावर हात ठेवला.

एकमेकांशी शब्दापारचं खूप खूप काही बोलून गेला त्या दोघांचा स्पर्शं. तिचं मातृत्व, त्याचं पितृत्व, दोघांनी रुजवलेला, वाढवलेला हा गोकुळाचा वृक्ष...... त्याला आलेल्या अमृताच्या फुलांची पखरण जागोजाग होती? आपल्या ’आ‌ई वडील’ असण्याचा खरा खरा अर्थ अगदी आत, नव्याने रुजून आल्याचं दोघांनाही जाणवलं.

"चल, आराम करुया आता जरा. सकाळी खूप काही करायचंय आपल्याला. त्या वेड्याला समजवायचंय. त्याच्यात तितकं बळ आलंय हे सगळं पेलायचं. मला माहितीये, आपलं ऐकेलच, तो. अरे, आपलाच मुलगा, कुणी परका का आहे?",
बोलता बोलता त्याच्या खांद्यावर थोपटत उठलेल्या अनूकडे मिलिंद मान वर करून बघत राहिला. आ‌ईपणाचं हे एक समर्थ रूप त्याच्या भरल्या डोळ्यांत मावेना. कुठेतरी त्याचा रूबिक क्यूबही जुळत आल्यासारखा वाटला त्याला. पडलाच असेल एखादा चुकीचा वळसा, तर तिघं मिळून जुळवू सगळे रंग, आहे काय? हं?

समाप्त.

गुलमोहर: 

ही जुन्या मायबोलीवरची कथा. माझी पहिलीवहिली कथा... मायबोलीवरचीच नाही... एकूणच.

ही वाचली होती, मी विचारणारच होते. खूप सही जमली आहे कथा.

अरे हो.. आठवतीय ही कथा! तेव्हा बेहद्द आवडली होती..तेव्हा दाद हे नाव तितकं लक्षात राहीलं नव्हतं( कारण माझ्यासाठी नवीन होतं.. नंतर कळलेच दादचे लेखन काय असते.. ! Happy ) पण रुबिक क्युब आणि कृष्ण हे अफलातून नाव अजुन लक्षात आहे!! सहीच.. आण सगळ्या कथा!

कथा छानच आहे. पण एक कुतुहल म्हणुन विचारते, अनाथालयाचे संचालक्/कर्मचारी पहीली काही वर्ष घरी भेट देऊन बाळाची वाढ, संगोपन बघत असतात आणि पालकांनी अगदी लहान असतानाच म्हणजे ३-४ वर्षाचं असतानाच मुलांना कृष्णाची गोष्ट सांगुन ते "दत्तक" बालक आहेत हे त्यांना समजेल अशा भाषेत सांगाव अस सांगतात. (हे ऐकीव माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीतले, तिने मुलगी दत्तक घेतली आहे) तर खरच पालक इतकी वर्ष लपवुन ठेवु शकतात का? म्हणजे त्यांची स्वतःची नी त्यांची पिल्लुची मानसीक तयारी होत नसेल हे खरे पण अस लपवुन ठेवण शक्य आहे का? म्हणजे पुन्हा त्याबाबतीत अनाथालय काही follow up करत नाही का?

दाद - हे सगळ कथा वाचली म्हणुन पडलेले प्रश्न आहेत पण कथेच्या आवडी/निवडीशी ह्यांचा संबंध नाही. परत एकदा सांगते, कथा परिणाम कारक आहे, मला त्यातला शेवटचा परिच्छेद ज्यात "आई" ""माझी तर खात्रीच झालीये. जगातल्या सगळ्या आ‌ई-वडिलांचं हेच एक काम एक कृष्ण द्यायचा परत या जगाला. आपला म्हणून वाढवायचा आणि जगाचा म्हणून परत द्यायचा. मग गोकूळात राहिला काय, मथुरेत राहिला काय, आपलाच की तो!" अस म्हणते तो खुपच भावला.

खरच आई वडिलान्च भावविश्व अगदी समर्थपणे व्यक्त केलत......
धन्यवाद दाद, मनापासून मनापर्यत!
Happy

क्लासच!! >>जगातल्या सगळ्या आ‌ई-वडिलांचं हेच एक काम एक कृष्ण द्यायचा परत या जगाला. आपला म्हणून वाढवायचा आणि जगाचा म्हणून परत द्यायचा. मग गोकूळात राहिला काय, मथुरेत राहिला काय, आपलाच की तो!">> मी तुला मागे म्हटलं तसं.. हा या कथेचा गाभा!
पहिल्या कथेपासूनच इतकं भारी लिहीत होतीस? मानलं तुला. Happy

-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

दाद, काय लिहील आहेस ग ..सहिच !!!!!!!!!!!!!!!!!! Happy

मला आवडते ही कथा... वाचायला काही नसले की मी जुन्या माबोवरच्या कथा वाचत असते, ही त्यापैकी एक. गेल्या आठवड्यातच वाचली होती.

