लज्जास्पद संस्कृती - सावीपूर

Submitted by बेफ़िकीर on 21 November, 2011 - 02:31

"बप्पा .... थंकल... थंकल्ल..."

तीन वर्षांची चिमु रामकाकांकडे अपेक्षेने पाहात होती. भव्य घरातील शिवलिंगावर अभिषेकपात्र भरून ठेवल्यावर दूधमिश्रीत पाण्याची धार सुरू झाली की ताटकळत बसलेली चिमू उठायची आणि चिमुकले हात जोडून म्हणायची 'थंकल बप्पा'! आणि मग रामकाका समजावणीच्या स्वरात म्हणायचे.

"थंकल बप्पा नाही म्हणायचं बाळा.. नीट म्हणा बरं? शं क र.. 'र' म्हण 'र'?

"य"

चिमूला 'र' म्हणता यायचा नाही आणि ती 'य' म्हणाली की रामकाका हसून तिच्या हातावर श्री गणेशाच्या पूजेचे गूळखोबरे आणि महादेवाच्या पूजेचे साखरफुटाणे ठेवायचे. ते अख्खे तोंडात भरून ती आणखीन मागायची आणि आणखीन परत मिळायचे. असे तीन चार वेळा झाले की सुधाबाई तिला उचलून घेऊन जायच्या.

चिमू दोन महिन्याची होती तेव्हा सुधाबाई तिला पदरात लपेटून रामकाकांच्या दारात उभ्या राहिलेल्या होत्या. डोळ्यांना पाण्याची धार लागलेली, कसलंतरी जुनाट लुगडं, अनेक ठिगळांचं पोलकं, गळ्यात काहीही नाही, कपाळावर कुंकू नाही आणि चेहर्‍यावरच्या रडक्या भावातही एक सत्शील अभिमान चमकणारा!

"ताईंच्या हाताशी राहीन, पडेल ते करीन, पदरात लेकरू आहे, ब्राह्मण विधवा आहे मी, मारून हाकलून दिले आहे वपन करायला नाही म्हणाले म्हणून, एका खोपटात मावू आम्ही दोघी, ही चिमा आणि मी, आमच्या उघड्या दु:खावर मोठ्या भावाच्या आधाराचं पांघरूण घाला दादा"

"हं.. तो खोपा आहे बघ... तो साफ करून घे आणि राहा तिथे... मालकीणबाई सांगतील ते ऐकायचं... त्यांनी हाक मारली आणि तुला पोचायला चार पळ जास्त झाले असे होता कामा नये... पोटभर खायला मिळेल, वर्षातून सणासुदीला कपडे आणि वर्षातून चार वेळा पगार... जास्तीत जास्त सुखात राहणे तुझ्या हातांच्या न कंटाळता काम करण्यावर अवलंबून आहे बघ... नांव काय तुझं??"

खरे तर रामकाकांना तिची कीवच आलेली होती. पण अगदीच सुरुवातीपासून गोड बोलले की काही जण सोकावतात हा अनुभव असल्याने ते थोडेसे कडक बोलले इतकेच! जानकी गावात गेलेली होती. तिच्याशी सल्लामसलत करायला वेळही नव्हता. साधारण जानकीच्याच वयाची ही विधवा आहे म्हंटल्यावर जानकीला बरी सोबत होईल अशा विचाराने त्यांनी तात्काळ सुधाला आपल्या भल्या मोठ्या घराच्या अंगणातील एका त्रिकोणी पालासारख्या खोप्यात सामावून घेतले. पुढच्या चार पिढ्या बसून खातील इतके धन पडलेले असताना सुधाच्या प्रवेशाने बिघडणार काहीच नव्हते म्हणा!

"सुधा जोगदेव"... सुधाने स्त्रीसुलभ शैलीने जमीनीकडे पाहात नांव उच्चारले स्वतःचे!

"नवरा कसा गेला?"

"विहिरीत ढकलले दिरांनी"

"क्काय?? मग खटला नाही झाला?"

"नाही, गरीबी आड आली.."

सुधाच्या कहाणीत रामकाकांना फारसे स्वारस्य नव्हतेच, पण जुजबी तरी माहिती असावी या उद्देशाने त्यांनी पुढचा प्रश्न केला.

"आम्ही खटला दाखल केला तर??'

"चिमाचे वडील मिळणार नाहीत"

सुधाच्या सलज्ज पण ठाम आणि कर्ट स्वरात उच्चारलेल्या या विधानाने रामकाका चरकलेच. ही बाई दिसते तितकी सामान्य नसून हिला हिचे स्वतःचे विचार आहेत आणि ती आयुष्याला पूर्णपणे भिन्न दिशा देण्याच्या हेतूने येथे पोचलेली आहे हे त्यांना जाणवले.

वय वर्षे पस्तीसच्या रामकाकांचा देह एखाद्या किल्ल्यासारखा होता. लहानपणापासून तालमीत गेल्यामुळे भरभक्कम झालेले होते ते! घरात रोजचे सकाळ संध्याकाळ मिळून कमीतकमी चाळीस पान व्हायचे. जे कुणी यायचे ते पानावरच बसवले जायचे. मग बाहेरच्या व्हरांड्यात सगळ्यांच्या गप्पा! रामकाका तिथेच दिवसभर बसायचे. संध्याकाळी शेतावर जाऊन यायचे. मोठा धार्मिक माणूस! सकाळी शिवाच्या पूजेशिवाय दुधाचा थेंबही नाही. अजूनही तालीम सुरूच होती, पण घराच्या मागे बांधलेल्या तालमीत! जेथे गावातील अनेक पोरे घुमायची. या पोरांचे आई बाप शेतावर राबायचे. सावीपूरचा एक अन एक माणूस रामकाकांच्या कुटुंबाच्या सहाय्यामुळेच उभा राहिलेला होता.

सावीपूर! सावित्रीदेवीचे अवाढव्य देऊळ असलेले काही हजार लोकसंख्येचे ते लहान गाव! आजूबाजूच्या गावातील लोकही सतत दर्शनाला येत असले तरीही व्यावसायिकीकरण मात्र झालेले नव्हते. स्वातंत्र्यपूर्व काळ तो! साधे लोक होते सगळे! अधूनमधून घोड्यावरून किंवा बग्गीतून एखादा गोरा साहेब जाताना दिसायचा इतकेच!

सावित्रीदेवीची नवरात्रात असलेली पूजा करण्याचा मान परांजपे कुटुंबाकडे गेले कित्येक पिढ्या होता.

काही शतकांपुर्वी बांधल्या गेलेल्या या देवळाचा सातत्याने जीर्णोद्धारही केला जायचा. गावात ब्राह्मणांची घरे इनमीन दहा बारा! पण सर्वच जातीचे आणि काही मुसलमान लोकही या देवीच्या नवरात्राच्या उत्सवाला न चुकता हजर असायचे. कोणी परगावी कामाला असलाच तर तो सुट्टी काढून यायचा.

सावित्रीदेवी हे दैवत नवसाला पावायचे. अशी श्रद्धा तरी होतीच. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरकावर विचार न करणार्‍या माणसांचा तो काळ होता. देवीला नवस बोलून फलप्राप्ती झाली की नवस फेडताना अनेक प्रकार केले जायचे. अगदी शंभर पान घालण्यापासून ते कोंबडे, बकरे येथपर्यंत सर्व काही! बाकीच्या गावांमधील लोकही नवस बोलायचेच.

सावित्रीदेवीच्या पूजेचा मान परांजप्यांना नुसताच मिळायचा नाही. त्या मानाबरोबर अनेक जबाबदार्‍या यायच्या आणि अनेक लाभही! गावातील बरीचशी जमीन त्यांच्याच नावे होती. अडल्यानडल्याला जमेल तशी मदत करणे आणि स्वतःच्या पायावर उभे करणे, गावाच्या विकासासंदर्भातील काही कामे करणे, गावात एकी ठेवणे अशी अनेक कर्तव्ये असायची. या बदल्यात गावातील बराचसा महसूल या ना त्या प्रकारे मिळत राहायचा. दूधदुभते, धान्य, भाजी हे तर स्वतःच्याच घरचे असायचे. पण एक प्रकारची पाटीलकीच असल्याप्रमाणे राबायला शेकडो माणसे, पैसा अडका आणि मानसन्मान मिळत राहायचा.

