मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ्या मिरी सारखी दिसणारी सुकलेली<<<< तिरफळ हे एक मिरमिरीत चवीचं काटेरी झाडाचं फळ आहे. वाळल्यावर ते उघडतं, आणि त्यातून काळी बी बाहेर पडते. आमटीत अगर वाटणाला चव येते ती त्या सालानी, काळ्या बी ने नव्हे..

विनय Wink

परीक्षा म्हटली की आंगार काटो येता. बापूस सांगता रतांबे वेचूक चल, आये सांगता 'काजी कोण सुकत घालतलो, तुजो बापूस?'. आजियेचा म्हनना 'लिना लिना भिकार चिना'. मास्तर ये तोंडा जा तोंडा गाळी घालतत, पास नाय झालंय तरी तेंका तरास. एकादो मंत्री नायतर मोटो माणूस धापू झालो असतो तर दोन चार दिस सुट्टी गावतली होती, अभ्यास करूक. कदी वाटतां, व्हया कित्याक ह्यां शिक्षाण? शेवटी 'हिरी हिरी फापारी...' करुचांच हा. पण वाटता कदीतरी शिकान मास्तर नायतर गरामशेवक झालंय, तर चार लोक माकाय मान देतीत. पोरां भाजीपालो आणून घराक देतीत, आणि मियां पण गाळी घालून काय जायना चार पोरांक चार बुकां शिकवीन...

विनय Wink

सगळो परिच्छेदच मजेशीर पण गरामशेवक एकदमच झकास! Lol

विनय मस्त Lol
आता खरो कस विद्यार्थ्यांचो Happy

अरेच्च्या सगळे गेले वाटतं विकांताला सुट्टीवर ...

परीक्षा म्हटली की आंगावर काटा येतो. बाप सांगतो रतांबे(आमसोल किंवा कोकमाची फळं) वेचायला चल, आई म्हणते, 'काजू कोण सुकत घालेल, तुजा बाप?'. आजीचं म्हणनं 'लिना लिना भिकार चिना'. मास्तर येता जाता शिव्या घालतात, पास नाही झालं तरी त्याना त्रास. एखादा मंत्री नाहीतर मोठा माणूस मेला असता तर दोन चार दिवस सुट्टी मिळाली असती, अभ्यास करायला. कधी वाटतं, हवं कशाला हे शिक्षण? शेवटी ('हिरी हिरी फापारी...') करायचेच आहे. पण वाटते कधीतरी शिकून मास्तर नाहीतर ग्रामसेवक झालो, तर चार लोक मलाही मान देतीत. पोरं (विध्यार्थी) भाजीपालो घरी आणून देतील, आणि मी पण शिव्या देउन का होईना चार पोरांना चार बुकं तरी शिकवीन...

विनयानु ह्या हिरी हिरी फापारी म्हणजे .. मराठित.. पुन्हा येरे माझ्या मागल्या.. तसे आहे का ? (कितिही शिकले तरी पुन्हा हे घरचे कामच कराय्चे आहे ह्या अर्थाने ) ???

लिना लिना भिकार चिन्हा ह्या म्हणिचो पण अर्थ लागूक नाय. मिया तर जुन्यो हितगुजवर शोधान शोधान दमलंय Sad लई म्हण्यो गावल्या.. पण ह्या खयच नाय... Sad

<<'लिना लिना भिकार चिना'. >> लिना म्हणजे लिहिणे. जुनी लोकं शिक्षणाला बोटचं मोडायची म्हणुन ते तस म्हणायचे.. शिकुन कोण मोठं झालय? असं. <भिकार चिना> भिकारपणाचं लक्षण.

<<('हिरी हिरी फापारी...')>> शेत नांगरताना शेतकरी बैलाला असं म्हणत असतो. म्हणजे एकुण असं म्हणायच आहे की, किती शिकलो तरी शेतीच करायची आहे ना?

एक ठळक चूक आहे लिखाणात >>>एकादो मोटो माणूस धापू झालो असतो ?