>>ही जुन्या मायबोलीवरची कथा. माझी पहिलीवहिली कथा... मायबोलीवरचीच नाही... एकूणच.

हे पटतच नाही.. एवढं सहही आहे !! विषयाची हाताळणी तर अप्रतिमच म्हणायला हवे... दाद ची पोस्ट दिसली कि वाचायचा मोह टाळुच शकत नाही मी...

तेव्हाही खुप आवडली होती आणि आताही...
--------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

दाद,
सुरेख कथा आहे ही !
रुबिक क्युब आणि कृष्ण हे शिर्षक पाहुन आधी काहीच कळाले नव्हते !
त्यात 'चिकन्ना' हे नांव पण.......पुढेपुढे वाचत गेलो ते त्यामुळेच.....!
खूप भावस्पर्शी कथा! आवडली Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

दाद! तुझ लिखाण भावल नाहि अस झालय कधि! आवडल..

सगळ्याच कथा पुन्हा पुन्हा पोस्ट केल्यास तरी मी त्या पुन्हा पुन्हा नव्याने वाचेन... Happy

शीर्षकावरुन कळलंच की आधी ही कथा वाचली आहे म्हणून.. असो. पुन्हा एकदा, दाद, छान आहे कथा.

ही जुन्या मायबोलीवरची कथा. माझी पहिलीवहिली कथा... मायबोलीवरचीच नाही... एकूणच.>>

खरंच पटत नाही. खुप छान लिहलं आहेस. थेट भिडतय काळजाला !!
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

काय लिहिली आहेस दाद! पुन्हा एकदा डोळ्यातून पाणी काढलंस! तू लिहिलेली माझी सर्वात आवडती कथा आहे ही..
-----------------------------------
Its all in your mind!

धन्यवाद. जुन्या मायबोलीवरची कथा इथे परत देऊ का नको अशा दुग्ध्यात होते. दोघा-तिघांनी विचारल्यामुळे धाडस केलं.
माझा लिहिण्यातला नवखेपणा नक्की दिसून येतोय, नाही? (म्हणजे आता सरावले असं नाही. बरेच विषय हाताळायचं धाडस होत नाही)... पण माझीही ही सगळ्यात आवडती... अजूनतरी. खूप अवघड नातं आहे हे दत्तक पालक्-पाल्याचं.
अल्पना, सत्यजीत.... Happy

कविता, प्रश्नं "टेक्निकल" आहे. ज्या पालकांना हे लपवून ठेवायचय ते ठेऊ शकतील का? होयही आणि नाहीही. ही कथा माझ्या आधीच्या पिढीत धरली तर? कदाचित शक्य आहे. आताच्या दिवसात कदाचित नाही. मी कथा लिहिताना हा विचार केला नव्हता. मला वाटतं, पालकांना ते शक्य आहे असं धरून चालूया... ह्या कथेपुरतं.

नाव वाचल्यावर ओळखिची वाटली, वाचायला लागले अन् परत वाचत गेले खुपच हळवि आहे आणि खुप सुंदर

सुरेख कथा दाद. जुन्या माबोवरच्या सगळ्या कथा आणा इथे.. Happy

दाद, अतिशय आवडल ............. फ़ार मस्त आहे नेहमीप्रमाणेच ..........

फारच छान कथा... आधी नावामुळे लक्ष गेले आणी मग दाद ची म्हणल्यावर लगेच वाचायला सुरू केली.
दाद्...प्लीज आधीच्या सगळ्या कथा एथे आणा म्हणजे माझ्यासारख्या नवीन लोकाना पण वाचायला मिळतील.
फुलराणी.

दाद!!! Happy

जुन्या मायबोलीवर वाचली होती. त्यानंतर वाचलेली 'स्पर्धा'...... पण 'नक्श फरीयादी है' सारखं जीव ओवाळून टाकावा असं लिखाण तुझं बर्‍याच दिवसात वाचलेलं नाहीये.. माझी ही एक फर्माईश पूर्ण कर.. प्लिज. Happy

प्लीज आधीच्या सगळ्या कथा एथे आणा म्हणजे माझ्यासारख्या नवीन लोकाना पण वाचायला मिळतील. अनुमोदन

पहिली कथा आवडली Happy

एकदम मस्त काळजाला भिडनारी........
सचिन

मस्त दाद!!! कथा वाचल्यावर , खास करुन शेवटचे अनुचं बोलणं वाचुन तर शिर्षकावर फिदा आपण!!:)

superb!!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

मस्त दाद!!! कथा वाचल्यावर , खास करुन शेवटचे अनुचं बोलणं वाचुन तर शिर्षकावर एकदम फिदा आपण Happy

superb!!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

शलाका ताइ....आणखी एक मास्टरपीस.....
खुप सुंदर.... Happy
....................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

Pages