रामकाका परांजपेंकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजानुसार ही त्यांची दहावी पिढी होती जिच्याकडे सावित्रीदेवीच्या उत्सवाची जबाबदारी व पूजेचा अधिकार व अर्थातच त्यायोगे मिळत राहणारी ही पोझिशनही होती.

महत्वाचे म्हणजे ब्राह्मणांनी परजातीयांचे शोषण करणे हा विचार गावात कोणाच्या मनाला शिवलेलाही नव्हता. परांजपे हे एकच ब्राह्मण कुटुंब प्रचंड श्रीमंत होते. गावातील इतर ब्राह्मण तसे गरीब होते व एक प्रकारे परांजप्यांच्याच सहाय्याने मिळवत होते. परांजपे कुटुंबाने कित्येक दशके गावावर प्रेमाची बरसातच केलेली होती. अर्थातच, स्वतःचा डामडौलही तितक्याच निष्ठेने सांभाळलेलाही होता आणि इतरांना सांभाळायला लावलेलाही होता.

आणि हा डामडौल सांभाळण्याची मुख्य इच्छा घरातील स्त्रियांना अधिक असायची. परांजपेंकडे लग्न करून आलेली बाई ही गावातील प्रतीसावित्री समजली जायची. तिच्या नुसते रस्त्यातून जाण्याला सगळ्यांनी चालणे थांबवून मान तुकवण्याची सलामी मिळायची. तिचा शब्द म्हणजे अंतिम शब्द! हाताशी असंख्य नोकर चाकर! जणु सम्राज्ञीच ती! हाच मानसन्मान खुद्द परांजप्यांनाही असायचाच, पण परांजपे घराण्यातील पुरुष तसे शानशोकीच्या मोहात फारसे पडायचे नाहीत. घराच्या अजस्त्र व्हरांड्यात साथीदारांना किंवा कोणाही आल्यागेलेल्याला जमवून गप्पा मारायच्या आणि गावाचे भले करत राहायचे इतपत त्यांचे विश्व मर्यादीत!

फक्त एकच झालेले होते गेल्या तीन पिढ्यांपासून! ते म्हणजे घरातील प्रमुख स्त्री सवाष्ण गेलेली होती. मग तिची जाऊ असली तर ती स्वतःच्या नवर्‍याबरोबर सावित्रीदेवीच्या पूजेला उभी राहायची आणि आपोआपच मेलेल्या जावेचा मानसन्मान तिला मिळू लागायचा. मेलेल्या जावेचा नवरा हयात असला तरी तो आता केवळ नामधारी व्हायचा आणि त्याचा भाऊ, जो पूजेला उभा राहिला, तो प्रमुख समजला जाऊ लागायचा.

गेल्या तीन पिढ्यांपासून हे असेच होत असल्यामुळे आणि त्यातील पहिल्या दोन पिढ्यांमध्ये दोन दोन भाऊ असल्याने काही प्रश्न निर्माण झालेला नव्हता. पण तिसर्‍या पिढीत, म्हणजे रामकाकांच्या वडिलांच्या पिढीत असे झाले नाही. त्यांना भाऊच नव्हता. सहा बहिणी झाल्या पण भाऊ झाला नाही. सहाही बहिणी जगल्या, सासरी गेल्या, नांदल्या आणि माहेरी येऊन जाऊन खुषीत राहिल्याही! श्रीमंती होतीच! पण रामकाकांना काका नव्हता. आणि रामकाकांची आईही वारली. सवाष्णच! तेव्हा रामकाका दहा वर्षाचे होते.

आजवर दोन भाऊ असल्याने गावकर्‍यांना न भेडसावणारा प्रश्न आता भेडसावू लागला. पुढच्या वर्षापासून पूजा कोण करणार? आणि पूजा झाली नाही तर परांजप्यांमध्ये का राबायचे? देवी कशी नवसाला पावेल? गावाचे भले कसे होईल? आपली राखरांगोळी व्हायला कितीसा वेळ लागणार? परांजप्यांच्या घरात सवाष्ण का टिकत नाही? त्यांच्या घरी लोक मुलगी कशी काय देतील? म्हणजे देवी त्यांच्यावरही कोपलेली असावी. देवीला सावित्रीगाव नकोसे झाले आहे काय?

रामकाकांची आई वारल्यावर गावात चर्चेला ऊत आला होता. आणि ही चर्चाही चक्क पहिल्यांदाच, परांजप्यांच्या व्हरांड्यात न होता गावाच्या वेशीवर झाली होती. आणि दोन अडीच तास चर्चा झाल्यावर जवळपास दिडएकशे लोक चालत रामकाकांच्या वडिलांकडे आलेले होते.

आपले म्हणणे चाचरत चाचरत मांडणार्‍या लोकांच्या मागणीकडे रामकाकांच्या वडिलांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले तसा मात्र मागणीचा जोरही वाढू लागला आणि त्यातील प्रखरताही!

"समजा नाही झाली देवीची पूजा तर काय" असा प्रश्न रामकाकांचे वडील विचारणे केवळ अशक्य होते. एकतर त्यांची स्वतःची नितांत श्रद्धा होतीच, पण गावाच्या भावनाच समजून घेतल्या नाहीत तर हा जमाव हिंसक होऊन आपलेच काहीतरी करेल हेही त्यांच्या लक्षात येत होते. शेवटी त्यांनी ती मागणी मान्य केली.

'दुसरा विवाह करण्याची'

आणि तातडीने एका गरीब ब्राह्मण कुमारिकेशी त्यांचा विवाह करून देण्यात आला. ती होती चौदा वर्षांची! स्वतः रामकाका दहा वर्षांचे आणि त्यांची आई चौदा वर्षांची!

मात्र सावित्रीदेवीला बहुधा हेही मान्य नव्हते. पुढच्या वर्षीचे नवरात्र यायच्या आतच ही कुमारिका - सौभाग्यवती आजारी पडली आणि सातव्या दिवशी तीही वारली.

गाव आणि स्वतः परांजपे कुटुंब नुसतेच दु:खी झाले नाही तर अवाक झाले.

रामकाकांच्या सर्व सहा आत्या माहेरी आल्या. त्यांनी भावाच्या डोक्याला चर्चेने मुंग्या आणल्या. आणि ऐन नवरात्राच्या काही दिवस आधी त्यांनी आणखीन एका लांबच्या गावातील मुलीचे लग्न करून दिले भावाशी! ती मात्र वीस वर्षांची होती आणि ती पूजेला उभी राहिलीही! तिला नंतर लगेचच दिवस गेले आणि पुढचे नवरात्र यायच्या आधी दिड महिना ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. ही स्त्री रामकाकांपेक्षा बर्‍यापैकी मोठी होती व सावत्र आई म्हणून तिची भूमिका पारही पाडत होती. रामकाकांचा तिला काहीसा रागच होता, पण नवर्‍याच्या धाकाने मात्र ती बुजलेली असायची. पुढे ही स्त्री वेडसर झाली, पण ती मेली मात्र नाही. तिचा मुलगा चांगला तरुण वयाचा झाला तेव्हा समजले की तोही वेडसरच आहे. त्याची वेडसर आई रामकाकांच्या वडिलांबरोबर पूजेला उभी राहायची नवरात्रात! तेवढे मात्र नीट करायची. आणि रामकाकांचे लग्न ठरले. ते स्वतः तीस वर्षाचे असताना! जानकी या परगावातील एका खात्यापित्या घरातील सुसंस्कृत मुलीशी!