मास्तरानु माजा भाशांतर करुक खय चुकला काय ? की तुम्ही हय लिवलेल्या उतार्‍यात एक चूक हा ?
माका कळणा नाय.

बरोबर ... एकादो मोठो माणूस धापू झालो.. (एकादा मोठा माणूस मेला असता)..

विनय Wink

एडीटलं Happy
झाला चं मेला Lol

शाळेक सुट्टी पडली ? कोणच नाय ता... ना मासतर ना विद्यार्थी .. खय रवले सगळे ?

गुरुजी जरा कामात हत.. येतले आज उद्या...

विनय Happy

फाट होवच्या आदीच आयेन कमरेत लात घातली. 'मेल्या उठ, कुळथाक जावंक होया,' म्हणाली. शेजार्‍याचो कोंबोय आजून तेच्या हातरुणात होतो. भायर बगलंय तर आजून रात तशीच सांडलेली. फटाफटा कंदील मात्र पेटले घरातले. पाटिये कपळार घेवान सड्याची वाट धरली तेव्हा तीन/चार वाजले असतीत. कुळीथ काडुक अश्या येळाकच जावचां लागता. रातीच्या दवार शेंग भिजल्यार ती पटकन फुटणां नाय. दिवस वरतो येवच्या आधी कुळीथ उपटून घरात येवाक होयो. नायतर मगे शेंग थयंच फुटतली मगे घराक काय येवचां नाय.

विनय Happy

ह्या माका म्हायतच नव्हता! नवीन माहिती. धन्यवाद विनयदादा Happy

एके काळी शेतात काम केल्लंय मी आमच्या घरच्या... मगे भात पेरणां, तरवो लावणां, शाकारणी, शेंगदाणे, कुळथाची शेती, परडां, मिरचे, काजी, आंबे, रताम्ब्यापर्यंत सगळांच करूचां पडता नाय शेतकर्‍याच्या घराक. फक्त जॉत धरुक देत नाय, बैलाक काय तरी इजा होयत म्हणान. थयली सगळी म्हायती..
विनय Happy

>>तरवो लावणां >>

तरवो लावणां म्हणजे काय? भाताची रोपां काय?

पहाट होण्याच्या आधीच आईने कमरेत लाथ घातली. 'मेल्या उठ, कुळीथ काढायला जायचे आहे,' म्हणाली. शेजार्‍यंचा कोंबडा आजून आरवला नव्हता. बाहेर पाहील तर अजून रात्र ****. घरातले कंदील मात्र पेटलेले दिसत होते. टोपली डोक्यावर घेवुन **** वाट धरली तेव्हा तीन/चार वाजले असतील. कुळीथ काढायला अश्या वेळेलाच जावे लागते. रात्रीच्या दवाने शेंग भिजल्यावर ती पटकन फुटत नाही. दिवस उजाडायच्या आधी कुळीथ उपटून घरात यायला हवे. नाहीतर मग शेंग तिथेच फुटणार, आणि मग घरी आणायला काही जमणार नाही.
====================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

सांडलेली: पडलेली.
सड्याची: सडा: टेकडीच्या उतारावरची जमीन. इथे सहसा पावसाच्या दिवसात शेती होते...
घराक काय येवचां नाय: घरी ते दाणे येणार नाहीत...

विनय

मास्तरानु १०० पैकी किती गुण?? पोरांका वायच गुण पण देवा. पोरा अजून आनंदान शिकतीत मगे Happy

सतिशाक नव्वद टक्के...

'बेगी बेगी काडा रे... बाबल्या निजलस काय? कावळे आरडाक लागले, दिवस उगवाक इलो दिसता', तात्यान साद घातली. थंडी तर हाडापर्यंत लागा होती. कंदीलाच्या उजेडात फक्त चार तोंडाच दिसा होती. लांबसून कोणी बगल्यान तर 'भूतां' वाटान भियालो असतो. म्हदीच करडात कायतरी वळवळलां.
'बाये माजे, किरडू इलां की काय?' तायल्यान इचारल्यान.
'गो, किरडू इलां तरी कंदीलाक भियातलां... पण दगडार काय ठेव नको हां, एकादो विंचू निगालो तर..,' आये बोलतली होती, पण विंचू म्ह्टल्यार तायल्यान आरड मारून दिली.