त्या लग्नानंतर लगेचच वेडी सावत्र आई वारली तेव्हा मात्र गाव हादरले. आणि खुद्द परांजपे कूटुंबीयही! सगळ्यांनाच मनात वाटू लागले की सावित्रीदेवी परांजप्यांच्या घरात सवाष्ण जास्त वेळ टिकू देत नाही.

'परांजप्यांकडे सावित्रीदेवी सवाष्ण टिकू देत नाही'

एक वेडा सावत्र भाऊ, सावत्र आई वारलेली आणि पुढच्याच वर्षी वडीलही वारलेले अशा अवस्थेत एकतीस वर्षाच्या रामकाकांनी गावाची सूत्रे हातात घेतली. मुळात रक्तातच ते सगळे असल्याने त्यांना अवघड गेले नाही. गेली चार वर्षे नक्षत्रासारख्या सुंदर जानकीताई त्यांच्याबरोबर सावित्रीदेवीच्या वार्षिक पूजेला उभ्या राहात होत्या. त्यांना अर्थातच एक काडी इकडची तिकडे करावी लागायची नाही. एकट्या घरातच जवळपास पंधरा नोकर चाकर होते. शेतावर वेगळे आणि मुळात गावच जणू नोकर असल्यासारखे! त्या सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी कारण काढून रोज गावातून फिरून यायच्या बैलगाडीतून! खरे कारण हे असायचे की दुतर्फा लोक थांबतात आणि मान तुकवतात किंवा हात जोडतात हा थाट त्यांना हवासा असायचा. कित्येकदा आपल्या माहेरच्यांना येथे बोलावून त्यांनी हा थाट दाखवलेला होता. त्या माहेरी गेल्या की त्यांना तितक्याच थाटात त्याचमुळे वागवले जायचे.

जानकीताई सुस्वभावी होत्या, नवर्‍याला वचकून असंणार्‍या होत्या पण कामबिम मात्र करायच्या नाहीत. ऐषाअरामात राहायची आवड त्यांना लागलेली होती. घरात रोज चाळीस पान झाले काय आणि रात्री बारा वाजता कुणी जेवायला वाढा म्हणाले काय, त्यांना काहीच घेणेदेणे नसायचे. एकमेव सवाष्ण म्हणून रामकाकाही त्यांचा शब्द खाली पडू द्यायचे नाहीत. पण गावात कुजबूज होऊ लागली. जानकीताई आई होईनात!

ही कुजबूज खुद्द दोघांच्या कानी पडली तरी त्यात त्यांना विशेष काही वाटेना! मात्र हळूहळू जानकीताईंना काहीतरी इतरच वाटू लागले. रामकाकांच्या मनात काहीतरी भलतेच तर नसेल ना असे त्यांना वाटू लागले. बाहेरच्या गप्पा त्या आता कान देऊन ऐकू लागल्या. पण एकंदरीत रामकाका सभ्य गृहस्थ होते. दुसरी बायको करून अणावी असे काही त्यांच्या मनात नाही हे जानकीताईंना समजल्यावर त्याही निर्धास्त झाल्या. पुर्वीप्रमाणेच आनंदात वागू लागल्या. आणि अचानक सुधा या ब्राह्मण विधवेचा घरात प्रवेश झाला. तोही त्या स्वतः घरात नसतानाच! परस्पर रामकाकांनी त्या बाईला घरात राहायची परवानगी दिलेली असल्याने जानकीताईंना काही म्हणताच येईना! कारण नवर्‍यासमोर तर शब्दही उच्चारायची भीती! आणि घरात आजवर कित्येक पिढ्यात एकही ब्राह्मण नोकर ठेवला गेलेला नाही. या विधवेचे हे मूल कुठले? ती अचानक घरात येऊन काम काय करायला लागतीय??

हळूहळू संशयी मनाने त्यांनी सर्व माहिती काढली. त्या विधवेचे काम अगदी लख्ख असायचे. त्यात ती कशालाही नाही म्हणायची नाही. अदब ठेवून वागायची. मागच्याच दाराने ये जा करायची. कोणाला दिसायची नाही. खाली मान घालून वावरायची. हसायचीही नाही. मुलीचे मात्र खूप करायची. तिला खायलाही फार लागायचे नाही. जानकीताईंच्या तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आत तिने ते काम केलेले असायचे. हाक हवेत विरायच्या आत ती खोप्यातून मागच्या दाराने घरात आलेली असायची. तिचा इतिहास समजला तसे जानकीताईंनाही वाईट वाटू लागले तिच्याबद्दल आणि स्वतःच्या संशयी विचारांबद्दल! मग त्यांनी तिला सामावून घेतले. लहानग्या बाळाचे कोडकौतुक करायला सुरुवात केली. त्यांनीच त्या बाळाला चिमू हे नांव दिले. खरे तर चिमू हे काही नांव नव्हे, पण अगदी छोटेखानी बारसेही केले घरातल्याच नोकरांसमोर! त्या आधी सुधा तिला काहीही हाका मारायची.

परांजपे खानदान, सावित्रीदेवी आणि गाव या सर्वातील नियम, अपेक्षा, कर्तव्ये यापासून योजने दूर असलेला तो चिमणा जीव चिमू आता सरळ बाहेरच्या दारातच खेळू लागला. रांगायची, मग चालायला लागली. मग सरळ पुरुष माणसांमध्ये येऊन टकामका बघत असायची. मग कोणीतरी 'ही कोण' असे विचारायचे. मग रामकाका काहीतरी सांगायचे. मग कोणी तिला काहीतरी खाऊ वगैरे द्यायचे. मोठमोठी माणसे आलेली असायची. ती त्या ठिकाणी त्या पिल्लाला पाहून खो खो हसायची. रामकाकांनाही तिचे कौतुक वाटायचे. ती बिनधास्त तेथे टपकलेली पाहून तेही खो खो हसायचे. चिमू बाहेर पोचलेली आहे असे कुणी सुधाला सांगितले की सुधा घाबरून घामाने निथळायची. बाहेर सगळ्यांसमोर जाताही येत नाही आणि चिमूला मागे आणताही येत नाही अशी विचित्र अवस्था व्हायची तिची. ती अवस्था पाहून जानकीताई खदखदून हसायच्या. मग एक जुना म्हातारा नोकर हळूच तिला उचलून सुधाच्या मांडीवर आणून ठेवायचा. सुधा त्या धीट बाळाकडे बघतच बसायची, थोडे रागवायचीही, पण चिमा निरागसपणे खिदळायची. ते खिदळणे पाहून आतमधले सगळेच खिदळायचे आणि सुधाचा राग पळून जायचा.

एकदा रामकाका खुषीत असताना जानकीताईंनी थट्टेच्या स्वरात विचारूनही पाहिले होते.

"मैत्रीण तर नव्हे ना सुधा कोणती जुनी? भारीच माया चिमूची म्हंटलं तुम्हाला"

"बहिणीच्या मुलीवर माया करायला तुमची परवानगी लागते का आमच्या सासरेबुवांची??"

खरे तर रामकाकांनीही थट्टेतच हासत हासत विचारलं होतं! पण एकदम आपल्या वडिलांपर्यंत चर्चा पोचलेली पाहून जानकीताई हादरल्या आणि तोंडाला पदर लावून खाली बघून सुळ्ळकन खाली निघून गेल्या. पुन्हा हा विषय काढून चालणार नाही इतके त्यांना समजले. नाहीतर विजेचा कडकडाट होईल आणि नोकराचाकरांसमोर आत्तापर्यंत मिळवलेली इभ्रत क्षणात धुळीला मिळेल हे त्यांना माहीत होते. मागे एकदा रामकाकांचा दुर्वासावतार त्यांना पाहायला मिळालेला होता.

हळूहळू तिसरेच होऊ लागले. महत्वाच्या चर्चेसाठी किंवा अचानक येऊन टपकणार्‍यांपैकीचे लोक आता नियमीतपणे चिमूशीच खेळायला व्हरांड्यात येऊन तासनतास बसू लागले. रामकाका तर चिमूला मांडीवरच बसवून घ्यायचे. मग हळूच केळ्याचा लहान घास, कधी साखरफुटाणा असे तिच्या तोंडात भरवायचे. आता म्हातारा नोकर तिला उचलून न्यायला यायचा आणि रिकाम्याच हातांनी मागे जाऊन जानकीताईंना सुधाकडे न बघताच सांगायचा..

"द्येवी... मालक सोडेनात बाळाला.. आन बाळबी मालकान्ला... इप्रीत परकार... सावित्रीद्येवीचा गाव दिड वर्साच्या प्वरीनं खुळा केलाय... सुधाताय.. लक्षणं चांगली न्हाई दिसत मला... तुम्हाला हाकून द्येनार बगा मालक"

कर्माला हात लावून बसलेली सुधा या वाक्याने हादरून जानकीताईंकडे आधाराच्या अपेक्षेने पाहायची. जानकीताई तोंडाला पदर दाबून धरत हासण्यावरचे नियंत्रण सुटल्यावर स्वतःच्याच गुडघ्यांत डोके खुपसून खूप वेळ हसायच्या आणि मग वर बघून कावरीबावरी झालेल्या सुधाला म्हणायच्या..

"बाळजीवाचा लळा कोणालाही लागतोच... तू काय बघतीयस?? त्यांनी तुला हाकललं तर मी घेईन ठेवून हो?? "

लाजरे हासत मग सुधा कामाला लागायची.

व्हरांड्यात मात्र धमाल उडालेली असायची. गर्भश्रीमंत परांजप्यांच्या घरात चहापाणी आणि दुधदुभत्याला काय कमी? त्या चिमूच्या नादाने बसून राहणार्‍यांना तासाला चहा आणि काहीबाही मिळत राहायचे. हिशोब नव्हता. वेड लागायची पाळी आणली चिमूने! ती आता बोबडे बोलू लागली होती. एकेक चवी कळू लागल्या होत्या. थोडा चहा पोटात जाऊ लागला होता. पावले टाकताना पुर्वीसारखे लडखडणे होत नव्हते. तीन चार पावले सरळ व्यवस्थित टाकली जात होती. खेळणी मिळू लागली होती. गावाचं भलं राहिलं बाजूला आणि चिमूचंच भलं सुरू झालं होतं! पुरुषांचा अड्डा असल्याने गावातल्या बायकांना तेथे येता येत नसल्यामुळे त्या मागे येऊन थांबून राहायला लागल्या.

पहाटे चार वाजता उठून तालीम झाल्यावर आंघोळ उरकायला रामकाकांना सहा वाजायचे. चिमू पावणे सहालाच उठून रडू लागायची. असहाय्य झालेली तिची माऊली मग तिला व्हरांड्यात आणून बसवायची. कार्टीने तिला वैताग आणलेला होता. त्या क्षणी जी चिमू व्हरांड्यात यायची ती रात्री दहा वाजता झोपायला आईबरोबर खोप्यात जायची तितकेच! सगळे नोकर आणि गावातले नामांकित सज्जन त्या चिमूच्याच नादाला लागलेले होते.

रामकाका पूजेला बसले की चिमू मांडीवर बसायची त्यांच्या! सगळी स्तोत्रे आणि सर्व देवांची आंघोळ होईपर्यंत ती टुकूटुकू बघत बसायची. मात्र शेवटचा अभिषेक कुलदैवत विश्वेश्वराला सुरू झाला की मग सतत म्हणू लागायची..

"थंकल्ल... बप्पा... बप्पा... थंकल्ल...."

"थंकल नाही म्हणायचं बाळा... नीट म्हण बरं??? शं क र... म्हण???"

"थंकल्ल..."

"अंहं.. 'र' म्हण 'र' ??"

" .. 'य'..."

तिला 'र' म्हणता आला नाही की रामकाका हसू लागायचे. मग अभिषेकानंतर तिला खाऊ मिळाला की मग व्हरांड्यात जाऊन प्रतिष्ठितांबरोबर महत्वाची चर्चा करायला ती मोकळी व्हायची.

पुर्वी रामकाका कधी एकदा व्हरांड्यात येतात याची वाट पाहिली जायची. हल्ली चिमूची वाट पाहायला लागले होते.

ती कोणाकडेही जायची आणि कितीही वेळ न रडता बसायची. त्यामुळे अधिकच लोकप्रिय झालेली होती. तिच्या अस्तित्वासहच गावाच्या महत्वाच्या बाबींची चर्चा व्हायला लागलेली होती आता. कारण ती नजरेआड झालेली तर चालत नव्हतं आणि महत्वाची चर्चा तर व्हायलाच हवी असायची.

आणि त्या दिवशी गावावर प्रेतकळा पसरली.

हृदयविकाराचा धक्का आल्याने जानकीताई अत्यंत धक्कादायक पद्धतीने अकस्मात निधन पावल्या. रात्रीत!

गावच्या देवळातील देवीने गावच्या जिवंत देवीचा पुन्हा एकदा बळी घेतला.

परांजप्यांच्या घरात सलग चौथ्या पिढीत सवाष्ण बाई गेली.

पहिलवानगडी असलेले भरभक्कम रामकाकाही दुपारी धाय मोकलून रडले. कोणाला तो शोक पाहवेना!

जानकीताईंच्या माहेरचे येईपर्यंत संध्याकाळ उजाडली. गावात त्या दिवशी दूध पिती बाळं आणि मरणासन्न वृद्ध सोडले तर एक माणूस जेवला नाही. एक चूल पेटली नाही.

जानकीताई या जिवंत सावित्रीदेवी होत्या. गाव सुन्न झालेले होते. कुजबूज होऊ लागली होती. परांजप्यांकडे सुवासिनी जिवंत राहात नाही हे सर्वांना पटू लागले होते. हा कोप सावित्रीदेवीचाच असणार असेही वाटू लागले होते.

इकडे रामकाका एकटेच आपल्या शयनकक्षात राहू लागले होते. जानकीताईंचे तेरा दिवस त्यांनी श्रद्धेने केले होते. पण त्यानंतर स्वतःला जवळपास कोंडूनच घेतले होते. संपर्क कमी केला होता नव्हे तर बंदच केला होता. घरातील एक जुना म्हातारा नोकर आणि एक कामवाल्या आजी या दोघांनाच तेथे प्रवेश होता. तो नोकर जेवणखाण घेऊन वर यायचा तेवढेच! आणि त्या आजी खोलीची साफसफाई करायच्या. बाकी कोणीही तेथे जाऊ शकत नव्हते.

जानकीताईंचा मृत्यू हा केवळ सावित्रीदेवीचा कोप असू शकेल म्हणून रामकाका दु:खी झालेले नव्हते तर त्यांचे अपरिमित प्रेम होते जानकीदेवींवर! आयुष्याचा साथीदार असा एका रात्रीत निघून जाणे त्यांना अजूनही अविश्वसनीयच वाटत होते.

मात्र काळाने आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. अनेक दिवस असेच गेल्यानंतर गावातल्या अनेकांना रामकाकांची काही ना काही जरूर भासू लागली. येशू नावाचा एक म्हातारा मुनीम आजवर रामकाकांच्या जबाबदार्‍या कसाबसा पार पाडत होता. पण काही प्रकरणांमध्ये खरोखरच रामकाकांची आवश्यकता भासू लागली होती.

परांजपे कुटुंबातील पुरुषाला 'काका' म्हणण्याची प्रथा असायची. त्यामुळे अगदी दोन वर्षाच्या मुलालाच्या नावापुढेही काका जोडले जायचे. रामकाकांचे बालपण या गावाने पाहिलेले होते. त्यांना सगळे रामकाकाच म्हणायचे.

राम काका कधी भेटतील या मागणीचा जोर वाढू लागला तसा एक दिवस येशू हिम्मत करून वरच्या मजल्यावर आला. आजवर आयुष्यात तो केवळ आठ दहा वेळा या खोलीजवळ आला असेल. दार वाजवल्यावर आतून आवाज आला.

"कोण??"

"काका मी... येशू..."