'लवकर लवकर काढा रे... बाबल्या झोपलास काय? कावळे ओरडायला लागलेत, दिवस उगवायला आला असे दिसतेय', तात्याने हाक मारली. थंडी तर हाडांपर्यंत लागत होती. कंदीलाच्या उजेडात फक्त चार तोंडेच दिसत होती. लांबवरुन कुणी बघीतले तर 'भूते' वाटुन घाबरला असता. मध्येच **** काहीतरी वळवळले.
'आई ग! , सापाचे पिल्लु आले की काय?' ताईने विचारले.
'अग, सापाचे पिल्लु आले तरी कंदीलाला घाबरेल... पण दगडावर काही ठेवु नकोस, एखादा विंचू निघाला तर..,' आई बोलणार होती, पण विंचू म्ह्टल्यावर ताईने ओरड मारून दिली.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

किरडू: कोणत्याही प्रकारचा साप...
कराडः सुके गवत...

सतिशः ९५ गूण... (हल्ली एकच विद्यार्थी दिसतो)...

आट वाजले तशी शेंग फुटाक लागली. आता उद्याची वात बगुक होई. मिया घराकडे जावन निजान देतलंय होतंय. फाटिये उचलून आम्ही वाटेक लागलों. आयेन रातीच खळां सारवन ठेवललेन. पत्यारो काडूक एकदा वाडवण फिरवलेन आणि पाटिये खळ्यात रिकामी केल्यो. आता निंबार चडासर काय करूक नको. दुपारी दांड्यान झोडले काय कुळिथ आणि भुसो एकत्र झातलो. मगे आये वार्‍या देतली आणि रात्री कुळथाचा सांबारा.. आतापुरती भाकरी बरी..

आठ वाजले तशी शेंग फुटायला लागली. आता उद्याची वाट बघायला हवी. मी घरी जाउन झोप काढतो झालं. पाट्या उचलून आम्ही वाटेला लागलो. आईनं रात्रीच खळं सारवून ठेवलेलं. पालापाचोळा (केर) काढायला एकदा केरसूणी फिरवली आणि पाट्या रिकाम्या केल्या. आता उन चढेपर्यंत काहीही करायला नको. दुपारी दांड्याने कुळीथ झोडले की भूसा एकत्र होईल. मग आई वारा देईल आणि रात्री कुळथाचा सांबारा... आतापुरती भाकरी बरी...

पत्यारो आन वाडवण माका कळणा नाय.
पालापाचोळा आणी केरसूणी बरोबर आहे का ?

९८ मार्काचो पेपर सोडवल्यान. Happy

(हल्ली एकच विद्यार्थी दिसतो)...>>> मिया हयसरच हा.. पण काय तो ओव्हर कॉन्फीडन्स इलो हा ना मगे गॄहपाठ करुक नकोसा वाटता Uhoh

****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

१०० मार्क तुका... (पत्यारो आणि वाडवण बरोबर)..
विनय Wink

गुरुजी, अधुन मधुन एखादा मराठी उतारा देऊन तो मालवणीत भाषांतर करायला द्या. कारण माझ्या समोर कुणी मालवणी बोलत असेल तर त्याचे बोलणे बरेचसे कळते. पण मला जे काही सांगायचे आहे ते मनात मराठीत तयार असते. परंतु त्याला पर्यायी मालवणी शब्द माहीत नसल्याने संभाषण मालवणी व मराठी असे मिश्र होते.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

मास्तरानू सतिषाक अनुमोदन Happy
ह्या १०० टक्के खरा सांगल्यान सतिषानं. माका पण तोच प्रोब्लेम हा. मालवणी समजूक लागला हा पण बोलुचा काय कधी कधी काहीच जमणा नाय. Sad
गजालिर रोज जातंय .. नमस्कार गजाली करानूच्या पल्याड कायच नाय. Sad
****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

Pages