"काय झालं??"

"गावाचे लय प्रश्न हायेत... समद्ये जमल्येत... "

"आम्हाला त्यात स्वारस्य नाही म्हणाव... आई सावित्रीने जानकीला नेले... "

चाचरत चाचरत येशूने पुढचे विधान केले. हे विधान करताना त्याने प्रचंड हिम्मत गोळा केलेली होती. आणि ती हिम्मत गोळा होण्याची कारणे होती रामकाकांच्या लहानपणी येशूने त्यांना खेळवले असण्यात!

"काका... परांजप्यांना दोन भूमिका असत्यात... एक घरची आन एक गावची... "

रामकाकांच्या कपाळावरची शीर संतापाने तटतटली आतमध्ये! बाहेर येशू हादरून थांबलेला होता.

पण अनपेक्षित उत्तर आले.

"ठीक आहे... दुपारला बोलाव सगळ्यांना... आम्ही येऊ"

आपल्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने सुखावलेला येशू धावतच खाली येऊन सगळ्यांना म्हणाला..

"मालक दुपारी यायचेत सज्जात... या जाऊन घरला.."

त्या दिवसापासून रामका दुपारपासून रात्रीपर्यंत व्हरांड्यात बसू लागले. हळूहळू साहस करून सुधाही आता पुन्हा चिमूला तेथे जाऊ द्यायला लागली.

दिवस बदलू लागले. रामकाकांच्या मनावरचा जानकीदेवींच्या मरणाचा व्रण तसाच असला तरी त्याचा रंग फिक्कट होऊ लागला. गावच्या प्रश्नांच्या चर्चेने आणि चिमूच्या बोबड्या बोलांनी!

पुन्हा पहिल्यासारखे दिवस यायला मात्र तब्बल दिड महिना लागला.

आज कित्येक दिवसांनी चिमूला मांडीवर घेऊन साखरफुटाणे खायला देताना रामकाका मनमुराद हासले.

जीवात जीव आला सावीपूरच्या! सगळेच आनंदीत होऊन पाहात होते. देवकाते म्हणून एक ज्येष्ठ होते, त्यांनी रामकाकांना अनुभवाचे चार बोल ऐकवले..

"काका... तुमचं वय ल्हान म्हून चार सबूद सांगतोय.. दु:खाला पाठी घालून म्होरं निघावं लागतंय मान्साला... दुख कुरवाळत बसनारा खंगत जातू... तब्येत बघा आपली.. घरात, गावात लक्ष देऊ लागा... द्येवी गेल्या हे ल्हान दु:ख न्हाय... आम्हीबी जानतोच... पन इसरायला हवं... इस्मृती ह्ये मान्साला मिळालेलं वर्दान हाये.."

दोन अडीच महिन्यात परांजप्यांच्या घराला पुर्वीइतकी नसली तरी बरीचशी चांगली कळा प्राप्त झाली. मात्र प्रत्येक स्मितहास्याला आणि प्रत्येक आनंदी कृतीला जिवंत सावित्री म्हणजे जानकीदेवींच्या मृत्यूच्या आठवणीची झालर मात्र राहिली ती राहिलीच!

पुन्हा चिमू पूजेच्या वेळेस रामकाकांच्या मांडीवर बसू लागली. 'थंकल' चे आता 'चंकल' झालेले होते. थ ऐवजी च आला असला तरीही ल ऐवजी र मात्र येत नव्हताच!

तिला उचलून आणायला आता पुर्वीसारखी सुधा धावत नव्हती. जानकीदेवी होत्या तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता एकत्या पुरुषाच्या खोलीत जायला अर्थातच तिला स्वतःची आणि कोणाचीच परवानगी नव्हती.

हळूहळू गावाला पुन्हा उत्साह आला. पोरे तालमीत घुमू लागली. बायाबापड्या हसू लागल्या. आणि गणपती बसण्याच्या आठ दिवस आधी गावातले जुने जाणते वीसजण पुन्हा व्हरांड्यात आले. आज मात्र त्यांचे चेहरे अतिशय गंभीर होते.

रामकाका चिमूशी खेळत हासत होते. सगळेच तिच्याशी थोडे थोडे खेळले आणि मग रामकाकांना जाणवले. आजचा नूर थोडा वेगळा दिसतो.

त्यांनी हिराभाऊंना विचारले.

"काय झालं हो भाऊ?? गंभीर का सगळे??"

हिराभाऊंनी देवकातेंकडे बघितले. सर्वात ज्येष्ठ म्हंटल्यावर विषय देवकातेंनाच काढायला लागणार होता. ते म्हणाले..

"साने ब्राह्मणाची गोदावरी लग्नाची हाये काका"

रामकाकांना आनंद झाला. चिमूला खांद्यावर बसवत ते म्हणाले...

" अरे वा?? .. मग बघा एखादा चांगला मुलगा... उडवून टाकू बार दोन महिन्यात..."

चक्रावून सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. पुन्हा देवकाते म्हणाले..

"सावित्रीद्येवीच्या उत्सवाला .... सु...सुवासि... नी"

ताडकन रामकाकांच्या कपाळावरची शीर फुगली. डोळे कधी नव्हे इतके विस्फारले. आतून जुना म्हातारा नोकर आणि आणखीन एक दोघे येऊन दाराशी लपून बसून ऐकू लागले. जमलेला जमाव खाली मान घालून आता शिव्या ऐकायला तयार झाला होता...

"काय बोलताय आजोबा???"

रामकाकांचा आवाज जहरी झाला होता. कोणाच्याच तोंडून शब्द फुटेना! पण बोलायला तर हवेच होते. देवकातेंना स्वतःची जबाबदारी माहीत होती ज्येष्ठ म्हणून!

"मी सवता बघतूय काका... गेली शहात्तर वरीस द्येवीचा उत्सव थांबल्याला न्हाई... तुमच्या घरातली सुवासिनी असायचीच... आन ह्या वर्शी मातुर तसं व्हनार न्हाय... ह्या वर्षी सावित्रीद्येवी कोप करंल... गाव बुडंल आपलं... श्येतंबितं जात्याल पाण्याखाली... इस्कूट होईल... परंपरा मोडंल... छी थू व्हईल दहा गावात.. मान्सं हासतील आप्ल्यावं.. ह्ये जरूरीच हाये काका... द्येवीचाच उत्सव न्हाई झाला तर सावीपूर काह्यला म्हनायचं गावाला आनि?? "

देवकातेंनी सगळ्यांचे विचार बोलून दाखवले होते. रामकाका मात्र जमीनीकडे ताठ नजरेने पाहात होते आणि समोरची फरशी क्रोधाने जाळत होते. चिमूला त्यांनी कधीच खाली उतरवले होते. ती मधेमधे बडबड करू लागली तसा म्हातारा नोकर अदबीने येऊन रामकाकांना सलाम करून तिला उचलून घेऊन जाऊ लागला. रामकाकांनी त्याला हाक मारली...

"लहू... मुलीला आत सोडून बाहेर येऊन बस..."

आजवरच्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली नव्हती लहूवर! हादरून तो चिमूला आत सुधाकडे देऊन सगळ्यांमध्ये येऊन बसला खरा, पण बरचसं अंतर राखून!

"लहू... गाव काय म्हणतंय ऐकलस का??"

लहू गार पडलेला होता. या विषयात आपल्याला सर्वांसमक्ष बोलायला लागेल असे त्याला कधी वाटलेच नव्हते. पण तेवढ्यात रामकाकांनी त्याला आधार दिला.

"लहू... मनात जे आलं तेच बोल .... शब्दांना खोटे मुलामे देऊ नकोस... तू हे घर उभं केलेलं आहेस कित्येकदा... मोठा आहेस या घरातला तू... आम्हाला चार शब्द शिकवायची तुझी पात्रता आहे... मनापासून बोल"

गावाला विचित्र दृष्य बघायला मिळालं! लहू ताडकन उठला आणि रामकाका या आपल्या निम्या वयाच्या माणसाच्या पायावर त्याने लोळण घेतली. रडत रडत म्हणाला...

"धनी... इतकं बी मोठं नका करू मला... पर येक सांगतो... त्येबी बापाच्या वयाचा हाये म्हून आणि तुमीच परवानगी दिल्यासा म्हून.. फत्तरात द्येव नसतूय धनी... सावित्रीद्येवी फत्तर हाये... जानकीद्येवी खरी द्येवी व्हत्या.. ह्यो म्हातारा काय बकतूय म्हन्तील समद्ये... पर धनी... परांजप्यांत सवाष्ण राहिना ह्ये सावित्रीद्येवीचं कामच न्हाय.. ह्ये प्रारब्ध हाये... आस्लं काय करू नका... उत्सवाला सवाष्ण लागतीय ह्ये मान्सांनीच ठरीवलं हाय... माझ्या जिंद्गीत कधी मी पाह्यलेलं नाय सावित्रीद्येवी उत्सव करा म्हन्तीय आसं.... पर एक हाये मातुर... तुमच्या जिद्गीला अर्थ यावा म्हून जर द्येवी आन्नार असाल घरात... तर मातुर जरूर आना.. पर त्ये तुमच्यासाठी धनी... द्येवीसाठी आन गावासाठी न्हाय"

थक्क झालेले होते सगळे! एक रामकाका सोडून! कारण त्यांच्या मनातील लहूबद्दलचा आदर वाढलेला होता. घरातील इतर सर्व नोकर मात्र हादरलेले होते. हा लहू इतकं बोललाच कसं म्हणून!

देवकातेंकडे बघत रामका म्हणाले...

"बघितलंत आजोबा... मलाही हे पटतं... जे लहू म्हणाला... आणखीन एक लग्न करून त्या मुलीला या घरात नांदवायची ती काय फक्त देवीसाठी?? आणि त्याच देवीने सवाष्णी नेल्या म्हणता ना?? मग जरूर काय आणखीन एक सवाष्ण घरात आणायची???"

आता मात्र हद्द झलेली होती. परांजपे कुटुंबाचा उरलेला एकमेव वंशज महार जातीच्या लहूचे ऐकून थोरामोठ्यांना अक्कल शिकवू लागला हे कोणालाच सहन होईना! हिराभाऊ भडकले लहूवर!

"लहू... अक्कल हाये का चारचौघात कोनाला काय बोलावं ती?? आं?? ल्येका पदरच्या प्वारावानी तुझ्या पिढ्यांना हित्त दानापानी द्येत आलं परांजपे... आनि एक सबूद बोलायची परवानगी काय मिळाली अक्कल शिकवतूयस व्हय?? आं?? आत जाऊन हिरीत जीव द्ये तू... कोनासमूर बोलतूस??? "

घाबरलेला लहू रामकाकांना सलाम आणि देवकाते आणि हिराभाऊंना नमस्कार करून आत गेला.

आता हिराभाऊ रामकाकांशी बोलायला लागले.

"काका... परांजपे खानदानाचं एक आणखीन कर्तव्य बी आसतंय... त्ये म्हन्जे गाव सांभाळणं... गावाला दोन्ही द्येवी हव्या हायेत... तुम्ही सुवासिनी आन्ली न्हाईत तर समद्या गावाचं वाटूळं व्हनारे.. मंग काह्यला राबायचं तुमच्यात??? काह्यला म्हसूल आनून द्यायचा?? काह्यला सांगायचं पाहुण्यांत की आमी सावीपूरचं हावोत... काह्यला हित्तं यून गावाचे परस्न सुटतील अशी आशा धरायची?? गावाची मागनी हाय ही... तुमचं वय ल्हान पर मान मोठा.. म्हून आदराने इनंती करतूय सगळे... पर गावाला जित्ती द्येवी हवीच... तवाच सांगू सावीपूरचं रहिवासी आम्ही आसं... ही मागनी फेटाळू नका काका... "

संपूर्ण गाव आपल्याविरुद्ध उलटत आहे हे पाहून मात्र रामकाका चरकले.

त्यांनी वेळ मागून घेतला.

आणि दहा दिवसांनी सर्वांसमक्ष म्हणाले की साने ब्राह्मणाला येथे बोलवा. त्याच्याशी बोलणी करा.

दोन तरुण सानेला आणायला धावले. अर्ध्या तासात साने लगबगीने येऊन पोचला आणि त्याला त्या तरुणांनी सगळीच कहाणी येताना सांगितलेली असल्याने आला तोच रामकाकांच्या पायावर पडून रडत म्हणाला..

" काका... आम्ही गरीब माणसं आहोत हो... आम्हाला माफ करा... मला एकच मुलगी आहे... आणि ती... ती मरावी असं मला... नाही वाटत मला... "

अंधश्रद्धेने युक्त अशी मने होती सगळ्यांची!

त्या ब्राह्मणाला परोपरीने सगळ्यांनी सांगितले की असे काही होणार नाही. पण ते स्वतःला कोणालाच मात्र पटत नव्हते. गेल्या चार पिढ्यात तेच झालेले होते. ब्राह्मण ऐकेना!

शेवटी धाक दाखवल्यावर ब्राह्मण म्हणाला की एका अटीवर तो लग्न लावून देईल मुलीचे या घरात! त्याचा आणि त्याच्या बायकोचा गावाने खून करून टाकायचा. असला आक्रस्ताळेपणा पाहून शेवटी रामकाका भडकले आणि सगळ्यांनाच हाकलून दिले. तोंडे पाडून सगळेच परतले.

रामकाका अतिशय गंभीर होऊन विचार करत होते. हा काय प्रसंग उद्भवला म्हणून नशिबाला दोष देत होते. उद्या आपण लग्नच केलं नाही आणि सावित्रीदेवीची नवरात्रात पूजा झाली नाही तर हे लोक आपल्यालाही खलास करायला मागे पुढे पाहायचे नाहीत हे त्यांना जाणवले. जीव कोणाला प्यारा नसतो???

दुसर्‍या दिवशी त्यांनी निरोप पाठवले. सगळे जमले. रामकाका म्हणाले...

"कोणी गरीब ब्राह्मण घरची मुलगी बघा... कोणत्याही गावातली असो... तिच्या माहेरचं आपण भलं करू... "

आदेश सुटला तसा जो तो लगबगीने हात धुवून घेता येतील म्हणून स्वतः स्थळे शोधू लागला. आलेल्या दहा ते बारा परगावातील स्थळांपैकी आठ स्थळांनी स्वतःच निक्षून नकार दिला.. त्यांना इतिहास माहीत होताच. उरलेल्या स्थळांनी अवाच्या सवा मागण्या केल्या. त्या पूर्ण करणे अशक्य नव्हतेच! पण त्या मुली एकतर वेडसर तरी होत्या किंवा व्यंग तरी होते. परांजपेंनी स्वतःच नकार दिला. वेळ भराभर जात होता. गणपती विसर्जन पार पडूनही काही दिवस झालेले होते.

निराश मनाने सगळेच आज पुन्हा जमले. खिन्न सावट प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते. देवकाते म्हणाले...

"आधीपास्नंच परयत्न क्येले आस्ते तर झालं आस्त... परांजप्यांनी गावाचं ऐकायलाबी येळ लावलाच... "

रामकाकांना आता रागावणे शक्य नव्हते. कारण आता त्यांना गावाचीच भीती वाटू लागली होती. आजकाल लोक व्हरांड्यात बसतानाच जणू हक्काने आणि चिवटपणे बसल्यासारखे बसायचे. त्यामुळे ताण वाढायचा.

त्यातच रामोशी जातीचे पण स्वतःची मोठी जमीन असलेले किसनमामा बोलू लागले.

"परांजप्यांवं... आमी इच्चार करून आलो हावोत... जरा लकश द्या... समद्यांच्याच भल्याचा उपाव हाये.."

रामकाकांनी मामांकडे पाहिले.

"बोला??? काय उपाय आहे मामा??"

"आमी... आमी आसं ऐकल्यालं हाये की.... की... ह्यी जी पोरगी हित्तं खेळतीया... ती... म्हन्जी तिची आई बामन हाये... "

हे वाक्य ऐकून आत स्वयंपाकघरात असलेला नोकर अन नोकर थरथरला. देवघरातील शिवलिंगही थरथरले असेल. रामकाका तर हिंस्त्रच दिसू लागले होते. आतमध्ये सुधाच्या शरीराला इतका कंप सुटला होता की चक्कर यायची बाकी होती.. रामकाकांचा अवतार पाहून बोबडी वळला रामोशी मामा पुढे म्हणाला...

"पुरतं ऐका परांजप्यावं... "

त्याला अडवून घुसमटत्या आवाजात रामकाका संतापून म्हणाले...

"हरामखोर... मामा मामा म्हणून तुम्हाला आदर देत गेलो... घरच्याच नोकरचाकरांची स्थळं आणता मला??? नालायक??? ती ब्राह्मण आहे हे माहीत असलं तर हेही माहीत असेल की आम्ही तिला बहीण मानतो... होय ना??? आणि ... आणि हेही ऐकून ठेवा माहीत नसलं तर... की... की ती बाई विधवा आहे... सावित्रीदेवीसाठी विधवा पुन्हा सवाष्ण झालेली चालते वाटतं सावीपूरला... ?????"

घराच्या भिंतीसुद्धा हादरतील असा तो घुसमटलेला आवाज होता. आतमध्ये सुधाच्या काळजाचं पाणीपाणी झालं होतं! आजवर काढलेल्या निष्कलंक आयुष्याकडे आता बघताना गावातले लोक, घरातले सगळे नोकर आणि खुद्द घरमालक रामकाका गढूळलेल्या नजरेने बघणार होते... आत्महत्या हा एकच पर्याय बाकी आहे असे तिचे मन तिला सुचवूही लागलेले होते....

जानकीदेवी गेल्यापासून जणू गावातील सगळा शहाणपणाच संपला होता.

बरच वेळ घाबरून नि:शब्द झालेले गावकरी आता एकमेकांकडे पाहू लागले. आणि मग धीर धरून हिराभाऊ म्हणाले...

"काका... रामोश्याचं पुरतं ऐकलं न्हाईत आपन... ती बाई विधवा हाये... ह्ये... ह्ये समदं गाव जान्तंच... "

रामकाकांनी चक्रावलेल्या नजरेने विचारले...

"मग?? मग हा प्रस्ताव मांडलाच कसा मामांनी??"

"परस्ताव आपन ऐकलाच न्हाईत धनी... आमी त्या बाईबाबत बोलतच न्हाई हावोत... "

"... मग?????"

"आपली... आपलीच आश्रित आसलेली ती बाई.. आपल्याच जातकुळीची हाये.. "

".... म्हणजे??? "

"ती... आपलं ऐकनारच..... "

"काय???? "

"ती... सवताची.... सवताची पोरगी तुम्हास्नी... द्यायला.... तया... र... व्ह.. ई...."

रामकाकांनी आयुष्यात पहिल्यांदाच उच्चारलेल्या शिव्यांच्या बरसातीत आणि टिपेला पोचलेल्या आवाजाच्या लहरीत एकेक गावकरी व्हरांडा सोडून घाबरून निघून चाललेला होता.

तिकडे खुद्द सावित्रीदेवीची मूर्तीही हादरून थरथरली असेल ही कल्पना ऐकून! देवघरातले शिवलिंग डचमळले असेल! माजघरात असलेल्या सुधाला मूर्च्छा आलेली होती ते ऐकून.. तिला उचलून तिच्या खोप्यात घेऊन गेल्या काही बायका... लहूने चिमूला मांडीवर घेऊन तिचे लक्ष वळवायचा प्रयत्न सुरू केला....

रिकाम्या झालेल्या व्हरांड्यातून आता रामकाका प्रचंड संतापात आपल्या खोलीत चाललेले होते... जाताना त्यांना लहूच्या मांडीवरची चिमू दिसली. नेमकी तिचीही नजर त्यांच्याकडेच गेली तशी ती सुटण्यासाठी उसळ्या मारू लागली. लहूने तिला सरळ उचलून बाहेरच नेले... रामकाकांचा पहाडी आवाज घरात घुमला... प्रत्येक जण थरथरला...

"लहू????????"

हादरलेला लहू अंगणात चिमूला तशीच सोडून आत धावला....

"पुन्हा ती पोरगी आम्हाला दिसता कामा नये.... आमच्या नजरेस ती पोरगी पडली तर तुला कोयता डोक्यात घालून मारून टाकेन... "

संतापलेले रामकाका आपल्या खोलीत निघून गेले.

सावीपूरमध्ये अभद्र शांतता पसरली असली तरी हाकलून दिलेले गावकरी पुन्हा जमून संतापून चर्चा करत होते. त्यांच्यामते सावित्रीदेवीच्या उत्सवाला परांजप्यात सुवासिनी असणे व नसणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता. पुन्हा रामकाकांवर प्रेशर आणायलाच हवे असे ते ठरवत होते.

इकडे तिन्हीसांजेच्या अंधुक प्रकाशात लहू म्हातार्‍याने जवळचे साठवलेले एकशे तीस रुपये सुधाताईला देऊन तिला चिमूसकट घराच्या बाहेर काढले. तिला काही टांगा मिळेना! मग तिला घेऊन तो वेशीपर्यंत चालत गेला. तेथून एखादा टांगा मिळेल असे त्याने तिला सांगितले आणि घाबराघुबरा होत घरात परतला. परतताना त्याला वाईट वाटत होते की एका गरीब विधवेला लहान मुलीसकट आपण सोडून दिले. पण स्वतःच्या जीवाची गावकर्‍यांकडून भीती असल्याने पर्याय नव्हता. आता तो सुटकेचा नि:श्वास टाकत होता की सुधा एकदाची गेली.

पण पंधराव्या मिनिटाला मागच्या अंगणात दहा गावकरी सुधाला घेऊन जमले जमले आणि त्यांनी रामकाकांना ऐकू येणार नाही अशा पद्धतीने घुसमटत्या आवाजात लहू म्हातार्‍याला ठोकून काढले आणि धमकी दिली की गावातली जिवंत देवी म्हणजे चिमादेवी हिला जर त्याने गावातून पसार करण्याचा प्रयत्न केला तर तो मरेल.

हळूच लहूने त्यांना एका खोलीत लपवून ठेवले. चिमाने आवाज करू नये म्हणून सुधाने तिला थोडीशी अफू चाटवली आणि चिमा झोपून गेली.

रामकाका जेवलेले नव्हते. दारही उघडत नव्हते. लहूमध्येही वर जाऊन दार ठोठावण्याची हिम्मत नव्हती. गावकर्‍यांनी सुधाला घरात आणून सोडताना सुधालाही काही फटके लगावलेले होते. ती जीवाच्या भीतीनेच वावरत होती.

शेवटचा पर्याय म्हणून रात्री दहा वाजता ती एकटीच वरच्या खोलीत गेली. या खोलीत आजवर तिने पाऊल टाकलेले नव्हते. ही खोली कशी आहे हे इतक्या वर्षात तिला माहीतही नव्हते. दार वाजवल्यावर आतून संतप्त उत्तर आले.

"कोण आहे??? दार वाजवायचे नाही समजत नाही का??"

बराच वेळ घाबरून तशीच थांबली ती! खालच्या मजल्यावरून लहू वर टकामका बघत होता. त्याची इच्छा होती की सुधासाठी धन्यांनी दार उघडूच नये, नाहीतर ते तिला मारूनही टाकतील इतके संतापलेले आहेत.

पण सुधाला आर या पार करणे आवश्यकच होते. तिने पुन्हा हलकेच दार वाजवले आणि त्याचक्षणी अतिशय संतापलेल्या रामकाकांनी दार वाजवत विचारलेला प्रश्न अर्धाच राहिला...

"सांगतोय ना दार वाजवा......... ...... ... तू????????"

सुधाला रडू आवरेना... उंबर्‍यातच रामकाकांच्या पायांवर कोसळली ती... अश्रूची धार त्यांच्या पावलांवर वाहात रडत रडत म्हणाली...

"मला माफ करा दादा... मला सोडून द्या... मला गावाबाहेर जायचं आहे.... लोक जाऊ देत नाहीयेत... माझ्या मुलीला वाचवा... "

संतापलेल्या रामकाकांनी तिची वेणी धरूनच तिला फरफटत आत नेले आणि उभे केले. भीतीने कापत असलेल्या सुधाच्या डाव्या गालावर रामकाकांचा उजवा हात फाडकन बसला तसा तिचा आवाजही फुटेना! केवळ वेणी त्यांच्या हातात राहिल्याने ती खाली पडली नव्हती इतकेच! तोवर लहू धावत वर आला होता आणि त्याने झटापट सुरू केली तसा त्यालाही रामकाकांचा प्रसाद मिळाला.

रामकाका सुधाला म्हणाले...

" नालायक.... आता तुझी मुलगी काय?? आजवर आमच्या मांडीवर हागली मुतली तेव्हा आमची मुलगी होती काय?? खाऊन खाऊन गबदूल झाली तेव्हा आमची मुलगी?? आं??? तुझी अवस्था पाहून घरात ठेवून घेतले ही आमची चूक?? तुझ्यावर उपकार केले ही आमची चूक?? नक्कीच असेच काहीतरी कारण असणार तुला तुझ्या सासरच्यांनी हाकलून देण्याचे... आज मुलगी वाईट अवस्थेत पोचायला आली तेव्हा स्वतःची मुलगी आठवली रांडे??? "

सुधा मार खातच होती. अनेक नोकर वर आले होते. कोणालाच रामकाका आवरत नव्हते. शेवटी एकदा त्यांचा राग थोडासा कमी झाल्यावर मार खाल्लेली सुधा कशीबशी खाली गेली. कोणाचा तरी राग कोणावर तरी निघाला इतकेच! सुधाला मार खाल्ल्याचे वाईट वाटत नव्हते. आपली मुलगी परांजप्यांची पत्नी होणार याचे वाईट वाटत नव्हते. ती त्यांची पत्नी होऊन मेली असती तरी सुधा जन्मभर येथे फुकट राबली असती. पण तो जीव चिमणा होता. या वयात असल्या कारणासाठी लग्न होणे तिला मान्यच नव्हते. पण नालायक अंधश्रद्धाळू गावकर्‍यांपुढे काही चालेनासे झालेले होते. तिने मनाशीच विचार केला होता. आज रात्रीच चिमूचा गळा दाबायचा आणि आपणही वीष खायचे.

रामकाका मात्र पलंगावर पडून हतबल होऊन आक्रंदत होते. बर्‍याचे वेळाने शांत होऊन ते खाली आले आणि सर्व जाग्याच असलेल्या नोकराचाकरांना अद्भुत दृष्य पाहायला मिळाले.

रामकाका आले ते थेट सुधासमोर बसलेच! हात जोडून म्हणाले...

"माझी बहिण आहेस तू... मी हात जोडतो... हवे तर ते चुलीतले लाकुड घेऊन मला मार... पण हे इतके मात्र होऊदेत सुधाबाई... इतके मात्र होऊदेत... अगं माझ्या अंगाखांद्यावर वाढलेले बाळ आहे ते... बघ कसे निरागसपणे झोपले आहे... पण आपले हे नालायक गाव.... त्यांना पडली आहे दगडाच्या मूर्तीची काळजी... मी जमेल तितक्या लगेच दुसरे लग्न करेन सुधाबाई... तोवर हिला माझी पत्नी म्हणून... वावरू... देत...."

जमीनीवर डोके ठेवून रामकाका स्फुंदुन स्फुंदून रडत होते. लहू म्हातार्‍याने पाठ थोपटली तसे त्याचे पाय धरत रामकाका रडत म्हणाले...

"लहू... तुझ्या अंगाखांद्यावर रे वाढलो मी... होय ना??? दोन फटके का ठेवून दिले नाहीस महारा मला???... का जात आडवी आली तुझी???... अरे अधिकार आहे तो तुझा... मार... मार मला... "

लहू कधी नव्हे असा रडला. सगळेच रडत होते.

==================

चिमू आता आठ वर्षांची आहे... सगळ्यांनी अनेक वर्षे समजूत घातल्यामुळे रामकाकांपासून आपण लांब राहायचे हे तिला समजलेले आहे. लहू म्हातारासुद्धा तिला सलाम करतो.... दरवर्षी नवरात्रात ती देवीच्या उत्सवाला रामकाकांच्या शेजारी उभी राहते... जिवंत देवी शाळेत कशी जाईल म्हणून चिमू शाळेत जात नाही... तिची आई तिला घाबरून सन्मानाने वागवते.. अगदी आईचे वात्सल्यही जपूनच देते तिला... आई खोप्यात राहते आणि चिमू घरात खालच्या मजल्यावर... आता चिमूला र केव्हापासूनच म्हणता येतो... रामकाका महिम्न म्हणत असताना ती खालच्या मजल्यावर हळूच पुटपुटते...

आसमाप्तं इदं स्त्रोत्रं पुण्यंगंधर्वभाषितं
अनहुप्यंमं मनोहारि शिवं ईश्वरवर्णनं
इत्येषा वांग्मयीपूजा श्रीमत्शंकर पादयो:
अर्पिताहतेनदेवेषा प्रीयताममे सदाशिवः

तव तत्वं न जानामी कीदृषोसी महेश्वरः
यादृषोसी महादेवः तादृषाय नमोनमः
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः
सर्वपापविनिर्मुक्तं शिवलोकेच महीयते

परांजप्यांना पुढचा वंशज पाहिजे म्हणून गावकरी मागे लागलेले आहेत. जिवंत देवीला मालकी हक्कांची जाणीव होऊ लागली आहे. तिलाही रस्त्यात सलाम झडतात. फक्त एकच फरक पडला आहे.

रामकाका तिच्याशी एक अक्षरही बोलत नाहीत. तिच्या निरागसपणाला मायेची उब द्यायला त्यांचे हात आता धजत नाहीत.

=======================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

तू हे घर उभं केलेलं आहेस कित्येकदा... मोठा आहेस या घरातला तू... आम्हाला चार शब्द शिकवायची तुझी पात्रता आहे... मनापासून बोल" >> __^__!!

लिखाण छान झाले आहे न थांबता वाचत रहावेसे वाटले.

mast aahe....andhshraddha , aani pratishthaa .. yanchi haav manasala kontya thikani aanun thevate....yaache chhan chitran kele aapan...

कथा आवडली Happy
पण 'कर्ट' 'पोझिशन' ह्यासारखे इंग्लिश शब्द कथेतल्या वातावरणात खूपच विसंगत वाटत आहेत. ते चुकून वापरले गेले आहेत का ?
दुसरं म्हणजे रामकाकांच्या बायकोने बाळाला 'चिमू' नाव दिले, त्याआधी तिची आई तिला कुठल्याही नावाने हाका मारायची असे तुम्ही लिहिले आहे पण सुरुवातीला सुधा तिच्या मुलीचे नाव 'चिमा' असेच सांगताना दाखवले आहे.

आवडली म्हणाणार नाही बेफी.. सुन्न मात्र झाले
मानवी स्वभाव आणि मानसिक प्रेशर मुळे कश्या प्रकारची हतबलता येऊ शकते, ते वाचून सुन्नता आली.

(तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह लिखाण, एखाद्याला "जगण्याची" उर्मी मिळवून देणारे, अतिशय प्रभावीपणे करू शकाल- एक माईल्स्टोन असल्याप्रमाणे, असे वाटत राहिले एकंदर वाचन करताना- वैम- विचार करा पटलंच तर)

Pages